पिच्छा


“तीन!” रुचिका ओरडली. 

“दोन!” वाणी किंचाळली. 

“एक!” मी ओरडलो. 

“LIFTOFF!”च्या कल्लोळाने ‘The Golden Trio’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप दुमदुमला. 

आणि अडीच-तीन महिन्यानंतर आम्ही पहिल्यांदाच अगदी मनापासून सुटकेचा निःश्वास टाकला. 

रात्रीचे अकरा वाजून सत्तावन्न मिनिटं झालेली होती. सबमिशनच्या डेडलाईनच्या अगदी तीन मिनिटे आधी आम्ही विजयी मुद्रेने आमचा रिसर्च पेपर आमच्या गाईडना मेलने पाठवून दिला होता. तो क्षण मी कधीच विसरणार नाही. त्या एका क्षणी आम्हाला एकमेकांव्यतिरिक्त जिव्हाळ्याचं कुणी नव्हतं, साऱ्या विश्वाची काहीही पर्वा नव्हती आणि आमच्या लेखी आमच्या त्या रिपोर्टइतकी गोंडस वस्तू जगात दुसरी कुठलीही नव्हती. 

हा असा दिमाखदार शेवट ज्याचा झाला, तो प्रवास अर्थातच असंख्य अडथळ्यांनी, डोकेदुखींनी आणि रोमांचाने भरलेला होता. आम्हा तिघांच्या ग्रुपचं हे ‘Golden Trio’, अर्थात ‘सोनेरी त्रिकुट’ हे नाव आम्ही हॅरी पॉटरच्या पुस्तकांतून इतिहासात अजरामर झालेल्या हॅरी, रॉन आणि हर्माइनी या त्रिकुटाच्या नावावरून घेतलेलं होतं, आणि त्याची सुसंगतीही आम्हाला एकत्र आल्यापासून पावलापावलावर जाणवतच आलेली होती. अर्थात, हॅरी, रॉन आणि हर्माइनीने एकत्र मिळून कैक वेळा अक्षरशः जीवघेण्या संकटांवर मात केलेली होती, पण तरीही आमच्या ग्रुपला त्यांची उपमा देणं काही चुकीचं नव्हतं. त्या तिघांवरची संकटं जीवघेणी असली तरी तो सगळा काळ त्यांच्या मुख्य शत्रूची, वॉल्डेमॉर्टची ठळक प्रतिमा त्यांच्यासमोर होती; थोडक्यात आपला लढा कशाशी आहे याची त्यांना पूर्ण जाणीव होती. या काळात आम्हाला मात्र ज्या शत्रूंना तोंड द्यावं लागलं ते सगळे गुप्त आणि अनेक अंशी अज्ञात होते.

हे रिसर्च प्रोजेक्ट हे काही आम्हा तिघांचं पहिलंच काम नव्हतं. त्याआधी इतर अनेक लहानसहान प्रकल्पांमध्ये आम्ही एकत्र काम केलेलं होतं. त्यामुळेच मी जेव्हा एकत्र हा प्रकल्प करण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा त्या अगदी आनंदाने सहभागी झाल्या. आमच्या BA च्या तिसऱ्या वर्षात आम्हाला दोन विशेष प्रकल्प करणं गरजेचं असतं. आमच्या लाडक्या इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटने अतिशय औदार्य दाखवून आमच्यापुढे प्रकल्पासाठी पुस्तक-परीक्षण, इतर रिसर्च पेपर्सचं परीक्षण, केस स्टडी आणि रिसर्च प्रोजेक्ट एवढे पर्याय दिले होते. त्यापैकी पहिला पर्याय फक्त भित्र्या किंवा आळशी लोकांसाठीच असतो यावर आमचं एकमत सुरुवातीलाच झालेलं होतं. तर दुसरीकडे रिसर्च प्रोजेक्ट हे नंतर किती क्लिष्ट होऊन बसेल याची आधीच शक्यता वर्तवणं कठीण असल्यामुळे आमच्या शिक्षकांनी आम्हाला “सुरुवातीला एखादा केस स्टडी घेऊन जरा परिस्थितीचा आढावा घ्या, मग पुढच्या सत्रात रिसर्च करायला घ्या,” असा सल्ला दिला होता, पण तरीही तेव्हाच रिसर्च हाती घेण्याचा निर्णय घेणारे आम्ही एकटेच नव्हतो. आम्ही सगळेच तसे रोमांचित झालेलो होतो आणि काहीतरी धडपड करण्याची प्रामाणिक इच्छा सगळ्यांनाच होती. आम्हा तिघांपुरतं बोलायचं, तर आम्ही याच्याकडे फक्त शंभर मार्कांचा एक जादाचा पेपर म्हणून कधीच पाहिलं नाही. तेव्हाही आणि आत्ताही, आमचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आमच्या प्रिय विषयाच्या अफाट ज्ञानसागरात आमचे आपले एकदोन थेंब टाकण्याचा प्रयत्न, हाच होता. मग त्यातून जे मार्क मिळाले (आणि कौतुक झालं) ते आमच्याच विषयाच्या भाषेत सांगायचं तर आमच्यासाठी positive externality होते. 

या सगळ्याची सुरुवात मात्र अभ्यासक्रमासाठी आम्हाला हे करावंच लागणारे हे आम्हाला कळायच्याही खूप आधी झाली. दुसऱ्या वर्षाच्या शेवटी मी माझ्या मॅडमना (ज्या पुढे आमच्या गाईड बनणार होत्या) सहज मी सुट्टीत एखादा रिसर्च हाती घेऊ का असं विचारलं. खरंतर मी त्यासाठी खूप लहान किंवा अननुभवी आहे हेच त्या म्हणतील अशी माझी अपेक्षा होती आणि त्यात तथ्यही होतं. वर्गाच्या सुरक्षित आवरणाच्या आत राहून आम्ही सगळ्यांनीच इकॉनॉमिक्समध्ये पुष्कळ हातपाय मारलेले असले तरी खऱ्या जगाशी आमचा काहीच परिचय नव्हता. पण त्यांनी मला अगदी मनापासून प्रोत्साहन दिलं. 

“तू बघ तुला कशात करायचंय ते. तुझं ठरलं की मला सांग, मी तुला पुढे कसं जायचं ते सविस्तर सांगेन.” त्या म्हणाल्या. “पण विषय निवडताना घाई करू नकोस. रिसर्च खरंच डोकं खाणारी गोष्ट असते आणि तो विषय आपल्या जिव्हाळ्याचा नसेल तर आपली इच्छाशक्तीही कमी पडू शकते नंतर. त्यामुळे तुला हवा तेवढा वेळ घे. तुला असा एखादा प्रश्न सापडला, की ज्याचं उत्तर तुला सापडत नाहीये आणि कळल्याशिवाय स्वस्थ बसवत नाहीये, की घाल उडी बिनधास्त.”

मग मी उत्साहाने असा विषय, असा प्रश्न शोधू लागलो. अर्थशास्त्राशी अजिबात निगडित नसलेल्या गोष्टी फारच कमी असल्या तरी त्यांच्यापैकी बहुतेकांना हाताळण्याची माझी कुवत नव्हती. हा काळ होता २०१९ मधल्या मे महिन्याचा. जेट एअरवेजकडे बघून सगळेच हळहळत होते. काही काळ मी जेटविषयीच्या बातम्या फॉलो करत राहिलो. स्वतः त्या कंपनीने दोनचार वेळा प्रवास करून आल्यामुळे तिच्या या आजारपणाला पाहून मलाही वाईट वाटत होतं. जेट आणि पर्यायाने भारताच्या हवाई वाहतूक क्षेत्राच्या मी जितक्या खोलात वाचत गेलो तितकं मला ते सगळं खूप विविध व्याधींनी ग्रासलेलं दिसू लागलं. किंगफिशर काही वर्षांपूर्वी बुडलेली होती. एअर इंडिया खूप काळापासून व्हेन्टिलेटरवर होती. गेल्या काही वर्षांपासून जेटची प्रकृती खालावतच चाललेली होती आणि या टप्प्यावर बहुतेकांनी आशा सोडून दिलेली होती. संपूर्ण क्षेत्र काही मूठभर ताकदवान कंपन्यांच्या हाती पडण्याची वेळ जवळ येत चाललेली होती, ज्यामध्ये ज्येष्ठ खेळाडू इंडिगो आणि स्पाईसजेट यांसोबतच उदयोन्मुख ‘विस्तारा’चाही समावेश होता. पण जरा खोलात जाऊन पाहणी केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की त्यांचीही अवस्था काही फार बरी म्हणता येण्याजोगी नव्हती. गेले काही महिने त्यांनीही तोट्यात राहून धंदा केल्याचं कळताच मला धक्काच बसला. 

तेव्हा मी या सगळ्या भूतकाळाचे अहवाल जसे वाचून काढले तसेच अनेक तज्ज्ञांची मतेही समजून घ्यायचा प्रयत्न केला. बहुतेकांचा रोख या दिशेने जात होता, की हवाई वाहतूक क्षेत्रातल्या या काही मोजक्या कंपन्यांमधली स्पर्धा आता धोक्याची पातळी पार करून गेली होती. त्या सगळ्यांनी त्यांच्या अधिकृत सल्ल्यात विमानकंपन्यांनी इतक्या कमी दरात तिकीटविक्री करून तोट्यात राहू नये, असाच विचार व्यक्त केला होता. कंपन्यांमधल्या स्पर्धेच्या शास्त्राचा थोडासा भाग शिकल्यामुळे मला हे कळत होतं की आपली मागणी पूर्ण ढासळू न देता हळूहळू किमती वाढवत नेण्याचं सर्वांनी ठरवलं तर ते अशक्य काही नव्हतं. मला हेही कळत होतं की जी गोष्ट माझ्या लक्षात येऊ शकते ते कंपन्यांना अर्थातच व्यवस्थित कळत होती. मग माझ्या अचानक लक्षात आलं की माझ्या मॅडमनी तेव्हा वर्णन केलेल्या प्रश्नासारखा हा प्रश्न मला खरोखरच स्वस्थ बसू देत नव्हता. 

तिकिटांचे दर वाढवण्यात सगळ्यांचंच भलं आहे याची पूर्ण कल्पना असूनही, या कंपनांनी तोट्यात राहूनच धंदा करणं का पसंत केलं? तोट्यात धंदा करून आपल्याच प्रकृतीला धोक्यात घालणं हा त्यांना तुलनेने बरा पर्याय वाटावा, इतकं भीषण दुसऱ्या बाजूला काय वाढून ठेवलेलं असावं? त्यांना नक्की भीती कशाची वाटत होती? एकमेकांचीच? का आणखी कोणाची?

या टप्प्यावर माझ्या डोक्यात पहिला विचार आला तो माझ्या दोन विश्वासू साथीदारांचा. मॅडम माझ्यावर लक्ष ठेवून असल्या तरी मला त्या दोघींचीही गरज होती हे मला कळलं होतं. मी त्यांना आधी जरा बिचकतच पूर्वकल्पना दिली, कारण आत्तापर्यंत एकत्र काम करण्यात आम्ही धमाल केलेली असली तरी सर्वाधिक सुखाचा क्षण कायम पूर्ण झाल्यावरचाच असे. आपणहून खड्ड्यात उडी घालण्याची त्यांची तयारी होती का ते मला समजून घ्यावंच लागणार होतं. म्हणून मी त्यांना माझ्या इच्छेबद्दल, मॅडमच्या प्रोत्साहनाबद्दल आणि एक विषय सापडल्याबद्दल सांगितलं. 

“मी हे तुम्हाला का सांगतोय ते तुमच्या लक्षात आलंच असेल,” मी पुढे म्हणालो. 

“अर्थात,” दोघीही म्हणाल्या. “कधी सुरुवात करतोय आपण?”

प्रत्यक्षात सुरुवात आम्ही कॉलेज पुन्हा सुरु होऊन, प्रकल्पाची कामगिरी आमच्यावर अधिकृतपणे सोपवल्यानंतरच केली. तोपर्यंत मी या सगळ्या कूटप्रश्नाशी संबंधित सगळे धागे आपसात वाटून दिले आणि तो सगळा काळ आम्ही फक्त शक्य तेवढं वाचन करण्यात घालवला. प्रत्यक्षात काही करण्यापूर्वी पूर्ण माहिती असलेली बरी असा सगळ्यांचाच आग्रह होता. 

आमच्या मॅडमचं एक आवडतं वाक्य म्हणजे “खऱ्या जगात असं नसतं बरं का!” आणि हे वाक्य त्या हटकून वर्गात कुठलंतरी सुबक मॉडेल समजावून सांगितल्यानंतर म्हणायच्या. माझ्या वाट्याला आलेल्या धाग्यांचा अभ्यास करताना मला क्षणोक्षणी याची प्रचिती येत होती. माझ्या हातातला मुख्य विषय म्हणजे ‘Airline Economics’ हा होता. मागेपुढे आम्हाला आमचं मायक्रोइकॉनॉमिक्सचं ज्ञान इथे वापरावं लागलं असतं तर विमानकंपन्यांचा धंदा नक्की कसा चालतो ते व्यवस्थित समजून घेणं तर गरजेचंच होतं. ते समजून घेण्याच्या पहिल्याच प्रयत्नाचा मी धसका घेतला होता. 

मायक्रोइकॉनॉमिक्स मध्ये ग्राहक आणि कंपन्या यांच्यातल्या नातेसंबंधांची मॉडेल्स शिकताना ‘प्राईस’ आणि ‘क्वांटिटी’ हे दोन व्हेरिएबल्स आमचे जिवलग दोस्त झालेले होते. पण इथे त्यांची मदत घेणं इतकं सोपं उरलेलं नव्हतं. क्वांटिटी कशाची? चॉकलेट अथवा फोनप्रमाणे विमानकंपन्या जे विकायच्या ते ‘गुड’ नसून ‘सर्व्हिस’ होती, आणि आजपर्यंत आम्ही ‘सर्व्हिस’ घेऊन आमचं कुठलंही मॉडेल चालवून पाहिलेलं नव्हतं. क्वांटिटीचं एकक काय? एक सीट? एक विमान? का एक प्रवास? काहीच कळेनासं होत होतं. दुसरीकडे ‘प्राईस’चे स्वतःचेच नखरे सुरु होते. एका प्रवाशाच्या एका सीटची एका प्रवासाची किंमत असं ठरवलं, तरी लगेच पुढचा प्रश्न आलाच: कुठला प्रवास? तुमचा माणूस दिल्लीला चाललाय का ऑस्ट्रेलियाला? याने अर्थातच किमतीत फरक पडणार. दुसरं म्हणजे एका ठरलेल्या प्रवासातलीच सीट म्हटली, तरी ती सीट कुठल्या प्रकारच्या विमानात, फार काय विमानाच्या कुठल्या भागात (बिझनेस क्लास, इकॉनॉमी क्लास?) होती त्यावरून परत किमती बदलल्या असत्या. याहून भयंकर म्हणजे जाण्यायेण्याच्या तारखांवरून किमती वेड लागल्यासारख्या बदलत राहतात हे मला माहित होतं. या प्रश्नांनी डोकं फिरायची पाळी आल्यावर मी जरा कासावीस होऊन शोध घेतला, तसं मला सापडलं की ‘Airline Economics’ या खास शाखेत यावर पुष्कळ विचार आधी झालेला होता. खूप डोकेफोड करून लोकांनी ‘Available Seat Kilometers’ हे एकक शोधून काढलं होतं. त्याचा थोडक्यात अर्थ असा, की एक सीट एक किलोमीटर नेणं या हिशोबाने अशा किती सीट्स एकूण किती किलोमीटर नेणं त्या कंपनीला तेव्हा शक्य होतं, ते मोजणं. आणि या एका ‘सीट किलोमीटर’चा हिशोब मांडला आणि कंपनीच्या एकूण कमाईला त्याने भागलं, तर ‘Revenue per Available Seat Kilometer’ मिळू शकत होता. हा तात्पुरता दिलासा होता, पण पुढचे काही महिने आम्ही आमच्या या ‘ASK’ आणि ‘RASK’ या नवीन मित्रांची आमच्या ‘क्वांटिटी’ आणि ‘प्राईस’ या जुन्या सोबत्यांशी ओळख करून देण्याचा आटोकाट प्रयत्न करत बसणार होतो. 

इकॉनॉमिक्सबद्दलची एक टिप्पणी माझी विशेष प्रिय आहे. ती म्हणजे “अर्थशास्त्राचा अभ्यास करणं म्हणजे इंजिन चालू असताना गाडी चालवायला शिकण्यासारखं आहे.” तोपर्यंत एक चपखल वर्णन म्हणूनच याकडे पाहणाऱ्या आम्हाला त्या वाक्याचं मर्म त्या मधल्या काळात अचानक झणझणीत झोंबून गेलं. जूनमध्ये जेटने अखेर सगळी ऑपरेशन्स थांबवली आणि त्यांनी पूर्ण काढता पाय घेतल्याचा इतर दोघांना, म्हणजेच इंडिगो आणि स्पाईसजेट यांना अनपेक्षित फायदा झाला. जेटच्या सगळ्या मागणीवर एकदम झडप घालता आल्यामुळे आणि पर्यायाने जेटचीच वापरात नसलेली विमानं आणि स्टाफ वापरायला मिळाल्यामुळे स्वस्तात धंदा करूनही या दोघांनी आपल्या तब्येती दणक्यात सुधारल्या आणि काही महिन्यांपासून चालू असलेला ‘Indian Aviation Crisis’ अकस्मात संपुष्टात आला. इकडे आमच्या काळजाचा ठोकाच चुकला. ज्या आजारावर उपाय शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो तो एकदम नाहीसाच झालेला होता. आता काय? पण जरा शांत होऊन यावर अखंड सल्लामसलत केल्यावर आमच्या लक्षात आलं की ही एक तात्पुरती विश्रांती होती, आणि ज्या रोगाने या क्षेत्राला पछाडलेलं होतं तो शोधून त्यावर मात केली नसती तर काही काळाने पुन्हा हीच परिस्थिती उद्भवली असती. त्यामुळे आम्ही पुन्हा नेटाने कामाला लागलो. 

रिसर्चचा एक महत्त्वाचा भाग असतो ‘लिट रिव्ह्यू’. किंबहुना ही पायरी यशस्वीरीत्या ओलांडल्याशिवाय पुढे काम करणं हे नैतिकदृष्ट्या चुकीचं असतं. आपण जे करायला निघालो आहोत ते आपल्या आधीच कोणी केलेलं असेल तर त्या योगदानावरचा हक्क त्यांचा असतो. आपण अजाणतेपणे कुणी आधीच केलेलं काम पुन्हा करून दिलं तर आपल्यावर plagiarism चा आरोप लागतो, आणि अशा वेळी आपण ते मुद्दाम केलेलं नसून आपला फक्त अभ्यास कमी पडला हा मुद्दा गैरलागू ठरतो. आपण पूर्ण अभ्यास केलेला असल्याचीच अपेक्षा असते. ही समस्या जरी काही काळापासून अस्तित्त्वात असली तरी त्याचं ‘The Indian Aviation Crisis’ मध्ये रूपांतर अगदी नुकतंच झालेलं होतं, त्यामुळे त्यावर काही पेपर्स नसतील हा माझा अंदाज बरोबर ठरला. याशिवाय इतर संबंधित रिसर्च पेपर्स वाचून आम्हाला गोष्टी कशा हाताळल्या जाव्यात याची मौल्यवान माहिती मिळाली असती हेही आहेच. त्यामुळे plagiarism ची शक्यता टाळण्यासाठी या पेपर्सचे केवळ ॲब्स्ट्रॅक्ट्स वाचून आमचं काम होणार असलं तरी आम्ही शक्य होतं तेव्हा त्या पेपर्सच्या पद्धतीही वाचायचा प्रयत्न केला. 

या सगळ्या अभ्यासानंतर आम्ही प्रत्यक्ष मैदानात उतरायला तयार झालेलो होतो. पहिली पायरी म्हणजे आमच्या प्रश्नावर एक संभाव्य उत्तर (hypothesis) मांडणं, जेणेकरून मग ते तपासून पाहता येईल. आमच्या सगळ्या शिक्षकांनी आम्हाला ‘नैतिक रिसर्च’ चे धडे देताना एक असं सांगितलेलं होतं की सुरुवात करताना आपला हायपोथेसिस बरोबर ठरणार आहे का चुकीचा त्याची आपल्याला आधीच कल्पना नसली पाहिजे. तरच आपला रिसर्च शक्य तितक्या निःपक्षपाती पद्धतीने पार पडू शकतो. असे हायपोथेसिस काळजीपूर्वक निवडायचे कसे त्याबद्दल आम्हाला जरा धास्तीच वाटत होती, पण सुदैवाने आम्ही जे दोन हायपोथेसिस शेवटी ठरवून टाकले त्यापैकी एकाच्याही बरोबर असण्याच्या संभाव्यतेबद्दल आम्हाला अजिबात काही कल्पना नव्हती. 

आमचा प्रश्न होता की विमानकंपन्यांना भीती वाटतेय ती कोणाची? त्याला उत्तर म्हणून आमचा एक हायपोथेसिस असा होता की त्यांना लोक त्यांना पूर्ण सोडून देऊन वाहतुकीच्या इतर पर्यायांकडे; मुख्यतः रेल्वेकडे जातील आणि हे त्यांना टाळायचंय. दुसरा असा होता की त्यांना एकमेकांचीच भीती वाटतेय, म्हणजे प्रत्येक कंपनीच्या मनात आपण किमती वाढवल्या आणि इतरांनी नाही वाढवल्या तर आपली मागणी बुडेल अशी भीती असल्यामुळे कोणीच वाढवत नाहीये अशी परिस्थिती. आम्ही आमच्या परीने हे दोन्ही हायपोथेसिस तपासून पाहायला सुरुवात केली. 

पहिला ग्राहकांच्या वागणुकीशी निगडित असल्यामुळे वाणीने सुचवलं की आपण त्यांनाच गाठूया. त्यासाठी आम्हाला एक किचकट सर्व्हे रचावा लागला. समोरच्या व्यक्तीला आधी ती कुठल्या कारणांसाठी विमानप्रवास निवडेल असं विचारून मग आम्ही प्रत्येक व्यक्तीसमोर तिच्या preferences नुसार खास तयार केलेली एक काल्पनिक शक्यता ठेवली. त्यात आम्ही तिच्याच सगळ्या अपेक्षा विमान पूर्ण करत असल्याचं दाखवलं, आणि दुसरीकडे विमानाच्या तिकीट दरात एकदम मोठी वाढ झालेली दाखवली. यामागचा विचार असा होता की विमान त्या व्यक्तीच्या बाकी सगळ्या इच्छा पुरवत असूनही तिला पर्याय बदलून रेल्वे किंवा इतर सेवा निवडावीशी वाटावी इतकी ताकद त्या एकट्या ‘प्राईस’मध्ये होती का ते तपासणे. चांगला पावणेदोनशे लोकांचा सर्व्हे घेऊन आमच्या असं लक्षात आलं, की असं घडलं असतं तरी किमान ७५% लोकांनी त्यांचा विमानानेच जायचा विचार मुळीच बदलला नसता. यावरून विमानकंपन्यांना मागणी घटण्याची भीती वाटायचं काही कारण नाही असं सुचवून आम्ही आमचा पहिला हायपोथेसिस खोटा ठरवला. 

दुसऱ्याची तपासणी अजूनच गुंतागुंतीची ठरणार होती. किमतीच्या आधारे एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या कंपन्यांपुढचे पर्याय मांडण्यासाठी तयार केलेलं ‘बर्ट्रांड मॉडेल’ आम्ही शिकलेलो होतो. ते मॉडेल एका कंपनीला तिच्या सगळ्या स्पर्धकांच्या सगळ्या संभाव्य चालींची पूर्ण कल्पना असेल हे गृहीत धरून तिची स्वतःसाठीची सर्वोत्तम चाल कुठली असावी ते सांगतं. उदाहरणार्थ इथे प्रत्येक कंपनी इतर कंपन्या काय किमती लावू शकतील याचा अंदाज घेऊन स्वतःची किंमत ठरवू शकली असती. हे मॉडेल वापरण्याची कल्पना रुचिकाने सुचवली तेव्हा ते खूप सोपं वाटलं होतं. एवढं काय? प्राईस आणि क्वांटिटी मिळवायचे आणि चालवून पाहायचं. पण वरच्या एका परिच्छेदात ते मिळवण्यात किती कष्ट पडले ते सांगितलं आहेच. सुदैवाने ASK आणि RASK यांचा आम्ही निवडलेल्या चारही कंपन्यांचा (जेट, इंडिगो, स्पाईसजेट आणि एअर इंडिया) सगळा डेटा Directorate General of Civil Aviation या अधिकृत सरकारी वेबसाइटवरून अगदी आरामात मिळाला. ते मॉडेल चालवण्याची युक्ती अशी की प्रत्येक कंपनीच्या मागणीचा आलेख (Demand Curve) काढताना त्या कंपनीबरोबर इतर कंपन्यांच्या ‘प्राईसेस’ देखील समीकरणात घालायच्या आणि अशी चारही समीकरणं एकत्रितपणे सोडवली की आम्हाला लगेच प्रत्येक कंपनीची, इतरांच्या किमती गृहीत धरल्या तर सगळ्यात जास्त ठेवता येईल अशी प्राईस मिळाली असती.      

आमची उरलीसुरली सगळी ऊर्जा ती समीकरणं मिळवण्यातच खर्ची पडली. एकतर डेटाच्या आधारे व्हेरिएबल्समधलं नातं ओळखण्याची कला, जी संख्याशात्रात रिग्रेशन या नावाने ओळखली जाते, ती आम्ही तेव्हा शिकलेलोच नव्हतो. म्हणजे साधं एका रेषेचं रिग्रेशन त्या दोघींचं आधी संख्याशास्त्र असल्यामुळे करून झालेलं होतं, पण हे जरा जास्त क्लिष्ट प्रकारचं निघालं. शेवटी आम्ही ते मॉडेल आम्हाला ज्यांनी शिकवलं होतं त्या आमच्या सरांची मदत मागितली आणि त्यांनीही खूप उत्साहाने आम्हाला खूप महत्त्वाचे सल्ले दिले. अखेर ते आणि आईच्या मदतीने घाईघाईने थोडंसं रिग्रेशन शिकून चालवलेलं मॉडेल याचं फलित म्हणजे आम्हाला आमच्या चार प्राईस व्हेरिएबल्सच्या किमती म्हणून चार ऋण संख्या मिळाल्या. या टप्प्यावर मी विमानातून उडी मारण्याच्याच मनस्थितीत होतो, पण आईने मला दाखवून दिलं की मी सुरुवातीला केलेल्या एका गृहीतकामुळे माझ्या व्हेरिएबल्समधलं नातं मूळच्या प्राईस आणि क्वांटिटीच्या नात्याच्या बरोबर उलट होतं, म्हणून संख्या ऋण आल्या होत्या. मी आमच्या मॅडमना याबद्दल सांगताच त्यांनीही त्या संख्यांना धन मानण्यास काहीच हरकत नसल्याची ग्वाही दिली आणि आम्ही एकदाचे सुटलो. 

या सगळ्या काळात मॅडमचा आविर्भाव फक्त अधूनमधून डोकावणाऱ्या एका चौकस जाणत्या व्यक्तीचा होता. दर आठवड्याला आमच्या उचापती कुठल्या स्थितीत होत्या ते आम्ही त्यांना सांगायला जायचो फक्त. त्यांनी कधीच आमच्या मानगुटीवर बसून आमच्या प्रत्येक छोट्याछोट्या पावलात लक्ष घातलं नाही. हेही योग्यच होतं, कारण त्यांच्या दृष्टीने या सगळ्या खटाटोपाचा मुख्य उद्देश आम्हाला खऱ्या जगाची ओळख व्हावी आणि खरं ‘इकॉनॉमिक्स’ कशाशी खातात ते व्यवस्थित कळावं हाच होता. त्यामुळे त्यांनी जिथे गरज पडेल तिथे आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं आणि क्वचित आमच्या पायावर मोठा धोंडा पाडण्यापासून वाचवलं, पण त्यापलीकडे आम्हाला आमच्याच पद्धती आणि आमचेच तर्क आजमावून पाहू दिले. त्या काळात आम्हाला अधूनमधून जे नैराश्याचे झटके यायचे त्यात त्यांच्या या अलिप्तपणाबद्दल आणि आमच्यावरच्या ‘अतिविश्वासा’बद्दल थोडीशी चीडही येऊन गेली. पण ते काम झाल्यावर यामुळेच आमची विजयाची आणि आत्मविश्वास वाढीस लागण्याची भावना तितकीच खरी होती. सबमिशनच्या आधीच्या दोन दिवसांत मात्र त्यांनी आम्हाला जी क्षणाक्षणाला साथ दिली ती मी कधीच विसरणार नाही. आम्हाला या प्रकरणातून शिकायला मिळालेली आणखी एक गोष्ट म्हणजे सर्वांत नादिष्ट कलाकारापेक्षाही रिसर्च पेपर तपासणाऱ्याचे नखरे जास्त असतात. पान नंबर लिहिण्याच्या पानावरच्या त्या एका विशिष्ट जागेपासून मधलं अंतर, फॉन्ट वगैरे प्रत्येक लहानसहान गोष्टींवर त्या तपासणाऱ्यांची मतं असू शकत होती. तेव्हा तो फायनल ड्राफ्ट तयार करताना आम्ही दर दहा मिनिटांनी मॅडमना पिडायचो, पण त्यांनी अगदी शांतपणे आमच्या सगळ्या शंका आल्या तशा दूर केल्या. आणि या प्रकल्पाचा अखेरचा टप्पा, म्हणजेच एका बाहेरच्या तज्ञाने घेतलेली आमची यावरची तोंडी परीक्षा, हा त्या तिथे बसलेल्या नसत्या तर इतक्या चांगल्या प्रकारे पार पडूच शकला नसता. त्या तज्ञांनी विचारलेल्या बारीकसारीक प्रश्नांना उत्तरं देताना आम्ही जरा गडबडलो तर त्या स्वतःहून खुलासा करीत आणि आम्हाला पुढे बोलायला प्रोत्साहन देत. आम्हाला सत्र संपल्यावर आमचे मार्क्स मिळालेच, पण ती तोंडी परीक्षा संपल्यावर त्यांनी ज्या कौतुकाने आम्हाला “छान केलंत, आता या,” असं म्हणून पिटाळलं त्यानेच आम्हाला सगळं मिळालेलं होतं. 

आणि हवाई वाहतूक क्षेत्राचं काय? आम्ही त्या बर्ट्रांड मॉडेलवर एवढी मेहनत घेतली त्याचंच फळ म्हणून त्या मॉडेलने अखेर जो निष्कर्ष काढला तो खूपच सुरेख निघाला. तो पाहिल्यावर आम्हाला असं कळलं की जेट, इंडिगो आणि स्पाईसजेट हे तिघंही आत्तापेक्षा खूपच जास्त किमती सहज लावू शकले असते, तेही आपापसातल्या स्पर्धेला धक्का न लावता. त्यांना भीती होती ती एअर इंडियाची, आणि तिच्या किमती तुलनेने खूपच कमी आलेल्या होत्या. त्याचाच अर्थ जर एअर इंडिया इतरांशी फक्त स्वतःच्या बळावर स्पर्धा करत असती तर ती लावू शकत असलेला उच्चतम दर इतरांच्या उच्चतम दरापेक्षा खूपच कमी होता. थोडक्यात मॉडेलचा निष्कर्ष असा होता की सरकारच्या पैशाचा पाठिंबा नसता तर एअर इंडिया एवढा काळ टिकूच शकली नसती आणि तिच्या अनुपस्थितीत उर्वरित क्षेत्रातली स्पर्धा सुयोग्य राहून जेटचा जीव वाचला असता. हा निष्कर्ष वास्तवाशी इतका अनुरूप होता की आम्हाला लगेच कळलं की आम्ही किमान कुठली घोडचूक तरी केलेली नाहीये. शेवटी आम्ही या जोरावर आमचा दुसरा हायपोथेसिस खरा ठरवून अधिकृतपणे आमच्या शोधकार्याची सांगता केली. 

या प्रकल्पातून आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यापैकी सर्वात महत्त्वाची अर्थात हीच होती की खरं जग आपल्या कल्पनेपेक्षा खूपच गुंतागुंतीचं असतं. पण त्याचबरोबर आमच्या असंही लक्षात आलं, की खरी मजा त्यातच आहे. जर जग खरंच आमच्या पुस्तकातल्या बर्ट्रांडच्या उदाहरणानुसार वागत असतं तर त्यासाठी लागणारे जिन्नस आपणहून शोधून मिळवण्याचं सुख आम्हाला कधीच मिळालं नसतं. याबरोबरच, अर्थशास्त्राला विचारला जाणारा एक खवचट प्रश्न हा असतो की जर जग इतकं कल्पनेपलीकडे क्लिष्ट असेल तर ही सोपी मॉडेल्स रचतात कशाला? याला आम्ही जे यापुढे सडेतोड उत्तर दिलं असतं त्याला वास्तवाचा आणि स्वानुभवाचा आधार असता. या सगळ्याच्या पलीकडे, रिसर्च म्हणजे मला काही बाबतीत लॉजिकचे कूटप्रश्न सोडवण्यासारखंच वाटतं. उत्तर मिळायला हवं असतंच, पण ते स्वतः हुडकून काढण्यातला आनंद जास्त असतो. आणि आमच्या पहिल्याच प्रयत्नात आम्हाला यश आल्यामुळे पुढे असे अजून जास्त महत्त्वाकांक्षी प्रश्न हाती घेऊन सोडवण्याच्या उर्मीला बळच लाभलं होतं. 

इंजिन अजून चालूच आहे. ते कधीही थांबणार नाही आणि त्याला अधिकाधिक खोलात जाऊन समजून घेण्याची आमची तहानही कधी पूर्णपणे भागणार नाही.


       


Comments

  1. 2019मधला एका विशिष्ट विषयाच्या संशोधनाच्या प्रवासाचे उत्कंठावर्धक वर्णन फारच कौतुकास्पद!! आणि शेवटच्या परिच्छेदातील मजकुराला तर माझा सलाम!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प