लेख ललाटीचा
“प्राक्तनापुढे कोणाचं काहीही चालत नाही,” डोळ्यांच्या कडांवर गेल्या काही काळापासून तंबू ठोकून राहिलेल्या अश्रूंना ‘पुसून तरी काय करावे’ या भावनेने वाहू देत महाभारतातील आणखी एक पात्र वदते, आणि माझी काहीशी चिडचिड होऊन मी ते पुस्तक बंद करतो आणि जरा मोकळ्या हवेत फेरफटका मारायला घराबाहेर पडतो. सोसायटीतून बाहेर पडत असताना तिथल्याच एका काकूंचा चप्पल तुटल्यामुळे उमटलेला “मेलं नशीबच फुटकं!” हा उद्गार आणि त्यांच्या कौतुकाने इंग्लिश मीडियममध्ये घातलेल्या मुलाची सायकलची चेन अचानक तुटल्यामुळे बाहेर पडलेली “Tough Luck!” ही अभिव्यक्ती कानावर पडते. आपोआपच सुरु झालेलं एक विचारचक्र मनात खेळवत मी टेकडीच्या दिशेने चालत निघतो.
एरवी कारुण्याने ओथंबलेल्या कहाण्या वाचताना माझ्या सहानुभूतीची क्षमता चाळीस टक्क्यांच्या वर कधी गेल्याचं मला आठवत नसलं, तरी महाभारत वाचायला मला कायमच खूप आवडतं. विशेषतः माणसांच्या कृती आणि त्यांचे संभाव्य परिणाम या गोष्टींबद्दल स्वतःशीच काही विवेचन करण्याचा मूड असेल तेव्हा तर नक्कीच. तरीही, पूर्वी एकदा युधिष्ठिर त्याच्या चारही भावांना ‘अज्ञातवासात तू कोण होणार’ हा एकच प्रश्न विचारण्यापूर्वी प्रस्तावनेदाखल त्या प्रत्येकाचे LinkedIn Profile विस्तृत करताना आढळला होता तेव्हा माझ्या जरा डोक्यात गेला होता. त्या प्रसंगापेक्षाही जास्त वैताग मला आत्ता सतत समोर येणाऱ्या या ‘प्राक्तन’ शब्दामुळे आला होता. अगदी लहानपणी हेच महाभारत आजीच्या तोंडून ऐकत असताना मला ‘प्राक्तन’ हे या सगळ्या कथेतलं प्रमुख खलनायकाचं पात्र आहे असं वाटत असे. तेव्हा कुणाचंच बरं बघता न येणाऱ्या या अज्ञात शक्तीबद्दल चीड वाटे, पण मोठं झाल्यावर पुष्कळ प्रसंगांमध्ये असं वाटून गेलं की या मंडळींचा ‘प्राक्तन’ असं म्हणून शरणागती पत्करण्याकडेच जास्त कल होता. असं वाटल्यावर माझ्या मनात आलेला पहिला प्रश्न हाच होता; की बाकीच्या सगळ्या अतिकठीण समस्यांना धीराने तोंड देण्याची तयारी दाखवणारी ही पात्रं, या एका अज्ञात शक्तीपुढे कशी इतकी सहज हताश होऊ शकत होती? प्राक्तनापुढे त्यांचं काहीच चालू शकत नाही; यावर या सगळ्यांचा एवढा विश्वास का होता? आणि प्रत्यक्षात तेच सत्य आहे का?
त्या काळी माझ्या प्राक्तनात पुष्कळ गृहपाठही लिहून ठेवलेला असल्यामुळे या प्रश्नाने तेव्हा मला फार काळ सतावले नाही. मग कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाच्या वर्गात त्याची पुन्हा नव्याने भेट झाली, पण एका वेगळ्याच रूपात. ते रूप समजण्याआधी, आपण जेव्हा ‘नशीब’ म्हणतो तेव्हा आपल्याला नक्की काय अर्थ अभिप्रेत असतो त्याकडे एक नजर टाकूया. जेव्हा आपण ‘चांगलं नशीब’ किंवा ‘सुदैव’ म्हणतो तेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली असं असतं. तसंच, आपण जेव्हा ‘वाईट नशीब’ किंवा ‘दुर्दैव’ म्हणतो तेव्हा तीच गोष्ट आपल्या मनासारखी घडलेली नसते. ‘दुर्दैव’ म्हटलं की मला नेहमी माझ्या लहानपणीचा एक खेळ आठवतो. सुट्टीत संगमनेरला जायचो तेव्हा मावशी कधीकधी येताना हरभऱ्याची मोठी डहाळी घेऊन यायची, आणि त्यानंतरचा घटनाक्रम ठरलेला असे. आजी सगळे हरभरे भाजायची आणि मग मी आणि मावशी अंगणात बसून ते हादडायचो. म्हणजे मुख्यतः मीच; कारण मावशीने खेळच तसा ठरवलेला होता. माझा एक दाणा ठरलेलाच असायचा; पण हरभऱ्याच्या एका घाट्यात जर दोन दाणे सापडले तर त्यातला एक तिला मिळायचा. त्यामुळे प्रत्येक घाटा उघडल्यावर ‘मावशीचं सुदैव!’ किंवा ‘मावशीचं दुर्दैव’ असे निकाल जाहीर व्हायचे; आणि त्यात ‘दुर्दैव’ अनेक पटींनी जास्त वेळा निघायचं हे सांगणे नलगे! यामुळे आज मी कुठेही “मला संभाव्यताशास्त्राची (Probability) गोडी माझ्या मावशीने लावली” असं लिहून द्यायला तयार आहे. आज इतक्या वर्षानंतर हा खेळ आठवून माझ्या लक्षात आलं, की अशा प्रकारे ‘सुदैव’ आणि ‘दुर्दैव’ या दोन्ही शक्यता संभाव्यतेच्या भाषेत लिहिल्या जाऊ शकतात. घाट्यात एकापेक्षा जास्त दाणे निघण्याची घटना म्हणजे ‘सुदैव’ अशी व्याख्या करावी, आणि मग तसं न घडण्याच्या घटनेला ‘दुर्दैव’ म्हणावं, म्हणजे दोन्हींच्या संभाव्यतांची बेरीज एक होते. याच एका अत्यंत साध्या साक्षात्काराचा हा सगळा विचार पुढे नेण्यात मला खूप फायदा झाला.
दरम्यान, याच उदाहरणातून आणखी एक गोष्ट आपल्यासमोर येते. ती म्हणजे हेतू एकच असतो, आणि सुदैव आणि दुर्दैव या शक्यता फक्त तो हेतू साध्य होतो का नाही यावर अवलंबून असतात. इथे एक दाणा मिळणं हा ठळक हेतू होता. (अर्थात, हा खेळ रचण्यामागे मावशीचा हा हेतू नक्कीच नव्हता हे उघड आहे. जर मला अशा प्रकारे विचार करायला उद्युक्त करणं हा तिचा हेतू असेल तर उत्तम; पण माझी दानशूरता तपासणं हा हेतू असेल तर तो अजिबातच साध्य झाला नाही!) थोडक्यात, इथे नशीब नक्की काय रूप घेतं ते ठरवण्याचा सर्वाधिकार त्या घाट्याला दिलेला होता आणि त्यातून आपल्या कृतींचा प्रभाव पूर्णपणे काढून टाकण्यात आला होता. यावरून आपल्या आधीच्या प्रश्नाला एक छान उत्तर मिळतं. प्राक्तनासमोर ती सगळी मंडळी नतमस्तक होत असत; कारण त्यांची कृती आणि त्यामागचा हेतू ही घटना घडवण्यातली फक्त एक बाजू असते, आणि उरलेलं कायम विश्वाच्याच हातात असतं. (‘काहीतरी ठरवणारी शक्ती’ या गोष्टीला आपण वेगवेगळी नावं देतो; ‘प्राक्तन’ आणि ‘देव’ ही त्यापैकीच. मला ‘विश्व’ म्हणायला आवडतं, इतकंच) आणि विश्वाचं पारडं इथे तुलनेने खूपच जास्त वजनदार असल्याचा पुरावा तर आपल्याला रोज मिळतो. तर थोडक्यात प्राक्तनाला शरण जाणं म्हणजे नशीबाच्या दोऱ्या विश्वाच्या हाती देणं. मग मला लगेच पडलेला प्रश्न म्हणजे: मानवाने स्वेच्छेने त्या का देऊन टाकल्या असतील? गोष्टींना खोलात जाऊन समजून घेणे आणि त्या ज्ञानाचा उपयोग त्या गोष्टींवर काही प्रमाणात प्रभाव प्रस्थापित करणे या मूळच्या मानवी स्वभावाशी हे विसंगत वाटतं. पण या प्रश्नाचं उत्तर तसं सोपं होतं. माणसाने हे सगळं समजूनउमजून त्या दोऱ्या कधीच विश्वाच्या हाती दिल्या नाहीत. त्याने फक्त ‘सुदैव’ आणि ‘दुर्दैव’ हे दोन प्रकार मांडले; मग पुढचं सगळं आपोआप झालं. माझ्या मावशीला हरभऱ्याचा एक दाणा मिळतोय का नाही याच्यात विश्वाला काहीच स्वारस्य नाही; किंबहुना दोन्ही घटना त्याच्या दृष्टीने इतक्या बिनमहत्त्वाच्या आहेत की कुठली का घडेना; त्याला काहीच फरक पडत नाही. फरक पडतो तो आम्हाला, कारण या दोन घटनांना तुलनात्मक महत्त्व आम्ही दिलं. आणि जोवर घाटा आमचं सोडून विश्वाचं ऐकत राहील, तोवर आमच्या नशिबाच्या दोऱ्या विश्वाच्या हातात राहतील.
माझ्या प्राक्तनाच्या प्रश्नावर अशा प्रकारे विचार करण्याची क्षमता मला तत्त्वज्ञानाने दिली, पण त्याने स्वतःचाही एक प्रश्न उपस्थित केलाच. त्याचं कामच ते. जर मानवाने एक विशिष्ट हेतू मनात ठेवून एक कृती केली, आणि तरीही शेवटी परिणाम काय होईल हे सर्वस्वी विश्वाच्याच हातात असेल, तर माणसाने मुळात ती करावी का? किंवा तो हेतू मनात बाळगावा का? शेवटी घडणार जे आहे ते विश्वाच्याच मर्जीने असेल, तर ‘हेतू’, ‘निर्णय’, ‘विवेकबुद्धी’ या संकल्पनांना आपण कुरवाळत बसण्यात काय अर्थ आहे? या प्रश्नाला तत्त्वज्ञानात ‘Determinism Vs. Free Will’ असं नाव आहे. आपण वर केलेल्या सगळ्या तर्काचा आदर करून, घडणाऱ्या घटनांवर मानवाला पूर्ण नियंत्रण असू शकतं अशी भूमिका या दोन्ही बाजू घेत नाहीत, कारण ते अर्थातच खरं नाही. आपण मनात कितीही धरलं तरी आपण हात लावू ती प्रत्येक गोष्ट आपल्या आधी गुरुत्त्वाकर्षणाचंच ऐकते. या दोन भूमिकांमध्ये वाद होतो तो या मुद्द्यावरून, की मानवी कृतींना पूर्ण नसेल, पण काही लहानशा प्रमाणात नियंत्रण आहे का? घडणाऱ्या घटनांवर आपला इवलासा का होईना पण प्रभाव आहे का? Determinism म्हणतं की नाही; आणि Free Will म्हणतं की असू शकतो.
Free Will या संकल्पनेचा साधा अर्थ घ्यायचा म्हटला तर तो म्हणजे निर्णय घेण्याची क्षमता. कुठल्याही विशिष्ट परिस्थितीत कशी प्रतिक्रिया द्यायची ते ठरवण्याची मुभा. पण यामध्ये फक्त हेतू आला, आणि त्याचं अस्तित्त्व फक्त मनात आहे. त्या निर्णयानुसार जी कृती घडते, तिचा पुढच्या घटनेवर कसा परिणाम होतो, ते यामध्ये येत नाही. आणि Determinism असं म्हणू शकतं, की जर त्यामुळे घटनेवर काहीच परिणाम होणार नसेल; तर तो हेतू काय होता याने काय फरक पडतो? त्या दृष्टीने, Free Will अस्तित्त्वात आहे, पण irrelevant आहे. इथे सगळीकडे ‘निर्णय’ म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय येऊ शकतात, पण त्यांचं विश्लेषण करणं खूप क्लिष्ट आहे कारण त्यांच्यामुळे घडणारी घटना एक नसून तिच्या साखळ्या असतात. तेव्हा आत्ता उदाहरणापुरता एक अगदी लहानसा निर्णय घेऊ. मी क्रिकेटमध्ये बॉलिंग करतोय, त्यामुळे अर्थातच माझा हेतू समोरच्या बॅट्समनला आऊट करणं हा आहे. मी आता जो बॉल टाकायला चाललोय तो थेट स्टंपात जावा अशी माझी इच्छा आहे. प्रत्यक्षात त्यावर सिक्स बसतो. इथे नक्की काय घडलं? Free Will हे काहीसं असं समजावून सांगायचा प्रयत्न करेल. ते म्हणेल की बॉलरने टाकलेल्या बॉलवर त्याचं free will सक्रिय होतंच; म्हणजेच त्या बॉलरच्या निर्णयक्षमतेचा आणि त्यानुसार केलेल्या विशिष्ट कृतीचा त्या बॉलच्या गतीवर, हालचालीवर आणि दिशेवर काहीतरी परिणाम होत होता. पण इथे एकच free will कार्यरत नसून दोन विरुद्ध free wills ची चुरस होती. सिक्स मारणं हे त्या बॅट्समनचं free will असेल, तर त्यानुसार घडलेल्या त्याच्या कृतीचा काहीतरी परिणाम त्या संपूर्ण घटनेवर होतच असणार आहे. विकेट पडायच्या ऐवजी सिक्स बसला, याचा अर्थ एवढाच की बॉलरच्या free will चा प्रभाव बॅट्समनच्या free will च्या प्रभावापेक्षा कमी ठरला. कुठलंही एक free will पूर्ण हरलं नाही की जिंकलं नाही.
आणि मघाशी वर्णन केलेल्या बाकीच्या सगळ्या variables चं काय? तिथल्या वाऱ्याची गती, पिचची स्थिती… विचार केला तर अगणित variables निघतील, कारण आपल्या दृष्टीने ही घटना ‘बॉल टाकला, सिक्स बसला’ एवढीच असली तरी प्रत्यक्षात ती असंख्य घटनांच्या साखळीतील एक टप्पा आहे. पण Free Will म्हणेल की या सगळ्या variables चा घटनेवर परिणाम निश्चित होत असला, तरी त्यांचा या प्रश्नाशी काहीच संबंध नाही, कारण ती कुणाच्याच बाजूने नाहीयेत. घडणाऱ्या घटनेवरचा त्यांचा प्रभाव हा बॉलर, बॅट्समन, टीम, देश या कशावरच आधारित नाहीये; कारण मघाशी सांगितल्याप्रमाणे, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या डोक्यातून काढल्या आहेत, विश्वाला त्यातल्या कशानेच काही फरक पडत नाही आणि ही सगळी variables विश्वाचं ऐकतात. त्यामुळे त्या variables चा प्रभाव आहे तसाच धरला, तर चुरस उत्पन्न होते ती फक्त दोन variables मध्ये: त्या दोघांच्या free wills मध्ये. हे सगळं अशा प्रकारे मांडल्यावर खूपच गुंतागुंतीचं वाटू शकेल, पण आपण जेव्हा ‘या बॉलवर बॅट्समन बॉलरपेक्षा जास्त चांगला खेळला’ असं म्हणतो, तेव्हा आपल्याला हेच सगळं म्हणायचं असतं.
त्यामुळे या टप्प्यावर मी आत्तापर्यंतचे निष्कर्ष एका समीकरणात मांडायचा प्रयत्न करतो. कुठल्याही एका कृतीचा परिणाम हा आपण त्या कृतीशी संबंधित असलेल्या आणि त्या क्षणी कार्यरत असलेल्या सगळ्या variables च्या प्रभावांची बेरीज आहे असं म्हणू शकतो. आणि बऱ्याचदा, या सगळ्या variables ची यादी करणं जवळपास अशक्यच असतं. अगदी मघाच्या उदाहरणात ‘पिचची स्थिती’ हे एक variable मानलं तरी प्रत्यक्षात त्या स्थितीला कारणीभूत अशी पुन्हा बरीच variables निघतील. पण आपल्याला अशी यादी करत बसायची गरज नाही; आपल्याला फक्त एवढंच दाखवता यायला हवं की या कृतीशी संबंधित असलेल्या कोणत्याच माणसांचा त्या variables वर काहीच परिणाम होत नाही. म्हणजेच, ती काही माणसांचं ऐकत नाहीत; त्याउलट त्यांच्या मूळच्या स्थितीनुसार त्यांनी जसं वागणं अपेक्षित होतं तशीच वागतात. आता पिचच्या स्थितीला माणसांच्या कृती, हेतुपुरस्पर किंवा निर्हेतुक, कारणीभूत ठरूच शकतात; पण इथे या बॉलिंगच्या कृतीचं विश्लेषण करताना आपण त्यांना गृहीत धरत नाही कारण या कृतीशी संबंधित फक्त बॉलर आणि बॅट्समन हीच दोन माणसं निघतात. भूतकाळात घडून गेलेल्या परिणामांच्या मागचा माणसांचा हात इथे मोजत बसण्यात अर्थ नाही. याचं कारण संभाव्यताशास्त्रातल्याच एका युक्तिवादानुसार, एखादी गोष्ट घडली हे जर सत्य असेल, तर ती घडण्याच्या टप्प्यापर्यंत काय होत गेलं त्याने काही फरक पडत नाही. म्हणजेच, एखादी गोष्ट घडण्याची संभाव्यता ही ती गोष्ट घडत नाही तोपर्यंतच लागू असते. एकदा घडली, की घटनांची ‘साखळी अ’ कारणीभूत होती का ‘साखळी ब’ याने काही फरक पडत नाही; कारण दोन्ही साखळ्यांचा शेवट हा एकच आहे जो आता घडलेला आहे. तर हे आपल्या उदाहरणात चालवून पाहिल्यावर आपण अशा सगळ्या variables चा एक गट करून टाकू शकतो, आणि हा गट ही कृती घडत असताना फक्त विश्वाचंच ऐकतो असं म्हणू शकतो. थोडक्यात, त्या गटाचा अंतिम परिणामावर असलेला प्रभाव हा अढळ आहे; संबंधित माणसांची free wills कशीही वागली तरी त्याचं वागणं ठरलेलं तेच आहे. त्यामुळे आपण असा निष्कर्ष काढू शकतो की यानंतर, अंतिम परिणाम नक्की काय होणार त्यावर प्रभाव उरतो तो फक्त या सक्रिय free wills चा, कारण संपूर्ण कृतीमध्ये स्वेच्छेने तीच बदलू शकतात.
हे सगळं ठीक आहे, पण ‘विश्वाचं ऐकणं’ म्हणजे नक्की काय? अगदी सुरुवातीच्या पातळीवर आपण असं म्हणू शकतो की विश्वाचं ऐकणं म्हणजेच भौतिकशास्त्राच्या नियमांचं पालन करणं. पण आपण त्याहूनही खोलात जायचं ठरवलं, तर भौतिकशास्त्राचे नियम आपल्याला ठाऊक आहेत तसेच का आहेत याची कारणमीमांसा करताना आपल्याला पुंजवादाकडून (Quantum Mechanics) एक खूप कुतूहलजनक उत्तर ऐकायला मिळतं. थोडक्यात सांगायचं झालं, तर ‘भाकरी का करपते?’, ‘पाने का सडतात?’ आणि ‘घोडा का अडतो?’ हे विचारल्यास आपण अगदी ऐटीत ‘न फिरवल्याने’ असं उत्तर देऊ, पण पुंजवाद म्हणेल, ‘Entropy’! ऊर्जेच्या स्वभावाचा अभ्यास करणारी भौतिकशास्त्रातली ही एक संकल्पना आहे. औपचारिक अभ्यासक्रमात न्यूटनच्या तीन नियमांच्या फारसं पुढे न गेलेल्या माझ्यासारख्यांसाठी युट्युबवर Ted Ed ने ही क्लिष्ट संकल्पना एका उदाहरणातून सुरेख समजावून सांगितली होती. ते उदाहरण म्हणजे: तुमचा वाफाळता चहाचा कप थोड्या वेळाने गार का होतो? तो चहा गरम आहे याचाच अर्थ त्याच्यात आजूबाजूच्या हवेपेक्षा ऊर्जेचं (उष्णतेचं) प्रमाण जास्त आहे. म्हणून त्यातली जास्तीची ऊर्जा हवेत जाते आणि दोन्हीकडचं प्रमाण एकसारखं होईपर्यंत हे चालू राहतं, म्हणून चहा गार होतो, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण असंच का? जर ऊर्जा दोन्हीकडे असेल, तर नेहमी कपातलीच हवेत का जाते? हवेतली कपात येऊन चहा आणखी गरम का होत जात नाही?
मला समजलेलं उत्तर असं आहे: आपण कल्पना करू की ऊर्जेची चार units कपात आहेत आणि दोन हवेत आहेत, म्हणून चहा जास्त गरम आहे. आता आपलं काम आहे या units ची हालचाल अभ्यासणं. आपल्याला माहित असलेल्या नियमानुसार, शेवटी तीन units चहात आणि तीन हवेत असं उरायला हवं. पण तूर्तास आपण काहीतरी व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षा सोडून देऊन या units ना हवं तसं फिरण्याची मुभा दिली, तर शेवटी काय बघायला मिळेल हे सांगायला आपल्याला संभाव्यतेची (Probability) मदत घ्यावी लागेल. ती असं सांगेल की, जर एक unit चहात किंवा हवेत असण्याची शक्यता ५०:५० धरली, तर चहात तीन आणि तीनच units उरण्याची, किंवा दोन्हीकडे समान संख्येने units उरण्याची शक्यता ३१.२५% एवढी निघते. तर दुसरीकडे, चहा आणखी गरम व्हायला हवा असेल तर सहाही units शेवटी चहातच निघायला हवीत, आणि त्याची शक्यता निघते केवळ १.५६%! Average घटनांची संभाव्यता ही टोकाच्या घटनेच्या संभाव्यतांपेक्षा कायमच अधिक असते, या संभाव्यताशास्त्राच्या नियमाला हे अनुसरूनच आहे. आणि जसजशी units ची संख्या वाढत जाईल तशी ती सगळी units एकाच ठिकाणी येण्याची संभाव्यता आणखीनच कमी होत जाईल. म्हणूनच अगदी अब्जावधी units असलेल्या प्रत्यक्षातल्या चहाच्या एका कपात ती इतकी कमी असेल, की ती आपल्याला आपल्या हयातीत घडताना कधीच दिसणार नाही. आणि हरकत काय? शेवटी आपल्या शास्त्रांमधले सगळे नियम हे आपण हयातीत पाहिलेल्या गोष्टींपासूनच तर प्रभावित असतात!
तात्पर्य हेच की पुंजवादानुसार विश्वातल्या सगळ्या घटनांच्या मुळाशी असलेली ही महाशक्ती म्हणजे संभाव्यता! संभाव्यता म्हणजेच प्राक्तन असंही आपल्याला म्हणता येईल. वास्तविक शक्य सगळंच असतं; आणि जे असंभव ते घडताना दिसत नाही, पण तेही घडू शकतं! या सगळ्याचा आपल्या मघाच्या चर्चेशी संबंध जोडायचा झाला तर आपण असं म्हणू शकतो, की आपली ती सगळी variables विश्वाचं ऐकतात याचा खरा अर्थ ते त्यांच्या संभाव्यतांच्या हुकुमानुसार वागतात. या सगळ्यांच्या सामूहिक प्रभावानुसार बॉल नक्की कसा पडेल ते संभाव्यता ठरवते. आणि मघाशी म्हटल्याप्रमाणे, बॉल स्टंपमध्ये पडला काय किंवा सिक्स बसला काय, संभाव्यतेला काहीच फरक पडत नाही, त्यामुळे तिचं ऐकणारी सगळी variables तिच्या मर्जीनुसारच वागतील, आणि उरलेला फरक हा फक्त त्या दोन व्यक्तींच्या free wills मुळे निर्माण होतो.
अर्थात, हे असं वाचलं तर आपल्याला असं वाटू शकेल की जो काय फरक पडायचा तो free will मुळेच पडत असेल, तर सगळ्या घटनाक्रमात free will ला सर्वाधिक महत्त्व आहे. पण प्रत्यक्षात ते या सगळ्या variables च्या गर्दीमधलं एक आहे फक्त. घटनेवरचा संभाव्यतेचा प्रभाव हा आपल्या इच्छेनुसार बदलत नसला, तरी तो असतो, आणि प्रचंड असतो. त्यामुळे आपल्या रोजच्या आयुष्यात आपल्या free will मुळे थोडा फरक पडत असला, तरी संभाव्यतेच्या प्रभावापुढे तो नगण्य असतो. पण आता हे सगळं पुन्हा Determinism च्याच दिशेने जात असल्यासारखं वाटतंय. आपलं free will जर कधीच संभाव्यतेला हरवू शकत नसेल, तर त्याच्या अस्तित्त्वाला अर्थ तरी काय? म्हणजे आपण त्याला संभाव्यता म्हटलं तरी शेवटी तो ललाटीचा लेखच ठरतो का?
या टप्प्यावर मी असं एखादं उदाहरण शोधायला लागलो की ज्यात free will चा प्रभाव संभाव्यतेला हरवण्यात यशस्वी झाला होता; म्हणजेच असा एखादा प्रसंग ज्यात संभाव्यतेच्या नियमांत अजिबात न बसणारी गोष्ट फक्त free will च्या जोरावर माणसाने घडवून आणली. असं उदाहरण शोधायला जायचं असेल, तर ते आपल्या भौतिक अस्तित्त्वात क्वचितच सापडेल असं मला वाटलं. आपल्या आजूबाजूचा निसर्ग, विश्व, फार काय आपल्याच शरीरात चालू असलेल्या प्रक्रियांवर तरी कुठे आपल्या free will चा तेवढा प्रभाव असतो? माझ्या free will ने साधी शिंक रोखायचं जरी ठरवलं तरी माझं नाक आणि त्यातल्या शिंकेला कारणीभूत असलेल्या सगळ्या मंडळींच्या दोऱ्या संभाव्यतेच्याच हातात असतात. म्हणून मला जर असं उदाहरण शोधायचं असेल तर ते अशाच ठिकाणी शोधावं लागेल, जिथे सक्रिय असलेल्या कुठल्याच variables वर या वैश्विक महाशक्तीचा काहीच प्रभाव असू शकत नाही.
असं काही अस्तित्त्वात असू शकेल का? असेल तर ते संपूर्णपणे मानवनिर्मित असायला हवं. क्रिकेटचा खेळ हा मानवनिर्मित असला तरी त्यातल्या सगळ्या वस्तू, मैदान, खेळाडूंची शरीरं यातलं काहीच मानवनिर्मित नसतं. खरंतर आपण एरवी सहज मानवनिर्मित म्हणतो त्या इमारत, यंत्रं, वाहनं अशा सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात मानवनिर्मित नसून मूळच्या नैसर्गिक गोष्टींना मानवाने दिलेलं वेगळं रूप असतं. आणि नैसर्गिक गोष्टी संभाव्यतेचं ऐकतात. पूर्णपणे मानवनिर्मित असं काय असू शकेल? विचार इथपर्यंत आला तेव्हा मी जरा ब्रेक घ्यायचं ठरवून फोन उघडला आणि त्यात मला ‘शेअरबाजार अजूनही कोसळतोय’ असं एक notification आलेलं दिसलं.
आणि अचानक मला एक संपूर्णपणे मानवनिर्मित गोष्ट सापडली होती; आणि तेवढंच नाही तर मला हवं होतं ते उदाहरणही सापडलं होतं. शेअरबाजारात फिरणारे शेअर्स ज्या कंपन्यांचे असतात, त्यांना अर्थातच भौतिक अस्तित्त्व असतं आणि त्यांच्या रोजच्या नफातोट्यावरही भौतिक घटकांचा प्रचंड प्रभाव असतो. त्यामुळे शेअरबाजारातल्या हालचाली या फक्त कंपन्यांच्या performance वर आधारित असत्या तर तोही संभाव्यतेचा गुलाम असता, पण प्रत्यक्षात तसं घडत नाही! प्रत्यक्षातल्या शेअरबाजाराचं स्वरूप म्हणजे मुख्यतः त्यात फिरणाऱ्या अगणित शेअर्सच्या किमतींवरून जगभरातल्या लोकांमध्ये होणारे मतभेद, आणि अधूनमधून एकमत! फक्त माणसांच्या मतांवर आधारित असल्यामुळे, तो पूर्णपणे मानवनिर्मित असू शकतो, कारण या मतांच्या पलीकडे त्याला काही भौतिक अस्तित्त्वच नाही. तर शेअरबाजारात संभाव्यतेला हरवणं शक्य आहे का?
नुसतं शक्यच नाही, तर ते घडून गेलेलंही आहे. मला पूर्वी मी वाचलेले काही case studies आठवले. रॉबर्ट शिलर नावाच्या एका नोबेल पारितोषिक विजेत्या अमेरिकन अर्थतज्ञाने एकदा मानवी मतं, विचार आणि भावना अमेरिकन बाजाराला कुठपर्यंत फिरवू शकतात यावर अभ्यास केला होता. त्यांनी सर्वप्रथम बाजाराला संभाव्यतेच्या नियमांत बसवण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांच्या असं लक्षात आलं की सलग तीन दिवस बाजार १०% कोसळणे या घटनेची संभाव्यता इतकी कमी आहे, की अगदी विश्वाच्या जन्मापासून आजतागायत प्रत्येक क्षणी अमेरिकन बाजार चालू असेल असं धरलं, तर अशी घटना फारतर एकदा घडलेली असेल. याचा अर्थ बाजारात वावरणाऱ्या लोकांनी ही घटना घडणार नाही असं गृहीत धरून चालावं ना? पण वास्तवात हीच घटना मागच्याच शतकात तीनदा घडलेली आढळून आली. याचं कारण एवढंच की जर बाजारातल्या घटना या फक्त माणसांनी घेतलेल्या निर्णयांनुसार घडत असतील, तर पुरेशा लोकांना ‘पडेल’ वाटलं तर तो खरंच तेवढा पडेल. तीन दिवस का, दहा दिवस पडेल! आपल्या बाकीच्या कुठल्याही उदाहरणात फक्त आपण ठरवलं म्हणून काहीतरी घडवून आणणं तितकं सहज शक्य नसतं आणि आपल्याला संभाव्यतेची परवानगी लागते, पण इथे फक्त पुरेशा लोकांनी मिळून ठरवलं तर हे खरंच घडू शकतं. कारण इतकंच की हे फक्त free will चंच साम्राज्य आहे, आणि विश्वाला यात बोलायला काही वावच नाहीये! अर्थात, हे जसं शेअरबाजारात लागू होतं तसंच निवडणुका, opinion polls, survey based research अशा सगळ्या ठिकाणी लागू होतं. ज्या गोष्टींचं संपूर्ण अस्तित्त्व मानवी निर्णयांवर आधारित असतं, त्या प्रत्येक गोष्टीबद्दल हेच घडतं. फार काय, ‘समाज’ हीच मुळात एक संपूर्णतः मानवनिर्मित संकल्पना आहे. त्यामुळे समाजाच्या आखणीत आपण ठरवलेली नाती, भूमिका, परस्परसंबंध यातल्या कशातच वैश्विक संभाव्यतेला काहीच बोलता येत नाही, कारण या सगळ्या आपणच केलेल्या व्याख्या आहेत, आणि त्या आपण म्हणू ते रूप धारण करतील. अगदी माझ्या आणि मावशीच्या खेळाबद्दल बोलायचं झालं, तर हरभऱ्याच्या घाट्यात एक दाणा असेल का दोन हे संभाव्यताच ठरवते, आणि आम्ही त्यातल्या सुदैव आणि दुर्दैव या केलेल्या व्याख्यांनुसार काय निघणार हेही ठरवते. पण हरभऱ्याच्या घाट्यात एकच दाणा निघाल्यावर, मावशीने ठरवलं की ‘दुर्दैव’ म्हणून गप्प न बसता ‘आता फार झालं’ म्हणून तो दाणा स्वतःच खाऊन टाकायचा, तर ते घडणं काही संभाव्यता थांबवू शकत नाही, कारण तो आमचा प्रश्न आहे!
विचारचक्र कधीच थांबलेलं असतं आणि माझं चालणं आटोपून मी घरी परत आलेलो असतो. सगळे निष्कर्ष अजूनही डोक्यात घोळत असतात. Free will अस्तित्त्वात असतं. ते काही घटनांवर पूर्ण प्रभाव पाडू शकत असेल, तर उरलेल्या सगळ्या घटनांवर त्याचा अगदी इवल्याशा प्रमाणात का होईना, पण प्रभाव असतो. संभाव्यता सर्वशक्तिमान नाही. प्राक्तन सर्वशक्तिमान नाही. आपण घेतो त्या निर्णयांना काहीतरी महत्त्व असतं. आणि म्हणूनच, बहुतेकवेळा संभाव्यतेपुढे आपलं काहीच चालत नसलं, तरी आपण आपलं free will वापरण्याची एकतरी संधी का सोडावी? समजा त्याक्षणी निघालं आपलं free will पुरेसं सशक्त, तर कुणी सांगावं? अक्षरशः काहीही घडू शकतं.
वा! सोप्या शब्दात गणिती आणि तत्वज्ञानाच्या संकल्पना उलगडून दाखवाव्यात ते तूच!
ReplyDelete