परीक्षण: जोकर


आपल्या रोजच्या आयुष्यात आपण सतत काही आकड्यांच्या संपर्कात येत असतो. काही दुर्घटना घडली, तर मृतांचे आकडे, जखमींचे आकडे, नुकसानाचेही आकडेच. स्थलांतरित मजुरांचे आकडे, स्टेशनवर चेंगराचेंगरीत ठार झालेल्यांचे आकडे. मंदीमुळे नोकऱ्या गेलेल्यांचे आणि देशोधडीला लागलेल्या कुटुंबांचे आकडे. ढिसाळ कारभारामुळे झालेल्या अपघातांच्या बळींचे आकडे, दंगलीत मारले गेलेल्यांचे आकडे. आणि समाजाकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे रोज शरीराने आणि मनानेही झिजत जाऊन जगणं असह्य झालेल्यांचे आकडे. एक आकडा हे माहिती मांडण्याचं इतकं सोयीस्कर माध्यम आहे की त्या प्रत्येक आकड्यामागे एक माणूस, एक जीवन असतं ही बाब आपण किती चट्कन विसरून जातो. त्यामुळे जेव्हा अशाच एका ‘आकड्याच्या’ रोजच्या आयुष्यात आपल्याला सरळ उचलून फेकलं जातं, तेव्हा आपल्या belief system च्या सगळ्या पायालाच हादरे बसायला लागतात. २०१९ मध्ये आलेला टॉड फिलिप्स दिग्दर्शित ‘जोकर’ हा सिनेमा त्याकरताच पाहायला हवा.
आजच्या जगात कॉमिक्स मधून आलेल्या गोष्टींचे सिनेमे यांना सरसकट ‘पोरांचे’, ‘फक्त ॲक्शन’ किंवा ‘टाईमपास’ असले टॅग्स न लागता त्यांना सर्व प्रकारच्या प्रेक्षकवर्गांकडून दाद मिळते हा ट्रेंड चांगलाच आहे. या नव्याने आलेल्या सामाजिक शहाणपणाचं मार्व्हल स्टुडिओजसारखे काही अगदी सर्वार्थाने सोनं करतात, तसेच जोकरसारखे काही एकटे चित्रपटही. आणि अगदी वेगळ्या प्रकारे. कॉमिक्स, सुपरहिरो आणि सायफाय या तिन्ही जॉनर्सवर अनभिषिक्त सम्राटाप्रमाणे वर्चस्व गाजवणाऱ्या मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या सावलीत इतर काही वाखाणण्याजोगे प्रयोग बऱ्याचदा दुर्लक्षित राहतात. मार्व्हलच्या जोडीने आपलंही एक ‘युनिव्हर्स’ उभारण्याच्या प्रयत्नात त्यांच्या प्रतिस्पर्धी DC ने सणसणीत माती खाल्लेली असली तरी त्यांच्याकडच्या काही पात्रांना अजूनही प्रतिष्ठेचं स्थान आहे. बॅटमॅनचा आद्य शत्रू ‘जोकर’ हे त्यापैकीच एक पात्र, आणि त्याला आपल्या फसलेल्या युनिव्हर्सच्या बाहेर स्वतंत्रपणे लॉंच करण्याचा निर्णय सार्थकी लागला असंच म्हणावं लागेल. 
जोकर हे कॉमिक्समधल्याच काय, पण एकूणच सगळ्या मानवी कल्पनाशक्तीने घडवलेल्या सर्वाधिक गुंतागुंतीच्या आणि क्लिष्ट व्यक्तिमत्वांपैकी एक आहे. त्यात ख्रिस्तोफर नोलनच्या ‘द डार्क नाईट’ मध्ये ती भूमिका हीथ लेजरने ज्या अभूतपूर्व अभिनयसामर्थ्यासह बजावली होती त्याने तिचा दर्जा कायमसाठी खूप वर नेऊन ठेवला होता. त्यामुळे जोकरची एक ‘उगमकथा’ घडवणं हे खूपच मोठं आव्हान बनलं होतं, ते दिग्दर्शकाने पेलण्याचा एक प्रामाणिक आणि कौतुकास्पद प्रयत्न केला आहे असं म्हणता येईल.
‘द डार्क नाईट’ मध्ये जोकर हा ‘कोण कुठला काय’ हे काहीच न सांगता थेट अंगावरच येतो. अर्थात त्यामुळे त्याच्या एकूण इफेक्टला फायदाच होतो, पण यामुळेच अगदी सुरुवातीपासून जोकरची गोष्ट सांगू इच्छिणाऱ्याला एक पुष्कळ मोकळं मैदान मिळालं. टॉड फिलिप्सच्या सिनेमात जोकरचं नाव आर्थर फ्लेक असतं हे आपल्याला कळतं. गॉथम शहरातल्या सर्वात पिचलेल्या, वाळीत टाकलेल्या आणि अतिशय गरीब अशा समाजाचा एक सर्वसामान्य घटक. एक वेगळाच मानसिक आजार असलेला, म्हाताऱ्या आईची काळजी घेण्यासाठी धडपडणारा आणि मंदीमुळे इकडून तिकडे हेलकावे खात फिरणारा एक दयनीय जीव. तशी त्याला एका दुकानाबाहेर विदूषकाचा वेष करून जाहिराती करण्याची नोकरी असते. त्याच्या पगारावर तो त्याचं आणि आईचं कसंबसं भागवत असतो आणि आपल्या आजारासाठी एका सरकारने नेमलेल्या निरिच्छ समुपदेशकाकडे जात असतो. त्यांच्या एका मीटिंगमधला त्याचा ‘Is it just me, or is it getting crazier out there?’ हा निरागस प्रश्न आपल्या काळजात बाणासारखा रुततो, आणि आपल्या काळजासाठी तो वॉर्म-अपच म्हणावा लागेल. 
या सिनेमाची गोष्ट, एक सगळ्याच बाजूंकडून खच्चीकरण झालेल्या, संतुलन आणि असंतुलन यांच्या सीमेवरच्या माणसाचं माणूसपण हळूहळू विरत जाऊन आतमध्ये दडलेल्या सैतानाला कसं वाट करून देतं ते सांगण्याचा प्रयत्न करते. ‘एका संतुलित माणसाचा बेभान राक्षस बनवायला एक बेक्कार दिवसदेखील पुरतो’ हे जोकरचंच दुसऱ्या एका ठिकाणी फेकलेलं वाक्य या कथानकाला दुजोरा देतं. त्यामुळेच या आर्थरच्या या क्षयाला आजूबाजूचा समाज किती कारणीभूत आहे हेही या सिनेमातून आपल्याला विचारण्यात येतं, त्याचबरोबर हा सिनेमा अशाच समाजाचा आपण नकळत भाग असू का अशाही विवंचनेत आपल्याला सोडून जातो. आर्थरच्या या प्रश्नाचं उत्तर आपणच द्यायचं आहे. 
आणि त्यात आपल्याला मदत करण्यासाठी सिनेमा काही आजूबाजूच्या गोष्टी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. जोकर गॉथम सिटीच्या ज्या भागात राहत असतो तो खूप बकाल, उदासवाण्या इमारती, गलिच्छ रस्ते वगैरे यांनी भरलेला दाखवला आहे. याशिवाय सुरुवातीच्या एका प्रसंगात शहराची कचरा नियोजन सेवा मोडकळीस आलेली असल्यामुळे ठिकठिकाणी गटारं, कचरापेट्या, सार्वजनिक शौचालयं वगैरे कचऱ्याने भरून वाहत असल्याचं सांगितलं जातं. असलं सगळं ते वातावरण, त्यात ते रस्त्यावरचे पिवळे मिणमिणते दिवे, या सगळ्यांनी एक विलक्षण औदासिन्य आपल्या मनाला सुरुवातीपासून झाकोळून टाकायला लागतं. हाच परिणाम अजून चांगल्या प्रकारे साधायला दिग्दर्शकाने रंगांचा आणि प्रकाशाचा खेळ छान जमवला आहे. पांढऱ्याशुभ्र ढगांच्या मधून डोकावणारं छानसं ऊन कुठल्याच दृश्यात आपल्या समोर येत नाही. त्याउलट त्या उदासवाण्या पिवळ्या प्रकाशाच्या वातावरणातच आपण इतका वेळ काढतो की कधी मध्येच हॉस्पिटलसारख्या कुठल्यातरी तुलनेने स्वच्छ इमारतीतला प्रखर पांढरा उजेडही आपल्या डोळ्यांवर आघात करून जातो. हा प्रकाशाचा खेळ आपण त्या अवस्थेतून जाणाऱ्या लोकांची मनस्थितीची उपमा आहे असं म्हटलं तर ‘आशा करायची ती कशासाठी’ हाच प्रश्न आपल्याला फिरूनफिरून पडत राहतो. 
जोकर या संकल्पनेचे काही ठळक पैलू या सिनेमात आपल्याला आढळतात, त्यापैकी सगळ्यात प्रकर्षाने जाणवणारा एक म्हणजे मुखवट्याचा. ख्रिस्तोफर नोलनच्या ‘डार्क नाईट ट्रिलॉजी’ मध्ये ‘मुखवटा’ या संकल्पनेवर बऱ्याच वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून विवेचन झालं आहे, आणि जोकरमध्येही आपल्याला ते विवेचन असं ठळकपणे नाही दिसलं तरी एक अंतःप्रवाह म्हणून ते कथेचा भाग असतं आणि त्यासंबंधित काही प्रश्न विचारायला आपल्याला भाग पाडत राहतं. मुख्य प्रश्न हा, की मुखवटा हा माणसाचं खरं रूप झाकतो, का बाहेर पडायला मदत करतो? सर्वसामान्य माणसाला त्याच्या प्रतिमेमुळे मर्यादांना सामोरं जावं लागतं, त्यामुळे मुखवट्याआडून तो हवे तसे वागू शकतो. सिनेमातही आपण आर्थर या दयनीय माणसाला जोकरचा मेकप केल्यावर जास्त आत्मविश्वास असलेल्या, बेफिकीर आणि अनेक अंशी मनातूनही जास्त मुक्त अशा रूपात पाहू शकतो. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे सिनेमाच्या अगदी सुरुवातीला जो जोकरचा अवतार त्याला काही लोकांकडून अत्यंत तुच्छतेची वागणूक मिळायला कारणीभूत ठरतो, तोच अवतार शेवटपर्यंत त्याचं नुसतं सर्वाधिक गाजलेलं रूपच नाही, तर त्याच्या असंख्य समर्थकांच्या एकीची खूणही बनलेला असतो. त्यामुळे शेवटपर्यंत दिगदर्शक आपल्याला खरा आर्थर फ्लेक कोण, आणि तो मेकप हा त्याचा मुखवटा आहे, का तेच त्याचं खरं रूप असून त्याचा मानवी चेहरा त्याचा मुखवटा आहे, अशा प्रश्नांत अडकवून ठेवतो. 
जोकरचा आणखी एक पैलू म्हणजे हास्य; ते मात्र अगदी वेगळ्याच प्रकारे या सिनेमात आणलं जातं. जोकरच्या मते सगळी परिस्थिती किंवा त्याची अवस्था हे सगळं आता इतकं हाताबाहेर गेलं आहे की आता राग येणं किंवा निराश होणं याच्याही पलीकडे जाऊन हसू येण्याला सुरुवात झालेली आहे. जोकरचं हास्य हा त्याच्या मेकपचा भागच आहे. लालभडक ओठ आणि या कानापासून त्या कानापर्यंत फाकलेली जिवणी हे तोंडावर वागवत जोकर सगळ्या जगावर हसतो; खदाखदा हसतो. या सिनेमात त्या हास्याचा एक अतिशय कल्पक उगम दाखवलेला आहे. या जोकरला एक असाध्य मानसिक आजार असतो ज्यामुळे कुठल्याही प्रकारचा भावनातिरेक होताच ताबा सुटून त्याला मोठ्याने हसू फुटतं. मनातली भावना अगदी विरुद्ध टोकाची असताना हसावं लागतं, याच्याइतकं करुण काय असू शकेल? प्रत्येक प्रसंगात त्याचं ते हास्य आपलं काळीज चिरत जातं. पण हळूहळू जसा जीवन असह्य होऊन आक्रोश करणारा आर्थर जेव्हा त्या उद्वेगाच्या पलीकडे जाऊन आपल्या परिस्थितीबद्दल पूर्णपणे निर्विकार होतो, तेव्हा त्याच्या हास्यावरचा त्याचा ताबा वाढायला लागतो. संपूर्ण सिनेमात आर्थर फक्त एकदाच मनापासून हसतो. अगदी शेवटच्या प्रसंगात, ‘जोकर’च्या नावाने त्याच्यासारख्या लोकांचा नायक आणि शांतताप्रिय समाजाचा शत्रू बनल्यानंतर एका मनोरुग्णांच्या हॉस्पिटलमध्ये एका वेगळ्या समुपदेशकाशी बोलत असताना आर्थर हसतो, आणि तेव्हा तो अतिशय संतुलित दिसतो. तो का हसतोय असं तिने विचारल्यावर तो अगदी शांतपणे तिला ‘तुम्हाला नाही कळणार’ असं म्हणतो, आणि हीच त्याच्या ‘जोकर’ बनण्याची शेवटची पायरी ठरते. हे एक वाक्य सिनेमातल्या इतर अनेक वाक्यांप्रमाणेच आपल्या मनावर अगदी कोरून ठेवल्यासारखं परिणाम करतं. 
जोकरचं विविध प्रकारचं हास्य, हसतानाची चेहऱ्यावरची उघडउघड वेदना, त्याचं कधीकधी संतुलित आणि कधीकधी पूर्णपणे बिथरल्यासारखं वागणं, या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना अगदी भिडतील इतक्या तन्मयतेने त्या पात्राच्या भूमिकेत संपूर्णपणे शिरून करणं म्हणजे हे काम स्वीकारणाऱ्या कोणत्याही नटासाठी मोठं आव्हानच होतं. याशिवाय त्याच भूमिकेबद्दल जगाने ज्याला अगदी साश्रुनयनांनी डोक्यावर घेतलं त्या हीथ लेजरच्या मागून ही भूमिका वठवण्याचं काम म्हणजे त्या कलाकारावर खूपच मोठी जबाबदारी आलेली! हे आव्हान वॉकीन फिनिक्स या अभिनेत्याने लीलया पेललं तर आहेच, पण त्याशिवाय ‘जोकर’ या पात्राशी लेजरप्रमाणेच आपलं नाव कायमस्वरूपी जोडून टाकलेलं आहे. जोकरचा रक्त गोठवून टाकणारा नाच आणि अशांसारख्या काही ठळक हालचाली फिनिक्सने स्वतः घडवलेल्या आहेत, आणि त्या पात्राच्या एकूण व्यक्तिमत्त्वाशी त्या ज्या सहजतेने एकरूप होतात त्यातूनच या कलाकाराची मेहनत आणि निष्ठा दिसून येते. जोकर प्रदर्शित झाल्यानंतर फिनिक्सने ‘गोल्डन ग्लोब्ज’ आणि ‘ऑस्कर्स’ या दोन्ही प्रतिष्ठित पुरस्कारसोहळ्यांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’चा पुरस्कार मिळवला आणि दोन्ही वेळेला हॉलिवूडने उभं राहून त्याचा गौरव केला.   
प्रथमदर्शनी जोकरसारख्या सिनेमात आपल्याला फिनिक्सच्या भूमिकेसमोर इतर भूमिकांना काहीच महत्त्व नाही असं वाटू शकतं, पण काही ठळक पात्रांचा ‘जोकर’ला घडवण्यात महत्वाचा वाटा होता, त्यामुळे त्या भूमिकाही उठून दिसल्या. खास नोंद घेण्याची बाब म्हणजे या भूमिका लहानपणीचा बॅटमॅन किंवा त्याच्या वर्तुळातील लोकांच्या नव्हत्या. तरीही फॅन्सना खूश करायला दिग्दर्शकाने त्यांना सिनेमात छोट्याशा भूमिका देऊन आणि आर्थर हा बॅटमॅनच्या वडिलांचा अनौरस मुलगा असण्याच्या शक्यतेचं पिल्लू सोडून थोडा मसालाही घातला आहे. पण त्या ठळक भूमिका होत्या आर्थरची आई, त्याची एक शेजारीण आणि टीव्हीवरच्या एका लोकप्रिय टॉक शो होस्ट मरे फ्रँक्लिन यांच्या. तिन्ही भूमिका जोकरच्या मनोराज्याला तडे देणाऱ्या ठरल्या. आर्थरचं त्याच्या आईवर खरंच प्रेम असतं आणि सुरुवातीला तिच्यासाठी झटताना आणि तिची काळजी घेताना तो सगळ्यात संतुलित असतो, पण तिच्याकडून तो खरंतर बॅटमॅनच्या वडिलांचा, म्हणजेच अब्जाधीश थॉमस वेनचा मुलगा असल्याची बातमी त्याला कळते तेव्हा त्याचं सगळं भावविश्व आपलं आयुष्य किती वेगळं होऊ शकलं असतं या कल्पनेने सैरभैर होतं. अखेर तीही त्याच्या आईने त्याची ‘मानसिक शांतता जपायला’ सांगितलेल्या अनेक खोट्या गोष्टींपैकी एक निघते तेव्हा त्याची तिच्याबद्दलची आपुलकीही पार आटते आणि त्यापुढे तो पूर्णपणे स्वतःला सगळ्या पाशांपासून तोडतो. त्याची शेजारीण त्याला एकदा लिफ्टमध्ये भेटते आणि ते डेटिंग करायला लागतात, याशिवाय त्याचा आदर्श असलेल्या मरे फ्रँक्लिनच्या शोमध्ये एकदा प्रेक्षक म्हणून गेलेला असताना तो मरेला वडिलांसारखंच मानत असल्याचं सांगतो आणि मरे त्याची अगदी वडिलांसारखीच आपुलकीने चौकशी करतो, हे बघताना आपल्यालाही थोडीशी आशा वाटू लागते. पण प्रत्यक्षात या दोन्ही गोष्टी आर्थरच्या कल्पनेतच घडतात, आणि त्याची शेजारीण त्याला तिच्या घराबाहेर काढते आणि मरे त्याची टीव्हीवर जाहीर चेष्टा करतो तेव्हा भावनिक सुखाच्या भुकेमुळे जोकरने घडवलेलं हे कल्पनाविश्व खळकन फुटून जातं. यामुळे परत आपल्या मनात, आर्थरच्या कल्पनारंजनामुळे वास्तव जास्त भयावह ठरतं, का वास्तवामुळे त्याला कल्पनेतच रमणं भाग पडतं असे प्रश्न पडू लागतात, आणि ‘जोकर’ अस्तित्त्वात येण्याला तो स्वतः जबाबदार आहे का समाज, हेही आपल्या मनात पुन्हा येऊन जातं. या भूमिका लहानशाच असल्या तरी फ्रान्सेस कॉनरॉय (आई), झॅझी बीट्झ (शेजारीण) आणि रॉबर्ट डी नीरो (मरे) यांनी त्यांना योग्य न्याय दिलेला आहे.        
जोकरच्या भावविश्वाचं सखोल दर्शन आपल्याला घडवण्यात दिग्दर्शकाने खूप मेहनत घेतली आहे, आणि ‘जोकर आला कुठून’ या प्रश्नाला एक उत्तर देण्याचा प्रयत्नही केला आहे. पण यामुळेच हा जोकर ‘डार्क नाईट’मधल्या जोकरच्या तुलनेत एक खलनायक म्हणून फिका पडतो. ‘डार्क नाईट’मधल्या जोकरचा सगळ्यात भयावह पैलू त्याचा उघडउघड अमानवीपणा होता. त्याचं वर्णन बॅटमॅनच्या विश्वासू बटलरच्याच शब्दांत करायचं झालं तर ‘ज्याला फक्त जग जळताना पाहायचं आहे असा माणूस’ असं होऊ शकतं असा तो असतो. या नवीन सिनेमातल्या जोकरचा प्रवास हा मानसिक आजार, उपेक्षा, अशा गोष्टींनी भरलेला असल्यामुळे या गोष्टी उलट्या फिरवल्या तर जोकर परत फिरू शकतो हा विश्वास आपल्याला वाटू शकतो. याचं कारण म्हणजे आर्थर माणूस असल्याची आपल्याला सगळा वेळ, अगदी तो शेवटी पार टोकाला गेलेला anarchist झाल्यावरही, खात्री असते. ज्या मार्गाने तो आला तो मार्ग ठाऊक असल्याने त्याला जर खरंच त्याच्या आईकडून किंवा इतर कोणाकडून खरं प्रेम मिळालं असतं आणि त्याच्या आजारासकट समाजाने त्याला स्वीकारलं असतं तर तो परत फिरला असता असं आपल्याला खरंच वाटतं. थोडक्यात, जोकर घडणं हाच एक समाज म्हणून आपला पराभव असला, तरी या चुकीला निस्तरण्यासाठी आपण काय करू शकतो ते आपल्याला यातून कळतं. ‘डार्क नाईट’मधला जोकर हा इतक्या पलीकडे गेलेला दाखवला आहे की त्याच्यावर कुठल्याच मार्गाने विजय मिळवणंच आपल्याला अशक्य वाटतं. त्याला हवंय तरी काय, आपण काय देऊ शकतो, काय केलं तर तो परत माणसात येईल? काही नाही. त्याला फक्त जगाला जळताना पाहायचं आहे. या एका गोष्टीमुळे तो जोकर सर्वश्रेष्ठ खलनायक ठरतो, आणि त्याची विकृती फक्त सामाजिक किंवा आर्थिक तेढ यासारख्या समस्यांच्या पलीकडे गेलेली ठरते. त्या पार्श्वभूमीवर हा नवा जोकर आपलं अंतःकरण हेलावून टाकतो, पण आपल्याला घाबरवून टाकू शकत नाही.  
पण एक, अनेक महत्त्वाच्या आणि विशेषतः मानसिक आजारांबद्दलच्या जागरूकतेची प्रश्नांवर आपल्याला विचार करायला भाग पाडणारा सिनेमा म्हणून हा खूपच कौतुकास्पद ठरतो यात वादच नाही. तो कथेसाठी पाहावा, कलाकारांसाठी पाहावा, एका आवडत्या पात्राची जास्त ओळख होण्यासाठी पाहावा, पण सगळ्यात जास्त पाहावा तो आत्मपरीक्षणासाठी! आपलं माणूसपण नक्की कशात आहे ते समजून घेण्यासाठी, आणि आपल्या आजूबाजूच्या सर्वांनाही ते जपता यावं यासाठीही.    

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प