थरारनाट्य
अर्थव्यवस्थेला मानवी शरीराची उपमा देणं चुकीचं ठरणार नाही. एकतर ती एक अशक्य गुंतागुंतीची रचना असते आणि दुसरं म्हणजे कधीही पाहिलं तरी तिचं काहीतरी दुखत असतंच. आज काय पायच दुखतायत (वाहतूक), काल हातच दुखत होते (उद्योग), उद्या डोकंच दुखेल (तंत्रज्ञान) वगैरे वगैरे. तिला विश्रांती मिळणं अवघडच असलं तरी पुष्कळ घरगुती उपायांनी या सगळ्या गोष्टी बऱ्या होऊ शकतात. कधीतरी बाहेरची मदत घ्यावी लागली तरी शेवटी सगळं सुरळीत पार पडतं. थोडक्यात एक सशक्त अर्थव्यवस्था असे लहानसहान धक्के पचवू शकते. पण तिला एकदम हृदयविकाराचा झटकाच आला तर? तर मात्र विशेष कष्ट घेऊन आणि खर्च करून तिचा जीव वाचवावा लागतो. ही अशाच एका हृदयविकाराची कथा आहे, ज्याला आपण सगळे ‘२००८ चं जागतिक आर्थिक संकट’ या नावाने ओळखतो. त्याला समजून घेण्यासाठी आपल्याला सुरुवात अर्थातच अर्थव्यवस्थेच्या हृदयाकडे, म्हणजेच वित्तक्षेत्राकडे नजर टाकून करावी लागेल.
आपण याला जरी जागतिक संकट म्हणत असलो, तरी त्याची सर्वाधिक झळ बसली ती अमेरिका आणि युरोप यांनाच. त्यांच्या दृष्टीने ते म्हणजेच जग असं आपण खवचटपणे म्हणू शकतो आणि ते अगदीच चुकीचंही नाही. हे नाट्य समजून घेण्यासाठी सर्वप्रथम यातल्या ठळक पात्रांचा परिचय करून घ्यायला हवा.
पहिल्या पात्राचं नाव आपण सगळ्यांनी या संकटाशी संबंधित चर्चेत तर ऐकलेलं आहेच, पण शिवाय आपल्या रोजच्या आयुष्यातही हे नाव अनेकदा आपल्या कानावर पडून जातं. हे पात्र म्हणजे न्यूयॉर्कच्या नकाशावरच्या असंख्य उभ्याआडव्या रेषांपैकी एक लहानशी रेष: वॉल स्ट्रीट. सबंध अमेरिकेच्या वित्तक्षेत्राचा उल्लेख या नावाने होतो याचं कारण म्हणजे ‘न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंज’ तिथे आहे आणि त्यांच्याकडच्या सर्वांत मोठ्या इन्व्हेस्टमेंट बँकांची मुख्यालयेही त्याच परिसरात आहेत. त्यामुळे वॉल स्ट्रीट म्हटलं की आपण त्या बँकांबद्दल बोलतोय हे गृहीत धरलं जातं. त्या बँका म्हणजे गोल्डमन सॅक्स, जे. पी. मॉर्गन चेस, मेरिल लिंच, मॉर्गन स्टॅनली आणि सिटीबँक. याखेरीज इतर दोन नावंही महत्त्वाची आहेत; ती म्हणजे बिअर स्टर्न्स आणि लेहमन ब्रदर्स. या संकटाची सुरुवातच मुळी या दोन बँका बुडण्यापासून झाली.
तर इन्व्हेस्टमेंट बँक म्हणजे काय? आपल्या मनात बँक म्हटलं की जे दृश्य उभं राहतं ते यांच्या खऱ्या स्वरूपाशी अगदीच विसंगत ठरेल. तसा या नावाला विशेष अर्थ नाही. आपल्या सामान्य बँकाही गुंतवणूक करतातच. पण ‘इन्व्हेस्टमेंट बँकिंग’ ही विविध ‘वित्तीय सेवां’पैकी एक खास सेवा आहे, आणि ती पुरवणाऱ्या संस्था म्हणून या अजूनही ओळखल्या जातात. ही सेवा म्हणजे इतर कंपन्या एकमेकांशी सौदा करत असताना त्यातले असंख्य पैशाशी संबंधित असलेले बारकावे हाताळण्यात त्यांना मदत करणं. पण या कंपन्या बँका म्हणूनच ओळखल्या जात असूनही त्यांनी हळूहळू इतर बऱ्याच प्रकारच्या वित्तीय सेवांमध्ये आपले हातपाय पसरले. त्यातल्या एका विशिष्ट सेवेच्या माध्यमातून त्यांचा या सगळ्या प्रकरणाशी संबंध येतो.
ती सेवा समजून घेण्यापूर्वी आपल्याला इतर दोन महत्त्वाच्या पात्रांकडे वळावे लागेल. एक म्हणजे साध्या बँका आणि दुसरे म्हणजे अमेरिकेची आम जनता! सामान्य जनतेचं एका साध्या बँकेशी असलेलं नातं प्रामुख्याने दोन रूपांमध्ये असतं; ती म्हणजे कर्ज घेणे आणि पैसे ठेवणे. दिलेल्या कर्जावर बँक जेवढं व्याज घेते, त्यापेक्षा थोडंसं कमी व्याज ती आपल्या ठेवींवर देऊ करते, आणि या दोन व्याजांमधला फरक म्हणजे तिचा नफा. त्यामुळे साहजिकच एका बँकेचं सुखस्वप्न मनाला येईल तेवढं कर्ज देता येणं हेच असतं. तिचे सगळे ठेवीदार एकाच वेळी आपापले पैसे परत मागायला येणार नाहीत या एका गृहितकावर बँकेचा सगळा धंदा चालतो, पण कोण कधी काय मागायला येईल ते सांगणं अशक्यच असल्यामुळे एका बँकेने आपल्याकडच्या ठेवींचा किती हिस्सा कर्ज द्यायला न वापरता पैसे किंवा इतर कुठल्यातरी रूपात स्वतःकडेच जपून ठेवावा यासंबंधी नियम आहेत. ते नियम ठरवण्याचं काम आपल्याकडे रिझर्व्ह बँक करते.
या सगळ्याचा मुद्दा हाच की या नियमांच्या कक्षेत राहून शक्य तितकी रक्कम कर्ज म्हणून देता यावी यासाठी एक बँक खूप शक्कल लढवू शकते. पण कर्ज देण्यात एक अंतर्भूत धोका कायमच असतो; ते फेडलं न जाण्याचा. आणि एखाद्या कर्ज घेणाऱ्याची पात्रता आपण क्षणभर बाजूला ठेवली (कारण ती कधीच ठामपणे मांडता येत नाही) तर बँकेची जितकी जास्त रक्कम कर्ज म्हणून दिलेली असते तितका जास्त धोका बँकेच्या आरोग्याला संभवतो असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे बँकेची सगळी शक्कल ही हा धोका कमीत कमी कसा करता येईल हा कूटप्रश्न सोडवण्यात गुंतलेली असते.
आणि हा अर्थातच खूप चांगला विचार आहे, आणि इतका महत्त्वाचा आहे की ‘फायनान्स’ या शास्त्राची एक सबंध शाखा फक्त या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विकसित केलेली आहे. ती म्हणजे ‘रिस्क मॅनेजमेंट’. या शाखेच्या सगळ्यात मूलभूत शिकवणींपैकी एक म्हणजे तुमच्या एकूण गुंतवणुकीत वैविध्य जेवढं जास्त तेवढा एकूण धोका कमी. यामागचा विचार सोपा आहे. जर धोका हा आपल्याला अनपेक्षित असलेल्या कुठल्यातरी अप्रिय घटनेच्या शक्यतेतून निर्माण होणार असेल तर अशी अप्रिय घटना एकाच वेळी सगळ्याच क्षेत्रांत घडण्याची शक्यता खूपच कमी ठरते. त्यामुळे आपण हे वैविध्य व्यवस्थित जपलं तर महायुद्ध, महामंदी किंवा आत्ताचं कोरोना संकट या गोष्टी सोडता बाकी बहुतेक सगळ्या अप्रिय शक्यतांवर आपण विजय मिळवू शकतो. याचाच अर्थ असा की धोका कमी करण्यासाठी बँकेने फक्त एकाच क्षेत्राकडे आपला कर्जाचा भार वळवणं चुकीचं आहे आणि तिने कायम सगळ्या प्रकारच्या कर्जांमध्ये एक समतोल राखला पाहिजे. आपल्या या थरारनाट्याची सुरुवात होते ती इथे.
‘बुडबुडे’ हा आमच्या कॉलेजमधल्या अर्थशास्त्राच्या ग्रुपमधला एक आवडीचा चर्चेचा विषय आहे. ‘बुडबुडा’ या संकल्पनेचं मुख्य स्वरूप म्हणजे एखाद्या गोष्टीची किंमत काही कारण नसताना वेड्यासारखी वाढत जाऊन आकाशापर्यंत पोचते आणि मग प्रचंड वेगाने खाली कोसळते. किमती वाढत असेपर्यंत लोकांना त्या वाढतच राहतील असं वाटू लागतं आणि त्या त्यांच्या लायकीपेक्षा जरा जास्तच वाढल्या आहेत हे सगळ्यांच्या एकदम लक्षात आलं की त्या कोसळतात. हवेत गेलेला बुडबुडा फुटला की त्या विशिष्ट गोष्टीच्या बाजारात एक भूकंप घडवून जातो, त्यामुळे कुठल्याही अर्थव्यवस्थेसाठी एक बुडबुडा अतिशय विध्वंसक ठरू शकतो. बुडबुडे निर्माण कसे होतात, त्यांना न फोडता कसं हाताळायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो फुटायच्या पुष्कळ आधी ओळखता कसा येईल हे सगळेच अर्थशास्त्रातले अतिगहन प्रश्न आहेत. २००८ च्या संकटातून जर काही चांगलं बाहेर पडलंच असेल तर ते हेच की बुडबुड्यांच्या अभ्यासाला माहितीचा एक अनमोल खजिनाच मिळाला.
२००८ चं संकट हाही एका बुडबुड्याचा स्फोट होता. या बुडबुड्याचा जन्म २००२-०३ च्या दरम्यान कधीतरी झाला होता, अमेरिकेच्या घरांच्या बाजारपेठेत. घरांच्या किमती कधीपासून सातत्याने वाढायला लागल्या ते मागे वळून पाहून आपण सांगू शकतो, पण त्याचं बुडबुड्यात रूपांतर नक्की केव्हा झालं ते मात्र सांगणं खूप कठीण आहे. आपण असं म्हणू शकतो की या काळात कधीतरी अमेरिकन बँकांचे गृहकर्जाचे दर घसरायला लागले. व्याजदर हेही इतर सर्वच गोष्टींप्रमाणे मागणी आणि पुरवठा यांच्या परस्परसंबंधांवर आधारित असतात, म्हणजेच याचा अर्थ गृहकर्जाची मागणी वाढत चालली होती. या काळात खूप लोकांनी कर्ज काढून घरं बांधायला काढली आणि बँकांनीही त्यांच्या उत्साहाला खतपाणी घातलं. घरांच्या बाजारपेठेतल्या वाढणाऱ्या मागणीमुळे किमतीही वाढायला लागल्या आणि ते पाहून लोकांना आणखीनच चेव आला.
आता या टप्प्यावर आपण जरा थांबून परिस्थितीचा आढावा घेऊया. एखाद्या व्यवस्थित वाढणाऱ्या बाजारपेठेत आणि बुडबुड्यातला मुख्य फरक काय असं विचारलं तर हेच म्हणता येईल की जेव्हा वाढ ही तर्कापलीकडे जाते तेव्हा तो बुडबुडा. निर्णय घेताना आपण rational विचार सोडून भावनेच्या आहारी जाऊ लागतो, तो बुडबुडा. हे म्हणणं ठीक आहे, पण वास्तवात गोष्टी यापेक्षा खूप गुंतागुंतीच्या ठरतात. Rational किंवा तर्कशुद्ध विचार म्हणजे नक्की काय? आपण बाजारपेठेला क्षणभर बाजूला ठेवून एका व्यक्तीचा विचार करू. अशी कल्पना करा की तुम्ही अमेरिकेत राहता आणि घर घेण्याचा विचार करत आहात. तुम्ही हेही बघताय की गेल्या काही महिन्यांपासून घरांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. मग त्या पुढेही अशाच वाढत राहतील अशी तुम्ही अपेक्षा करावी का? अर्थशास्त्रात याला ‘adaptive expectations’ म्हणतात; म्हणजेच जे आजवर घडलंय तेच पुढेही घडत राहील अशी अपेक्षा. याकडे असं पाहिलं तर हा मूर्खपणा वाटतो, पण हीच प्रक्रिया तर्कशास्त्रात ‘induction’ या नावाने ओळखली जाते आणि माहिती मिळवण्याचं एक चांगलं साधनही समजली जाते. सोपं उदाहरण म्हणजे, ‘कावळा काळा असतो’ हे ठरवायला तुम्ही सगळे कावळे तर पाहू शकणार नाही. तुम्ही पाहिलेला प्रत्येक कावळा काळा निघाला तर हे विधान तुम्ही सत्य मानून घेऊ शकता. पण यातही आपण तेच तर करत आहोत. भूतकाळातल्या अनुभवांवरून भविष्याबद्दल गृहीतक मांडत आहोत. त्यामुळे वरवर गडबड वाटणारी ही किमती वाढण्याची अपेक्षा आपल्याला अचानक तर्कशुद्ध वाटू लागते. पुढची पायरी? जर मला घर घ्यायचं आहे आणि किमती उद्या वाढणार आहेत हे ठाऊक असून जर मी ते आज नाही घेतलं तर मला गाढवांत काढलं जाणार हे उघडच आहे. किमती वाढणार असतील तर आत्ताच घर घेऊन टाकावं हाही तर्कशुद्ध विचार आहे. म्हणजे निष्कर्ष असा की अमेरिकेतल्या घराच्या बाजारपेठेची वागणूक जर आपण अशी वैयक्तिक पातळीवर आणून समजून घेतली तर आपल्याला असं दिसतं की घर घेणं हा तर सगळ्यात तर्कशुद्ध मार्ग होता. आणि बाजारपेठेतल्या प्रत्येकाने आपापल्या पातळीवर असाच विचार केला, तर बुडबुडा आलाच कुठून?
पण या सगळ्या गोष्टींकडे नीट बघितल्यावर आपल्याला एक वर्तुळ आढळून येतं. मी उद्या किमती वाढतील म्हणून आज घर घेतलं आणि उद्या खरंच किमती वाढल्या तर याचा अर्थ माझा अंदाज बरोबर होता, बरोबर? चूक. प्रत्यक्षात घडलं असं की माझ्यासारखाच विचार शंभर इतर लोकांनी केला आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आज घरं घेतली. मागणीत झालेल्या या वाढीमुळे किमती वाढल्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा एकमेकांना टाळ्या देत ‘आपण काय हुशार’ या आनंदात वावरतो, तेव्हा आमच्याच खरेदीमुळे त्या किमती वाढल्या ही महत्त्वाची बाब विसरून जातो. थोडक्यात या वाढलेल्या किमतीचं कारण फक्त आणि फक्त त्या वाढतील अशी लोकांची अपेक्षा हेच उरतं. आणि जेव्हा आपल्याला असं आढळून येतं की कशाच्यातरी किमती त्या वस्तूच्या उपयुक्ततेमुळे, सुधारणांमुळे किंवा इतर कुठल्याही rational कारणामुळे वाढायच्या ऐवजी फक्त या अपेक्षांच्या चक्रामुळे वाढत आहेत, तेव्हा आपण एक पाऊल मागे टाकून या संपूर्ण चित्राकडे एक नजर टाकून म्हणू शकतो: बुडबुडा!
म्हणूनच कुठल्याही टप्प्यावर ‘याचा बुडबुडा होऊ घातलाय’ हे म्हणणं कठीण असलं तरी बाजारपेठांचा सखोल अभ्यास करणाऱ्या अर्थतज्ञांना एखादी बाजारपेठ अशी जरी धोक्याच्या दिशेने जायला लागली तर ते कळू शकतं का? कळत होतं. ज्या काळात हा बुडबुडा फुगत होता त्याच काळात तज्ञांकडून धोक्याचे संकेतही येत होते. पण लोकांनी ते फारसे मनावर घेतले नाहीत, आणि जोपर्यंत त्यांना आपला विचार तर्कशुद्ध वाटत होता तोपर्यंत त्यांना अगदी दोषही देता येत नाही. हे कधीतरी फुटेल असं तुम्ही म्हणताय? मी मान्य करतो. पण मला घर घ्यायचंय आणि किमती आत्ता वाढतायत हे तर सत्य आहे ना? मग मी का आज घेऊ नये? गोष्टी इथपर्यंतच होत्या तोपर्यंत ठीक होतं. पण घर का घ्यायचंय असं विचारल्यावर जेव्हा ‘गृहकर्जाचे रेट्स बघा. इतके खाली आलेत तर ते चांगलंच नाही का? मला नसेल या बाजारातलं फार कळत, पण माझ्या बँकेला कळतं ना? त्याशिवाय का त्यांनी एवढ्या कमी दरात कर्ज देऊ केलंय?’
ही त्यांची चूक.
एरवी जर बँकेला स्वतःच्या भवितव्याची खूप काळजी असती आणि आपला धोका आपल्यालाच मॅनेज करावा लागणार आहे अशी परिस्थिती असती तर त्यांनी अजिबातच असलं काही केलं नसतं. दर थोडे कमी केले असते, पण आपणहून ‘घरं घ्या, घरं घ्या’ असं लोकांच्या कानात ओरडत फिरले नसते. पण त्या काळात पुष्कळ बँका तसं करत होत्या. ‘घर कसं आपल्या हक्काचं, प्रत्येक अमेरिकन माणसाचा आपल्या घरावर अधिकार’ अशी घोषणाबाजी त्या काळात वाढत होती आणि काचकूच करणाऱ्या लोकांना मोहात पाडलं जात होतं. आपल्या एकट्याच्या बळावर बँका हे करायला धजल्याच नसत्या, पण त्यांच्या पाठीशी एक महाकाय ताकद उभी होती. वॉल स्ट्रीट.
या बुडबुड्याच्या खूप पूर्वीपासून बँका आणि वॉल स्ट्रीट यांचं एक खास नातं आहे. कर्ज देण्याचा धोका कमी करायला वॉल स्ट्रीट बँकांना खूपच भन्नाट प्रकारे मदत करू शकते. बँका आपण दिलेली कर्जं वॉल स्ट्रीटला विकतात. मग वॉल स्ट्रीट अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कर्जांना एकत्र ‘गुंफून’ त्यांची एक ‘सिक्युरिटी’ (म्हणजेच ज्याच्यात गुंतवणूक करता येईल अशी वस्तू, उदा. शेअर्स, बॉंड्सप्रमाणे) तयार करते. अशा एका वस्तूला ‘Asset Backed Security’ म्हणतात, कारण तिचं मूल्य ती ज्याच्यापासून घडवलेली असते त्या asset च्या मूल्यावरून ठरते. इथे तो asset म्हणजे कर्ज. जर कर्जाची व्यवस्थित फेड झाली तर वॉल स्ट्रीट त्याचं रूपांतर या सिक्युरिटीच्या माध्यमातून नफ्यात करू शकते. या सिक्युरिटी मग शेअर्सप्रमाणेच बाजारात विकल्या जातात आणि एका कर्जाचा धोका अशा प्रकारे अनेक गुंतवणूकदारांमध्ये वाटून संपवून टाकण्यात येतो. ही कल्पना ऐकायला अर्थातच खूप गोड वाटते, आणि शिवाय यामुळे प्रत्येक बँकेला आपापल्या पातळीवर वैविध्य जपावं लागत नाही. जर चार बँकांपैकी एकीने फक्त गृहकर्जं दिली, एकीने शिक्षणासाठी कर्जं दिली, एकीने कार लोन्स दिल्या आणि एकीने उद्योगांना कर्ज दिलं, तर वॉल स्ट्रीट या चार प्रकारच्या कर्जांची एक सिक्युरिटी बांधून ते वैविध्य साधू शकते. अशात जरी कारचा बाजार घसरला आणि त्या लोन्स फिटल्या नाहीत, तरी त्या सिक्युरिटीमधली इतर कर्जं समतोल टिकवून राहतात, त्यामुळे बँकांची काळजी मिटली. या काळात जवळपास सगळ्याच बँका प्रामुख्याने गृहकर्ज देत होत्या आणि ती कर्जं वॉल स्ट्रीटला विकत होत्या. प्रत्येक बँकेने असा विचार केला असेल की मला घाबरायचं कारण काय? मी जरी फक्त गृहकर्ज विकत असले तरी वॉल स्ट्रीट इतर प्रकारची कर्ज कुठूनतरी घेईलच. शेवटी ती सिक्युरिटी चांगलीच निघेल, मग कर्ज फिटलं नाही तर काय एवढं? मी आल्यागेल्या प्रत्येकाला गृहकर्ज देईन, कारण धोक्याची जबाबदारी वॉल स्ट्रीटने घेतली आहे ना.
ही बँकांची चूक.
आता आपण अखेर पुन्हा वॉल स्ट्रीटवर आलो. बऱ्याच वर्षांपासून नफ्याच्या हात धुवून मागे लागणं, aggressive business आणि कर्मचाऱ्यांना लठ्ठ पगार आणि त्याहूनही लठ्ठ बोनस या सगळ्यांमुळे वॉल स्ट्रीटवर पुष्कळ टीका होते, पण तिचं महत्त्वही नाकारता येत नाही. या संकटामुळे जगाला पहिल्यांदाच वॉल स्ट्रीटची नव्याने ओळख झाली. ती चांगली का वाईट अशा प्रश्नांना उत्तरं नाहीत. सत्य हेच की नफा म्हटलं की ती मागेपुढे पाहत नाही. जेव्हा तिची उद्दिष्टं आणि साऱ्या अर्थव्यवस्थेची उद्दिष्टं एकाच दिशेने असतात तेव्हा तिच्या शक्तीचा अर्थव्यवस्थेला आणि सामान्यांनाही प्रचंड फायदा होऊ शकतो. पण ती नसतील तर? म्हणूनच आता या संकटानंतर वॉल स्ट्रीटला लगाम घालण्याची खूप चर्चा होतेय. वित्तक्षेत्र हे कायमच अर्थव्यवस्थेचं हृदय राहील, पण ते गरजेपेक्षा जास्त फुगून इतर अवयवांवर दबाव आणू लागलं तर त्याचा त्रासच जास्त होऊ शकतो हे आता पटायला लागलं आहे. याचे परिणाम दिसायला कदाचित अजून पुष्कळ वर्षं लागतील, पण वॉल स्ट्रीट जरा सुधारली तर तो या संकटाचा अजून एक चांगला परिणाम म्हणता येईल.
मग आता वॉल स्ट्रीटचं कुठे चुकलं? ती बँकांकडून ही कर्जं विकत घेत होती आणि त्यांच्या सिक्युरिटी बनवून विकत होती. तीही काही अगदीच जीवावर उदार होऊन खेळणारी वगैरे नाही. सुरुवातीला तिनेही सगळ्या कर्जांचा व्यवस्थित अभ्यास करून काळजीपूर्वक सिक्युरिटी तयार करायला घेतल्या, आणि वर मूडीज सारख्या संस्थांकरवी त्या सिक्युरिटीजचं धोक्याचं ‘रेटिंग’ही मिळवलं आणि विमाकंपन्यांकडून त्या सिक्युरिटीजचा विमाही उतरून घेतला. इथपर्यंत ती शहाण्यासारखीच वागत होती. पण हळूहळू ती विकत असलेल्या स्किक्युरिटीजमधलं गृहकर्जाचं प्रमाण खूप वाढायला लागलं. जर एका सिक्युरिटीमधल्या कर्जांपैकी ऐंशी टक्के कर्जं ही गृहकर्जच असतील तर वैविध्य गेलं कुठच्या कुठे! पण त्यातही चांगल्या, मध्यम आणि वाईट लोन्सचे थर असतात. वाईट लोन म्हणजे जी मुळात बँकेने या इसमाला दिलीच का हा प्रश्न पडावा इतकी वाईट. एका सिक्युरिटीमध्ये जर पन्नास टक्के चांगली गृहकर्जं, चाळीस टक्के मध्यम गृहकर्जं आणि दहाच टक्के वाईट गृहकर्जं असतील तरी इथपर्यंतची परवडलं. या थरांना मग मूडीज वेगवेगळी रेटिंग द्यायची. जेव्हा वॉल स्ट्रीटने एका सिक्युरिटीमधल्या फक्त घाणेरडं रेटिंग मिळालेल्या लोन्स उचलल्या, अशा सगळ्या घाणेरड्या लोन्सना एकत्र करून एक सिक्युरिटी तयार केली आणि तिला मात्र मूडीजने चांगलं रेटिंग दिलं, तिथे या सगळ्यांनी मिळून माती खाल्ली.
याबद्दल जसा वॉल स्ट्रीटला दोष देण्यात येतो तसाच त्या रेटिंग संस्थांना आणि विमाकंपन्यांनाही देण्यात येतो. ‘ती ढीग तुम्हाला घाणेरड्या लोन्सने बनलेल्या सिक्युरिटी दाखवेल, तुम्हाला अक्कल नको?’ असा त्या दोषाचा स्थायीभाव. थोडक्यात या सगळ्या बाबतीत या सगळ्यांच्या चुका झाल्या त्या विश्वासाच्या पातळीवर. लोकांनी बँकांवर विश्वास ठेवला, बँकांनी वॉल स्ट्रीटवर, वॉल स्ट्रीटने रेटिंग आणि विमाकंपन्यांवर आणि त्या दोघींनी पुन्हा वॉल स्ट्रीटवर. आणि या सगळ्यांनी मिळून विश्वास ठेवला तो घरांच्या बाजारपेठेच्या वाढीवर, म्हणजेच त्या बुडबुड्यावर. आणि तो लेकाचा आपल्या बुडबुडेधर्माला जागलाच.
आता सांगण्यासारखं खूपच कमी उरलं आहे. बुडबुडा फुटला तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात कर्जं फिटली नाहीत, त्यामुळे सर्वप्रथम घरांची बाजारपेठ आणि बँका बुडाल्या. आणि त्यांच्याकडच्या वाईट लोन्स वॉल स्ट्रीटने मिठाई म्हणून सगळीकडे वाटल्यामुळे एकापाठोपाठ ती विकत घेणारे सगळे बुडायच्या मार्गाला लागले. मग सरकारला खूप प्रमाणात पैसा ओतून वॉल स्ट्रीटच्या राक्षसी इन्व्हेस्टमेंट बँकांना वाचवावं लागलं. तो पैसा खूपच होता आणि अर्थातच अमेरिकन नागरिकाने आपल्या खिशातून दिलेला होता, पण वॉल स्ट्रीट कोसळली असती तर अमेरिकेच्या आणि अनेक अंशी जगाच्याही अर्थव्यवस्थेला जो भयानक हादरा बसला असता त्याच्या तुलनेत काहीच नाही. शेवटी आपल्या मूर्खपणाची किंमत यातल्या प्रत्येकाने मोजली, आणि आजही यांच्यातलं नातं तसंच आहे. वॉल स्ट्रीट आजही तितकीच शक्तिशाली आहे आणि पुन्हा अशी वेळ आली तर तिने धोक्याचे संकेत आधी ओळखावेत एवढीच आशा आपण करू शकतो. याशिवाय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आणि इतर अनेक संस्थांनी पुन्हा असं होऊ नये म्हणून बरीच नवी धोरणं अंमलात आणायचा प्रयत्न केला, पण त्यांची उपयुक्तताही एका मर्यादेपुरतीच असू शकते. पुढचा विचार प्रत्येकालाच करायचा आहे.
एखादा महत्त्वाचा निर्णय घेताना आपण काय विचार करतो? आपल्या प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी एक गोष्ट आपण सगळेच करतो, आणि ती म्हणजे त्या निर्णयाच्या संभाव्य परिणामांचा विचार. आपल्याला अगदी तर्कशुद्ध विचार करायचा असेल तर आपण असं म्हणू शकतो की एकतर वाईटापेक्षा चांगल्या परिणामांची शक्यता जास्त असली पाहिजे किंवा ती नसली तर चांगल्या परिणामाचे आपल्याला मोल जास्त पाहिजे. पण यात मेख अशी निर्माण होते की आपण जेव्हा परिणामांना एवढं महत्त्व देतो तेव्हा त्या निर्णयामागच्या हेतूंकडे फारसं लक्ष देत नाही. तत्त्वज्ञानातल्या ‘Consequentialism’ या विचारसरणीच्या मते कुठल्याही निर्णयाचे मूल्यमापन करण्यास त्याचे परिणाम पुरेसे असतात, पण यातून नवेच प्रश्न निर्माण होतात. एखादी चांगल्या हेतूने केलेली गोष्ट फसली, तर ती चांगली का वाईट? तसंच एखाद्या वाईट हेतूने केलेली गोष्ट खूप चांगले परिणाम घडवून गेली, तर ती चांगली का वाईट? याहीपेक्षा जास्त म्हणजे, जर एखादी वाईट गोष्ट चांगल्या हेतूने केली आणि ती फसली, तर तिचं काय?
घाणेरड्या कर्जांना चांगलं रेटिंग मिळवून देऊन विकणं हा प्रताप त्या तिसऱ्या व्याख्येत बसतो. शेवटी जर बुडबुडा फुटला नसता तर याचा सगळ्यांना फायदाच झाला असता. त्यामुळे बुडबुडा ओळखण्यातली चूक एकट्या वॉल स्ट्रीटच्या माथी मारण्यात काही अर्थ नाही. पण शेवटी आपल्या असं लक्षात येतं की कुठल्याही परिस्थितीत भावनेच्या आहारी न जाता आपलं काम चोख करायचं ठरवलं तरी बुडबुड्याचे विध्वंसक परिणाम टाळता येऊ शकतात. प्राचीन काळापासून अनेक बुडबुडे येऊन गेले आहेत आणि यापुढेही येतील, कारण त्यांचा उगम कुठल्या एका प्रकारच्या यंत्रणेशी किंवा विचारसरणीशी नसून आपण माणूस म्हणून परिस्थितीकडे कसे पाहतो त्या आपल्या मूलभूत घडणीशी आहे. त्यामुळे आता प्रश्न एवढाच उरतो की असा प्रसंग पुन्हा आला तर आपण आपल्या वैयक्तिक पातळीवरच्या तर्कशुद्ध वाटणाऱ्या विचाराला बाजूला ठेवून, आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांच्या हितासाठी जरा एक पाऊल मागे घेऊन सावधगिरी बाळगू शकू का? या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.
ते मिळण्यासाठी आपल्याला मदत करण्यासाठी एकदा येईलच, पुढचा बुडबुडा.
(हा विषय अर्थातच यापेक्षा खूप गहन आहे आणि या लेखातला प्रत्येक मुद्दा एका स्वतंत्र लेखाचा मानकरी आहे. या लेखाचा उद्देश फक्त एक सलग घटनाक्रम सांगणं हा असल्यामुळे त्या प्रत्येक मुद्द्याच्या खोलात जाण्याचा मोह इथे आवरला आहे. हे संकट हा माझा खास अभ्यासाचा विषय असल्यामुळे मी याच्या विविध पैलूंचा वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पिच्छा करत राहणार आहे, त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर स्वतंत्र लेख लिहायला मला नक्कीच आवडेल. तेव्हा तूर्तास क्रमशः)
आत्ता मी ( आर्थिक व्यवस्थेचे) थरार नाट्य हा ब्लॉग वाचला.
ReplyDelete*आर्थिक बाबींबाबत इतक्या खोलात जाऊन कधी विचार केल्याचे आठवतच नाही.
* भाव वाढले,कमी झाले, फायदा- नुकसान ,व्याजाचे टक्के कमी जास्त या पलिकडे फारसे लक्ष नसते.
* मात्र तू जी सोप्या भाषेत मांडणी केली आहेस,म्हणजे बुडबुडा फुटणे,वॉल स्ट्रीट वरील आर्थिक उलाढाल,consequentialism ही विचार सरणी हे सर्व ज्या तार्किक क्रमाने व सोप्या भाषेत मुद्देसूद मांडलेस त्याला तोड नाही.
मला खालील ओळी फार योग्य वाटत आहेत.
" डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका,जे दिसते ते तसेच का हे उलगडण्याला शिका!"
खूप छान लेख!! वाचायला मजा आली. 😊
ReplyDeleteSuperb ! माझ्यासारख्या निरर्थक 😊लोकांना फारच अर्थपूर्ण वाटेल हा लेख. धन्यवाद.
ReplyDeleteBird’ eye view at the Subprime lending mess. Interesting, entertaining and educating as well!
ReplyDeleteGreat narration.