चगमनेर ७
“हं, आत्ताच नको हे काही मांडत बसूस, लवकरच आवरावं लागेल पुन्हा,” आजी हॉलमध्ये येत म्हणते. दुपारच्या जेवणानंतर काही तास गेलेले असतात आणि मी माझ्या सोबत आणलेल्या सगळ्या गाड्या फरशीवर एका नीट ओळीत मांडून ठेवत असतो. माझ्या समोर पलंगावर मुक्ता एक पुस्तक घेऊन बसलेली असते; नेमकं कोणी बाहेरचं अचानक आत आलंच तर आमच्यापैकी मोठी ती आहे असा त्यांचा गैरसमज व्हावा म्हणून. मला माझ्या शर्यती करायच्या असतात. बत्तीस गाड्यांपासून सुरुवात करून मग सोळा, आठ, चार आणि दोन अशा क्रमाने. ही कल्पना मी आय.पी.एल वरून उचलली असं मुक्ताचं म्हणणं असतं. मी माझी रचना थांबवून आजीकडे बघतो.
“अरे संध्याकाळी गावात जायचंय ना आपल्याला,” ती म्हणते. “एक दगडी आप्पेपात्र विकत घ्यायचं आहे, तुझ्या मामीला ते पुण्याला न्यायचंय. आणि मुक्ताला एक साडी घ्यायचीय स्वतःसाठी. तर आम्ही असा विचार केला की मस्त गावात फिरू संध्याकाळी, खूप गोष्टी तुम्हाला बघायला आवडतील. हे सगळे लहान असताना आम्ही राहायचो तो वाडा, मारुती मंदिर…”
जर कुठल्यातरी एका मंदिरात जायचंच असेल तर मीही हनुमानाचंच निवडलं असतं. आणि आई लहानपणी राहायची तो वाडा मला पाहायला खूपच आवडणार होता. नुसतं तेवढंच करायचं असतं तर मी लगेच उठून तयार झालो असतो, पण मला खरेदी आवडत नाही.
“तुला कशाला साडी हवीय आत्ता?” खरेदीची यादी पन्नास टक्क्यांनी लहान करावी या हेतूने मी मुक्ताला विचारतो.
“मला मोठं दिसायचंय,” ती पुस्तकातून डोकं वर न काढता म्हणते. कधीकधी तिने इतक्या सहजपणे खरं कारण सांगून टाकलं की पंचाईत होते, कारण मला वादही घालता येत नाही. मोठं दिसायला मलाही खूप आवडतं, पण मोठे पुरुष नेमके लहान पुरुषांसारखेच कपडे घालतात. “तुझ्यासाठीही घेऊ की काहीतरी छान झब्बा वगैरे,” असं मावशीचं ऐकून मी नुसतीच मान हलवतो. पुण्यातल्या घरी माझ्या कपड्यांचा विषय निघाला की माझ्यापुढे हमखास ‘निरिच्छ’ हा कुठलातरी शब्द चिकटतो. बाबांनाच जास्त हौस असते, म्हणून मी त्यांच्या गाडीवर त्यांच्यामागे बसून पुण्यातल्या गावात जातो आणि प्रत्येक दुकानात त्यांनी माझ्यासमोर धरलेल्या पहिल्या गोष्टीला ‘हो’ म्हणतो. तसं एरवी मला संगमनेर काय किंवा पुणं काय, ‘गाव’ या ठिकाणी जायलाच आवडत नाही. नुसत्याच चार मुलं एकच वही वापरत असल्यासारख्या रेघोट्या असतात तशा असंख्य गल्ल्या आणि बोळ. गल्ल्यांचं माझं काही वाकडं नसतं, पण मोठ्या रस्त्यावरून चार गाड्या जाव्यात आणि गल्लीतून एक गाडी जावी, म्हणून गल्लीतून जेव्हा चार गाड्या जातात तेव्हा मला राग येतो.
आज सुदैवाने पण मावशी तिची गाडी घेणार नसते. आम्ही सगळे पुन्हा रिक्षांतून जाणार असतो. फाट्यावर येऊन बराच वेळ उभं राहिलो तरी रिकामी रिक्षा दिसलेली नसते. मग बऱ्याच काळानंतर एक रिकामी रिक्षा येते पण आमच्या आधीच गल्लीच्या दुसऱ्या बाजूला उभ्या असलेल्या दोन बायकांपाशी थांबते. मावशी त्यांच्याकडे बघते तेव्हा त्या हात करायला लागतात.
“करायची का शेअर?” मावशी मला आणि मुक्ताला विचारते. मला आधी ती कल्पना फार आवडत नाही, कारण मागच्या काही वेळा असं घडलेलं असतं तेव्हा त्या काकूंना मी गोड वाटलेलो असतो आणि त्यांनी सगळा वेळ मला प्रश्न विचारण्यात घालवलेला असतो. या काकूंनी पण तसं केलं तर त्यांना एका वेगळ्याच मुलाची गोष्ट सांगावी का असा विचार मी रिक्षापाशी पोहोचेपर्यंत करतो, पण तिथे हा प्रश्नच उरत नाही. कारण रिक्षावाले काका लगेच माझ्याकडे वाकून बघून “वा वा! आता एक काम करूया. या सगळ्या मावश्यांना बसू देत मागे. दादा आणि मी पुढे बसू.” असं म्हणतात. मला खूप म्हणजे खूपच आनंद होतो. आजोबांना काल असं करताना पाहिल्यापासून मलाही हे करायची खूप इच्छा असते. मग मी ऐटीत काकांच्या खांद्यावर हात टाकून पुढच्या सीटवर बसतो आणि मागे वळून बघतो. मावशी हसत असते, तर मुक्ताच्या चेहऱ्यावर तिलाही ‘मावशी’ म्हटल्यामुळे एक भाव आलेला असतो. पण रिक्षा सुरु करायच्या आधी काका तिच्याकडे वळून “बसलात ना ताई नीट?” असं विचारतात त्यामुळे तीही खूश होते. मग मागून येणाऱ्या दुसऱ्या एका रिक्षातल्या काकांना आई आणि आजीपाशी थांबायला खुणेनेच सांगून काका आमची रिक्षा पळवतात.
रिक्षातल्या प्रवासात मावशी बराच वेळ त्या दोन काकूंसोबत गप्पा मारत असते, मुक्ता बाहेर बघत बसलेली असते आणि मी काकांच्या चालवण्याकडे बघत असतो. माझं लक्ष आहे असं पाहून ते अधूनमधून हॉर्न, दिवे वगैरेंची बटणं मला दाबून दाखवतात. पण माझ्या डोळ्यांसमोर रिक्षा पुढून कशी दिसत असेल असं चित्र नाचत असतं. मला कायमच रिक्षाला चेहरा आहे आणि तिचं पुढचं एकटं चाक म्हणजे तिचं लांब नाक आहे असं वाटत असतं, आणि आत्ताही ते काका हँडल फिरवत असताना मला समोरच्याला ही रिक्षा नाक मुरडताना दिसत असेल असं वाटतं. माझं सगळं लक्ष रिक्षाकडे असल्याने तिचा वेग एकदम खूप कमी होतो तेव्हाच ‘आपण गावात पोचलो’ असं कळतं.
तसं अजून ते गावासारखं गाव नसतं. स्टँडच्या थोडं पुढे गेल्यावर लागलेलं एक ‘श्रीराम ड्रायफ्रूट्स’ असं दुकान असतं आणि मावशीला तिथून कायकाय घ्यायचं असतं. ते काम पटकन व्हावं म्हणून असेल, पण आजी आम्हाला दुकानाबाहेरच्या एका कट्ट्यावर बसून जरा बाहेरची गंमत पाहायला सांगते. मला तिथे पाच मिनिटं बसल्यावर लक्षात येतं की ज्या गर्दीची आणि मोठ्या आवाजाची कल्पना मी पुण्यातल्या गावाच्या अनुभवावरून केलेली असते तसं काहीच इथे दिसत नाही. दुकानाबाहेरचा रस्ता गावातल्या गल्ल्यांहून मोठा असतो, पण त्यावरही मोठ्या कारपेक्षा बैलगाड्याच जास्त दिसतात. मागच्याच शालेय वर्षात लाकडाच्या काड्यांपासून काहीतरी बनवायचं असा आर्ट प्रोजेक्ट दिलेला असताना मी बैलगाडीच केलेली असते, कारण खरीखरी बैलगाडी पण लाकडाच्या काड्याच (“ओंडके” - आजी) एकत्र बांधून केलेली असते हे मला माहित असतं, आणि दुसरी कुठलीच मोठी खरी गोष्ट तशी बनवलेली नसते, मग ती तशी का बनवायला सांगावी? हा प्रश्न मी प्रोजेक्ट सबमिट करताना टीचरना विचारणार असतो, पण तेव्हा माझी बैलगाडी कोसळायच्या आत मार्क मिळवून मला पळणं जास्त महत्त्वाचं वाटलेलं असतं. आर्ट खरंच एक उच्छाद असतो.
एखादी मोटरसायकल कधी बैलगाडीच्या मागे अडकलीच तर एकदोनदा हॉर्न वाजवते, आणि बैलांनी वाट दिली तर पुढे जाते, पण नाहीतर पुण्यातल्यासारखी सतत हॉर्न वाजवत बसत नाही. त्यामुळे हॉर्नपेक्षा बैलांच्या घंटांचाच आवाज जास्त येत असतो. आत्ता त्यांच्याकडे बघताना मला अचानक असं वाटतं की गाय आणि बैल माझे सगळ्यात आवडते प्राणी असावेत. बैल खूप वेगात पळू शकतात असं मला बाबांनी एकदा सांगितलेलं असतं, पण मी संगमनेरला कधीच कुठल्याही बैलाला पळताना बघितलेलं नसतं. त्याउलट मी पाहिलेल्या प्रत्येक बैलाच्या चेहऱ्याकडे बघून तो “येतं म्हणून काय झालं, का पळू?” असं म्हणत असेल असं वाटतं. अगदी मोठ्या नाशिक रोडवरचे बैलही या बैलापेक्षा फारतर सदुसष्ठ टक्के जास्त वेगाने चालत असतील. आत्ता या गर्दीत या बैलाने अचानक पळायचं ठरवलं तर काय मजा येईल असा विचार मी करायला लागतो. कधीतरी अगदी जोरात पळणारा बैल बघितलाच पाहिजे बुवा. याच गल्लीच्या दुसऱ्या बाजूला एक गाय बसलेली असते आणि नेहमीप्रमाणेच काहीतरी चावत असते. माझ्या घरी ‘कपिलेने घेतला झोका’ नावाचं एक लहान मुलांचं पुस्तक असतं आणि ते मला अजूनही कधीकधी वाचायला आवडतं. त्यात फक्त झोका घेण्याची इच्छा असलेल्या आणि सायकल चालवता येणाऱ्या गाईची गोष्ट असते. ते पहिल्यांदा वाचल्यापासून मला केव्हाही गाय दिसली की ती ‘सायकल कशी चालवावी’ किंवा ‘झोका कसा बांधावा’ असाच विचार करत असेल असं वाटतं; कारण ती काहीतरी विचार करत असते एवढं नक्की कळतं. मी कधी सलग सहा सेकंद गाईसारखा चेहरा केला तर आजी किंवा मावशी लगेच ‘काय एवढी विश्वाची चिंता करताय’ असं विचारतात. मी अशा वेळी बऱ्याचदा शनीच्या चंद्रांची नावं आठवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि तेव्हा माझी यादी पूर्ण होईपर्यंत त्याने आणखी एखादा चंद्र कुठूनतरी मिळवला असेल का एवढीच खरंतर चिंता असते. तसंही, सायकल चालवायला किती विचार करावा लागतो? त्या गाईच्याही मनात असंच काहीतरी चालू असावं. ती अचानक थेट माझ्याकडे बघते, आणि मला अचानक मोठ्याने “किती आठवले?” असं विचारावंसं वाटतं. पण मग त्यानंतर ती लगेच एका मोटारसायकलकडे बघायला लागते.
“आपण यानंतर आम्ही लहानपणी जिथे राहायचो त्या वाड्यात जाणार आहोत ना,” आई मागून येऊन म्हणते. “तिथे आमच्या अंगणात सारख्या गाई यायच्या.” हे ऐकल्यावर मला लगेच तो वाडा बघायचा असतो, पण पहिल्यांदा आम्हाला कपड्यांच्या दुकानात जायचं असतं. तिथपर्यंत चालत जाताना मी आईला, रोज वेगवेगळ्या गाई यायच्या का एकच गाय परत परत यायची ते विचारतो. याचं उत्तर मुक्तालाही ऐकायचं असतं.
“एकच असेल,” मागून चालणारी मावशी म्हणते. “तुझ्या आईने तिचा गृहपाठ पूर्ण केलाय का नाही ते बघायला येत असेल रोज.” किंवा कदाचित गृहपाठ तपासायलाही येत असेल असं मला वाटतं. मी गृहपाठ करत असताना जर एका गाईने येऊन माझ्याकडे तसं बघितलं असतं तर मी नक्कीच माझं गणित पुन्हा तपासलं असतं.
‘राजेंद्र स्टोअर्स’ नावाच्या कपड्यांच्या दुकानात पाय ठेवल्यावर मी गाईंना विसरतो कारण अचानक आम्हाला बघून दुकानाचे मालकच पुढे येतात. आम्हाला अगदी आनंदाने “या या” असं म्हणत ते दुकानाच्या मागच्या भागातल्या एका मोठ्या गादीकडे नेतात आणि बसवतात. चहा पण विचारतात. आमच्या सगळ्या गटात चहा फक्त मीच पीत असतो, त्यामुळे आई त्यांना हो म्हणते आणि माझ्याकडे वळून “त्यांनी बशी दिली तरी मांजरासारखा पिऊ नकोस,” असं सांगते, जे इथे माझ्या तोंडाच्या उंचीचं टेबल नसल्याने मी तसंही करणार नसतो. ते मालक लगेच खूश होऊन कोणालातरी पाठवतात आणि आम्ही सगळे खाली बसतो.
“हे कसे ओळखतात आपल्याला?” मी हळूच मावशीला विचारतो.
“अरे हे तुझ्या मामाचे मित्र आहेत,” ती सांगते. “त्याची मोठी बहीण म्हणून ते मला ओळखतात. उद्या मुक्ताच्या कोणत्या मित्रमैत्रिणींनी दुकान काढलं तर तुलाही तिथे असंच सगळं मिळेल,”
“ते मी त्यांना याच्याबद्दल काय सांगते त्यावर अवलंबून आहे,” मुक्ता म्हणते. मी शांतपणे चहा प्यायला लागतो.
बऱ्याच वेळानंतर मुक्ताची एक साडी घेऊन होते तोपर्यंत माझे तेवीस चंद्र आठवून झालेले असतात. त्यांनी दाखवलेल्या सगळ्या साड्यांपैकी एकच मुक्ताने माझ्यापुढे धरलेली असते आणि मी फक्त “हिच्यात तू मोठी दिसणार नाहीस,” असं म्हणालेलो असतो. मग मावशी माझ्या झब्ब्याचा विषय काढते आणि आधी पहिला दिसेल तो मला घेऊन टाकायचा असतो, पण मग मला एकाचा रंग आवडत नाही आणि दुसऱ्यावरची नक्षी आवडत नाही आणि तिसऱ्यावरचं दोन्ही आवडतं पण त्याला ‘अस्तर’ का काय ते नसतं म्हणून आई घेऊ देत नाही. तो झब्बा फिकट निळ्या रंगाचा असतो आणि त्यावर चौकोनांची नक्षी असते म्हणून मला तो काचांनी बनलाय असं वाटलेलं असतं. पण त्यानंतर ते आम्हाला एक गडद जांभळ्या रंगाचा दाखवतात, तो सगळ्यांनाच आवडतो. ते झाल्यावर कोणी धोतराचा विषय काढू नये म्हणून मी आधीच मावशीला मला धोतर नको असल्याचं बजावून सांगितलेलं असतं, ते आठवून ती लगेच ‘पायजमे दाखवा,’ असं म्हणते. मला खरंतर पांढऱ्या रंगाचं काहीच आवडत नाही आणि मी त्यावर काहीतरी सांडीन या भीतीने आईलाही आवडत नाही. पण इथे झब्ब्यासोबत तसाच पायजमा चांगला दिसेल असं सगळे म्हणायला लागल्यावर एक पांढरा पायजमा घेतो. त्यानंतर आईला काही पडदे वगैरे बघायचे असतात, तेवढ्या वेळात मुक्ता मला आम्हाला दिसत असलेल्या सगळ्या साड्यांबद्दल सांगायला लागते.
आता फक्त आप्पेपात्रच घ्यायचं उरलेलं असतं, आणि त्यासाठी आम्ही त्या गल्लीतून पुढे चालत ‘कोळपकर गृहवस्तू भांडार’ नावाच्या एका दुकानापाशी येतो. दुकानात आणि आजूबाजूला खूप वेगवेगळी भांडी मांडून ठेवलेली आम्हाला दिसतात, त्यापैकी एक ‘रवी’ आणि ‘सोऱ्या’ या दोनच गोष्टी मला ओळखू येतात. मग मध्येच एक पुरणाचं यंत्रही दिसतं. ते आप्पेपात्र निवडताना आमची लुडबुड होईल असं वाटून मावशी पुन्हा मला आणि मुक्ताला बाहेर घेऊन येते आणि आम्ही त्याच गल्लीत थोडं पुढे चालत निघतो.
“इथली एक गंमत सांगू का तुम्हाला?” मावशी म्हणते. “तू अगदी बाळ होतास ना, तेव्हा तुझी आई एकदा इथून तुला कडेवर घेऊन चालत होती. तर समोरून एक काका आले आणि तुझ्याकडे पाहून ते काय म्हणाले असतील?”
“काय?” मी विचारलं. मावशीच्या चेहऱ्याकडे बघून तिने कुठल्या हेतूने ही गोष्ट काढली असेल ते कळत नव्हतं.
“ते म्हणाले, हा तुमचा मुलगा खूप हुशार आहे. आणि कारण काय सांगितलं माहितीय? की तुझे कान खूप लांब आहेत म्हणून.” मावशीला नेहमीप्रमाणे कौतुक आणि चिडवाचिडवी दोन्ही करायचं होतं.
“हॅरी पॉटरमध्ये बुटक्या गुलामांचे कान लांब असतात,” मुक्ता म्हणते, तर मला ते ऐकून माझ्या आवडत्या ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ मधले लांब कानांचे, लांब पांढऱ्या केसांचे धनुष्यबाण चालवणारे उंच लोक आठवलेले असतात. ते त्या जगातले सगळ्यात हुशार लोक असतात असं बाबांनी मला समजावून सांगितलेलं असतं. लांब कान म्हणजे हुशार हे जर सगळ्यांनाच कळत असेल तर हॅरी पॉटरमध्ये असं का दाखवलं असेल असं मी मुक्ताला विचारतो.
“ते बुटके गुलाम असतात खूप हुशार,” ती मान्य करते. “तू बघ म्हणजे तुला कळेल.”
तोपर्यंत आजी आणि आई ते आप्पेपात्र घेऊन आलेल्या असतात. ते पात्र म्हणजे फक्त एक मोठी गोलाकार दगडी ताटली असते आणि तिच्यात सात गोलाकार खड्डे असतात. एक खड्डा मध्यभागी असतो आणि उरलेले सहा त्याच्या आजूबाजूला असतात, म्हणून मला ते पाहून आधी सूर्यमालेची आठवण येते. पण त्यांनी मधल्या खड्ड्याचा आकार बाकीच्यांएवढाच ठेवलेला होता, त्यामुळे त्यात सूर्य मावूच शकला नसता. मग तो तसाच ठेवून उरलेल्यांमध्ये आप्पे केले, तर ग्रह नुसतेच एका खड्ड्याभोवती फिरतायत असं काहीतरी दिसेल. ही कल्पनाही फार छान नसते, पण ग्रहांएवढ्याच सूर्याच्या कल्पनेपेक्षा जास्त चांगली असते. मी हे सगळं मामीला सांगायचं ठरवतो.
“झाली खरेदी!” आई मला म्हणते. “आता चला वाडा बघायला,”. ऐकून छान वाटतं पण वाटेतल्या कुठल्यातरी दुकानात चालताचलता डोकावून आणखी काहीतरी घेण्याची आठवण यांच्यापैकी कोणाला येऊ नये म्हणून मी मुद्दाम जरा वेगात चालायला लागतो. थोड्या वेळाने समोर एक भलंमोठं देऊळ दिसायला लागतं. हेच मारुतीचं मंदिर, असं मावशी सांगते, आणि त्यात इतर बऱ्याच देवांच्या मूर्त्या असल्याचंही सांगते. का ते माझ्या आधी लक्षात येत नाही, कारण या मंदिरातल्या बाकी सगळ्या देवांची संगमनेरमध्ये इतर ठिकाणी आपापली प्रायव्हेट मंदिरं असतात अशी मला खात्री असते. मग मला हनुमानाची मी ऐकलेली एकेक गोष्ट आठवायला लागते आणि एकदा त्याने त्याची छाती चिरून आतमध्ये राम आणि सीता उभे असल्याचं दाखवलेलं असतं. मग मला वाटतं की कदाचित हे मंदिर हा हनुमानच असेल आणि त्याच्या छातीत म्हणजेच मंदिराच्या आत सगळे देव कायमच असतील, आणि त्या एका प्रसंगी त्याने राम आणि सीता दिसतात तो विशिष्ट कोपराच चिरून दाखवला असेल.
मंदिराच्या बाहेर एक खूप मोठा लाकडी रथ ठेवलेला दिसतो. “या रथाची गोष्ट माहित आहे का तुम्हाला?” आजी विचारते. “दर हनुमान जयंतीला हा रथ बरेच लोक मिळून ओढतात अशी परंपरा आहे. एकदा काय झालं, लोक निघाले रथ ओढायला, आणि इंग्रज म्हणाले, की नाही ओढायचा रथ. ओढलात तर काठीने मारू. मग बऱ्याच बायका पुढे आल्या आणि म्हणाल्या, आम्ही ओढतो. त्यावर काय म्हणायचं ते इंग्रजांना कळलंच नाही. मग बायकांनी ओढला हा रथ या चौकापर्यंत.” शाळेत मागच्याच वर्षी आम्ही इंग्रजांचा भारतातला इतिहास शिकलेला असतो. तो आणि ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ एवढ्या दोनच गोष्टींमुळे मला इंग्रज ऐकून माहित असतात. मग मी तो प्रसंग डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करायला लागलो, पण रथाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात या विचारापाशी मी अडकतो. पण त्या सगळ्या इतिहासात काठ्या खूपदा आलेल्या असतात, त्यामुळे त्यांनी बायकांनाही मारलं असतं असं मला वाटतं. त्या बायका खूपच शूर असाव्यात. ही गोष्ट पण इतिहासात असायला हवी होती असं मला वाटतं. पलीकडच्या रस्त्यावरून थोडं पुढे चालत गेल्यावर आम्ही पुढे दुसऱ्या एका छोट्या देवळापाशी येतो.
“आम्ही लहानपणी या मंदिराच्या आवारात आणि रस्त्यावर खेळायचो,” मावशी सांगते. “हे ज्ञानेश्वरांचं मंदिर आहे.” हे ऐकल्यावर मी आणि मुक्ता एकाच वेळी ‘पण ते कुठे देव होते’ असं काहीतरी म्हणतो, आणि आजी आमच्या प्रश्नाचं उत्तर देते. “आपण देवांची मंदिरं का बांधतो, तर तिथे असताना आपल्याला त्या देवांची आठवण यावी, आणि त्याने आपल्याला बरं वाटावं म्हणून. तसंच ज्ञानेश्वरांची आठवण यावी असं इथल्या लोकांना तेव्हा वाटलं असेल, म्हणून त्यांनी बांधलं असेल.”
“आणि हा आमचा खेरवाडा,” आई त्याच्या विरुद्ध बाजूच्या एका जुन्या दगडी इमारतीकडे बोट दाखवत म्हणते. तो खूपच मोठा दिसत असतो.
“हा सगळा आपलाच होता?”
“नाही, खूप जणं राहायचे इथे,” मावशी सांगते. “तुमच्या सोसायटीत तुम्ही कसे राहता तसेच.”
त्या वाड्याला एक मोठं लाकडी दार असतं आणि त्याच्याखाली उंबरठा असतो, तो पाहून मला पुन्हा त्या गाईची आठवण येते. दार असेल दिवसा कायम उघडं, पण आत येण्यासाठी त्या गाईला अगदी उंबरठा ओलांडून, दोन पायऱ्या उतरून मधल्या मोठ्या अंगणात यावं लागत असेल. एवढं सगळं करावं असं तिला का वाटत असेल असा मी विचार करतो, पण गाईच्या मनातले विचार ओळखणं अवघडच असतं म्हणून सोडून देतो. त्या छोट्या चौकाच्या चारही बाजूंनी मोठे दगडी ओटे असतात आणि त्यांच्यावर मागे उघडी दारं असतात. त्यांच्यापैकी कुठल्या दारात ते राहायचे ते आजी आम्हाला बोट करून दाखवते. आम्ही आत जात नाही, बाहेरूनच सगळं बघून घेतो.
मला ते दार बघताना पुण्यातलं घर आठवतं. तिथे माझ्या दारापासून दोन मीटरच्या अंतरावर माझा सगळ्यात जवळचा मित्र राहत असतो. त्याच्या दोन मजले वर दुसरा एक मित्र असतो आणि तिसरा एक अगदी वरच्या सातव्या मजल्यावर असतो. आणि पलीकडच्या इमारतीतही दोन मित्र असतात. रोज संध्याकाळी खेळायला खाली यायचं म्हणजे आमच्या मजल्यावर आम्ही भेटायचं आणि खाली जाऊन एकतर खूप मोठ्याने हाका मारायच्या, आणि ऐकूच नाही गेल्या तर लिफ्टने बाकीच्या सगळ्या मजल्यांवर जाऊन बाकीच्यांना गोळा करायचं. आम्ही या वाड्यात राहत असतो तर ते सगळे एकाच मजल्यावर अगदी शेजारीच असते, आणि शिवाय कोणीतरी एक त्याच्या घरातून बाहेर मधल्या चौकात आला की बाकीच्या घरांमधून तो दिसेलच, मग हाका मारायची गरजच पडणार नाही. आणि या चौकात खेळण्यात खूप जास्त मजा येत असेल, कारण चारही बाजूंनी दगडी भिंती, मग बॉल किंवा बॅडमिंटनचं फूल बाहेर पडेलच कसं? पुण्यात ते सारखं पलीकडच्या सोसायटीत जाणार, मग कुंपणावरून उडी मारून कोणी ते जाऊन आणायचं यावरून वाद होणार, यातलं काहीच इथे होत नसेल.
त्या लाकडी दारातच उभं राहून मी आतमध्ये पसरलेल्या त्या वाड्याकडे बघत बसतो. डोळे लहान करून बघितलं तर तो बराच खोल जातोय असं वाटतं. दोन्ही बाजूंची छोटी छोटी आतली दारं वाड्याच्या आतल्या भागाकडे वाकतायत असं वाटतं. त्या दारांच्या आत अंधारच दिसत असतो त्यामुळे ती भुयारं असून वेगळ्याच कुठल्यातरी जगात जातायत असं वाटत असतं. आजूबाजूला सगळीकडेच अंधार पडायला लागल्यामुळे हळूहळू मधल्या चौकातला प्रकाशही कमी होत असतो आणि अगदी पलीकडच्या भागातली दारं आणि भिंत यांच्यातला फरकच कळेनासा झालेला असतो. असं वाटतं की रात्र पडली की त्या सगळ्या लहान घरांमध्ये राहणाऱ्या सगळ्यांना बाहेरच्या सगळ्यांपासून लपवायला ती दारं भिंतीचाच भाग होतात आणि आतमध्ये राहणारी माणसं मग आजोबांच्या कपाटात दिसतो तसा कंदील लावून त्या प्रकाशात रात्रीचं जेवायला लागतात आणि कोणाचा होमवर्क राहिला असेल तर त्याच प्रकाशात एकमेकांना चिकटून तो करायला लागतात आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या पूर्ण काळोखात फक्त एकाच लहानशा प्रकाशाच्या वर्तुळाएवढं त्यांचं जग उरलेलं असतं आणि त्याचा बाहेरच्या जगाशी काहीही संबंध नसतो आणि चहूकडे अंधारच असला तरी त्याची भीती वाटत नाही आणि उलट त्याच्यात खूप शांत वाटतं आणि केव्हातरी मग कंदिलाची पणती होते आणि मग मेणबत्ती होते म्हणून प्रकाशाचं वर्तुळ लहान लहान होत जातं आणि त्या लोकांचं जग लहान होत जातं आणि कुठूनतरी एका मोठ्या गोधडीसारखी झोप सगळ्यांवर पसरते आणि मग केव्हातरी भिंतीत पुन्हा दारं तयार होतात आणि सकाळचा प्रकाश आत पसरून सगळ्यांना उठवतो आणि सगळे तोंड धुवत दात घासत बाहेर येतात आणि मधल्या चौकात एक गाय आलेली असते.
“काय चालू आहे डोक्यात?” आजी मला विचारते.
“विश्वाची चिंता,” मी म्हणतो.
आम्ही परत जायला निघतो.
अशीच विश्वाची चिंता करत राहा म्हणजे आम्हाला छान छान वाचल्याचा आनंद मिळत राहील!!
ReplyDeleteखूप भारी रे आदित्य... प्रकाश संत च्या लिखाणाची आठवण झाली..!! असाच लिहीत राहा आणि आम्हाला आनंद देत राहा..!! ❤️
ReplyDelete