बोधीवृक्षाखाली

  मी सिंगापूरला येऊन आता सहा महिन्यांहून जास्त काळ झाला. नव्या आयुष्याशी जुळवून घेताना कशाकशाला सामोरं जावं लागतंय हा प्रश्न मला पुण्यातून बऱ्याचदा विचारला जातो. तशी माझी इंटर्नशिप आहे, हॉस्टेल लाईफ आहे, एकट्याने पार पाडल्याच पाहिजेत अशा अनेक जबाबदाऱ्या आहेत, पण या सगळ्या गोष्टींची सवय व्हायला दोनतीन आठवडे पुरले, आणि मग एकदा त्या सगळ्या गोष्टी एका ठरलेल्या दिनक्रमात आपापल्या जागी जाऊन बसल्या की त्यांचा सतत मनात विचार येणंही थांबतं. मुस्तफा सेंटर या इथल्या महाकाय सुपरमार्केटमध्ये मी केलेल्या पहिल्या मोठ्या खरेदीची गोष्ट मी पुण्यात सगळीकडे मला इंटर्नशिप मिळाल्याच्या बातमीपेक्षा जास्त चवीने सांगितली होती. काल मी अगदी एका सराईतासारखा एका दारातून आत शिरून, योग्य क्रमाने सगळ्या गोष्टी उचलून, माझ्या ठरलेल्या काउंटरपाशी पैसे देऊन दुसऱ्या दारातून बाहेर पडलो, तोपर्यंत मी आत जाताना ऐकायला सुरु केलेलं गाणंही संपलं नव्हतं. मी गमतीने स्वतःलाच म्हणालो, की मी सहा महिने सिंगापूरमध्ये काढलेत याचा याहून चांगला पुरावा काय असू शकेल? माझा ‘ठरलेला काउंटर’!

        अशा खूप गोष्टी आता ठरलेल्या आहेत. माझा ठरलेला नाश्ता, ठरलेली मेट्रो, ठरलेलं दुपारचं जेवण, ठरलेली बस, आणि रात्री खोलीतच फरशीवर सगळे जिन्नस मांडून माझ्या गुणाच्या इलेक्ट्रिक कढईत केलेली ठरलेली खिचडी. अर्थात, यातल्या खाण्यापिण्याच्या गोष्टींबद्दल मी रोजच्या पातळीवर जरा वैविध्य साधत असलो, तरी तेही एका ठरलेल्या यादीतूनच. मी राहतो तो भाग आणि माझ्या कामाचा डाउनटाऊन भाग आता माझ्या इतक्या परिचयाचे झालेले आहेत, की आता माझी मजल इतरांना पत्ता सांगण्यापर्यंत गेलेली आहे. आणि तेवढंच नाही, तर कुठल्या मेट्रोने गेलात तर किती वेळात पोचाल अशी गणितंही मांडून देण्यापर्यंत. मेट्रोचा नकाशा ही एक गोष्ट मी तेरा वर्षांपूर्वी पहिल्यांदा इथे आलो होतो तेव्हाच पाठ करून टाकली होती, आणि तिचा आता मस्त उपयोग होतोय. स्टेशनमध्ये शिरतो तेव्हा हमखास कोणीतरी नकाशासमोर उभं राहून वाद घालताना दिसतंच, आणि मग माझ्या स्वतःच्या सहज संचाराचा खूप तोरा मिरवावासा वाटतो. २०१९ मध्ये एकटाच इथे ट्रिपला आलो होतो तेव्हा मला घरातून ज्या अनेक सूचना मिळाल्या होत्या, त्यापैकी एक ठळक सूचना म्हणजे ‘सराईतांचं अनुकरण करायला जायचं नाही’, आणि सराईत या सदरात गूगल मॅप्सचे इशारे धुडकावून लावणाऱ्यांपासून ते विमानतळावर तासभर आधी पोचणाऱ्यांपर्यंत सगळे येत. आपण सगळ्या पायऱ्या दोनतीनदा तपासूनच करायच्या. आणि त्या ट्रीपमध्ये मी हा सल्ला कसोशीने पाळला होता. तेव्हा स्वतःला असंही सांगितलं होतं, की दम धर. अपना टाईम आएगा. एक दिवस कोणीतरी माझ्याकडे पाहून ‘त्या सराईतासारखं आपण नको बुवा करायला’ असं स्वतःलाच बजावेल. आणि आता तो एक दिवस उरलेला नसून, इथला प्रत्येक दिवस झाला आहे. हे असं सगळं आठवलं की पुढच्या अनेक अनिश्चित गोष्टींची भीती जरा कमी होते; थोडं आतूनच शांत व्हायला होतं. माझं इथलं शिक्षण संपलं की पुढचा प्रवास जेव्हा, आणि जिथे, सुरु होईल, तिथे पुन्हा याच सगळ्यातून जावं लागणार आहे. आणि आत्ता मी इथल्या आयुष्याशी जुळवून घ्यायला शिकलोय म्हणून त्या वेळी ते जास्त सोपं होईल असं अजिबात नाही, हेही पटलं आहे. तो बदल घडेल तेव्हा पुन्हा दिवसाला सतरा या दराने अडचणी अंगावर येतील आणि पहिले एकदोन महिने सगळ्या प्लॅन्सचा कचरा होईल. आणि मग त्या प्रवासाचा सहावा महिना उजाडला, की मी असाच काहीतरी लेख लिहून इतरांना ब्रह्मज्ञान ऐकवत असेन. हा विचार मनात आला की एक अत्यंत हवीहवीशी शांतता आणि समाधान घेऊन येतो, आणि केवळ तो बदल येऊ घातलाय म्हणून त्याची भीती वाटणं खूप कमी होतं. 

पण ज्या एका गोष्टीशी जुळवून घेणं सगळ्यात अवघड गेलं, ती म्हणजे अर्थातच एकटेपणा. आणि त्याला अर्थात अनेक अंशी माझा स्वभावही कारणीभूत आहे. तसे इथे काही नवे मित्र मिळाले आहेत, काही अनपेक्षित ओळखी झाल्या आहेत, आणि माझ्या ऑफिसमधली माझी टीम तर माझी इंटर्नशिप संपल्यानंतर मी खूप मिस करेन. पण त्यापलीकडे सगळा मोकळा वेळ कोणासोबत घालवावा अशी मला इच्छाच होत नाही. आत्ता माझ्या आजूबाजूला असेच परदेशी किंवा किमान घर सोडून बाहेर शिक्षण घेणारे खूप जण आहेत. त्यांचे फोटो, stories, किस्से वगैरे सगळं पुष्कळ हेवा वाटण्याजोगं आहे. त्यांचे नवे सोबती, त्यांच्याबरोबर केलेल्या सहली, जागलेल्या रात्री, घेतलेले असंख्य आठवणीत ठेवावेत असे अनुभव हे सगळं पाहून असं कधीकधी वाटून जातं, की हॉस्टेल लाईफ म्हणतात तो सगळा अनुभवच मी गमावतोय का? आणि तेही फक्त मला चार लोकांच्यात मिसळायची हौस नाही म्हणून? पण हे सगळे विचार आठवड्यात येऊन जातात, कधी इतक्या प्रबळपणे जाणवतात की या वीकेंडला जरा हॉस्टेलमध्ये आणि इतर ठिकाणी ओळखी वाढवू, किंवा किमान आहेत त्या मित्रांसोबत तरी वेळ घालवू असे ठराव पास होतात. माझ्या एरवीच्या एकांतवासाची पुण्यालाही खूप काळजी आहे; मला अधूनमधून ‘अरे जरा माणसांमध्ये जा की जरा’ अशा विनंत्या येतात. मग वीकेंड येतो आणि हे सगळं धाब्यावर बसवून मी एकटाच कुठेतरी फिरून येतो नाहीतर खोलीतच बसून काहीतरी बघत किंवा वाचत बसतो. 

आता हे खरंच आहे की आपण कितीही स्वावलंबत्वाच्या बाता केल्या तरी आपल्याला माणसांची गरज असते. विशेषतः अनोळखी ठिकाणी एकटेच असताना; मग आपल्याला ते ठिकाण किती का ओळखीचं वाटेना. काही प्रसंग असे येऊन गेलेत ज्यांच्यामुळे माझ्या इथल्या नव्या मैत्रीच्या नात्यांचं महत्त्व मला खूपच प्रकर्षाने जाणवलं आहे. हे सगळं कळतं पण वळत नाही, आणि हळूहळू हे मला बदलावं लागणार आहे हे मी आता स्वीकारलंय. पण नुकताच माझा वाढदिवस होऊन गेला, आणि तो मी घरापासून इतक्या लांब घालवलेला पहिलाच वाढदिवस ठरला. मी त्या दिवशी ऑफिसला रजा टाकली आणि दिवसभर मला जे हवं तेच करायचं असं ठरवलं. रजा नामंजूर होण्याचा प्रश्नच नव्हता; उलट ‘तू आला असतास तर आपण पार्टी केली असती’ असं मला माझी टीम म्हणाली. मला अर्थातच खूप छान वाटलं, पण मी म्हणालो की मला जरा स्वतःशी ‘reconnect’ करायला वेळ हवा होता. जरा असे शब्द वापरले की लोकांना लगेच पटतं असा माझा अनुभव आहे, म्हणून. प्रत्यक्षात तसं काहीही करायचा माझा विचार नव्हता. मी आपला माझा एक आवडता सिनेमा बघणार होतो. खाण्यापिण्याचं विशेष वेगळं असं काही ठरवलं नव्हतं, कारण एका अर्थी इथे आल्यापासून सगळंच खाणंपिणं ‘विशेष वेगळंच’ झालेलं होतं, आणि माझा वाढदिवस आहे याने पोटाला काहीही फरक पडत नाही याची जाणीव होती. एवढाच माझा प्लॅन होता, आणि तो मी पुण्याला कळवला तेव्हा माझं आयुष्य उदासीन आहे असलं काहीतरी त्यांना वाटू नये म्हणून ‘रात्री मात्र मरिना बे सँड्स ला जाऊन येईन हो’ असं एक त्याला जोडलं. आणि खरंच मी तसं करणारही होतो. अगदी संध्याकाळचे सहा वाजेपर्यंत तोच बेत होता. पण तेव्हा मी अचानक तो बेत सरळ रद्द करून माझ्या होस्टेलच्या जवळच्या बोटॅनिकल गार्डन्समध्ये गेलो. एका बाकावर बसून माझी आवडती गाणी ऐकत सूर्य बुडताना पाहिला आणि परत आलो. वाढदिवस झाला. 

माझ्या २०१९ च्या ट्रिपवर मी लिहिलेल्या लेखमालिकेतल्या ‘भेटपर्व’ या लेखात मी असं म्हणालो होतो, की सिंगापूर या माझ्या अत्यंत लाडक्या शहराला माझी शाळा घेण्याची खूप हौस आहे. हाही तशातलाच प्रकार! मी त्या रात्री खोलीवर परत आलो तेव्हा असा विचार केला, की मी आत्ताच एका बागेत फिरण्यासाठी एका गगनचुंबी इमारतीला टांग दिली होती. दुबईतल्या सगळ्या आकाशाला भिडणाऱ्या काचेरी कलाकृतींवर एकेकाळी जीव ओवाळून टाकणारा तोच मी का असा मला खरंच प्रश्न पडला. केवळ लांब जाण्याचा कंटाळा आल्यामुळे मी माझ्या आवडीनिवडींशी एकनिष्ठ राहणं थांबवलं होतं, का मुळात मला कधी ते आवडतच नव्हतं, का एकेकाळी आवडायचं तितकं आता आवडत नव्हतं? काही कळेनासं झालं. त्या दिवशी एवढं मात्र कळलं होतं, की मधले एकदोन महिने अजिबात कुठे भटकायला गेलो नसल्यामुळे, मी बोटॅनिकल गार्डन्सना खूप मिस केलं होतं, आणि तेव्हा मी दर रविवारी सकाळी एकदा चक्कर मारायचीच असं ठरवलं. तो एक ठराव पाळलाही गेला. अशाच आणखी एका रविवारी तिथे जाऊन दिवसाची सुरेख सुरुवात केल्यानंतर, आता कुठे उत्तर मिळतंय असं मला वाटलं. 

माझा एकांतवास आहेच, पण अनेक अर्थांनी अज्ञातवासही आहे. या अवाढव्य शहरात माझ्या ज्या मोजक्याच ओळखी आहेत त्यांचाही माझ्याशी असलेला परिचय केवळ काही महिन्यांचा आहे. उलट मला वर्षानुवर्षं ओळखणारे सगळे चार हजार किलोमीटरचा अंतरावर आहेत. कधीकधी ही जाणीव बोचते, पण या परिस्थितीचा एक अनपेक्षित फायदा या घटनेमुळे माझ्या लक्षात आला. सोशल मीडियाच्या तोट्यांवर भाष्य करणाऱ्या एका सुरेख व्हिडिओत त्यांनी समजावून सांगितलेला एक ठळक तोटा असा होता की सोशल मीडिया आपल्याला स्वतःच्याच एका कृत्रिम प्रतिमेच्या प्रेमात पडायला लावते. याचे टोकाचे परिणाम म्हणजे आपण खूप अनुभव फक्त त्यांच्याबद्दल सांगायला भारी वाटेल म्हणून घेत बसतो, आणि मुळात आपल्याला ते आवडतंय का नाही हे स्वतःला विचारत नाही. बराच काळ हे लक्षात ठेवून मी अभिमानाने स्वतःला सोशल मीडियापासून लांब ठेवलं, पण इथे माझ्या असं लक्षात आलं की हा एक मूळ मानवी स्वभावच आहे ज्याला सोशल मीडिया फक्त खतपाणी घालते. अगदी आपल्याला खूप जवळून ओळखणाऱ्या लोकांच्या मनातही आपली एक अपूर्ण प्रतिमाच असते, आणि यात चूक कोणाचीच नसते. कारण इतकंच की आपल्या आयुष्याबद्दलचा ‘raw data’ आपल्या तुलनेत इतर कोणाकडेच, अगदी आपल्या आईवडिलांकडेही नसतो. त्यामुळे त्यांच्या मनातली ही प्रतिमा सगळे data points सामावून घेणाऱ्या एका कोलाजमधून नाही तर काही ठळक एकमेकांशी सहमत असणाऱ्या समीकरणांमधून घडत असते. माझ्या बाबतीतलं एक अत्यंत ठळक समीकरण म्हणजे मी आणि गगनचुंबी इमारती, आणि त्यांच्यावर माझ्याइतका माझ्या जवळच्या कोणाचाच जीव नसल्यामुळे, माझी ही गोष्ट मला सहज वेगळं पाडते, आणि म्हणूनच त्यांच्यासोबत असताना मलाही हीच प्रतिमा नकळत जपावीशी वाटते. कदाचित म्हणूनच माझ्या वाढदिवसाचे बेत सांगताना मी पहिल्यांदा मरिना बे सँड्स सांगून मोकळा झालो, अगदी मलाच ते हवं होतं का नाही हे स्वतःला विचारायच्याही आधी. कारण मला मनासारखं स्वातंत्र्य असताना आणि ती अर्ध्या तासाच्या अंतरावर असताना मी तिला भेट देणं हीच गोष्ट माझ्या प्रतिमेशी सुसंगत होती. आणि मी मघाशी म्हटल्याप्रमाणे, माझा वाढदिवस पुण्याला फार ‘उदासीन’ वाटू नये असा माझा प्रयत्न चालू होता, आणि मी ऑफिसात किंवा मित्रांसोबत एखादी पार्टी करण्याऐवजी मरिना बे सँड्सला गेलो असतो तर मी एकटा आहे तरी आनंदात आहे एवढं पुण्याला नक्की वाटलं असतं. पण या सगळ्यात मला खरंच काय हवं होतं त्याचा विचारच मी करत नव्हतो.  

इथे जणू काही सिंगापूरने माझ्यासमोर सगळे पर्याय ठेवले, आणि असं फक्त तेच करू शकतं. “एका बाजूला तुला हव्या तितक्या गगनचुंबी इमारती आहेत, आणि एका बाजूला तुझं लाडकं बोटॅनिकल गार्डन आहे. तू एक निवडलंस तर का निवडलंस हे विचारायला कोणीच नाहीये. काय करणार आहेस?” आणि मी बोटॅनिकल गार्डन्सला गेलो. मला कायमच निसर्गाचंही खूप आकर्षण आहे, त्यामुळेच पुण्यात मी सतत टेकड्यांवर भटकत असायचो. पण मला गगनचुंबी इमारतीही खूप मनापासून खरंच सुंदर वाटतात; त्यांची चित्रं काढायला, त्यांची वर्णनं करायलाही खूप आवडतं. पण दोन्ही गोष्टींच्या सौंदर्यात महत्त्वाचे फरक आहेत. गगनचुंबी इमारत खूप नेत्रसुख देते, पण निसर्गात तेवढंच फक्त मिळत नाही. निसर्गात असताना सौंदर्य फक्त आपल्या आजूबाजूला नसून आपण स्वतः त्याचा एक भाग आहोत असं वाटत असतं, आणि म्हणूनच तासन् तास निसर्गात फिरायला, झाडांकडे बघत बसायला काहीच वाटत नाही. माझ्या दृष्टीने मला गगनचुंबी इमारतीचं सौंदर्य कायमच आव्हानात्मक वाटत आलंय, कारण तिचा मूळ स्वभावच तसा आहे. गगनचुंबी इमारत ही सर्वार्थाने ‘बघ मी कुठवर पोहोचू शकते’ हे ठसवण्यात गुंतलेली असते. त्यामुळे तिच्याकडे बघताना आपली मान दुखते, टोपी खाली पडते आणि अचंबा आपल्या चेहऱ्यावर लिहिला जातो; या सगळ्या भावना अनुभवायला खूप मजा वाटते. मला कायमच माणसाने स्वतःच्या बुद्धीने घडवलेल्या अविष्कारांचं आकर्षण वाटत आलंय, आणि त्यात जशा कला येतात, विश्वाचे प्रश्न उलगडणारं विज्ञान येतं, तसंच आपली निर्मिती करण्याची आतली उर्मी आणि त्यातलं कौशल्यही येतं. आणि गगनचुंबी इमारत हा त्या अर्थाने खरंच एक डोळे दिपवणारा आविष्कार आहे. पण तिच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यात हा अचंबा हा खूप महत्त्वाचा घटक असल्यामुळे, ती कलाकृती म्हणून आपल्याला फार काळ आपलीशी वाटू शकत नाही. त्यात कायम ती समोर आहे आणि मी तिच्याकडे बघतोय असं द्वैत असतं. माझ्या बाबतीत या नियमाला अर्थातच बुर्ज खलिफा आणि मरिना बे सँड्स असे काही ठळक अपवाद आहेत, पण बहुतांश गगनचुंबी इमारतींच्या बाबतीत हे होतं मात्र नक्की. त्या उलट निसर्गात असताना तो एक वेगळा आहे आणि मी त्याच्याकडे पाहणारा कोणी परका आहे असं कधीच नसतं. आपण एकदा त्यात शिरलो की त्याचा भागच होऊन जातो. आपण आपल्याच कुतुहलामुळे निसर्गापासून तसे लांबच राहून जगत असलो, तरी आपलं कुठेतरी त्याच्याशी अगदी खोलवर नातं आहे हे अशा वेळी जाणवतं. मरिना बे सँड्स म्हटलं की अंगात उत्साह संचारतो, नाचावंसं वाटतं, तिथे असताना खूप समाधान वाटतं, पण खोलीवर परत आल्यावरही किमान उरलेला दिवसभर पुरेल इतकी प्रसन्नता निर्माण करणं मात्र बोटॅनिकल गार्डन्सनाच जमू शकतं. 

आणि हा परिणाम आपल्यावर अगदी सतत घडवत राहण्यात सिंगापूर शहराचा प्रचंड वाटा आहे. या शहराला प्रेमाने ‘Garden City’ म्हणतात ते उगाच नाही; उलट आपलं शहरी infrastructure आणि निसर्ग यांचा एक अत्यंत organic मेळ घडवून आणणं हे सिंगापूरला इतकं सुरेख जमलं आहे की आज इतर बरीच शहरं त्याचं अनुकरण करायच्या प्रयत्नात आहेत. आणि हा खूपच दिलासादायक बदल आहे, कारण अगदी थेट निसर्गाच्या नाही तरी किमान वनस्पतींच्या सान्निध्यात राहणं आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायद्याचं असतं हे सगळ्यांनाच तसं मान्य आहे. तसं गच्च्यांमध्ये, ऑफिसांमध्ये वगैरे कुंड्यात रोपं हा प्रकार बऱ्याच काळापासून प्रचलित आहे, पण सिंगापूरचं यश त्यापेक्षा खूपच वरच्या पातळीचं आहे. एकतर इथल्या सगळ्या मानवी infrastructure मध्ये निसर्ग घरच्यासारखा घुसलाय. एरवी शहराचं विभाजन मुख्य शहर, ज्याला ‘डाउनटाऊन’ म्हणतात, आणि उपनगरं यांच्यात होतं, आणि उपनगरं सहजच तुलनेने खूप हिरवी असतात. सिंगापूरमध्ये हे विभाजन घडवायला तसा वाव नाहीच, कारण एवढंसं ते बेट. पण म्हणून त्यांनी सबंध शहरातच उपनगरीय हिरवळ पसरवली आहे. अगदी मी राहतो त्या आणि त्याला खेटूनच असलेल्या Central Business District या भागांमध्ये पण रस्ते इतके दाट झाडीने माखलेले दिसतात, की आपण सतत एका गावातून दुसऱ्या गावात चाललोय असं वाटतं. मग इतर उपनगरीय भागांची समृद्धी तर काय वर्णावी? आणि इथले पूल, बोगदे, कालवे, सगळे असंख्य वेलींनी नटलेले असतात. हा अर्थातच सगळा शहरीय भाग झाला, पण हे नाव सिंगापूर कमावतं ते त्याच्या अनेक काळजीपूर्वक जपलेल्या बागांमुळे. त्यांना खरंतर बाग म्हणण्यापेक्षा नीट काळजी घेऊन वाढवलेली जंगलंच म्हणलेलं बरं पडेल. आमचं बोटॅनिकल गार्डन्सपण त्यापैकीच एक, आणि मी गेले सहा महिने नियमितपणे तिथे जातोय तरी दर खेपेला मला नवीन काहीतरी सापडतंच इतकं ते राक्षसी आहे. आणि तरी ते खास वनस्पतींसाठी घडवलेलं आहे; या बेटाच्या मध्यभागी आणि उत्तरेला जी जंगलं आहेत त्यांच्या तुलनेत याचा आकार काहीच नाही. हे सगळं पाहून मला खरंच असं म्हणावंसं वाटतं की सिंगापूर एक अभयारण्य आहे, फक्त अभय आहे ते माणसांना! प्रत्यक्ष जंगलात जाऊन राहण्याचं आपलं धाडस होत नाही, आणि शिवाय आपल्याला आपल्या सगळ्या सोयी लागतात, म्हणून निसर्गाच्या हाकेच्या अंतरावर राहून हे सगळं करायचं असेल तर सिंगापूर ती संधी देतं. आणि याच संधीचा लाभ घेण्यासाठी माझ्याकडे अजून किमान दीड वर्ष शिल्लक आहे, याचा खूप आनंद होतोय. 

माझ्या इथल्या एकांतवासात त्यामुळे मला खरंच नव्याने मी सापडलो, आणि माझ्याच आवडीनिवडींचा एका जास्त mature दृष्टिकोनातून नवा परिचय झाला. हे इमारतींचं एक उदाहरण झालं फक्त. आणि मी कितीही माझ्या comfort zone ला धरून ठेवायचा आटापिटा केला, तरी असंच अधूनमधून मला न विचारता सिंगापूर त्याला तडे घालेल हा विश्वासही आहे. अशा सगळ्या अविस्मरणीय अनुभवांनी रविवार भरलेला असला, की सोमवारी सकाळी पाच वाजता उठायला काहीच वाटत नाही.   



Comments

  1. सुंदर! ♥️ And I'm so freaking proud of you! 🥺

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प