माझे पु.लं.

          काही दिवसांपूर्वीच, सिंगापूरमध्ये काही महिने राहून परत येताना पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. वास्तविक मुंबईला उतारण्याने एकूण प्रवास चार-साडेचार तासांनी अकारण लांबतो हे माहित असूनही मला पुण्याला विमानाने येणे हा विचार फारसा पटलेलाच नव्हता. एकतर मला पुण्याच्या विमानतळाला ‘विमानतळ’ म्हणायलाच कसंतरी होतं. तसा आता तिथे एक मॉल आणि काही सुव्यवस्था झाल्या आहेत, पण तरी उतरल्यावर मी यापूर्वी अनेक ठिकाणी बोलून दाखवलेलं एक मत मोठ्याने व्यक्त केलंच: “पुण्याचा विमानतळ कसला, यष्टीचा ष्ट्यांडच आहे खरं तर,” आणि अगदी ठसक्यात बरं का. यावेळेस मात्र मी माझ्या या अभिव्यक्तीकडे वळून एक नजर टाकली आणि मला गंमत वाटली. इतर सगळीकडे इंग्लिश शब्दांचे ‘देशी’ उच्चार ऐकून उगाच नाटकीपणे तोंड वाकडं करणारा मी, आत्ता स्वतः तेच केलं होतं. किंबहुना, यापूर्वी केव्हाही हे विधान करताना मी कधीच ‘एस. टी. चा स्टँड’ असं म्हटलं नसल्याचं मला आठवलं. का कोण जाणे, माझ्या कानांना हाच शब्दप्रयोग जास्त पटत होता. 

विमानतळातून मॉलकडे नेणाऱ्या स्कायब्रिजमधून चालत असताना मी त्यातल्या भिंतींवरची कलाकृती पाहताना हा विचार विसरलो. छान काढली होती चित्रं. ‘मराठी संस्कृतीची वैशिष्ट्यं’, ‘मराठी खाद्यपदार्थ’ असं करता करता पुढे ‘मराठी व्यक्तिमत्त्वं’ असं शीर्षक लांबून पाहिलं तेव्हा त्या चेहऱ्यांच्या गर्दीत एक चेहरा बघायची इच्छा उफाळून आली. त्या चित्राच्या जवळून जाताना मी तोच चेहरा शोधत होतो. सापडला. चेहऱ्यावर कठोर, निश्चयी भाव असलेल्या आपल्या समस्त मराठी वीरांच्या पंक्तीतला तो एकमेव मिस्किलपणे हसणारा चेहरा. तो पाहिल्यावर मला माझ्या मघाच्या प्रश्नाचं उत्तर आपोआप मिळून गेलं. 

एका विमानतळाला दिलेली ‘यष्टीच्या ष्ट्यांडाची’ उपमा ही मुळात मला सुचलेलीच नव्हती. उलट ही भावना पहिल्यांदा व्यक्त करताना एका कुठल्याशा अर्धवट आठवणाऱ्या संदर्भाचा तो एक तुकडा आपसूकच जिभेवर आला होता. तेव्हा तो चेहरा बघून मला अचानक तो संदर्भ पूर्ण आठवला. ‘कैरोसारख्या मोठ्या शहराचा विमानतळ अगदीच यष्टीच्या ष्ट्यांडासारखा असावा हे काही मला फार रुचले नाही, पण थोड्याच वेळात आमचे विमान कैरोला नाही तर बेहरिन बेटावर उतरले होते असे कळले.’ ‘अपूर्वाई’ मधलं हे वाक्य लक्षात त्याच कारणासाठी राहिलं असणार, ज्यासाठी पु.लं.ची अनेक वाक्यं लक्षात राहायची: लहानपणी ती वाचून किंवा ऐकून इतकं हसू आलं असणार, की त्या वाक्यांची मेंदूने कुठेतरी ‘कुठल्याही क्षणी उपयुक्त ठरणारे डोपामिनचे अत्यंत विश्वासार्ह स्रोत’ म्हणून नोंद केली असावी.

मला वाटतं माझ्या मनात खरंच असा एखादा फोल्डर अस्तित्त्वात असावा, आणि तो खरंच पु.लं.च्या अशा असंख्य out-of-context वाक्यांनी खच्च भरलेला असेल. सिंगापूरमध्ये कुठेतरी चालत जात असताना अचानक पाऊस सुरु झाला आणि काही कारण नसताना पु.लं.च्या ‘आमचा धंदा: एक विलापिका’ या लेखातलं एक वाक्य असंच मनात चमकलं. ‘अंगे भिजली जलधारांनी अशा तरुणींना आलिंगन द्यायला निघालेला एखादा चारुदत्त, केळ्याच्या सालीवरून घसरून पडावा, हातातली छत्री उलटी व्हावी आणि भिजलेल्या रस्त्याचे चुंबन घेताना पाठीवरचा बुशशर्ट वर सरकून आतल्या बनियनची फाटकी भोके दिसावीत, असे काहीसे झाले,’. मग यानंतर माझं रस्त्यातच पाचसहा मिनिटं मोठ्याने हसून झालं, आणि मग मी संदर्भ वगैरे आठवण्याच्या मागे लागलो. वास्तविक त्या वाक्याचा पावसाशी काहीच संबंध नव्हता. त्या लेखात, स्वतःला उगाच शहाणे समजणाऱ्या होतकरू लेखकांनी ‘खोली’ असलेले काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला की कसे वाटते, या गोष्टीचे वर्णन करायला आमच्या पु.लं.ना हीच एवढी रसभरीत इमेजरी का सुचावी, असं वाटूनही मला हसू येत राहिलं. त्या क्षणी हे सगळं आठवत रस्त्याने चालणारा तो मी छत्री घेतलेला चारुदत्त होतो का ‘खोली’ हुडकणारा दिडशहाणा होतकरू लेखक होतो, मला कळलं नाही. एकेकाळी मला या दोन्ही उपाध्या लागू पडल्या असत्या या विचाराने मला आणखीनच हसू आलं. मला कुठेही, काहीही कारण नसताना अशी एक टपली मारून जाण्याचा अधिकार फक्त पु.लं.नाच आहे. 

पु.लं. गेले त्या दिवशी मी खूप रडलो होतो. अर्थात, हे म्हणण्यात मोठेपणा काहीच नाही कारण त्या काळात दिवसातला माझा बराचसा वेळ तेच करण्यात जायचा. अगदी बालपणी आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या संभाषणांतून मातृभाषा शिकायचा प्रयत्न करत असताना, आपल्या मनात आपोआप वारंवार कानी पडणाऱ्या शब्दांचं एक वर्ड रजिस्टर तयार होत राहतं. एका सुसंस्कृत आणि रसिक मराठी घरात जन्मल्यामुळे ‘पु.ल. देशपांडे’ हे एक नाव त्यांचं काहीही हाती पडण्याच्या बरीच वर्षं आधीपासून माझ्या या वर्ड रजिस्टरमध्ये होतं. I was first introduced to him as an integral part of my reality. आणि म्हणूनच मला असं वाटतं, की माझ्या आवडत्या लेखकांच्या नावांची मनात उजळणी करताना त्यांचं नाव लगेच आठवत नाही; आठवलं तरी त्या यादीत बसवत नाही. वाचता येत नसताना घरातल्या कोणाहीकडून त्यांचे लेख ऐकणं इथपासून, त्यांचं एकही पुस्तक सोबत नसताना अचानक एकापाठोपाठ एक आठवत गेलेल्या इकडच्या तिकडच्या वाक्यांतून त्यांचा एखादा लेख मनातच उभा राहणं आणि तिथेच वाचलाही जाणं, असा हा प्रवास असल्यामुळे, माझ्यासाठी ते आवडते ‘लेखक’ या संचात बसू शकत नव्हते. ते स्वतःचाच एक संच होते, अजूनही आहेत. 

असं मनात येईल तेव्हा त्यांचे लेखच्या लेख फक्त स्मरणशक्तीच्या बळावर मनात रचत जाणं जमण्यासाठी, मी लहानपणी तशी मेहनतही खूप घेतली होती. एखादा लेख मला खूप म्हणजे खूपच आवडलाय तर मला तो पाठच पाहिजे या हट्टाने मी शाळेत असताना ‘भ्रमण मंडळ’, ‘मी आणि माझा शत्रुपक्ष’, ‘म्हैस’, ‘पाळीव प्राणी’ असे लेख पाठ केले होते. त्यातल्या ‘भ्रमण मंडळ’ या लेखाचं एक ‘पठण’ करण्याचा कार्यक्रम माझ्या शाळेने वार्षिक स्नेहसंमेलनात घातला होता. तेव्हा मला त्यातले बरेच विनोद कळले नव्हते. फार काय, तेव्हा मला ‘एक पात्र’ म्हणून सगळ्यात जास्त आवडलेले सोकरजीनाना त्रिलोकेकर वाक्यात सतरा वेळा उच्चारायचे तो ‘साला’ हा (आचार्य बाबा बर्व्यांच्या भाषेत) अपशब्द होता हेही माहित नव्हतं. मी दुसरीत होतो. तिथे स्नेहसंमेलनात कुठल्यातरी बडबडगीतावर बसवलेला नाच आणि कुठल्यातरी देवीला वंदन म्हणून बसवलेला ‘डिवोशनल आयटम’ या दोन कार्यक्रमांच्या मध्ये मी एकटाच, भांग पाडलेल्या आणि शर्ट आत खोचलेल्या अतिशय गुणी बाळाच्या अवतारात, स्टेजवर उभा राहून त्रिलोकेकरांना माझ्या जिभेवर थैमान घालण्याची संधी देत होतो. आत्ता ते सगळं आठवून मला खूप हसू येतं आणि वाटतं की हे सगळं ऐकून, आणि त्याच प्रभावाखाली असताना मी वर्गात कोणालाही ‘साले इडियट’ अशा हाका मारत फिरलो असेन ते पाहून, प्रेक्षकांतल्या किती पालकांना ‘काय या मुलावरचे संस्कार’ असं वाटलं असेल? पण मग असं लक्षात येतं की त्यांच्यापैकी जे कोणी खरे मराठी वाचणारे असतील, त्यांना असंच वाटलं असेल की या वयात ‘बटाट्याची चाळ’ आवडणं, यापेक्षा जास्त चांगले संस्कार असूच कुठले शकतात?

यानंतर एकदा आजी तिच्या काही मैत्रिणींसोबत एका दिवसाच्या सहलीला गेली तेव्हा मला सोबत घेऊन गेली होती. तिथे मला थोडासाच आग्रह पुरला आणि मी असंच संपूर्ण ‘म्हैस’ म्हणून दाखवलं होतं. मला वाटतं, ‘म्हैस’ हा मी त्यांच्या तोंडून ऐकलेला पहिला लेख असावा. ‘म्हैस’ हातात घेऊन वाचण्याचा योग या घटनेनंतर खूप वर्षांनी आला. त्यांच्या ‘गोळाबेरीज’ या पुस्तकात मला तो सापडला. वाचताना डोळ्यासमोर प्रसंग आणि पात्रं जशी उभी राहतात तशीच ऐकतानाही राहतात. त्यानुसार बगुनाना, झंप्या दामले, मधू मलुष्टे, सुबक ठेंगणी, आत्मविश्वास असलेले मास्तर, पावर नसलेले आर्डर्ली आणि धर्मा मांडवकर या सगळ्यांना तोपर्यंत मी मनात एका वेगळ्याच प्रकारे जिवंत केलं होतं. एकतर पु.लं. स्वतः वाचत असताना प्रत्येक पात्राच्या संवादांमध्ये इतके सहजपणे शिरायचे की या सगळ्या लोकांची बोलण्याची तऱ्हाही माझ्या मनात पक्की होती. शेवटी ते सगळे पु.लं.चेच शब्द! कथाकथनाच्या वेळी त्यांनी रंगात येऊन एखादी वाक्यरचना बदललीही असेल. पण ती तशीच वाक्यरचना त्या खास आवाजासकट डोक्यात ठाण मांडून बसलेली असल्यामुळे, तो लेख वाचत असताना ‘ह्यॅ, असं कुठे म्हणाला उस्मानशेट’ असं स्वतःलाच ठिकठिकाणी टोकत होतो. त्यानंतर ‘म्हैस’ हा लेख फक्त ऐकायचाच असं मी स्वतःशी ठरवून टाकलं. त्याचप्रमाणे ‘पुणेकर, मुंबईकर आणि नागपूरकर’, ‘अंतू बर्वा’, ‘गच्चीसह झालीच पाहिजे’ असे काही खास लेख मला मी त्यांच्या तोंडून ऐकत नसेन तर तितके आवडतच नाहीत. आपल्या आधुनिक व्याख्यांनुसार पु.लं.नी एक आख्खं ‘युनिव्हर्स’च उभारलं होतं, आणि त्यातल्या लहानसहान पात्रांनाही त्यांच्या तोंडी स्वतःचं असं व्यक्तिमत्त्व लाभायचं. 

‘भ्रमण मंडळ’ आणि ‘गच्चीसह झालीच पाहिजे’ यानंतर मी बटाट्याच्या चाळीतला वाचलेला लेख म्हणजे ‘उपास’. तेव्हाही लहानच होतो. त्याच्या आधीचे दोन्ही लेख हे बघणाऱ्याच्या भूमिकेतून होते तर ‘उपास’ हा प्रथम पुरुषवाचक होता, म्हणून मला पु.लं. स्वतः त्या चाळीत राहत होते आणि ‘पंत’ हे पात्र म्हणजे ते स्वतःच होते असं बराच काळ वाटत होतं. असं वाटल्यावर माझ्या मनात डोकावलेला पहिला विचार हा होता की याचा अर्थ बटाट्याची चाळ खरी आहे आणि मी आत्ता खरंच मुंबईला गेलो तर मला त्रिलोकेकरांचे किंवा द्वारकानाथ गुप्त्यांचे कोणीतरी भेटतील. या विचाराने मी अक्षरशः हुरळून गेलो होतो. पण मग त्याच लेखातला ‘चिंत्याचे बाबा मरणार का रे चंदू’ हा कुठल्यातरी कार्ट्याच्या तोंडचा संवाद वाचून मी आईला पु.लं.ना चिंतामणी असा कोणी मुलगा होता का ते विचारलं होतं. तोपर्यंत ‘चिंत्या’ वरून ‘चिंतामणी’ ओळखण्याएवढं माझं मराठी सुधारलं होतं, आणि शिवाय ते चितळे मास्तरांच्या धाकट्या मुलाचं नाव असल्यामुळेही माहित होतं. पण मग आईने मला पु.लं.नी ते एका व्यक्तिरेखेच्या भूमिकेतून लिहिलंय आणि त्यांना मुलं नव्हतीच असं सांगितलं. पु.लं.च्या आयुष्याबद्दलचा तो एक तपशील मला बरीच वर्षं पुरला. पु.लं. माझे होते. ते माझ्यासाठी कोण होते ही जाणीवच इतकी संतुष्ट करणारी होती की ते महाराष्ट्रासाठी कोण होते हा प्रश्न मला बरीच वर्षं पडलाच नाही. 

पण मोठं व्हावंच लागतं, त्याप्रमाणे त्याचं उत्तर हळूहळू समजायला लागलं. आधी पु.लं.च्या आयुष्यावरचं श्याम भुर्के यांनी लिहिलेलं ‘पु.लं. एक आनंदयात्रा’ हे पुस्तक वाचनात आलं. त्यानंतर आई मानगुटीवर बसल्यामुळे मी ‘आहे मनोहर तरी’ वाचून काढलं. या दरम्यान सगळीकडे उल्लेखांचा स्फोट तितक्याच वेगाने आणि सातत्याने होत होताच. त्यांच्या अशाच एका पुण्यतिथीला कुठल्यातरी इंग्लिश पेपरच्या पुरवणीत त्यांच्याबद्दल ‘He was a colossus’ असं म्हणून लिहिलेला एक लेख वाचला. तेव्हाच त्यांनी लेखकासोबतच इतर केवढ्या भूमिका निभावल्या ते समजलं. ‘नाच रे मोरा’ हे त्यांचं आहे हे कळल्यावर तर खूप मोठं regression झाल्यासारखं वाटलं. ते असे सगळीकडेच दिसायला लागल्यावर आपण त्यांच्या केवढ्या लहानशा भागाच्या संपर्कात होतो ही अचानक जाणीव झाली. 

आणि मला वाटतं म्हणूनच, स्वतःचा ब्लॉग टाकल्यानंतर आणि कृष्णविवरांपासून ते वूडहाऊससारख्या लेखकांबद्दल एवढं सगळं लिहित असतानाही, ज्या एका व्यक्तीमुळे माझ्यात लिहिण्याची आवड निर्माण झाली तिच्यावर लेख तर सोडाच, उल्लेखही फारसा माझ्याच्याने झाला नाही. मनात राहून राहून असं वाटत होतं की माझ्याआधी महाराष्ट्राचा त्यांच्यावर हक्क आहे. सखाराम गटणेच्या शब्दांत, ते शीतल छाया देणारे वटवृक्ष असले तरी त्या छायेत बसण्यासाठी नंबर लावणारा मी रांगेतला अगदी शेवटचा पांथस्थ असणार होतो. आज अचानक, बऱ्याच महिन्यांत मराठी शब्द हातात घेऊन वाचता न आल्यानंतर बटाट्याच्या चाळीत दिवस घालवला आणि हे सगळं व्यक्त करण्याची स्फूर्ती आली. शेवटी कुणीसं म्हटलं आहेच, की महाराष्ट्राच्या सगळ्या सांस्कृतिक क्षेत्रांतल्या अनेक दिग्गज मंडळींनी पु.लं. बद्दलच्या आपल्या भावना कैक वेळेला व्यक्त केल्या आहेत; म्हणून काय या छोट्या होतकरू लेखकाने आपल्या भावना व्यक्त करूच नयेत की काय? आणि का करू नयेत? ते माझेही लाडके व्यक्तिमत्त्व आहेच.         

Comments

  1. जबरदस्त लेका. तुझे लिखाण आणि तुझ्यावर वाचनाचे संस्कार करणाऱ्या तुझ्या आईला सलाम.. लिहिते राहो...

    ReplyDelete
  2. आदित्य पुन्हा वाचतांना तीच मजा अनुभवली,कारण पुलं या व्यक्तीला आपण आयुष्यभर विसरुच शकणार नाही इतका आनंद दुसऱ्या कोणत्याही लेखक, गायक यांनी दिला नाही.अर्थात मंगेशकर आणि राहुल देशपांडे यांना सोडून,पण पुलंची प्रवासवर्णने, बटाट्याची चाळ, म्हैस,अंतू बर्वा हे विसरून शकत नाही.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प