चगमनेर २
बस डावीकडे वळून स्टँडच्या आवारात शिरल्यापासून माझी चुळबुळ सुरु झालेली असते. मला का कोण जाणे पण बसमधून सगळ्यात आधी उतरायचं असतं. आता ही बस लगेच कुठेही जाणार नाही हे चांगलं माहित असतं, पण माझ्या मते मी इथेच उतरणार आहे; इथे माझा आणि बसचा संबंध संपला हे जाहीर केल्यावरच मला प्रवास संपल्यासारखं वाटतं. पण आई अगदी शांतपणे बसून असते, आणि बसच्या इंजिनने शेवटची घरघर पूर्ण केल्यानंतरच उठते आणि डोक्याच्या वर ठेवलेला डाग खाली काढते. मग तो हातात धरून आणि झोळी खांद्यावर अडकवून ती उतरायला निघते आणि मी पळतच तिच्यामागून येतो. बसच्या उघड्या दारातून मी एक मोठ्ठी उडी मारूनच बाहेर पडतो. बसच्या पलीकडे जाऊन मी समोरच्या दृश्याकडे पाहतो. डावीकडे कधीपासून रंग द्यायला हवाय अशी स्टँडची एकमजली इमारत असते. तिच्या शेजारच्या छोट्याशा बोळीत एकदोन मोटरसायकल उभ्या असतात. त्या बोळीच्या दुसऱ्या बाजूला काही उंच झाडांची गर्दी असते ती थेट आमची बस आत्ताच जिथून आत आली त्या जागेपर्यंत पसरलेली असते. त्या भागात आमच्या शाळेच्या ग्राउंडवर असते तशा मातीचाच रस्ता बनलेला असतो. मी आत्तापर्यंत याच प्रवासात जिथेजिथे स्टँड पाहिले आहेत तिथे कुठेही स्टँडच्या आवारात डांबरी रस्ता जवळपास कधीच नसतो. बसच्या दमलेल्या चाकांना मातीतच छान गार वाटत असावं. पलीकडचा नाशिक रोड नावाचा मोठा रस्ता मात्र व्यवस्थित डांबरी असतो आणि त्याच्यावरून गाड्या वेगाने जात असतात. मला गंमत वाटते की आपण स्वतः त्या रस्त्यावर असताना आपल्याला आपली बस दुपारच्या जेवणानंतर पळत असल्यासारखी वाटते, पण खरं तर तीही अशाच वेगात जात असणार.
“कदाचित रिक्षा लगेच मिळणार नाही; थोडं चालत जायची तयारी आहे ना?” आई विचारते. खरंतर माझी तयारी नसते. हेच आम्ही आत्ता पुण्याच्या स्टँडवर उतरलो असतो तर आम्ही जणू त्यांच्याच घरी उतरणार असल्याच्या थाटात रिक्षावाले एकदम पुढे आले असते. इथे तसं काही नसतं. पण त्या उन्हात स्टँडवर मला बसूनही राहायचं नसतं, त्यामुळे मी शहाण्या मुलासारखा दुसरा डाग उचलतो आणि आईबरोबर चालत निघतो.
आम्ही नाशिक रोडच्या कडेकडेने चालत निघतो. थोड्या अंतरावर गेल्यावर माझ्या असं लक्षात येतं की स्टँडवर दिसत नसल्या तरी रस्त्यावर खूप रिक्षा फिरत असतात, आणि आम्हाला आणि आमच्या सामानाला पाहून हळूच वेग कमी करून आमच्यापुढून जातात. त्यातल्या एकीला आई हात करते आणि ‘घुलेवाडी’ असं सांगते. ते आधी ‘पन्नास’ असं म्हणतात, पण त्यावर आईने लगेच ‘वीस’ असं म्हटल्यावर त्यांना आम्ही इथलेच असल्याचं लक्षात येतं. शेवटी जो भाव ठरतो तो कायम यांच्या मध्ये कुठेतरी असतो, त्यामुळे माझ्या डोक्यात ‘मी सुरुवातच तिथून केली असती’ असं येऊन जातं. मग ते काका उतरून आम्हाला आमचं सामान नीट आत ठेवायला मदत करतात.
“कुठे वळायचं ते सांगशील का तू?” आई मला विचारते. आधी माझं ठरत नाही, पण मग मी काही वेळ आमच्या गल्लीचं तोंड नक्की कसं दिसतं ते आठवण्यात घालवतो. तोपर्यंत आम्ही मुख्य गावातून बाहेर पडून आजूबाजूला दाट झाडी असलेल्या भागातून जायला लागलेलो असतो. थोड्या वेळाने उजवीकडे दूरवर एक उंच गुलाबी रंगाची इमारत दिसायला लागते आणि आई ते तिचं कॉलेज असल्याचं सांगते. असंच डावीकडे एका ठिकाणी एका गल्लीत ‘लेलेबाईंचं घर’ असल्याचं मला आठवतं. या दोन्ही जागा मी कायम फक्त नाशिक रोडवरून लांबूनच पाहतो.
आमच्या शेजारून एक बस पळत असते. तिच्या खिडक्यांमधून डोकावणाऱ्या लोकांना पाहून मला टूकटूक करावंसं वाटतं. ‘आम्ही चाललोय आता घरी, तुम्हाला आहेत अजून बसमध्येच दोनतीन तास काढायचे,’ असा विचार सुचतो. तेवढ्यात मुख्य संगमनेर आणि आमच्या घुलेवाडीला वेगळं करणारा तो ओढा आणि त्याच्यावरचा पूल लागतो. यानंतर मी उजवीकडे ओळखीच्या खुणा शोधायला लागतो. थोड्या वेळाने पुढे एक गिरणीसारखी दिसणारी मोठी पांढरी इमारत लागते आणि मी काकांना वळायला सांगायची तयारी करतो. त्या इमारतीसमोरचं मोठं फाटक आम्ही ओलांडल्यावर मी “इथे उजवीकडे घ्या,” असं सांगतो.
आम्ही एकदम गुळगुळीत डांबरी रस्त्यावरून दाणकन खडबडीत मातीच्या रस्त्यावर येतो. आमची ही गल्ली मला अगदी तोंडपाठ असते. सुरुवातीला थोडा वेळ अगदी सरळ रस्ता आणि दोन्ही बाजूंना मोठे बंगले असतात. डाव्या बाजूच्या सगळ्या बंगल्यांच्या आणि आमच्या मध्ये एक भिंत असते, आणि त्या बंगल्यांची अंगणंही याच बाजूला असल्यामुळे बंगल्याच्या इमारती कुठेतरी मागे लपल्यासारख्या दिसतात. मग पुढे थोडासा चढ आणि एक डावीकडचं वळण लागतं. त्या वळणापाशी उजव्या बाजूला एक मोठं शेत सुरु होत असतं आणि त्या शेतात काही अंतरावर पाठीवर मोठ्या अक्षरात ‘गोविंद विडी’ असं लिहिलेला एक मोठा काळा ट्रक उभा असतो. त्या ट्रकला पाहून मला एकदा आईने ‘काही गोष्टी वाचता येत असल्या तरी मोठ्याने वाचायच्या नसतात’ असं सांगितलेलं असल्याचं आठवतं. वळताना उजव्या बाजूला पिठाची गिरणी असते. वळण घेतल्यावर लगेचच पुन्हा उजवीकडे वळण्याची वेळ येते. तेही वळून झाल्यावर पुढे खूप लांबवर पसरलेला रस्ता दिसत असतो. उजवीकडे ढमाल्यांचं दुकान असतं आणि डावीकडे एक हिरव्या रंगाचा बंगला असतो. माझी नजर या सगळ्यावरून फिरून शेवटी त्या बंगल्याच्या पुढच्या उंच गुलाबी बंगल्यावर थांबते. त्या गुलाबी बंगल्याच्या फाटकापाशी आल्यावर आम्ही काकांना थांबायला सांगतो. तोपर्यंत पुढच्या दारासमोरच्या पायऱ्या उतरून आजोबा आणि आजी फाटकापाशी आलेले असतात.
“आम्ही ऐकलाच रिक्षाचा आवाज,” आजोबा फाटक उघडत असताना आजी हसत हसत म्हणते.
“बाकी सगळा प्रवास व्यवस्थित झाला ना?” आईने रिक्षातून खाली काढलेला दुसरा डाग उचलत आजोबा म्हणतात. “तसे वेळेवर पोचलात ते पंक्चर होऊन,”
मी एकदा डावीकडच्या पायऱ्यांकडे तर एकदा फाटकाच्या बरोबर समोर असलेल्या चढाकडे बघत असतो. तिथून थेट मागच्या अंगणात जाता येतं. मी त्या तिघांकडे एकदा पाहतो आणि तिघेही हसून मान डोलावतात. मग मी उड्या मारतच तो चढ चढून जातो. माझ्या मागे मला आई त्या दोघांना ‘हो, आहे नदीला पाणी,’ असं सांगत असल्याचं ऐकू येतं.
मागचं अंगणही अगदी मला आठवत असतं तसंच असतं. डावीकडे बंगल्याला चिकटलेला चॉकलेटी फरशांचा ओटा आणि त्याच्यावर बसवलेला झोपाळा, तिथून वर जाणारा लोखंडी जिना, जिन्याच्या खांबांखाली ठेवलेली अडगळ, तिच्या पलीकडे बंगल्याच्या दुसऱ्या बाजूचा चढ (इथून उतार दिसणारा) त्याला झाकणारी दाट झुडुपं, त्याच्या शेजारी असलेला कपडे धुण्याची मोरी आणि त्याला लागून असलेला मोठा हौद, हौदाला चिकटलेली उंच भिंत, तिच्या कडेकडेने फुललेली आजोबांची बाग आणि तिच्या वर पार आकाशापर्यंत पोचणारी मोठी टेकडी, आणि बागेच्या कट्ट्यावर तशाच ठेवलेल्या फुटक्या फरशांच्या ‘ठिकऱ्या’.
यातल्या पहिल्यांदा कशापाशी जावं या विचारात पडल्यामुळे मी बराच वेळ तसाच उभा राहतो. मधल्या आवारातल्या गुळगुळीत फरशा आम्ही ठिकऱ्यांचे चौकोन म्हणून वापरत असतो, आणि शिवाय आत्ता दुपारच्या उन्हात त्या तापलेल्या असतात. मागच्या उताराकडे जाऊ शकत असतो, पण आत्ता त्या सगळ्या झुडुपांतून वाट काढायची माझी इच्छा नसते. मी हौदाकडे गेलेलं आजोबांना फारसं आवडत नाही. तसं त्यांना मी त्या लोखंडी जिन्यावर गेलेलंही आवडत नाही, आणि त्याला कारण माझाच वात्रटपणा असतो. तो जिना खूप जुना आहे आणि त्या लोखंडाला एकदोन ठिकाणी थोडासा गंजही चढलेला आहे. मुख्य म्हणजे त्याच्या तेरा-चौदा पायऱ्या अरुंद आहेत, फटी असलेल्या आहेत आणि दोन पायऱ्यांच्या मध्ये नुसतीच मोकळी जागा आहे. मी जिन्यात मध्येच फतकल मारली तर जिन्यातून पाय खाली सोडून बसू शकेन एवढी मोठी. आणि असा हा जिना मी एक वर्षाचा असताना रांगत रांगत चढलेलो असतो. तेव्हा गोकुळाष्टमी असते आणि हॉलमध्ये बरीच गर्दीही असते. पण गर्दीचं लक्ष कुणाच्यातरी मांडीवर रुसून बसलेल्या मुक्ताकडे असल्यामुळे मी हळूच तिथून सटकून बाहेर येऊन जिना चढलेलो असतो. आजोबा तेव्हा खूप रागावतात. त्यामुळेच आत्ता माझी त्या जिन्याशी अगदी निखळ मैत्री असून मी त्याच्या वरच्या पायऱ्यांवरून अंगणात उड्याही मारत असलो तरी मी हे सगळं कधी आजोबांसमोर करत नाही.
तेवढ्यात आई दारातून बाहेर येते आणि मला आंघोळीला जायला सांगते. तिने तिच्या केसांना टॉवेलमध्ये चक्का बांधतात तसं बांधलेलं असतं. माझे बदलायचे कपडे तिने खोलीत काढून ठेवलेले असतात, ते घेऊन मी पळतच आत जातो. तोपर्यंत आजीने गीझरमधून गरम पाणी काढून ठेवलेलं असतं. आमच्या घरी सोलरचं यंत्र आहे ही खूप भारी गोष्ट असली, तरी इथे अगदी म्हणू तेव्हा गरम पाणी मिळतं हेही मला खूप आवडतं. आंघोळ करून मी पुन्हा आतल्या खोलीत येईपर्यंत पानं घेतलेली असतात.
“आत्ता जेवून घ्या, पण भूक शिल्लक ठेव बरं का,” असं आजी माझ्याकडे पाहून डोळे मिचकावत सांगते. याच्यामागचा अर्थ कळल्यावर माझा प्रवासाचा शीण लगेच पळून जातो. सगळीच्या सगळी भूक शिल्लक ठेवायची माझी एका पायावर तयारी असते, पण तरी मला वरणभातही सोडवत नाही. त्यामुळे मी पोळीभाजी रद्द करून आजीकडून वरणभाताचा एक मोठा गोळा कालवून घेतो आणि स्वयंपाकघरात चमचा आणायला पळतो. भात कायम चमच्यानेच खाण्याच्या माझ्या सवयीबद्दल मग नेहमीप्रमाणे विषय होतो, आणि विषय निघालाच आहे म्हणून माझ्या बशीत ओतलेला चहा तिच्यापाशी तोंड नेऊन मांजरासारखा पिण्याच्या सवयीवरही चर्चा होते. मला संगमनेरचा तो चमचे ठेवायचा माशांच्या आकाराचा स्टँड खूप आवडतो म्हणून मी तो आख्खा घेऊन येतो आणि त्यातला एक चमचा उचलून जेवायला बसतो.
आम्ही येणार असलो की मावशी नेहमी कॉलेजमध्ये हाफ-डे टाकते. तशीच आजही ती टाकते आणि आमचं जेवण होत आलेलं असताना तिच्या प्लेझरचा आवाज ऐकू येतो. पाच मिनिटांत ती मागच्या दारातून आत येते आणि तिचा स्कार्फ आणि गॉगल काढून आमच्यात येऊन बसते.
“ओळख काय आणलंय भाचरेबुवांसाठी,” ती माझ्याकडे पाहून हसत म्हणते.
“जिलब्या!” मी उत्साहाने म्हणतो. “मघाशी आजीने हिंट दिलीच होती.”
मावशी हसत तिच्या पिशवीतून जोश्यांच्या दुकानातल्या जिलब्यांचा मोठा पुडा काढून आजीकडे देते आणि आजी तो एका मोठ्या भांड्यात रिकामा करण्यासाठी स्वयंपाकघरात जाते.
“आणि अजून काय आणलंय?” मावशी म्हणते आणि मला काहीच कळत नाही. उन्हाळा असल्यामुळे हरभरे नसावेत, मग पेरू? असं मी विचारतो. त्यावर ती खायचा पदार्थ नाही असं सांगते. मग मला काहीच सुधरेनासं झाल्यावर ती पर्समधून एक घडी केलेला कागद काढते. त्याच्यावर काहीतरी पाचशे वेगवेगळ्या नावांची यादी असते.
“आजपर्यंत सापडलेल्या सगळ्या कीटकभक्षी वनस्पती,” मावशी सांगते. किड्यांना खाऊन पोट भरणाऱ्या झाडांना असं म्हणतात असं तिनेच मला पूर्वी सांगितलेलं असतं. “तू मध्ये म्हणाला होतास ना मला तुला यादी हवीय म्हणून?”
“हो,” मी म्हणतो. मागच्या वेळी संगमनेरला माझ्या हट्टानुसार सगळ्यांनी माझा सगळ्यात आवडता सिनेमा ‘मादागास्कर’ पाहिलेला असतो. तो पूर्ण इंग्लिश असल्याने आजी गंमत म्हणून मलाच अधूनमधून अर्थ विचारत असते. मलाही अर्थ कळत नसतोच, पण एकदा बाबांनी सगळं समजावलेलं असल्यामुळे आणि पुन्हापुन्हा पाहून गोष्ट पाठ झालेली असल्यामुळे मी जमेल तसं संदर्भ लावत सांगत असतो. फक्त एका गाण्याच्या वेळी पंचाईत होते. मला बहुतेक शब्द ऐकूच येत नाहीत, पण मी पहिल्या ओळीच्या शेवटी ‘साय’ असा शब्द असेल हे मला जे काही ऐकू येतं ते आणि दुसऱ्या ओळीच्या शेवटी यमकातला ‘बाय’ हा शब्द ऐकून ताडलेलं असतं. आणि ती ओळ चालू असताना तिथे सिनेमात एक फूल एका किड्याला खातं असं दाखवलेलं असतं, म्हणून मी त्या वनस्पतीला इंग्लिशमध्ये ‘साय’ असं म्हणत असल्याचं ठासून सांगायचा प्रयत्न केलेला असतो. म्हणून तेव्हा मी मावशीकडे सगळ्या तशा वनस्पतींची यादी मागितलेली असते, म्हणजे मला माझं म्हणणं सिद्ध करता आलं असतं. आत्ता तिने आणलेली यादी पाहून तसं काही नसल्याचं माझ्या लक्षात येतं. पण ती यादी आणायचं लक्षात ठेवूनही तो मूळ प्रसंग आजी आणि मावशी विसरलेल्या असतात म्हणून बरं. मी फक्त तिला थॅंक्यू म्हणतो आणि पुण्याला गेल्यावर बाबांना त्या पूर्ण गाण्याचा अर्थ विचारायचं ठरवतो.
उशिरा दुपारी ‘काय करायचं’ यावर खूप बोलणं होतं. मला नेहमीप्रमाणे मोठ्या रस्त्यावर जाऊन गाड्या बघायच्या असतात पण ऊन उतरेपर्यंत मावशी मला घेऊन जाणार नसते. चल्लस, पत्ते, फळ-फूल-नाव-गाव अशा आमच्या सगळ्या ठरलेल्या खेळांवर चर्चा होते, पण मला मुक्ता येईपर्यंत यातलं काही खेळायचं नसतं. थोड्या वेळाने आईच्या आजी आणि मावशीबरोबर वेगवेगळ्या नातेवाइकांबद्दल गप्पा सुरु होतात. विषय माझ्या ओळखीच्या असलेल्या मामा आणि मावश्यांवर चालू असतो तोपर्यंत मी ऐकत बसतो, पण तो तिथून त्यांच्या मावशा, आत्या, काका, असा जायला लागला की माझं लक्ष उडतं. म्हणून मी सरळ आईच्या झोळीतून गाड्या काढतो आणि दोन पलंगांच्या मध्ये उशांचा पूल करून त्याच्यावरून फिरवायला लागतो. मी गाड्या खेळणं किंवा उशांचे पूल करणं याबद्दल आजोबांचं काहीही म्हणणं नसतं पण मला गाडी नुसती सोडून द्यायला आवडत नाही. तिला हाताने धरूनच पुढे नेत मी तिच्यामागून सगळीकडे रांगत रांगत फिरतो आणि म्हणून आजोबांना पलंगावर एका ठिकाणी नीट बसता येत नाही. म्हणून ते रागावतात, मग मला बॅटबॉल खेळायचं का असं विचारतात. मग आम्ही फरशीवर बसून सरपटी बॅटबॉल खेळायला लागतो.
थोडा अंधार पडायला सुरुवात झाली की आम्ही सगळे अंगणात जाऊन बसतो. आजी आणि आजोबा जिन्यासमोरच्या झोपाळ्यावर बसतात. आई आणि मावशी त्यांच्या पुढे चॉकलेटी ओट्यावर मांडी घालून बसतात आणि मी जिन्यावर एक पायरी शोधून बसतो. मग माझ्या शाळेबद्दलच्या गप्पा होतात, मे महिन्याची सुट्टी असल्यामुळे कसा होमवर्क नाही ते एक बरंय यावर चर्चा होते. दिवाळीचे होमवर्क मी संगनमेरला घेऊन येत असल्यामुळे त्या तिघांची त्यात खूपदा पुष्कळ मदत होत असे. मागच्या वर्षी आमच्या शाळेचं चिन्ह असलेली एक पणती आम्हाला डाळींपासून करून आणायला सांगितलेली होती. आर्ट म्हणजे माझा सगळ्यात नावडता विषय, आणि दरवेळी असल्या कैच्याकै कल्पना घेऊन येणाऱ्या आमच्या टीचरचा मला राग येई. पण ती पणती छान झाली होती; तिच्यावर डाळी आणि जवस लावायला आजीने आणि मावशीने खूप मदत केली होती.
मग मावशी पायात चप्पल घालून मला ‘चल’ असं म्हणते आणि मी अगदी नाचतच तिच्यामागून निघतो. आम्ही जाण्याच्या आधी तिघीजणी रात्रीच्या जेवणाचं काय करायचं ते ठरवून टाकतात आणि उद्या बाकीचे आल्यावर वरच्या हॉलमध्ये झोपू, आज इथे खालीच गाद्या घालू हेही ठरवतात. मग मी आणि मावशी निघतो. पुण्यात अगदी खाली उतरायचं तरी कपडे बदलावे लागतात, पण इथे मी तसाच आलो तर कोणालाही काही वाटत नाही याचा मला आनंद होतो. मी माझ्या घरातल्या कपड्यांतच मावशीचा हात धरून ती गल्ली चालून जातो. वळणावरचं दत्ताचं देऊळ पाहून मला आजोबा लहानपणी घेऊन यायचे ते आठवतं. आम्ही आमच्याकडची सदाफुलीची भरपूर आणि जास्वंदाचं एक मोठं लाल फूल असं आजीच्या परडीतून घेऊन जाऊन दत्ताला वाहत असू. आत्ता मात्र मी लगेच देवळाच्या बाहेरूनच नमस्कार करतो आणि आम्ही लगेच चालत मोठ्या रस्त्यावर येतो.
दुपारी बघितलेल्या शेजारच्या मोठ्या पांढऱ्या इमारतीच्या आवारापाशी एक बाक असतो. त्याच्यावर बसून आम्ही गाड्या बघत बसतो. अधूनमधून मावशी मला एखाद्या कारचं नाव विचारते. मधूनच एक ट्रॅक्टर दिसतो, पण तो यायच्या आधीच त्याच्या वासावरून तो ‘मळी’ नेणारा ट्रॅक्टर असेल असं मावशीने सांगितलेलं असतं. मला सगळ्यात जास्त ट्रक बघायला आवडतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मावशीला तिच्या लॅपटॉपवर ट्रकचे फोटो दाखवायला सांगायचं मी ठरवतो आणि खूप अंधार पडेपर्यंत आम्ही तसेच तिथे बसून राहतो.
मोठ्याने न वाचण्याच्या गोष्टी, साय बाय गाणं कम कीटक आणि चक्का बांधलेला टॉवेल 😊👌👌👌
ReplyDeleteघराचं वर्णन खासच 👍
मस्त वर्णन..... तुझ्या बारश्याला आलो होतो, ते आठवलं एकदम....
ReplyDelete😊😊👌
ReplyDelete🙂👍
ReplyDelete