माय
“हो, आहे ना माझा एक ब्लॉग. मी लिहितो माझ्या प्रवासांबद्दल, अनुभवांबद्दल, डोकं फिरवणाऱ्या आधिभौतिकातल्या प्रश्नांबद्दल…”
“ओह!!!”
“त्यावरच्या नव्वद टक्के गोष्टी मराठीत आहेत,”
“ओह….”
अर्थातच, वरच्या दोन्ही ‘ओह’ मध्ये फरक असतो. उत्कंठेच्या फुग्याला टाचणी लावायच्या आधीचा आणि नंतरचा असे ते दोन उद्गार असतात. हा संवाद अगदी अशाच प्रकारे मी पुण्यातच एका नव्या नोकरीला लागल्यापासून चारपाच वेळा तरी घडला असेल. गेल्या काही वर्षांत मी माझी हे सांगण्याची शैली पुष्कळ सुधारली होती; नुसतंच “माझा ब्लॉग आहे. वाचा हं!” असं म्हणायच्या ऐवजी त्यांना आधीपासून रस असलेल्या एखाद्या विषयावर जरा चर्चा करून मग “यावरच मीही काहीतरी लिहिलंय,” असं म्हणून त्यांना उद्युक्त करण्याची कला मला आता जमली आहे. सुदैवाने या नव्या नोकरीच्या ठिकाणी आधिभौतिकात रस असलेले खूप जण निघाले म्हणून त्यांना वाचकांच्या गर्दीत आणणं सोपं झालं, पण काही क्षणांपुरतं. बहुतांश गोष्टी मराठीत आहेत हे ऐकल्यावर त्यांचा उत्साह ओहोटीसारखा ओसरताना मी पाहू शकत होतो.
अर्थात यात त्यांची काही चूक नव्हती कारण मराठी त्यांच्यापैकी काहींची मातृभाषा नव्हती. पुण्यात बराच काळ राहिल्यामुळे त्यांना कामापुरती बोलता येत होती, पण वाचता येत नव्हती. पण घडलं असं की या प्रत्येक प्रसंगी हे कळल्यावर त्यांचा पुढचा प्रश्न म्हणजे, “तू तुझ्या लेखांचं इंग्रजीत भाषांतर का करत नाहीस?” सुरुवातीला एकदोनदा मीही याचा जरा गांभीर्याने विचार केला. मधल्या काळात माझे भारताबाहेरचे मित्र खूप वाढले होते आणि त्यांच्यापैकी पुष्कळांना माझ्या काही विशिष्ट लेखांमध्ये रस होता. काही फ्रेंच, काही चिनी, काही इतर कुठल्या देशांचे अशा सगळ्यांना जोडणारा दुवा तेव्हा अर्थातच इंग्रजी होती, आणि म्हणून तेव्हाही हा विचार एकदोनदा माझ्या मनात येऊन गेला होता. असंच एक दिवस मी हिय्या करून माझ्या एका लेखाचं भाषांतर करायला बसलो. तशी काही अडचण नसायला हवी होती; मूळ मराठीतले सगळे विचार माझेच होते आणि माझं इंग्रजीही चांगलं होतं. पण मला काही वेळ खटपट केल्यानंतर तो प्रयत्न सोडून द्यावा लागला, कारण पुन्हापुन्हा मी जसा मांडला होता तसा विचार खरंच केला असेल असं मलाच पटत नव्हतं. स्वतःच्याच अनुभवांचं वर्णन करणारे लेख सोडाच, पण इतर काही फक्त तात्त्विक युक्तिवाद असलेले लेख तरी मला जमायला हवे होते असं मला वाटलं, कारण त्यांच्यातलं तत्त्वज्ञान मी मुळात इंग्रजीतून शिकलो होतो. पण छे! आपणच केलेला पदार्थ आपल्यालाच बेचव लागावा असं होत होतं; आणि बेचव आहे हे माहित असतानाही तो खात राहायला आपण म्हणजे काय इतर आहोत? दिला फेकून तो प्रयत्न ड्राईव्हवरच्या कचरापेटीत. आणि आता ज्यांनी मला आधीच्या लेखांचं भाषांतर करायला सुचवलं त्यांच्याच बद्दल हा नवा लेख लिहितोय, आणि तेही त्यांना अजिबात कळणार नाही अशा स्वरूपात!
तो पदार्थ बेचव का लागावा यावर मी जरा वेळ विचार केला. मग माझ्या असं लक्षात आलं की चांगल्या प्रकारे भाषांतर करण्यासाठी फक्त त्या दोन भाषांवर प्रभुत्व असून पुरत नाही. हाच अनुभव खूप पूर्वी मी फक्त ‘इंग्रजीचा सराव’ या शुद्ध हेतूने पु.लं.च्या चार गोष्टी इंग्रजीत भाषांतरित करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा आला होता. प्रत्येक लेखच काय, अगदी प्रत्येक वाक्यही फक्त त्यातल्या शब्दांचं बनलेलं नसतं. त्या शब्दांची तशाच प्रकारे रचना करण्यामागे आपल्या मनात काहीतरी विचार झालेला असतो, आणि आपण आता सवयीने हे इतक्या सहजपणे करू शकतो की हे घडतंय याची आपल्याला जाणीवच होत नाही. कॉलेजमध्ये तत्त्वज्ञानाच्या एका शिबिरात याच प्रश्नावर एकदा खूप छान चर्चा रंगली होती; आणि तो प्रश्न म्हणजे: विचार करायला भाषा लागते का? सुरुवात विचार फक्त भाषेतूनच होऊ शकतो या भूमिकेपासून मग स्वप्न, काही अनुभूतींची मीमांसा वगैरे गोष्टींवरून फिरून शेवटी या भूमिकेवर आला की प्रत्येक विचारात भाषा असलीच पाहिजे असं नसतं आणि बरेच विचार भाषेशिवायही प्रकट होऊ शकतात. पण तरीही, विचार करणं म्हणजे नक्की काय ते आधी ठरवावं लागेल. जर फक्त मनाच्या समुद्रात उठणाऱ्या लाटा म्हणजेच विचार असं म्हटलं तर त्यांना भाषा लागतेच हे पटत नाही. पण त्याच अस्थिर लाटांवरून एक विशिष्ट दिशा गाठायचा प्रयत्न करणारे तारू म्हणजे विचार असं म्हटलं तर तिथे भाषा येते; कारण आपल्या अस्ताव्यस्त विचारांना आपल्यालाच नीट समजेल आणि नंतर आठवता येईल असं रूप द्यायचं झालं तर भाषा लागते. थोडक्यात, ‘विचार’ या गोष्टीची ‘प्रेरणा’ आणि ‘मांडणी’ अशा दोन घटकांत विभागणी केली तर दुसऱ्या घटकासाठी भाषा गरजेची असते हे आपल्याला पटतं. आणि तरीही, ती मांडणी आपण बोलताना किंवा लिहिताना अगदी तशीच्या तशीच उतरवतो असंही नाही. इतरांना वाचता किंवा ऐकता येईल आणि रुचेल असं काहीतरी लिहायचं किंवा बोलायचं असल्यास ती मनातली मांडणी आहे तशीच उतरवणं शक्य नाही. पण म्हणूनच आपण जेव्हा ते वाक्य लिहितो तेव्हा आपल्या डोक्यात ती मांडणी कुठेतरी घर करून बसलेली असते, आणि तशीच मांडणी वाचकाच्या मनातही निर्माण झाली तर ते आपल्याला ‘भिडलं’ असं आपण म्हणतो. या पार्श्वभूमीवर, मी पु.लं.चा लेख वाचताना त्यांना अभिप्रेत असलेली मांडणी काही प्रमाणात तरी समजू शकलो म्हणून मला तो आवडला, पण त्याचं यशस्वीरीत्या भाषांतर करायचं असेल तर मला ती मांडणी मोडून ती इंग्रजीतून पुन्हा नव्याने बांधावी लागेल. नाहीतर, शब्दांच्या पातळीवर माझं इंग्रजी वाक्य अगदी बिनचूक असेल पण त्यातून तीच भावना काही केल्या पोहोचवता येणार नाही, कारण त्या शब्दांना एकत्र गुंफून अर्थ प्राप्त करणारा दुवा वेगळ्याच भाषेतला राहील. यामुळेच जेव्हा कुणी मठ्ठ व्यक्ती ‘मला ते असं फील झालं’ असं काहीतरी बडबडते तेव्हा या चिरफाडीचं कारण मनातली मांडणी इंग्रजी आणि बोलणं मराठी हे आहे हे आपल्याला कळू शकतं. याच विवेचनातून आणखी एक मुद्दा मग सहजच समोर येतो; तो म्हणजे काही गोष्टींचं भाषांतर होऊच शकत नाही. पु.लं.च्या आणि मराठीतल्या इतर अनेक मोठ्या लेखकांच्या बाबतीत असं नक्कीच म्हणता येईल. माझ्या स्वतःच्या बाबतीत बोलायचं झालं तर कदाचित माझ्या ब्लॉगवरच्या गोष्टी भाषांतरित होऊ शकतील, पण मला स्वतःला ते करता येणार नाही. मी मुळात लिहितो कारण माझ्या सगळ्या अस्ताव्यस्त अनुभवांना असं मराठीतून एक समजून घेता येईल आणि पुन्हापुन्हा अनुभवता येईल असं रूप देता यावं म्हणून; आणि म्हणूनच ते वाक्य लिहिताना त्यामागची माझ्या मनातली मांडणी मला खूप प्रिय असते. मग तीच मोडून काढायची? आपण अभिमानाने ज्याप्रमाणे ‘बोलतो मराठी’ आणि ‘ऐकतो मराठी’, त्याचप्रमाणे ‘विचार करतो मराठी’ हेही आपल्याला लाभलेलं तितकंच मोठं भाग्य आहे, आणि आपल्या मराठी असण्याचा खराखुरा गाभा आहे.
लहानपणापासून माझं आणि मराठीचं अगदी साधंसरळ नातं होतं. कधीकधी ‘तुमचं तुमच्या देशावर किंवा आईवडिलांवर प्रेम आहे का’ अशा आशयाचे प्रश्न समोर आले की आपल्यापैकी भाग्यवान मंडळींना जसं ‘दुसरं काय असणार आहे’ अशाच रूपात उत्तर सुचतं, तसंच माझं मराठीच्या बाबतीत होत असे. बोलणं तर लांबची गोष्ट; यातलं काहीही येत नसतानाही मी मराठीतूनच रडायचो. माझा पहिला शब्द अर्थातच मराठीतला होता. तो नक्की काय होता याबद्दल जरा दुमत आहे, पण तो मराठी होता याबद्दल काही वाद नाहीये. मधल्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकल्यामुळे आणि त्यापेक्षाही इंग्रजी साहित्याची आवड निर्माण झाल्यामुळे, माझे माझ्या या ‘मावशी’शी असलेले संबंध खूप सुधारले. कालांतराने त्यात जर्मन, जपानी या मावश्यांचीही भर पडली. पण अधूनमधून वाचन आणि एरवी कामापुरतं या भाषांना वापरून, उरलेला सगळा वेळ मराठीतूनच जगत असल्यामुळे, ती बोलताना किंवा ऐकताना अगदी अभिमानाने ऊर भरून वगैरे यायचा नाही. तो तसा भरून यायला सुरूवात झाली ती सिंगापूरला राहायला गेल्यावर, कारण तिथे पहिल्यांदाच मला रोजच्या जीवनात सर्वत्र इंग्रजी वापरणं भाग पडलं. तेव्हा मी तिथे एकटा फिरताना आजूबाजूच्या गोष्टींवर मराठीतून उत्स्फूर्त प्रतिक्रिया द्यायचो आणि ते अनुभव लिहून काढायची वेळ आली की मराठीतूनच लिहायचो, पण यातलं काहीच ‘आपल्या मातृभाषेचं आणि आपलं नातं घट्टच राहायला हवं’ अशा कुठल्याही जाणीवपूर्वक हेतूने नाही तर पुन्हा ‘दुसरं काय करणार आहे’ अशा साध्यासरळ विचाराने! अगदी दुसऱ्या कोणासोबत असतानाही मला जर ठेच लागली तर त्याला कळावं म्हणून मी काय इंग्रजीत आईगं करणार आहे? पण तिथल्या माणसांशी बोलताना आपण कुठेच आपली भाषा वापरू शकत नाहीये हे जरा बोचायचं; आणि म्हणूनच माझ्या तिथल्या वास्तव्यातले काही ठळक प्रसंग माझ्या मनात घर करून बसले आहेत. माझ्या तिथल्या इंटर्नशिपच्या सुरुवातीच्या काही दिवसांत मी पुण्याचा हे कळल्यावर माझी मूळची ओडिशाची असलेली मॅनेजर “मला थोडंथोडं मराठी येतं बरं का; आपण अधूनमधून बोलत जाऊया म्हणजे माझंही सुधारेल,” हे इतक्या अस्खलितपणे बोलली की “नक्की काय सुधारायला हवंय” हे माझ्या अगदी तोंडावर आलं. तिथले फ्रेंच आणि चिनी मित्र, मी भारतीय आहे म्हटल्यावर माझी मातृभाषा हिंदीच असणार असं उगाच गृहीत न धरता ती काय आहे ते विचारायचे, मग मला मराठीतून काहीतरी बोलण्याची विनंती करायचे आणि मग तसे उच्चार करायचा प्रयत्न करायचे, हे सगळं मला आवडायचं, पण मी सांगितलेला एखादा शब्दप्रयोग आवडला तर तो नंतर लक्षात ठेवून वापरायचे तेव्हा तर ते अनेक पटींनी जास्त आवडायचं. माझा मूळचा गोव्याचा असलेला होस्टेलवरचा अमराठी मित्र, आम्ही एकत्र चालत असताना आईचा व्हिडिओ कॉल आल्यावर मोठ्या उत्साहाने तिच्याशी “काकू, कसे आहात? तिथे वातावरण कसं आहे?” वगैरे तोडक्यामोडक्या मराठीत चार वाक्यं बोलला होता; असे अनेक लहानसहान प्रसंग. पण माझ्या अगदी मनावर कोरला गेलेला प्रसंग एकच. माझी इंटर्नशिप संपत आली तेव्हा एका शनिवारी मला माझ्या टीमच्या बॉसनी त्यांच्या घरी जेवायला बोलावलं. ते तमिळ होते आणि बऱ्याच वर्षांपासून त्यांच्या परिवारासह सिंगापूरला राहत होते. त्यांच्या आईंना इंग्रजी येत नव्हतं आणि मला तमिळ, म्हणून आमच्यात संभाषण झालं ते माझ्या बॉसनी दुभाष्याची भूमिका केली म्हणूनच. आमचं जेवण चालू असताना मध्येच त्या माझ्या बॉसना घेऊन जरा वेळ आत गेल्या आणि मग मी निघायची वेळ झाल्यावर माझ्याकडे येऊन मला “आवडलं ना सगळं? बरं वाटलं मला खूप तू आलास ते. आता उशीर झालाय, त्यामुळे नीट जा. स्वतःची काळजी घे,” असं सगळं मराठीतून सांगितलं. त्या क्षणी माझ्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आलं होतं. समोरच्या व्यक्तीला अगदी क्षणात आपलंसं करून घ्यायचं असेल तर त्यांच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करायचा हे मी सिंगापूरला शिकलो होतो, आणि त्याचा काही फ्रेंच, चिनी आणि तमिळ लोकांच्या बाबतीत अगदी जादूसारखा परिणाम होताना पाहिलंही होतं, पण भारतात एवढ्या भाषा आणि त्यातही ‘आपली शाखा कुठेही नसल्यामुळे’ कुणी मराठीतून माझ्यासाठी हेच करायचा प्रयत्न करेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. हिंदीवरही समाधान मानायला मी तयार होतो. अशात कोणीतरी असं ध्यानीमनी नसताना एकदम इतक्या मायेने बोललं की जे वाटतं त्याचं वर्णन करायला अगदी मराठीही अपुरीच पडेल. मग मला खूप प्रकर्षाने वाटलं की मराठी बोलण्यात उगाच कमीपणा वाटणाऱ्या इकडच्या काही मंडळींना तिथे न्यावं आणि त्यांच्याबाबतीत हाच प्रकार घडताना पाहावं. अशाच कोणी चिनी किंवा थाई माणसाने त्यांना पाहून मराठीत बोलायचा प्रयत्न केला, तर ते इथे जसं झटकून टाकतात तसंच तिथे करतील का? आणि त्यांनी तसं केलंच, तर जो आदर आपण त्यांच्या मातृभाषेला दाखवतोय तो ते स्वतःच दाखवत नाहीयेत हे पाहून ती चिनी किंवा थाई मंडळी किती आश्चर्यचकित होतील? अगदी मायक्रोसॉफ्ट एक्सेलदेखील आग्रहाने चिनीतूनच वापरणारी ती स्वाभिमानी माणसं आपल्याकडच्या या वृत्तीला पाहून किती कोड्यात पडतील?
त्यांना वाटायचं तेवढं आश्चर्य वाटू देत; त्यांच्या आणि आपल्या परिस्थितीत जमीनअस्मानाचा फरक आहे, असा युक्तिवाद अशा वेळी मग इकडे खूपदा ऐकायला मिळतो. जर्मन आणि जपानी लोकांनी आग्रहाने स्वतःच्याच भाषेत स्वतःचं काम बघावं आणि इतरांनाही तसंच करावं लागावं, ही परिस्थिती आपण जाणून आहोत. या दोन्ही देशांत काम हुडकायला जाताना ‘तुमची मातृभाषा जर्मन; माझी मराठी, पण आपल्या दोघांनाही इंग्रजी येते तर त्यातूनच सगळं करू’ असं म्हणायला गेलो तर त्यांचं उत्तर हमखास ‘आधी जा आणि जर्मन शिकून या, मग आपण पुढचं बोलू’ असंच असतं. तो त्यांचा हक्कही आहे. हे दोन्ही देश कधी ब्रिटिश साम्राज्याचा भाग नव्हते, हे एक कारण, आणि उर्वरित जगाला त्यांच्या अटी स्वीकाराव्या लागतील एवढं एका विशिष्ट बाबतीतलं कर्तृत्त्व या दोन्ही देशांचं आहे. औद्योगिक तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये अनुक्रमे जर्मनी आणि जपान यांनी स्वतःचं जे स्थान निर्माण केलं आहे, त्या स्थानामुळेच या बाबतीत जगाच्या उपयोगी पडताना त्यांचे बरेच नियम ते स्वतः ठरवू शकतात. भाषा हा त्यापैकीच एक. गेल्या काही दशकांत चीनने स्वतःसाठी हीच परिस्थिती निर्माण केली आहे. भारताकडे अजूनतरी ते स्थान नाही हे स्पष्ट आहे. पण या संपूर्ण युक्तिवादात एक महत्त्वाचा मुद्दा बाजूलाच राहतो; तो म्हणजे या देशांतल्या मंडळींच्या भाषाभिमानाला कारणीभूत त्यांची जगाच्या बाजारपेठेतली आर्थिक प्रगती मुळीच नाहीये. तो भाषाभिमान कायमच होता; आता फक्त कामाच्या बहुसंख्य ठिकाणी त्याला जागणं त्यांना शक्य झालंय इतकंच. उदाहरणार्थ, माझ्या Masters in Finance चा संपूर्ण अभ्यासक्रम हा इंग्रजीतून होता, ते विद्यापीठ फ्रेंच असलं तरी, कारण जगाच्या वित्तीय बाजारपेठांचं काम पुष्कळसं इंग्रजीतून होतं. त्यामुळे वर्गात शिक्षकांशी आणि आपापसांत कामाचं बोलत असले की ही सगळी फ्रेंच, चिनी, जपानी, थाई मंडळी एकमेकांशी इंग्रजीतून बोलायची, पण मध्येच अगदी ‘काय उकडतंय नाही’ असं म्हणायची वेळ आली की लगेच त्यांच्या मातृभाषेत. इंग्रजीच्या जागतिक प्रभावामुळे आपल्याला ती वापरणं भाग आहे असं स्पष्टीकरण देणाऱ्या इथल्या कोणीही हे विसरता कामा नये की गप्पा मारायची वेळ आली की दोन फ्रेंच, दोन चिनी किंवा दोन जर्मन माणसं जवळपास कधीच इंग्रजीतून बोलत नाहीत, आणि वर कारण विचारायचा कोणी उर्मटपणा केलाच तर ‘आम्हाला आमच्या भाषेतून जितक्या सहजपणे व्यक्त होता येतं तितकं इंग्रजीतून होता येत नाही’ असं सांगतात. पण दोन मराठी माणसं मात्र अगदी महाराष्ट्रातच राहून इंग्रजीत गप्पा मारताना आढळतील, आणि शिवाय ‘आम्हाला इंग्लिशमधून स्वतःला एक्सप्रेस करणं जास्त इझी वाटतं’ असं म्हणतील. हे शेवटचं विधान दुर्दैवाने सत्यकथेवर आधारित आहे.
पण मग, माझ्या स्वाभिमानाच्या आसनावरून अशा सगळ्यांकडे थेट टीकास्त्र फेकत बसण्याऐवजी, जरा त्यांच्या भूमिकेतून विचार करावा असं मला वाटलं. इंग्रजी का जास्त सोपी वाटत असेल? वेगवेगळी उत्तरं असू शकतात; आणि त्यातलं एक उत्तर नक्कीच हे आहे की आपल्याकडे, विशेषतः पुण्यात, मराठी वापरताना जरा कुठे चूक झाली की एकदम ढाल-तलवारीच बाहेर निघतात, आणि यामुळे साध्य एकच होतं की मराठी मनापासून बोलण्याची धडपड करणाऱ्या माणसाचा हुरूप जातो आणि त्याच्या मनात उलट मराठीबद्दल भीती बसते. अशात त्याला इंग्लिश वापरणं जास्त सोयीस्कर वाटतं, कारण एक म्हणजे इंग्लिशमधल्या चुका समोरच्याला तितक्या सहज काढता येत नाहीत कारण पुष्कळदा समोरच्याचाही याबाबतीत आनंदच असतो. दुसरं म्हणजे, आपल्या समाजात व्यवस्थित मराठी बोलणाऱ्या माणसापेक्षा चुका करत इंग्लिश बोलणाऱ्याला जास्त मान मिळतो. इंग्रजी बोलता येणं ही बुद्धिमत्तेची खूण नाही हे आपल्या समाजाच्या डोक्यात शिरायचं तेव्हा शिरेल, पण दरम्यान आपल्यापैकी स्वाभिमानी मंडळींनी मराठी बोलताना लहानशी चूक झाल्याबद्दल समोरच्याला गाढवांत काढणं आणि ‘बोली’ ला ‘अशुद्ध’ म्हणत राहणं थांबवलं, तरी पुष्कळ फरक पडेल.
पण एरवीही अशा प्रकारचा विचार न करणाऱ्यांनाही इंग्रजी जास्त सोपी वाटू शकते हे, ज्या मंडळींना इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांचा स्वभाव माहित आहे त्यांना चटकन लक्षात येईल. माझ्या मते प्रत्येक भाषेला स्वतःचा असा एक स्वभाव असतो, जो तिच्यामध्ये उतरण्यास कारणीभूत त्या समाजातल्या चालीरीती, गुणदोषाच्या कल्पना असं सगळं असतं. मी नुकतीच जपानी भाषा शिकलो तेव्हा मला प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे या भाषेच्या स्वभावाचं मूळ स्वरूप ‘नम्रता’ हे आहे. नम्रता दर्शवणारे शब्द आणि वाक्यप्रयोग सगळ्या भाषांमध्ये असतात, पण इथे मूळ जपानी समाजातच नम्रता हा अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला गुण असल्यामुळे या भाषेत ती शब्दांपलीकडे उतरते. याचे एक उदाहरण म्हणजे, जपानी वाक्यामध्ये, कर्ता ‘मी’च असला तरी त्याचा थेट उल्लेख टाळण्यात येतो. यामागचा त्यांचा विचार म्हणजे, आपण अगदी स्वतःच करत असलेल्या गोष्टींबद्दल जरी बोलत असलो तरी सारखं ‘मी’ ‘मी’ करणं शोभून दिसत नाही. त्यामुळे बरीच जपानी वाक्यं “काम करतोय”, “भेटणार आहे”, “दुकानात चाललोय”, अशीच असतात. याउलट भाषेत ‘तू’ किंवा ‘तुम्ही’ साठी एक शब्द जरी असला, तरी तो प्रत्यक्षात बोलताना वापरणं म्हणजे अनादराची पराकाष्ठा मानली जाते. त्यामुळे कुणालाही संबोधताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं असा नियम आपल्याला दिसतो. थोडक्यात, जर आपण आपल्याच घरातल्या कुणाला “झालं का जेवण साहेबांचं,” असं जपानीत म्हणालो तर आपण आचारसंहितेला धरूनच वागत असतो; पण हेच वाक्य आपण मराठीत म्हटलं तर त्यात इरसालपणा, उपरोध, समोरच्याची प्रेमळ थट्टा असं सगळं येतं, पण नम्रता चुकूनही येत नाही!
याला कारण मराठीचा स्वभाव, आणि त्याचं वर्णन करायला मला ‘खेळकरपणा’ याहून चांगला शब्द सुचत नाहीये. प्रसंगी ही भाषा सहज गंभीर होऊ शकते; प्रसंगी तितक्याच सहजपणे निर्विकारही होऊ शकते. पण या खेळकरपणाचा गाभा हा मनात जी कुठली भावना आहे, तिला गरजेपुरतंच वजन देण्यात आहे. मी मराठीला पुष्कळदा गंभीर होताना पाहिलेलं आहे, पण कधीच वाजवीपेक्षा जास्त गंभीर झाल्याचं पाहिलेलं नाहीये. एखादी गोष्ट लाजिरवाणी ठरली तर ती तिला लाजिरवाणीच म्हणेल; लांच्छनास्पद म्हणणार नाही. आणि जेव्हा लांच्छनास्पद म्हणेल तेव्हा घडलेली गोष्ट तिला खरंच अगदी तेवढी बोचली आहे हे आपल्याला सहज जाणवेल. तसा हा शब्द बोलीत मी एकदाच ऐकलाय. एकदा बसने संगमनेरला जाताना आमच्या मागच्या सीटवर बसलेल्या दोन काकू कशाचंतरी वर्णन सारखं ‘लांच्छनास्पद’ असं करत होत्या. प्रवासात मिळेल ती करमणूक प्रसादासारखी स्वीकारायची ही शिकवण लहानपणीच मिळालेली, आणि त्या न्यायाने त्या काकूंचं सगळ्या बसला ऐकू जाईल असं संभाषण मी आणि आईने तसं संपूर्णच ऐकलं होतं. तेवढ्यावरून ते जे काही होतं ते ‘लांच्छनास्पद’ अजिबातच नव्हतं हे स्वच्छ कळत होतं, आणि म्हणून मी आणि आई सारखे यावर हळूच हसत होतो. आत्ता तो प्रसंग आठवल्यावर मला असं वाटतं, की खुद्द मराठीही त्या प्रकाराला हसत बसली असती. जगातल्या हेतू नसताना प्रचंड विनोदी ठरणाऱ्या गोष्टींच्या यादीत ‘गरजेपेक्षा जास्त गांभीर्याने पाहणे’ या प्रकाराला एक मानाचे स्थान आहे; आणि असा प्रकार कुठेही घडलेला दिसला की मराठीची जिवणी फाकणारच. तिचा स्वभावच तसा! मी जर ‘बस वेळेवर मिळाली’ अशासारख्या साध्या आनंदाचं अगदी रसभरीत वर्णन केलं तर अगदी कौतुकाने ऐकून घेईल, पण त्यातच मी ‘माझं अगदी ऊर भरून आलं’ असं म्हणालो तर लगेच पदर तोंडाला लावेल. कारण तिने आत्तापर्यंत अनेक खरेखुरे ऊर भरून येईल असे प्रसंग पाहिलेत. आणि इथेही ती काही माझ्या त्या क्षणाच्या भावनेला कमी लेखत नसते; फक्त “फार मोठा झालास काय रे,” असं मिस्किलपणे विचारत, त्यातून ‘प्रत्यक्षात ऊर भरून येण्याचे प्रसंग येतील खूप तुझ्या आयुष्यात, तेव्हा तूही तुझं हे वाक्य आठवून हसशील; तोपर्यंत धीर धर.” असं सुचवत असते. मराठीला कुठेही ‘माय’, ‘मातृभाषा’ वगैरे म्हणताना मला ती जितकी आईसारखी वाटत नाही तितकी अशी काहीतरी कल्पना केली की वाटते. माझी इंग्रजी नावाची मावशी मात्र मला अगदी हवं तसं बोलू देते. तिचा मूळचा स्वभाव भावना व्यक्त करण्याऐवजी त्या मांडण्यासाठी, त्यांचं वर्णन करण्यासाठी जास्त अनुकूल असल्यामुळे, तिथे माझ्या तोंडातून ‘shameful’ आणि ‘disgraceful’ हे दोन्ही शब्द तितक्याच सहजतेने घरंगळतात. ही माझी मावशी मला कुठेही हवा तितका आव आणू देते, म्हणून कधीकधी मला तिचा आधार घेऊन बोलावंसं वाटतं हेही तितकंच खरं. आणि एरवीही, आपल्याला जर कधी एखाद्या भावनेची किंवा विचारांची तीव्रता स्वरापेक्षा नुसती शब्दांतूनच सुचवायची असेल, तर इंग्रजी आपल्या छान उपयोगी पडते. तिचा स्वभाव descriptive, तर मराठीचा expressive! मला वाटतं म्हणूनच मराठीत इंग्रजीतल्या ‘I love you’ या वाक्प्रचाराचा अगदी तितक्याच सहज बोलता येईल असा समांतर वाक्प्रचार नाहीये, पण ती भावना आहे तशी आणि तितकीच व्यक्त करण्यासाठी उपयुक्त असे वाक्प्रचार पुष्कळ आहेत. जिथे लळा तिथे लळाच, जिथे जीव तिथे जीवच, जिथे जिव्हाळा तिथे जिव्हाळाच, आणि जिथे प्रेम तिथेच फक्त प्रेम! तसे या सगळ्या भावनांसाठी इंग्रजीतही प्रतिशब्द आहेत; मराठीइतकी समृद्ध नसली तरी ती भाषा म्हणून गरीब अजिबात नाहीये. पण ‘I love you’ म्हणणं आणि एकूणच कुठलीही भावना सहजपणे मांडता येणं या तिच्या गुणधर्माचा तिलाच असा तोटा होतो, की कुठल्याही श्रेष्ठ भावनेचा केवळ वाक्प्रचाराचा अतिवापरामुळे फार लवकर बटाटा होतो. माझ्या आजूबाजूला मी इतक्यांना, इतक्यांदा, इतक्या गोष्टींच्या बाबतीत ‘love’ हा शब्द वापरताना पाहिला आहे, की त्या भावनेची प्रचंड ताकद कुठेतरी क्षीण होत चालली असल्यासारखी वाटते. आजकाल सर्वत्र, विशेषतः सोशल मीडियावर फक्त वापरण्यास सोपी ठरल्यामुळे इंग्रजीतल्या अनेक शक्तिशाली अभिव्यक्तींचं असं ‘अतिवापरामुळे अवमूल्यन’ होत असताना ही मावशी काहीशी निराश होऊन पाहत असते, आणि तिची व्यक्त होण्याची मूळची अफाट क्षमता ओळखून असल्यामुळे मीही! ‘प्रेम’ या भावनेमागची ताकद आपली माय व्यवस्थित ओळखून आहे, म्हणूनच ती आपल्याला सर्रास सगळीकडे तो शब्द वापरू देत नाही. त्यातूनच आपल्या सगळ्या अभिव्यक्तींना पूर्णपणे प्रामाणिक आणि सच्च्या ठेवण्यात ती यशस्वी होते, आणि त्यासोबतच स्वतःचं शब्दरूपी वैभव टिकवूनही ठेवते. तशी चतुर आहे आपली माय!
आणि म्हणूनच, आपल्या आजूबाजूला मराठीचा वापर वाढावा अशी जरी माझी मनापासून इच्छा असली, तरी त्यासाठी ती आणखी ‘सोपी’ व्हावी, म्हणजेच तिने तिचं अचाट वैभव गमावून बसून फक्त चार शब्दांच्या सार्वत्रिक वापराचं स्वरूप तिला यावं, असं मला अजिबात वाटत नाही. मुळात मला असं वाटतच नाही की कुठलीही भाषा, एखादा विषय अवघड असावा तशी अवघड असू शकते. भाषा या मुळात माणसांनी एकमेकांच्या मनातलं जाणावं या उद्देशाने निर्माण केलेल्या; किंबहुना त्यांच्या हातून निर्माण होत गेलेल्या अशा गोष्टी आहेत. त्या खरंतर अनेक शतकं जगलेल्या, अनेक मंडळींच्या सुखदुःखाच्या भिन्न कथा ऐकलेल्या आणि समाजाच्या रचनेतले अनेक बदल पचवलेल्या प्रौढ व्यक्तिमत्त्वांप्रमाणेच आहेत. आणि त्या जर क्लिष्ट, गुंतागुंतीच्या, आपलेच नियम मोडणाऱ्या आणि कधीकधी डोक्यात जाणाऱ्या असल्या, तर त्याचं कारण एवढंच आहे की मुळात आपण तसे आहोत. त्यामुळे मला कुठलीच भाषा अवघड वाटत नाही; ती आपल्याला किती चांगली वापरता येते हे फक्त आपण तिला किती चांगलं ओळखतो यावरून ठरतं. आणि तिला ओळखण्यासाठी, वाचन आणि संभाषण या अनिवार्य अशा गोष्टी आहेत, आणि त्याही सातत्याने केल्या तरच. परीक्षांमध्ये मला जर्मन आणि जपानी, दोन्हीतही उत्तम मार्क्स पडत असले, तरी मी त्यांना अजून ओळखत नाही, आणि ही ओळख फक्त वाचन आणि संभाषण यातूनच होऊ शकते.
मला वाटतं की आपल्या सगळ्यांना कुठेतरी हे ठाऊक असतं, पण होतं असं की आपण हाच नियम इतक्या सहजपणे मराठीला लावायला जात नाही. ती तर आई आहे; आपली तिच्याशी अगदी आपल्या जन्माच्या आधीपासून ओळख आहे, मग ती कशी कमी होईल? सत्य हेच आहे, की तिचा वापर कमी झाला तर तिची ओळखही कमी होऊ शकते, अगदी विरूनही जाऊ शकते. सिंगापूरला राहून आल्यानंतर मला अगदी माफक प्रमाणात का होईना, पण याची प्रचिती आली होती. मनात एखाद्या वाक्याची जुळवाजुळव करताना आपल्याला पहिल्यांदा इंग्लिश शब्द आठवतोय, आणि मराठी शब्द जरा प्रयत्नपूर्वक आठवावा लागतोय, हे मला परत आल्यावर जाणवलं आणि मी कासावीस होऊन पुन्हा जोमात मराठी वाचन सुरु केलं. या पार्श्वभूमीवर, अगदी परवा ऑफिसमध्ये माझ्या एका मित्राने ‘Which meeting room is empty’ असं विचारल्यावर माझ्या तोंडून ‘I think the purple room is रिकामी’ असं निघालं; आणि ओशाळणं जर जाऊच दे, मला उलट एकदम खूप छान वाटलं. माझ्या मनात असं आलं, की लहानपणापासून मराठी वाचण्याची, मराठी नाटकं पाहण्याची सवय असलेल्या, मराठीत ब्लॉग लिहिणाऱ्या आणि सिंगापूरमध्ये राहत असतानाही युट्युबवर मराठी गोष्टी बघणाऱ्या माझं असं होऊ शकतं, तर ही भाषा आपल्याला येणं ही गोष्ट अजिबातच गृहीत धरण्यासारखी नाहीये. तरी मी फक्त दीड वर्ष बाहेर राहिलो होतो. परवा आमच्या घरी बाबांचे एक इंग्लंडमध्ये स्थायिक झालेले मित्र आणि त्यांच्या दोन लहान मुली आल्या होत्या, आणि त्या मराठीत बोलत होत्या. त्यांना त्यांच्या आईबाबांनी, आपण आत्ता भारतात आहोत तर कटाक्षाने मराठी बोललं पाहिजे असं सांगितलेलं होतं. पण मला खूप विशेष वाटलेली गोष्ट अशी की त्या अजिबात कर्तव्य भावनेने, किंवा सक्ती केल्यामुळे ‘ठीक आहे आता काय’ असं म्हणून नाही, तर अगदी मनापासून, कौतुकाने आणि अभिमानाने मराठी बोलत होत्या. त्यांच्या बोलण्यातून त्यांचा आत्मविश्वास, शिवाय मराठीवरचं प्रेम, हे सहज कळून येत होतं. ते मराठी तोडकंमोडकं होतं, पण तेव्हा मला असं वाटलं की मीच काय, कोणीतरी त्यांच्या चुका काढायची काहीतरी गरज आहे का? जर त्या स्वतःहून मराठी बोलण्याचा एवढा प्रयत्न करत असतील, तर त्या चुका काय आहेत ते समजून घेऊन त्या टाळण्याएवढा उत्साह त्यांच्यामध्ये आहेच. शेवटी तो उत्साह, ती आपलेपणाची भावना आणि ती भाषा वापरताना होणारा आनंद, याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि याच गोष्टी भाषा टिकवूनही ठेवतील. म्हणूनच मला असं म्हणावंसं वाटतं, की हो, आपण मराठीचा वापर वाढवला पाहिजे, पण तो ती आपली मातृभाषा आहे आणि ती आपली जबाबदारी आहे या कर्तव्यभावनेने नाही, तर आपल्याला ती खूप खूप आवडते म्हणून. तिला एक व्यक्तिमत्त्व म्हणून न जाणणं हा आपलाच तोटा आहे, म्हणून. आपण जर असं केलं नाही तर एक अत्यंत समृद्ध, वैभवशाली, प्रगल्भ आणि बोलकी भाषा आपल्या हातातून निसटेल, म्हणून. मराठीइतकी सुंदर भाषा आपल्याला आपली मातृभाषा म्हणून मिळाली आहे, हे खरंच आपल्याला लाभलेलं खूप मोठं भाग्य आहे, म्हणून.
आदित्य... अत्यंत समृद्ध करणारा लेख आहे तुझा 🤗
ReplyDeleteलेखाचा उगम आणि प्रवास दोन्हींनी पकडून ठेवलं. असा एक समग्र विचार तू करतोस, केला आहेस हे खूप आवडलं! ह्या दृष्टीने भाषांकडे बघणं, त्यांच्यात (योग्य त्या पद्धतीने) तुलना करणं ह्याने तुझी ह्या सर्वच भाषांमधली जाण समजते.. ह्यावर तुझ्याशी चर्चा करायला आवडेल! 'बटाटा होणे' आवडलंच .. त्याबद्दल thank you! धन्यवाद नव्हे, 'thank you' च! :)
ReplyDeleteअत्यंत सुंदर आणि समर्पक लेख.. आम्हाला असं व्यक्त होता येत नाही पण तू आमच्याच मनातलं बोललास असं वाटलं... तुझ्या इतक्या छान भाषेत मला व्यक्त होता येणार नाही म्हणून जास्त काही लिहीत नाही.. मात्र सुरुवातीपासून शेवट पर्यंत खिळवून ठेवणारी तुझं भाषा प्रभुत्व आहे एवढं नक्की....!! लिहीत राहा आम्हाला आनंद देत राहा..!!
ReplyDeleteआदित्य, लेख खूप आवडला आहे.सगळ्या भाषांचा विचार करून, त्या भाषांचा
ReplyDeleteआदर ठेवूनही आपल्या भाषेतील गोडवा, किंवा फटकळपणा या बाबींचा विचार
छान मांडला आहेस. तुझी भाषा मनोवेधक आहे. असेच लेखन करत राहा.
खूप शुभाशीर्वाद!
♥️
ReplyDeleteआदित्य,भाषेला व्यक्तिमत्त्व असतं हे किती नेमकेपणाने सांगितलं तू!कुठलीही भाषा अवघड का नाही ह्याचं इतकं नेमकं उत्तर याआधी कधीच मिळालं नव्हतं असं वाटलं..लिहिता रहा असाच.खूप शुभेच्छा
ReplyDeleteमराठीला माय म्हणणं नेहमीचं आहे पण इतर भाषांना मावशी मानून त्यांच्याशी असलेलं नातं.... किती छान कल्पना रे !
ReplyDeleteआदित्य, खूप छान लिहिलं आहेस. भाषेचा वेगवेगळ्या अंगाने विचार केला आहेस. वेगळ्यावेगळ्या अंगाने याचं शब्दशः भाषांतर कसं होईल याचा विचार करूनच हसू आलं. प्रत्येक भाषेची एक नजाकत असते हेच खरं
ReplyDelete