अलीबाबाची गुहा आणि पैशाचं झाड
लहानपणी मला एका गोष्टीचं कुतूहल होतं. (इतर बऱ्याच गोष्टींसारखंच, पण हिच्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरं आता मिळाल्यामुळे हिचा उल्लेख करावासा वाटतो) बाबा संध्याकाळी पाच-साडेपाचला ऑफिसमधून घरी आले की किमान एक तासभर कॉम्प्युटरवर असत. ते काम करतायत आणि म्हणून त्यांना त्रास देऊ नये एवढंच मला कळलं होतं. सकाळी मी शाळेत जायला निघायच्या आधी ते टी.व्ही.वर काय बघतायत याच्याकडे माझं लक्ष असायचं. त्या चॅनेलवर खालच्या भागात एक पट्टी सतत फिरत असे. तिच्यावर काही अनाकलनीय नावे आणि त्यांच्यापुढे त्यापेक्षाही जास्त अनाकलनीय आकडे एकापाठोपाठ एक असे येत असायचे. स्क्रीनचा एक मोठा भाग कसल्यातरी चार्टने व्यापलेला असायचा. मला प्रश्न पडे, की ते चार्ट जास्त आकर्षक बनवायला त्यांना वेगवेगळे रंग का देत नाहीत? फक्त लाल किंवा हिरवा, एवढेच का? स्क्रीनच्या उरलेल्या भागात कोणीतरी तीच ठरलेली वाक्यं पुन्हापुन्हा म्हणत असे. ‘हे घ्या’, ‘हे विका’, ‘हे ठेवा’ आणि मग अचानक ‘आजचा दिवस चांगला आहे’. तेव्हा हे चॅनेल एकाच वेळी जाहिराती, अगम्य गणित आणि रंगीत चित्र दाखवतं अशी माझी समजूत होती. ती खालची पट्टी तयार करणाऱ्याचा बहुधा कधीच निर्णय पक्का होत नसावा, कारण काहीकाही आकडे माझ्या डोळ्यांदेखत बदलत. आपल्याला हे कळणार नाही असं वाटून मी तेव्हा बाबांना काही विचारत नसे. पण माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच लवकर, म्हणजे नववीतच माझी या प्रकाराशी ओळख झाली.
त्याचं काय झालं, मी नववीत असताना राष्ट्रीय आर्थिक शिक्षण संस्थेची (NCFE ची) एक परीक्षा जाहीर झाली होती. तिला मी बसलो होतो. तिच्यासाठी असलेल्या स्वतंत्र अभ्यासक्रमात अर्थशास्त्राच्या काही मुलभूत संकल्पनांची ओळख करून दिली होती. उदाहरणार्थ अर्थव्यवस्था, आयात-निर्यात, बॅंकिंग आणि ‘हे’. बाबांनी मला ‘हे’ म्हणजे काय ते समजावले, तेव्हा अचानक त्या सगळ्या प्रकारचा खुलासा झाला, आणि एका वेगळ्याच जगाशी माझी ओळख झाली. ज्या जगात भारतातल्या असंख्य कंपन्या, ब्रोकर नामक मंडळींची ऑफिसेस आणि वेबसाईट, वार्षिक रिपोर्ट्स, आवडते बैल आणि नावडती अस्वलं, सेन्सेक्स, निफ्टी, जपानी मेणबत्त्या, BSE आणि NSE, सोनं, डॉलर्स, पौंड आणि रुपयेच रुपये आहेत, त्या जगाचा मी एक, नगण्य का होईना, पण भाग झालो.
शेअर-मार्केट म्हटल्यावर, आणि आत्तापर्यंत त्यात ‘कार्यरत’ असलेल्या लोकांनी जे काही मला सांगितलंय ते ध्यानात घेऊन, या लेखाचं शीर्षक जरा अतिच आशावादी आहे. यात उतरणाऱ्या नवख्या मनुष्याला त्यातले सराईत (म्हणजे खूप काळ ते करत असलेले) जे सांगतात त्यात हा सावधगिरीचा इशारा असतोच. तो म्हणजे ‘इथे आपल्याला पैसे द्यायला कोणी बसलेलं नाहीये. हा एक खेळ असून जिंकलात तरच पैसे मिळतात.’ ही धोक्याची सूचना. मग त्याच्यामागून आपल्याला इतरांच्या कारकिर्दीतले सपशेल हरण्याचे किस्से ऐकायला मिळतात. खरं तर खेळ सुरु करायच्या आधीच कोणी भयंकर शक्यता सांगून ठेवत नाही. पण इथे मात्र आधी ‘वास्तवाची जाणीव’ केलेली चांगलीच असते, कारण शेवटी आपले पैसे अडकलेले असतात आणि ते नाहीच परत मिळाले तर काय, हा विचार आधीच केलेला केव्हाही चांगला!
शेअर-मार्केटला कोणी जुगार म्हणतात, तर कोणी बुद्धिबळ. म्हणजे एकदम दोन टोकाच्या उपमा. स्वतः यात न उतरणारेच त्याला जुगार म्हणतात, हे विशेष! त्यांच्या या म्हणण्याला बहुतेक वेळा एकंच कारण असतं, ते म्हणजे पैसे ‘लावणे’. हे मान्य करावेच लागते. आपल्या पैशांची बोली लावल्याशिवाय यात उतरताच येत नाही. पण म्हणून जुगार काय? जुगार हातातल्या पानांवर बेतलेला असतो. नशिबाचा खेळ. शेअर-मार्केट म्हणजे नशिबाचा खेळ हेही १००% खरं आहे. पण त्याचा पद्धतशीर अभ्यास करून आणि अनुभवातून शिकून ‘ती’ घटना टाळता येते, हेही तितकंच खरं. दुसरीकडे याला ‘खेळ’ म्हणणारे लोक हे मान्य करतात की इतर खेळांमध्ये आणि याच्यात एक महत्वाचा फरक असतो. हा खेळ छंद म्हणून खेळता येत नाही. चांगला क्रिकेट खेळणारे असंख्य लोक, मुले देखील, भारताच्या टीमसाठी नाही तर मजा म्हणून, आवड म्हणून खेळतात. पण इथे मात्र रोजच पाकिस्तानशी मॅच असते. म्हणून पूर्ण तयारी करणं गरजेचं असतं.
इथे ‘या’ म्हटलं, की पहिला प्रश्न असतो ‘का’. मग गुंतवणूक का करायची यावर विवेचन होतं. उद्याचा विचार कसा फायद्याचा असतो, तजवीज करून ठेवणं कसं चांगलं, वगैरे वगैरे. एकदा गुंतवणूक चांगली हे पटवलं की झालंच, कारण करायची तर इथेच हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट असतं असं बहुतेक लोक मानतात. नाही म्हणायला बाँड्स हाही पर्याय असतो, पण काही काही लोक उगीचच सरकारला जास्त पैसे देण्याच्या विरोधात असतात. रिअल्टी (जमीन) मध्ये करू नका असं आपल्याला सांगतात, आणि ‘का नाही’ विचारलं तर ओशाळून हवामानाबद्दल बोलायला लागतात. खरं तर त्याचं कारणही स्पष्ट आहे. गेली काही वर्ष रिअल्टी मार्केटमध्ये मंदी सुरु आहे, आणि रिअल्टीचं एकूणच सगळं कासवाच्या गतीने होत असतं. तेव्हा ‘ही वेळ नाही’ असं म्हटलं तर शहाण्याने समजून घ्यावं. बँकेत पैसे ठेवणे ही गुंतवणूक असते, पण या दृष्टीकोनातून नाही पाहिलं तरी एवढं सगळेच करतात. आपली बँक आपल्या एफ.डी.ला सहा, सात टक्के व्याज देते, मुलांच्या एफ.डी.ला नऊ-दहा टक्के देते, म्हणून आपण खूश असतो. हे ठरलेला नफा झाला. शेअर-मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा नफा सगळ्यात आकर्षक असतो. गणिती भाषेत त्याची रेंज ‘इन्फिनिटी टू इन्फिनिटी’ अशी असते. लोकांच्या काचकूच करण्याचं मुख्य कारण म्हणजे तोट्याची भयंकर शक्यता, जी काहीही करून पूर्णतः घालवता येत नाही. पण म्हणून नफ्याची शक्यताही हरवून बसायची? म्हणूनच ‘higher the risk, higher the rewards’ हा शेअर-मार्केटचा एक सर्वमान्य नियम आहे!
असाच एक दुसरा जगमान्य नियम म्हणजे, पु.लं.च्या शब्दांत, ‘बेंबट्या, चार माणसे वागतात तसे वागावे!’ हेच वाक्य नव्याने यात उतरणाऱ्या व्यक्तीला वडिलकीच्या आविर्भावात सांगण्यास वापरतात. त्यांच्या भाषेत, ‘the trend is your friend’. तात्पर्य, स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्याची ही जागा नसून, इथे जे बहुसंख्य ट्रेडर्स करतात तेच करावे. कारण बहुसंख्य ट्रेडर्स केवळ बरोबरच असतात असं नाही, तर त्यांच्या देवाणघेवाणीवरूनच बहुतेक वेळा मार्केटची ‘ट्रेंड’ ठरते! या बाबतीत ही अदृश्य बाजारपेठ अर्थव्यवस्थेच्या अगदी उलट वागते. खरेदी झाली की भाव वाढतात, वाढते भाव बघून खरेदी वाढते आणि या चक्रातूनच ‘ट्रेंड’चा जन्म होतो. मग लोकांनी विकायला सुरुवात केली की ट्रेंड फिरते. शेअर-मार्केटचा स्थायिभाव हाच असतो!
काही लोक जरा वेगळा विचार करतात. ‘आपण स्वतः कशाला काही करायचं? एक्स्पर्टची मदत घेऊया’. याचे प्रकार म्हणजे टी.व्ही.वरच्या तज्ञांच्या बोलण्यानुसार वागणे, किंवा म्युचुअल फंडात गुंतवणूक करणे. तरीही, ज्यांना शेअर-मार्केटचा अनुभव आहे ते तज्ञांचं म्हणणं ऐकतात आणि मग ते असं का म्हणतायत ते स्वतः पडताळून पाहतात. ‘म्युचुअल फंड’ म्हणजे आपल्या वतीने ती पॉलिसी काढणारा पैसे गुंतवतो. तो ‘तज्ञ’ असतो, म्हणून आपण निश्चिंत. पण तोही यशस्वी होईल याची खात्री नसते. डाऊ नावाच्या प्रसिद्ध गुंतवणूकदाराने (अमेरिकेच्या डाऊ-जोन्स इंडेक्सच्या भागीदाराने) शेअर-मार्केटचे सहा तांत्रिक नियम सांगितलेत, त्यातला एक म्हणजे ‘stock market discounts all news’. याचा अर्थ म्हणजे शेअर-मार्केटच्या सध्याच्या स्थितीची जेवढी माहिती आपल्याला असते तेवढीच त्या तज्ञालाही असते. किंबहुना, त्याला ती स्थिती जितकी चांगली कळते तेवढीच चांगली आपल्यालाही कळू शकते. चार्ट्सचा अभ्यास करून, ट्रेंडचा प्रकार ओळखून आपण जे कयास बांधतो तेच तो तज्ञही करतो. गुंतवणुकीचा एक नियम म्हणजे जो स्वतःचे पैसे घालायला तयार असतो तोच सर्वोत्तम सल्ला देऊ शकतो, कारण तेवाच तो पूर्ण मन लावून जिंकायचा प्रयत्न करतो. म्हणून पॉलिसी विकणारा जर स्वतः त्या शेअर्समध्ये पैसे गुंतवत असेल तर आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेऊ शकतो. अशा वेळी दोघेही जिंकतात किंवा दोघेही आपटतात, कारण एवढं सगळं करूनही तोटा होऊच शकतो. बरेच लोक असं सांगतात की कोणाच्या द्वारे ट्रेडिंग करण्यापेक्षा स्वतः अभ्यास करून पैसे गुंतवावेत. आत्मनिर्भत्सना दुसऱ्याचा गळा धरण्यापेक्षा बरी! (विशेषतः दुसऱ्याची फारशी चूक नसताना) शेअर-मार्केट म्हटल्यावर कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा होणारच. प्रत्येक ट्रेडमागे पैसे मिळवायला आपण ब्रोकर नाही!
काही पुस्तकांत शेअर-मार्केटच्या इतिहासाचे उल्लेख सापडतात. हा सगळा प्रकार १७७३ मध्ये लंडन शहरात सुरु झाला म्हणे, आणि तोही लंडनच्या प्रसिद्ध कॉफी शॉप्सचं सदस्यत्व घेण्यात आणि विकण्यात, ज्याचं नंतर शेअर-सर्टिफिकेट्स मध्ये रुपांतर होऊन त्यात कंपन्या उतरायला सुरुवात झाली. तेव्हाच्या ट्रेडिंगबद्दल वाचलं की एकविसाव्या शतकात जन्मल्याचा आनंद होतो. अगदी सुरुवातीला शेअर घेतल्याचा पुरावा म्हणून कागदी सर्टिफिकेट मिळायची. मग ती जपून ठेवणं आलं. आणि खरेदी-विक्री करायला स्टॉक एक्स्चेंजला भेट द्यावी लागत असे. रेडियो आणि वर्तमानपत्र हीच माहिती मिळवण्याची साधनं. बातमी कळली की पलंगाखालचा पेटारा उघडायचा, आणि आपल्याकडचे शेअर बघायचे, विकायचा असल्यास त्याचं सर्टिफिकेट हुडकून एक्स्चेंजपर्यंत धावत जायचं असले प्रकार असायचे. या सगळ्यामुळे शेअर-मार्केटमध्ये गरजेनुसार ‘त्वरित निर्णय’ घेणे अशक्य व्हायचे. ‘तो पडतोय’ असा इशारा आला की तो जमिनीवर आपटायच्या आत शेअर विकले गेले पाहिजे असतात. (किंवा ‘तो पडलाय’ असा इशारा आल्यास मिळाले पाहिजे असतात) नंतर दूरध्वनीचा शोध लागल्यावर ब्रोकरला फोन करणे शक्य होऊ लागले. तो काळ दाखवणाऱ्या काही सिनेमांत स्टॉक एक्स्चेंजचं दृश्य असेल तर त्या खोलीत अनेक छोटी-छोटी टेबलं ठेवलेली दिसत. त्या टेबलांवर एक मोठ्ठा टेलिफोन (तेव्हा तसाच असायचा) आणि एक मोठं रजिस्टर ठेवलेलं असायचं. ब्रोकर त्या टेबलाशी बसून घाम पुसत फोन घेणे आणि दुसऱ्या हाताने रजिस्टरमध्ये नोंद करणे हेच काम करत असत. ज्या दिवशी बाजारात भरपूर उलाढाल होत असे त्या दिवशी पेनचं टोपण लावायलाही वेळ नसे!
तेव्हाचा विचार केला तर आजची परिस्थिती त्यापेक्षा खूपच सुखद आहे. आणि ‘त्वरित निर्णय’ घेता येण्यामागे इंटरनेटचा मोठा वाटा आहे. इंटरनेटमुळे आज आपण सकाळी सव्वानऊ ते दुपारी साडेतीन या वेळात कधीही आपली ठरलेली साईट उघडून ‘त्या’ कंपनीच्या शेअरवर सतत नजर ठेवता येते. त्याची अनुकूल हालचाल दिसली की लगेच आपल्या ब्रोकरच्या साईटवर जायचे, घ्यायची/विकायची ऑर्डर देऊन ठेवायची आणि मार्केटच्या कामाला वेग असेल तर पाचदहा मिनिटांतच आपले शेअर विकले गेलेले (किंवा मिळालेले) पाहायचे. आहे काय अन् नाही काय!
शेअर-मार्केटमध्ये उतरायचं किमान वय अठरा आहे. पण त्याच्या आधी ‘सराव’ करायचा असल्यास काही साईट आहेत, जिथे खोट्या पैशाने खोटे शेअर घेऊन हा खेळ खेळता येतो. मी हाच मार्ग निवडला बुवा, कारण एकदम खरे पैसे घेऊन कोण सुरुवात करणार? थोडी भीती वाटतेच, पण स्वतःवर पूर्ण विश्वास ठेऊन उडी घालणारेही लोक असतात. काही महिने ट्रेडिंग केल्यावर आपली भीती जाते, कारण तोपर्यंत आपण थोडा नफा मिळवलेला असतो आणि थोडा तोटाही सहन केलेला असतो, आणि म्हणूनच आपण ‘जे अटळ आहे त्याला घाबरायचं कशाला’ असा विचार करू लागतो. अतिउत्साहाने सुरुवात करणारेही थोड्याच काळात मलूल होतात, कारण तोटा सहन करण्याची तयारी नसते. आपण सगळ्याचा अर्थ लावायला शिकलो म्हणजे मार्केट आपल्या इशाऱ्यावर नाचणार अशी यांची समजूत असते. पण आख्ख्या बाजारपेठेला आपल्या इशाऱ्यावर नाचवायला आपल्याला कुठल्यातरी मोठ्ठ्या कंपनीचे मालक असावं लागतं आणि आपल्या ‘घराण्याला शोभेल’ एवढी गुंतवणूक करावी लागते. गमतीची गोष्ट अशी, की आपल्यासारख्या एकट्या गुंतवणूकदाराला त्याच ट्रेंडच्या इशाऱ्यानुसार जावं लागतं, जी ट्रेंडच मुळी जनतेच्या इशाऱ्यानुसार जात असते!
माझ्या मते शेअर-मार्केटचा हा सगळा उपक्रम (किंवा उपद्व्याप) हा मानवाच्या सुपीक डोक्यातून निघालेल्या अनेक सुंदर कल्पनांपैकी एक आहे. ‘आपला नफा आपण इतरांमध्ये वाटूया, म्हणजे त्यांनी त्यात वाटा घेतला की एकूण नफ्याचं मूल्य वाढून आपल्या सगळ्यांनाच अधिक पैसे मिळतील’ ही खरोखरच भन्नाट कल्पना आहे. उत्पन्नाच्या चार प्रकारांतला (पगार, व्याज, भाडे आणि नफा) सगळ्यात आकर्षक प्रकार, म्हणजेच नफा, हा शेअर-मार्केटच्या कृपेमुळे आता उद्योजकांचा अभिमानाचा मुद्दा उरला नाही. भारतात शेअर-मार्केटच्या येण्यानंतर गुंतवणुकीचे प्रमाण वाढले, आणि आजही गुंतवणुकीद्वारे अर्थव्यवस्थेत पैसा खेळता ठेवण्याचा सगळ्यात चांगला आणि लोकप्रिय मार्ग आहे. जाताजाता प्रसिद्ध इन्व्हेस्टर म्हणतात ते म्हणतो : “गुंतवायचे तर इथे गुंतवा, पण का ते ठरवून गुंतवा. आणि निर्णय घ्यायला वेळ लावू नका. आकडे कुठल्याही क्षणी फिरू शकतात. आजचा हिरवा उद्या लालभडक होऊ शकतो ………”
More on the markets on apam
More on the markets on apam
Comments
Post a Comment