रुचकर सिंगापूर


 फूड कोर्टमधल्या ‘माय एलिफन्ट’ नावाच्या माझ्या ठरलेल्या थाई गाळ्यासमोरच्या रांगेत मी काहीसा खिन्न होऊन उभा होतो. ऑफिसमध्ये दिवसाच्या पूर्वार्धात काम मनासारखं झालेलं नव्हतं. आज निघायच्या आधी एक चालू प्रकल्प मला पूर्ण व्हायला हवा होता, आणि आता अगदी शेवटच्या टप्प्यात असतानाच माझ्या स्प्रेडशीट्सना नखरे सुचत होते. एका विचित्र अशा अडचणीवर तासभर मला खटपट करताना पाहिल्यानंतर बॉसनेच “आता लगेच जा जेवायला, भरल्या पोटी सुचेल,” असं म्हणून मला बाहेर पिटाळलं होतं. ऑफिसपासून दहा मिनिटांवर असलेल्या माझ्या ठरलेल्या मॉलमधल्या फूड कोर्टमध्ये शिरताना मी असा विचार करत होतो, की समस्येची टांगती तलवार डोक्यावर असताना काही वेळ दुसरं काहीतरी करावं लागणं म्हणजे त्रासच. त्यात आता नेमकी त्या दिवशी सगळ्यांनाच थाई खायची हुक्की आलेली असल्यामुळे रांगेत माझा आणखीनच वेळ जाणार होता. यथावकाश मी काउंटरपाशी पोहोचलो.

        “अरे, किती दिवसांनी दिसलास!” काउंटरपलीकडच्या थाई मावशी हसत म्हणाल्या. “मला वाटलं विसरलास काय आम्हाला. काय रे, खूपच दिवसांनी येतोय नाही का हा?” हे त्यांच्या शेजारच्या आचारीबुवांना उद्देशून होतं. त्यांनीही सौम्यपणे हसत मान डोलावली. मी दचकलोच होतो. दिवसाला किमान दोनतीनशे चेहरे पाहणाऱ्या त्या मंडळींना, रोज त्यांच्या आस्थेने चार चौकशा करणारे लोक तरी आठवत असतील का अशी मला शंकाच होती. तशात एका निमूटपणे नुसतं डिशचं नाव पुटपुटणाऱ्या अबोल मुलाचं विचारायलाच नको. पण चक्क… दुसऱ्या क्षणी मीही अगदी मनापासून त्यांच्याकडे पाहून हसलो.

“अहो, गेले काही दिवस एक डबा लावलाय म्हणून ऑफिसमध्येच जेवत होतो. पण तरी इथली आठवण येतेच ना!” 

“येणारच! आणि कशाची तेही माहितीय मला,” अत्यंत अभिमानाने मावशी म्हणाल्या. “अरे, एक पाइनॅपल फ्राइड राइस आणि आईस टी दे रे याला. आणि… स्प्रिंग रोल्सही घेशील ना रे?” हे होईपर्यंत शेजारच्या आचारीबुवांनी सगळ्या घटकांची जमवाजमव करून ठेवलीच होती. दोन मिनिटांत माझ्या हातात तीनही पदार्थ होते. मला अचानक खूप छान वाटायला लागलं होतं आणि समस्या डोक्यातून निघून गेली होती. 

सिंगापूरमधल्या माझ्या खाद्यजीवनाबद्दल काहीही लिहायचं म्हटलं की ‘आपुलकी’ या गोष्टीला त्यापासून वेगळं करता येणंच शक्य नाही. कुठल्याही ठिकाणी कुठलाही पदार्थ वाढला जात असताना ही मात्र अगदी ताटाबाहेर सांडत असायची. आज या गाळ्यावरच्या मंडळींचं हे सौजन्य पाहून मी आधी चक्रावलो होतो, पण जेवताना मला वाटलं की त्यांनी मला ओळखणं याच्यात वास्तविक तितकं आश्चर्यजनक काहीच नव्हतं. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून मी जवळपास रोज दुपारचं जेवण या मॉलमध्ये घेत होतो, आणि अर्ध्याअधिक वेळा या थाई गाळ्यावरच. सगळ्या आशियाई खाद्यसंस्कृतींपैकी थाई संस्कृतीचा मला सगळ्यात जास्त परिचय असल्यामुळे सिंगापूरमध्ये कायमच ते माझं ठरलेलं आश्रयस्थान होतं. 

जानेवारीत पहिल्यांदा मी या ‘माय एलिफन्ट’च्या हातचं जेवलो होतो तो प्रसंग माझ्या चांगलाच लक्षात होता. ऑफिसमधला तो पहिलाच आठवडा असल्यामुळे दुपारच्या जेवणासाठी ठरलेल्या जागा नव्हत्या. पहिले तीन दिवस मी ऑफिसच्या अगदी जवळच चार ठिकाणी जाऊन, तो परिसर अत्यंत महाग हॉटेल्सनी भरलेला असल्याचा धडा घेऊन परत आलो होतो. चौथ्या दिवशी माझी ही अडचण मी एका सिनियरना बोलून दाखवली तेव्हा त्यांनी लगेच या मॉलचा पत्ता दिला आणि त्या दिवशी तिकडेच जेवायला जाणार असलेल्या दोन डेटा सायंटिस्ट्ससोबत मला पाठवलं. तिथे एक टेबल पकडून ते दोघंही त्यांच्या ठरलेल्या गाळ्याकडे गेले आणि मी ‘ओळख’ आणि ‘खिसा’ या दोन निकषांच्या आधारावर सगळीकडचे मेनू पालथे घालायला लागलो. ‘ओळख’ म्हणता माझी पावलं आपसूकच मला फूड कोर्टमधल्या एकमेव थाई गाळ्याकडे घेऊन गेली आणि तिथला सगळ्यात ओळखीचा आणि मुख्यतः फक्त पाच डॉलर्सचाच असलेला ‘मँगो स्टिकी राईस’ हा पदार्थ घेऊन आमच्या टेबलाशी परत आलो. एक्स्चेंज रेट्सचा किडा मनातून तोवर पुरता गेलेला नव्हता. माझी निवड पाहून माझ्या दोन दोस्तांनी लगेच डोळे विस्फारले आणि ती एक साइड-डिश असल्याची मला कल्पना दिली. त्यानंतर पुढचे आठ महिने ‘मला हा पदार्थ फारच आवडतो बुवा’ यावरून ऑफिसमध्ये चिडवाचिडवी चालू होती. 

वास्तविक तिच्या एकूण प्रमाणावरून ती साइड-डिशच असल्याचं माझ्याही लक्षात यायला हवं होतं, पण त्या पदार्थाला माझ्या मनात बऱ्याच वर्षांपासून एक खूप मानाचं स्थान असल्यामुळे मी पटकन तिच्याकडे बोट दाखवताना सखोल विचार वगैरे केलेला नव्हता. हा पदार्थ म्हणजे एक खरीखुरी थाई खासियत, आणि ‘माझा हत्ती’ तो अगदी सुरेख जमवायचा. स्टिकी राईस म्हणजे काहीसा साखरभातासारखाच, फक्त नारळाच्या दुधापासून बनवलेला. ते मिश्रण बराच वेळ एकजीव झाल्यानंतर त्या गोड भाताच्या अक्षरशः वड्या पाडता येतात. तशीच एक कंपासपेटीच्या आकाराची वडी सफाईदारपणे कापून मावशी एका ताटलीत ठेवायच्या, आणि त्यावर आंब्याच्या उभ्या फोडी रचून पळीने आणखी थोडंसं नारळाचं दूध ओतायच्या. मी पहिल्यांदा हा पदार्थ भारतातच कधीतरी खाल्ला होता, तेव्हा मला आंबाच फारसा आवडत नसे. पण त्या भाताचा एक घास आणि आंब्याची एक फोड एकत्रच तोंडात घातल्यावर एक काहीतरी स्वर्ग गाठल्याची भावना मनात येते, ही अंधुकशी आठवण घेऊन मी २०१९ सालच्या माझ्या सिंगापूरच्या ट्रिपमध्येही एका दुसऱ्या फूडकोर्टमध्ये तो खाल्ला होता. तिथे गोड भात वाडग्यातून मिळत असे. त्यापेक्षा इथली भाताची वडी मला खूप जास्त आवडली होती. त्या पहिल्या दिवशी तो खाऊन परत गेल्यावर, तो अगदी तृप्त करत असला तरी पोट भरत नाही असा साक्षात्कार झाला, तेव्हापासून मी अगदी विशिष्ट दिवशी बाकीच्या जेवणानंतर तो घ्यायचा असं ठरवलं. तेव्हापासून ऑफिसमध्ये एखादं मोठं काम झालं की ते साजरं करायला मी हेच करत होतो. तोपर्यंत मी स्वतःचं असं एक तंत्रही विकसित केलं होतं. त्या सुबक वडीचा एक तुकडा कापून तोंडात, जिभेला स्पर्श न होऊ देता ठेवून द्यायचा, आणि मग काळजीपूर्वक आंब्याच्या एका फोडीचंही तसंच करून, एकदम तोंडात सुखाचा स्फोट होऊ द्यायचा. इतर बऱ्याच गोष्टींची घाई असतानाही, याचा मात्र एकेक घास पूर्णपणे आस्वाद घेत हळूहळूच खायचा असा माझा एक रिवाज माझ्याही नकळत तयार झाला होता, आणि तो पाळताना मला ‘I deserve this’ असं जणू प्रत्येक घास मला सुचवत असे. यावेळीही ही समस्या संपल्यावर इथे परत येऊन हे घ्यायचं असं मी मनाशी ठरवून टाकलं. 

दरम्यान माझा पाइनॅपल राईस मला खुणावत होता. फ्राईड राईस ही संकल्पना आपल्या सगळ्यांना आता चिनी खाद्यसंस्कृतीमुळे अगदी परिचयाची झालेली असली, तरी थाई संस्कृतीतही तो स्वतःचं असं एक स्थान टिकवून आहे. लहानपणापासून भात ही माझी जेवणातली सर्वाधिक प्रिय वस्तू. लहानपणी बऱ्याचदा जेवणातला पोळीभाजी हा प्रकार फक्त उपचारापुरताच माझ्याकडून स्वीकारला जायचा, आणि शाळेत पोळीभाजीचा डबा न्यायचा असा घरी ठराव पास झाला तेव्हा मला सुरुवातीला त्याचा त्रास झाला होता. पण माझी आजी माझं भातप्रेम व्यवस्थित ओळखून असल्यामुळे, मी शाळेतून घरी यायचो तेव्हा तिने माझ्यासाठी वरणभाताचा ढीग कालवून ठेवलेला असायचा. भातावर पळीने वरण ओतण्याऐवजी ती वरणाच्या बाऊलमध्येच सगळा भात घालून तो त्यातच मीठ, लोणच्यासह कालवायची. तेव्हापासून ‘सढळ हात’ या काहीशा उपरोधात्मक वाक्प्रचाराचा माझ्या दृष्टीने तोच अर्थ आहे. मला भात एवढा आवडायचं मुख्य कारण म्हणजे तो खाताना कसल्याच गणिताची गरज नसते. लहानपणी एका पोळीपासून सुरुवात करून ती दीड, दोन अशी अंकगणिती श्रेढीने वाढवत नेलेली, आणि शिवाय प्रत्येक घासमागचं गणित ते वेगळंच! पानातली भाजी एकाच वेळी पुरेल आणि संपेलही अशा प्रकारे तिचं विभाजन करत जात ती खाणं हे मला कायमच, भाताच्या तुलनेत तरी, कसरतीचं काम वाटत आलंय. भाताला असली काहीही कटकट नसते. एकदा तो मनासारखा कालवून झाला, की बाकी कसलाच विचार न करता अविश्रांत तो तोंडात ढकलत राहणे एवढंच कार्य उरतं. शाळेची किमान सहासात वर्षं तरी सकाळी दहाच्या सुमारास पोळीभाजी आणि दुपारी फक्त भात अशी सवय लागल्यामुळे, एका वेळचं पूर्ण जेवण हे फक्त भाताच्या आधारावर होऊ शकतं याचं ट्रेनिंग पोटाला पूर्वीपासूनच मिळालेलं होतं. 

आणि असं ट्रेनिंग असेल तर सिंगापूर हे नंदनवनच मानावं लागेल. (चला, सिंगापूरला नंदनवन म्हणायला आणखी एक कारण मिळाले; दिवस सार्थकी लागला!) सिंगापूरमध्ये एकवटलेल्या सगळ्या खाद्यसंस्कृती बघितल्या, तर भात हा इथला सर्वमान्य सम्राट असल्याचं कुणीही मान्य करेल. प्रामुख्याने चिनी, मग त्यानंतर थाई, कोरियन आणि ‘साऊथ ईस्ट आशिया’ प्रांतातल्या विविध संस्कृती, आणि ते संपेपर्यंत आपली भारतीय, आणि तीही दाक्षिणात्य! आणि फूड कोर्टमध्ये यापैकी कुठल्याही संस्कृतीच्या गाळ्यावर जाऊन भात सांगितलात, की ‘सढळ हाताची’ मघाचीच व्याख्या बघायला मिळते. त्यानुसार आत्ताही मी या पाइनॅपल राईसचा अस्ताव्यस्त पसरलेला डोंगर घेऊन बसलो होतो. 

मी अगदी लहानपणी सिंगापूरला ट्रिपला आलो होतो तेव्हा हा पाइनॅपल राईस पहिल्यांदा खाल्ला होता. तेव्हा आम्ही एका हॉटेलात गेलेलो असल्यामुळे त्यांनी अगदी पारंपरिक पद्धतीने तो अननसाच्या कवचातच भरून दिला होता. त्या अद्भुत plating पेक्षाही तेव्हा त्याची चव मनात घर करून बसली होती. त्यानंतरच्या बऱ्याच वर्षांत हा प्रकार एक आश्रयस्थानच झालेला असला, तरी भारतात माझा त्याच्या सगळ्यात साध्या स्वरुपाशीच संबंध आलेला होता. तो म्हणजे आपण चिनी मसाल्यांऐवजी आपले मसाले वापरून केलेला साधा फ्राइड राईस आणि त्यात तेलातून परतून काढलेले अननसाचे तुकडे. सिंगापूरच्या माझ्या फूड कोर्टमध्ये मला एवढंच मिळालं असतं तरी मी सुखी असतो, पण या पदार्थाची त्यांची आवृत्ती वेगळीच निघाली. पहिली गोष्ट म्हणजे कोणी आपणहून ‘नॉनव्हेज नको’ असं सांगितलं तरच ते वगळायचं या सिंगापूरच्या धर्माला ते जागले. जर भातात अननस असेलच तर शिवाय काही का असायला हवं हा माझा निरागस प्रश्न आणि संपूर्ण जेवणात सामिष काहीच नाही असं कसं हा सिंगापूरचा जवळपास तितकाच निरागस प्रश्न, यांची काहीशी चढाओढ सुरुवातीचे काही दिवस झाली. पण माझ्या जेवणात नुसता भात असतो हे घरी कळल्यावर त्यांना सुरुवातीला वाटलेली चिंता ही त्यासोबत चिकनही येतं हे कळल्यावर पुष्कळच कमी झाली हे पाहून मीही निश्चिंत झालो. ‘माय एलिफन्ट’च्या मंडळींच्या दृष्टीने फ्राइड राईस म्हणजे त्यात चिकन तर आलंच; शिवाय अननस घालणं हे खरं वैशिष्ट्य! त्यामुळे भातात चिकनचे बरेच तुकडे तर असायचेच, पण शिवाय भातावर वरून ‘चिकन फ्लॉस’चा पुन्हा सढळ हाताने वर्षाव व्हायचा. 

इंटर्नशिप चालू असताना वीकेंडला, आणि कॉलेज सुरु झाल्यावरही बऱ्याचदा मी वेळ काढून सिंगापूरचे न बघितलेले भाग पायाखालून घालावेत या हेतूने खूप फिरायचो. सकाळी बाहेर पडलो की अगदी रात्रीच खोलीवर परत यायचो. दुपारी भूक लागायला लागली की भटकंती करतच जवळपासच्या कुठल्यातरी ठिकाणी थांबायचो. फूड कोर्ट आणि रस्त्यावरच्या गाड्या वगैरेंवरही खायला फारसं काही वाटत नसे, कारण गाड्या असल्या तरी सिंगापूरची स्वच्छता असायचीच. अशातही माझा मुख्य ओढा थाई जेवणाकडे असे, आणि पाइनॅपल राईस नाही अशी थाई जागा फारच क्वचित आढळायची. अशा अनेक ठिकाणचा अनुभव घेतल्यावर मला कळलं की सगळीकडे एकाच प्रकारचा राईस मिळत नाही. मूळ पदार्थ तोच ठेवून बाकी बऱ्याच बाबतीत वैविध्य साधण्याचं काम सिंगापूरमध्ये पसरलेले अनेक गाळे, हातगाड्या आणि खाणावळीही उत्साहाने करतात. ऑफिसच्या टीममधला एक मित्र एकदा ऑफिसपासून जराशा लांब असलेल्या ‘तिओंग बहरू’ इथल्या नव्या फूड कोर्टमध्ये घेऊन गेला होता. मॉलमधल्या फूड कोर्टच्या तुलनेत इथे खूपच कमी चकचकीतपणा होता, आणि एसीच्या बंदिस्त वातावरणाऐवजी तो एका मोठ्या कम्युनिटी सेंटरच्या वरच्या मजल्यावर सगळीकडे उघड्यावर पसरलेला होता. साधी लोखंडी बाकडी आणि वर फिरणारे खूपच लांब हात असलेले पंखे, आणि सगळीकडे प्रचंड गोंगाट असं वातावरण. एकेकाळी मी शंभरदा नाक मुरडलं असतं, पण तेव्हा मला त्या वातावरणात खूपच उत्साह वाटला. तिथे दुसरं म्हणजे दिखाऊपणा कसलाच नव्हता. कोणीही आपल्या गाळ्याला काहीतरी कल्पक नाव देण्याऐवजी सरळ मुद्द्याचं तेवढंच लिहीत होते. एवढ्या स्पष्टवक्तेपणासाठी माझी अजून मानसिक तयारी झालेली नसल्याने मी तिथला थाई गाळा शोधून माझा ठरलेला पदार्थ मागवला, आणि जे हातात पडलं ते पाहून चकितच झालो. इथल्या मावशींनी चिकन घालायच्या ऐवजी दोन मोठे प्रॉन्स घातले होते, दोन फिश स्टिक्स दिल्या होत्या आणि शिवाय वरून एक तळलेलं अंडं सोडलं होतं. “एका घासात सगळं येईल असं घे हो,” असं त्या इतक्या प्रेमाने म्हणाल्या की मी फिश स्टिक्स वेगळ्या काढण्याचा माझा आधीच निर्णय बदलून त्यांच्या इच्छेला मान द्यायचं ठरवलं, त्यामुळे त्याच पदार्थाला पूर्णपणे वेगळ्या प्रकारे enjoy करता आलं. असंच एकदा एका मित्रासोबत मरिना बे इथे सायकलिंग करायला गेलो होतो. दहा-अकरा किलोमीटरची एक चक्कर मारल्यानंतर खूपच भूक लागली होती, आणि अशात माझ्या मित्राला प्रयोग सुचत होते. “आधी पोट भरू” असं ठरवून मी आधी परिसरातला थाई गाळा शोधून काढला आणि पाइनॅपल राईस सांगितला. त्यांनी अननस, चिकन, मटार आणि कणसाचे दाणे असं घालून दिला होता. तसंच याच मित्रासोबत एकदा नाक्यावरच्या लहानशा थाई हॉटेलमध्ये गेलो होतो तेव्हा त्यांनी दिलेल्या भातात काळे वाटाणे आणि मनुका होत्या. तात्पर्य, मी एका आठवड्यात ठरवून सगळे दिवस फक्त पाइनॅपल राईस खाल्ला हे घरी कळवलं तेव्हा पुण्याला माझ्या परिस्थितीची जरा कीव आली, पण मी मात्र त्या सात दिवसांत एकाच पदार्थाच्या माध्यमातून अनेक प्रांत फिरून आलो होतो.   

२००९ साली मी, आई आणि बाबा सिंगापूरला आलो होतो तेव्हा आईच्या मनात भातामुळेच एक कडवट आठवण राहून गेली होती. एके दिवशी दुपारी फिरत फिरत आम्ही चायनाटाऊनमध्ये आलो होतो आणि तिथल्याच एका छोट्या हॉटेलात जेवायला थांबलो होतो. पर्यटक नेहमी जातात अशा सिंगापूरच्या सगळ्या दिखाऊ भागांमधल्या हॉटेलांत लहानसा का होईना, पण शाकाहारीचा एक स्वतःचा मेनू तरी असायचा, पण हाच प्रकार सिंगापूरच्या इतर राहत्या भागांमध्ये आढळत नाही हे आम्हाला त्या दिवशी खऱ्या अर्थाने कळलं. चायनाटाऊनमधल्या त्या खानावळीत व्हेज राईस नावाचा जो एकमेव शाकाहारी पदार्थ होता, तो प्रत्यक्षात फक्त शिजवलेला पांढराशुभ्र भात आणि काही कोबीची पानं एवढाच निघाला. भात हा आपल्या जेवणात अविभाज्य असला तरी कालवण नाही अशी कल्पनाच आपल्याला सहजपणे करता येत नाही. नुसताच भात कसा खायचा? तेव्हा मला आणि आईला तो प्रकार फारच विचित्र वाटला होता, पण मी तिथे राहत असताना माझ्या लक्षात आलं की चिनी खाद्यसंस्कृतीत, भात हा फ्राइड नसेल तर बहुतेकवेळा तसाच असतो. आपल्याला त्यासोबत नुसतं कोरडं तोंडीलावणं पुरत नाही; आपल्याला कालवायला काहीतरी लागतं. पण इथल्या अशा साध्या भाताच्या डिशेसचा स्थायीभाव म्हणजे एक व्यवस्थित शिजवलेला चविष्ट पदार्थ आणि सोबत भाताचा ढीग! या दोन भिन्न पद्धतींमधला दुवा शोधायचा झाल्यास तो थाई खाद्यसंस्कृतीमधल्या ‘ग्रीन करी’ या प्रकारात सापडेल. पाइनॅपल राईसच्या जोडीने हा माझा एक अत्यंत आवडता प्रकार आहे. इथेही, मूळची ग्रीन करी ही फक्त करी असते, कुठल्यातरी अगम्य मसाल्यांचं मिश्रण असलेली. मग तुम्ही तिच्यात काय घालता यातून तिची वेगवेगळी रूपं जन्माला येतात. भारतात बऱ्याचदा कणीस, मटार, गाजर, फ्लॉवर असे आपले नेहमीचे रश्श्याचे घटक घेऊन ती येते. मी २०१९ मध्ये सिंगापूरला फिरायला गेलो होतो तेव्हा पहिल्या रात्री याच पदार्थाने माझ्या दमलेल्या जीवात पुन्हा चैतन्य आणलं होतं. वास्तविक ती तशी साधीच होती; तिच्यात फक्त चिकन आणि कांद्याच्या आख्ख्या पाकळ्या घातल्या होत्या. पण त्या फूड कोर्टमधल्या इतरांकडे बघून मी ते खाण्याचा एक वेगळा प्रकार शिकलो. घरच्याप्रमाणे भात करीत कालवून घेण्याऐवजी आधी चमच्याने करी आणि तिचे घटक तोंडात सरकावायचे, आणि मग दुसऱ्या चमच्याने शक्य तेवढा भात तोंडात कोंबायचा. जे काही कालवणं व्हायचंय ते थेट अंतिम टप्प्यावर होऊ देत! नुसताच ऊन ऊन भात तोंडात सरळ ढकलण्याचा सराव यातून झाला, आणि मग त्यासह करीऐवजी कोरडे पदार्थ आले तरी काही वाटेनासं होऊ लागलं. 

याच तपश्चर्येतून माझी ओळख सिंगापूरच्या एका अत्यंत लोकप्रिय पदार्थाशी झाली: चिकन राईस. नावाप्रमाणेच अत्यंत साधीसोपी पाककृती. एक कुठलातरी मसाला घालून शिजवलेल्या चिकनचे सहासात लांबसडक उभे काप आणि त्याखाली साध्या भाताचा ढीग. मघाशी सांगितलेलं तंत्र वापरल्यास खूप कोरडं कोरडं होत नाही. रोजचं दुपारचं जेवण फूड कोर्टमध्ये घेणाऱ्या सिंगापूरकरांमध्ये हा पदार्थ इतका प्रसिद्ध का ते समजणं सोपं आहे. एकतर करायला खूप सोपा, त्यामुळे वेळही लागत नाही. फास्ट फूड म्हणजे आरोग्याला घातक हे समीकरण मोडून काढण्यात सिंगापूरच्या फूड कोर्ट्सचं आणि त्यांच्या या पदार्थांचं मोठं योगदान आहे. घटक एवढेसेच असल्यामुळे स्वस्तही. माझ्या हॉस्टेलवरच्या मित्राने हा पदार्थ चक्क तीन डॉलरमध्ये मिळेल असं एका विद्यापीठाचं कँटिन शोधून काढलं होतं. कमी पैशात अगदी पौष्टिक आणि पोटभर जेवण होतं. आणि जरा एकदीड डॉलर जास्त खर्च करायची तयारी असेल आणि विविधता हवी असेल, तर हेच चिकन करण्याचे इतर अनेक प्रकार आढळतील. त्या सगळ्या प्रकारांपैकी पुन्हा थाई मंडळींचा ‘Honey Glazed Chicken’ हा प्रकार माझा सगळ्यात आवडता ठरला. भाताचे असे प्रकार मुख्यतः चिनी असले तरी अशा इतर संस्कृतींचाही त्यात सहभाग असतो. अशीच माझ्या लक्षात राहिलेली आणखी एक डिश म्हणजे एक कोरियन राईस बाऊल, जो मला ‘माय एलिफन्ट’च्या शेजारच्या गाळ्यावर एके दिवशी सापडला होता. त्यात फक्त KFC स्टाइलचं कुरकुरीत तळलेलं चिकन, भात, आणि मिठाच्या पाण्यातून काढलेले गाजर, मुळा आणि कोबी असे मेंबर होते. पहिल्यांदा तो प्रकार पाहून या कच्च्या भाज्या खाऊ शकेन का असा प्रश्न पडला होता. प्रत्यक्षात तो बाऊल मी त्यानंतर सहासात वेळा घेतला असेल. मला तेव्हा वाटलं होतं, की माझी ही तपश्चर्या अशीच चालू राहिली, तर एक दिवस मी कोबी सोडून काहीही नसलेला भातही तितक्याच चवीने खाऊ शकेन.

अननसाला जरी आपलं सूत भातासोबतच जमवता येत असलं, तरी चिकन आणि मंडळींना असं काही बंधन नसावं. इथे बऱ्याच फूड कोर्ट्समध्ये मला असा प्रकार आढळला की फळ्यावरच्या मेनूमध्ये फक्त चिकन किंवा इतर अशा प्रमुख घटकांची नावं असायची. मी एकदा अशाच एका जरा आडवळणावरच्या फूड कोर्टमध्ये ऑफिसमधल्या एका चिनी मित्रासोबत गेलो होतो तेव्हा मी त्याला या प्रकारचा अर्थ विचारला, त्यावर त्याने फक्त हसून “मागवून बघ” असं मला सांगितलं. मी त्याप्रमाणे तिथे जाऊन चिकन सांगितल्यावर तिथल्या मावशींनी “त्यासोबत भात का नूडल्स” असं लगेच विचारलं. नूडल्स म्हटल्याबरोबर माझ्या मनात अर्थातच पहिल्यांदा मॅगी डोकावली. लहानपणापासून एक लक्झरी म्हणून माहित असलेली मॅगी सिंगापूरला आल्यावर तर आयत्या वेळी गरम आणि पोटभर काहीतरी असं पटकन खोलीतल्या खोलीत करण्याची वस्तू म्हणून आयुष्याचा भागच बनलेली होती. त्या नूडल्सची लोकप्रियता जाणून हॉस्टेलजवळच्या मी जवळपास रोज जायचो त्या खानावळीने तिथल्या फ्राईड नूडल्सची खास मॅगी वापरून केलेली एक आवृत्ती काढली होती. मेनूवरच्या ‘नासी गोरेंग’ म्हणजे फ्राइड राईस आणि ‘मी गोरेंग’ म्हणजे फ्राइड नूडल्स यांच्यासह त्या पदार्थाला ‘मॅगी गोरेंग’ म्हणून मानाचं स्थान होतं. पण त्या फूड कोर्टमध्ये मी चिकनसोबत घेतलेल्या नूडल्स वेगळ्याच निघाल्या. त्यांचं वर्णन करायला मला खरंतर शेवया हाच शब्द जास्त योग्य वाटतोय. भातापेक्षा त्या तळलेल्या शेवयांना स्वतःची अशी एक चव असायची; जी मला सुरुवातीला गरम पोळी नुसतीच तुपासोबत खाताना जशी लागते तशी वाटली. त्या शेवया प्रत्यक्षात तांदुळापासून बनवण्यात येतात हे मला फार नंतर कळले. म्हणजे तुम्हाला मिळणारा चॉईस हा खरंतर फक्त काटा वापरायचा का चमचा, एवढाच! बाकी धान्य तेच पोटात जाणार. असं असलं तरी मला नूडल्स भाताइतक्या पोटभर कधी फारशा वाटल्या नाहीत. त्यांच्या जोडीला सूप आले की मात्र ते अगदी तृप्त करून जायचे. आपल्याकडच्या हॉटेल्समध्ये एक फ्लेवर पकडून Cream वापरून दाट केलेली सूप मिळतात, तर याउलट इथल्या फूड कोर्ट्समधली सूप जास्त पाणीदार असतात आणि एक फ्लेवर असण्याऐवजी पुन्हा त्यात वेगवेगळे घटक घालून ती चव आणलेली असते. मी बऱ्याचदा स्वतंत्र घटक घेण्याऐवजी खास चिनी ‘डम्पलिंग्ज’ असलेली सूप घ्यायचो. हा घटक प्रकार मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा मला त्यात कांदे, बटाटे, फारतर फ्लॉवर वगैरे अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात इथल्या सूपमध्येच काय, पण एकूणच बहुसंख्य पाककृतींमध्ये मला इतर बऱ्याच संस्कृतींमध्ये अगदी नायकच ठरलेला बटाटा हा फारसा कधीच दिसला नाही. इथले पारंपरिक पदार्थ राहू देत, पण इथल्या मॅक्डोनाल्ड्समध्येही आपल्याकडची ‘आलू टिक्की’ असलेला बर्गर सापडतच नाही. प्राधान्य कायम सामिषाला हे जरी गृहीत धरलं, तरी शाकाहाराचा वाढत्या लोकप्रियतेमुळे एखादा शाकाहारी पर्याय करणं यांना अनिवार्य झाल्यावरही, हे मश्रुम किंवा काही पालेभाज्यांपासून बर्गरमधली ती patty तयार करण्यात खूप कल्पनाशक्ती वापरतात, पण त्यांना बटाटा सुचत नाही. आमच्या कॉलेजच्या कँटिनमध्ये मला चक्क राजगिऱ्यापासून बनवलेली patty असलेला बर्गर मिळाला. या सगळ्या आविष्कारांना ‘Impossible Burgers’ या सदरात घालण्यात येतं; म्हणजेच meat न वापरता बनवलेले पण तरी meat ची चव लागेल असे शाकाहारी बर्गर! या सगळ्या चळवळीत meat ची चव नसतानाही एक अत्यंत स्वादिष्ट बर्गर बनू शकतो ही गोष्ट कुणाच्याच गावी नसते, आणि बिचारा बटाटा उपेक्षित राहतो.            

किंबहुना माझ्या संपूर्ण वास्तव्यात मला बटाट्याचं दर्शन एकाच ठिकाणी झालं: ते म्हणजे त्या फूड कोर्टमधल्या ‘हॉट पॉट’ नावाच्या गाळ्यावर. ऑफिसमधल्या टीमसोबत जेवायला आलो की त्यापैकी चिनी मंडळी हमखास हाच पर्याय निवडत. सबवेमध्ये जाऊन आपलं सँडविच आपणच तयार करण्याच्या पद्धतीसारखंच हेही. तिथे गेलात की सर्वप्रथम तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या बाउलचा आकार सांगायचा, मग शेजारी मांडून ठेवलेल्या अनेक कच्च्या अथवा शिजवलेल्या जिनसांपैकी आपल्याला हवी ती निवड करायची. मग तिथली मंडळी आपण निवडलेलं सगळं त्या बाऊलमध्ये एकत्र करून देतात. सगळे जिन्नस एकत्र बांधायला ते एक ठेवणीतलं अतिशय तिखट असं मसाल्यांचं मिश्रण वापरतात म्हणून तो ‘हॉट पॉट’! रोजच्या जेवणात मसाल्यांचा अभिमानाने पाऊस पाडणारा एक भारतीय म्हणून मी पहिल्यांदा हा प्रकार घेतला तेव्हा मला तो अगदी कष्टानेच संपवता आला. ‘तुमची काय बुवा मसालेदार खाण्याची ताकद’ ही स्तुती आपल्याला जर युरोपियनांकडून मिळाली असेल तर त्यावरून लगेच स्वतःची पाठ थोपटायची नसते हा धडा मी इथे शिकलो. पण हा प्रकार तयार होत असताना पाहायला आवडत असल्यामुळे, मी बऱ्याचदा स्वतःची ऑर्डर देऊन परत माझ्या चिनी मित्रांकडे येऊन त्यांना अगदी सफाईदारपणे आपल्या जिनसांची निवड करताना बघायचो. त्या जिनसांमध्ये मला सोलून ठेवलेले आख्खे बटाटे दिसले, शिवाय मॅगी नूडल्सचे केक, मटणबॉल्स, चिकनचे बरेच प्रकार, काही मासे असं बरंच काही दिसलं. शिवाय कच्च्या कोबीची पानं, लेट्युसची पानं आणि पातीचे कांदे हेही होते. फार पूर्वी दुसऱ्या एका फूड कोर्टमध्ये मला ‘भातासोबत काय’ अशी विचारणा झाल्यावर, मी पोटाला भीती वाटू नये म्हणून ‘फक्त veggies’ असं सांगितलं होतं, तेव्हा माझ्या पानात फक्त हे तिघेजण आले होते आणि पोट माझ्यावर जास्तच वैतागलं होतं. 

माझ्या टीममधल्या या लोकांचा दुसरा अत्यंत आवडता प्रकार सांगायचा झाला, तर त्याचं वर्णन मला ‘सिझलर’ असं करावं लागेल, पण तरी तिथे त्याला कोणीच हे म्हणत नाही. आपल्याकडे आपल्या डोळ्यांसमोर अगदी चटचट भाजल्या जाणाऱ्या या पदार्थाची मध्ये इतकी हवा झाली होती, की खास सिझलर्ससाठीच प्रसिद्ध झालेली हॉटेलं निघाली. त्यांच्यातही हा काहीतरी खूप क्लिष्ट प्रकार असल्याच्या थाटात तो अतिशय काळजीपूर्वक सर्व्ह केला जातो आणि त्या तप्त भांड्याला हात लागू न देता वरचे मऊ झालेले फ्राइज आणि वाटाणे उचलून घेण्याची कसरत जमली की दाद मिळते. या सगळ्या दिखाऊपणापासून सिंगापूर अलिप्त आहे. इथल्या फूड कोर्टमध्ये जितक्या सहजपणे तुम्ही साधा फ्राइड राईस उचलू शकता तितक्याच सहजपणे सिझलरही घेऊ शकता. आणि स्वतःच! आमच्या या ठरलेल्या फूड कोर्टमध्ये असे दोन गाळे होते. त्यातल्या एकात खूप वजनदार अशा आयताकृती दगडी भांड्यांमध्ये खूप तिखट रश्श्यात शिजवत ठेवलेले सबंध मासे आणि अशा इतर गोष्ट मिळायच्या. आणि तो मासा पूर्ण शिजलाय का नाही; त्याला सगळ्या बाजूंनी मसाला योग्य प्रकारे लागला आहे का नाही हे पाहण्याची जबाबदारी खाणाऱ्याची असते. मी एकदा माझ्या चिनी मित्राला हा प्रकार खाताना समोर बसून पाहत होतो. डाव्या हाताने तो मासा सारखा परतत ठेवत उजव्या हाताने मघाशी खाली असलेल्या बाजूचा एक तुकडा तोडून तो तोंडात सरकवत माझ्याशी pricing strategies वर गहन चर्चा करत होता. माझी मजल इथपर्यंत जाणार नाही म्हणून मी असेच सिझलर देणाऱ्या ‘Pepper Kitchen’ नावाच्या गाळ्यावर जात असे. तिथे एका गोलाकार दगडी पात्राच्या मध्यभागी भात टाकून ते त्याच्या मध्यभागी एक लहानसा खड्डा करून त्यात कणसाचे दाणे भरायचे, भाताच्या बाजूने चिकनचे तुकडे पसरायचे आणि भरपूर मिरी शिंपडून हातात द्यायचे. ते चिकनचे तुकडे आपण ते अवजड भांडं हातात घेतो तेव्हा पूर्णपणे कच्चेच असतात; आणि आपण टेबलापाशी जाऊन बसलो की सुरुवातीची काही मिनिटं चमच्याने ते परतून काढत बसतो, आणि मग हाणायला सुरुवात करतो. या पदार्थाबरोबर ती मंडळी दुसऱ्या एका छोट्या वाडग्यात आग्रहाने एक साधं सूप वाढायची. सिझलर खाताना अधूनमधून त्याचे घोट घेत राहण्याची पद्धत आहे. हे सूप म्हणजे ‘मिसो सूप’ नावाचा एक जपानी प्रकार आहे, आणि ते सोयाबीन, एक प्रकारचा सुगंधी तांदूळ आणि Seaweed वापरून तयार केलं जातं, आणि शिवाय वरून काही कांद्याच्या पातीचे तुकडे सोडलेले असतात. अशा फूड कोर्ट्समध्ये पसरलेल्या अनेक संस्कृतींच्या गाळ्यांमध्ये ही एक गोष्ट तशी common म्हणून आढळते. 

हे सूप आठवताच ‘आपुलकी’ हा मुद्दा पुन्हा माझ्या मनात येऊन गेला. इथल्या इतक्या फूड कोर्ट्समधल्या अनेक गाळ्यांवर मी जेव्हा जेव्हा हे सूप घेतलं आहे ते प्रत्येक वेळी त्यांनी आग्रहाने विचारलं म्हणूनच. माझ्यातल्या अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्याला यासंबंधी इतर पदार्थांच्या लिहिलेल्या किमतींबद्दल अनेकदा प्रश्न पडलेला आहे. या सूपचे जास्तीचे पैसे ते कधीच लावत नाहीत, आणि जर मूळ किमतीत सूपची किंमत असेल हे गृहीत धरलं, तरी ते स्वतःहून ते सूप देऊ करतात हा मुद्दा राहतोच. ते जर काही बोललेच नसते, तर माझ्यासारख्या नवख्याला आपण इतक्या वेळा न घेतलेल्या सूपचेही पैसे भरले हे लक्षातच आलं नसतं. या उदाहरणावरून मला ‘फूड कोर्ट’ या परंपरेचं एक तत्त्व सहजच लक्षात आलं: bare minimum करायचं नाही. तांत्रिकदृष्ट्या पाइनॅपल राईसमध्ये फक्त अननस आणि चिकन असेल तर पुरतं, पण बाकीच्या सगळ्या गोष्टींची पेरणी स्वतःहून करायची, तेही किमतीत अजिबात बदल न करता. आपण फक्त प्रॉन्स सांगितलेले असतानाही शिवाय फिश स्टिक्स द्यायच्या. सोडा असलेली सरबतं घेतली की एकच ग्लास आणण्याऐवजी सोडावॉटरची बाटलीच आणून द्यायची आणि ‘यातून हवं तेवढं रिफील करा’ असं सांगायचं. आणि नुसताच अगदी साधा फ्राइड राईस घेतला असेल तरी आपणहून त्यावर एक अंडं तळून घालायचं. आमच्या हॉस्टेलजवळच्या एका फूड कोर्टमधल्या एका आजोबांनी एकदा मला आणि माझ्या मित्राला चिनी नवं वर्ष झाल्यानंतर समृद्धीचं प्रतीक म्हणून चक्क एकेक संत्रं दिलं होतं. 

सिंगापूर हे आता अगदी जागतिक स्तरावर महत्त्व असलेलं ultramodern शहर झालेलं असलं, तरी त्याची पारंपरिक मुळं ही अशी टिकून आहेत. एकेकाळी दिवसभर अंगमेहनतीची कामं करणाऱ्या इथल्या नागरिकांसाठी कमी दरात पौष्टिक आणि पोटभर जेवण देण्यासाठी जन्माला आलेली ही ‘फूड कोर्ट’ची संस्कृती आजही आपली सगळी तत्त्वं  सांभाळून, खूप झपाट्याने हिशोबी झालेल्या या जगातही आपली नैसर्गिक आपुलकी टिकवून आहे. याच प्रसन्नतेचा वारंवार प्रत्यय आल्यामुळेच असेल, पण माझ्या पूर्वीच्या काहीशा नखरे करण्याची सवय असलेल्या स्वभावाला या अनुभवाने पूर्ण बदललंच, आणि शिवाय या संपूर्ण काळात मी कधीच एकटा जेवतोय असं मला वाटू दिलं नाही. सहासात वेगवेगळ्या देशांच्या आणि वयांच्या माणसांसोबत रांगेत उभं राहून, काउंटरवरच्या मंडळींचं स्मितहास्य परतवून, आपलं जेवण घेऊन चार अनोळखी माणसांसोबत एका टेबलावर बसून त्याचा आस्वाद घेणे; हे चालू असताना एकटं अजिबात वाटत नाही. उलट अशा वेळी मला मी या अफाट शहराच्या कष्टाळू जीवाचा एक लहानसा भाग वाटतो; जो अशाच इतर हजारो भागांसोबत इथे ठराविक वेळेला येतो आणि तृप्त होऊन पुन्हा आपापल्या कामाला जाताना या विखुरणाऱ्या गर्दीत हरवून जातो.     

अशा विचारांनी हरवलेल्या अवस्थेतच मी ऑफिसला परत आलो आणि त्यानंतर दहापंधरा मिनिटांतच माझी ती समस्या सुटलीही होती. शेवटी नखरे स्प्रेडशीटचे नव्हते; पोटाचेच होते. आणि तेही गेले बरेच महिने सिंगापूरमध्ये राहत होतं, मग त्याने नखरे का करू नयेत?  



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प