निवडुंग

जगात फक्त दोन प्रकारची माणसं असतात. एकाला त्याला जे हवं असतं ते मिळतं, दुसऱ्याला ते मिळत नाही. मिळवणारा तेवढ्यापुरता हसतो, आणि त्याला शक्य असेल, तर गमावणारा “ठीक आहे, उद्या भेटू,” एवढंच म्हणतो. दुसऱ्या दिवशी ही भेट झाली काय किंवा झाली नाही काय; आधी गमावणारा नंतर जिंकला काय किंवा पुन्हा हरला काय, दिवसाच्या शेवटी पुन्हा माणसांचे हेच दोन प्रकार उरतात. 

आपण रोजच्या ज्या जगात वावरतो त्यात हे सूत्र आपल्यापर्यंत सहज पोहोचत नाही. पोहोचलं, तरी ते पुष्कळ नटवलेल्या रूपात पोहोचतं. मूळच्या साध्याच पदार्थावर पुष्कळ साखरपेरणी करून आणल्यासारखं. याचं कारण एवढंच की इथे जे ‘मिळवण्या’बद्दल आपण बोलत आहोत, ते मिळवण्यासाठी त्या दोन व्यक्तींमध्ये काहीतरी घडावं लागतं. आणि हेच कसं घडावं, कसं घडू नये, याचे आणि यासंबंधीचे अगणित नियम आपल्या या जगात सक्रिय असतात आणि ते पाळले जाताहेत की नाही ते तपासणाऱ्या तितक्याच यंत्रणाही कार्यरत असतात. आपलं जग जितकं गुंतागुंतीचं होत जातं तितके हे Rules of Engagement समजायला जास्त कठीण होत जातात, आणि आपण रोजच्या आयुष्यात प्रत्येक वेळी त्यांना खोलवर जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि या सगळ्या नियमांच्या उदात्तीकरणात हरवून जाऊन आपण, त्या सगळ्याच्या मुळाशी हेच सूत्र आहे हे विसरतो. 

मग कुठूनतरी अशी एखादी कलाकृती आपल्यासमोर येते जिला अनुभवल्यानंतर याच सूत्राचं सर्वत्र असलेलं अस्तित्त्व अचानक आपल्याला प्रकर्षाने जाणवतं. माझ्या दृष्टीने अशी कलाकृती म्हणजे मी बऱ्याच वर्षांपूर्वी पहिल्यांदा पाहिलेला एक सिनेमा, जो त्या वयात मला फक्त एक झकास ॲक्शनपट म्हणून खूप आवडला होता. त्यानंतर तो पुन्हा पुन्हा जेव्हा पाहिला, तेव्हा प्रत्येक वेळी मनावर काहीतरी वेगळाच परिणाम घडवून गेला. सुरुवातीला मी खूप रोमांचित होतो. मी मनात ठरवलेल्या नायकाची प्रत्येक प्रसंगात सरशी होतेय का नाही ते पाहण्यात गुंतलेलो होतो, आणि शेवटी तो यशस्वी ठरल्यावर ‘सुखान्त झाला’ असं म्हणून मी टीव्ही बंद केला आणि लगेच दुसऱ्या कशात तरी रमलो. त्यानंतर काही काळाने तो पाहताना, आधी गोष्ट माहित असल्यामुळे माझं पात्रांकडे जास्त लक्ष गेलं आणि माझ्या त्या नायकाच्या प्रतिमेतल्या भेगा मला बोचायला लागल्या. तेव्हा मी तसंही सकाळच्या चहासोबत चमचाभर सात्त्विक संताप घेण्याची सवय असेल अशा वयाचा होतो, त्यामुळे तेव्हा हा सिनेमा मला पचलाच नाही आणि तो पाहिल्यानंतर दोनतीन दिवस मी औदासिन्याने तळमळत होतो. त्यानंतर तो जेव्हा बघितला, तोपर्यंत माझी पाचकशक्ती खूपच सुधारलेली होती, त्यामुळे मला पहिल्यांदाच तो फक्त एक गोष्ट म्हणून, कुठल्याच एका पात्राची बाजू न घेता पाहता आला, आणि मी नव्याने प्रभावित झालो. मधल्या काळात मला अशा कोरड्या, गोष्टीपुरती गोष्ट सांगू पाहणाऱ्या आणि कसलाच संदेश देण्याच्या किंवा समाजप्रबोधन करण्याच्या फंदात अकारण न पडणाऱ्या ‘Unpretentious’ कलाकृतींचं वाटणारं आकर्षण खूपच वाढलं होतं. आपण त्या नीट समजून घ्यायचा प्रयत्न केला की त्यांची भूमिका आणि त्या भूमिकेतून त्यांनी परिस्थितीवर केलेलं भाष्य आपल्याला रुचू शकतं, आणि त्यांचा मुद्दा त्यांनी मला चमच्याने भरवण्याचा प्रयत्न न केल्यामुळे एक समजूतदार प्रेक्षक म्हणून त्या माझा आदरही करतात असं मला वाटतं. आजही माझा आवडता कलाप्रकार हाच आहे आणि त्याच्या दरबारात या सिनेमालाही मानाचं स्थान आहे. 

हा सिनेमा म्हणजे ‘द गुड, द बॅड अँड द अग्ली’. सर्जिओ लिओन दिग्दर्शित, १९६६ साली प्रदर्शित झालेला आणि क्लिंट इस्टवूड, ली व्हॅन क्लीफ आणि इलाय वॉलक यांच्या मुख्य भूमिका असलेला. अमेरिकन यादवी युध्दाच्या दरम्यान पश्चिमेकडच्या राज्यांमध्ये भटकणाऱ्या या तीन माणसांची गोष्ट; रूपरेषा म्हणून सांगायची असल्यास एवढीच: तिघांनाही एका ठिकाणी पुरलेल्या गुप्त धनाची खबर लागते, आणि तिघेही आपापल्या मार्गाने त्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात. या ध्येयप्राप्तीच्या मार्गावर त्यांचा आजूबाजूच्या समाजाशी अनेक प्रकारे संबंध येतो आणि त्यातूनच आपल्यालाही त्या कालखंडाचं एक चित्रण पाहायला मिळतं. या सिनेमाला ‘स्पगेती वेस्टर्न’ या सदरात घालण्यात येतं, जो अमेरिकेतल्या अत्यंत लोकप्रिय ‘वेस्टर्न’चा उपप्रकार आहे. पण फक्त ‘इटालियन लोकांनी बनवलेले वेस्टर्न सिनेमे’ यापलीकडे या उपप्रकाराला स्वतःचं एक स्थान आहे, कारण ते पारंपरिक अमेरिकन वेस्टर्न सिनेमांमध्ये जरा वेगळ्या प्रकारे उठून दिसतात. 

सेटिंग मात्र ठरलेलं: अमेरिकेतली टेक्सास, ॲरिझोना, न्यू मेक्सिको, कोलोराडो, युटाह, वायोमिंग - म्हणजे थोडक्यात अमेरिकेतला वाळवंटाचा प्रदेश - आणि त्यात विखुरलेली असंख्य छोटीछोटी खेडी. सोन्याची किंवा इतर खनिजांची मालवाहतूक करणारी एखाददुसरी आगगाडी सोडल्यास घोडे हे प्रवासाचं मुख्य साधन. एकेक खेडं म्हणजे दोन चौकांच्या वर क्वचितच पसरलेलं, त्यात एक बँक, एक पोलीस स्थानक, एक दारूचा पब असे सगळे ठरलेले जिन्नस व्यापार खेळताना खोक्यातून काढून मांडल्यासारखे. चहूबाजूंना शेकडो मैल पसरलेल्या रखरखाटात एकमेकांना धरून राहणारी, अगदी गावच्या विहरीवरही न भांडणारी अगदी साधी माणसं. अशात अधूनमधून काही गुंड प्रवृत्तीच्या टोळ्या गावात घुसणार, पबमध्ये घुसून तिथे नाचणाऱ्या आणि टेबलं पुसणाऱ्या मुलींना छळणार, मग पलीकडच्या इमारतीतून बुटांचा खणखण आवाज करत शेरिफसाहेब येणार. ते आधी त्या टोळीच्या म्होरक्याला जरा समज द्यायचा प्रयत्न करणार, पण तो नसेलच जुमानत तर सरळ द्वंद्वाचं आव्हान देणार. मग पबबाहेरच्या चौकात द्वंद्व बघायला गाव गोळा होणार. शेरीफ आणि म्होरक्या एकमेकांकडे पाठ करून पाचसात पावलं चालणार, मग लगेच वळून एकमेकांच्या नजरेला नजर मिळवत, हळूच एक हात आपल्या कमरेशी बांधलेल्या पट्ट्याकडे सरकवायला सुरुवात करणार. आणि म्होरक्याला त्याची बंदूक हाती लागते न लागते तोच शेरीफ चपळाईने आपली बंदूक काढून चालवणार आणि म्होरक्या मूकपणे जमीनदोस्त होणार. यानंतर उरलेल्या टोळीने काय करायचं ते त्यांच्यावरच सोडून शेरीफ त्या प्रेताकडे एक कटाक्ष टाकून एखादं भारीतलं वाक्य टाकणार. असल्या सगळ्या वाक्यांपैकी “या गावात तसंही आपण दोघं मावूच शकलो नसतो” या वाक्याचा तर लोकप्रियतेचा कडेलोट होऊन अतिवापर झालेला आहे. सत्याचा जय झाला म्हणून ही गोष्ट ऐकणारं बाळ आता झोपू शकतं, पण त्याच्या शेजारच्या तरुणाला हे सगळं खूपच साजूक तुपातलं वाटलं तर सोप्पा उपाय म्हणजे गावच्या शेरीफच्या जागी एक वेगळाच कोणीतरी गूढ तरुण आणायचा. हा तरुण त्या मुलीची छेड काढली जाईपर्यंत काही बोलणार नाही, मग लगेच धावून येईल. पुढचा घटनाक्रम तसाच, फक्त शेवटी तो तिला उद्देशून एक वेगळं वाक्य टाकेल आणि ती लाजेल, किंवा तो फारच ‘कूल’ दिसायचा प्रयत्न करत असेल तर तिने साश्रुनयनांनी मानलेले आभार झटकून काही न बोलता घोड्यावरून बसून निघून जाईल. The Cowboy. मग गोष्ट ऐकणारा तरुण तसंच काहीतरी करून दाखवण्याच्या कल्पना रंगवत, हातात सिगरेट नसली तरी उगाच तोंडातून धूर काढल्यासारखे ओठ हलवत झोपून जाईल. 

या सगळ्यावर आपली प्रतिक्रिया अशीच असेल की, मसाल्यासाठी केवळ आपला भारतच प्रसिद्ध नाही तर! ‘काऊबॉय’ या संकल्पनेचं मूळ स्वरूप म्हणजे डोक्यावर आडवी हॅट आणि कमरेशी गोळ्यांनी भरलेला पट्टा घातलेला, बंदूक चालवण्यात तबरेज असा घोडेस्वार. आणि त्या बंदुकीवर आधारित असलेलं ते द्वंद्व, त्यातला ‘तू चालवतोस का मी’ अशी ताणलेली उत्सुकता, हा सगळा या कलाप्रकाराचा स्थायीभाव आहे. वर सांगितलेल्या गोष्टीत मूळ रूपरेषा हीच ठेवून त्या द्वंद्वाला एक छानसा उदात्त, romantic touch देण्यात आला आहे. त्या घोडेस्वाराची ‘रक्षणकर्ता’ ही प्रतिमा आपल्या मनावर बिंबवण्यात, आणि त्या romantic touch मुळे आपणही असं असावं, असं आयुष्य जगावं अशी इच्छा निर्माण करण्यात कथानक यशस्वी ठरतं. थोडक्यात, हे ‘काउबॉईज’ म्हणजे मागच्या शतकातले आणि खासकरून अमेरिकन वेस्ट या प्रांतातले अव्हेंजर्स! 

या पार्श्वभूमीवर स्पगेती वेस्टर्न सिनेमे, त्यातही खासकरून सर्जिओ लिओनने दिग्दर्शित केलेले सिनेमे उठून दिसतात कारण त्यांच्या कथानकात ते पहिल्यांदा हे romantic वलय नष्ट करतात. त्याच्या अनुपस्थितीत मग त्या सगळ्याच परिस्थितीचं एक तुलनेने खूपच उदासीन, शुष्क आणि अनेक अंशी भीतीदायक रूप आपल्या समोर येतं. सर्जिओ लिओनचे सगळ्यात सुप्रसिद्ध सिनेमे म्हणजे ‘द डॉलर्स ट्रिलॉजी’ मधले तीन; त्यापैकी ‘द गुड, द बॅड अँड द अग्ली’ हा तिसरा आणि सगळ्यात जास्त लोकप्रिय सिनेमा आहे. याला तशी ‘ट्रिलॉजी’ म्हणणं जरा कठीण आहे, कारण एक सलग कथा अशी तीन तुकड्यांत विभागलेली नसून त्या तीन स्वतंत्र कथा आहेत. त्यांच्यातला एक समान धागा म्हणजे नायकाची भूमिका तिन्हीमध्ये क्लिंट इस्टवूडने केली आहे, आणि ती पात्रंही तशी बऱ्यापैकी एकच माणूस असावी असं आपल्याला पटू शकेल अशी आहेत. त्याच्या या तीन पात्रांना जोडणारा आणखी एक दुवा म्हणजे त्याचं नाव कधीच आपल्याला कळत नाही. आणि तो मघाशी केलेल्या वर्णनात अगदी तंतोतंत बसणारा काऊबॉय असला, तरी एक मात्र आपण नाकारू शकत नाही, ते म्हणजे तो हिरो नक्कीच नाहीये. 

तो आहे एक ‘Bounty Hunter’. ‘काऊबॉय’ सारखीच ही त्या प्रांताशी आणि काळाशी पूर्णपणे एकरूप असलेली एक संकल्पना आहे. हा व्यवसाय समजून घेण्यासाठी आपल्याला आधी तिथली कायदा-सुव्यवस्था पद्धत समजून घ्यावी लागेल. आपल्या अपेक्षेप्रमाणेच, आधी सांगितलेल्या गोष्टीत ती जशी ‘सेवेशी तत्पर’ म्हणून आपल्या समोर येते तशी अजिबातच नसून, त्यापेक्षा खूप जास्त वास्तववादी असते. गावाला शेरीफ असतो की. पण त्याच्या त्या एवढ्याशा स्टेशनात चार माणसं. एक डाकूंची टोळी आली आणि गाव लुटून गेली तर ते काय लढणार आहेत? मुळात ते लढाऊ तरी आहेत का? प्रशिक्षित असतील, पण तरी एका गावात साधेपणाने राहतायत. गावाबाहेरच्या वैराण जगात अक्षरशः बंदुकीवर पोट घेऊन जगणाऱ्या डाकूंशी दोन हात त्यांना करता येतील? आणि केंद्रीय यंत्रणा? ती बसलीय पूर्वेला कुठेतरी; या प्रदेशाकडे एक नजर टाकायला तिला सवड नाही. तेव्हा शासनाचा मार्ग एकच: या डाकूंच्या नावावर इनाम लावायचं आणि ते मिळवण्यासाठी कोणीतरी त्यांना पकडून घेऊन येईल अशी आशा करत बसायचं. मारूनच आणलं तर आणखी उत्तम. तसंही जिवंत डाकूंना बांधून एवढा प्रवास करून आणणं त्या बिचाऱ्यालाही कष्टाचंच नाही का?

त्यामुळे आपला नायक करत असलेलं काम हे जरी आपल्या पाठ्यपुस्तकातल्या व्याख्येनुसार ‘चांगलं काम’ असलं, तरी त्याचा हेतू काय आहे त्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. त्याला ते इनाम हवंय. जर त्या डाकूने त्यापेक्षा जास्त पैसे देऊ केले, तर तो बाजू बदलेलही. जर फारच हुशार निघाला, तर डाकूने देऊ केलेले पैसे घेईल, मग त्याला मारेल, आणि मग त्याबद्दल इनामही घेईल. थोडक्यात या वाळवंटात नीतिमत्तेला फारसा कुठे वाव नाही, आणि स्वार्थ समोर उभा असताना ती जिंकूच शकत नाही. हे सगळं जाणून आपला नायक हा चोर-दरोडेखोरांचा पाठलाग करून, त्यांना टिपून-टिपून मारतो आणि त्याबद्दल बक्षीस गोळा करत जगतो. आणि या नैतिक मार्गाला धरून राहण्याचं त्याचं कारण एवढंच की कधीही त्याच्या कुठल्याही सावजापेक्षा इनाम देऊ करणारे जास्त श्रीमंत असतील हे त्याला माहित आहे. 

या मुद्द्यावर एवढं बोलण्याचं कारण एवढंच, की या सिनेमात हा माणूस नायक म्हणून आपल्या समोर येतो तेव्हा तिन्ही मुख्य पात्रांपैकी तो ‘गुड’ आहे असं आपल्याला कळतं. हे घडत असताना आपल्या मनात ‘गुड’ या शब्दामुळे त्याच्याबद्दल कुठलीही उदात्त भावना निर्माण होऊ नये अशी खबरदारी दिग्दर्शकाने घेतलेली आहे. या सिनेमात इलाय वॉलकने साकारलेल्या पात्राला आपण ‘अग्ली’ म्हणून ओळखतो; तो एक सामान्य भुरटा चोर असतो. त्या प्रदेशातल्या पाचसहा गावांत त्याच्या नावावर वेगवेगळ्या रकमेची बक्षिसं लावलेली असतात. हे समजल्यावर आपला ‘गुड’ काय करतो? त्याला पकडतो, एका गावात त्याबद्दल बक्षीस घेतो. ‘अग्ली’ला फाशी द्यायची वेळ येते (हो, भुरटा चोरच असला तरी अशा सगळ्यांना बंद करून ठेवण्याची क्षमता कोणापाशी आहे?) तेव्हा शेवटच्या क्षणी कुठूनतरी लांबून, गोळीने दोरखंड कापून त्याची सुटका करतो. मिळालेल्या बक्षिसाचा अर्धा हिस्सा त्याला देतो आणि पुढच्या गावात पुन्हा हेच नाट्य उभारण्यासाठी घेऊन जातो. अशा सगळ्या गावातली बक्षिसं गोळा करून झाली की जाईल घोड्यावर बसून, दुसऱ्या एखाद्या प्रदेशात असाच एखादा ‘व्यवसाय’ उभारण्यासाठी. त्या चोराचं काय? तो पुन्हा चोरी करेलच, आणि त्याला पकडायला कोणीतरी असेलच. थोडक्यात आजूबाजूच्या कोणाचंही थेट नुकसान न करता आपला स्वार्थ त्याला पूर्ण बघता येतो, म्हणून तो ‘गुड’! 

आणि आपल्या लवकरच लक्षात येतं, की त्या प्रदेशात, समाजात, संस्कृतीत ‘गुड’ची ही व्याख्याही हवीहवीशी वाटू शकते. ती का ते समजायला आपल्याला ‘बॅड’ आणि ‘अग्ली’ या इतर दोन मुख्य व्यक्तिरेखांकडे नजर टाकावी लागेल. ली व्हॅन क्लीफने साकारलेली ‘बॅड’ ही व्यक्तिरेखा ‘गुड’ च्या उलट म्हणूनच आपल्यासमोर येते. व्यवसायाने तोही तेच असतो, पण अधूनमधून सुपारी घेण्याचं कामही करत असतो. सिनेमाच्या सुरुवातीलाच त्याला दोन माणसांकडून एकमेकांना मारण्याची सुपारी मिळते, आणि तो दोघांचेही पैसे घेऊन दोघांनाही मारतो, तेही ‘मी दिलेला शब्द मोडत नाही’ हे मारण्याआधी दोघांनाही ऐकवून. थोडक्यात स्वतःच्या स्वार्थासाठी समोरच्या कोणाचंही कितीही नुकसान करण्याची त्याची तयारी असते, म्हणून तो ‘बॅड’. ‘अग्ली’ हा मघाशी म्हटल्याप्रमाणे एक साधा भुरटा चोर असतो, आणि त्याचं असं वर्णन करण्यातला विरोधाभास आपल्याला सिनेमात ठिकठिकाणी जाणवतो. हा चोर मनाला येईल तसं जगतो; त्याला हवं तेच करतो, कसलंही बंधन मानत नाही. ‘कायद्याच्या बाजूने उभं दिसणं’ आणि ‘शब्द न मोडणं’ असे ‘गुड’ आणि ‘बॅड’चे जसे, वरवरचे का होईना, पण नियम आहेत, तसे या चोराचे कसलेच नाहीत. त्याचा बेफिकीर स्वच्छंदीपणा आपल्या तत्त्व, गुण, समाजमान्यता अशा बंधनांत अडकलेल्या जीवाला अस्वस्थ करतो, म्हणून त्याला ‘अग्ली’ म्हणण्यात कुठेतरी आपण सुखावतो. तो कुरूप, कारण कुठल्याही रूपाची त्याला पर्वाच नाही. बाकी दोघांचेही स्वार्थच सर्वश्रेष्ठ असले, तरी कुठल्यातरी वेष्टनात बांधले जाऊ शकतात. ‘गुड’ हा स्वार्थी असूनही समाजाच्या बाजूने. आणि पूर्णपणे ‘बॅड’ असणं हीही एक शान असते. या चोराचं तसं काही नाही. माझ्या मते या सगळ्यातून हेच सुचवलं आहे की ‘स्वार्थीपणा करू नका’ या आपण सगळ्यांनी ऐकलेल्या शिकवणीमागे खरं तर ‘तुमचा स्वार्थीपणा असा उघडा ठेवू नका; त्याला चार माणसांना पटेल असं काहीतरी आवरण तरी द्या’ ही खरी शिकवण दडलेली असते. त्यामुळे या चोराला ‘अग्ली’ म्हणत हा सिनेमा आपल्याला आपल्यातच दडलेला दांभिकपणा दाखवतो. 

स्वार्थाच्या अशा पैलूंचं दर्शन आपल्याला या तीन व्यक्तिरेखांच्या वागण्यातून जसं होतं, तसंच त्यांच्या आजूबाजूच्या समाजाच्या एकूणच स्वभावाकडे पाहतानाही होतं. हा सगळा प्रदेश म्हणजे ‘मानवी समाज’ नावाच्या डोंगराच्या टकमक टोकावरच कसरत करत उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. एवढासा धक्का लागूनही तो कोसळेल आणि मग त्याच्यात आणि जनावरांच्या कळपात काहीच फरक उरणार नाही. तसं बघायला गेलं, तर मानवी समाजाने स्वतःला वन्य प्राण्यांपेक्षा वेगळं समजण्याचं मूळ कारणच आपल्या सगळ्यांचा माणुसकीसारख्या काही अमूर्त संकल्पनांवर असलेला सामूहिक विश्वास हेच आहे. त्याचबरोबर, नुसता नैसर्गिक स्वार्थ आणि हव्यास यांच्यातला फरकही हा सिनेमा आपल्या लक्षात आणून देतो. ट्रिलॉजीतला दुसरा भाग, ‘फॉर या फ्यू डॉलर्स मोअर’ हा सिनेमा, त्याच्या नावातूनच हे अधोरेखित करतो. खरंतर हे दोन्ही सिनेमे बघितल्यावर हे नाव आपल्या तिसऱ्या भागालाच जास्त शोभून दिसतं असं मला वाटलं होतं. या दुसऱ्या भागात ली व्हॅन क्लीफने साकारलेलं पात्र आपल्या नायकासोबत एका चोरांच्या टोळीच्या मागावर असतं, पण असं करण्यामागचा त्याचा हेतू त्या टोळीच्या म्होरक्याने पूर्वी त्याच्या बहिणीवर केलेल्या बलात्काराचा सूड उगवणं हा असतो. म्हणूनच शेवटी सगळ्यांना मारून झाल्यावर तो बक्षिसाच्या रकमेत वाटा न मागता निघून जातो, आणि यामुळे त्या कथानकाला एक भावनिक रंग चढतो. ‘द गुड, द बॅड अँड द अग्ली’ मध्ये मात्र सगळ्या मुख्य पात्रांचा शुद्ध हेतू ‘जास्त डॉलर्स’ एवढाच असतो, आणि विशेष म्हणजे ‘कशासाठी’ या प्रश्नाला उत्तर देण्यातही कोणाला रस नसतो. जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात ‘जास्त डॉलर्स’ हवे असतात, तेव्हा बहुतेकवेळा कुठलीतरी भौतिक भूक पूर्ण करण्याचं साधन म्हणून आपण त्यांच्याकडे बघत असतो. जास्त डॉलर्स म्हणजे जास्त मोठा बंगला, जास्त मोठी गाडी, किंवा जास्त लोकांना मदत (कारण उपयोगी पडण्याचं समाधानही आपल्या स्वार्थाचा एक स्रोत असतंच की) असं काहीही. पण इथल्या वाळवंटात कोण ही स्वप्नं रंगवत असेल? आपण गर्भश्रीमंत असलो तरी उद्या याच खानावळीत येऊन हेच मटण खायचं आहे आणि याच लोकांसोबत संध्याकाळी हाच पाईप ओढायचा आहे. मुळात जी परिस्थिती एका मर्यादेपलीकडे बदलूच शकत नाही, तिथे दोन हजार डॉलर्स हातात असले काय किंवा दोन लाख असले काय? शिवाय सगळी समाजव्यवस्थाच एवढी मोडकळीला आलेली, त्यात फार पुढचा विचार करून तरी काय करायचंय? हे समजल्यावर ते धन मिळवण्याचा या तीन माणसांचा आटापिटा आपल्याला गोंधळात टाकतो. अशा प्रकारे समजूतदार, rational स्वार्थ आणि असा अविचारी हव्यास यांच्यातला फरक स्पष्ट करून हा सिनेमा आपण दोष नक्की कशाला दिला पाहिजे ते सहज पटवून देतो. 

अशा प्रकारे अखेर जेव्हा याच अविचारी हव्यासाचा विजय होतो, तो प्रसंग सिनेमात खूपच सुंदर प्रकारे रंगवलेला आहे. अकस्मात तो आपल्या समोर येतो. धन पुरलेलं असतं एका स्मशानभूमीत, आणि कुठूनतरी पळत येणारा ‘अग्ली’ असाच अचानक त्यातल्या एका थडग्याला धडकतो. त्यानंतरची चारपाच मिनिटं त्याला फक्त त्या स्मशानभूमीत वेड लागल्यासारखं इकडेतिकडे पळताना दाखवलं आहे. सद्सद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून एखाद्या गोष्टीचा एवढा पिसाटल्यासारखा पिच्छा केल्यानंतर, ती अचानक हाताशी येते तेव्हाची प्रतिक्रियाही तितक्याच रानटीपणे, धरण फोडून उधळणाऱ्या नदीसारखी खळखळून बाहेर पडते. या सिनेमातल्या पार्श्वसंगीताचं, विशेषतः शेवटच्या प्रसंगातल्या संगीताचं स्वतंत्रपणे खूप कौतुक होतं, पण मला व्यक्तिशः या प्रसंगातलं पार्श्वसंगीत जास्त भिडलं. आपला चोर थडग्याला धडकतो त्या क्षणी पडलेल्या पहिल्या ठोक्यापासून ते संगीत हळूहळू वेग पकडत जातं, नवनवीन वाद्यं आणत राहतं आणि लवकरच एक पूर्णपणे बेभान असं रूप धारण करतं. एका टप्प्यावर तर ते संगीत कमी आणि सुरांचा नुसता वेडा गोंगाट आहे असंच आपल्याला वाटतं, आणि माझ्या मते हे त्या क्षणाची भावना किती रांगडी, बेधुंद आहे हेच आपल्या मनावर ठसवत राहतं. ते ऐकताना आपल्याच छातीची धडधड आपोआप वाढते, आणि आपण अगदी कष्टाने तोपर्यंत यांच्यापैकी कोणाच्याच यशासाठी cheer केलं नसेल, त्या चोराबद्दल आपल्या मनात फक्त घृणाच जरी असेल, तरी तेवढ्यापुरतं आपण त्याच्या वावटळी उत्साहात भिरकावले जातो. 

यानंतर त्याला आणि आपल्याला पुन्हा जमिनीवर आणण्यासाठी सुरु होतो, तो या सिनेमातला सगळ्यात डोक्यावर घेतला गेलेला अंतिम प्रसंग. या सगळ्या शोधमोहिमेत ‘गुड’ आणि ‘अग्ली’ एकत्र काम करत असतात आणि ‘बॅड’ आपल्याच मार्गाने जात असतो. या प्रसंगात, स्मशानभूमीच्या मध्यभागी तिघे अखेर भेटतात, आणि धन पुरलेलं थडगं नेमकं कुठलं आहे ते ‘गुड’लाच माहित असतं. ते एकदा दगडावर लिहून तो मध्यभागी ठेवतो, आणि मग तिघेही निशःब्दपणे एकमेकांकडे बघत उलट्या पावली चालू लागतात, कारण त्यानंतर काय घडणार आहे ते तिघांनाही माहित असतं. तीन तास चालू असलेल्या एका शर्यतीचा शेवट असा इथे होतो, आणि मला हा प्रसंग खूप आवडण्याचं कारण म्हणजे तोपर्यंत घडलेलं सगळं या एका क्षणात सहज विरघळून जातं. तोपर्यंतच्या कथेत या तिघांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनेकवेळा प्रयत्न केलेला असतो. त्यानंतर एकत्र येण्याची तयारीही दाखवलेली असते. ‘गुड’ आणि ‘अग्ली’ यांची सुरुवातीला जरा चकमक झाली असली तरी बहुतांश प्रवासात ते अगदी सहकाऱ्यांसारखेच वागलेले असतात. त्यांच्या या सगळ्या इतिहासाचं, त्यांच्या प्रवासामुळे त्या प्रदेशावर झालेल्या चांगल्यावाईट परिणामांचं, कशाचंच महत्त्व या क्षणी उरत नाही. सगळ्या दिव्यातून पार पडल्यानंतर अखेर उरतं एकच: बंदूक तू चालवतोस का मी. 

यानंतर जे द्वंद्व होतं त्याचा शेवट, आणि त्यानंतर ते धन सापडणं वगैरे प्रसंग गोष्टीत गुंतून पडलेल्या प्रेक्षकाला समाधानी करण्यासाठी आहेत, आणि तसं करण्यात ते यशस्वी होतील अशाच प्रकारे ते हाताळलेही आहेत. पण माझ्या लेखी तिन्ही पात्रं एकमेकांना भिडतात तिथेच जे सांगायचा हा सिनेमा एवढा वेळ प्रयत्न करत असतो ते तो सांगून मोकळा होतो. माणसांचे प्रकार दोनच: मिळवणारा आणि गमावणारा. मग ‘गुड’ कोण, ‘बॅड’ कोण आणि ‘अग्ली’ कोण, या प्रश्नाचा संबंध येतोच कुठे?       

Comments

  1. आदित्य,एका इंग्लिश सिनेमाचं परीक्षण तू खूपच छान केले आहेस.तुझ्या लेखनातील मला आवडलेली वाक्ये जी मला फार नवीन वाटली. सकाळच्या चहा सोबत " सात्त्विक संताप" घेण्याची सवय, औदासिन्याने तळमळणे, पाचकशक्ती की पचनशक्ती सुधारणे, चमच्याने भरवणे,एक समजूतदार प्रेक्षक म्हणून आदर करणे,कलेचा दरबार.
    सुरुवात ज्या विषयाने --मिळवणारा आणि गमावणारा हे माणसांचे दोन प्रकार --- त्याच विषयाने शेवट!
    म्हणजे सगळा लेख आखीव पद्धतीने व विषयाला फाटे न फोडता लिहीला आहेस. खूपच छान!
    असेच लेख वाचायला मिळोत ही सदिच्छा आणि मिळतील ही खात्री आहे!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प