चगमनेर ४
सकाळी नऊ वाजता मामी आणि लंपूची औरंगाबादची गाडी सुटणार असते, म्हणून आम्ही सगळे लवकर उठून, आंघोळीसाठी नंबर लावून आठ वाजेपर्यंत आवरून घेतो. मावशीही कॉलेजला चालली असते, म्हणून तिच्या गाडीवर मागे बसून कोणी जायचं यावरून माझा आणि मुक्ताचा वाद होतो. लहानपणी आई मला तिच्या गाडीवर नेताना पुढे बसवून न्यायची. पण तसं आता करायला मी खूप मोठा झालोय हे मावशीने मला सांगितलेलं असतं. तरीही, मागे बसून का होईना, पण गाडीवर बसून जायला मी एका पायावर तयार असतो. शेवटी कोणीतरी असा मुद्दा काढतं की मावशी गाडीवरून स्टँडवर आधी पोहोचली तर तिच्याबरोबर जाणाऱ्याला काही वेळ स्टँडवर एकटं थांबावं लागेल. हे ऐकल्यावर मी जरा घाबरतो, पण अगदीच भीती वाटली तर मी मावशीला तेवढी पाच मिनिटं थांबायला सांगेन असा विचार करून माझा हट्ट सोडत नाही.
“तुम्हाला दोघांना घेऊन जाऊ का मी? ट्रिपलसीट?” मावशी हसत विचारते.
“बरं होईल मग, म्हणजे मलाही येता येईल यांच्याबरोबर रिक्षातून,” आई म्हणते.
“नको कशाला उगीच?” आजोबा पेपरमधून डोकं वर काढून म्हणतात. “मुक्ता तू नंतर कधीतरी जा.” मुक्ता समजूतदार असते म्हणून ते तिला समजावतात. हे छान होतं. मला समजूतदार वाटण्यात काही रस नसतो, मला गाडीवर जायचं असतं.
“का पण आजोबा?” मुक्ता म्हणते. “काल तुमचे ते मित्र आले होते की मोटरसायकलवरून तिघं-तिघं. मग त्यातला एक उतरून पुढे गिरणीत गेला आणि दोघं तुमच्याशी बोलत बसले इथे फाटकापाशी -”
मला काही ते आजोबांचे मित्र वाटलेले नसतात. अंगणात किंवा घराजवळ सापडलेले साप आजोबांनी मारल्याच्या काही गोष्टी आम्ही आजीकडून ऐकलेल्या असतात, त्यामुळे मला ते आजोबांना एखादा साप मारायला बोलावतायत की काय असं उगीचच वाटून जातं. मुक्ताचं हे ऐकून आजोबा हसायला लागतात आणि हो म्हणतात. यामुळे माझ्यावर मावशी आणि मुक्ता यांच्या मध्ये बसण्याची वेळ येते.
तरीही आम्हाला खूप मजा येते. मी मावशीला आणि मुक्ताने मला धरलेलं असतं. आमच्या घुलेवाडीच्या कच्च्या रस्त्यावरून जाताना आम्ही तिघंही मजेत टुणटुणत असतो; असं रिक्षातून येत असताना होत नाही. मावशी आमच्यासाठी हळू चालवत असते. मुक्ताला वेगाची जाम भीती वाटते, त्यामुळे आम्ही मस्त गुळगुळीत असलेल्या नाशिक रोडवरून जायला लागल्यावरही ती मावशीला वेग फार वाढवू देत नाही. अगदी पुढे क्षितिजापर्यंत शुकशुकाट असतानाही मावशीने जरा वेग तीसचा पस्तीस केला तरी मुक्ताचा मागून आवाज येतो.
“किती घाबरट आहेस,” मी बोलून घेतो.
“तू मध्ये बसलायस म्हणून,” ती लगेच म्हणते. “तू मागे बसला असतास तर गेला असतास उडून,”
“अरे आता आलाय ना गाडीवर, मग भांडताय कसले? पडदा टाका आणि बघा जरा आजूबाजूला,” मावशी म्हणते. एकदा आमचं खूप मोठं भांडण झाल्यानंतर आजीने आम्हाला ‘जाऊ द्या, आता वादावर पडदा टाका जरा!’ असं सांगितलेलं असतं; तेव्हापासून आम्ही कधीही जरा भांडलो की त्यातून बाहेर पडण्यासाठी ‘पडदा टाकतो’. कधीकधी हातरुमाल टाकून चालतं; कधीकधी गोधडी टाकावी लागते. पण आत्ता रुमाल पुरला असता. म्हणून आम्ही इकडेतिकडे बघायला लागतो.
मुक्ताला कडेच्या दगडांवरच्या वेली दिसतात. मला पुढे लागणारा ओढ्यावरचा पूल दिसतो. मुक्ताला पाच कावळे दिसतात. मला ओढ्याच्या काठावरची घूस दिसते. मुक्ताला एक बैलगाडी दिसते. मला दूरवरच्या एका घरावरच्या कौलांची नक्षी दिसते. मुक्ताला मोटारसायकलवरून जाणारे आणखी तिघेजण दिसतात. मला एका रिक्षात ड्रायव्हरच्या खांद्यावर हात टाकून पुढे बसलेला माणूस दिसतो. मुक्ताला डोक्यावर टोपल्या घेऊन जाणाऱ्या दोन बायका दिसतात. मला रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक मोडकी गाडी दिसते. मुक्ताला स्वदेश हॉटेल दिसतं. मला पुन्हा तो गोविंद विडीचा ट्रक दिसतो. मुक्ताला एका इमारतीच्या बाहेर अंगणात उभी करून ठेवलेली काही विचित्र आकाराची मशिन्स दिसतात. मला एका दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीत वाळत घातलेली चादर दिसते. मुक्ताला समोरून वेगाने येणाऱ्या गाडीच्या काचेवरचा ‘L’ दिसतो. मला रस्त्याच्या कडेला काठीने टायर पळवण्याचा खेळ खेळणारी मुलं दिसतात. मुक्ताला एक मोठ्ठी म्हैस दिसते. मला एक ऊसाच्या रसाचं दुकान दिसतं. मुक्ताला उजवीकडून वळून रस्त्यावर येणारी एक एसटी दिसते. मला उजवीकडून वळून रस्त्यावर येणारी एक एसटी दिसते.
मामी आणि लंपू इतक्या लगेच चाललेले असतात म्हणून जरा वाईट वाटत असतं, पण तरी स्टँडवर पोहोचताना मनात ‘आपण फक्त निरोप द्यायला आलोय, आपण इथेच राहणार आहोत’ हे पक्कं माहित असल्यामुळे खूप आनंद होतो.
“आपण निघाल्यावर त्यांना मिळालीच असेल रिक्षा लगेच, त्यामुळे ते येतच असतील मागून,” मावशी म्हणते. “तुम्ही दोघं थांबणार का इथे? या इथे झाडाच्या सावलीत थांबा; त्यांची रिक्षा इथेच येईल. कुठे लांब जाऊ नका. थांबाल ना?”
मला मुक्ता बरोबर असताना तेवढी भीती वाटत नाही. आम्ही हो म्हणतो आणि त्या सावलीत उभे राहतो. पलीकडे एका वळणावरून खूप गाड्या येऊन आमच्यासमोरून जात असतात. कुठली गाडी येईल ते ओळखायचा खेळ खेळायचा का असं मुक्ता विचारते पण मला ती कल्पना फारशी आवडत नाही. रिक्षा आणि बसचं ठीक आहे, पण कार येणार हे ओळखायचं असेल तर कुठली कार ते नको का सांगायला? म्हणून मग आम्ही आमच्या आदल्या रात्रीच्या विषयावर पुन्हा बोलायला लागतो.
थोड्याच वेळात आई, मामी आणि लंपू येतात. आम्ही त्यांना सामान खाली काढायला मदत करतो.
“तू जातोस का लंपूला कडेवर घेऊन आत? शेवटचा चान्स आहे बघ,” मामी मला म्हणते. पण मला तरीही भीती वाटत असते, म्हणून मग मुक्ता त्याला आत घेऊन जाते आणि आम्ही एक बाक पकडतो. मुक्ताला वाटेत एक वजनकाटा दिसलेला असतो. आई गाडीची चौकशी करायला गेलेली असते, म्हणून मी लंपूला मांडीवर घेऊन बसायला तयार होतो आणि मामी मुक्ताला घेऊन वजन करायला नेते. ती परत आल्यावर मी तिला तिचं भविष्य विचारतो.
“आप बहुत होशियार हैं,” ती कार्ड उलटं करून वाचते.
“बरोबर आहे मग हे तुझ्या भविष्यात लिहिलंय ते - आत्तातरी ते खरं नाहीये,” मी म्हणतो. त्यावर ती चिडून मला माझं काढून यायला सांगते म्हणून मीही मामीबरोबर जाऊन माझं करून येतो. मी परत आल्यावर मुक्ता माझ्या हातातलं कार्ड ओढून घेऊन उलटं करते. ते का कोण जाणे पण रिकामंच असतं.
“हा हा हा, तुला भविष्यच नाहीये,” मुक्ता म्हणते.
आई तोपर्यंत गाडीची माहिती काढून आलेली असते. ती गाडी येईपर्यंत त्या दोघी कुठल्याकुठल्या विषयांवर बोलत बसतात आणि मी आणि मुक्ता डेपोतून येणाऱ्या बसचा रंग ओळखायचा खेळ खेळायला लागतो. हा खेळ जास्त चांगला चालतो.
थोड्या वेळाने एक लाल गाडी येते आणि तिचा नंबर पाहून आई आणि मामी उठतात. मग आई लंपूला कडेवर घेते आणि मामी गाडीत जागा धरायला पळते. आम्ही दोघं त्यांचं सामान घेऊन तिच्या मागे जातो. त्या बॅगा घेऊन गाडीत चढताना ‘आपण गाडीत बसायला नाही आलोय’ या विचाराने मला पुन्हा एकदा आनंद होतो. मामी आमच्या हातातून बॅगा घेऊन त्या वरच्या कप्प्यात ठेवून देते. मग आम्ही खाली उतरतो आणि आई लंपूला घेऊन चढते. लंपूला मामीकडे देऊन ती पुन्हा खाली उतरल्यावर आम्ही तिघं त्यांच्या खिडकीच्या खाली येऊन उभे राहतो. मामी सगळ्यांचा निरोप घेते. लंपू तेवढ्यात खिडकीच्या बाहेर हात काढतो आणि मुक्ता तो हातात धरते. थोडा वेळ तसंच थांबल्यावर मग मामी लंपूला तो परत घ्यायला सांगते.
“पोचल्यावर फोन कर,” आई म्हणते. मुक्ताला आत जायचं असतं. गाडी सुटायला थोडा वेळ असतो म्हणून आई तिला जाऊ देते. गाडी सुटायची वेळ झाल्यावर मुक्ता जरासा रडवेला चेहरा घेऊन खाली उतरते. आम्ही गाडी निघून जाईपर्यंत तिथेच उभे राहतो, मग एक रिक्षा करून परत घरी यायला निघतो. घरी पोचल्यावर मुक्ता आधी आतल्या खोलीत जाऊन बसते. आजी मला ‘तिकडे नको जाऊस थोडावेळ’ असं म्हणून ‘बटाट्याची चाळ’ काढून देते. मग मी बाहेर अंगणात जाऊन झोपाळ्यावर वाचत बसतो. थोड्या वेळाने मुक्ता बाहेर येऊन माझ्या शेजारी बसते आणि त्याच्यात डोकं घालते. मग आम्ही जेवायची वेळ होईपर्यंत ‘भ्रमण मंडळ’ मधले संवाद मोठ्याने म्हणत बसतो. मला ते सगळे पाठ असतात.
“ठिक्कर खेळायची?” मी जेवण झाल्यावर म्हणतो.
“नको, ऊन असेल आत्ता बाहेर खूप,” आजी म्हणते. “आणि परत तुम्ही काहीतरी वेड्यासारख्या उड्या मारणार,” हे ती पुढे फक्त माझ्याकडे पाहून म्हणते. म्हणून मग दुसरं काय करायचं असा विचार सुरु होतो. शेवटी मी, मुक्ता, आजी आणि आई मिळून ‘फळ फूल नाव गाव’ खेळायचं ठरवतो.
हा आमचा संगमनेरला आल्यावरचा एक ठरलेला आवडता खेळ असतो. प्रत्येकजण एकेक कागद-पेन घेतो आणि फळ, फूल, नाव, गाव असे कॉलम काढतो. मग एक कोणीतरी मनात इंग्लिश अक्षरं म्हणायला लागतो आणि दुसरं कोणीतरी मध्येच ‘स्टॉप’ असं म्हणतं. मग ज्या अक्षरापाशी थांबलेलो असू त्या अक्षरापासून या चारही कॉलममध्ये एकेक नाव लिहायचं असतं. आपलं लिहून झालं की सांगायचं असतं, आणि एकच जण उरला तर त्याने थांबलंच पाहिजे असा नियम असतो. मग गुण मोजले जातात. जर बरोबर लिहिलं असेल आणि ते दुसऱ्या कोणीच लिहिलं नसेल तर दहा गुण मिळतात. जर साफ चुकलंच असेल तर शून्य. जर बरोबर असेल पण दुसऱ्या कोणीतरी पण ते लिहिलेलं असेल तर त्यांना पाच-पाच गुण मिळतात. त्यामुळे गुण वाढवायला सगळ्यात भन्नाट काहीतरी लिहिलं की उत्तम. अशा वेळी मग मी आणि मुक्ता हॅरी पॉटरमधली नावं लिहितो. फळ आणि फूल यांच्याच बाबतीत बऱ्याचदा गडबड होते.
एकदा ठरल्यावर मग आम्ही गोष्टी गोळा करायला घेतो. मुक्ता बाहेरच्या हॉलमधल्या लाकडी टीपॉयच्या खालच्या कप्प्यातून खूपसे रद्दी कागद घेऊन येते आणि मी मावशीच्या डेस्कवरच्या पेनस्टँडमधून काही पेन उचलतो. तेवढ्यात मला तिथे माझं आवडतं पेपरवेट दिसतं. मावशीकडे एक खूप सुंदर पेपरवेट असतं. ते काचेचं असतं आणि एका अर्धगोलात वरच्या बाजूला टीव्ही डिशच्या आकाराचा एक तुकडा पडल्यासारखा त्याचा आकार असतो. किंवा एक घास घेतलेल्या गोल गरगरीत पेरूसारखा. त्याच्या आत एका लहानशा बेटावर काही अगदी छोटीछोटी घरं असतात आणि आजूबाजूने एक समुद्र असतो आणि त्यात खरंखुरं पाणी असतं. शिवाय तो नीट धरला तर त्याच्या आत एकदम रात्रीच्या आकाशातले असंख्य तारे दिसायला लागतात. मला तो हातात धरून खळखळून त्यात पूर आणायला फार आवडतं. एकदा स्वच्छ धुवून झाल्यावर ते लहानसं गाव खूप फ्रेश दिसतं असं मला वाटतं. मी त्या गावाकडे आणि त्या फक्त एकाच बाजूने दिसणाऱ्या सुंदर निळ्या आकाशाकडे बघत तासन् तास बसू शकतो. आत्ता मी ते धरून एकदा पूर आणून घेतो आणि बराच वेळ त्या गोलाच्या आत उधळलेल्या पाण्याला पुन्हा बेटाच्या आजूबाजूला शांत होताना पाहत राहतो. मग मला आमच्या खेळाची आठवण येते आणि मी ते आणि पेन घेऊन परत आतल्या खोलीत येतो.
“अरे सापडली वाटतं तुझी नगोबल नगरी,” आजी माझ्या हातातलं पेपरवेट पाहून हसून म्हणते. पूर्वी एकदा मी मावशीच्या टेबलावर एक ‘नोबेल नगरीतील किस्से’ नावाचं पुस्तक पाहिलेलं असतं आणि ते नाव या गावाला दिलेलं असतं. फक्त त्या ‘नोबेल’चं मी ‘नगोबल’ केलेलं असतं. मी दरवेळी मावशीला ते पुण्याला परत नेऊ का असं विचारतो, पण खरं तर संगमनेरला येण्याच्या माझ्या काही ठरलेल्या कारणांपैकी हे एक मोठं कारण असतं.
आम्ही खेळायला बसतो. मुक्ताला एक पिवळा कागद तो हॅरी पॉटरमधल्या चर्मपत्रासारखा वाटल्यामुळे हवा असतो. बाकीचे आम्ही आपापले कागद घेतो. मी अगदी व्यवस्थित कागदावर उभ्याआडव्या रेषा आखून मला हवं तसं टेबल काढून घेतो. मुक्ता आणि आजी फक्त कॉलमची नावं लिहितात. आईने तिच्या मोठ्या कागदाचा एकच कोपरा पकडून त्यात खूप किरट्या अक्षरात कॉलम्स केलेले असतात. मुक्तावर पहिल्यांदा मनात अक्षरं म्हणायची वेळ येते आणि थोड्या वेळाने मी ‘स्टॉप’ म्हणतो.
“स,” मुक्ता म्हणते. आम्ही लगेच खाली वाकून लिहायला लागतो. लिहिताना माझं लक्ष सारखं माझ्या नगोबल नगरीकडे जात असतं म्हणून ती परत ठेवून यावी का असा मी विचार करतो. पण त्यातही वेळ गेला असता. थोड्या वेळाने सगळ्यांचं होतं आणि आम्ही फळापासून सुरुवात करतो.
फळाच्या बाबतीत कोणाचंतरी सारखं येणारच हे आम्ही मान्यच केलेलं असतं. ‘स’ पासून अशी किती फळं माहित असतात? शिवाय आमचा एक नियम असा असतो की एखाद्या गोष्टीचं मराठी नाव असेल तर त्याचंच इंग्लिश किंवा दुसऱ्या कुठल्या भाषेतलं नाव लिहायचं नाही. हा नियम एकदा मी ‘ल’ पासून लिहिताना प्राण्याच्या कॉलममध्ये ‘लायन’ असं लिहिल्यापासून मुक्ताने चिडून लागू केलेला असतो. ‘प्राणी’, ‘देश’, ‘पुस्तक’ असे काही जास्तीचे कॉलम आम्ही कधीकधी घेतो. म्हणून यावेळी ‘स’ पासून फळ लिहिताना मला ‘सफरचंद’ किंवा ‘संत्रं’ याच्या पलीकडे जाता येत नाही.
“संत्रं,” मी माझं सांगून टाकतो. आईने सफरचंद लिहिलेलं असतं. मुक्ता अगदी विजयाच्या आनंदात ‘सीताफळ’ सांगते, पण आजीनेही तेच लिहिलेलं असल्याचं मग कळतं. मी खूश होऊन स्वतःला दहा गुण देतो.
मग पाळी असते फुलांची. मला फुलांची नावं फळांहूनही कमी येतात म्हणून यात मला पाच मिळाले तरी बरं वाटतं. मी ‘सदाफुली’ लिहितो, आणि गंमत म्हणजे आई आणि आजीने तेच लिहिलेलं असतं. मुक्ताने ‘शेवंती’ लिहिलेलं असतं.
“ते ‘श’ पासून आहे,” मी म्हणतो.
“पण आपण इंग्लिश अक्षरं धरतोय ना, अशाने ‘श’ येणारच नाही.” मुक्ता म्हणते. मग यावर थोडं बोलणं होतं. शेवटी इथून पुढे मराठी अक्षरं म्हणायचं ठरतं आणि मुक्ताला दहा गुण मिळतात.
मग आम्ही नावांवर येतो. आई आणि आजी ‘स’ पासून दोन मराठी नावं सांगतात. मुक्ताने अर्थातच हॅरी पॉटरमधून ‘सिव्हिरस स्नेप’ लिहिलेलं असतं. मी यावेळी हुशारी दाखवून माझ्या आवडत्या ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ मधून ‘साउरॉन’ हे नाव लिहिलेलं असतं. यावेळी सगळ्यांनाच दहा गुण मिळतात.
शेवटी गावांची पाळी येते. इथे कोणीतरी ‘संगमनेर’ लिहिणारच कारण ते इतकं उघड आहे असं एका बाजूने वाटत असतं, पण ते इतकं उघड आहे की ते कोणीच लिहिणार नाही असंही वाटत असतं. शेवटी ते खूप लिहावंसं वाटत असूनही मी तो धोका नको असं ठरवतो. गावांच्या बाबतीत माझ्याकडे काही खास नावं असतात. मग सगळे सांगतात आणि माझा दुसरा अंदाज बरोबर असल्याचं समोर येतं.
“सातारा,” आजी म्हणते.
“सांगली,” मुक्ता म्हणते.
“सिन्नर,” आई म्हणते.
“सिंगापूर,” मी म्हणतो. खाली वाकून माझ्या ‘सिंगापूर’ लिहिलेल्या चौकोनात कोपऱ्यात ‘दहा’ हा आकडा लिहीत असताना माझ्या मनात येतं, की ठीक आहे. काही हरकत नाही.
संगमनेर कधीच माझ्यावर रागावणार नाही.
आदित्य,फळ,फूल चा खेळ,ठिक्कर, आजोबा काय म्हणाले होते ते, लंपूबद्दलच्या आठवणी,नोबेलनगरीतील नवलस्वप्ने,पेपरवेट-- मांडणी झकास!! मात्र मी तुम्हा दोघांना प्लेझरवरून स्टॅंडपर्यंत सोडले होते,म्हणजे मला जमले होते तर!!
ReplyDeleteखूप मस्त ! सगळं किती बारकाईनी लिहिलं आहेस! मजा आली वाचतांना😊
ReplyDeleteकौतुक करायला शब्दच नाहीत. खूप छान!
ReplyDelete