कोरोनाव्हायरस आणि जादूची छडी
कोरोनाव्हायरसच्या या काळात एक गोष्ट सातत्याने ऐकू येत आहे आणि ती म्हणजे हा काळ आपल्याला खूप काही शिकवून जाईल आणि तो जाईल तेव्हा जग खूप बदललेलं असेल. फक्त ते बदललेलं म्हणजे नक्की कसं, आणि यातून आपण काय शिकावं त्याबद्दलची ही माझी काही मतं.
सर्वप्रथम मी असं म्हणेन की या वाक्यातच एक चूक आहे; ती म्हणजे कोरोनाव्हायरस गेल्यानंतरच्या गोष्टींबद्दल बोलणं. तो जाणार नाहीये. एकतर त्याला या पृथ्वीवर जगण्याचा आपल्याइतकाच अधिकार आहे. पण निसर्गाच्या नियमानुसार आपण जर त्यापेक्षा ‘फिट’ असलो तर उर्वरित आयुष्य आपल्याला आपण सध्या ज्या भीतीच्या छायेत जगतोय त्यात जगावं लागणार नाही. आणि आहोत आपण तसे. लवकरच आपल्याला औषध सापडेल, लस सापडेल आणि याच विषाणूचा पुन्हा असा स्फोट होण्याची चिन्ह दिसली तर आपलं प्रत्युत्तर आत्तापेक्षा खूप जास्त नियोजित आणि अभ्यासपूर्ण असेल. म्हणून ‘कोरोनानंतरच जग’ या वाक्प्रचारासंबंधी मला मार्व्हलच्या ‘डॉक्टर स्ट्रेंज’ नावाच्या सिनेमातील एक वाक्य आठवावंसं वाटतं: “We never lose our demons. We only learn to live above them.” ()
याला आपलाच ‘सैतान’ म्हणण्याचं कारण म्हणजे या विषाणूच्या प्रसारासाठी माणूस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एका प्रमाणात जबाबदार आहे. यात नवीन काहीच नसावं, पृथ्वीवर घडणाऱ्या बहुतेक गडबडलेल्या गोष्टींमध्ये आपला काहीतरी हात असतोच. यामुळेच आता पर्यावरणाच्या बाजूने बोलणाऱ्यांकडून इशाऱ्यांचा पूर येतोय. हा विषाणू म्हणजे कशी निसर्गाने आपल्याला केलेली आपल्या पापांची शिक्षा आहे आणि आपल्यात जरा जरी लाज शिल्लक असली तरी आपण हे सगळं थांबवू वगैरे वगैरे. याबद्दल मला हेच म्हणावंसं वाटतं की ‘निसर्ग’ हा काही ‘कर्म’ मानणारा तर सोडाच, पण विचार करणारा जीवही नाहीये. निसर्ग किंवा आपला ग्रह किंवा जीवसृष्टी, ही एक अत्यंत गुंतागुंतीची यंत्रणा आहे आणि आपण अजाणतेपणी कशात हात घातला तर तिच्यात काहीतरी बिघाड होणारच. जर आपल्या इतर गोष्टी आपण करतच राहणार असू तर हा बिघाड टाळण्याचा प्रयत्न करणं किंवा किमान तो सीमित करण्याचा प्रयत्न करणं हेही आपलं कर्तव्य आहे.
आणि ‘हे सगळं थांबवणं’ म्हणजे नक्की काय? जेव्हा आपण काय काय करणं ‘अपेक्षित’ नव्हतं याची यादी कोणाकडे मागतो तेव्हा ती व्यक्ती हमखास पर्यावरणाच्या नावाखाली तिला न आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी त्या यादीत घालून मोकळी होते. मी जरा व्यापक दृष्टीने विचार करायचा प्रयत्न केला, की खरंच कायकाय आपण करणं ‘अपेक्षित’ नव्हतं; तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आदिमानवाने जेव्हा बोलायला तोंड उघडलं तेव्हाच आपण या ‘अपेक्षा’ धुडकावून लावायला सुरुवात केली. जर इतर सर्व जीवसृष्टी जे करते तेच आपण करणं ‘अपेक्षित’ असतं तर गोष्टी फारच सोप्या होऊन जातात: आपलं तोंड हे गिळायला आहे, हातपाय हे अन्न मिळवायला आहेत आणि उर्वरित शरीर या कार्यांना सहाय्य करण्यासाठी आहे. म्हणून जर आपण ‘अपेक्षित’ या मुद्द्यावर विचार करायला गेलो तर आपण आजपर्यंत घडवलेलं चांगलं-वाईट सगळं जाईल. विज्ञान, कला, साहित्य, सगळं.
हा विचार अर्थातच टोकाचा निराशावादी आहे. तर दुसरीकडे आपल्याला एक टोकाचा आशावाद बघायला मिळतो, तो म्हणजे सगळं काही ठीक होईल हा. खुद्द देव हाही याच आशावादाचा एक भाग आहे. या ‘सगळं काही ठीक होईल’ या विचारातला ‘होईल’ हा शब्द सूचक आहे; त्याच्यामागे ‘आपोआप होईल, आपल्याला काही करावं लागणार नाही’ अशी भावना दडलेली असते. आणि देव आपली काळजी घेईल कारण त्याचं आपल्यावर प्रेम आहे यातही तीच निष्क्रियतेची भावना आहे. या भावनेचा उगम शोधायला जाता मला कुठेतरी वाचलेला एक विचार आठवतो. त्यात म्हटल्यानुसार, ‘प्रेम या भावनेची विरुद्ध भावना म्हणजे तिरस्कार नाही. तिरस्कार हे जरा भ्रष्ट रुपातलं प्रेमच असतं. प्रेमाची खरी विरुद्ध भावना म्हणजे संवेदनाशून्यता.’ आज विज्ञान जेव्हा आपल्याला सांगतं की विश्वाला आपली अजिबात काही पडलेली नाहीये, तेव्हा कोणत्यातरी वरचढ शक्तीचं आपल्यावर प्रेम आहे हे मानण्याचं आकर्षण आपण समजू शकतो. पण तेवढ्याने आपला एकही प्रश्न सुटणार नाहीये.
हे फक्त देवाच्याच बाबतीत घडतं असं नाही. इथे मला जुन्या सुपरमॅनच्या चौथ्या भागाची, म्हणजेच ‘The Quest For Peace’ या सिनेमाची आठवण होते. त्यामध्ये मानवजातीचा शांतताप्रिय तारणहार म्हणून मिरवण्यासाठी हा उपटसुंभ आपली सगळी अण्वस्त्र अवकाशात एका पिशवीत गोळा करून ती पिशवी सूर्यावर भिरकावून देतो. हे म्हणजे किती परिकथेतल्यासारखं झालं नाही? एका वरचढ शक्तीच्या हातून आपल्या सर्वांत वाईट कृत्यांचे पुरावे, जिथे त्यांच्या शंभरपट ताकदीचे स्फोट दर सेकंदाला घडत असतात अशा सूर्यावर फेकून द्यायचे, आणि पुन्हा आपण मोकळेच! असला काहीतरी तोडगा काढण्यात आणि गच्चीत उभं राहून ‘कोरोना गो’ असं किंचाळण्यात मला तरी काही फरक दिसत नाही. वास्तविक आपल्या सगळ्यांना माहित आहे की या मंत्राची उपयुक्तता आपल्या जखमेवरच्या रामबाण उपायाच्या म्हणजेच ‘आला मंतर कोला मंतर छू’ या मंत्राच्या उपयुक्ततेएवढीच आहे. पण म्हणून आपण ते म्हणणं थांबवत नाही. जरा बरं वाटतं, नाही असं नाही. पण या गोष्टींचा फक्त बरं वाटण्यापुरताच उपयोग करावा हे आपण या काळात शिकावं असं मला वाटतं.
हे म्हणजे काय? तर आपल्या कुठल्याही प्रश्नाला एक जादुई, सगळं काही ठीक करून टाकेल असं उत्तर नाहीये. कुठल्याही समस्येवर कायमस्वरूपी उपयोगी पडेल असा तोडगा नाहीये. असेल तरी शोधण्याची आपली माणूस म्हणून कुवत नाहीये. जग फार झपाट्याने बदलतं; अशात आज आपण काढलेला तोडगा शंभर वर्षांनंतरही उपयुक्त राहीलच कसा? असा तोडगा निघेल किंवा कोणीतरी तो आपल्याला देईल हे मानून जगणं जितकं चुकीचं आहे, तितकंच चुकीचं असा तोडगा न मिळाल्यामुळे आत्तापर्यंत आपण घडवलेलं सगळं वायाच गेलं असंही म्हणणं आहे. माणूस म्हणून आपल्या हातात सध्याच्या समस्यांवर तोडगे काढणं एवढंच आहे. इंधनावर चालणाऱ्या गाड्या यायच्या आधी न्यूयॉर्कमध्ये घोडागाड्या होत्या आणि त्यांच्यामुळे त्या शहराच्या आरोग्याचे, हवेच्या दर्जाचे आणि एकूणच पर्यावरणाचे तीनतेरा वाजलेले होते. तेव्हाच्या परिस्थितीत इंधनाच्या गाड्या हे तेव्हाचा सर्वोत्कृष्ट उपाय होता. तेव्हा त्याचा उपयोग झाला, आणि आता दोनशे वर्षांनंतर तेच आपल्या जीवावर उठलंय. ठीक आहे, आपण हाही प्रश्न सोडवू. कदाचित आत्ताच्या आपल्या तोडग्याचे नंतर वाईट परिणाम दिसू लागतील, आणि आपण आपल्या पुढच्या पिढ्यांवर त्यांच्यावर तोडगे काढण्याएवढा विश्वास तर ठेवू शकतो ना? एका वेळी एक गोष्ट करत जाणं हेच आपण करू शकतो. त्यासाठी आत्ताच्या काळातलं आपलं काम म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपल्याला जास्त चांगला बदल कसा घडवून आणता येईल आणि निसर्गाला कमीतकमी धक्का पोहोचेल असं आपलं मानवी जग कसं घडवता येईल यावर सतत विचार करत राहणं हेच आहे. आणि हे घडतंय. Improvement is our job, and it’s a lifetime endeavour. त्यामुळे कोरोनाव्हायरस मधून आपण जर काही शिकणार असू, तर माझी अशी आशा आहे की आपण हे शिकावं की आपले प्रश्न सोडवणं आपल्याच हातात आहे आणि ते करण्याची आपली क्षमताही आहे. आपल्याला त्या क्षमतेवर विश्वास ठेवून, आशा किंवा निराशा यापैकी कुठलंच टोक न गाठता, समोर आलेल्या समस्येवर विचार करत जगणं हेच आपलं काम आहे. आपण एकाचवेळी सगळ्या गोष्टी सुधारू शकत नाही, पण यामुळे आपण हताश होऊन बसलो तर जे सुधारणं आत्ता शक्य आहे तेही आपण सुधारू शकणार नाही आणि आपल्या हातून चांगलं असं कधीच काही घडणार नाही.
Comments
Post a Comment