समोरचा पडदा ३
मागच्या लेखात मास्टरशेफचं एवढं गुणगान केलं, पण सांगायला खेद वाटतो की मागचा सीझन मी या अद्भुत कार्यक्रमाला संपूर्ण न्याय देऊ शकलो नाही. तसा मी तो पूर्ण पाहिला, आणि त्यातल्या घटनाही माझ्या लक्षात राहिल्या आहेत, आणि नेहमीप्रमाणेच विजेती स्पर्धक बिली हिची सगळ्यात जास्त ओळख मला झाली आहे. पण यावर्षीच, या कार्यक्रमाला एक प्रतिस्पर्धी मिळाला. त्या प्रतिस्पर्धी कार्यक्रमातही कसलीतरी जादू होती हे नक्की. तो सापडल्यापासून त्याने मला मास्टरशेफचे बरेच एपिसोड त्याच्या ब्रेक्समध्ये पाहायला भाग पाडलं. खरं तर मास्टरशेफच्या इतक्या कट्टर भक्ताचे असे आचरण म्हणजे महापापच! पण हा नव्याने सापडलेला कार्यक्रम पुष्कळ बाबतींत मास्टरशेफसारखा होता, आणि मास्टरशेफची ओळख आणि चांगले संबंध प्रस्थापित झालेले असल्याने, या कार्यक्रमाला एक चान्स द्यायचा माझा प्रामाणिक विचार होता. आणि त्या कार्यक्रमाने अशी काही भुरळ घातली पाहा, की त्या प्रभावाखाली रात्री नऊ वाजता आमची बोटं रिमोट कंट्रोलवर पडायची आणि आणि आमचं लक्ष स्टार वर्ल्डवरून ‘कलर्स इन्फिनिटी’ या चॅनेलवर यायचं. मग या कार्यक्रमाने उदारपणे भलामोठा ब्रेक देऊ केला की आलोच परत लाडक्या स्वयंपाकघरात! पण टेकायला वेळ नाही अशी परिस्थिती. कारण तिकडचा ब्रेक संपताक्षणीच तिकडे परत जायची इच्छा असल्याने बोटं रिमोटवरून हलत नसत.
हा कार्यक्रम बऱ्याच बाबतींत मास्टरशेफसारखा आहे असं विधान मी वर केलं. याचा अर्थ तीही स्पर्धा आहे, आणि कुकिंगची, असं मला म्हणायचं नाहीये. एक म्हणजे हे दोन्ही कार्यक्रम पाहून नकळत आपल्या ज्ञानात खूप भर पडते. शिवाय मास्टरशेफ प्रमाणेच इथल्याही सर्व घटना खऱ्या असून, इथे येणाऱ्या आशावादी मंडळींपैकी काहींची स्वप्नं खरोखरच पूर्ण होतात. या दोन्ही कार्यक्रमांत आपल्यासमोर येणाऱ्या दोन्ही व्यवस्था या समाजाच्या हितासाठीच निर्माण केलेल्या आहेत, हे आपल्या लक्षात येतं. शिवाय अजून एक फॅक्टर असतोच, जो अशा बहुतेक सर्व स्पर्धा किंवा इतर रियालिटी शोजना लागू होतो. व्यक्तिशः माझा असा अनुभव आहे, की मान्यवरांच्या वर्तणुकीवरून आपण कधीकधी या स्पर्धांची पारख करतो. कदाचित या स्पर्धा पाहताना, आपण नकळत स्पर्धकांच्या भूमिकेत शिरतो म्हणूनही असेल. तसं ते सयुक्तिकही आहे. आपल्यासमोर धडपड करून आपली कला आणि कौशल्य सादर करणाऱ्या व्यक्तींशी हे आधीच यशस्वी झालेले मान्यवर, दुष्टपणे वागले, तर आपल्याला ते सहन होत नाही. कुठेतरी आपल्या मनातल्या प्रतिमेलाही तडा जाऊ शकतो. याउलट जर ते मान्यवर गॅरी, जॉर्ज आणि मॅटसारखे लोक असतील, तर आपणही जास्त आनंद घेऊन ते पाहू शकतो. या कार्यक्रमाचे मान्यवरही स्वभावाने खूप चांगले आहेत. वेळप्रसंगी कठोर व्हावं लागतंच, आणि तशा यांच्या कठोर होण्याच्या पद्धती मास्टरशेफ मंडळींपेक्षा जरा वेगळ्या असल्या, तरी आपण त्याला ‘दुष्टपणा’ म्हणूच नाही शकणार. एवढंच नाही, तर या मंडळींना पाहिल्यावर आपल्या मनात त्यांच्या क्षेत्रातल्या बहुतांश लोकांबद्दल जी प्रतिमा असते, ती योग्य नसल्याचं आपल्याला कळतं आणि ‘सगळेच तसे नसतात’ हे आपल्याला पटतं.
एवढ्या वातावरणनिर्मितीनंतर माझी खात्री आहे की मला चांगले ओळखणारे लोक हा कार्यक्रम ओळखू शकतील. पण मीही इथे सांगतो. त्या कार्यक्रमाचं नाव ‘शार्क टॅंक’ असं आहे. एक क्षणभर मी कसातरी तुमचा मोठा पचका केला असं तुम्हाला वाटू शकतं. कारण नावावरून हा कार्यक्रम ‘Man Vs. Wild’, ‘Crocodile Hunters’ या पंगतीतला भासू शकतो. अगदी सुरुवातीला मलाही तसंच वाटलं होतं, पण नंतर लक्षात आलं की ‘शार्क’ हा ‘उद्योजक’ किंवा ‘Investor’ साठीचा सर्वमान्य शब्द आहे. या कार्यक्रमाचं स्वरूप असं, की सहा यशस्वी उद्योजकांकडे उत्साही नव्याने उद्योग सुरु करणारे येतात. त्यांचा धंदा समजावून सांगतात आणि या ‘शार्क’ मंडळींना गुंतवणूक करायची विनंती करतात. या ‘शार्क’ना उद्योग चांगला आहे असं वाटलं, तर ते काहीतरी ऑफर करणार आणि सौदा ठरला तर नवे उत्साही उद्योजक त्यांच्या उद्योगासाठी भरपूर पैसे घेऊन घरी जाणार. या एका बाबतीतही हा कार्यक्रम मास्टरशेफ सारखा आहे. म्हणजे या क्षेत्रात उतरणाऱ्या लोकांना हे पाहण्याचा प्रचंड फायदा होऊ शकतोच, शिवाय तशी इच्छा नसणाऱ्यांनाही त्यातून खूप माहिती आणि मनोरंजन मिळतं.
तर मी मघाशी ज्या मान्यवरांचं एवढं कौतुक केलं, ते आहेत कोण? सहा यशस्वी उद्योजक, ज्यापैकी पाच प्रत्येक एपिसोडला हजर असतात. क्वचित कुणी वेगळा माणूस जागा भरून काढतो, तरी हे सहा लोक ठरलेले आहेत : केव्हिन ओ-लिअरी, रॉबर्ट हर्जोव्हेक, बार्बरा कॉर्कोरन, डेमंड जॉन, मार्क क्युबन आणि लॉरी ग्रेनियर. सगळे आपापल्या क्षेत्रातले दिग्गज. कार्यक्रमाच्या सुरुवातीला या सगळ्यांचा परिचय केला जातो. यापैकी केव्हिन आणि रॉबर्ट हे IT कंपन्यांचे मालक होते. बार्बरा न्यू यॉर्कमधल्या एका मोठ्या रिअल इस्टेट कंपनीची मालकीण आहे. डेमंड जॉन हा ‘फूबू’ नामक फॅशन ब्रँडचा मालक आहे. मार्क आणि लॉरीच्या कंपन्यांची नावं सांगत नाहीत, त्याउलट हे सांगतात की मार्क हा ‘Dallas Mavericks’ या बास्केटबॉल संघाचा मालक आहे आणि लॉरी स्वतः एक अत्यंत कल्पक उद्योजक असून, डिझायनिंग क्षेत्रातले तीनशेहून अधिक पेटंट्स तिच्या नावावर आहेत. तसंच QVC नामक चॅनेलवर तिचा एक कार्यक्रम आहे. या सगळ्या माहितीनंतर तुमच्या मनात कदाचित हा विचार आला असेल, की आपण या लोकांचीच काय पण त्यांच्या कंपन्यांचीही नावे ऐकलेली नाहीयेत. ते खरंय म्हणा. आपल्या स्वतःच्या देशात कार्यरत असलेल्या सगळ्या कंपन्या तरी आपल्याला कुठे माहित असतात? खुद्द BSEवर ६०००हून जास्त कंपन्या आहेत, कुणाकुणाची नावं लक्षात ठेवणार?
कार्यक्रम सुरु होतो, आणि आशावादी मंडळी आपले प्रस्ताव घेऊन आत येतात. एका मोठ्या खोलीत हा सगळा प्रकार घडतो. मध्यभागी एका ओळीत पाच शार्क मोठ्या आरामखुर्च्यांत बसलेले असतात. त्यांच्या पुढच्या भागात त्या नव्या उद्योजकाला आपली कल्पना समजावून सांगायला आणि दाखवायला भरपूर जागा असते. प्रत्येकाला आपल्या सोयीने एक मॉडेल उभारायची संधी मिळते आणि आपली उत्पादने चालवून दाखवण्याचीही. उद्योजक एक भाषण देतो, ज्यात सुरुवातीला त्याचा प्रस्ताव त्याने स्पष्ट केलेला असतो. मग ही शार्क मंडळी त्यांना प्रश्न विचारतात. सुरुवातीचे प्रश्न ठरलेले असतात. ‘किती काळापासून ही कंपनी चालू आहे’, ‘एकूण आत्तापर्यंतचा नफा काय’, ‘उत्पादन तयार करायला किती खर्च येतो’ वगैरे. सगळी माहिती मिळाल्यावर शार्क लोक आपली मतं सांगतात, आणि समोरच्याचा प्रस्ताव स्वीकारतात किंवा स्वतःच एक प्रस्ताव मांडतात.
एका एपिसोडमध्ये असे चारपाच प्रस्ताव ऐकले तरी आपल्या शब्दसंपत्तीत चांगलीच भर पडते. उद्योजक सांगतो, “माझ्या कंपनीचा दहा टक्के हिस्सा देण्याच्या बदल्यात मी दोन लाखाची गुंतवणूक मागत आहे.” मग यावर चर्चा होते. या प्रस्तावाचा असाही अर्थ असतो की या उद्योजकाच्या दृष्टीने त्याची कंपनी वीस लाखांची आहे, यावर कधीकधी शार्क मंडळी आक्षेप घेतात. कधी हे मूल्य दरवर्षीचा नफा-तोटा विचारात घेऊन ठरवलेले असते, तर कधी ‘उद्योजक मित्राचा अंदाज’ किंवा अशाच कुठल्यातरी कारणावरून असते. ते चुकीचे असतेच असेही नाही. सलग काही एपिसोड याच वाक्यांमध्ये देवाणघेवाण झाली तर काळजी नसावी, केव्हिन मजा आणतोच. या माणसाने खरं तर ‘एका सौद्याला गोलगोल फिरवायचे शंभर मार्ग’ अशा स्वरूपाचं पुस्तक लिहायला पाहिजे! समोरच्या माणसाला घाम फुटेल इतक्या पळवाटा आणि शक्य असलेले बदल तो सुचवतो. समजा समोरच्याने वर उल्लेख केलेला प्रस्ताव मांडलाय. आधी केव्हिन म्हणेल, “तुझ्या कंपनीचा नफा ऐकून मी असं सुचवतो, की मी तुला दोन लाख देईन, पण त्या बदल्यात मला ३०% दे.” एका फटक्यात कंपनीचं मूल्य तीनपटीने कमी होणं हे उद्योजकाला अर्थातच फारसं आवडत नाही. पण केव्हिनसारख्या अत्यंत अनुभवी उद्योजकाचे अंदाज सहसा योग्यच असतात. मग तो उद्योजक २०% किंवा २५% वर सौदा आणायचा प्रयत्न करतो. मग केव्हिन म्हणेल, “बर चल मी ते एवढं खाली आणत नाही. त्यापेक्षा मी तुला १०% साठी दोन लाख देईन, पण एका अटीवर. ती अट म्हणजे तुझ्या अंदाजानुसार तुझं उत्पादन पुढच्या सहा महिन्यांत एका मोठ्या रिटेलमध्ये पोहोचलं पाहिजे.” आता तुम्ही, अटी घालायला हा काय लहान मुलांचा खेळ किंवा सासू-सुनेचं (पडद्यावरचंच) भांडण आहे की काय असा विचार करत असाल, तर तसं काही नाही. हा गुंतवणुकीचा एक प्रकार असतो, ज्याला Contingency Offer असं म्हणतात. उद्योजक घाम पुसत उभा असताना केव्हिनच पुढचा बॉल टाकणार : “बर हे सगळं जाऊ दे. त्यापेक्षा मी दोन लाख देतो, पण मला कुठलाही हिस्सा नको. त्यापेक्षा तुझ्या उत्पादनाच्या प्रत्येक विक्रीमागे मला ०.२% उत्पन्न दे.” (याला Royalty Deal म्हणतात) अर्थात हा प्रकार अनंतकाळापर्यंत चालत नाही. केव्हिनला त्याचे गुंतवणुकीचे पूर्ण पैसे परत मिळाले की थांबतो. तरी तोपर्यंत ते एक ओझं असतंच. मग बाकीचे शार्कही ‘काय रे केव्हिन किती पिळशील बिचाऱ्याला’ वगैरे सुरु करतात. मास्टरशेफ मंडळींप्रमाणेच, शार्क्स एकमेकांचे चांगले मित्र. दुसऱ्या एखाद्या शार्कने काही प्रस्ताव मांडला तर हा प्रकार थांबणार.
डावीकडून मार्क, बार्बरा, केव्हिन, लॉरी, डेमंड आणि रॉबर्ट
तशा प्रत्येक शार्कची एखादा सौदा मंजूर करण्यासाठीची स्वतंत्र कारणं असतात. बहुतेक वेळा, जेव्हा कुठल्यातरी उदात्त सामाजिक हेतूसाठी कंपनीचा काही नफा जात असतो तेव्हा शार्क मदत करायला जास्त उत्सुक असतात. एका सैन्यातल्या माणसाने सैनिकांसाठी कमी खर्चात शक्तिवर्धक पेय केलं होतं तेव्हा त्याला दोन शार्क तर मिळालेच, पण सगळ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं आणि सगळ्यांच्या वतीने सैन्याचे आभार मानले. एरवी बऱ्याचदा हे शार्क आपल्याच क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये सहभागी होण्यात जास्त उत्सुक असतात, आणि उद्योजकही त्यांनाच मनात धरून आलेले असतात. फॅशन डिझायनिंग क्षेत्रातल्या उद्योजकांना डेमंड किंवा लॉरी किंवा दोघेही मिळाले की देव पावल्यासारखं होतं. बाकी केव्हिन, रॉबर्ट आणि मार्क यांचं क्षेत्र तांत्रिकदृष्ट्या IT असलं तरी मार्केटिंग आणि इतर बऱ्याच तत्सम क्षेत्रातला त्यांचा अनुभव मोठा असल्याने, त्यांना ‘पटवण्याचा’ प्रयत्न सगळ्यात जास्त लोक करतात. स्त्रियांचे कष्ट हलके करण्यासाठी केलेल्या एका उत्पादनाच्या मालकिणीच्या प्रस्ताव बार्बराने अगदी भावुक होऊन स्वीकारला होता. अर्थात तिचा अनुभव पाहता हा निर्णय विचारपूर्वक घेतलेला होताच, आणि ती कंपनीही आज खुशीत आहे. पण सगळे शार्क हे कधी मार्ग अवघड दिसला म्हणून, किंवा खूप काम करायला हवं आहे हे कळल्यावर प्रस्ताव नाकारतात. आधी मला हे आश्चर्यजनक वाटायचं, पण शेवटी ते स्पर्धेचे परीक्षक नाहीयेत. त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ आणि पैसा गुंतवताना कंटाळा आला तर ते अगदीच साहजिक आहे. कधीकधी कंपनीच्या क्षेत्राचं आणि आपलं जमत नसल्यामुळेही नकार मिळतो. याच कारणासाठी मार्कने गोल्फ-क्लब्स, बार्बराने टाय, केव्हिनने डेटिंग सर्व्हिस, रॉबर्टने कुत्र्याची बिस्किटं, लॉरीने चीझचे खाद्यपदार्थ आणि डेमंडने सायकली या वस्तू तयार करणाऱ्या कंपन्यांचे प्रस्ताव नाकारले आहेत. “या क्षेत्राची मला माहिती किंवा आवड नसल्याने मी पैशाव्यतिरिक्त काही मदत करू शकणार नाही.” असं ते प्रामाणिकपणे सांगतात.
कधीकधी याच्या बरोबर उलट प्रकार घडतो. समोरच्याचा प्रस्ताव इतका आकर्षक असतो, की शार्क लोक एकमेकांशी तो सौदा जिंकण्यासाठी चक्क भांडतात! काही वेळ एकमेकांच्या प्रस्तावांवर मात करायचा प्रयत्न केल्यावर ते उद्योजकाला विचारतील आणि त्या हरखून गेलेल्या उद्योजकाला एक शार्क निवडायचा आनंद मिळतो. अर्थात, बहुतांश वेळा शार्क भांडायच्या ऐवजी एकत्र यायचा प्रस्ताव मांडतात, आणि उद्योजकाचा आनंद गगनात मावेनासा होतो. एका ऐतिहासिक चर्चेनंतर आलेल्या उद्योजकाला उपस्थित असलेले पाचही शार्क भागीदार म्हणून मिळाले! याउलट बऱ्याचदा काही मंडळी एकही शार्क न मिळता परत जातात. पण या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीमुळे ओळख होते आणि इतर अनेक असे ‘शार्क’ यांच्याशी संपर्क साधतात.
सरासरी दर एपिसोडमध्ये एक छोटं सदर असतं, ज्यात पूर्वी येऊन गेलेल्या उद्योजकांचे अपडेट्स मिळतात. सौदा केलेल्या आणि न केलेल्याही लोकांच्या नंतर खास मुलाखती घेतल्या जातात, ज्यामध्ये ते उत्साहाने उद्योग आता कसा तेजीत आहे, आणि आत्ताचा नफा किती वाढलाय, आणि भागीदार शार्क किती चांगले सहकारी आहेत हे उत्साहाने सांगतात. एकदा पैसे दिले की या शार्क मंडळींचं काम संपत नाही; नंतर ते स्वतः त्या कंपनीच्या प्रगतीत जातीने लक्ष घालतात. त्यांच्या अनेक महत्वाच्या संपर्कांचा आणि शिफारशीचा या नव्या उद्योजकांना खूप फायदा होतो. आणि कुठलाही मोठा निर्णय घेताना इतक्या अनुभवी मंडळींची साथ असल्यामुळे योग्य तोच निर्णय घेतला जातो. थोडक्यात, शार्क टॅंकमध्ये सौदा झाला की जो प्रचंड लाभ होतो, त्याचा गुंतवणुकीचा पैसा हा फार लहान भाग असतो.
अखेरीस, मी असंच म्हणेन की ‘बहुतांचे कल्याण’ करण्याचा हेतू साध्य करणाऱ्या मोजक्या कार्यक्रमांपैकी शार्क टॅंक एक आहे. एका पेन्शनर आजीबाईंनी फावल्या वेळातला छंद म्हणून सुरु केलेल्या कलाकृतींना प्रसिद्धी देण्याचं काम या कार्यक्रमातून झालं. तोच छंद आज त्यांचा यशस्वी फॅमिली बिझनेस आहे! एका लहान नऊ वर्षांच्या मुलीच्या लिंबू सरबत विकण्याच्या धंद्यात सुधारणा आणि बऱ्याच नवीन गोष्टी सुचवून शार्क्सनी तिच्या Stall चा Enterprise केला. फार काय, केव्हिन तिला गमतीत असंही म्हणाला होता, “मी बनतो तुझा पार्टनर, पण तू आत्ता शाळा सोडून तुझ्या धंद्याला पूर्ण वेळ देशील का?” बिझनेसचं अधुरं स्वप्न पूर्ण करायला आलेले, छंदातून घराला हातभार लावण्याचा प्रयत्न करणारे, सामाजिक कार्यासाठी कमी खर्चात सोयी उपलब्ध करण्याची इच्छा असणारे आणि भविष्यात अमेरिकेची अर्थव्यवस्था चालवण्याची क्षमता असणारे हुशार लोक....... या सगळ्यांची मदत शार्क टॅंक करू शकतो. आणि या जगाशी आपला परिचय करून देण्याचं श्रेयही त्याला द्यायला हवं. मास्टरशेफ प्रमाणेच, एखाद्या क्षेत्रातल्या सगळ्यात यशस्वी लोकांच्या काम करण्याच्या पद्धती बघून आपल्याला जो फायदा होतो, तो मोजता येत नाही. मोजता न येणारा फायदाही महत्वाचा असतोच, नाही का?
असो, आता आवरतं घेतो. TV पाहण्याचा आपला मुख्य उद्देश मनोरंजन हाच असतो. माझ्या बाबतीत बोलायचं झालं, तर पुस्तक वाचणे किंवा TV पाहणे या जेवणाबरोबर ओघाने येणाऱ्या क्रिया आहेत. (म्हणूनच मी कधीकधी त्यातली महत्वाची क्रिया कोणती ते विसरतो आणि डेझर्ट म्हणून आईची बोलणी खातो) पण मनोरंजन करावं अशाच हेतूने आपण TV लावतो, तेव्हा ती गरज भागवणारे असंख्य कार्यक्रम असतात. त्यातले लक्षात राहण्यासारखे जे होते, त्यांना स्वतंत्र लेखाचा मान देण्यात मला आनंद झाला. पण TV अजून बंद करायची वेळ आलेली नाही. या मनोरंजनाच्या बाबतीतही आपल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात, आणि त्यानुसार मी ज्या कार्यक्रमांकडे जास्त ओढला जातो त्यांचं वर्णन मी पुढे करणार आहे. शार्क टॅंकचा एपिसोड संपला, but don’t go anywhere! We’ll be right back with समोरचा पडदा ४!!
And it's here! SP4
And it's here! SP4
Very Intersting....aage badho buddy😁 we are going nowhere!
ReplyDelete>>म्हणूनच मी कधीकधी त्यातली महत्वाची क्रिया कोणती ते विसरतो आणि डेझर्ट म्हणून आईची बोलणी खातो
ReplyDelete😂😂 I used to think all desserts are pleasant.
:)
ReplyDeleteमस्तच! नवीन कार्यक्रम आणि त्याची माहिती नर्मविनोदीपणे सांगण्याची जुनी पद्धत...दोन्ही खास! ;)