चगमनेर ६
प्रवरा.
संगमनेर जसं ‘आमचं गाव’ तशी प्रवरा ही ‘आमची नदी’ असते.
संगमनेरला जाणं म्हटल्यावर ठरलेल्या काही गोष्टींमध्ये नदीवर जाणे हेपण असतं. पण दरवेळी हे करता येईलच असं नसतं. संगमनेरला जसं नळाला पाणी ‘येणं’ ही एक ‘घटना’ असते तशीच नदीलाही पाणी ‘यावं’ लागतं. आम्ही जायच्या आधी जेव्हा आई फोन करते आणि बेत ठरवते तेव्हा नदीचं ती एक विचारतेच. आणि यावेळीही आम्ही तशी खात्री करून मगच आलो असतो. आणि अगदी आमची बस गावात शिरण्याच्या आधी पुलावरून आम्ही तिचं छान पसरलेलं निळंशार पाणी पाहिलंही असतं. त्यामुळे या वेळी नदीवर एक चक्कर होणारच असते. ती आज संध्याकाळी करायची असं आम्ही ठरवतो. त्यामुळे सकाळी आम्ही काही फार काहीतरी असं करत नाही. मला आजचा दिवस नदीचा दिवस म्हणूनच ठेवायचा असतो. मी सकाळी बराच वेळ पु.लं. वाचतो आणि अधूनमधून मावशीचा लॅपटॉप घेऊन जरा ट्रक चालवतो. मुक्तालाही माझ्यासारखंच वाटत असेल असं मला वाटतं, कारण तीही सकाळचा बराचसा वेळ फोनवर शाळेतल्या एका मैत्रिणीशी बोलण्यात घालवते. पण नदीवर जायचं नसतं तरी तिने हेच केलं असतं कदाचित.
आमचं दुपारचं जेवण तसं साधंच असतं कारण रात्री नदीहून परत येताना आम्ही ‘स्वदेश’ मध्ये जेवणार असतो. संगमनेरला आल्यावर हॉटेलला जेवायला जायचं म्हटलं की ते एकच हॉटेल आम्हाला दिसतं. म्हणजे मला तरी. मुक्तासारखं नवीन कुठेतरी जाऊन नवीन काहीतरी खाऊन पाहण्याचा मला एवढा उत्साह नसतो. हॉटेलमध्ये जायचं म्हणजे स्वदेशमध्ये जाऊन एक पावभाजी आणि तोंडी लावायला मुक्ताने घेतलेल्या डोशाचे तीन घास असं माझं ठरलेलं असतं. शिवाय नदीवर जायचं म्हणजे मावशी भेळ आणणारच.
जेवणानंतर आई मला दर सात मिनिटांनी जास्तीचे कपडे बरोबर ठेवायची आठवण करायला लागते आणि आजीने “हरकत नाही, बस तसाच स्वदेशमध्ये ओल्या कपड्यांत,” असं म्हटल्यावर मगच मी शहाण्यासारखा उठून आमचा डाग उघडतो आणि उचकापाचक करायला लागतो. थोड्या वेळाने मी कपड्यांसकट तयार असतो पण ते काढताना मी विस्कटलेल्या घड्या पाहून आईला तिनेच ते काढून द्यायला हवे होते असं वाटतं. आम्ही जाणार साडेचार नंतर असतो म्हणून मधल्या वेळात मी, आई, आजी आणि मुक्ता पुन्हा एकदा ‘फळ फूल नाव गाव’ खेळतो. कुणालाच माहित नसतं पण मी परवाच्या खेळात फक्त फुलांमुळे हरल्यानंतर जेव्हा मावशीच्या लॅपटॉपवर गूगलवर गेलेलो असतो तेव्हा ट्रक बघायच्या ऐवजी काही फुलांची नावं शोधून ठेवलेली असतात. त्यामुळे आमच्या खेळात ‘ल’ अक्षर आल्यावर मी अगदी ऐटीत ‘लोबेलिया’ हे नाव सांगतो. मग मागच्या वेळेसारखंच याला काहीतरी मराठी नाव असेल असं मुक्ताचं म्हणणं असतं, पण ते शोधण्यात परत खूप वेळ जाईल म्हणून मला माझे दहा गुण मिळतात. मुक्ताने फूल आणि नाव दोन्हीमध्ये लिली लिहिलेलं असतं आणि त्यापैकी नावात तिला पूर्ण गुण मिळतात. फळांमध्ये लिची आणि लिंबू या दोनच गोष्टी कायम निघतात त्यामुळे आम्हाला ल हे अक्षर तसं आवडतच नाही. अशी अवघड अक्षरं आली की गावांमध्ये आई आणि आजी कायम पुढे जातात. मग अशाच वेळी एरवी कधी न ऐकलेली ‘लासलगाव’ अशी नावं ऐकायला मिळतात. मी आधी लातूर लिहून ‘पाच तर पाच’ असं म्हणणार असतो, पण मग परवा मी सिंगापूर लिहून कसे दहा गुण मिळवलेले असतात ते मला आठवतं आणि मी लंडन लिहितो. पण मुक्तानेही तेच लिहिलेलं असतं. हॅरी पॉटर आणि शेरलॉक होम्समुळे लंडन तिलाही खूप आवडतं.
चार-साडेचारच्या सुमारास आम्ही निघूया असं म्हणतो आणि म्हणून आम्ही फाटकाबाहेर येऊन उभे राहतो तेव्हा पाच वाजलेले असतात. आता कोणीतरी (म्हणजे मावशीच) रिक्षा आणायला जाणार आणि परत घेऊन येणार त्यापेक्षा आम्हीच चालत फाट्याकडे निघतो. आजोबांचं संध्याकाळचं चालणं आमच्या नदी बेतामुळे बुडणार असतं त्यामुळे ते एवढं तरी चालूया असं म्हणतात. मला किंवा मुक्ताला काहीच हरकत नसते. तिला त्या वळणदार रस्त्यावरच्या प्रत्येक घरात कोण कोण राहतं आणि त्यांच्या घरी कोण कोण ‘असतं’ ते सगळं डीटेल आजी आणि मावशीला विचारायचं असतं. मागे एकदा असंच जवळच्या कुठल्यातरी घरातल्या आजीआजोबांकडे आलेली त्यांची नात मुक्ताची मैत्रीण झालेली असते. तशा अधूनमधून आजूबाजूच्या घरांमधल्या आमच्या वयाच्या काही मुलांशी आमच्या थोड्या ओळखी झालेल्या असतात पण त्यांची नावं मी पुण्याला जाऊन विसरून येतो. या एका मुलीला ‘रेणू’ म्हणायचे असं एक मला आठवत असतं कारण पहिल्यांदा आजीने तिच्याबद्दल सांगितलं तेव्हा मुक्ताने ‘मग तिला धाकटी बहीण असेल तर तिचं नाव अणू असेल’ असा काहीतरी विनोद केलेला असतो आणि त्यामुळेच मला मॉलेक्युलला मराठीत रेणू म्हणतात हे कळलेलं असतं. त्या सुट्टीत तिने आणि मुक्ताने बऱ्याचदा गोट्या खेळलेल्या असतात आणि मी लांब उभं राहून बघितलेलं असतं. एकतर तिला पहिल्या एकदोन वेळा मी मॉलेक्युल अशी हाक मारलेली असल्यामुळे ती माझ्याशी फारसं बोलत नसते. शिवाय माझं बोट दुखतं.
मुक्ताचा परिसर अभ्यास चालू असताना मी फक्त वळणावरच्या शेतात गोविंद विडीचा ट्रक दिसतो का ते पाहायचा प्रयत्न करत असतो. खूप लांबवर काहीतरी मोठं काळं दिसतं पण तो ट्रक असतो का रेडा ते इथून कळत नसतं. कारण त्या शेतात पूर्वी मावशीने मला एकदा चार रेडे दाखवलेले असतात आणि त्यातल्या एकाने आमच्याकडे पाहून शिंकल्यावर मी घाईघाईने मावशीला घरी ओढून आणलेलं असतं. आजोबा फाट्यावर पोचेपर्यंत मावशीने एका रिक्षाला हात केलेला असतो. आम्ही सहा जण असल्यामुळे दोन रिक्षा करू असं मला दुपारी एकदा वाटलेलं असतं, पण संगमनेरात पुण्यासारखी ‘आपलीच रिक्षा’ नसते. बऱ्याचदा शेअरचीच असते. त्यामुळे शेवटी कोंबूनच बसायचं तर इतर कोणापेक्षा यांच्याच बरोबर बसू असं मी ठरवतो. रिक्षात आधी आई, मावशी आणि आजी बसतात आणि आम्हा दोघांना त्यांच्या मध्ये अर्धवट मांडीवर, अर्धवट उभं असं घेऊन बसतात. आजोबा काकांच्या शेजारी त्यांच्या खांद्यावर हात टाकून बसतात. त्या एवढ्याशा सीटवर दोघांना बसायला जागा कशी असा मला एकदा प्रश्न पडलेला असतो, पण मग मी एका रिक्षात पुढे तिघांना बसलेलं पाहिलेलं असतं. आजोबांसारखं तसं बसावं असं मला आधी खूप वाटतं, कारण तिथे ते तसे ऐसपैस बसतात. पण रिक्षा एकदा सुरु झाल्यावर मला मी जसा बसलेलो असतो तेच आवडतं. रिक्षाचा वेग आणि आम्ही सगळ्यांनी सगळ्याच हातांनी एकमेकांना सगळीकडून धरून ठेवलेलं असल्यामुळे मला मी एकटा नसून आम्ही सगळे एकच मोठ्ठा जीव आहोत असं काहीतरी वाटत असतं. हा जीव बराच वेळ मोठ्या रस्त्यावर दाणदाण करून शेवटी गावाकडे जाणाऱ्या एका गल्लीत शिरतो.
नदीकडे जाण्याचा रस्ता गावातून जातो म्हणजे खूप गल्लीबोळांतून, आणि त्या लक्षात ठेवायचा मी एकदाच प्रयत्न केलेला असतो पण ते अशक्यच वाटतं. आई, मावशी आणि आजी आम्हाला अधूनमधून काहीकाही खुणा सांगत असतात पण आम्हाला त्या विशेष लक्षात राहतील अशा वाटत नाहीत. कुठल्याकुठल्या रस्त्यांवर दुकानांसमोर उभी असलेली काही उभी टोपी घातलेली माणसं आजोबांकडे पाहून हात करतात. मला या सगळ्या रस्त्यावरची एकच मोठ्ठी खूण लक्षात असते, ती म्हणजे शनीचं देऊळ. शनी हा देव आहे हे आजीने मला पूर्वी सांगितलं तेव्हा मला खूप भारी वाटलेलं असतं. पण मला कधीच शनीकडे पाहून तो आपल्यावर चिडेल किंवा शिक्षा करेल असं काही वाटलेलं नसतं. मागच्या एका सुट्टीत आजीने शनीच्या मंदिरात जायचं का असं विचारल्यावर मी अगदी टुणटुण करत निघालेलो असतो, कारण मला गूगलवरच्या सहाशे फोटोंतून आणि मावशीने दिलेल्या मोठ्ठ्या पोस्टरमधून पाहिलेला माझा लाडका ग्रह दगडी मूर्तीच्या रूपात पाहायचाच असतो. त्या देवळाच्या गाभाऱ्यात तो तसाच नेहमीप्रमाणे कड्या सांभाळत एकीकडे कललेली मान घेऊन बसलेला असेल असं मला वाटलेलं असतं, पण तिथेही इतर देवळांतल्यासारखा कोणीतरी माणूसच असतो मूर्ती म्हणून. मग आजीने ‘देव असलेला शनी’ असा दिसतो असं सांगितल्यावर मी ‘खरा शनीच छान दिसतो’ असं काही बोलायच्या आत ती मला देवळाबाहेर घेऊन गेलेली असते. आत्ताही त्या देवळासमोरून जाताना मी आकाशाकडे पाहूनच नमस्कार करतो.
शेवटी आम्ही नदीच्या घाटावर पोचतो आणि रिक्षा सोडून देऊन एक चांगलासा पार शोधायला लागतो. फार गर्दी नसेल अशा ठिकाणी, कारण आम्हाला पाण्यात पोहायची तशी खूप इच्छा नसते. गर्दी असलेल्या ठिकाणी बऱ्याचदा मुलं रांग लावून पाण्यात उड्या मारत असतात. मी आणि मुक्ता पाण्यात जातो तेव्हा आजोबा ‘जपून’ असं सात वेळा सांगतात. पण आम्ही तसे खोल पाण्यात कधीच जात नाही. मला पोहता येत नाही, त्यामुळे आईने मला माझ्या कमरेपर्यंत येणाऱ्या पाण्यातच जायचं असं सांगितलेलं असतं, आणि मुक्ताला पोहता येत असलं तरी तिलाही तेच सांगितलेलं असतं. मग ती उगीच माझ्या आजूबाजूने दोनतीन चकरा मारून दाखवते. मला एकदा पाण्याच्या आत गेलं की बाकी काही करायचंच नसतं. पाणी गार असल्यामुळे मला माझे पाय वेगळ्याच जगात आहेत असं काहीतरी वाटत असतं. पाण्यात कमरेपर्यंत बुडवून तसं जरा वेळ बसून राहिलं की मला माझे पाय जाणवतच नाहीत; फक्त त्यांच्या आजूबाजूने वाहणाऱ्या पाण्याचा गारवा जाणवतो. दोनतीन मिनिटांतून एकदा मी एक पाऊल हलवून ते तिथेच असल्याची खात्री करतो. मधूनच एकदा पायाच्या बोटांना शेवाळ सापडतं आणि मग गुदगुल्या झाल्यासारखे ते थोडावेळ आपोआप हलतात आणि मग मला पुन्हा त्यांना ‘वेगळ्या जगात’ टाकायला जरा जास्त वेळ शांत बसावं लागतं.
आई आणि आजी पाण्यात पाय बुडवून काठावर बसलेल्या असतात. आजोबा एकदा पाण्यात उतरतात आणि आमच्यावर पाणी उडवतात, मग बाकीच्यांच्या शेजारी काठावर जाऊन बसतात. मावशी भेळ आणायला गेलेली असते. मावशी परत आल्याशिवाय मला पाण्यातली माझी सगळ्यात आवडती गोष्ट करता येणार नसते म्हणून मी तसाच बसून राहतो. आता मी मुक्ताला बोअर करत असतो. ती माझ्यावर दोनतीनदा पाणी उडवते म्हणून शेवटी मी पायांना परत या जगात आणतो आणि तिच्यावरही पाणी उडवायला लागतो. तेवढ्यात मावशी येते. ती कागदात धरलेली भेळ आणि एक छोटं कार्ड आईच्या हातात देते. ते कार्ड पाहून मला उगीच स्टॅंडवरच्या वजनकाट्याची आठवण येते. मग आई, आजी आणि आजोबा ते कार्ड वापरून भेळ खायला लागतात तेव्हा मावशी पाण्यात उतरते आणि मुक्ताच्या मागे लागल्यासारखं करते, आमच्यावर पाणी पण उडवते. पण ती आल्यामुळे आता मला माझी आवडती गोष्ट करायची असते. मी तिच्या समोर जाऊन थांबतो आणि ती मला कमरेला घट्ट धरते. मी मध्येच वर बघून आईकडे बघतो. माझा हा वात्रटपणा तिला फारसा आवडलेला नसतोच. पण मावशीने धरलंय म्हटल्यावर मी सरळ स्वतःला मागे झोकून देतो.
पायांसोबतच आता एकदम पाठ आणि केसही वेगळ्याच जगात गेल्यासारखे वाटतात. माझ्या डोळ्यांना आता वरच्या मोठ्ठ्या आडव्या पसरलेल्या झाडाच्या फांद्या दिसत असतात. त्या कुठल्यातरी गोष्टीतल्या राजासारखं मलाही तेव्हा त्यांच्यावरची पानं मोजावीशी वाटतात, कारण खरंतर मला तेवढा वेळ तसंच पाण्यात राहायचं असतं. मग मी आळीपाळीने माझ्या डोक्याचा एकेक भाग बुडवून तो वेगळ्या जगात नेऊन आणतो. आधी कान बुडतात तेव्हा पुन्हा गुदगुल्या होतात, मग हनुवटी बुडते तेव्हा मला आजूबाजूचे लोक न दिसता एकदम सगळीकडे पाणीच पाणी दिसायला लागतं. मग समोर अगदी थोडंसं दिसणारं माझं पोट एक बेट असल्याची मी कल्पना करायला लागतो. त्याच्या आजूबाजूचं सगळं पाण्याखाली असल्यामुळे हे बेटही आपोआपच वेगळ्याच जगात असतं. मग हळूहळू गाल बुडतात तेव्हा काठावरून ‘बास’, ‘पुरे’ वगैरे अगदी हळूच ऐकू यायला लागतं. शेवटी पापणीच्या कडांपर्यंत पाणी येतं तेव्हा मी अगदी धाडसी मुलासारखं डोळे इकडेतिकडे फिरवून आता आकाशच बनलेल्या पाण्याला पाहून घेतो. मग मावशीच मला एकदम ओढून पुन्हा वर घेते आणि “संपलं का तुझं मिनिट” असं हसत हसत विचारते. मग पाण्यातून वर येताना मी मनात ‘मिनिट?’ असा विचार करत असतो. माझं हे चालू असताना मुक्ताने नाक धरून दोनतीन डुबक्या घेतलेल्या असतात त्यामुळे काठावर आल्यावर आम्ही दोघंही पूर्ण भिजलेले आणि कुडकुडत असतो. का कोण जाणे पण मला माझी हुडहुडी घालवायला पुन्हा पाण्यातच जायचं असतं.
पण मग आई माझा टॉवेल घेऊन मला एका लांबच्या झाडाकडे नेते आणि मावशी मुक्ताला घेऊन दुसरीकडे जाते. कोरडे कपडे घालून परत आल्यावर आम्ही सगळे मिळून भेळ खायला लागतो आणि अधूनमधून (आजीच्या सांगण्यामुळे डाव्या हातानेच) खडे उचलून पाण्यात टाकत असतो. त्या ठिकाणी मग वेगवेगळ्या आकारांच्या अंगठ्या तयार होतात. त्यांना तरंग म्हणतात असं आजी म्हणते. मला वाटतं की मीही एक दगड असायला हवा होतो, पण आम्ही टाकत होतो त्या दगडांसारखा नाही. ते दगड ते तरंग तयार करून बुडून जातात. मला असा दगड व्हायचं होतं की जो उडत उडत पाण्यापर्यंत जाईल आणि अगदी पाण्यावर पडला की त्याचेच तरंग होऊन सगळीकडे पसरत जातील. म्हणजे मग मलाही पाण्यावर एकाच वेळी सगळ्या दिशांनी पसरता आलं असतं. मग आजोबा आम्हाला उजवीकडे बोट दाखवून जरासं पुढे नदीपात्राच्या खोल भागात काहीतरी दाखवतात. तिथे दोन भोवरे असतात.
डावीकडे जरा लांबवर पाहिल्यावर मला बऱ्याचदा दिसायची तशी मुलं दिसतात. ती लांबून पळत येऊन नदीपात्रात खूप पुढे उड्या मारतात. त्यांना चांगलं पोहता येतच असणार. चितळे मास्तरांच्या गावात कसे सगळे लहानपणी विहरीत पोहायला शिकायचे तसं काहीतरी इथे असेल का असं मला वाटतं. पण किती मजा आहे त्या मुलांची! सकाळी शाळा वगैरे संपवून, होमवर्क वगैरे करून संध्याकाळी त्यांना नदीवर जाता येतं! आणि आम्ही इथे आलो तरी आम्हाला नदीवर येण्यासाठी केवढातरी मोठा बेत करावा लागतो. पुण्याला जरा पावसात चिखलात फुटबॉल खेळलो तरी घरी आल्यावर आई टॉवेल आणि गरम कपडे वगैरे सुरु करते. आणि ही मुलं त्यांचीत्यांचीच येतात, कितीही वेळ पाण्यात खेळतात आणि जातात. मग मला वाटतं, की मला जसं नदीचं पाणी सोडावंसंच वाटत नाही तसं त्यांचं होत असेल का?
गावातून बाहेर पडून मोठ्या रस्त्याला लागल्यावर थोड्या वेळाने डावीकडे ‘स्वदेश’ लागतं. त्याला त्याची स्वतःची इमारत असते आणि बाहेर अंगणात खूप टेबल्स अगदी पांढऱ्या चादरी वगैरे घालून ठेवलेली असतात. स्वदेश हे आमचं नेहमीचं हॉटेल आणि तिथे काय घ्यायचं तेही आमचं ठरलेलंच असतं. स्वदेशला जाणे ही संगमनेरला आल्यावर करण्यासारख्या काही ठरलेल्या गोष्टींमधली एक असते, आणि मला तसंही खूप वेगळंच नवीन काही घेऊन पाहायला आवडत नाही. वेटर आल्यावर मावशी त्याला तीन मसाला पापड सांगते आणि आमच्याकडे पाहून ‘तुम्हाला हवा असेल तर नंतर चौथा घेऊ,’ असं म्हणते. तिने नेहमीप्रमाणे आमच्या मनातलं ओळखलेलं असतं. मग दुसरे वेटर येऊन सगळ्यांचे ग्लास सुलटे करतात आणि पाणी भरतात. स्वदेशमधले पाण्याचे ग्लास काचेचे असले तरी जग स्टीलचा असतो. आपण सांगितलं नाही तरी आपला ग्लास थोडा रिकामा झालेला पाहून वेटर येऊन तो आपणच पुन्हा भरून जातात हे मी पहिल्यांदा स्वदेशमध्ये पाहिलेलं असतं. तेवढं पाणी मला शेवटपर्यंत संपवता येणार नाही म्हणून असेल, पण मला जेवताना पाणीच न प्यायची सवय लागलेली असते. मग वेटर बिल द्यायला येतो तेव्हा मी एकदाच ग्लास रिकामा करतो आणि मला बरं वाटतं. मसाला पापड संपल्यावर आम्हाला चौथा आता नको असतो, म्हणून आम्ही पावभाजी आणि मसाला डोसा मागवतो. मला खरंतर डोसा आणि बटाट्याची भाजी खूप आवडते पण इथे ते त्या डोशाच्या आत लपवलेल्या भाजीत खूप कढिलिंबाची पानं घालतात. पूर्वी एकदा हे माहित नसताना मी मसाला डोसा मागवलेला असतो आणि हे भाजीबद्दल कळल्यावर मग तेव्हा आईला स्वतःसाठी काही मागवावं लागलेलं नसतं. मग त्यानंतर मला पावभाजी आवडते म्हणून मी ती इथे नेहमी घेतो आणि आई पण घेते. बाकीच्यांना डोसा हवा असतो. मला चार पावच पुरतात हे आईला माहित असतं म्हणून बरं असतं कारण पुन्हा पाव वाढायला येणाऱ्या वेटरना ‘नको’ असं मला मोठ्याने सांगायला मी उगीचच घाबरतो. चार पाव झाल्यानंतर मी त्यांनी टेबलावर ठेवून दिलेल्या वाटीतून दोन लिंबाच्या फोडी काढून त्या माझ्या उरलेल्या भाजीत पिळतो आणि चमच्याने खाऊन टाकतो. मग आम्ही आईस्क्रीम सांगतो. मला इथलं व्हॅनिला आवडतं आणि मुक्ताला मँगो, पण ती यावेळेस गुलाबजाम घेते. यावेळेस मलाही यांचं व्हॅनिला आवडत नाही. ते मला उगीच जरा जास्तच गार वाटतं; किंवा मीच कदाचित एक मोठ्ठा घास घेतलेला असतो. मग तो घास गिळताना माझ्या मानेवर जाऊन बसतो आणि तिथे बराच वेळ बर्फ दाबून धरल्यासारखं वाटायला लागतं. हे चालू असताना नाकही आतून दुखत असतं. हे संपल्यावर मी उरलेलं आईस्क्रीम वितळायची वाट पाहून मग ते पिऊन टाकतो. घसा अजूनही गार पडल्यासारखा वाटत असतो त्यामुळे त्यांनी शेवटी आणलेलं हात धुवायचं गरम लिंबूपाणी मला प्यावंसं वाटतं.
रिक्षातून परत जाताना मी ठरवून टाकतो की आता मला खूप सर्दी झाली किंवा तापबीप आला तर तो त्या आईस्क्रीममुळेच असं सांगायचं. कारण पुढच्या वेळी स्वदेशमध्ये जाऊन आईस्क्रीम नसतं खाता आलं तरी मला चाललं असतं. नदीचं काय?
वाह क्या बात!
ReplyDeleteएकदम सही लिहिलं आहे ब्लॉग.....मला सगळा तो प्रवास दिसत होता आणि जाणवत होता...
वर्णन अगदी साधं, सोप्पं आणि जस आहे तस लिहिलंय असं वाटलं....आणि वाचताना हसू पण येत होतं.... अणू- रेणू, तरंग, बेट, आईस्क्रिम....
ब्लॉग अगदी मनापासून आवडला...या लिखाणात मिश्किल स्वभाव डोकावत होता. मस्त....👍👍👍👍
वैभवशाली भूतकाळ आठवला...
ReplyDeleteसगळ चित्र डोळ्यासमोर उभे केलेस
छान लिखाण
फारच सुरेख 🌿
ReplyDeleteलंपनच जणू आपल्याशी गप्पा मारतोय. त्या वयातील भावनांचे चिमुकले जग, त्यातील विविध अगदी किरकोळ बाबींचे तपशीलात जाऊन केलेलं सहज सोप्पं वर्णन. त्यातील नाना प्रकारच्या निरागस गुंतागुंतीची विविध वळणे, भाबड्या वयातील भावनांचे आविष्कार आणि तितकेच कोवळे बेरकी हिशोब. सोप्पं नाही बुवा हे असं सहज, नैसर्गिक व्यक्त होणं.
तुझी ही सहजता लुभवणारी आहे.
असंच छान छान मोकळं करायला लावणारं लिहित रहा हीच सदिच्छा!
- पी डी (काका/ मामा/ नाना/ तात्या/वगैरे वगैरे)
अरे "समगनेर"☺️ च काय भारी वर्णन केलस रे,, माझ्या सगळ्यात आवडत्या काळात नेलस, असंच लिहीत राहा, किती ओघवती भाषा आहे तुझी,
ReplyDeleteतुझी मुग्धा मावशी
खरेच प्रवरा यथार्थ दिसली
ReplyDeleteमला माझ्या लहानपणची आठवण झाली
सगळा चित्रपट डोळ्यासमोरन तरळला
आजही संगमनेरला गेलं की गंगामाईच्या काठावर गेल्याशिवाय जाण्याला पूर्णत्व येत नाही
आदित्य छान लिहीलंय ✌️
संगमनेर व प्रवरा नदी दोन्ही खूपच मनाच्या जवळचे . खूप सुंदर लेखन
ReplyDeleteवाचताना प्रकाश संतांचा लम्पनच आठवत राहिला.शैली खूप तशी आहे.खूपच सुंदर लिहिलंय.केवळ वर्णन नाही,त्या पुढे जाणारे आहे हे.फार आवडलं मला
ReplyDeleteअगदी अचूक वर्णन ! भूतकाळात घेऊन गेलास म्हणून खूप आनंद झाला.
ReplyDelete