असाही एकांतवास
सकाळी दहा-सव्वादहाची वेळ. नुकताच झालेला आणखी एक चविष्ट नाश्ता पचवत मी लॅपटॉपवर माझी आवडती सिरीयल बघत आरामात बसलो होतो. तेवढ्यात खोलीतला फोन वाजला. पलीकडच्या बाईचा आवाज आता माझ्या चांगलाच परिचयाचा होता. गेले दहा दिवस रोज एकदा फोन करून ही बाई मला ‘तिकडील सर्व क्षेम?’ असं विचारत होती.
“हॅलो,” मी म्हणालो.
“गुड मॉर्निंग, सर!” ती म्हणाली. “मला तुम्हाला कळवण्यास आनंद होतोय की तुमची RT-PCR निगेटिव्ह आली आहे. तुम्हाला आता चेक आऊट करायची परवानगी आहे. तुमची इच्छा असेल तर आत्ताही करू शकता; आत्ता काउंटरवर फार गर्दी नाहीये,”
“हो, गर्दी टाळली पाहिजे,” मी. “धन्यवाद, मी थोड्या वेळाने चेक आऊट करीन.”
“काही हरकत नाही, सर! पुन्हा इथे उतराल अशी आशा आहे.” ती म्हणाली आणि या घटनेच्या असंभाव्यतेवर मनापासून हसत मी फोन ठेवला. लॅपटॉप बंद करून सामान आवरायला सुरुवात केली. खोलीत आल्यापासून टेबलावर कागदपत्रं पसरलेली होती. ती एकेक करून बॅगेत घालायला लागलो. पहिल्यांदा हातात लागला तो हॉटेलने मला दिलेला त्यांच्या नियमांचा कागद. तसा तो जपून ठेवण्यात काहीच अर्थ नव्हता, पण एक आठवण म्हणून मला तो ठेवावासा वाटला. तो हातात धरून पुन्हा एकदा वाचताना, मला दहा दिवसांपूर्वी तो पहिल्यांदा हातात घेतला तो प्रसंग आठवत होता.
तो प्रसंग सांगायच्या आधी जरा इतिहास सांगायला हवा. ‘जीवाचं सिंगापूर’ ही लेखमाला मी संपवत आणली त्या दरम्यान कधीतरी, माझ्या लाडक्या शहराने मला पुन्हा हाक मारली. ‘भेटपर्व’ या लेखात मी बाबांच्या एका कलीगना भेटलो होतो तेव्हा सांगितलं होतं की मी सिंगापूरमधल्या एका विद्यापीठात मास्टर्ससाठी अर्ज केला होता. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की वेळ असल्यास परिसर पाहून ये, आणि मी म्हटलो होतो की तिथे मला प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे कशाला माझा आहे तो प्लॅन बदला! पण माझा तो अंदाज मात्र चुकला, आणि त्याच विद्यापीठात यावर्षी मास्टर्स चा अभ्यासक्रम सुरु झाल्यानंतर, नोव्हेंबरमध्ये सिंगापूरने भारतासाठी आपली दारं पुन्हा उघडली तेव्हा अखेर इथे पुन्हा येण्याचा योग जुळून आला.
सध्याच्या नियमानुसार, मला सिंगापूरला पोचल्यावर दहा दिवस quarantine मध्ये राहायचं होतं. त्याच अनुभवाची ही कथा. सिंगापूरची व्यवस्था अशी आहे की तुम्हाला सरकारने नेमून दिलेल्या ठिकाणीच ते दहा दिवस काढायचे असतात. आणि ती ठिकाणं ही बहुतेककरून पंचतारांकित हॉटेलं असतात. अर्थात त्या हॉटेलचा खर्च ते भरायला लावत नाहीत; प्रत्येकाला एक ठरलेला खर्च असतो आणि तो आपण किती दिवस राहतोय आणि आपल्यासाठी जेवणाची सोय यावर आधारित असतो. बाकी ते हॉटेल जाणे आणि सरकार जाणे! त्यामुळे विमानतळावर सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला आणि प्रवासात झालेल्या काही मित्रांना एका हॉटेलचा टॅग दिला. तो म्हणजे फक्त एक छोटं गोल पिवळं स्टिकर होतं आणि त्यावर फक्त R असं लिहिलं होतं. त्यावरून आम्ही कुठल्या हॉटेलला चाललोय त्याचा काही थांगपत्ता लागला नाही. आम्हाला न्यायला सरकारची बस आली होती. साधारण अर्ध्या तासाच्या त्या प्रवासात आम्ही पुढचे दहा दिवस भेटणारच नसल्यामुळे खूप गप्पा मारून घेतल्या. शेवटी त्या बसने आम्हाला सामानासकट ‘स्वीसोटेल’ नावाच्या एका इमारतीत सोडलं. त्यांनी आम्हाला आत जायची घाई केल्याने मला त्या इमारतीची उंची नीट मोजता नाही आली. रात्रीचा एक वाजला होता.
ते पंचतारांकित होतं यात काही वादच नव्हता. एका प्रशस्त लॉबीमध्ये काही खुर्च्या अंतर ठेवून मांडून ठेवल्या होत्या. काउंटरवर लोक मास्क,फेस शिल्ड आणि आमची कागदपत्रं हाताळायला म्हणून हातमोजे घालून उभे होते. त्यातल्या एकाने मला खूण केली आणि मी माझं सगळं ओझं घेऊन त्याच्यासमोर जाऊन थांबलो. माझी सगळी कागदपत्रं तपासल्यानंतर त्याने हा कागद माझ्या हातात दिला.
“त्यावर सगळं लिहिलेलं आहेच तरी मी तुम्हाला सगळी कल्पना देतो.” तो म्हणाला. “हा तुमचा रूम नंबर आणि हे तुमचं कार्ड. पुढचे दहा दिवस तुम्हाला कुठल्याही कारणासाठी या खोलीच्या बाहेर पडता येणार नाही.”
“हो.” मी म्हणालो. नाही म्हणायची बिशादच होती जणू!
“रोज सकाळी पुढच्या दिवशीचा मेनू उघडतो. या फॉर्मवरचा कोड स्कॅन करून तुम्हाला तो फॉर्म भरता येईल. रोज दुपारी बारा वाजायच्या आत फॉर्म भरा. उद्याचे choices या कागदावर आहेत. वाचा आणि मला आत्ताच सांगा.”
मी ते बघितलं. सुदैवाने अगदीच अनोळखी असे कुठलेच पदार्थ नव्हते. मग मी दुपारसाठी चिकन, रात्री साधी भाजी आणि भात आणि सकाळी नाश्त्यासाठी फक्त ‘assorted pastries’ असं लिहिलं होतं ते सांगितलं. त्याने त्या सगळ्याची कुठेतरी नोंद केली.
“याशिवाय तुम्हाला काही मागवायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन जरूर मागवू शकता. ते आधी इथे येईल आणि मग वर तुमच्यापर्यंत पोचवलं जाईल. तुम्हाला सगळ्या गोष्टी खोलीच्या दाराबाहेर ठेवलेल्या मिळतील. बेल वाजली की थोड्या वेळाने फक्त दार उघडून त्या आत घ्या, आणि तुमचं झाल्यावर उरलेलं बाहेर ठेवून द्या. आमच्या ठरलेल्या वेळी आम्ही ते नेऊ. आणि हो, खोलीचं दार उघडताना, आणि गच्चीत जाताना मास्क तेवढा लावा.”
मी नुसतंच ‘हो’ म्हटलं; तेव्हा माझ्या मनात माझ्या खोलीला गच्ची आहे ही नवी माहिती रेंगाळत होती.
“याशिवाय काही सूचना असतील तर तुम्हाला फोनवर सांगण्यात येतील. आत्ता या मागच्या दारातून आत जा, बोळात अगदी टोकापर्यंत जा आणि तिथल्या शेवटच्या लिफ्टने वर जा. स्वीसोटेलमध्ये तुमचं स्वागत.” आणि मग क्षणभर थांबून हसून म्हणाला, “आणि सिंगापूरमध्येही!”
मीही हसलो. हे एक वाक्य त्याआधी विमानतळावर पाचसहा लोकांकडून ऐकलं होतं आणि यापुढेही अनेक जणांकडून ऐकणार होतो, पण ते ऐकण्याचा कंटाळा येणं तर सोडाच, उलट प्रत्येक वेळी आतून नव्याने बरं वाटायचं. ते वाक्य म्हणजे एका अर्थी माझ्या प्रवासाचा आणखी एक टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची पावतीच होती. हळूहळू का होईना, मी माझ्या ध्येयाच्या जवळ सरकत होतो. आणि ‘Welcome to Singapore’ हे तीन शब्द मला केवळ ‘पोहोचणं’ या घटनेचंच आपल्याला केवढं अप्रूप वाटू शकतं याची पुन्हापुन्हा प्रचिती करून देत होते. तेव्हा मला क्षणभर का होईना पण गेल्या तीस तासांचा सगळा थकवा गेल्यासारखा वाटला.
पण मी कुठल्या लिफ्टमधून जावं हेही त्याने मला सांगायचं होय? असा विचार आधी उगीच माझ्या मनात आला होता, पण मग माझ्या लक्षात आलं की या हॉटेलचा परिसर खूप मोठा असून त्याच्या दोन मुख्य इमारती आहेत. त्या दोघींपैकी जी गगनचुंबी होती तिच्यात मी होतो. मोठ्या उत्साहाने मी माझा खोली क्रमांक पाहिला. माझी खोली तेराव्या मजल्यावर होती. काहीसा हिरमुसून मी टोकाच्या लिफ्टकडे गेलो.
खोलीचं वर्णन ‘प्रशस्त’ एवढंच करता येईल आणि त्या खोलीचा तो अधिकारही आहे. दोन मोठी कपाटं, त्यातल्या एकात इस्त्री आणि इस्त्री करायचं फोल्डिंग टेबल, बाथरूम, दोन मोठे पलंग, कोपऱ्यात मोठं working table आणि त्याला लागून एक आडवा सोफा आणि, वचनाप्रमाणे, एका बाजूला संपूर्णपणे काचेची भिंत आणि पलीकडे छोटीशी गच्ची. सगळ्या बॅगा खाली ठेवून मी आधी दार उघडून गच्चीत गेलो आणि तेराव्या मजल्यावरून का होईना, पण आजूबाजूचा सगळा परिसर मोठ्या प्रेमाने न्याहाळायला लागलो. तेवढ्यात बाकीच्या मित्रांचे त्यांच्या खोल्यांचं वर्णन करणारे मेसेज यायला लागले होते. त्यापैकी एकीने तिची खोली छप्पन्नाव्या मजल्यावर आहे असं सांगितल्यावर मी फोन ठेवून दिला. सुखरूप पोचल्याचं भारतात कळवून टाकलं आणि तसाच एका पलंगावर कोसळलो.
आत्ता तो कागद घेऊन वाचताना ती सगळी रात्र पुन्हा माझ्या डोळ्यांसमोरून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता नेमकं लेक्चर होतं, त्यामुळे मला त्या बिछान्याचा अपमान करून फोनवर सकाळी साडेसातचा गजर लावावा लागला होता. काही तासानंतर मला बेलच्या आवाजाने अचानक जाग आली, तेव्हा माझ्या पलंगाशेजारी त्यांनी ठेवलेलं लठ्ठ घड्याळ सकाळचे आठ दाखवत होतं. त्या घड्याळाकडे पहिल्यांदाच नीट पाहिल्यावर गजर त्याच्यातही लावता येतो असं दिसलं. खोलीतल्या बाकीच्याही बऱ्याच गोष्टी मला खुणावत होत्या, पण मी आधी घाईघाईने उठून आधी दाराकडे, मग नीट जाग आल्यामुळे फिरून मास्क घालायला टेबलाकडे आणि पुन्हा दाराकडे असा धडपडलो. दाराबाहेर कोणीही नव्हतं, फक्त दारासमोर तिरक्या करून ठेवलेल्या एका खुर्चीवर प्लॅस्टिकच्या पिशवीत काहीतरी ठेवलेलं होतं. त्या माझ्या नाश्त्यासाठी मी आदल्या रात्री सांगितलेल्या ‘assorted pastries’ होत्या. मी त्या परत आणून टेबलावर ठेवल्या आणि आवरायला गेलो. नऊ वाजेपर्यंत जेमतेम सगळं करून झालं होतं, आणि मी लेक्चर चालू असताना खाल्लेलं चालणार होतं. त्यामुळे मी माझा गजर कसा चुकला असेल या विचारात लेक्चर करायला बसलो, आणि ते चालू असताना दहा वाजता फोन अचानक आरवला. आदल्या रात्रीच्या सगळ्या गडबडीत मी फोनवर सिंगापूरची वेळ लावायला विसरलो होतो.
आत्ताही मी बॅगा भरत असताना भारतात साडेसातच वाजलेले होते. घरी आईबाबांचा दिवस नुकताच सुरु झाला असेल, ते चहा घेत असतील असं सगळं मला दिसायला लागलं. व्हिडिओ कॉल करून त्यांना मी निघत असल्याचं कळवावं असं वाटलं, पण माझ्या अंगात निघण्याच्या कल्पनेनेच खूप उत्साह संचारला होता. आदल्या दिवशी ती RT-PCR करायला म्हणून खालच्या लॉबीत गेलो होतो तेव्हा रांगेत मला अगदी भिंतीएवढ्या खिडकीतून पलीकडे काही अंतरावर असलेली मरिना बे सँड्सची इमारत दिसेल अशा ठिकाणी उभं करून सिंगापूरने एक थट्टा केली होती. त्या दृश्यानंतरचे चोवीस तास मी फक्त उतावीळ होण्यात घालवलेले होते. त्यामुळे आता मी सगळ्यात आधी बाहेर पडणार होतो.
टेबल आवरत असताना मला त्या सकाळच्या नाश्त्याचा प्लॅस्टिकचा ट्रे दिसला. त्या दिवशी मी नाश्त्याला दोन चिकन सॉसेज, दोन कटलेट, अंडं आणि baked beans असं जरा पाश्चिमात्य पारंपरिक असं खाल्लं होतं. या हॉटेलमधल्या अन्नाचा दर्जा एकदा लक्षात आल्यावर ते दहा दिवस मी मनासारखे प्रयोग करायचं ठरवलं होतं, पण नाश्त्याच्या बाबतीत तेवढा वाव नाही मिळाला. माझ्या ठळकपणे लक्षात राहिलेले तीनच मेनू पुन्हापुन्हा येत राहिले. पहिला अर्थातच त्या पेस्ट्रीज होत्या. आपल्याकडे पेस्ट्री म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो क्रीमचा पाऊस पाडलेला केकचा तुकडा, आणि खरंतर तीच प्रतिमा मनात ठेवून मी पहिल्यांदा तो मागवला होता. पण त्यात नेमक्या पेस्ट्रींच्या घराण्यातले इतर सगळे लोक निघाले. सगळंच गोडगोड. फार काय, मला थोडातरी आंबट निघेल अशी आशा दाखवणारा एक रंगीबेरंगी केक सगळ्यात गोड निघाला. त्या मानाने आजचा हा नाश्ता खूपच संतुलित होता. तिसरा प्रकार हा ‘oatmeal porridge’ हे नाव मिरवत असून माझ्या आपणहून संकटात उडी घालण्याच्या अचानक वाढलेल्या इच्छेला साजेसाच होता. पण त्याच्यासोबत त्यांनी एका डबीत सुपारीसारखी दिसणारी काहीतरी दाट पावडर आणि खूपसे बेदाणे दिले होते, आणि ते सगळं एकत्र कालावल्यावर माझ्या जिभेची भीती बऱ्यापैकी गेली.
बाकी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात हटकून भात हा एक ठरलेला सदस्य असे, आणि माझ्या दृष्टीने ती पर्वणीच होती. नुसता शिवजलेला पांढराशुभ्र भात आणि काहीतरी तोंडीलावणं या एका बाबतीत आपल्या मराठी खाद्यसंस्कृतीचं या चिनी-मलेशियन-सिंगापुरी संस्कृतीशी उत्तम जमतं. रोजच्या तीन पर्यायांपैकी एक शाकाहारी असे, आणि तो हटकून भारतीयच निघायचा. मी बऱ्याचदा उरलेल्या मांसाहारी पर्यायांपैकी जो जास्त ओळखीचा वाटे तो घेत असे, पण तितक्याच वेळा शाकाहारी पर्याय पण निवडून पोटाला दिलासाही देत असे. त्या शाकाहारी पदार्थांमध्ये मला बहुतेकवेळा दालफ्राय मिळायचं, पण एकदा मटकीची उसळ आणि एकदा फ्लॉवरची भाजी पण मिळालं. रात्री आपलं अगदी ओळखीचं मिळणार आहे हे माहित असलं की दुपारी पोटही आव्हानं पेलायला तयार असायचं.
ट्रे नेहमीप्रमाणे खोलीबाहेर ठेवायला जाताना मला मी दुसऱ्या एका टेबलावर ठेवलेली परवाची दोन कार्डबोर्डची खोकी दिसली, आणि त्याही आठवणीचा आस्वाद घेत मी ती सगळी बाहेर ठेवून आलो. इथे आल्याच्या तिसऱ्याच दिवशी दुपारचं जेवण घेताना मला या हॉटेलला माझे लाड करायची हौस असल्याचं लक्षात आलं होतं. सगळी जेवणं सिंगापूरमधल्या कुठल्यातरी मध्यवर्ती केंद्रातून येत होती असं नंतर कळलं, पण अधूनमधून त्यांच्यासोबत येणाऱ्या या काही गोष्टी नक्कीच हॉटेलचंच डोकं होतं. त्या पहिल्या वेळी मला जेवणासोबत एका गोल प्लॅस्टिकच्या डब्यात केकचा, आपण दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर आपल्याला आग्रहाने वाढला जातो एवढा मोठा तुकडा होता. त्या दहा दिवसांत असे एकूण तीन केक मला मिळाले, शिवाय दोन वेफर्सची पाकिटं आणि या कार्डबोर्डच्या खोक्यातून छोट्या पेस्ट्रीज (आपल्या व्याख्येनुसार) आणि मॅकरुन्स मिळाले. तसंच चांगल्या सवयीपण असाव्यात म्हणून दोनदा केळी आणि चार वेळा सफरचंदपण आली. आणि हे सगळं मी न मागता. मीही या सगळ्याचा आदर करून येईल ते सगळं संपवत असे. मी आयुष्यात पहिल्यांदा स्वतःहून सोलून एक आख्खं केळं खाल्लं याबद्दल आईनेही सिंगापूरचे आभार मानले. या आणि अशा अनेक गोष्टींमुळे, माझं इथलं वास्तव्य तांत्रिकदृष्ट्या एक कैद असली तरी मला क्षणभरही अडकून पडल्यासारखं वाटलं नाही. अर्थात, खिडकीतून मरिना बे सँड्स दिसेपर्यंत.
टेबलावर राहिलेली शेवटची वस्तू म्हणजे एक छोटीशी सुबक लाकडी पेटी होती, त्यातून आदल्या सकाळी मला हॉटेलकडून दोन हृदयाच्या आकाराची चॉकलेट्स आली होती. सोबत एक कार्ड होतं, ज्यात त्यांनी या दहा दिवसांत मी केलेल्या सहकार्याबद्दल माझे आभार मानले होते. भावना छापील असल्या तरी मला ते वाचून बरं वाटलं होतं.
आज ती पेटी माझ्या बॅगेत ठेवून सगळी कुलुपं लावून टाकताना माझ्या मनात आलं, खरंतर आभार तर मी मानायला पाहिजेत. मी दहा दिवसांपूर्वी एक अंत पाहणारा प्रवास करून, शिणलेल्या आणि कुठलीही अप्रिय बातमी पचवायची तयारी नाही अशा अवस्थेत इथे आलो होतो. आणि या हॉटेलच्या पहिल्या दर्शनाने, खोलीत पाऊल टाकल्यावरच्या क्षणी जीव भांड्यात पडला होता, आणि त्या क्षणी त्या भावनेइतकी प्रिय दुसरी कुठलीच असू शकत नव्हती. त्यानंतरचे दहा दिवस या खोलीने, हॉटेलने माझी व्यवस्थित काळजी घेतलेली होती, मला एका नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायची संधी दिली होती, सिंगापूरमध्ये पाऊल टाकून आपल्या पायावर उभं राहण्याच्या क्षणासाठी मला तयार केलं होतं. ती खोली माझं अभयारण्यच बनली होती. आणि तिच्यातून बाहेर पडून खाली लॉबीत परत जाताना, तिथल्या मास्कचा पलीकडून स्मितहास्य करणाऱ्या स्टाफचा निरोप घेताना, बाहेर पडून त्या गगनचुंबी इमारतीकडे मनसोक्त डोळे भरून पाहिल्यावर टॅक्सी शोधायला जाताना, मी एका वेगळ्याच समाधानाचा अनुभव घेत होतो. अशा वेळी मी याचे पैसे भरले होतेच की मग, या सगळ्यावर माझा हक्कच होता असे कडवट विचार नाहीच मनात येत. तेव्हा होती फक्त कृतज्ञता.
कोव्हिडच्या काळाने आपल्या सगळ्यांनाच आपल्याला खात्री असलेल्या सगळ्या गोष्टींवर शंका घ्यायला लावली, आपल्या जवळच्यांपासून आपल्याला लांब ठेवलं आणि अनेक नात्यांमध्ये विरह निर्माण केला. सिंगापूरने मला हाक मारल्यानंतर मी तब्बल वीस महिन्यानंतर त्याला प्रतिसाद देऊ शकलो होतो, आणि तरीही मी एकदाचे इथे पाय टेकल्यावर ते, मी २०१९ मध्ये आलो होतो तेव्हा जसं वागलं होतं अगदी तसंच आत्ताही वागलं होतं. हा विचार मनात आल्यावर मला पुन्हा उत्साहाने भरून आल्यासारखं वाटलं आणि मी लगबगीने टॅक्सी स्टॅंडकडे निघालो.
खूप छान आणि ओघवतं लिहिले आहेस.
ReplyDeleteफारच मस्त! सगळं डोळ्यांसमोर उभं राहिलं. असाच लिहिता राहा.
ReplyDeleteKhupach masta lihila ahes Aditya
ReplyDeleteAaj kadhi nhave te eka damat sagala lekh vachala 😃
आता जेव्हा केव्हा सिंगापुरला जाण्याचा योग येईल तेव्हा त्या गगनचुंबी इमारतीला नक्कीच भेट देईन. अर्थात quarantine साठी नाही 😆
आदित्य, लेख मस्त! सिंगापूर- quarantization चा अनुभव विशेष आणि तू केळी व सफरचंद यांना तुझ्या खाद्यपदार्थात समाविष्ट करून घेतलंस याबद्दल अभिनंदन!
ReplyDeleteआदित्य छानच.
ReplyDeleteमस्त रे!
ReplyDeleteअशा वेळी मी याचे पैसे भरले होतेच की मग, या सगळ्यावर माझा हक्कच होता असे कडवट विचार नाहीच मनात येत. तेव्हा होती फक्त कृतज्ञता. 👌👌
अगदी खरं!!!
छान व्यक्त केलं!
Deleteखूपच छान 👌👌
ReplyDeleteकिती छान लिहितोस...... मस्तच.... मला आवडतील तुझे लेखा वाचायला.....लिखते रहो ...
ReplyDeleteQuarantine मधे फक्तं खाण्याचं वर्णन! त्याव्यतिरिक्तंचा वेळ "खायला" नाही कां उठला?
ReplyDeleteकिती सहजता आहे लिहिण्यात तुझ्या ,वाचत रहावं लेख संपू नाही असं वाटत
ReplyDelete