ध्रुवांतर


मे २०२३ आणि त्यात कधीतरी होणार असलेली ‘शेवटची परीक्षा’ या गोष्टी आता काही आठवड्यांच्या अंतरावर आहेत. त्या परीक्षेनंतर कॉलेजचा अभ्यासक्रम संपेल, आणि पुन्हा एखादी इंटर्नशिप किंवा थेट नोकरी शोधायला आपण मोकळे अशी परिस्थिती निर्माण होईल. आत्ताच्या क्षणी मे नंतरचं सगळं अनिश्चित आहे. मी इतर कुठेतरी जाणार, का पुण्याला परत जाणार, का सिंगापूरमध्येच राहणार, हे अनिश्चित. मी छोटीशी इंटर्नशिप करणार, का एकदीड वर्षाचा मोठा ट्रेनिंग प्रोग्रॅम करणार, का थेट नोकरीलाच सुरुवात करणार, हे अनिश्चित. आणि एवढे मोठे मैलाचे दगडच जेव्हा अनिश्चित असतात, तेव्हा त्यांना जोडलेल्या असंख्य लहानसहान गोष्टी तरी कुठे ठरवता येतात? त्यांच्याबद्दलचे सकाळच्या चहासोबत केलेले फावल्या वेळचे विचार खूप लवकर हाताबाहेर जाऊन एकाच चक्रात अडकल्यासारखे फिरत बसतात. हे सगळं जाणवायचं कारण हेच की दोनअडीच वर्षांपूर्वी, मास्टर्स सुरु करायच्या आधीचा काही काळ मी अगदी अशाच मनस्थितीत काढला होता. पण मीच मनात दोन्ही प्रसंगांची तुलना करून पाहिल्यावर मला वाटलं की सगळंच काही पूर्वीसारखं नाहीये. किमान एक अत्यंत ठळक बदल घडलेला आहेच. 

हा बदल घडत असल्याची चाहूल मला वाटतं मला, मी मस्तपैकी एक महिन्याभराच्या सुट्टी पुण्यात घालवून नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सिंगापूरला आलो तेव्हाच लागली होती. तेव्हा माझी होस्टेलची खोली माझ्याच ताब्यात असल्याने मी बरंचसं सामान इथे सिंगापूरलाच ठेवून गेलो होतो. एका लहानशा बॅगेत चार कपडे भरून मी अगदी ‘travel light’ या तत्त्वाला अनुसरून पुण्यात उतरलो होतो. पुण्यातल्या त्या महिन्याभरात जेव्हा आठवड्यातून तीनचार वेळा बाहेर पडायची वेळ यायची, तेव्हा मला तेच कपडे पुन्हापुन्हा वापरावे लागायचे आणि नाहीतर बाबांचे घ्यावे लागायचे. सिंगापूरला पहिल्यांदा आल्यावर माझं लॉन्ड्रीचं रुटीन बसेपर्यंत मी हेच करत होतो असं मला तेव्हा अचानक आठवलं. 

पुण्याला जायच्या आधी पुष्कळ स्वप्नरंजन करून झालं होतं, विशेषतः खाण्याबद्दलचं. त्यानुसार ज्या गोष्टी इथे मिळत असल्या तरी ‘समाधानकारक’ वाटत नाहीत त्या सगळ्यांवर पुण्यात असताना ताव मारून झाला. मला माझ्या दुचाकीचीही आठवण आली होती. तिच्यावरून मनसोक्त भटकून झालं. सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत अगदी त्यांनी नम्रतेचा सगळा आव सोडून मला हाकलेपर्यंत वेळ घालवला. त्यातही तो मोकळा वेळ ‘सत्कारणी’ लावायचे संकल्प सोडले होते म्हणून खूप काही लिहायचा आणि वाचायचा बेत केला होता. लिहिणं तर सोडाच, पण एक उचललेलं नवं पुस्तकही संपलं नाही. तसंच अर्धवट टाकून इकडे उडत आलो. एका रविवारच्या ढगाळ सकाळी चांगी विमानतळावर उतरून, त्या एका चेक-इनच्या खांबाने केलेलं स्वागत स्वीकारून, मेट्रोत बसून सरळ खोलीवर परत आलो आणि पलंगावर अंग टाकलं. बॅग आवरायचेही कष्ट न घेता ती पलंगाखाली ढकलून दिली. पलंगावर चादर तशीच होती; बाथरूममध्ये जाण्यापूर्वी वाळत घातलेला एक शर्ट तसाच तिथे लटकत होता. वाळला होता बुवा. एका कपाटात कपडे आणि दुसऱ्या कपाटात काही दीर्घायुषी खाण्यापिण्याच्या गोष्टी असं सगळं तसंच होतं. तुपाला काही होत नाही असं आईने सांगितलेलं असतानाही मी खात्री करायला ती तुपाची लठ्ठ बरणी उघडून बघितली. द्रवाचं घन झालं होतं, पण बाकी काही फरक नव्हता. मी तिला तब्बल महिन्याभराने उघडत होतो याकडे पूर्ण दुर्लक्ष करत ती बरणी जणू मला शांतपणे, “काय मग, आज रात्री करायची का खिचडी?” असं विचारत होती. 

पुण्यात असताना ‘खिचडी’ हा एकमेव प्रकार मी टाळला होता, कारण सिंगापूरमध्ये जवळपास दर आठवड्याचे पाचही दिवस माझं रात्रीचं जेवण तेच असायचं; अजूनही आहे. तसे मी पुण्याहून निघताना बरेच पदार्थ ‘शिकून’ निघालो होतो, पण शेवटी हा एकच पदार्थ ‘जमतोय’ म्हटल्यावर रोजचा झाला. आणि माझ्या लेखी कायमच ‘वैविध्य’ किंवा ‘नावीन्य’ अशा अमूर्त संकल्पनांपेक्षा ‘आज काय करूया’ या प्रश्नाचे उत्तर रोज द्यावे न लागणे ही गोष्ट जास्त महत्त्वाची होती. दिवसभरात इतर प्रश्न काय कमी होते? त्यामुळे त्या रात्री मी शहाण्या मुलासारखी खिचडी केली आणि जेवून, भांडी घासून झोपून गेलो. दुसऱ्याच दिवशी माझ्या नव्या सत्रातलं पहिलं लेक्चर होतं. 

तो दिवस आता आठवताना असं वाटतं, की मला खिचडीचा कंटाळा आला होता म्हणून मी पुण्यात असताना ती खाल्ली नाही असं नसावं. पुण्यातून निघताना आईने मला मुगाच्या डाळीची गोडा मसाला वापरून गॅसवरच्या कुकरमध्ये केलेली खिचडी शिकवली होती, आणि गंमत म्हणजे तसं फारसं कधी घडलंच नाही. सिंगापूरला गोडा मसाला मिळेलच या आश्वासनासह मी इथे उतरलो आणि इथे नेमकी त्याने निराशा केली. हिंग, हळद, तिखट वगैरे सगळं मिळालं, आणि तेही भारतीय ब्रँड्सचंच, कारण इथल्या सगळ्या दाक्षिणात्य भारतीयांसाठी हे सगळंच ‘essential’ या सदरात होतं. पण गोडा मसाला म्हणजे आपली मराठी गोष्ट, हे मला पुण्यात असताना माहित नव्हतं. मी मुस्तफातूनच आईला फोन करून परिस्थितीची कल्पना दिली आणि तिने त्याऐवजी गरम मसाला घ्यायला सांगितला, आणि प्रमाणही बदलून सांगितलं. शिवाय इथे गॅसचा स्टोव्ह हा प्रकारच नसल्याने मी एक इलेक्ट्रिक कढई विकत घेतली; तिला प्रेशर कुकरसारखं वापरता येणार नव्हतं, त्यामुळे त्या प्रक्रियेतही बदल करून झाला. राहिला प्रश्न डाळीचा, आणि इथे मी काहीच कारण नसताना माझ्या ‘कॅल्क्युलसचं गणित पूर्ण बरोबर सोडवून शेवटच्या पायरीत चार गुणिले दोन बरोबर सहा असं लिहून येणे’ या धर्माला जागलो होतो. मुगाच्या डाळीऐवजी तूरडाळ उचलून आणली होती. थोडक्यात, मी सिंगापूरला आल्यावर खिचडी केली, पण माझ्या सवयीची खिचडी केलीच नाही. ती किलोभर तूरडाळ संपेपर्यंत दोन महिने गेले होते आणि तोपर्यंत मला तीच आवडायला लागली होती. पुण्यात आलो तेव्हा गोडा मसाला माझ्या बॅगेत ठेवण्यात आला, पण आत्ताही मी तो संपायची वाट बघतोय, जेणेकरून मला परत गरम मसाला आणता येईल. मी पुण्यात असताना खिचडी खाल्ली नाही कारण मला तोपर्यंत तशी खिचडी आवडेनाशी झाली होती. 

डिसेंबरमध्ये मला ख्रिसमसची चांगली अडीच आठवड्यांची सुट्टी होती, पण तेव्हा अचानक घरच्यांचंच इकडे येण्याचं नक्की झालं. चांगला एक आठवडाभर ते इथे राहणार होते, आणि ते इथे असताना मीही पूर्ण ‘टुरिस्ट मोड’ मध्ये जाऊन त्यांच्याबरोबर माझं हे विलक्षण बेट पुन्हा एकदा नव्याने अनुभवणार होतो. मी मनातून असं ठरवलं होतं, की मला इथल्या माहित झालेल्या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकायचा प्रयत्न करायचा आणि एक प्रवासी म्हणून हे सगळं पुन्हा बघायचा प्रयत्न करायचा. पण माझ्या या निश्चयाला ते इथे उतरल्यापासूनच तडे जायला लागले. एकतर चांगी विमानतळ तोपर्यंत माझ्या इतक्या ओळखीचा झाला होता की ते उतरतील तेव्हा नेमक्या कुठल्या दारातून बाहेर पडतील तेही मला आधीच माहित होतं, आणि त्याच दाराबाहेर मी ते उतरायच्या तासभर आधी जाऊन बसलो होतो. एका काचेच्या भिंतीपलीकडून ते सामान ओढत येताना दिसले तेव्हा मी अगदी योग्य ठिकाणी उभा होतो. ते बाहेर पडले, मिठ्या झाल्या, शेकहँड झाले, आणि माझ्या तोंडून उत्स्फूर्तपणे हे शब्द बाहेर पडले:

“Welcome to Singapore!”

आणि क्षणभर मीच दचकलो. माझ्या मनात आलेला पहिला विचार हा होता की त्यांना माझं हे वाक्य कसं ऐकू आलं असेल? प्रवाशांच्या एकाच गटातली एक व्यक्ती चुकून काही तास ईप्सित स्थळावर आधी पोहोचली तर ती ज्या थाटात अत्यंत नाटकीपणे हे वाक्य उच्चारेल त्याच थाटात मी हे म्हणालो असेन असं मला वाटत होतं. तेव्हाच माझ्या मनातून मी स्वतः हे वाक्य आधी जिथेजिथे ऐकलं होतं ते सगळे प्रसंग येऊन गेले. माझं इमिग्रेशन पूर्ण झाल्यावर विमानतळावरच्या एक बाई मास्कच्या पलीकडून स्मितहास्य करत मला हे म्हणाल्या होत्या. त्या रात्री मी माझ्या क्वारंटाईनसाठी ज्या हॉटेलमध्ये गेलो होतो तिथला स्टाफ मला प्रेमाने स्वीकारत हे म्हणाला होता. ते ‘प्रेमाने’ म्हणत होते हे माझ्या तेव्हा नाही, पण त्यानंतरच्या दहा दिवसांत त्यांनी माझी जी काळजी घेतली ती पाहून कळलं होतं. माझ्या कॉलेजमध्ये पहिल्यांदा पोहोचल्यावर आमचे विद्यार्थी प्रतिनिधी दहा डॉलर भरलेलं मेट्रोचं कार्ड माझ्या हातात ठेवत मला हे म्हणाले होते. हे सगळे प्रसंग माझ्या मनात तेव्हाही ताजे होते, पण ते घडून गेल्याला एक वर्ष होऊन गेलं होतं. त्याच वर्षभरात माझा स्टेटस ‘पाहुणा’ पासून ‘रहिवासी’ कधी झाला ते माझं मलाही कळलं नाही, पण झाला असणार. कारण माझ्या आप्तेष्टांवर मी हे वाक्य फेकल्यावर त्यांनी अजिबात नवल न वाटल्यासारखं हसून ते स्वीकारलं. मग थकून आल्यामुळे फ्रेश कुठे व्हायचं आणि मग काय करायचं ते मला विचारलं. 

“या हॉलच्या दुसऱ्या टोकाला वॉशरूम आहेत आणि इकडे दुसऱ्या बाजूला एक छान कॉफीशॉप आहे, इथे आपल्याला नाश्ता करता येईल आणि मग त्या दिशेने गेलो की आपण एका पुलावरून ज्युएलला पोहोचू आणि तिथे आपल्याला बराच वेळ आरामात काढता येईल, आणि इथेच जेवायचं असेल तर तिथे निवड करायला यापेक्षा खूप जास्त वावही असेल त्यामुळे जरा जास्त पोटभर काही खायचं असेल तर फ्रेश होऊन थेट तिकडेच गेलेलं बरं पण आरामात जाऊ कारण तिथे ट्रॉली नेता येत नाही त्यामुळे बॅगा ओढत न्यायची तयारी झाली की जाऊ,” मी. माझ्यातला ‘टुरिस्ट’ कधीच बेशुद्ध पडला होता. सगळे याच क्रमाने गोष्टी पार पाडायला लागल्यावर मी, माझ्या मेंदूने ही सगळी माहिती कधी आणि कुठून गोळा केली ते आठवायचा प्रयत्न केला, पण जमलं नाही. मग ज्युएल, त्यानंतर मेट्रोची कार्डं विकत घेणे, मग टॅक्सी करणे इथपासून ते त्यांच्या हॉटेलवर पोहोचेपर्यंत, त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर माझ्या तोंडून अशीच भरभरून माहिती सांडत होती. 

रहिवासी असलो तरी रोजच्या आयुष्यात त्या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांना पुन्हापुन्हा जाणं शक्य होत नाही, आणि परवडतही नाही. त्यामुळे त्यानंतर आम्ही ज्या अशा सगळ्या गोष्टींना भेट दिली त्या माझ्याही दृष्टीने अद्भुतच होत्या. काही काही तर मी तेरा वर्षांपूर्वी इथे येऊन गेल्यानंतर पहिल्यांदाच पुन्हा बघत होतो. त्यामुळे तिथे फिरत असताना माझा वासलेला ‘आ’ इतरांच्याइतकाच नैसर्गिक असायचा, पण तरी मी तो इतरांपेक्षा आधी मिटून उरलेला वेळ त्यांच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे खूप खूश होऊन पाहत बसायचो. तसं बघायला गेलं तर ही माझी ना जन्मभूमी होती ना कर्मभूमी (इथेच नोकरी शोधण्याचा विचार मला तेव्हा सुचला नव्हता), पण तरीही तो आठवडाभर माझा एक ‘जाज्वल्य अभिमान’ ओसंडून वाहत होता. आणि मला तो सगळा वेळ बाकीच्यांच्या चेहऱ्यावर प्रत्येक टुरिस्टच्या चेहऱ्यावर दिसतं ते कौतुक तर दिसत होतंच, पण त्याशिवाय एक वेगळाच आपलेपणाही दिसत होता. विशेषतः इथल्या सगळ्या अद्ययावत यंत्रणा आणि उत्कृष्ट सुविधा अनुभवताना, त्या सगळ्या माझ्या सेवेस तत्पर असल्याबद्दलची एक कृतज्ञताही त्यांना वाटत असल्याचं मला जाणवत होतं. माझ्या दृष्टीने मी माझं गाव त्यांना उत्साहाने दाखवत होतो, आणि तेही ‘माझं गाव’च बघत होते. तेव्हा मला असं वाटलं, की काही काळानंतर मी स्वतःही इथे राहत नसेन, पण तरी आमच्या घरातलं कोणीच यानंतर कधीच सिंगापूरकडे फक्त ‘एक ठिकाण’ म्हणून बघणार नाही. एकदा एका ठिकाणी आम्हाला चुकून एक मराठी कुटुंब भेटलं, आणि त्यांनी चौकशी सुरु केल्यावर माझ्या बहिणीने “माझा भाऊ इथेच असतो; आम्ही त्याला भेटायला आलो आहोत,” असं सांगितलं, तो क्षण माझ्यासाठी अनेक अर्थांनी त्या ट्रिपचा सर्वांत आनंददायी क्षण होता. किंबहुना मी असं म्हणेन की या क्षणाची तुलना, मरिना बे सँड्स पहिल्यांदा दिसल्यावर सगळे जे चाट पडले, त्याच क्षणाशी होऊ शकते!

त्यांना इथल्या प्रेक्षणीय स्थळांसोबत माझ्या सगळ्या ‘खास’ जागांनाही भेट द्यायची होती, आणि त्यानुसार ट्रिपच्या बेतात माझं कॉलेज, माझं हॉस्टेल, माझं जुनं ऑफिस अशा गोष्टींची यादी व्हायला लागली होती. त्या यादीत मी आग्रहाने आणखी एक नाव घातलं: बोटॅनिक गार्डन्स. इथे आल्यापासून माझ्या खोलीपासून अक्षरशः पाच मिनिटांवर असलेल्या त्या महाकाय जंगलावर माझा जितका जीव जडला आहे, तितका इतर कुठल्याच गोष्टीवर नाही. अगदी साक्षात मरिना बे सँड्सलाही खिलाडूपणे दुसऱ्या क्रमांकाचं स्थान स्वीकारावं लागलं. सिंगापूरला आल्यानंतरच्या पहिल्या काही दिवसांत अधूनमधून भीतभीत या वाटिकेत पाऊल टाकणारा मी, आता मनातली भीती आणि चिंता शांत करायला तिथे जातो. खूपच कमी वेळात, माझ्या खोलीपेक्षाही जास्त हे बोटॅनिक गार्डन्सच माझं इथलं अधिकृत अभयारण्य बनलं, आणि मला सिंगापूरशी घट्ट बांधून ठेवणाऱ्या दुव्याचं सर्वांत मोठं प्रतीकही. सिंगापूर जेव्हा सोडावं लागेल तेव्हा या एका ठिकाणाला निरोप देताना मला सगळ्यात जास्त भरून येईल, आणि तो क्षण कधी येईल ते माहित नसतानाही आत्ता नुसत्या त्या विचारानेही मला कासावीस व्हायला होतं. नव्या वर्षाच्या सुरुवातीला जे काही संकल्प केले, त्यातला ‘रोज सकाळी बोटॅनिक गार्डन्समध्ये एक चक्कर मारायला जाणे’ हा एक संकल्प न चुकता पाळला गेला आहे.

मी इथे नियमितपणे जायला लागलो त्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यांत मला सारखं पुण्याला video call करून माझ्या या गार्डन्सचं अद्भुत सौंदर्य दाखवावंसं वाटायचं, आणि माझी पहाट म्हणजे पुण्याची मध्यरात्र असल्याने माझ्या या खोडीबद्दल मी पुष्कळदा सगळ्यांची बोलणी खायचो. तेव्हा त्याचं काही वाटत नसे कारण माझ्या दृष्टीने, एवढं कमाल काहीतरी virtually का होईना पण त्यांच्यापर्यंत पोहोचवून मी त्यांनाही त्याची मजा घेऊ देत होतो. पण कालांतराने, बोटॅनिक गार्डन्सचा माझ्या मनाच्या निखळ आनंदावरचा परिणाम हा त्या सगळ्या निसर्गसौंदर्यामुळे नसून मला तिथे असताना कसं वाटतं त्याच्याशी निगडित आहे, हे माझ्या लक्षात आलं. त्यानंतर मी तिथे गेल्यावर video call करणं आपोआपच कमी केलं. माझ्या वर्गात या इथल्या होस्टेलवर मी एकटाच राहत असल्यामुळे, ही जागा ही पहिल्यापासूनच ‘माझी’ आहे आणि सिंगापूरमधल्या माझ्या रोजच्या आयुष्याच्या पलीकडची आहे. ती कालचक्र थांबवते, मनातल्या विचारांच्या वावटळीला शांत करते, येणारा दिवस उत्साहाने जगण्याची प्रेरणा आणि बळ देते, आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे असताना ती मला हट्टाने वर्तमानात जगायला भाग पाडते, आणि हे मी आत्तापर्यंत पाहिलेल्या कुठल्याच ठिकाणाला इतकं सातत्याने करायला जमलेलं नाहीये. ‘बोटॅनिक गार्डन्स’ हे जणू काही माझ्या एका अत्यंत सुखावह मानसिक स्थितीचं नावच आहे, आणि म्हणूनच त्याला एक दिवस खरंच निरोप द्यावा लागला तरी, माझ्या मनात आता त्याचं ‘शांतिदूताचं’ स्थान अढळ आहे, आणि कुठेही गेलो आणि कितीही चिंताक्रांत असलो तरी क्षणभर डोळे मिटून, एक दीर्घ श्वास घेऊन बोटॅनिक गार्डन्स डोळ्यासमोर आणलं, की माझा मेंदू सगळी काळजी विसरून शांतपणे उपाय शोधायच्या कामाला लागेल, ही खात्री आहे. 

मे महिन्यातल्या सत्राचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर मी पुण्याचं तिकीट काढून टाकलं, आणि संध्याकाळी चिंतन करायला मरिना बे सँड्सच्या समोर जाऊन बसलो. पुण्याचं तिकीट काढण्याचा क्षण कायमच खूप जीव भांड्यात पाडणारा असतो, अगदी इथे आपला जीव बागडत असला तरी. त्यामुळे त्या संध्याकाळी मी समाधानी होतो, आणि काही आठवड्यांत मी पुण्याला परत जात असेन असा विचार करत होतो. 

‘परत कसला जातोस?’

सिंगापूरला येऊन क्वारंटाईनमधून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा मरिना बे सँड्सला भेट दिली होती, तेव्हाही तिने अगदी अशीच प्रेमळ थट्टा केली होती. पण तेव्हा त्याचा अर्थ खूप वेगळा होता. तेव्हा सिंगापूरला आलो, एक लहानसं staycation पार पडलं, आणि मनाने परत पुण्याला जायला मी एका पायावर तयार होतो, आणि माझी लाडकी इमारत मला हळूच वास्तवाचं दर्शन घडवत होती. त्या रात्री मी खोलीवर परत आलो तेव्हा मला किमान दीड ते दोन वर्षं असंच राहायचं आहे ही नवी माहिती जरा बोचत होती, आणि या बदललेल्या वास्तवाला स्वीकारणं माझ्या मनाला जरा जड जात होतं. त्या रात्री झोपताना मी ‘हळूहळू होईल इथे राहायची सवय, पण फक्त दीड वर्षाचाच प्रश्न आहे’ असं स्वतःला समजावत होतो. 

तेच दीड वर्ष संपण्याचा क्षण आता जवळ येतोय आणि सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, पुढचं बरंचसं सगळं अनिश्चित आहे. सिंगापूरला येण्याच्या आधी हीच अनिश्चितता मला खूप सतावत होती, कारण मला तेव्हा पुणं सोडवत नव्हतं. माझं तिथलं आयुष्य, तिथले मित्रमैत्रिणी, तिथल्या सगळ्या सवयी सोडवत नव्हत्या. आता तीच अनिश्चितता परत आली असूनही, मी मात्र खूप शांत आहे. मला वाटलं होतं की या टप्प्यावर मी पुण्याची ओढ, सिंगापूर सोडण्याचं दुःख आणि तिसऱ्या एखाद्या ठिकाणी जाण्याची कुतूहलमिश्रित चिंता या सगळ्या भावनांमध्ये अडकलेलो असेन, पण प्रत्यक्षात याच्या अगदी उलट घडतंय. मी जर सिंगापूरलाच राहिलो तर काही प्रश्नच उद्भवत नाही, आणि जर इतर कुठे गेलो तर सुरुवातीला जड जाईल, पण कालांतराने मी त्या ठिकाणालाही सिंगापूरसारखंच आपलंसं करून घेईन, हा विश्वास मला शांत करतोय. पण माझ्या या शांततेचं सगळ्यात मोठं कारण हेच, जे या संध्याकाळी पुन्हा मरिना बे सँड्सने मिस्किलपणे माझ्या लक्षात आणून दिलं. 

मी आता पुण्याला गेलो तरी कधीच ‘परत’ पुण्याला जाऊ शकणार नाही. फार काय, सप्टेंबरमध्ये पुण्यात घालवलेली सुट्टीही तशीच होती. मी तेव्हाही पुण्याला गेलो होतो, पण ‘परत’ गेलो नव्हतो. मी तिथली सुट्टी संपवून सिंगापूरला ‘परत’ आलो होतो. अचानक मी परत आलो तो रविवार, त्यानंतर मी ज्या सहजतेने इथल्या आयुष्यात पुन्हा शिरलो ते, घरच्यांसोबत इथे घालवलेली सुट्टी आणि सिंगापूर या सगळ्या अनुभवाचा माझ्यावरचा कायमस्वरूपी झालेला परिणाम हे सगळं अचानक कोड्याच्या तुकड्यांसारखं एकत्र जोडलं गेलं आणि मला माझं उत्तर मिळालं. मी अगदी उरलेलं आयुष्य पुण्यातच काढलं, तरी मी पुण्याला ‘परत’ गेलो असं मला म्हणता येणार नाही. 

बोटॅनिक गार्डन्स मला जसं शांत करतं, तशीच मरिना बे सँड्स माझ्यात उत्साह भरते. या साक्षात्कारानंतर तिने वर्षभरापूर्वी माझ्या मनात पेरलेल्या विचारलाच पुन्हा जागृत केलं. तो विचार म्हणजे, आता इथून मी कुठेही गेलो, तरी येणारा प्रत्येक अनुभव अगदी नवाच असणार आहे. आणि नवा अनुभव हा किती कमाल असू शकतो ते कधी सांगताच येत नाही. तो अशक्य अद्भुत ठरू शकतो, आपण ती शक्यता फक्त स्वीकारायचा अवकाश. 

“पण कशावरून?” माझा शंकेखोर मेंदू पुन्हा म्हणतोच. मागच्या वर्षी याच प्रश्नाला ती काही उत्तर देऊ शकली नव्हती, पण या खेपेला ती अगदी आत्मविश्वानाने म्हणते, “जरा या गेल्या वर्षभराकडे एक नजर टाक.”

मी तसं करतो, आणि सगळ्या चिंता एकेक करत विरून जातात; फक्त कुतूहल उरतं आणि संपूर्ण मनाला व्यापून टाकतं. माझ्यासाठी यापेक्षा जास्त आनंददायी आणि समाधानकारक मनस्थिती असूच शकत नाही, असा विचार करत मी बराच वेळ समुद्राकडे बघत बसतो.   


Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प