विजय


‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ या विषयावर एक लेख लिहिण्याचा विचार खूप पूर्वीपासून घोळत होता. विशेषतः ‘एंडगेम’ने या पहिल्या पर्वाची सांगता होऊन आता एक वर्ष उलटून गेल्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा गौप्यस्फोट होण्याची शक्यता उरलेली नाही तेव्हा आता हे लिहायला हरकत नाही असं वाटलं. तरीही या लेखात काही विशिष्ट गोष्टींचा उल्लेख टाळता येणं तसं अशक्यच असल्यामुळे, आपल्यापैकी ज्यांना कुणालातरी ‘लव्ह यू’ म्हटल्यावर पुढे लगेच ‘३०००’ आठवत नाही त्यांनी जरा काळजीपूर्वकच वाचायला घ्यावा. 

आपल्याला लाभलेल्या कल्पनाशक्तीला सतत असंख्य प्रकारे चालना देण्याची माणसाची हौस ही आपल्या सगळीकडे प्रश्न विचारत राहण्याच्या अंतर्गत उर्मीशी अगदी सुसंगत आहे. ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला वास्तवात मिळत नाहीत त्यांना आपण कल्पनेत जिवंत करतो. आपल्यापैकी बरेच जण ‘चॉकलेटचा बंगला कसा असेल?’ हा प्रश्न आणि त्याचं सांगितिक उत्तर ऐकत आपल्या बालपणाचा एक तुलनेने जास्त रम्य भाग घालवला असेल. असे असंख्य प्रश्न आपल्या सगळ्यांना पडत असतात, आणि पुष्कळदा नुसतं एका झाडाखाली शांतपणे बसून त्यांच्यावर विचार करत बसणं या सुखावह अवस्थेपासून आपलं वास्तव आपल्याला दूर खेचत असतं. त्यामुळे अशा एखाद्या प्रश्नाला जेव्हा कोणीतरी आपल्याला एक अत्यंत हवंहवंसं उत्तर देऊ करतं तेव्हा त्या उत्तराच्या प्रेमात पडायला आपल्याला वेळ लागत नाही. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अर्थातच ‘आपल्याला जादू शिकता आली असती तर?’ हा प्रश्न आणि त्याला मिळालेलं ‘हॅरी पॉटर’ हे अजरामर उत्तर. एक कथा म्हणून, साहित्याचा नमुना म्हणून किंवा काल्पनिक रचना म्हणून ही पुस्तके उत्कृष्ट आहेतच, पण त्यांनी साऱ्या जगाला लळा लावला तो त्यामुळे नाही. शाळेत जाणं, मित्रमैत्रिणींबरोबर राहणं, होमवर्कवरून कुरकुर करणं, सण, खेळ, सहली, एकमेकांच्या घरी सुट्टी घालवणं… हे आपल्या सगळ्यांनी अनुभवलेलं वास्तव आणि त्याला मिळालेला एक अद्भुत जादुई टच असल्यामुळे शेवटी प्रत्यक्षात स्वतः एकदाही जादू न करता आपण त्या विश्वाचा  कायमसाठी भाग झालो. 

अशा अनेक प्रश्नांवर खूप जणांनी विविध उत्तरे द्यायचा प्रयत्न केला; त्यापैकी ‘पृथ्वीपलीकडे जीवसृष्टी असेल का’ या प्रश्नाचा तर अक्षरशः चावून चोथा झाला. पण या प्रश्नाला मिळालेल्या हजारो उत्तरांपैकी फक्त ‘स्टार वॉर्स’ सारखे काही जागतिक कीर्ती मिळवू शकले आणि उरलेल्यांपैकी खूप जणांना ‘cult following’ वर समाधान मानावं लागलं. अशीच अवस्था सध्याच्या काळात आणखी एका प्रश्नाची झाली आहे. ‘आपल्याकडे विशेष शक्ती असत्या तर?’ हा तो प्रश्न, आणि अनेक वर्षांपासून यावरच्या उत्तराचा मुख्य स्रोत कॉमिक्स होता. सिनेमा बनवण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा होत गेल्या तसे कॉमिक्समधून घराघरांत पोचलेल्या ‘सुपरहिरो’ या सदरातील काल्पनिक कथांना पडद्यावर आणण्याचे खूप प्रयत्न केले गेले. त्यापैकी न भूतो न भविष्यती इतकं अफाट यश, प्रसिद्धी, पैसा आणि पुढची बरीच वर्षं जगावर राहील असा प्रभाव हे सगळं फक्त एका प्रयत्नाच्या वाट्याला आलं. त्याच काळजीपूर्वक आखलेल्या संघटित प्रयत्नाला आपण ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’ या नावाने ओळखतो.  

यामधल्या सिनेमांविषयी बोलण्यापूर्वी आपण या संकल्पनेची थोडी माहिती करून घेऊया. मार्व्हल कॉमिक्स या कंपनीने त्यांनी निर्माण केलेल्या यच्चयावत सुपरहिरोंवर हजारो कॉमिक्समधून कथा सांगितल्या होत्या. त्यापैकी काही निवडक गोष्टी उचलून, त्यांना एकत्र करून एक संघटित ‘युनिव्हर्स’ उभं करण्याची कल्पना या शतकाच्या सुरुवातीला मार्व्हलच्या डोक्यात होती. या ‘युनिव्हर्स’ मधला पहिला अधिकृत सिनेमा म्हणजे २००८ साली प्रदर्शित झालेला ‘आयर्न मॅन.’ मार्व्हलने त्यानंतरच्या अकरा वर्षांत या युनिव्हर्समधले पहिले तेवीस सिनेमे (आयर्न मॅन धरून) काढले. ही तेवीस सिनेमांची मालिका ‘इन्फिनिटी सागा’ या नावाने ओळखली जात असून या नव्या स्टुडिओचा पहिला महाप्रकल्प होता. तिच्यामधला ‘अव्हेंजर्स: एंडगेम’ हा बाविसावा सिनेमा नुसता त्या मालिकेतलाच नाही, तर आत्तापर्यंतच्या इतिहासातला जगातला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे, आणि ही सबंध मालिकाही जगातली सर्वाधिक कमाई करणारी सिनेमालिका आहे. 

MCU च्या अफाट यशाने ‘सुपरहिरो’ या संकल्पनेलाच एका नव्या युगात आणून ठेवलं. सुपरहिरो फॉर्म्युला हा अनेक दशकांपासून ठरलेला आहे आणि आपल्या युनिव्हर्समध्ये मार्व्हलने तो मोडून काढण्याचा अगदीच नावापुरता प्रयत्न केला आहे हे जरी खरं असलं, तरी त्यांनी केलेले बदलही वाखाणण्याजोगे आहेत. माझ्या मते नुकताच आलेला ‘जस्टीस लीग’ हा सिनेमा मार्व्हलपूर्व जगात आनंदाने स्वीकारला गेलाही असता, पण मार्व्हलने अपेक्षा उंचावून ठेवल्यामुळे तो आणि त्याच्या आजूबाजूचे अनेक इतर समकालीन फॉर्म्युलावर आधारित सिनेमे आपटले. ते बदल नक्की कोणते व कसे त्याच्या खोलात जाण्याचा मी इथे प्रयत्न करणार आहे, कारण ‘इन्फिनिटी सागा’ला जगाने एवढं डोक्यावर का घेतलं ते समजून घेण्याकरता ते आवश्यक आहे. 

सर्वप्रथम या ‘सुपरहिरो समीकरणा’वर एक नजर टाकूया. ते ज्यावर आधारित आहे ते ‘नायक समीकरण’ इतकं प्रचलित आणि सर्वमान्य आहे की ‘Ted Ed’ ने त्यावर एक खास व्हिडिओच तयार केला आहे. त्यांनी सांगितलेला तो नायकाचा बारा टप्प्यांचा प्रवास हा तुमच्या आवडीच्या कोणत्याही नायकाला चालवून बघा; तो नक्कीच लागू होईल. आपला हॅरीदेखील याला अपवाद नाही, आणि असूही नये, कारण ते समीकरण घडवण्यातच असं आलेलं आहे की आपल्या मानवी मनाला पटण्यासारखं वाटेल. ते तसंच ठेवून आजूबाजूची गोष्ट भन्नाट प्रकारे मांडता आली तरच ती एकाच वेळी अद्वितीय आणि तरीही भावनिक पातळीवर आपल्याशी संवाद साधू शकणारी होते. याच समीकरणाची सुपरहिरो आवृत्ती अशी: एक सामान्य व्यक्ती, स्वतःच्या सामान्य आयुष्यात फारशी सुखी नसलेली, अपघातानेच कुठल्यातरी दैवी किंवा जादुई शक्तीच्या संपर्कात येते. मग ती शक्ती ज्या गुणांच्या शोधात असते ते गुण तिला या व्यक्तीमध्ये सापडतात, पण त्या व्यक्तीला स्वतःला ते दिसत नसतात. पहिल्यांदा त्या शक्तीची जबाबदारी आपल्यावर टाकलेली पाहून ती व्यक्ती बावचळते, नकारात्मक दृष्टिकोन बाळगते, काही वेळा त्या शक्तीचा गैरवापरही करते. पण प्रसंग ओढवल्यावर त्या व्यक्तीमधला तो सुप्त गुण एकदम उफाळून वर येतो आणि त्या शक्तींना योग्य प्रकारे वापरण्याची प्रेरणा मिळते. मग त्या संकटाचा नाश होतो आणि ती व्यक्ती आपल्या शक्ती स्वीकारून त्यांचा जगाच्या कल्याणाकरिता वापर करण्याची जबाबदारी अंगावर घेते. त्याचबरोबर ती स्वतःचं आधीचं नाव सोडून एक नवीन नाव स्वतःसाठी तयार करून घेते आणि त्या नावाने ती प्रसिद्ध होते.  

असं नुसतं बघायला गेलं तर या समीकरणात वाईट काहीच नाही, पण त्याच्या अतिवापरामुळे तुमची सुपरहिरो कथा अतिशय predictable होते. या समीकरणाला तडे देण्याकरता मार्व्हलने सुरुवातच अगदी त्याच्या मुळावर घाव घालून केली. ते म्हणजे सुपरहिरो आणि त्याची शक्ती यांच्यातलं नातं. या समीकरणानुसार विचार केल्यावर आपण असा निष्कर्ष काढतो की सुपरहिरो बनण्यासाठी काहीतरी गुण अंगी असावा लागतो, आणि ती शक्ती तो गुण वर काढण्यास मदत करते. म्हणजेच तो माणूस हिरो आधीपासूनच असतो, फक्त शक्ती मिळण्याचा अवकाश. MCU चा युक्तिवाद अनेक अंशी याच्या उलट आहे. त्यांच्या मते कुठलाही सुप्त गुण माणसाला सुपरहिरो बनण्यास पात्र ठरवत नाही. शक्तीही काही फक्त गुणी लोकांनाच मिळते असंही नाही. माणसाला सुपरहिरो हा घडवावा लागतो, आणि शक्ती फक्त मदत करू शकते. हेच हॅरी पॉटरमध्ये ‘it’s not our abilities that make us who we are; it is our choices’ या सुप्रसिद्ध वाक्याच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे. 

हा युक्तिवाद समजून घेण्यासाठी मार्व्हल विश्वातल्या सर्वाधिक लोकप्रिय सुपरहिरोंच्या गटावर, म्हणजेच ‘अव्हेंजर्स’वर एक नजर टाकूया. या गटाच्या सहा मूळ सभासदांचे गुणविशेष काय असावेत? एक खुशालचेंडू वृत्तीचा, गर्भश्रीमंत आणि आपल्या अफाट बुद्धीचा प्रचंड गर्व बाळगणारा उद्योजक. एक देशप्रेमाने प्रेरित, स्वभावाने भाबडा आणि सत्तर वर्षं बर्फात गोठून राहिल्यानंतर एकदम एकविसाव्या शतकात उठल्यामुळे बिचकणारा सैनिक. एक अमेरिकन आणि एक माजी रशियन अशी गुप्तचरांची जोडी. एक परग्रहावरचा, दैवी शक्ती असलेला आणि ऐषारामात जगण्याची सवय असलेला राजपुत्र. एक अतिशय बुद्धिमान, पण स्वतःच्याच एका भयाण रूपाचा तिरस्कार करत अंग चोरून जगणारा उदास शास्त्रज्ञ. आता विशेष शक्ती किंवा कौशल्य यांच्यापैकी प्रत्येकाकडे आहे, पण यांना हिरो मानण्यात आपल्याला काहीच तथ्य वाटणार नाही. २०१२ साली आलेल्या ‘द अव्हेंजर्स’ या सिनेमात त्यांना एका परकीय हल्ल्याविरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन केलं जातं, तेव्हा त्यांच्यात काही विलक्षण बदल घडून येऊन ते एकत्र उभे ठाकतात, असं काहीही होत नाही. कारण त्यांच्यात जरी कुठला सुप्त चांगुलपणा, स्वतःपलीकडे जाऊन जगाचा विचार करण्याची कुवत वगैरे असतं, तरी फक्त त्या शक्ती किंवा संकटाची चाहूल त्यांना एकत्र येण्यास पुरेशी ठरत नाही. त्याउलट त्यांचे आपापसातले हेवेदावे, मतभेद आणि egos डोकं वर काढू लागतात आणि शेवटी त्यांच्यात एक कडाक्याचं भांडण होतं आणि आधीच हाताबाहेर चाललेलं संकट आणखीनच चिघळतं. मी मध्यंतरी पाहिलेल्या एका सुरेख व्हिडिओच्या विश्लेषणाच्या मते, तो भांडणाचा सीन हा त्या सिनेमातला सर्वोत्कृष्ट, आणि ही मालिका यशस्वी होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. शेवटी या सहाजणांना एकत्र यायला कारणीभूत ठरणारी गोष्ट ही कुठलाही उफाळून येणारा चांगुलपणा नाही, तर त्यांच्याच जवळच्या, ते एकत्र येतील यावर ठाम विश्वास असणाऱ्या एका एजंटचा मृत्यू होतो तेव्हा त्यांना वाटलेली सामुहिक लाज आणि पश्चात्ताप, ही असते. या सगळ्यामुळे ही मंडळी आपल्याला अगदी पहिल्यापासूनच १००% माणसं असल्याचं पटतं, आणि म्हणूनच त्यांचा शेवटी झालेला विजय आपल्याला अतर्क्य वाटत नाही. 

कुठल्याही यशस्वी कथेत पात्रनिर्मितीला विशेष महत्त्व आहे. कथेतल्या लोकांवर आपला जीव असेल तर त्यांच्या गोष्टी आपण त्यांच्याइतक्याच गुंतून अनुभवतो. आणि मार्व्हलने रचलेल्या या तेवीस सिनेमांच्या मालिकेत त्यांनी लहानसहान डीटेल्सना खूप काळजीपूर्वक हाताळून या मुख्यच नाही, तर सपोर्टींग असलेल्या सगळ्याच पात्रांच्या बद्दल आपल्या मनात आपलेपणा निर्माण केला आहे. उदाहरण याच मृत्युमुखी पडलेल्या एजंटचं घेऊ. फिल कोल्सन हा तसा साधा माणूस. ‘शिल्ड’ नावाच्या ज्या संघटनेने अव्हेंजर्सना जन्म दिला तिच्यातला एक गुप्तचर. मार्व्हलच्याच ‘एजंट्स ऑफ शिल्ड’ नावाच्या एका टीव्ही मालिकेमधून सगळ्यांना माहित झालेला. म्हणजेच MCU ची सुरुवात होण्यापूर्वीच तो लोकप्रिय आणि आवडता होता, त्यामुळे त्याला तिथून थेट ‘द अव्हेंजर्स’मध्ये उभं करून मारलं असतं तर लोक निश्चितच हळहळले असते. पण खुद्द अव्हेंजर्सचं काय? त्यांनाही ते तितकंच नको का टोचायला? म्हणूनच हा फिल ‘आयर्न मॅन’ या पहिल्याच सिनेमात आपल्या खुशालचेंडू उद्योजकाला भेटतो; ‘आयर्न मॅन २’ मध्ये त्याचा एक जवळचा सल्लागार म्हणून असतो. ‘थॉर’ सिनेमात आपला दैवी राजपुत्र पृथ्वीवर अवतरतो तेव्हा त्याला इथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यात तोच मदत करतो. त्या उदास शास्त्रज्ञाशी, म्हणजेच हल्कशी आणि एकविसाव्या शतकातल्या त्या सैनिकाशी, म्हणजेच कॅप्टन अमेरिकाशी आपली नव्याने ओळख ‘द अव्हेंजर्स’मध्ये होते तेव्हाच फिलचीही होते. आणि ते दोन गुप्तचर, अर्थात ब्लॅक विडो आणि हॉकआय हे शिल्डमध्येच असल्यामुळे आधीपासूनच फिलचे जवळचे सहकारी असतात. म्हणूनच फिलचा मृत्यू सगळ्यांना चटका लावून जातो, आणि आपण स्वतः फिलला ओळखत असल्यामुळे आणि या लोकांचं आणि त्याचं नातं आधीपासून पाहत आल्यामुळे या अव्हेंजर्समध्ये मग निर्माण झालेली एकी आणि जिद्द आपल्याला ११०% खरी वाटते. 

मी स्वतः या मालिकेत मध्येच घुसलो. एका मित्राच्या आग्रहावरून मी त्याच्याबरोबर अव्हेंजर्सचा दुसरा भाग, ‘एज ऑफ अल्ट्रॉन’ पाहायला गेलो. तेव्हा मी यांच्यापैकी कोणाला ओळखणं तर सोडाच, पण ‘ज्या हिरोंना स्वतः काही करता येत नाही त्यांना अव्हेंजर्समध्ये एकत्र आणतात’ अशा मताचा होतो. तो सिनेमा पाहिल्यावर मात्र मला, ‘सुपरहिरो’ जॉनरमधले अनेक सिनेमे आधी पाहिलेले असल्यामुळे, ‘यांच्यात काहीतरी वेगळं आहे’ असं वाटून गेलं. त्यानंतर मी जेव्हा या सगळ्या मालिकेतला मैलाचा दगड म्हणून ओळखला जाणारा ‘कॅप्टन अमेरिका: सिव्हिल वॉर’ हा सिनेमा पाहिला तेव्हा मात्र माझं मत पूर्णपणे बदलून मी त्यात एकदम शिरलोच. त्या सगळ्या सुपरहिरो टाईप सिनेमांमध्ये माझा कायम एक मौलिक प्रश्न असायचा: हे लोक असे कसे सगळीकडे नासधूस करत लढतात? बाकीच्या जगाची त्यावर काहीच प्रतिक्रिया कशी होत नाही? अगदी ट्रान्सफॉर्मर्सपासून सुपरमॅनपर्यंत सगळ्या सिनेमांमध्ये अक्षरशः विध्वंस घडवून आणल्याशिवाय लोकांना ते पुरेसं गंभीर वाटणार नाही असा एक समज पसरलेला होता. आणि हे घडायचे मुख्यतः अमेरिकेतच. त्या काळीच काय, आजही हॉलीवूडपटांमधून जगाचा तारणहार अशी आपली प्रतिमा घडवण्याची अमेरिकेला वाईट खोड आहे. या प्रवृत्तीला आणि विध्वंसाला MCU काही ठळक अपवाद नाही. ‘द अव्हेंजर्स’ मधली अखेरची लढाई न्यू यॉर्कमध्येच घडते, आणि ‘अव्हेंजर्स’ ही जरी आंतरराष्ट्रीय संघटना असली तरी अमेरिकेच्याच अंगाखांद्यावर मोठी झालेली आहे. पण ‘आम्ही तुमचे रक्षक, तुमच्यावर संकट आलं तर आम्ही वाचवायला येऊ, तेव्हा तुम्ही चूप राहायचं आणि आम्हाला आमचं काम शिकवायचं नाही’ हा जो काही उर्मटपणा आहे त्याला ‘सिव्हिल वॉर’ने विशेष तडाखा दिला. ‘सिव्हिल वॉर’च्या नावातच सुचवल्याप्रमाणे, कथानक अव्हेंजर्समधले ताणतणाव टोकाला पोचून ते फुटण्याच्या दुर्दैवी घटनेवर आधारित आहे. पण ते तणाव निर्माण होतात कुठे? तर ‘एज ऑफ अल्ट्रॉन’मध्ये झालेल्या लढाईत ‘सोकोव्हिया’ नावाचं (प्रत्यक्षात काल्पनिक) शहर अव्हेंजर्सकडून गाडलं जातं आणि यामुळे त्यांच्या अफाट शक्तीला लगाम घालण्यासाठी संयुक्त राष्ट्रांमधले ११८ देश एकत्र येऊन त्यांना एका आंतरराष्ट्रीय पॅनेलच्या अधिपत्याखाली यायला सांगतात, आणि यावं का नाही यावरून आयर्न मॅन आणि कॅप्टन अमेरिका यांचं वाजतं, इथपासून! प्रत्यक्षात अगदी असं घडेल का नाही याबद्दल आपण काही सांगू शकत नाही, पण तरीही या घटना इतर सुपरहिरो गोष्टींपेक्षा वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या आहेत. ‘तुम्ही असलात सुपरहिरो तरी शेवटी माणसंच आहात, आणि तुम्ही चुका केल्या तर बाकीच्या जगाला उत्तर द्यायला तुम्ही बांधील आहात,’ हा संदेश देऊन MCU आपल्या सगळ्याच वीरांना जमिनीवरच ठेवतं. 

हॉलीवूडचा विख्यात दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसी मध्ये त्याच्या ‘मार्व्हेलचे सिनेमे सिनेमांपेक्षा थीम पार्कसारखे जास्त वाटतात’ या विधानामुळे चर्चेत आला होता. त्यासंबंधी त्याची एक दीर्घ मुलाखत वाचल्यावर मला असं समजलं की स्कॉर्सेसीचा रोख थेट मार्व्हलकडे नसून, एकाच साच्यातून एकामागोमाग एक सिनेमे काढून पैसे छापण्याच्या ट्रेंडवर आहे. एखाद्या सिनेमाला तुफान यश मिळालं की त्यातल्या पात्रांचं पुढे काय होतं ते जाणून घ्यायला तोच प्रेक्षकवर्ग तरी नक्कीच परत येईल या एका गृहितकावर आज हॉलीवूडमधल्या अनेक सिनेमालिका चालतात, आणि ते गृहीतक अगदीच चुकीचं असतं असंही नाही. १९७०च्या सुमारास हॉलिवूड गाजवणाऱ्या ‘स्टार वॉर्स’, ‘किंग काँग’ किंवा ‘एलिअन्स’ अशा सिनेमांचे आता पुन्हापुन्हा रिमेक्स, पुढचे भाग वगैरे निघतायत. अशाने नाविन्यपूर्ण कलाकृती करावी असं कोणाला न वाटता लोक सहज मिळणाऱ्या पैशाच्या मागे जातात असं त्याचं म्हणणं आहे. गंमत म्हणजे ज्या MCU च्या यशामुळे त्याच्या मते इतरांना हे स्फुरण चढलंय, ते स्वतः अशा ठरलेल्या साच्यात बसत नाही. स्कॉर्सेसी आणि इतर बऱ्याच लोकांना सुपरहिरो जॉनरबद्दल असलेला एक रास्त आक्षेप म्हणजे ठरलेल्या फॉर्म्युलात नवीन शक्ती किंवा नवीन खलनायक मिसळून दळत राहणं. नुसती ॲक्शनमागून ॲक्शन, युद्धामागून युद्ध, बाकी हे लोक एरवी कुठे जेवतात त्यावर भाष्य नाही. MCU च्या यशात एक महत्त्वाचा वाटा याचाही आहे की आपण या लोकांना हिरो म्हणून जेवढा वेळ पाहतो, त्यापेक्षा किंचित जास्तच वेळ आपण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यांत त्यांची वैचारिक आणि भावनिक वाढ होताना पाहतो. याची सगळ्यात चांगली उदाहरणं म्हणजे आयर्न मॅन आणि कॅप्टन अमेरिका. मालिकेच्या सुरुवातीच्या काळात, ‘आयर्न मॅन २’ मध्ये अमेरिकन सरकार आयर्न मॅनवर ते अद्भुत तंत्रज्ञान त्यांच्या हवाली करण्यासाठी दबाव आणायचा प्रयत्न करतं तेव्हा तो त्यांना सरळ ‘खड्ड्यात जा’ म्हणून धुडकावून लावतो. आपला उद्योजक हा कायमच आपल्या मर्जीनुसार चालणार आणि कोणाचंही वर्चस्व स्वीकारणार नाही. तर दुसरीकडे सैन्यात भरती होण्यासाठी अगदी वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवणाऱ्या कॅप्टन अमेरिकाची सुरुवातीला सैन्य, संघटना, शासन या गोष्टींवर ठाम श्रद्धा असते आणि आपल्या प्रत्येक वरिष्ठाशी तो भक्तिभावाने वागतो. या पार्श्वभूमीवर तुम्हाला ‘सिव्हिल वॉर’बद्दल ओळखायला सांगितलं तर UNचं वर्चस्व आयर्न मॅन धुडकावणार आणि कॅप्टन स्वीकारणार असंच तुम्हाला वाटेल. प्रत्यक्षात घडतं बरोबर उलटं. मधल्या काळात आयर्न मॅन स्वतःच्याच काही निर्णयांवर शंका घ्यायला शिकून आपल्या हाती सत्ता असावी का असा प्रश्न विचारू लागतो, तर कॅप्टनला ज्या सैन्याची आणि सरकारची आपण मनोभावे सेवा केली ते किती भ्रष्ट आणि दांभिक आहे याची हळूहळू जाणीव होऊ लागते. या संपूर्ण मालिकेत दोन व्यक्ती म्हणून त्यांची वाढ लक्षणीय आहे. अशीच नजर आपण प्रत्येक पात्रावर टाकली तर आपल्याला या एकत्रित सांगितलेल्या मोठ्या कहाणीत मानवतेच्या अनेक कहाण्या आढळून येतात आणि प्रत्येक अशा कहाणीत आपण तितक्याच सहजपणे गुंतून या अद्भुत विश्वाचा एक भाग काढू होऊन जातो कळतही नाही. याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्व्हलने कथा पुढे चालू ठेवली तरी काही काही गोष्टींचा योग्य वेळेला शेवटही केलेला आहे. एका विशिष्ट खलनायकाने खूपच मनं जिंकली म्हणून त्यालाच परत परत आणतील असं नाही. या अव्हेंजर्सपैकी प्रत्येकाचे स्वतंत्र काही शत्रू आणि काही सामूहिक शत्रू हे त्यांच्या सगळ्या प्रवासात बदलत जातात, मागे पडत जातात, नवे येत राहतात. ज्या गोष्टी संपता संपत नाहीत आणि तेच तेच खलनायक पुन्हापुन्हा येत राहतात, त्यांच्यातला आपला रसही लवकर आटू लागतो, कारण आपल्याला ज्या पात्रांबद्दल जिव्हाळा वाटतो त्यांना एकदातरी एक शांततापूर्ण शेवट मिळावा असं खूप वाटतं. हे एकच सूत्र आपण मनात ठेवलं तरी ‘एंडगेम’ एवढा अफाट यशस्वी कसा झाला ते आपल्याला लगेच कळतं.  

आजपर्यंतच्या या प्रवासात मार्व्हलने असेच अनेक पूर्वग्रह मोडून काढत, नव्या संकल्पनांना वाट करून देत या ‘विशेष शक्तींच्या’ प्रश्नाला एक अविस्मरणीय आणि हॅरी पॉटरप्रमाणेच अत्यंत हवंहवंसं उत्तर दिलेलं आहे. आणि अकरा वर्षांत तेवीस सिनेमे या अफाट वेगासहित आता पुढच्या अनेक प्रकल्पांवर काम करणं हे कोणाला कारखान्यासारखं वाटू शकेल. वाटू देत. माझ्या मते त्यांनी हे करत राहावं, कारण जुन्या मालिकांना पुन्हा रिमेक्समधून बळंबळंच पुन्हा जागृत करण्यात आणि असं अजून अपुऱ्याच राहिलेल्या असंख्य कहाण्यांना न्याय देत पुढे जाण्यात ठळक फरक आहे. आणि माझ्या दृष्टीने मार्व्हलचा सर्वांत मोठा विजय हाच आहे, की आपल्याला एका पूर्णपणे फॅन्टसी जगाच्या सफरीवर नेऊनही ते कधीच परिकथेसारखं वाटत नाही. ‘Happily Ever After’ हा शेवट परिकथेसाठी ठीक आहे, पण प्रत्यक्षात तसं घडत नाही; गोष्ट कधीच तशी संपत नाही.  


 

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प