चगमनेर १


“हं ठीके मी धरलीय ती बॅग, तू हो पुढे. रिक्षा घेऊन ये.”

असं म्हणत आई ती दाट निळ्या रंगाची, साठ टक्के माझ्याच खेळण्यातल्या गाड्यांनी भरलेली झोळी खांद्यावर अडकवते आणि दार लोटायला वळते. मला गुंतवून ठेवण्याच्या कामात त्या गाड्या खूप मदत करत असत; त्यामुळेच एवढ्या सगळ्या बरोबर घेण्याबद्दल ती फार काही बोललेली नसते. आमचा दुसरा, पायाजवळ ठेवण्यासाठी घेतलेला ‘डाग’ तिलाच उचलताना मी काही पाहत नाही, कारण तोपर्यंत मी तीनतीन पायऱ्या सोडत वेगाने जिने उतरायला लागलेलो असतो. अंगात एकदम उत्साह भरून आला की कसं कारण नसताना थरथरल्यासारखं होतं तसंच माझं होत असतं. इमारतीच्या आवारातून बाहेर पडून सोसायटीच्या मुख्य रस्त्यावर आल्यावर मात्र मी माझा वेग जरा कमी करतो आणि शहाण्यासारखा चालायला लागतो. पूर्वी एकदा मी अगदी मजेत पळत असताना बाबांनी लपूनछपून व्हिडिओ काढला आणि तो घरी ‘कौतुकाने’ लावण्यात आला तेव्हा मला बाकीच्यांऐवढं हसू आलं नाही. मी गेटमधून बाहेर पडून मोठ्या रस्त्यावर येतो. 

आमच्या शेजारच्या सोसायटीच्या दाराबाहेर एक रिक्षांचा थांबा आहे. तिथे सुदैवाने तेव्हा दोनतीन रिक्षा उभ्या असतात आणि शेजारच्या कट्ट्यावर तेवढेच काकाही बसलेले असतात. मी त्यांच्याजवळ जाऊन पोहोचेपर्यंत ते त्यांच्या गप्पा थांबवून माझ्याकडे कुतूहलाने पाहायला लागलेले असतात. 

“खाली आहे का?” मी घरी शिकवलेलं वाक्य कविता म्हटल्यासारखं म्हणून टाकतो. ते हसतात. 

“हो आहे की. कुठे जायचंय?”

“स्टँडवर.”

“अरे हाच स्टँड आहे की!” एकजण म्हणतात आणि ते पुन्हा हसायला लागतात. 

“बसस्टँड,” मी म्हणतो, मग आमच्याच सोसायटीच्या बाहेर एक बसचाही ‘थांबा’ होता हे मला आठवतं. त्यावरून पुन्हा सुरु व्हायला नको म्हणून मी लगेच “एसटीचा बरं का.” असं सांगून टाकतो. 

“तू एकटाच नाहीयेस ना बाळ?” दुसरे काका जरा गंभीरपणे विचारतात. 

“माझी आई आहे बरोबर. येतेय बॅगा घेऊन मागून. आपण रिक्षा घेऊन तिथे जाऊन थांबूया.” मी हात दोनशेसत्तर अंश फिरवून आमच्या सोसायटीच्या तोंड लपवायची वाईट खोड असलेल्या गेटपाशी नेतो. ते ‘चल,’ म्हटल्यावर मी रिक्षात बसतो. ते रिक्षा सुरु करतात आणि ते पन्नास मीटरचं अंतर गेल्यावर पुन्हा थांबवतात. आई तोपर्यंत बॅगा घेऊन आलेली असते.  

“सरक,” ती म्हणते आणि मी दुसऱ्या टोकाला सरकल्यावर ती झोळी रिक्षाच्या डिकीत ठेवून देते. दुसरा डाग पायापाशी ठेवून झाल्यावर ती बसते आणि काकांना परत ‘शिवाजीनगर एसटीचा स्टँड’ असं सांगून टाकते. हे तिने का केलं असावं ते काही मला कळत नाही. मी रिक्षा पकडली याचा अर्थ मी काही काकांना ‘आमच्या सोसायटीचं गेट’ असं सांगितलेलं नसणार. पण काकांना ‘स्टँड’ म्हटलं तरी घोळ होत असेल तर आईने खात्री केलेली बरी असं म्हणून मी तो विचार मनातून काढून टाकतो. 

रिक्षा मला पाठ असलेल्या रस्त्यावरून धावते. आमच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक गाडीच्या चालकाला मला ‘आम्ही संगमनेरला चाललोय’ हे ओरडून सांगावंसं वाटतं. मग लवकरच माझं लक्ष गाड्यांकडे जाऊ लागतं आणि मी मनातून त्यांना हाका मारत असल्यासारखा त्यांच्या नावांची उजळणी करायला लागतो. शाळेत कुठलीही गाडी ओळखू शकेल असा माझा लौकिक असतो. रस्त्यावरच्या बहुतेक गाड्या माझ्या स्वतःच्या संचाचा भाग असतात - अर्थात त्यांची खेळातली मॉडेल्स. पण माझ्या संचातल्या काही गाड्या मला याच काय पण पुण्यातल्या कुठल्याच रस्त्यावर कधी दिसलेल्या नसतात. त्या परदेशात असतात असं बाबांनी मला सांगितलेलं असल्यामुळे इकडे छोट्या असलेल्या गाड्या परदेशात मोठ्या असतात अशी काहीतरी माझी समजूत झालेली असते. माझ्या खेळण्यातल्या गाड्या आणि रस्त्यावरच्या गाड्या एकाच ठिकाणी दोन आकारांच्या साच्यांमधून बनवलेल्या असतात असं मला वाटत असतं. मग आपल्या रस्त्यावरच्या गाड्या परदेशात छोट्या असतात का यावर मी विचार सुरु करेपर्यंत स्टँड येतो. 

रिक्षासाठी मीटरप्रमाणे पैसे द्यायचे हा भाग आता पुढचे काही दिवस तरी विसरायला लागणार असं मी मनाशी पक्कं करतो. पैसे आईच देते, आणि या खेपेला आम्ही दोघंही एकेक डाग उचलून स्टँडच्या इमारतीत जातो. रिझर्व्हेशन केल्यामुळे बस कुठली आणि कुठे येणार आहे ते आईला आधीपासूनच माहित असतं. मी तेवढ्यात तिकिटाच्या खिडक्यांसमोर रांगा लावून उभ्या असलेल्या लोकांकडे पाहून दुष्टपणे हसून घेतो. बस यायला वेळ असतो. आई दोन जागा पकडते आणि तेवढ्यात मला वजनकाटा दिसलेला असतो. मी आईकडून एक रुपयाचं नाणं घेऊन त्या काट्यावर जाऊन उभा राहतो. पंचवीस. माझ्या स्मरणशक्तीची गंमतच आहे की मला माझी उंची कायम लक्षात असते पण माझं वजन मात्र मी नेहमी विसरतो. मग मी ते कार्ड उलटं करून माझं भविष्य वाचतो. ते हिंदीत लिहिलेलं असल्यामुळे मला ते वाचत असताना कानात एखाद्या जपानी कार्टूनने बोलावं तसं ऐकू आल्याचा भास होतो. 

साध्या लाल एसटीऐवजी एशियाडच्या मस्त हिरव्या गाडीतून जाता यावं म्हणून मला कायम रिझर्व्हेशन हवं असतं. माझ्या लेखी दोन्ही गाड्यांची तुलनाच होऊ शकत नाही. मला बसवर त्या जुन्या लालपेक्षा असा फ्रेश हिरवा रंग कधीही जास्त आवडतो. स्वच्छ डबा, त्यातल्या तुकडे पाडलेल्या अक्षरांत लिहिलेल्या सूचना (ज्या लाल गाडीत शिवाय अर्धवट पुसल्याही गेलेल्या असतात. आधीच अक्षरांचे तुकडे. प्रवासात वेळ जावा म्हणून मुद्दाम कोडी घातल्यासारख्या या सूचना दिसतात) आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरामदायी स्वतंत्र सीट्स आणि त्यांच्या मध्ये घातलेला तो लहानसा, वरखाली होणारा हात ठेवायचा दांडा. तो खाली करून ठेवला की कसे आपण आपल्या प्रांताचे मालक होतो, आणि कोणी ‘सरकून घ्यायला’ सांगत नाही. शिवाय मी प्रवासात अगदीच कंटाळा आला तर तो ड्रायव्हरच्या हाताला असलेला गियरच आहे असं समजून बसच्या बरोबर तो हलवायचा खेळही खेळू शकतो. 

गाडी सुटायला अजून वेळ असतो. खिडक्यांशेजारी विक्रेते फिरत असतात. त्यांच्या खांद्यावरच्या चौकोनी ट्रेमध्ये बिस्किटं, वेफर्स, ज्यूस असं कायकाय असतं. ते दिसतं म्हणून बरं, कारण ते जे एका दमात त्या सगळ्या गोष्टींची यादी वाचतात ती नुसती ऐकून काहीच कळत नाही. त्या गोष्टी घ्याव्याशा वाटतात, पण माझा आणि आईचं एक ठरलेलं असतं. प्रवासात आधी मी जर शहाण्यासारखं घरून आणलेल्या भोपळ्याच्या पुऱ्यांवर निभावलं तर दौलत ढाब्यावर आई वेफर्स घेऊ देणार असते. तशी भोपळ्याच्या पुऱ्या असताना मला बाकी कशाची गरज नसते, पण एका सबंध प्रवासात मी ‘बाजारचं’ काहीच नाही मागितलं तर आईचा गैरसमज होऊ शकतो. म्हणून मी त्या विक्रेत्यांकडे पाहत नाही, पण ते माझ्याच खिडकीच्या खालून दोनतीन वेळा जातात. त्यांना बहुतेक मी हट्ट करणारा मुलगा वाटतो. मग दोन मिनिटात गाडी गुरगुरायला लागते. 

बाहेर पडून मुख्य रस्त्यावर आल्यावर डावीकडे संचेती हॉस्पिटलची इमारत दिसायला लागते. तिच्या पुढे एक छान पूल असतो. त्या पुलावरून जाताना त्या उंच इमारतीच्या वरच्या मजल्यावरच्या खिडक्या जरा जास्त जवळ दिसायला लागल्यामुळे मला जरा उंच झाल्यासारखं वाटत असतं. विमानात बसणं असंच असावं अशी कल्पना मी करायला लागतो. मला विमानांबद्दल फक्त एकदोन मासिकांमधूनच थोडीशी माहिती असते. तेव्हा फक्त फोटो बघण्यासाठी म्हणून हातात घेतलेलं ते मासिक, पण घरात कोणी ‘काय वाचताय एवढं’ असं मुद्दाम चिडवायला विचारू नये म्हणून फोटोंखालची माहितीपण वाचावी लागलेली असते. पण ते मासिक नेमकं इंग्लिशमध्ये, त्यामुळे मला वाचून फार काही कळणार नाही हे माहित असतं. त्यापेक्षा वाचायला आकडे केव्हाही सोपे, आणि का कोण जाणे मला कायमच आकडे अगदी सहज लक्षात राहतात. खाली सोसायटीत मित्रांमध्ये किंवा शाळेत गप्पा मारताना जो आकडे फेकतो त्याला त्यातल्यात्यात जास्त गंभीर वाचक म्हणून ओळखलं जातं आणि ते का ते मला कळत नाही, पण माझ्यासाठी तेच सोयीचं ठरतं म्हणून मी आपला हाताशी लागतील ते आकडे वाचून काढतो. मी आयुष्यात वाचलेलं पहिलं वाक्य एका पेपरमधल्या एका बातमीचं नाव होतं. ‘कुठल्याशा आगीत आठ ठार.’ हे मी हॉलमध्ये बसून मोठ्याने वाचल्यावर स्वयंपाकघरात उभ्या असलेल्या आईला ठसका लागला. नंतर ही गोष्ट बराच काळ आमच्याकडे ‘कौतुकाने’ सांगण्यात आली. मला मात्र तेव्हा तो आठ हा आकडा दिसला म्हणून मी त्या नावाकडे वळलो एवढंच. 

राजगुरुनगर येईपर्यंत काही विशेष घडत नाही. राजगुरुनगरच्या स्टँडमध्ये आमची गाडी वळल्यावर आई मला फोन काढून देते आणि संगमनेरला फोन करून ‘राजगुरुनगर आलं असं कळव’ हे सांगते. हा निरोप मला सांगायला सांगितल्याचा तिला दरवेळी पश्चात्ताप होतो, कारण गाडी पुन्हा बाहेर पडून मुख्य रस्त्याला आल्यावर मी लगेच फोन लावतो आणि अक्षरशः निरोप देऊन ठेवून देतो. पलीकडून ‘हॅलो’ ऐकू यायचा अवकाश, मी लगेच ‘हॅलो आजी मी आदित्य बोलतोय राजगुरुनगर गेलं आत्ताच बाय.’ असं एका दमात सांगून मोकळा होतो. आईला फोन परत द्यायला वळतो तर ती हसू आवरत असल्यासारखी माझ्याकडे बघत असते. 

“अरे बोलायचं की दोन मिनिटं.”

हेच आई मला एकदोनदा याआधी कुठल्यातरी समारंभात म्हटलेली असते. कोणी नातेवाईक भेटल्यावर मी फार बोलत नाही म्हणून असावं. एकदा मी हे ऐकल्यावर समोरच्यांना शनीच्या कड्यांबद्दल सांगायला लागलो , तेव्हा ते सगळे हसले. मला मग असं कळलं की एक म्हणजे ‘दोन मिनिटं बोल,’ याचा अर्थ ‘दोनच मिनिटं बोल,’ आणि दुसरं म्हणजे अशावेळी स्वतःबद्दल बोलायचं असतं किंवा त्यांची चौकशी करायची असते. चौकशी तर आईच करते. तेव्हापासून मी कोणीतरी मला प्रश्न विचारेल अशी वाट बघतो आणि मग त्या प्रश्नाला आमच्या मराठीच्या पुस्तकाच्या भाषेत ‘एका वाक्यात उत्तर’ देऊन गप्प होतो. स्वतःचं म्हणून काही सांगायला जात नाही. अर्थात आजीची गोष्ट वेगळी. मी मला नुकत्याच झालेल्या एखाद्या साक्षात्कारापासून माझ्या परग्रहावरच्या गोष्टींपर्यंत काहीही रंगवून रंगवून सांगितलं तरी आजी आणि मावशी अगदी मनापासून ऐकतात. काही वर्षांनी ते सगळं माझ्या डोक्यातून जाईल अशी त्यांना का कोण जाणे खात्री असते, पण तरीही त्या रस घेतात. त्यांच्याशी अगदी ‘इकडच्या तिकडच्या गप्पा’ मारायचीही माझी एका पायावर तयारी असते, पण तीनएक तासांत भेटल्यावर प्रत्यक्षच बोलायचं ते आत्ता फोनवर कशाला सांगायचं असा मला प्रश्न पडतो. आई अर्थातच हसून सोडून देते. 

मग नारायणगाव येतं आणि आमची गाडी पंक्चर होते. या दोन गोष्टींचं माझ्या मनात इतक्या पक्क्या झालेल्या असतात की मला माझी सायकल पुण्यात पंक्चर होणं ही कल्पनाही काहीशी विचित्र वाटते. संगमनेरला जातानाच्या आत्तापर्यंतच्या जवळपास प्रत्येक प्रवासात हे घडलेलंच असतं, आणि बऱ्याच काळापासून नारायणगावच्या वेशीबाहेर कुठेतरी हा रस्ता बांधणाऱ्या माणसांनी कुठेतरी एक खिळा उभा करून लावलेला असेल अशी माझी ठाम समजूत असते. मग टायर बदललं जात असताना आमचा संगमनेरला दुसरा फोन करून होतो. या खेपेला मी फोन लावून ‘आम्ही नारायणगावला आहोत,’ एवढं सांगितल्यावर आजीही तिकडून ‘पंक्चर का’ असं विचारते. यावेळी मीही जरा गप्पा मारतो आणि आमच्या जवळून हसत हसत जाणाऱ्या त्या लाल ‘बश्यांकडे’ दुर्लक्ष करायचा प्रयत्न करतो. मागच्या एका प्रवासात एशियाड ही गाडीच मुळात नाजूक असू शकेल असं वाटून मी आईच्या बरोबर लाल गाडीतून जायला तयार झालो आणि नारायणगावला पोचल्यावर तीही बसलीच. त्यामुळे आत्ता मी माझ्या हिरव्या गाडीकडे बघत रस्त्याच्या कडेला उभं राहतो. 

यानंतर आळेफाटा हे गाव मला फक्त बस सुटताना ‘गेलेफाटा’ असं म्हणायला आवडत असल्याने लक्षात राहिलेलं असतं. यानंतर मी खऱ्या अर्थाने वाट पाहत असतो ती दौलत ढाबा येण्याची. त्याला मी प्रवासातला महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखत असतो. ढाबा आल्यावर गाडी थांबते आणि आम्ही पाय मोकळे करायला बाहेर पडतो. यानंतर गाडी कुठे थांबणार नसल्याने आईने मला एका ‘जाऊन येण्याची’ ताकीद दिलेली असते त्यानुसार मी ‘जाऊन येतो’. मग आम्ही दोघं मला हवं ते ‘लेज’चं पाकीट आणायला जातो आणि नेहमीप्रमाणे तिथे जे मिळतं तेच शेवटी घेऊन परत येतो. गाडीत चढायच्या आधी मी रस्त्याच्या कडेला उभा राहून थोडा वेळ आजूबाजूच्या हिरव्यागार डोंगरांकडे बघत बसतो. माझ्या दृष्टीने सबंध प्रवासात गाडीच्या खिडकीतून अगदी वाकून बघण्यासारख्या गोष्टी दोनच: एक अंगठा डोंगर आणि दुसरी म्हणजे नारायणगाव गेल्यानंतर थोड्या वेळाने अगदी दूरवर हमखास दृष्टीस पडणारी खोडदची महाकाय दुर्बीण! नारायणगावला बसने वैताग आणला असेल तर ती दुर्बीण पाहून मला लगेच बरं वाटतं. 

त्यानंतर घाट सुरु होतात आणि मघाशी पाहिलेल्या एका डोंगराला चिकटून जाण्यात मला फार मजा वाटते. आधी एकल घाट येतो आणि जातो. त्या घाटात फारशी ‘U’ आकाराची वळणं नसतात म्हणून मला तो खूप आवडत नाही. तशा वळणात कायमच एक भारी क्षण असतो. तेव्हा गाडी एकाच वेळी संपूर्ण वळत असतानाच चढही घेत असते आणि आत्तापर्यंत अदृश्य असलेला डोंगराचा एक भाग डोळ्यांसमोर आकार घेत असतो. अशात जर विरुद्ध बाजूने एक मोठ्ठा ट्र्क आला तर… . त्यातही शेवटच्या क्षणापर्यंत धडक होणार असं वाटत असताना नेमक्या दोन्ही गाड्या एकमेकींशेजारून व्यवस्थित निघून जातात. सगळ्या प्रवासात फक्त एकाच घाटात हे असं पुन्हापुन्हा घडू शकतं. एकल घाट ओलांडल्यापासून मी त्या घाटाच्या कल्पनेत रमलेलो असतो त्यामुळे काही वेळाने आईच मला ढोसून पुढे बघायला सांगते. पुढे आमच्यासमोर आडवं झोपलेल्या राक्षसासारखा दिसणारा एक मोठा डोंगर उभा असतो आणि त्याच्यावर मागेपुढे ब्रश फिरवून नक्षी काढल्यासारखा एक पट्टा दिसत असतो. 

“चंदनापुरी.” मी हळूच म्हणून टाकतो, पण माझं हृदय धडधडायला लागलेलं असतं. 

चंदनपुरी घाट हा फक्त आणि फक्त एकावर एक रचून ठेवलेल्या ‘U’ वळणांचा बनलेला असतो. त्यामुळे चढ लागल्यापासून आम्ही किमान सहा वेळा शेजारच्या दरीचं ते एकच दृश्य दोन्ही बाजूंनी आणि वेगवेगळ्या उंचावरून पाहतो. अखेर एक वळण आम्हाला अगदी आकाशात नेऊन ठेवणार असं वाटत असताना तिथून वळल्यावर आम्ही एका अवाढव्य कपारीमागून बाहेर पडतो आणि एक निराळंच जग आमच्या डोळ्यांसमोर असतं. त्या हिरव्या दरीत कुठेतरी एका इमारतींच्या गर्दीकडे बोट दाखवून आई ते संगमनेर असल्याचं सांगते आणि मला त्या डोंगरावरून तसंच एक मोठी झेप घेऊन वाऱ्यांवरून अलगद उडत थेट तिथे उतरावंसं वाटतं. 

दुसऱ्या बाजूलाही जवळपास तेवढीच वळणं असल्यामुळे आम्हाला त्याच दरीचं अगदी सर्वांगांनी दर्शन घडत राहतं, आणि मग ध्यानीमनी नसताना आम्ही सपाट जमिनीवर येतो. चंदनापुरीचा घाट संपल्यावर मनातून माझा प्रवास संपलेलाच असतो. आता उरतं फक्त ते धाकटं संगमनेर आणि मग मोठं संगमनेर. आज मावशीला कॉलेज असेल हे लक्षात ठेवून स्टँडवर उतरल्यावर आपली आपणच रिक्षा करायची आहे याची मी मनाशी तयारी करत बसतो. हळूहळू आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींमधलं ओळखीच्या गोष्टींचं प्रमाण वाढायला लागतं, पण कुठल्याही प्रवासातल्या अखेरच्या टप्प्याप्रमाणे संगमनेर यायचं ते येत नाही. हे खरंच असं असतं, की आता शेवटचा टप्पा हे माहित असल्यामुळे अस्वस्थता वाढते? ते काही असेना, मी आपला उजवीकडे दिसणारी प्रत्येक इमारत मागे गेल्यावर आता स्टँड येईल अशी अपेक्षा करत राहतो. थोड्या वेळाने मलाच माझ्या या खेळाचं कंटाळा येतो. 

तेवढ्यात बस वळते.  


Comments

  1. अगदी परवाच जाऊन आल्यामुळे एकदम सगळे डोळ्या समोर उभे राहतय.. खूप छान!

    ReplyDelete
  2. खरंच, संगमनेर भोज्ज्याला शिवून आले

    ReplyDelete
  3. इतकं relatable प्रवासचित्रण आता संपत आलं म्हणून डोळ्यात पाणी आलं, की आता हा असा प्रवास परत कधीच घडणार नाही म्हणून? माहित नाही..पण खूप खूप सुंदर वाटलं..♥️♥️♥️

    ReplyDelete
  4. अ प्र ति म वर्णन
    पुण्याला शिकत असताना काही एकटे तर एक दोनदा मिलींदसह केलेले पुणे संगमनेर प्रवास आठवले. आम्ही बहुतेक लाल डब्याने गेल्याने नारायणगावला कधीच बस पंक्चर झाली नाही 😊

    ReplyDelete
  5. संगमनेरला येतानांच्या गंमती-जमती इतक्या चपखल भाषेत लिहील्या आहेस की,पुढील गमती वाचायची उत्सुकता वाढली आहे.ती लवकरच पूर्ण होवो.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प