चगमनेर ५


दुपारचे तीन वाजलेले असतात. ‘फळ फूल नाव गाव’चा खेळ नुकताच संपलेला असतो आणि आम्ही सगळे आपापले गुण मोजत असतो. मी शहाण्या मुलासारखा कागदावर सगळ्या बेरजा करत असतो. माझ्या शेजारी मुक्ता काहीतरी पुटपुटत आणि बोटं नाचवत बसलेली असते. तिच्या पुटपुटण्यात ‘हातचे आले’ हे एक सारखंसारखं येत असतं. तो प्रकार म्हणजे नक्की काय ते मला कधी नीट कळलेलं नसतं त्यामुळे मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्याऐवजी मुक्ताची बेरीज चुकेल का ती उगाच वाढवून स्कोअर सांगेल यापैकी कशाची शक्यता जास्त असेल त्यावर विचार करत बसतो. पलीकडे आजी काहीही न बोलता मनातल्या मनातच एका ओळीतल्या सगळ्या आकड्यांची बेरीज करून तो एकदा ओळीच्या खाली लिहीत असते. तिच्या शेजारी बसलेल्या आईला तेवढंही करावं लागत नाही. तिने पूर्वीच सगळ्या आकड्यांना स्वतंत्रपणे मनात मिसळत जाऊन शेवटचा आकडा तिच्या मनात ठेवलेलाही असतो. असं नेहमीच होतं की ती शांतपणे आमच्या बेरजा पूर्ण होण्याची वाट पाहत बसते. एरवी कधीही कोणी माझ्याआधी संपवलं, गणित असो वा जेवण किंवा आणखी काहीतरी, की मला उगीचच वेग वाढवावा असं वाटतं. पण याच आधीच्या सत्रातल्या दुसऱ्या युनिट टेस्टमध्ये मी चार गुणिले दोन बरोबर सहा लिहून आलेलो असल्यामुळे मी अगदी निमूटपणे मान खाली घालून सगळ्या बेरजा नीट तपासत करत राहतो. 

शेवटी एकदा सगळ्यांचं झाल्यावर मग आम्ही एकमेकांना आमचे गुण सांगतो. आम्ही एकूण आठ राउंड्स खेळलेल्या असतात आणि प्रत्येक राउंडमध्ये चार गोष्टी असतात. एट फोर्झा थर्टी टू. म्हणून आम्हाला एकूण ३२० गुण मिळण्याची शक्यता असते. माझे एकूण गुण २७५ असतात. नेहमीप्रमाणे फुलांनी माझा घात केलेला असतो. आईचे २८५, आजीचे २९० आणि मुक्ताचे २९५ असतात. परंपरा म्हणून आई माझ्या आणि मुक्ताच्या बेरजा तपासते. मी एकही चूक केलेली नसते, पण मुक्ताच्या बेरजेत आईला एक चूक सापडते. आधी मला आनंद होतो, पण ती चूक सुधारल्यावर मुक्ताचे ३०० होतात. मग मी लहान मुलांचं फुलांची नावं ओळखायचं चित्रांचं पुस्तक पुन्हा बाहेर काढून अभ्यास करावा आणि मुक्ताने फावल्या वेळात जरा गणितं करावीत असं आमचं एकमेकांना बोलून होतं. 

आता जरा टीव्हीवर काहीतरी पाहूया असं आम्ही ठरवतो, पण मुक्ताला आणि मला दोघांनाही आवडतात अशी कार्टून्स खूपच थोडी असतात. तिने नेहमीप्रमाणे हॅरी पॉटरच्या काही सीडी आणलेल्या असतात. मी मादागास्कर आणि पोलर एक्सप्रेस आणलेली असते. मी हॅरी पॉटर पाहावं असं मुक्ताला खूप वाटतं, पण मला त्या सगळ्या खूप भीतीदायक आणि अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी वाटतात त्यामुळे माझा दरवेळी नकारच असतो. मी तिचं ऐकत नाही म्हणून मग मुक्ताही पोलर एक्सप्रेससारखा कमाल सिनेमा पाहत नाही. हॅरी पॉटर कुठे आणि पोलर एक्सप्रेस कुठे! मग आमचा वाद सुरु होतो. 

“हॅरी पॉटरमध्ये एक जादूची शाळा आहे,” ती म्हणते. हे वाक्य मी खूपदा ऐकलेलं असतं.

“पोलर एक्सप्रेसमध्ये एक जादूची आगगाडी आहे,” मी म्हणतो. आगगाडी कोणाला आवडत नाही?

“ती तर हॅरी पॉटरमध्ये पण आहे,” मुक्ता म्हणते. “आता तूच ठरव, फक्त एका जादूच्या आगगाडीवरचा आख्खा एक सिनेमा चांगला का ज्या सिनेमात त्याशिवाय जादूच्या इतर बऱ्याच गोष्टीपण आहेत तो चांगला?”

मी काही ठरवण्याचा प्रश्नच येत नाही. पोलर एक्सप्रेस हा माझा जगातला सगळ्यात आवडता सिनेमा असतो आणि त्याच्यापेक्षा चांगलं काही असू शकतं हे मला मुळात पटतच नाही. आणि ही गोष्ट आजीला मी तिला स्वतःहून काही सांगायला जातो तेव्हा ऐंशी टक्के वेळा ते त्याबद्दलच असतं त्यामुळे माहित असते. त्यामुळे हे असंच चालू राहणार हे ती ओळखते आणि मध्ये पडून एक उत्तर काढते. 

“आत्ता आपण दुसरं काहीतरी पाहूया,” ती म्हणते. “आणि आज रात्री झोपायच्या आधी तुम्ही एकमेकांना तुमच्या सिनेमांच्या थोडक्यात गोष्टी सांगा. गोष्टी आवडल्या तर दोघांनी दोन्ही सिनेमे पाहायचे. चालेल?”

मला मुक्ताने पोलर एक्सप्रेस बघायला हवा असतो, आणि शिवाय तिला दरवेळी भेटल्यावर ‘हॅरी पॉटर पाहा’ या तिच्या कटकटीपासून सुट्टी मिळेल म्हणून एकदाचा तो पाहून टाकावा असं मी मनात ठरवतो. पण तेव्हा बोलताना ‘ठीक आहे, आवडलं तर पाहीन,’ असं म्हणतो. मग आजी रिमोट घेऊन मराठी चॅनेल्स फिरवायला लागते. तिला एका चॅनेलवर ‘नवरा माझा नवसाचा’ नावाचा एक सिनेमा सापडतो आणि ती ‘हा बघूया’ असं म्हणते. हॅरी पॉटरपेक्षा काहीही चालेल म्हणून मी हो म्हणतो, आणि मुक्ताही लगेच हो म्हणते. पण बोअर झालं तर म्हणून मी आमच्या बॅगेतून माझी खेळण्यातली आगगाडी आणि रूळ आणून मांडून बसतो. 

“काय पाहताय एवढं?” मावशी विचारते. पाच वाजलेले असतात आणि गेला तास-दीड तास आम्ही अगदी मजेत तो सिनेमा बघत बसलेलो असतो. मग शेवट पाहायला मावशी आमच्याबरोबर बसते आणि संपल्यावर टीव्ही बंद करते. “तुम्हाला जेवणानंतर ठिक्कर खेळायची होती ना? आता जाऊ शकता. जेवण होऊन पुष्कळ वेळ झालाय आणि उन्हं पण उतरली आहेत.”

आम्ही लगेच टुणकन उडी मारून उठतो आणि मागच्या दारातून अंगणात जातो. मावशीने सांगितल्याप्रमाणे सगळी उन्हं उतरलेली नसतात. काही काही फरशांवर दोनचार उन्हं अजूनही असतात म्हणून आम्ही आधी सगळ्या फरशांवर उभं राहून त्या गार झालेल्या असल्याची खात्री करून घेतो. एकदा ते झालं की मग आजोबांच्या बागेच्या कट्ट्यावर ठेवलेले दोन टाइल्सचे तुकडे घेऊन येतो. त्या आमच्या ठरलेल्या ठिकऱ्या असतात. त्यांच्यापैकी आयसॉसिलिस ट्रँगलच्या आकाराची असलेली मला आवडते आणि मुक्ताला ती दुसरी ओबडधोबड आकाराची हवी असते म्हणून इथे आमचं भांडण होत नाही. आमचं हे चालू असताना मावशी वरच्या हॉलमधून आमच्यासाठी रंगीत खडूंचं खोकं घेऊन येते. नंतरचं सगळं रंगवायला मुक्ताला निळा खडू लागतो आणि मला हिरवा, पण मूळ ठिकरीचे चौकोन आखायला आम्ही पांढराच खडू वापरतो.

“तू चौकोन आख, मी आकडे लिहिते,” मुक्ता म्हणते. मागच्या वेळेला तिने मला ती फोनवर बोलून येईपर्यंत आकडेही घालायला सांगितलेलं असतं आणि मी त्या मोठ्ठ्या फरशांना माझ्या लहानपणीच्या गणिताच्या चौकोनी रेघांच्या वहीसारखं समजून त्या पूर्ण भरतील एवढे मोठे आकडे लिहिलेले असतात. मग पायाला खडू लागेल म्हणून ते तिने मला पुसायला लावलेलं असतं. मी एक पांढरा खडू घेऊन त्या फरशांच्या कडेकडेने तो ओढून परत येतो. पुन्हा मुक्ताशेजारी उभं राहून पटाकडे पाहिल्यावर मला एकदम काहीतरी आठवतं. 

“खेळून झाल्यावर आपण गुगळेकडे जाऊन कॅडबरी आणायची का?” मी विचारतो. मावशी आमची गंमत बघत झोपाळ्यावर बसलेली असते. 

“जो जिंकेल त्याला का?” ती विचारते. “किंवा जी जिंकेल तिला का,” ती मुक्ताच्या उघडणाऱ्या तोंडाकडे पाहून पुढे म्हणते. “जो माणूस किंवा जी व्यक्ती. दोन्ही बरोबर.” मागे एकदा मी ‘जो’ म्हटल्यामुळे एक वेगळाच वाद सुरु झालेला असतो आणि तो संपेपर्यंत अंधार पडल्यामुळे आम्हाला खेळतच आलेलं नसतं, आणि हे मावशीला चांगलं आठवत असतं. 

“नाही मी म्हणत होते की सगळ्यांसाठीच आणूया की,” मुक्ता म्हणते आणि मी लगेच मान डोलावतो. ठिकरीच्या खेळात शेवटी कोणीतरी जिंकेलच असं सांगता येत नाही. अगदी पूर्ण खेळायचा म्हटलं तर तो खूप म्हणजे खूप लांबू शकतो. खेळात करायचं काय असतं तर त्या चौकोनांमध्ये आपली घरं करायची. आपलं एक घर करण्यासाठी आपल्याला ती ठिकरी घेऊन कायकाय गोष्टी करायच्या असतात, आणि न चुकता. त्या केल्यावर आपलं घर होतं. पूर्ण खेळ संपायला आठही चौकोनांमध्ये घरं व्हावी लागतात, मग कोणाची जास्त यावर कोण जिंकलं ते ठरतं. पण जर तिथपर्यंत पोचलोच तर असंच होतं की दोघांची चारचार घरं झालेली असतात; पण बऱ्याचदा आम्ही पोचतच नाही. पहिल्या काही चौकोनांत घरं होईपर्यंतच अंगणात डास यायला लागतात. त्यामुळे खेळ थांबवावा लागतो. अशा वेळीही कोणाची जास्त घरं आहेत ते पाहून ठरवायचं का असं मावशी एकदा म्हणालेली असते पण तेव्हा आम्ही दोघांनी मिळून ‘डासांच्या चुकीमुळे आम्ही हरणार नाही,’ असं सांगितलेलं असतं. त्यामुळे ठिक्कर खेळताना आम्ही कधीच जिंकण्याचा विचार करत नाही. आजी कधीकधी म्हणते की तिला आम्ही ठिक्करच खेळलेली सगळ्यात जास्त आवडते. 

“सगळ्यांसाठी म्हणजे कोण गं?” मावशी हसत विचारते. “आजोबा नाही म्हणतील, आजी नाहीच म्हणेल, आत्याला तर विचारूच नकोस.” मुक्ताच्या आत्याला चॉकलेटच आवडत नाही. त्यामुळे मी कधी घरी तशीच आठ तुकड्यांची कॅडबरी आणली की बाबा आणि आजी एकेक तुकडा घेतात पण ती घेत नाही, म्हणून मला सहावा तुकडा मिळतो. “तुम्ही दोघं आणा तुमच्यासाठी.” असं म्हणून ती आत जायला उठते. 

“ए तू कुठे चाललीस?” मी लगेच विचारतो. “तू आमची जज झाली पाहिजेस,”

“अंपायर,” मुक्ता हळूच दुरुस्त करते. “ए हो ना आत्या. नाहीतर आमची फार भांडणं होतात मग नियमांवरून. 

“तू झालीस तर तुझ्यासाठीही एक कॅडबरी आणू.” मी पुढे म्हणतो. यावर मावशी अगदी मोठ्याने हसते आणि पुन्हा झोपाळ्यावर बसते. “सगळे टप्पे काय आहेत ते आधीच ठरवून घ्या पण,” ती म्हणते. “मध्येच पाणी आलं तर मला जावं लागेल.”

पाणी आलं तर आम्हालाही जावं लागणार असतं, पण आम्ही लगेच एकमेकांकडे बघत यादी करायला लागतो. 

“आधी एक ते आठ चौकोनांमध्ये ठिकरी टाकायची,” मुक्ता मला सांगते. 

“आणि एक ते आठ चौकोनांमध्ये लंगडी घालत जाऊन ती उचलून परत घेऊन यायची,” मी म्हणतो. 

“आणि ती उचलताना दुसरा पाय खाली ठेवायचा नाही,” मावशी झोपाळ्यावरून म्हणते. आता तिच्या हातात काहीतरी पुस्तक असतं पण तिचं इकडेही लक्ष असतं हे पाहून आम्ही खूश होतो. 

“एक ते आठ का आठ ते एक?” आजी बाहेर येत म्हणते. आम्ही तिला नेहमी एक ते आठच लंगडी घालत जातो असं सांगतो. फक्त एकदा आजीनेच आम्हाला कशी खेळायची ते दाखवलं होतं तेव्हा ती उलटी गेलेली असते. पण आजीने शिकवलेले बरेच नियम आम्ही आम्हाला हवे तसे करून घेतलेले असतात. “ठीक आहे मग पुढे बोला. आठ झाल्यावर?”

“तळहातावर, लंगडी.” मुक्ता. 

“पालथ्या हातावर, लंगडी,” मी. 

“मुठीवर, लंगडी.” मुक्ता. 

“पावलावर, चालत,” मी म्हणतो. 

“आम्ही इथेही लंगडी घालायचो,” आजी म्हणते. “एका पावलावर ठेवायची आणि दुसऱ्या पायाने घालायची,”

“ए नको गं ते खूप अवघड होतं,” मुक्ता. “पावलावर चालत, मग डोक्यावर…. चालत?” ती आजीकडे बघून म्हणते. आजी हसते आणि हो म्हणते. एवढ्या अवघड लेव्हल्सनंतर एखादी सोपी नको का?

“डोळे मिटून, चालत,” मी. डोळे मिटून अंगणात लंगडी घालण्याचा विचार एकदा आजोबांनी ‘नको,’ म्हणून बंद केलेला असतो. “मग घर,”

“आठवतंय की सगळं व्यवस्थित,” मावशी म्हणते. “पुण्याला खेळता वाटतं,” मला मुक्ताचं माहित नसतं पण मी फक्त एकदोनदाच पुण्याला सोसायटीत खेळायचा प्रयत्न केलेला असतो पण माझ्या मित्रांना तो फारसा आवडलेला नसतो. पण आम्ही ठिकरीचे नियम कधी विसरत नाही. असं होत असणार की आमचा मेंदू वेगवेगळ्या आठवणी वेगळ्या कप्प्यांमध्ये भरून ठेवतो आणि संगमनेरला चाललोय असं त्याला कळलं की तो तो एक कप्पा उघडून तयारच बसतो. म्हणूनच मला दिवाळीचा होमवर्क वगैरे संगमनेरला घेऊन यायला आवडत नाही. संगमनेरचा कप्पा उघडा असताना बाकीचे सगळे बंद पाहिजेत. मग कसं छान असतं. 

मुक्ता पहिल्यांदा खेळते. पहिला चौकोन अगदी समोरच असल्यामुळे तिला अगदी गुडघ्यांवर बसून तिची ठिकरी त्या चौकोनात ठेवता येते. मग ती अगदी मजेत ती उचलून लंगडी घालत जाऊन परत येते. तिसऱ्या चौकोनाच्या वेळी तिची जरा लांब पडते त्यामुळे मावशीला खाली उतरून पाहावं लागतं. ती ठिकरी तिसऱ्या आणि चौथ्या चौकोनाच्या मध्ये असते. 

“रेषेवर असेल तर आउट ना?”

“हो आउट पण पुन्हा टाकायचा चान्स मिळतो,” मुक्ता म्हणते. 

“ए नाही काहीही काय,” मी म्हणतो. “ते म्हणजे तुझी ठिकरी तिसऱ्या चौकोनात असून फक्त रेषेला जराशी टेकली असेल तर,” हेही मी मान्य करतो कारण मागच्या वेळी मी याच कारणासाठी मावशीला मला पुन्हा टाकायचा चान्स देण्यासाठी पटवलेलं असतं. “इथे ती तर साठ टक्के चौथ्या चौकोनात आहे,”

“साठ कशावरून?” मुक्ता बोलायला लागते पण मावशी तिला थांबवते. “ते कितीही टक्के असो, ती ठिकरी तिसऱ्याला ओलांडून चौथ्यात गेलीय ना, मग गेली तुझी संधी. तू टाक रे,”

मग मुक्ता ओट्यावर जाऊन बसत असताना मी टाकतो. मला काहीही करून न पाडता घरापर्यंत पोचायलाच हवं असतं, कारण मुक्ता माझ्यावर वैतागली तर ती तिचं घर करताना माझा बदला घेते. ते तिचं घर असलं तरी मला तिथे लंगडी सोडता येत नाही, त्यामुळे ती मुद्दाम माझ्यासाठी वेडावाकडा रस्ता काढून ठेवते. मी तशी मोठ्ठी उडी मारून तिचं घर थेट ओलांडू शकतो, पण अशाने ठिकरी पडते. तिचं घर चौथ्या किंवा पाचव्या चौकोनात असेल तरच हे जमतं, कारण या चौकोनांच्या पुढे विश्रांतीची जागा असते. तिथे ठिकरी पडली तरी चालतं. 

मी लंगडी घालत आठही चौकोन पूर्ण करू शकतो, आणि तळहातावर ठिकरी ठेवून लंगडी घालत जाणंही मला जमतं. पण पालथ्या हातावर ठेवून जाताना ती दाणदाण उडत असते. अशाच एका उडीच्या वेळी ती पडते आणि मला बाद व्हावं लागतं. मग मुक्ताही अगदी वेगाने हे सगळं पार करत येते आणि पालथ्या हाताची फेरी अगदी काळजीपूर्वक पूर्ण करते. ती शेवटच्या चौकोनात असताना मोठ्याने ‘भॉक’ करायचा मी विचार करतो, पण मग मावशीने तिला पुढे जाऊ दिलं असतं. 

मुक्ता डोळे मिटून जाण्याच्या लेव्हलपाशी येते. इथे मावशीचं काम असतं तिला नीट सांगणं. मावशी त्याप्रमाणे सांगायला लागते. “बरोबर. बरोबर. बरोबर. बरोबर आणि पोचलीस विश्रांतीगृहात! मस्त! आता ये पुन्हा. लांब टाक पाय. बरोबर, बरोबर, बरोबर? हं. जरा अगदीच हो रे फार काही सांगत नाहीये तिला. मुक्ता, आता अगदी लांब पाय टाकायचा बरं का. नाहीतर माझं ऐकतेस का? उडी मार सरळ.” उडी मारण्यावर मुक्ताचा काही फार विश्वास नसतो पण इथे ती थोडा विचार करून मारते. मग डोळे उघडून मावशीकडे पाहते. 

“झालं!” मावशी टाळ्या वाजवत म्हणते. “कर आता घर,”

मुक्ता ठिकरी हातात घेऊन पटाकडे पाठ करून उभी राहते आणि मागच्या मागे ठिकरी टाकते. ती जिथे पडेल तिथे तिचं घर. घर करण्यासाठी चौथा आणि पाचवा चौकोन तिच्यासाठी चांगला असतो कारण मग ते विश्रांतीगृहाला लागूनच मिळतं. त्यामुळे ती थोडी लांब टाकते आणि माझा मोठ्याने हसण्याचा आवाज ऐकून वळते. तिची ठिकरी पुन्हा जरा जास्तच लांब पडलेली असते. 

“आता तर ती शंभर टक्केच पलीकडे पडलीय,” मावशी म्हणते. मुक्ताला या टप्प्यावर पोचल्यावर काही फारसं वाटत नाही कारण तिचं घर तर आता होणारच असतं. म्हणून मग ती मी पुन्हा पालथ्या हाताची लेव्हल करायला जातो तेव्हा माझ्यासाठी चिअर करायला लागते. 

अंधार आणि डास येतात तोपर्यंत आमची एकूण सहा घरं झालेली असतात. तीन - तीन. मुक्ताची घरं तो वाकडातिकडा रस्ता सोडला तर खूप वेगवेगळ्या नक्षीने भरलेली असतात. मी माझ्या घरांमध्ये वाकडा रस्ता काढायच्या ऐवजी एक अगदीच अरुंद असा रस्ता डाव्या कडेला काढलेला असतो, आणि त्याच्या शेजारी वेगवेगळ्या उंचीच्या इमारती काढलेल्या असतात. मागच्याच वेळी आजी हे पाहून म्हणालेली असते की माझं नुसतं एक घर बांधून भागतच नाही. मला एक पूर्ण शहरच बांधायचं असतं. 

“चला आता गुगळेकडे,” मावशी उठून तिची पर्स घेत म्हणते. आम्ही तिघं जाऊन तीन मोठ्या कॅडबऱ्या घेतो. आम्ही आमच्या रस्त्यातच उघडून खायला सुरुवात केलेली असते. पण मावशी तिची कॅडबरी तशीच घरी आणते आणि फ्रिजमध्ये ठेवून देते. 

“तू आत्ता नाही का खाणार?” मी तिला विचारतो. 

“नको, मला आत्ता नकोय. राहू दे नंतर खावीशी वाटली मला तर, किंवा दुसऱ्या कुणालातरी,” मावशी आमच्याकडे पाहून हसत म्हणते. “घ्या आता पानं.”        
                                                                                                

Comments

  1. मी आत्ता सगळे वाचले.वाचता वाचता " अक्षर" घुलेवाडीचे सगळे खूप डोळ्यांसमोर आले.ठिकरीबद्दलच्याही काही आठवणी जाग्या झाल्या.मजा वाटली वाचून.तुझ्या मुद्देसूद मांडणीला व तर्कसंगत वर्णनाला सलाम!

    ReplyDelete
  2. खूप खूप मस्त! ♥️

    ReplyDelete
  3. फारच मस्त आणि सविस्तर! हे वाचून कोणालाही ठिकरी -- ठिक्कर खेळाविशी वाटेल!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प