चगमनेर ३


मला सकाळच्या शाळेमुळे अगदी सहा वाजताच उठण्याची सवय आहे, आणि ती इतकी की उन्हाळ्याच्या सुट्टीतही ती मोडत नाही. याचा संगमनेरला आल्यावर मला खूप आनंद होतो कारण अगदी सकाळी उठून अंगणात जाऊन बसणं म्हणजे! त्या मोठ्या फरशा कधी नव्हे ते गार असतात; मी त्यांच्यावर जाऊन बसलो की मला त्या ‘ये खडू घेऊन’ असं म्हणत असल्यासारख्या वाटतात. आमच्या पलीकडच्या बंगल्यात जे राहतात त्यांचं नाव मी नेहमी विसरतो, पण त्या काकू रोज सकाळी त्यांच्या हौदापाशी दात घासायला येतात एवढं मला लक्षात असतं. तशाच त्या आत्ताही येतात. त्या माझ्याकडे पाहून हसतात. असं वाटतं की त्यांना ‘आली का पोरं आता सुट्टीला, आता जाम दंगा होणार,’ असं म्हणायचं असावं. मग मलाही त्यांना ‘मी शांत मुलगा आहे, दंगा करणारी मुलगी दुपारी यायची आहे,’ असं सांगावंसं वाटतं. पण मी स्वतःहून बोलायला जातो आणि नंतर ते आई-मावशी-आजी यांना रंगवून सांगतो तेव्हा सत्तर टक्के वेळा त्या त्याला आगाऊपणा म्हणतात हे मला माहित असतं. म्हणून मी नुसतंच हसल्यासारखं करून जिन्यावर खेळायला जातो. 

खरंतर मी मावशीचं आवरून होण्याची वाट पाहत असतो, कारण मला तिचा कॉम्प्युटर चालू करता येत नाही. मला त्याच्यावर जाऊन ट्रक्सचे फोटो बघायचे असतात. ती बाहेर आली की मी लगेच तिच्यापाशी जाऊन तिला ‘कॉम्प्युटर लाव’ असं सांगायला लागतो. 

“अरे दात घासू देत की मला, आशुक!” मावशी अधूनमधून मला ‘आशुक’ म्हणते आणि मी तिला ‘मंजुळा’. मागे एकदा आम्ही टीव्हीवर सीडी लावून ‘ती फुलराणी’ पाहिलेलं असतं. पण हा प्रकार फक्त घरीच असं आईने मला सांगितलेलं असतं. गावातल्या रस्त्यांवरून फिरत असताना मी मावशीला ‘ए मंजुळा’ अशी हाक मारली असती तर आजूबाजूच्या ऐकणाऱ्या माणसांचा चांगलाच घोळ झाला असता. त्यात तिला गावातले बरेचसे लोक ओळखत असतात आणि तिचं नाव मंजुळा नाही हे त्यांना माहित असतं म्हणून जास्तच. ती मात्र मला कुठेही, कधीही आशुक म्हणू शकते म्हणून मला थोडा राग येतो, पण आजी आणि मावशी यांच्याकडे माझ्यासाठीच्या टोपणनावांची मोठी यादी आहे. तिच्यातल्या दुसऱ्या कुठल्याही नावापेक्षा हेच बरं असं मला वाटतं. आणि म्हणूनच मला बाबा कायकाय हाका मारतात ते त्यांनी खूपदा विचारलं तरी मी सांगत नाही. पण मला मावशीला मीच शोधून काढलेलं ‘मावस’ हे नाव कुठेही वापरायची परवानगी आहे. लोकांना ते गोड वाटतं असं मला सांगितलं आहे. “तुझे झाले का दात घासून आणि?” मावशी खोटेखोटे डोळे मोठे करून विचारते. 

“हो!”

“आणि चा झालो काय गो?” हे ती मुद्दाम मला काशिनाथ नाडकर्णी बनून विचारते. 

“हो!”

“मग जा पळ आता आंघोळीला,” ती म्हणते. “आमच्या गूगलला पारोसा गोळा नाही आवडत,”

गूगलने आत्तापर्यंत ही नावड कधी स्वतः व्यक्त केलेली नसते, पण मी तिचं ऐकतो. माझी अंघोळ होईपर्यंत तिने मला हव्या त्या ट्रक्सचे फोटो काढून ठेवलेले असतात. मग मी लगेच चॉकलेटी रंगाच्या बाऊलमध्ये पोहे आणि त्या माशांच्या चमचाळ्यातून चमचा घेऊन येतो आणि आम्ही दोघं ते फोटो बघत बसतो. मावशीला सगळ्या ट्रक्सचे प्रकार ऐकायला खूप आवडतात, म्हणून ती दर फोटोला मला विचारते. माझा सगळ्यात आवडता ट्रक म्हणजे बाबांच्या उंचीची चाकं असलेला मोठ्ठा मॉन्स्टर ट्रक असतो. त्याचे काही फोटो पाहिल्यावर मावशीला एकदम काहीतरी आठवतं. 

“तुझा तो आवडता खेळ आहे ना मॉन्स्टर ट्रक्सचा? तो खेळायचा आहे का तुला?” ती विचारते. मला दोनतीन वर्षांपूर्वी शाळेत कोणीतरी मिनिक्लिप नावाच्या वेबसाईटबद्दल सांगितलेलं असतं. तिच्यावर खूप खेळ असतात, त्यातला ‘मॉन्स्टर ट्रक नायट्रो २’ नावाचा खेळ माझा सगळ्यात आवडता असतो. मग मला अचानक आठवतं की दुपारी मुक्ता येणार असते आणि तिला नेहमी ‘कँडी अँड क्लाईड’च खेळायचा असतो. त्यामुळे आत्ता हा खेळून घेतलेला बरा असा विचार करून मी मिनिक्लिपवर जातो.

अकरा वाजल्यानंतर मी सारखा फाटकापाशी घुटमळायला लागतो. कुठल्याही क्षणी मामी मुक्ता आणि लंपूला घेऊन येणार असते. मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी संगमनेरला एकटाच आईशिवाय सतरा दिवस राहून दाखवलेलं असतं आणि ते सगळीकडे अगदी अभिमानाने सांगितलेलं असतं. तेव्हापासून मुक्ताला तेच करायचं असतं, पण दिवाळीच्या वेळी त्या सगळ्यांनाच यायचं असल्यामुळे तिला संधी मिळत नाही. म्हणून आत्ता ते तिघेजण येत असले तरी मामी उद्या लंपूला घेऊन पुढे औरंगाबादला जाणार असते. मग मुक्ताला अगदी मजेत इथे आठवडाभर राहून त्यानंतर मामाबरोबर औरंगाबादला जाता येणार असतं.

कोपऱ्यावर रिक्षाचा आवाज ऐकू येतो आणि मी लगेच फाटक उघडतो. रिक्षा अगदी माझ्या पायापर्यंत येऊन थांबते. मुक्ता तिच्यातून उडी मारून बाहेर येते आणि मला अगदी उत्साहाने ‘हाय’ करते. 

“काय धरू?” मी लंपूला मांडीवर घेऊन रिक्षात बसलेल्या मामीला विचारतो. 

“याला धरतोस का?” ती हसून विचारते. मी याआधी मुक्ताला लंपूला कडेवर घेताना पाहिलेलं असतं, आणि शिवाय आत्ता तो झोपलेला असतो, पण तरी मला जरा भीती वाटते. मी जिना चढताना उगाच धडपडलो वगैरे तर? म्हणून मी फक्त ‘नाही’ अशी मान हलवतो. 

“मी धरते त्याला,” मुक्ता त्याला घेत म्हणते. “तू हे धर.”

त्यांच्या बॅगा घेऊन मी आणि मामी फाटकातून आत येईपर्यंत मुक्ता लंपूला घेऊन पायऱ्या चढून दारापर्यंत पोहोचलेली असते. “रांगोळी कुठे गेली इथली भुईचक्रांची?” ती दारात आलेल्या मावशीला विचारते. 

“अगं दिवाळीत काढली होती ती आपण… गेली पुसली मधल्या काळात,” मावशी म्हणते आणि मुक्ताकडून लंपूला घ्यायचा प्रयत्न करते पण मुक्ता देत नाही. 

“ती भुईचक्रांची नाही, आकाशगंगांची होती,” मी मागून येत म्हणतो. 

“चल, आम्ही भुईचक्र म्हणूनच काढली होती,” मुक्ता आत जात म्हणाली. 

“तुला हवं तर तू आकाशगंगा म्हण,” मामी माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणते. “लंपूला तर चकल्या वाटल्या होत्या.”

लंपूला मुक्ताने आतल्या खोलीतल्या पलंगावर झोपवलेलं असतं. “आत्याचा लॅपटॉप चालू दिसतोय,” मी आत आल्यावर ती म्हणते. “काय बघत होतास?” 

“खेळत होतो मिनिक्लिप वर. तो ट्रक्सचा खेळ.”

“मग आत्ता आपण ‘कँडी अँड क्लाईड’ खेळूया?” ती विचारते, पण तेवढ्यात आजी येते आणि आता आधी जेवून घ्या, मग नंतर खेळत बसा असं सांगते, म्हणून मला बरं वाटतं. आज कोबीची मटार घातलेली भाजी असते. मुक्ता तिच्या भाजीतले मटार वेचून माझ्या पानात टाकते आणि मी माझ्या भाजीवरची कोथिंबीर काढून तिच्या भाजीवर टाकतो. मग तिचं झाल्यावर ती ताट स्वयंपाकघरात ठेवायला जाते आणि येताना माझ्या भातासाठी चमचा घेऊन येते. जेवण झाल्यावर आजी आम्हा दोघांना सगळं आवरून ठेवायला सांगते. आम्ही सगळी भांडी आत नेऊन ठेवतो, पण ‘फरशीवर थोडंसं पाणी टाकून पुसून घेण्याचं’ काम मी एकदा ग्लासभर पाणी टाकल्यापासून मुक्ता स्वतःहून करते. मग मी टीव्हीच्या खालच्या कपाटातून सुपारीची बरणी घेऊन सगळ्यांना विचारून येतो. 

मग आम्ही ठरल्याप्रमाणे पुन्हा लॅपटॉप मावशीकडून सुरु करून घेऊन ‘कँडी अँड क्लाईड’ खेळायला लागतो. खेळ सोपाच असतो, फक्त दिलेल्या वेळात काही गोष्टी पूर्ण करायच्या असतात. क्लाईडच्या वाट्याला नेहमी सगळ्या वाईट गोष्टी येतात. कँडी कचरा वेचते, क्लाईड पेटीतला कचरा काढून बाहेर फेकतो. क्लाईड लोकांच्या वाटेत पिना आणि सुया ठेवतो, कँडी त्या बाजूला करते. कँडी खाली पडलेल्या पिल्लाला घरट्यात ठेवते, क्लाईड ते झाड कापतो. हा खेळ खेळताना आमची सारखी भांडणं होतात कारण आम्हा दोघांनाही कँडी व्हायचं असतं. यावेळेसही आमच्या तिसऱ्या भांडणानंतर आम्ही तो खेळ बंद करून ‘फॉरेस्ट टेम्पल’ खेळायचं असं दोघं मिळून ठरवतो. तो खेळ आमच्या ‘बौद्धिक  वाढीसाठी’ चांगला असल्याचं मावशीने एकदा सांगितलेलं असतं. त्यात एक फायरबॉय आणि एक वॉटरगर्ल असते आणि त्यांना त्या देवळातल्या अनेक लेव्हल्स एकत्र पार करून जायचं असतं. प्रत्येक लेव्हलमध्ये दोघांनाही एकमेकांना मदत करावी लागते म्हणून आमची हा खेळ खेळताना कधीच भांडणं होत नाहीत. शिवाय, दोघांचे कंट्रोल्स कीबोर्डवर दोन वेगळ्या ठिकाणी असल्यामुळेही. 

आम्ही साडेचार वाजेपर्यंत असेच खेळत राहतो. मध्ये एकदा मामी येऊन आम्हाला दोन मिनिटांचा ब्रेक घ्यायला सांगते आणि तिचा स्वतःचा आवडता शेतीचा खेळ उघडून काही कणसं काढून घेते. मग आजी येऊन आम्हाला आता ऊन गेलं असल्यामुळे ठिकरी खेळायची आहे का असं विचारते. तेव्हा आम्ही हो म्हणतो आणि बाहेर अंगणात जातोही, पण पाचच्या सुमारास मावशी येऊन मला फाट्यावर गाड्या बघायला जायचं का असं विचारते. मुक्ताला त्यात काही रस नसल्यामुळे ती इथेच थांबून खेळूया असं आधी म्हणते, पण मग तिला तिच्या शाळेतल्या एका मैत्रिणीचा फोन येतो आणि ती आत जाऊन तिच्याशी बोलत बसते. असा मलाही फोन यावा असं मग मला फार वाटतं. मला शाळेतल्या एकाच मित्राचा फोन येतो आणि तोही माझ्या वह्या मागायलाच. म्हणून सुट्टीत तर तोही येत नाही. मग मी त्याच्या गप्पा ऐकत बसू शकतो पण सत्याऐंशी टक्के वेळा मला ते कशाबद्दल बोलतायत ते कळतच नाही. म्हणून मग मी मावशीबरोबर फाट्यावर जायला निघतो. त्या दुपारच्या झोपेमुळे लंपू खूप उत्साहात आलेला असतो आणि त्यालाही फाट्यावर यायचं असतं. म्हणून मग मावशी त्याला कडेवर घेऊन आणि माझा हात धरून बाहेर पडते. मुक्ताचा फोन संपल्यावर ती आजी, आई आणि मामीला तासभर सगळं सांगत बसणार हे मला माहित असतं म्हणून मी अगदी अंधार पडेपर्यंत फाट्यावर बसायचं ठरवतो. लंपूला गाड्या आवडतात म्हणून तो मी रस्त्यावरच्या गाड्यांबद्दल सांगत असताना ऐकत असतो. पण थोड्या वेळाने एक ट्रक आमच्या जवळून जाताना उगीच मोठ्याने हॉर्न वाजवत जातो आणि लंपू दचकून रडायला लागतो. मावशी त्याला थोडा वेळ शांत करण्याचा प्रयत्न करते पण मग आम्ही परत जायचं ठरवतो. घरी आल्यावर मला मुक्ताचं बोलणं अजून चालू असल्याचं दिसतं म्हणून मी आणि लंपू हॉलमध्ये जाऊन गाड्या खेळत बसतो. आम्हा दोघांनाही गाडी सोडून न देता तिला धरून फिरवायला आवडतं. वर पलंगावर बसून काहीतरी वाचत असलेले आजोबा आम्हाला फरशीवर रांगताना पाहून हसत असतात.  

रात्रीच्या जेवणासाठी अंगणात बसू या असं आजी सुचवते, म्हणून मग मी आणि मुक्ता परत कामाला लागतो. आधी आम्ही एक मोठी सतरंजी घेऊन ती अंगणात पसरतो. मग मी आतून एकेक करत भांडी आणून बाहेर ठेवायला लागतो आणि मुक्ता वरच्या हॉलमधून दोन मोठ्ठ्या बॅटऱ्या घेऊन येते. त्या आणि दारावरचा दिवा लावल्यावर अंगणात पुरेसा उजेड पडतो. आजोबा झोपाळ्यावर बसतात आणि आम्ही सगळे एका मोठ्या गोलात सतरंजीवर मांड्या घालून बसतो. लंपू आता आईच्या मांडीवर बसलेला असतो. रात्रीच्या जेवणात थालिपीठं असतात. 

“काय चाललं होतं बोलणं एवढा वेळ फोनवर?” आजी मुक्ताला विचारते आणि मी तेव्हाच एक मोठ्ठा घास घेतलेला असल्यामुळे मला तोंड वाकडं करता येत नाही. मग मी अधूनमधून ‘हूं’ करत दुसराच विचार करायला लागतो.

 माझ्या हातातल्या थालिपीठाच्या घासाला एक मोठं भोक असतं आणि ते मला आधी न दिसल्यामुळे मी त्या घासाबरोबर घेतलेलं लोणी त्या भोकातून गळून पडलेलं असतं आणि खाली सतरंजीवर पडायच्या ऐवजी माझ्याच मांडीवर पडलेलं असतं आणि मी तो घास तोंडात टाकून एकाच वेळी मांडीपाशी तोंड नेता येईल का असं पाहतो पण मग कोणाचंतरी लक्ष जाईल म्हणून दुसऱ्या हाताने ते लोणी हळूच उचलून तोंडात घालतो आणि सतरंजीवर एक मुंगळा बसलेला असतो आणि तो काळा असतो आणि मला एकदम आठवत नाही की लाल मुंग्या चावतात आणि काळ्या चावत नाहीत पण काळे मुंगळे चावतात का बहुतेक हो म्हणून मी माझ्या डाव्या हाताने त्याला उचलून दूर टाकावं का नाही कारण मग तो बोटाला चावेल ना आणि चुकून कोणाच्या पानात पडला तर त्यापेक्षा मी कॅरमसारखं त्याला उडवून लावलं तर माझ्या उजव्या बाजूने कारण तिकडे कोणी बसलेलं नाहीये आणि तिकडे पलीकडच्या अंगणात तर दिवा दिसतोय म्हणजे पलीकडच्या काकू रात्रीचे दात पण त्यांच्या अंगणातच घासतात की काय आणि त्यांनी आत्ता इकडे बघितलं तर मी त्यांना दंगा करणारी मुलगी दाखवू शकेन पण तो मुंगळा तिकडे आधी ढकलतो अरे तो गेला कुठेतरी म्हणून मग मी पुढचा घास घेतो आणि आजूबाजूला रातकिड्यांची किरकिर ऐकू येत असते आणि म्हणून त्या गाण्यात किर्रर्र रात्री म्हणतात वाटतं आणि आत्ता ते गाणं म्हटलं तर लंपूला फार मजा येईल त्याला फार आवडते भुतावळ आणि लंपूला आत्ता आई भरवतेय पण तो त्याचं बोट आत्ता दह्यात घालून बघायला निघालाय ठीके मावशीने पाहिलं ते आणि तिकडे मागे भिंतीच्या वरच्या टेकडीवर काय दिसतंय ते झुडूपच असेल पण ते फार कुत्र्यांसारखं दिसतंय आणि कुत्री दिसतात की दिवसा तिथे टेकडीवर मग आत्ताही असेल आणि आत्ताच्या अंधारात त्यांना दिसत असेल का किंवा कसं कळणार की काही मीटर अंतरावर टेकडीचा उतार एकदम संपतो आणि मग एक कडा आहे सरळ मग ती कुत्री जर प्रकाशाच्या दिशेने पळत निघाली तर ती पडतील की अंगणात येऊन पण असं कधी घडलं नाहीये नाहीतर आजीने सांगितली असती गोष्ट म्हणून पण असतील ती झुडुपंच आणि ती सळसळतायत आणि मुक्ता माझ्याबद्दल बोलतेय का मी तर तसं काही केल्याचं मला आठवत नाही हां दुसरं कोणीतरी असेल माझ्याच नावाचं आणि जेवण झाल्यावर आम्ही हौदापाशी जाऊ का हात धुवायला एक बॅटरी घेऊन मजा येईल ना खरं आजोबा जाऊ देतील का पण कदाचित ते एकट्याला नाही जाऊ देणार आणि मुक्ताचं होत आलंय आणि माझंही होत आलंय का मला अजून थालिपीठ हवंय नकोय मग भात हवाय का नको आणि मग झालं का खरंच आणि उठतो मी. 

“हात धुवायला हौदापाशी जाऊ का?” मी एक बॅटरी उचलत विचारतो. 

“जपून जा,” असं आजोबा म्हणतात. मी आणि मुक्ता ती मोठी बॅटरी धरून हौदाकडे जायला निघतो. हात धुताना मुक्ता मला सांगते की तिच्या सगळ्या कहाणीतली एक गोष्ट तिला फक्त मला सांगायची आहे आणि ते बाकीचे सगळे झोपल्यावर. 


Comments

  1. मी आत्ता सगळे वाचले बरं का आशुक! तू जे वर्णन केलं आहेस त्यामुळे त्या घटना अगदी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या.ते रात्रीचं टॉर्चच्या उजेडातलं अंगणातलं जेवण,आपलं फाट्यावर जाऊन ट्रक बघणे,मुक्ता व लंपूबद्दल तू जे लिहिलंस ते सगळं असं खूप सगळं डोळ्यांसमोर आलं. धन्यवाद
    मंजुळा/ मावस

    ReplyDelete
  2. खासच 👌 दंगा करणारी आणि फोनवर काय बोलली त्याचं तासभर वर्णन करणारी मुलगी 😊

    ReplyDelete
  3. आजचा ब्लाॅग एकदम खास! कारण ते दिवस तुमच्या लहानपणीचे होते. पण वाचतांना सगळं डोळ्यांसमोर तरळत होतं. आता नवीन जागा,वाढती वयं,वेगळे विषय,वेगळ्या गप्पा! पण तेही आनंददायकच! लिहीत रहा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प