मरिना बे सँड्स नंतर
Quarantine च्या दहा दिवसांनी एक विस्मरण घडवून आणलं होतं. हॉटेलमधली माझी खोली जणू एक कोष होती आणि मी तिच्या आत असेपर्यंत मला बाहेरच्या जगापासून, माझ्या नव्या जबाबदाऱ्यांपासून, आणि सगळ्यात जास्त बाहेर अजूनही जिवंत असलेल्या धोक्यापासून लांब ठेवत होती. माझ्या masters चा अभ्यासक्रम सुरू होता, आणि प्रकल्प आणि लेक्चर्स असं अधूनमधून चालू होतं, पण हा कोर्स पुण्यातच ऑनलाईन सुरू केल्यामुळे माझ्या मनात अजूनही तो कोर्स आणि माझं सिंगापूरमधलं वास्तव्य या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. ही माझी मनस्थिती मी हॉटेल सोडून बाहेर पडल्यानंतर दोनतीन दिवस टिकली असावी. तिसऱ्या दिवशी मी माझ्या एका वर्गमित्रासोबत ठरल्याप्रमाणे मरिना बे सँड्सला एक भेट देऊन आलो.
माझ्या दुबईच्या प्रवासवर्णनात मी काहीशा विनोदाने, पण तरी पुष्कळशा गंभीरपणानेच माझ्या प्रवासाला एका यात्रेची उपमा दिली होती, आणि बुर्ज खलिफा माझ्या त्या यात्रेचा परमोच्च क्षण होता (pun intended). तीच उपमा सिंगापूरला वापरायची म्हटली, तर माझ्या या यात्रेतलं सगळ्यात पवित्र देवस्थान अर्थात मरिना बे सँड्स असणार होती. २०१९ मध्ये माझ्याकडे अगदी चिकार वेळ असूनही मी फक्त पलीकडच्या किनाऱ्यावरून एक दर्शन घेतलं होतं, पण यावेळी मी तसं करणार नव्हतो. ती सबंध संध्याकाळ आम्ही पलीकडून, समोरून, खालून, आणि काही काळ आतूनही त्या इमारतीचा एकेक इंच न्याहाळण्यात घालवली. माझ्या मागच्या भेटीनंतर जगात एवढं सगळं वेड्यासारखं बदललेलं असताना, आपल्या स्थानी अढळ अशी ध्रुवताऱ्यासारखी ती इमारत पुन्हा पाहून मला भावनिकदृष्ट्या खूप आधार वाटला होता. सगळंच काही बदललेलं नाहीये, असं जणू ती मला सुचवत होती, आणि मी सुखावत होतो.
पण एक गोष्ट नक्कीच बदललेली होती, आणि माझ्या वर्गमित्राचा निरोप घेऊन परत जायला निघाल्यावर हा बदल सिंगापूरमध्ये उतरल्यानंतर पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने माझ्यावर आदळला. हॉटेलमध्ये राहत असताना कुठेतरी आपण का आलोय तेही विसरायला झालं होतं, आणि त्या सगळ्या अनुभवाला एक Staycation चा रंग चढला होता. मरिना बे सँड्सला जाणं हे माझ्या दृष्टीने एका पर्वाची सांगता वगैरे असल्याने, तिथे जाऊन येईपर्यंत मी अगदी यात्रेकरू mode मध्येच होतो. त्या इमारतीकडे पाठ फिरवून मेट्रोच्या दिशेने चालायला लागलो तेव्हा मनात आलं, की एक अतिशय सुखद विश्रांती आणि मनासारखं दर्शन झालं होतं, आता मी तृप्त मनाने परत जायला मोकळा होतो. आणि यानंतर लगेच मनात डोकावलेला विचार म्हणजे: परत कसला जातोस?
समाधीत पडल्यासारखा मी माझ्या होस्टेलवर परत आलो आणि माझ्या खोलीकडे पहिल्यांदाच एका वेगळ्या नजरेने पाहिलं. हिलाच आता घर म्हणायचं होतं. दोन कपाटं, एक पलंग, एक बाथरूम आणि दोन डेस्क. पुण्यातल्या घरी साधा विचार करतानाही मला घरभर फिरायची सवय असल्यामुळे, इथे मला विचार करायलाही ही जागा अपुरी वाटून गेली. तसं माझी खोली पुष्कळ मोठी आहे आणि माझ्या सगळ्या सामानासाठी व्यवस्थित जागा आहे, पण का कोण जाणे पहिले दोन आठवडे तरी मी माझं सामान लावलं नव्हतं. त्या दिवसांत मी रोज माझे कपडे आणि इतर गोष्टी बॅगेतून काढायचो आणि पुन्हा बॅगेत टाकून कुलूप लावून टाकायचो, जणू काही मला कुठल्याही क्षणी प्रवासालाच निघायचंय. आता वळून पाहताना वाटतंय, की बाहेर पडल्यानंतर ज्या सगळ्या प्रक्रिया पार पाडायच्या होत्या, म्हणजे एक आरोग्य तपासणी, बँकेत खातं वगैरे, त्या सगळ्या करत असताना कुठेतरी काहीतरी चुकेल अशी भीती होतीच, पण त्या भीतीत एक लहानशी आशा पण मिसळलेली असायची. सिंगापूरला येण्याची तब्बल वीस महिने स्वप्नं पाहिल्यानंतर, तेव्हा मी अशा मनस्थितीत होतो की कोणा अधिकाऱ्याने मला भारतात परत जायला सांगितलं असतं तर मला रडूही आलं नसतं. अशी मनस्थिती मोठी जबाबदारीची कामं पार पाडायला प्रतिकूलच असते, आणि कदाचित म्हणूनच मी सगळ्यात शेवटची पायरी, म्हणजेच माझा Student Pass ताब्यात घेणं, नकळतच खूप लांबवली. हा पास म्हणजे माझा इथला दोन वर्षांचा व्हिसा, आणि तो ताब्यात घेईपर्यंत मी एका तीस दिवसांच्या टुरिस्ट व्हिसावर इथे राहत होतो. तो टुरिस्ट व्हिसा बाद होण्याच्या अगदी चार दिवस आधी मी माझा पास मिळवला, आणि या निष्काळजीपणाबद्दल घरून थोडी बोलणीही खाल्ली. पण तो पास हातात घेतला, त्याच्यावर लिहिलेलं ‘जानेवारी २०२४ पर्यंत वास्तव्य मंजूर’ हे वाचलं, तेव्हा अचानक हे शहर मला पुन्हा खूप उबदार आणि welcoming वाटायला लागलं. त्या दिवशी मी परत आल्यावर सगळे कपडे कपाटांमध्ये लावून ठेवले, माझं डेस्क लावलं आणि बॅगा पलंगाच्या खाली ढकलून दिल्या. उभयपक्षी स्वीकार झालेला होता.
तसं ते welcoming कायमच होतं असं आता वाटतं. अगदी एकट्याने भाजी आणण्याचाही अनुभव नसलेल्या काहीशा घरकोंबड्या आणि अंतर्मुख मुलासाठी, स्वतःची जबाबदारी घेण्याचा पहिला अनुभव घेण्यासाठी सिंगापूर हे खरोखरच आदर्श शहर आहे. वाहतुकीपासून खरेदीपर्यंत सगळ्या ठिकाणी यंत्रणा इतक्या रुजवलेल्या आहेत की तुम्ही ठरवूनही चुकू शकत नाही. कुठेही जाताना तुमच्या दिमतीला एक पाट्यांचा पाऊस असतो; इतका की हळूहळू गूगल मॅप्सची गरज पण नाहीशी होते. मी साधं रस्त्याने चाललो होतो. एकतर तुम्ही शहरातल्या मोठ्या इमारतींच्या गराड्यात जा नाहीतर अगदी उपनगरीय गल्लीबोळांमध्ये जा, पादचारी मार्ग नाही अशी एकही जागा मला अजून दिसली नाही. त्यामुळे सायकलस्वार सोडले (जे अपेक्षेपेक्षा खूपच जास्त निघाले) तर चालताना आपण सहज आपली नजर समोरून काढू शकतो. म्हणूनच मला प्रत्येक वेळी आजूबाजूचा सगळा परिसर नीट पाहता आला. त्यात या पाट्याही. तर मी अगदी सहज रस्त्याने चाललो होतो, आणि उजवीकडे एका दिव्याच्या खांबावर पाटी दिसली: ‘मेट्रो स्टेशन - सरळ - ५०० मीटर.’ तेव्हा त्याचं काही वाटलं नाही. थोडं चालल्यावर पुन्हा ‘मेट्रो स्टेशन - सरळ - २०० मीटर.’ ‘बरं, आलं लक्षात,’ मी मनाशी म्हटलं. काही वेळाने पुन्हा ‘मेट्रो स्टेशन - सरळ - ५० मीटर’. आता इथपर्यंत आल्यावर मेट्रो स्टेशनची इमारत ठळकपणे दिसत होती आणि तिच्यावर मेट्रोचं ते प्रसिद्ध चिन्ह सगळीकडे होतं, पण तरी पाटी पाहिजेच बुवा. आणि इथल्या बहुतेक सगळ्या मेट्रो भूमिगत असल्या, तर भूमिगत स्टेशनांच्याही जमिनीवर इमारती असतात. लंडनसारखा नुसताच कुठेतरी पाताळात जाणारा जिना नसतो. आणि अशा एका भूमिगत स्टेशनला किमान चार आणि पुष्कळदा आठ प्रवेश असल्यामुळे, त्या परिसरात चहूकडे नजर टाकल्यावर ते चिन्ह हमखास चारपाच वेळा दिसतं. अशा वेळी ‘planned city’ म्हणण्यापेक्षाही, कोणीतरी या सगळ्या ठराविक गोष्टी ठराविक ठिकाणी हव्यात असा एक प्रोग्रॅम कॉम्प्युटरला सांगितल्यावर त्याने शहर जसं प्रिंट केलं असतं, तसं हे शहर दिसतं.
आणि या प्रिंटचा एक अविभाज्य भाग म्हणजे झाडी! मोठ्या डेरेदार वृक्षांनी आणि अगणित झुडुपांनी नटवलेला नाही असा एखादा रस्ता क्वचितच सिंगापूरमध्ये सापडेल. Divider वर, आणि दोन्ही बाजूंना हिरव्या रंगाचा स्फोट झालेला दिसतो, आणि फक्त उपनगरांतच नाही तर अगदी गगनचुंबी इमारतींच्या गर्दीतही. आणि फक्त रस्तेच नाही, तर पादचाऱ्यांना रस्ते ओलांडण्यासाठी जे ठिकठिकाणी पूल बांधलेले आहेत (त्यातल्या बहुतेक पुलांना अपंगांसाठी लिफ्टचीही सोय असते.) त्यांच्यावरही बोगनवेल पसरलेली असते. हेच मोठ्या flyovers आणि इतर पुलांसाठीही असल्यामुळे सिंगापूरमध्ये पूल आणि गुलाबी रंग हे आपल्या डोक्यात पक्कं बसलेलं एक चित्र बनतं. कुठल्याही ठिकाणी ट्रिपला जाण्यापेक्षा असं राहायला जाण्याने आपल्याला त्या ठिकाणाची खरी ओळख पटते हे मी निघायच्या आधी चार लोकांकडून ऐकलं होतं, कारण अशा वेळीच टुरिस्टपासून ज्या गोष्टी कळत-नकळत लपवण्यात येतात त्याही आपल्याला पाहायला मिळतात. आणि काही गोष्टी सिंगापूरही लपवत असेल याबद्दल मला शंका नाही, पण तरी स्थूलमानाने या शहराचा दिखाऊ भाग आणि राहता, working भाग यांच्यात तफावत नाही. Consistency आहे, आणि जी आहे ती हिरवी आणि सुंदर आहे.
आणि हा अनुभव generalize करायचा मोह आवरला पाहिजे, पण इथे माझा ज्यांच्याशी संपर्क आला ते सगळे कर्मचारी खूप हसतमुख आणि मनापासून मदत करायला तयार वाटले. त्यांच्या वागण्याबोलण्यातूनच एक प्रकारचा दिलासा मिळत होता. एकतर मास्कच्या आडूनही स्पष्ट दिसणारं स्मितहास्य आपल्या हृदयाची धडधड क्षणात कमी करू शकतं, आणि मला व्यक्तिशः तरी इथल्या लोकांचा accent खूप खेळकर आणि उत्साहाने भरलेला वाटत आलाय. लोकसंख्येत बहुतांश चिनी असल्यामुळे, त्या भाषेचा प्रभाव खूप ठिकाणी जाणवतो. रचनांमधल्या फरकामुळे असेल, पण इथल्या लोकांना त्यांच्या इंग्लिश वाक्यांचा शेवट ‘या’ आणि ‘ला’ असं हेल काढून म्हणण्यात करायची सवय आहे. बहुतेकवेळा हे इतक्या स्पष्टपणे जमलं नाही किंवा ते तोंडातल्या तोंडात बोलत असतील तर शेवटी नुसता एक लांब ‘आ’ लावतात. आपल्या दृष्टीने इंग्लिशपेक्षा आपली मराठी खूपच उत्साहाने भरलेली असते; आपल्याला इंग्लिश काहीशी अबोल आणि जेवढ्यास तेवढं व्यक्त करणारी भाषा वाटते, जे अनेक बाबतींत खरं आहे. पण या पौर्वात्य भाषाही अशाच उत्साही असाव्यात, कारण इथे त्या मुखांतून ऐकू येणारी इंग्लिशही तशीच वाटू लागते. समोरच्या कर्मचाऱ्याने आपल्याला ‘Did you bring all your documents?’ असं शांतपणे विचारणं, यापेक्षा त्यानेच ‘You bring all your documents aaaah?’ असं म्हणणं; यापैकी दुसऱ्या पद्धतीमुळे आपलं टेन्शन मात्र नक्कीच कमी होतं. माझ्या इथल्या फ्रेंच आणि इटालियन वर्गमित्रांनी ‘काय बोलतात काही समजतच नाही बुवा’ अशा टिप्पण्या केल्या (चोराच्या उलट्या…) पण मला मात्र यांचा accent आवडला.
अशा सगळ्या लोकांबरोबरचे माझे हे लहानसे संवाद माझ्या लक्षात राहण्याचं आणखी एक कारण मुळात संवादांची चणचण हेही असेल. मी quarantine मध्ये होतो तेव्हा मला रोज फोनवर कोणीतरी विचारायचं की ‘कसा आहेस, फार एकटं वाटत नाहीये ना?’ आणि मी अगदी प्रामाणिकपणे ‘नाही’ असं सांगायचो. खरंच त्या दहा दिवसांत एकटेपणा या एका गोष्टीचा त्रास तर सोडाच, पण जाणीवही झाली नाही. मी दाराबाहेर आलेलं खायचो, लेक्चर्स आणि अभ्यास करायचो आणि उरलेल्या वेळात मला हवं ते आणि मला हवा तितका वेळ लॅपटॉपवर बघत बसायचो. मी मजेत होतो, आणि मला कधीच एकट्याने मजा करताना चुकल्याचुकल्यासारखं वाटत नाही. पण बाहेर पडल्यानंतर एक गोष्ट जाणवली; की आपल्या आजूबाजूला कोणीच नसतं तेव्हा एकाकीपणा वाटत असेलही, पण तो अनेक पटींनी तेव्हा जास्त जाणवतो जेव्हा आपल्या आजूबाजूला शेकडो माणसं असून त्यातलं कोणीच आपलं नसतं. माझ्या हॉटेलच्या खोलीत माझ्या नजरेसमोर कोणीच नव्हतं आणि माझ्या लहानशा विश्वात मी सुखी होतो. पण बाहेर रस्त्यावर चालताना, मेट्रोतून फिरताना, कुठल्याही प्रेक्षणीय ठिकाणी फिरताना, आजूबाजूला घोळक्याने किंवा किमान जोडीने तरी आलेले लोक पाहून जो एकटेपणा बोचतो तो वेगळाच. आणि मला वाटतं याच भावनेने मला माझ्या काहीशा antisocial tendencies ना पार विसरायला लावून शक्य तिथे लोकांच्यात मिसळायला लावलं. कॉलेजमधले वर्गमित्र तर होतेच, पण तिथेही मी अनेक प्रसंगी स्वतःहून त्यांच्याशी बोलायला गेलो म्हणून आधी जी नुसती ऑनलाईन ओळख होती तिचं रूपांतर मैत्रीत व्हायला लागलं. पूर्वी मी जिच्याशी फक्त चॅटवर ओळख आहे अशा एका वर्गमैत्रिणीची लेक्चरनंतर तिच्याबरोबर आणि तिच्या मैत्रिणीबरोबर जेवायला जाण्याचा प्रस्ताव ऐकून काचकूच केली असती (हो, ‘वर्गमैत्रीण’ हा गट माझ्या एकूणच social circle चा ९०% हिस्सा झाल्यानंतरही). पण त्या दिवशी अगदी अडीच-तीन तास मनसोक्त गप्पा मारून आम्ही शेवटी चिडवाचिडवीच्या पातळीवर आलो. होस्टेलवरही एक मुलगी पुण्याची, आणि त्यातूनही फर्ग्युसनची आहे म्हटल्यावर आमची मैत्री लगेच झाली, आणि तिच्या होस्टेलवरच्या गँगमध्ये मी फक्त एका ‘हाय’ च्या जोरावर सामील झालो. माझी आणखी एक tendency म्हणजे कोणाबरोबरतरी मैत्रीची एक पातळी गाठली, किंवा एक ग्रुप निर्माण झाला, की मला तेच धरून ठेवायची फार इच्छा असायची. म्हणजे काहीही करायचं म्हटलं की त्यांना विचारायचं, आणि कधीकधी तर ते सगळे नाही म्हणाले ते आपणही ते करायचं नाही असं. सुदैवाने पुण्यातल्या माझ्या ग्रुपलाही या ‘ग्रुप’ प्रकरणाचं असंच आकर्षण होतं, आणि त्यामुळेच आमच्या वाटा आता पार वेगळ्या दिशांना गेलेल्या असल्या तरी आम्ही अजूनही रोजचा दिवस एकमेकांसोबत share करतो. असा एखादा काँक्रीट ग्रुप जितका हवाहवासा वाटतो, तितकीच अशी प्रासंगिक मैत्रीही वाटू शकते याचा अनुभव मी इथे घेतला. होस्टेलवरच्या त्या गँगमध्ये आम्ही फक्त दोनदा सगळे एकत्र जमलो, आणि एकदाच सिंगापूरच्या ‘Gardens By The Bay’ ला जाऊन आलो. त्यानंतर ग्रुपवर शुकशुकाट. आणि हल्ली तर इंटर्नशिपमुळे मी होस्टेलवर खूपच कमी वेळ असतो, तरी काल माझ्या लॉंड्री कार्डात पैसे नव्हते म्हणून मी यांच्यापैकी एकाला विचारलं, आणि त्याने आनंदाने त्याचं कार्ड मला वापरायला दिलं. मी त्याला वापरलेले पैसे transfer केले. रात्री जेवायला आम्ही एकाच वेळी बाहेर पडलो तरी तो दुसऱ्या एका मित्रासोबत आला होता आणि मी वेगळ्या टेबलाशी बसलो. तसाच त्यांच्यासोबतही बसू शकलो असतो, कारण ओळख व्हायला असा कितीसा वेळ लागतो? कॉलेजच्या वर्गमित्रांचेही असेच पुष्कळ अनुभव आले. एखाद्या दिवशी एकत्र जेवायला भेटायचं, तेव्हा अगदी जिवाभावाच्या सख्यांप्रमाणे गप्पा मारायच्या, त्यानंतर बरेच दिवस WhatsApp शांत. हे नुसतं ठीकच नाही, तर नॉर्मल देखील आहे, आणि या शांततेचा अर्थ मी हाक मारली तर मला प्रतिसाद मिळणार नाही असा घ्यायचा नसतो हे सगळं मला शिकायला मिळालं. आत्ता इंटर्नशिप चालू असल्यामुळे नव्याने निर्माण झालेला ऑफिसमधला ग्रुप तुलनेने बऱ्यापैकी कॉंक्रिट आहे, पण मी मधल्या काळात अशी ‘तेवढ्यापुरती मैत्री’ करायला शिकलो असल्याने आज ऑफिसचा सगळा ग्रुप जमतो तेव्हा खूप मजा येते, पण नाही जमू शकला तरी काहीच वाटत नाही. त्यामुळे सिंगापूरमध्ये येऊन जवळपास तीन महिने झाल्यांनतरही, ‘हक्काचं माणूस’ या सदरात मी एकटाच आहे, पण आज मी एकांतात घालवत असलेला प्रत्येक क्षण हा मी स्वेच्छेने एकांतात घालवतोय, ही जाणीव मला खूप समाधान देते.
सिंगापूरला येण्याआधी मी बरेच महिने घालवले होते ते मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात याच टप्प्याला घाबरण्यात. अगदी घरच्यांपासून सगळ्यांशी दिवसातून एकदाच, कधीकधी तेही नाही असा संपर्क; आजूबाजूचं सगळं अनोळखी वातावरण, त्यामुळे पुण्यात मी लावलेल्या सवयी पार बदलायची गरज निर्माण झालेली; पावलापावलावर नवा खर्च, तोही exchange rates मुळे आणखीनच बोचणारा; आणि असं पुष्कळ काही. या सगळ्या तरी मोठ्या गोष्टी झाल्या. माझ्यासारख्या ‘बदल पाहावा करून’ या विधानांकडे आठ्या घालून बघणाऱ्या व्यक्तीसाठी अगदी नव्या फरशीचा नवा स्पर्श हाही नकोसा वाटू शकतो. मला तेव्हा सगळ्यात जास्त भीती होती ती इथे आल्यावर हे असलेच सगळे विचार मला भेडसावून मला इथली मजाच घेऊ देणार नाहीत याची होती. प्रत्यक्षात तसं काहीही झालं नाही. माझ्या नेहमीच्या प्रवृत्तीशी अगदी विसंगत अशी गोष्ट म्हणजे मी इथे आल्यापासून मी पुण्याला कसं आणि कुठेकुठे मिस करतोय याचा एकदाही विचार केला नाही. कदाचित नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात त्या सुरुवातीच्या काही दिवसांत माझ्या मेंदूची इतकी ऊर्जा खर्ची पडत होती की त्यात मध्येच चुकून डोकावणारा ‘घरी कसं वेगळं होतं’ असा एखादा विचार सरळ केरात टाकला जात असावा. आणि आता इथे एक छान दिनक्रम बसला आहे आणि मेंदूलाही पुष्कळ आराम मिळतोय, तरी आता हे इथलं जगणं सवयीचं झाल्यामुळे homesickness तसा पुष्कळच कमी झाला आहे. कधीकधी पुण्यात माझी माणसं काय करतायत ते पाहून आपणही तिथे असायला हवं होतं असं वाटतं आणि तो पुन्हा उफाळून येतो, पण मग मी इथे काय करतोय त्याची लवकरच पुन्हा जाणीव होते आणि ‘खरंतर हेवा त्यांना माझा वाटला पाहिजे’ असं वाटून जातं आणि मी परत आनंदी होतो. आणि खरंच, इथला प्रत्येक दिवस अनेक आणि खूप अनपेक्षित प्रकारे विलक्षण असतो.
मी सिंगापूरला राहताना काय करत असेन अशा खूप कल्पना पुण्यात असताना रंगवल्या होत्या. तेव्हा मला वाटायचं की मी जरा मोकळा वेळ मिळाला की मरिना बे सँड्सकडे धावत असेन. पण इथे आल्यानंतर, त्या पहिल्या भेटीनंतर मी स्वतःहून कधी पुन्हा तिथे गेलो नाहीये. त्याउलट आता वेळ मिळाला की मी सिंगापूरचे इतर, अपरिचित भाग पायाखालून घालायचा प्रयत्न करतो. बाकी बऱ्याचदा बसमधून जाताना, दुसऱ्याच भागात कामासाठी किंवा इतर कशासाठी फिरताना, लांबवर ती नजरेस पडते, आणि तेवढं पुरतं. ती तिच्या जागी आहे, मी माझ्या जागी आहे, एवढं पुरतं.
आदित्य,तुझी लेखनशैली - फारच छान! तू ना एक छान लेखकही होऊ शकतोस.तू केलेलं होस्टेलचं वर्णन, सामानाची आवराआवर -- उभयपक्षी स्वीकार** तिथली वाहनं,सायकली, रस्त्यांवरच्या पाट्या, सर्वत्र पसरलेली प्रचंड हिरवी झाडी,
ReplyDeleteतेथील सिंगापूरियन्सचा स्वभाव,भाषा हे सगळं वर्णन अप्रतिम!
नंतर तुझं वाक्य " प्रत्येक क्षण मी स्वेच्छेने एकांतात घालवतो आहे" ह्याचा- तू एकांतात असतोस तेव्हा कितीतरी विविध मुद्द्यांवर वेगवेगळ्या प्रकारे विचार करत असशीलच.कारण- नवसर्जनाला स्वस्थता एकांत फारच पूरक ठरतो.
आणि शेवटचा परिच्छेद तर- व्वा!
खूप छान लिहिलंय.केवळ छान नाही..सगळा प्रवास खूप नीट मांडलाय.एकाच वेळी किती पातळ्यांवर मनात कितीतरी गोष्टी सुरू असतात..!ऍडजस्ट होणं ही गोष्ट किती पातळ्यांवर घडते आणि मग आपण तसे नसतो जसे त्यापूर्वी होतो.हे तुझ्या ह्या लेखाच्या निमित्ताने सार्वत्रिक आहे हे ठळकपणे जाणवलं.खूप सेन्सिटिव्ह आणि सेन्सिबल आहे हे👌👌👌
ReplyDeleteछान लिहिले आहे.
ReplyDeleteसुंदर लिहिलं आहेस! तू मजा घेतो आहेस आणि करतो आहेस याने अजूनच छान वाटलं.
ReplyDeleteसुंदर! ♥️
ReplyDeleteतुझं सगळंच लिखाण मला खूपच आवडलं आहे... भारी लिहितोस..!!
ReplyDeleteमस्तच! काही काही वाक्यं फारच आवडली .उदा- आपल्या बाजूला इतकी माणसं असतात पण त्यातलं आपलं कोणीच नसतं. अशीच दोन तीन आहेत. ती नंतर कळवते. सध्या एवढंच!
ReplyDeleteमस्त लिहिलंयस. सहज आणि प्रांजळ
ReplyDelete