आणि पुन्हा येतो होकार
मला ‘हे पुस्तक वाच’ असं कोणी सांगितलं आणि मी ते वाचलं, इतकंच काय तर त्यावर एक स्तुतिपर लेख लिहायला घेतला ही घटनाच खूप असंभव आहे, पण मग ज्यांच्या बाबतीत असं घडतं ती पुस्तकं असतातच सर्वच बाबतीत exceptional! हे आधी कुठेतरी वाचल्याचं आठवत असेल, तर मी माझ्या आधीच्या ‘आणि अखेर येतो होकार’ या लेखाची सुरुवात अगदी हेच बोलून केली होती. हे पुन्हा लिहिण्याचा मुद्दा हाच, की तो लेख आल्यानंतर या मधल्या काळात त्या पुस्तकांचा माझ्यावरचा प्रभाव किंचितही कमी झालेला नाहीये; असेलच तर वाढच झाली आहे. त्यामुळे त्याच पुस्तकांवर हा दुसरा लेख, आधीच्या लेखातल्या काही गोष्टी ‘अपडेट’ करण्यासाठी आणि काही गोष्टी नव्याने सांगण्यासाठी. ती पुस्तकं म्हणजे अर्थातच, त्याच, साहित्यात अजरामर झालेल्या दोन विलक्षण कलाकृती: Yes Minister आणि Yes Prime Minister.
मागच्या लेखात मी असं म्हटलं होतं की मी वाचलेली सर्वोत्कृष्ट पुस्तके हीच किंवा माझी सर्वात आवडती पुस्तकंही हीच असं मी म्हणू शकलो असतो, पण मी हॅरी पॉटरशी चुकूनही अशी प्रतारणा करू इच्छित नाही. आज, हॅरी पॉटर मला क्षमा करेल अशी आशा आहे, कारण वरचे दोन्ही किताब या दोन पुस्तकांनी या मधल्या काळात माझ्याही नकळत हळूच पटकावले आणि हा बदल मला सर्वार्थाने मान्य आहे. तेव्हा मी या पुस्तकांतल्या गोष्टी, सांगण्याची शैली, भाषा आणि विनोद या सगळ्यांनीच खूप प्रभावित झालो होतो, त्यामुळे ती पुस्तकं पुन्हापुन्हा वाचल्याने माझ्या विचारांना, आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाला हळूहळू जी दिशा मिळत गेली तिच्याकडे फारसं लक्ष दिलं गेलं नव्हतं. त्यामुळेच मागच्या लेखात या पुस्तकातल्या पात्रांवर, शैलीवर वगैरे पुष्कळ विश्लेषण झालेलं असल्यामुळे, या खेपेला focus या नव्या विचारांच्या दिशेवर जास्त असेल.
या पुस्तकांचं स्वरूप म्हणजे जिम हॅकर या एका साध्या काल्पनिक मंत्र्याच्या आणि नंतर पंतप्रधानाच्या या कारकिर्दीचं त्याच्याच शब्दांत केलेलं वर्णन. ही पुस्तकं म्हणजे हॅकरची डायरी, त्यात संपादकाची भूमिका घेतलेल्या लेखकांच्या टिप्पण्या आणि हॅकरच्या संपर्कात येणाऱ्या इतरांच्या डायरीमधले किंवा आठवणींमधले उतारे. त्या इतरांपैकी प्रमुख म्हणजे हॅकरचा private secretary बर्नार्ड आणि त्या विभागाचा permanent secretary हम्फ्री. हे दोघे म्हणजे नोकरशाहीच्या एकूणच संस्कृतीचे प्रतीक असल्यासारखे आपल्या समोर येतात आणि त्यामुळे हॅकरसोबतच आपणही या संस्कृतीबद्दल खूप काही शिकत जातो.
या पुस्तकाचा काळ म्हणजे १९८०-९० यांच्या दरम्यान असं आपण म्हणू शकतो. हॅकरचा पक्ष निवडून आल्यावर त्याला प्रशासनमंत्री बनवण्यात येतं इथे कथा सुरु होते आणि तो पंतप्रधान असताना त्यांचा पक्ष निवडणूक हरतो त्या टप्प्यावर संपते. या पुस्तकांच्या एकूणच सगळ्या तत्त्वज्ञानाचा आढावा घ्यायचा असेल, तर ‘पहिल्या दिवशी हॅकर’ आणि ‘शेवटच्या दिवशी हॅकर’ या दोन चित्रांमधले फरक सांगतासांगता तो घेता येईल. राजकारणात सक्रिय होऊन मंत्री बनण्याच्या आधी हॅकर एक लेक्चरर आणि एका सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या नियतकालिकाच्या संपादक असतो. त्यामुळे ‘पहिल्या दिवशी हॅकर’ हे चित्र डोळ्यांपुढे आणलं तर ते आपल्या अपेक्षेप्रमाणेच असेल: स्वतःच्या विचारसरणीवर ठाम श्रद्धा, समाजातल्या सगळ्या वाईट प्रवृत्तींबद्दल एक सात्विक संताप आणि आपण मनात आणलं तर मोठा महत्त्वाचा बदल घडवून आणू शकू हा ठाम विश्वास. हे अशा प्रकारे मांडल्यावर आपल्याला जरा निरागस आणि आदर्शवादी वाटू शकेल, पण खरंतर या सगळ्या मानसिक अवस्थांमधून आपण सगळे कधी ना कधीतरी गेलेलो असतो. विशेषतः तो मोठा महत्त्वाचा बदल घडवून आणण्यावरच्या विश्वासाचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, आणि शिवाय फर्ग्युसन कॉलेजमधली तीनही वर्षं याचाच सगळीकडे उद्रेक होताना पाहिलेला आहे. तेव्हा ‘या वयात असं प्रत्येकालाच वाटतं,’ असं मला जरा इतर वयाच्या लोकांकडून ऐकावं लागलं, आणि मी अर्थातच ‘त्या’ वयाचा असल्याने ‘नाही, नाही, हा कसा निराशावाद आहे आणि तुम्ही आशा सोडली असली तरी मी नाही सोडणार’ वगैरे बरंच काही ठणकावून सांगत असे. या पुस्तकांमुळे माझ्यात झालेला सगळ्यात दृश्य बदल हाच म्हणता येईल. आत्ताचं माझं यावरचं मत म्हणजे आशा कोणीच सोडलेली नसते. फक्त ती आशा करताना मनात जी अपेक्षा असते ती जास्त समजूतदारपणे केलेली असते.
आपण आणि हॅकर अशाच मोठ्या कल्पना घेऊन या गोष्टीत प्रवेश करतो, आणि त्या गोष्टीतल्या घटना त्यांच्यावर धडाधड आघात करून त्या बेचिराख करून टाकतात. जर कोणी दुखावलं जाण्याचं मनापासून ठरवलंच, तर या पुस्तकात आक्षेप घेण्यासारखं चिकार आहे. कारण आपण उराशी बाळगलेला कुठलाही विश्वास या पुस्तकात चिरफाड होऊन भिरकावून दिला जाण्याची खूप शक्यता आहे. आणि तेही आपले डोळे खाड्कन उघडणाऱ्या कुठल्यातरी अतिशय वास्तवदर्शी चित्रणातून नाही, तर विनोदातून. या पुस्तकांतल्या विनोदांचं वर्णन करायला मला ‘potent’ यापलीकडे दुसरा शब्दच सुचत नाही, त्यामुळे नेमका आपला विश्वास त्यांच्यात सापडला तर ते आपल्याला सणसणीत झोंबू शकतात. मी ही पुस्तकं पहिल्यांदा वाचली तेव्हा एक विनोद मला असाच झोंबला होता. कुठल्याशा आर्थिक संकटात ब्रिटन सापडल्यावर हॅकर बर्नार्डला म्हणतो की हम्फ्रीने किंवा त्याच्या वित्तखात्याच्या प्रमुख सेक्रेटरीने त्याला याचा इशारा द्यायला हवा होता. त्यावर बर्नार्ड म्हणतो की हम्फ्रीना अर्थशास्त्र तितकंसं कळत नाही, आणि वित्तखात्याचे प्रमुख सेक्रेटरी तर स्वतः अर्थतज्ञ आहेत, त्यामुळे त्यांना हम्फ्रीपेक्षाही कमी अर्थशास्त्र कळतं. हे वाचलं तेव्हा मी स्वतः अर्थतज्ञ होण्याच्या मार्गावरच्या पहिल्या पायऱ्या चढत होतो त्यामुळे, एका दृष्टिकोनातून पाहिलं तर ही माझ्या सगळ्या स्वप्नांची, आकांक्षांची उघडउघड खिल्ली होती. क्रूर थट्टा. जर अर्थशास्त्रच कळणार नसेल (किंवा आपल्याला ते कळतं असं कोणालाच वाटणार नसेल) तर कशाला करायचं हे सगळं? इथे मी काय करणं अपेक्षित आहे?
मला वाटतं, आपल्या मनातल्या एखाद्या प्रतिमेला जेव्हा एकदम तडा जातो तेव्हा आपली त्यावरची प्रतिक्रिया मुख्यतः दोन प्रकारची असते. एकतर आपण जिथून तो तडा गेला त्या स्रोतालाच मूर्खात काढायचा प्रयत्न करून आपली प्रतिमा जपायला जातो, आणि जर तो स्रोत मूर्खात काढण्याच्या योग्यतेचा नसेल; उलट खूप विश्वासार्ह असेल तर आपली सगळी श्रद्धा आपण पूर्णपणे नष्ट होऊ देतो. माझ्याच बाबतीतलं याचं एक उदाहरण म्हणजे एकेकाळी शेअरबाजार या संकल्पनेचं मला खूप कुतूहल असताना मला ‘वॉल स्ट्रीट’बद्दल फक्त निखळ आकर्षण असे. म्हणूनच जेव्हा मी पहिल्यांदा जागतिक आर्थिक संकटाचा नीट अभ्यास केला तेव्हा या माझ्या आकर्षणाला तडे जायला लागले. यावरची माझी प्रतिक्रिया पहिल्या प्रकारातली होती. किंबहुना मला असं म्हणता येईल की मी नंतरच्या काळात त्या संकटाच्या पछाडल्यासारख्या केलेल्या अभ्यासामागची प्रेरणा कुठेतरी माझ्याच मनात वॉल स्ट्रीटला दोषमुक्त करता येईल या आशेतून आलेली होती. काही जमलं नाही, आणि तिचे दोष उघडपणे दिसत असताना ते नाकारत राहणंही कुठेतरी माझ्या मनाला पटत नव्हतं. तात्पर्य मी तो सगळा काळ काहीशा विचित्र मनस्थितीत घालवला, आणि शेवटी जेव्हा वॉरेन बफेटच्या पुस्तकात वॉल स्ट्रीटचं काहीसं खिल्ली उडवणारं चित्रण वाचलं तेव्हा मी हायसं वाटून ते लगेच स्वीकारलं, कारण माझी कायमच वॉल स्ट्रीटपेक्षा बफेटच्या विचारांवर जास्त श्रद्धा होती. पण आता असं वाटतं, की मी एका वरच्या आदरस्थानाचा वापर करून आधीच्या आदरस्थानाचा काटा काढला आणि सुखावलो; पण याला काही constructive solution नक्कीच म्हणता येणार नाही. उद्या बफेटबद्दल काहीतरी ऐकून मी पुन्हा याच सगळ्यातून जाण्याची शक्यता राहतेच, नाही का? शेवटी perfect काहीच नाही, त्यामुळे आपण अशी आदरस्थानांची चढती श्रेणी लावत बसू शकत नाही. तसं केल्यास कुठल्यातरी टप्प्यावर आपले वरचे सगळे पर्याय संपतील आणि मग आपण जे कोसळू ते अनेक पटींनी जास्त वेदनादायी असेल.
हे सगळं शहाणपण मला या पुस्तकांतून मिळालं. माझ्या सुदैवाने मी तो अर्थशास्त्रावरचा विनोद वाचून या दोन्हीपैकी कुठलीच प्रतिक्रिया दिली नाही. पहिली प्रतिक्रिया माझ्या विवेकबुद्धीला तेव्हाही पटली नसती, आणि दुसरं टोक गाठून या पुस्तकाचा निषेधबिशेष करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती, कारण तोपर्यंत मला ते खूप आवडलेलं होतं. मी ती थट्टा पचवून पुढे वाचत राहिलो, आणि हाच या पुस्तकाने मला दिलेला सर्वात महत्त्वाचा धडा ठरला.
फक्त कुठलीतरी विशिष्ट विचारसरणी मनाशी घट्ट धरणाऱ्यालाच हे पुस्तक झोंबेल असं नाही. आपल्या बऱ्याचदा आपल्या आजूबाजूच्या माणसांकडून आणि आयुष्याकडून काही मूलभूत अपेक्षा असतात. काही तत्त्वांवर, मूल्यांवर किंवा गुणांवर आपली श्रद्धा असते. माणसांचा मूळचा चांगुलपणा, खरं प्रेम, एकनिष्ठता वगैरे असं काहीकाही आपण घेऊन फिरत असतो. या सगळ्यांनाही हे पुस्तक जिवंत सोडत नाही. म्हणजे अशा एखाद्या मूल्याला पकडून त्याची मुद्दाम उडवेल असं नाही. पण ते आपोआप घडतं. याचं मुख्य कारण म्हणजे विरोधाभास या पुस्तकात खच्चून भरलेला आहे; नव्हे या पुस्तकाचा स्थायीभावच आहे. काही गोष्टींच्या आपल्या मनातल्या व्याख्यांशी इतक्या विसंगत व्याख्या या पुस्तकात सापडतील की आपण कासावीस झालो तर नवल वाटणार नाही.
काही उदाहरणं पाहू. एकनिष्ठता आणि कृतज्ञता या आपल्या लेखी खूपच श्रेष्ठ भावना असतात. असाव्यातही. अमूर्त संकल्पना म्हणून त्या सुंदरच आहेत, पण वास्तवात त्या तशाच राहतात का हा खरा प्रश्न आहे. एकदा हम्फ्रीला त्याच्या जुन्या कॉलेजमधली एक व्यक्ती सांगते की त्या कॉलेजच्या तेव्हाच्या डीनला हम्फ्री आवडत नाही. यावर हम्फ्री चकित होऊन म्हणतो की का बुवा? डीनने कृतज्ञ राहावं अशी एक गोष्ट मी आजतागायत केलेली नाहीये, मग त्याला मी का आवडत नसेन? पहिल्यांदा हे वाचताना आपण कदाचित गोंधळून जाऊ, पण कृतज्ञतेकडे जे एक उबदार भावना म्हणून बघण्याऐवजी एक ओझं म्हणून बघत असतील त्यांच्या लेखी हि प्रतिक्रिया अगदीच तर्कशुद्ध आहे. उपकारांचं ओझं. हे वाचल्यावर मला एकदम असं जाणवलं, की शाळेत असल्यापासून आपल्याला ‘उपकार करताना परतफेडीची अपेक्षा ठेवू नये,’ आणि ‘उपकारांची फेड उपकरांनीच करावी,’ या दोन्ही शिकवण्या मिळालेल्या असतात, पण त्यांच्यातला दणदणीत विरोधाभास आपल्याला तेव्हा का कळत नाही? म्हणजे उपकाराची परतफेड करणं चांगलं आहे पण तिची अपेक्षा करणं चांगलं नाहीये? का? याच पुस्तकात एका ठिकाणी हॅकरच्याच तोंडी “Gratitude is merely a lively expectation of favours to come,” असं सरळसरळ घातलेलं दिसतं. अर्थात, तो राजकारणी असल्यामुळे त्याला हे आधीपासून मान्य असणारच. म्हणूनच दुसऱ्या एका प्रसंगी त्यानेच केलेली एकनिष्ठतेची व्याख्या म्हणजे “माझं पद बळकावण्याच्या इच्छेपेक्षा स्वतःचं पद जाण्याची भीती ज्याला जास्त असते, तो एकनिष्ठ.” या सगळ्यानंतर हे पुस्तक म्हणजे कसं ‘hopelessly cynical’ आहे असंच वाटेल. तसं म्हटलं गेलंही असेल. पण त्याचं कशाला काही वाटून घ्यायचं? त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा हम्फ्रीची “A cynic is what an idealist calls a realist.” ही चविष्ट व्याख्या आहेच!
आणि त्याच भूमिकेतून हे पुस्तक यच्चयावत सगळ्यांवर विनोद करतं. अशाच विनोदांच्या माध्यमातून त्यांनी अनेक गोष्टींमध्ये पर्यावरणाचा ऱ्हास, स्त्रियांचं शोषण, वंशभेद असे अनेक गहन सामाजिक प्रश्न हाताळले आहेत. हाताळले आहेत म्हणजे पुन्हा, या प्रश्नांच्या अस्तित्त्वामुळे सगळं कसं दुःखद आहे असंही दर्शवलेलं नाहीये किंवा त्यांच्यावर मात करण्यासाठी कुठलातरी उपाय सांगून प्रेरणाही दिलेली नाहीये. फक्त यथेच्छ खिल्ली उडवलेली आहे. कोणी म्हणेल की अशाने त्या समस्येचं गांभीर्य कमी होतं, पण ते कुठल्या भूमिकेतून विनोद केलेला असतो त्यावर अवलंबून असतं. काही विनोद मुद्दाम असे प्रश्न हसण्यावारी नेण्यासाठीच असतात, आणि हे पुस्तक ते करत नाही. तर काही विनोद हे अतिशयोक्तीचा आधारे समस्येचं टोकाचं रूप दाखवतात, कारण त्यांचा उद्देश लोकांना त्याबद्दल विचार करायला लावायचा असतो आणि ते पुष्कळदा यात प्रभावी ठरतात. हे पुस्तक तेही करत नाही. यातले विनोद फक्त परिस्थिती आहे तशी मांडतात. त्यातूनही खूप हसायला लावणारे विनोद करता येणं हे त्यांचं कौशल्य आहे. यामागची त्यांची मला समजलेली भूमिका अशी, की तार्किकदृष्ट्या, आज जे जे काही सामाजिक प्रश्न अस्तित्त्वात आहेत, त्या सगळ्यांच्या मुळाशी कुठलीतरी विचारसरणी आहे, आणि त्या प्रत्येक विचारसरणीच्या गाभ्यात कुठेतरी नुसता मूर्खपणा ठासून भरलेला आहे. असायलाच हवा, कारण नाहीतर ती समस्या अस्तित्त्वातच नसती, नाही का? या समस्या आहेत म्हणजेच त्या विचारसरणीने कुठेतरी विशेष माती खाल्लेली आहे. आणि हे पुस्तक बरोबर तीच जागा शोधून सगळ्यांसमोर आणतं, आणि परिणामी आपल्याला खूप हसू येतं. याचं एक छान उदाहरण म्हणजे ‘समान संधी,’ नावाची एक गोष्ट, ज्यात हॅकर सरकारी सेवेत जास्त स्त्रियांना घेण्याचा खटाटोप करत असतो. त्यावरून त्याचा आणि हम्फ्रीच वाद होतो तेव्हा हम्फ्रीचे युक्तिवाद एकापेक्षा एक बिनडोकपणाचे होत जातात. एका टप्प्यावर हॅकरने अशीच एक चूक दाखवून दिल्यावर हम्फ्री खरंच हरतो आणि म्हणतो की त्याने कधी याचा सखोल विचार केलेला नाही. आणि स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी समजण्याच्या विचाराच्या मुळाशी जो मूर्खपणा दडलेला आहे, तो असाच टप्प्याटप्प्याने या गोष्टीत डोकं वर काढू लागतो. शेवटी हॅकरला जे हवंय ते घडत नाहीच, आणि तोही कदाचित इतरांएवढा नसला तरी काहीसा पूर्वग्रहदूषित आहेच हेच समोर येतं. मला यातली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे यामुळे आपल्याला हॅकर किंवा हम्फ्री दुष्ट आणि स्त्रीविरोधी वाटावेत असा याचा उद्देशच नाहीये. आणि आपण ती गोष्ट नीट वाचली तर आपल्याला जाणवेल की व्यक्तिशः हे दोघेही अजिबात स्त्रीविरोधी नाहीयेत. पण ते ज्या यंत्रणेचा भाग आहेत ती मात्र तशी असून, तिला बदलण्यापेक्षा स्वीकारणं हेच दोघांच्याही पथ्यावर पडत असल्यामुळे ते हा मुद्दा सोडून देतात. “मी स्त्रीवादी आहे म्हणून या अशा नोकऱ्यांमध्ये बायकांचे हाल होतील अशी मला काळजी वाटते,” असं म्हणणारा हम्फ्री आणि “मी स्त्रियांच्या हक्कांसाठी लढेन कारण त्यासाठी मला खूप मतं मिळतील,” असं म्हणणारा हॅकर, या दोघांचाही मग आपल्याला ठळकपणे दिसतो तो दांभिकपणा! आणि तो खूप हास्यास्पद आहे, एवढंच!
हे सगळं हळूहळू कळल्यानंतर मला पु.लं.नी ‘अंतू बर्वा’ मध्ये गमतीत विचारलेला प्रश्नच पडला, तो म्हणजे: या मंडळींची आदराची स्थानं कुठली? हे पुस्तक कोणाला किंवा कशाला आदर्श मानतं? उत्तर आहे: कशालाच नाही. मुळात कुठलीच व्यक्ती किंवा विचारसरणी आदर्श मानण्याच्या योग्यतेचीच नाहीये हेच या पुस्तकाचं म्हणणं आहे. आणि तसं बघायला गेलं तर दांभिकपणाचा जन्मच मुळी आदर्शवादी दृष्टिकोनातून होतो. आदर्शवादी दृष्टिकोन माणसाला एका दिशेने खूपच पुढच्या टप्प्यावर नेऊन ठेवतो, जिथे तो आदर्श टिकवून ठेवण्यातच विरोधाभास निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि होणारच, कारण कुठेच तडा नाही अशी कुठलीच विचारसरणी नाही, कुठलाच युक्तिवाद नाही. मग या पुस्तकाचं यावर काय म्हणणं आहे?
मध्यभागी राहायचं, आणि जरा अतीच टोक गाठणारं काहीतरी समोर आलं, की हसायचं. आपलाच दिवस बरा जातो. आणि नाहीतरी, वर सांगितलेल्या उदाहरणानुसार, आपल्या आदर्शाला तडा गेल्यावर तो त्वेषाने नाकारला काय, किंवा स्वीकारून उदास झालो काय, मनस्ताप नक्कीच होतो. आणि या मनस्तापाचं मूळच जर कुठलीतरी टोकाची अपेक्षा करण्यात असेल, तर करायचीच कशाला? ‘सगळं छान छान होईल’ असा विचार करण्याने तेवढ्यापुरतं बरं वाटतं, पण जरा कुठे काहीतरी चुकलं (जे चुकणार आहेच) की लगेच तो बुडबुडा फुटून आपण लगेच ‘माणुसकी संपली’ वगैरे म्हणायला लागतो. पण जगात खरंच चांगल्या गोष्टी घडतात, त्यांचा आनंद मानायचाच नाही का? वाईट गोष्टी घडतात, त्यांचं दुःख करायचंच नाही का? मानायचाही आणि करायचंही. फक्त त्या एका चांगल्या किंवा वाईट गोष्टीवरून कसलाच जागतिक पातळीवरचा निष्कर्ष काढायला जायचं नाही. जे आहे ते तेवढ्यापुरतंच आहे. तेवढ्यापुरतं खूश व्हायचं, तेवढ्यापुरतं दुःखी व्हायचं, आणि मधल्या वेळात असले निष्कर्ष काढण्याची खोड असलेल्या सगळ्यांकडे बघून मनसोक्त हसत राहायचं. कारण जग हे शेवटी असंच असणार आहे.
आता एवढ्या विवेचनानंतर ‘शेवटच्या दिवशी हॅकर’ हे चित्र पाहायची आपली तयारी झालेली आहे. मागच्या लेखाप्रमाणेच, ते त्याच्याच शब्दांत पाहूया.
“I suddenly realized, with a real clarity I had never experienced before, that although I might win the occasional policy victory, or make some reforms, or be indulged with a few scraps from the table, nothing fundamental was ever ever going to change.”
Yes Prime Minister!
आत्ताच वाचले.मांडणी सोप्या भाषेत, उत्सुकता निर्माण करणारी, विचार करायला प्रवृत्त करणारी आणि हे पुस्तक एकदा तरी वाचायला हवेच अशी इच्छा निर्माण करणारी आहे.
ReplyDeleteApart from shenanigans of politicians and civil servants and journalists and academicians and and.. (practically entire society); YM YPM are dear to me for another reason.. Majesty of English language with all its splendour, subtlety, wit, irony, insult, cunning, deceptive, devious, canny, pedantic, polished, refined, snobbish..
ReplyDeleteAha