पलीकडे : अंगणात
पूर्वीच्या काळी असा समज होणं साहजिक होतं, की आपली पृथ्वी सगळ्याच्या केंद्रस्थानी असून बाकी मंडळी तिच्याभोवती फिरतात. सूर्य आणि चंद्र तर फिरताना दिसतातही. आणि बाकीच्या चांदण्या ‘शो’ म्हणून लावल्यासारख्या दिसतात. यामध्ये गैर काहीच नाही. उंबरठ्यावर भिंत नसून दरवाजा आहे हे कळेपर्यंत, आत बसून बाहेरचं जे दिसतं ते एका रेखाटलेल्या चित्रासारखं भासणं हे नैसर्गिक आहे. आणि अगदी पूर्वीच्या काळी आपल्याकडे दुर्बिणींसारखी साधनेही नव्हती, ज्यामुळे आपल्याला काही ठळक फरक लक्षात आले असते. उदाहरणार्थ, काही तुलनेने कमी प्रकाशणाऱ्या चांदण्या याही फिरत असतात, आणि एवढ्या चांदण्यांपैकी एकच तेवढी लाल दिसते, वगैरे वगैरे. पण ही साधने आली, आणि विकसित झाली, तशी आपल्याला आपल्या अंगणाची अचूक माहिती मिळत गेली.
सर्वांत महत्त्वाची माहिती म्हणजे आपण राहतो ते घर आणि अंगण आपल्याच पिताजींच्या मालकीचे नसून आपण एका मोठ्या वाड्यात भाडेकरू आहोत, ही. या वाड्याचा मालक म्हणजे आपल्याला इथून गोंडस वाटणारा, प्रत्यक्षात सदैव भडकलेला सूर्य. असे असूनही काही प्रमाणात त्याचे त्याच्या ‘पृथ्वी’ या भाडेकरूवर इतरांपेक्षा जास्त प्रेम आहे. आपली पृथ्वी सूर्यमालेत ज्या महत्त्वाच्या स्थानावर आहे, त्याला पाश्चात्य शास्त्रज्ञ ‘गोल्डीलॉक्स झोन’ म्हणतात. गोल्डीलॉक्स आणि तीन अस्वलांची गोष्ट आठवतीय? ही गोल्डीलॉक्स नावाची मुलगी लहानपणापासून स्वभावाने तशी पक्की बरं का. तीन अस्वलांच्या घरात घुसून त्यांच्या गोष्टी वापरणारी. अनुक्रमे श्री., सौ., व कुमार अस्वल यांची खीर खाऊन पाहून तिने दिलेली “This is too hot; this is too cold; this is just right,” ही प्रतिक्रिया खूप गाजली. सूर्यमालेतील पृथ्वीच्या स्थानाचे वर्णन करताना या परिकथेचा संदर्भ वापरण्यावरून या शास्त्रज्ञांची कल्पकता आणि विनोदबुद्धीच दिसून येते. खरंच आपली पृथ्वी ‘just right’ आहे. तिच्या आधीच्या बुध आणि शुक्र यांना सूर्याची झळ बसते, तर पलिकडच्यांना त्याचा थंडपणा सहन करावा लागतो. इथं कसं बेष्ट आहे.
बुध आणि शुक्र आपल्याला सर्वांत आधी सापडले, हे उघड आहे. ते आपल्या आणि सूर्याच्या मध्ये असल्याने त्यांना पाहून त्यांच्या कक्षेचा तपास सहज लावता आला. मंगळ शोधणंही तितकंच सोपं होतं. आपल्या आकाशातल्या एकमेव लाल चांदणीकडे नीट पाहिल्यावर तो आपल्या सगळ्यात जवळचा ग्रह असल्याचं आपल्याला कळलं. त्यापलीकडचे दोन ग्रह, मध्ये खूप अंतर असूनही आपल्याला सापडले याचे कारण म्हणजे त्यांचे प्रचंड आकार. त्यानंतर युरेनस, मग नेपच्युन आणि नंतर प्लूटो असे आपल्याला सापडत गेले. प्लूटो ग्रह आहे का नाही यावरून बराच काळ चाललेला वाद लक्षात असेलच. या दीर्घकाळ चाललेल्या चर्चेचा फायदा हाच की त्या बिचाऱ्याला तेवढा काळ तरी ग्रह म्हणवून घेता आले. पण त्याचं सुंदर गोलाकार रूप पाहून त्याला अगदी लघुग्रह म्हणणं पण आपल्याला झेपलं नसावं. आज त्याला बटू ग्रह (dwarf planet) या नावाने ओळखतात. त्याच्यापलिकडचा एक बऱ्यापैकी सारखे आकारमान असणारा दुसरा बटू ग्रहही आपल्याला सापडलाय. त्यामुळे साध्या तरी आपल्या या वाड्यात आठ श्रेष्ठ आणि दोन कनिष्ठ मेंबर आहेत हे आपल्याला ठाऊक आहे, आणि त्याचबरोबर आपल्या या शेजाऱ्यांचे स्वभावही.
भौगोलिक आणि भावनिक दृष्ट्याही, मंगळ आपल्याला शुक्रापेक्षा जवळचा आहे. एका अर्थी हे विरोधाभासात्मक आहे. कारण तुलना करायची म्हटली तर शुक्र केव्हाही मंगळापेक्षा सुंदर आहे. पाश्चात्य देशातही यांचे बारसे करताना मंगळाचे नाव Roman God of War वरून ठेवले गेले तर शुक्राचे Roman Goddess of Beauty वरून! पण आपल्याला नंतर जशी या आपल्या अगदी शेजारी असलेल्या जगांची ओळख झाली, तसं खरं काय ते आपल्या लक्षात आलं. नीट बघितलं, तर मंगळ लाल असून रक्तवर्णी नाही. त्याऐवजी त्याचा रंग गंजलेल्या लोखंडासारखा आहे. त्याच्या पृष्ठभागावर लोखंड इतक्या प्रमाणात आहे की वातावरणातील प्रक्रियांमुळे तो गंजून लालसर झाला आहे. तरीही, आपल्या पृथ्वीप्रमाणेच त्याच्याही ध्रुवांवर बर्फाळ प्रदेश आहेत. पूर्वी तो dry ice असेल असा अंदाज होता, पण मंगळावर पाणीही असू शकते हा नवीन खळबळजनक शोध ते मत बदलवेल असे वाटते. शिवाय त्याच्यावर पांढरट रेतीची वाळवंटेही आहेत; तसंच सूर्यमालेतील सर्वोच्च शिखर (Olympus Mons, ~ 22,000 m) आणि सर्वांत खोल दरीही (Valles Marineris, ~ -7000 m) तिथेच आहे. आणि वातावरणात ९५% CO2 असला तरी, सूर्यमालेत पृथ्वीच्या खालोखाल जीवसृष्टी वाढू शकेल असा मंगळच आहे. या सगळ्या शोधांमुळे मंगळाचा भाव चांगलाच वधारलाय आणि चंद्रानंतर आता आपण या ग्रहाला भेटी द्यायच्या दृष्टीने काम करत आहोत.
जर दुरून रागीट भासणारा आपला शेजारी प्रत्यक्षात असा असू शकतो, तर एवढा सुंदर मोत्यासारखा दिसणारा शुक्र कसा असेल? विचारच करायला नको. ‘दुरून डोंगर साजरे’ याचं शुक्र हे उत्तम उदाहरण आहे. तो मोत्यासारखा पांढरा दिसण्याचं कारण म्हणजे त्याचं वातावरण आपल्यापेक्षा खूपच दाट आहे, आणि त्यात सगळे नको ते वायू भरले आहेत. ‘ग्रीनहाऊस इफेक्ट’चा परिणाम तिथे सर्वाधिक होतो आणि तिथलं तापमान चारशे डिग्रीच्या वर जाऊ शकतं. मंगळाप्रमाणेच आपण एक कृत्रिम उपग्रह शुक्रावरही पाठवला होता. Venera 9 नावाचं आपलं धाडसी यंत्र ते घाणेरडं वातावरण भेदून पृष्ठभागावर पोचलं. तिथून त्याने पृष्ठभागाचे काही फोटो पाठवले, आणि काही वेळातच प्राण सोडला!! (म्हणून आपण यंत्र पाठवतो). आणि जणू हे कमी होतं, म्हणून त्याच्या हवेचा दाब पृथ्वीच्या नव्वद पट आहे. हे समजून घेण्यासाठी तुम्ही नऊ गाईंना एकाच वेळी खांद्यावर घेऊन उभे आहात अशी कल्पना करा, असं त्यांनी सांगितलं होतं. मी कल्पना केली नाही. वास्तविक याच्या आकारमानामुळे याला पृथ्वीचा जुळा भाऊच म्हणतात, पण स्वभाव इतके टोकाचे! शिवाय तो विक्षिप्तही आहे. एकतर हा पृथ्वीच्या उलट्या दिशेने स्वतःभोवती फिरतो, आणि तेही इतकं हळू, की तिथला दिवस वर्षापेक्षा मोठा होतो! एकूणच शुक्र म्हणजे अवघड जागचं मोठं दुखणं असलं तरी, शास्त्रज्ञ म्हणतात की तो आपल्याला भविष्य दाखवतो. जागतिक तापमानवाढ आटोक्यात आणली नाही, तर आपली पृथ्वी एक दिवस शुक्र होईल आणि मग आपल्याकडे सामूहिक पश्चात्ताप कारण्याएवढाच वेळ उरेल. तरी आता यासंदर्भात जागरूकता खूपच वाढलीय आणि आपण उलट्या दिशेने जायलाही लागलेलो आहोत, पण कुणा मुर्खाला अजून परिस्थितीचं गांभीर्य कळलं नसेल तर त्याला शुक्र दाखवावा. पुढच्या संवर्धनाच्या कामाला तो आपल्या शेजारी उभा असेल!
बुधाचीही आपल्याला एवढीच माहिती आहे, पण आपण त्यात एवढा रस घेत नाही. एकतर तो सूर्याच्या इतक्या जवळ आहे की आपण तिकडे काही पाठवलं तर, ते जळून जायची दाट शक्यता आहे. तसा बुध हा सगळ्यात लहान ग्रह. गुरु आणि शनी त्याची टिंगल करताना म्हणतात, “हॅ, आमचा उपग्रह तुझ्यापेक्षा मोठा आहे.” आणि बिचारा ते ऐकून घेतो कारण ते खरेच आहे! गुरूचा गनिमीड आणि शनीचा टायटॅन हे उपग्रह बुधापेक्षा आकाराने मोठे आहेत. सूर्यमालेत एकूणच आकाराच्या बाबतीत फार तफावत दिसून येते. कधी सूर्य आणि एका ओळीत सगळे ग्रह असं आयताकार चित्र पाहिलं, तर त्या आयताची एक बाजू सूर्यानेच व्यापलेली! मग एका ओळीत चार ठिपके, त्यातले मधले दोन रंग ओळखण्याइतपत मोठे दिसतात. ते म्हणजे आपली पृथ्वी आणि तिचा नालायक भाऊ! मग एक लघुग्रहांचा पट्टा. आणि त्याच्यापलिकडे दाट क्रीमच्या रंगाचा एक अतिप्रचंड गोळा. त्याच्या पृष्ठभागावरचा एक भलामोठा लाल डाग पाहून त्याला डोळा असावा असं वाटतं. सूर्यमालेतला हा सगळ्यात मोठा सभासद ‘गुरु’ या ‘कडक’ नावाने ओळखला जातो. आपले कृत्रिम उपग्रह याच्या भेटीला पाठवणे अगदीच अवघड. कारण स्थायूरुप गुरु ढगांच्या त्या अजस्त्र आवरणात कुठेतरी दडलेला आहे. गुरु आणि त्याच्या पुढचे ग्रह, स्वतःभोवती अतिवेगाने फिरून ढग गोळा करतात आणि आपला आकार खूप वाढवून ठेवतात. पण या ‘खोडकरपणात’ गुरु सगळ्यात यशस्वी आहे. आपण केला होता एक प्रयत्न, एक उपग्रह त्याच्या डोळ्यातून आत सोडायचा. गुरूच्या आत जाताना त्याने आपल्याला फोटोही पाठवले होते. ढगांच्या खाली, वातावरण जाणवण्याच्या पातळीवर आपल्या यंत्राला जांभळट रंगाचे पृष्ठभागसदृश काहीतरी दिसले म्हणे. मग त्याच्याशी संपर्क तुटला. आजही Pioneer नावाचा आपला साहसी उपग्रह गुरूच्या रहस्यमय दुनियेत कुठेतरी अस्तित्वात असेल.
माझा अनुभव असाच आहे, की गुरु फार काळ आपले लक्ष वेधून घेऊ शकत नाही. कारण ‘The Crown Jewel of Solar System’ ही उपाधी मिरवणारा महाभाग शेजारीच उभा असतो. मला लहानपणापासून शनीचं आकर्षण आहे. फार काय, मावशीने मला पृथ्वीगोल भेट दिला तेव्हा मी ‘शनीगोल’ नाही का मिळत असं विचारलं होतं. त्याला ‘साडेसाती’ जोडणाऱ्यांची मला चीड यायची, पण त्याच्यामागची भूमिकाही कळू शकते. आपल्याला एकूणच माहित नसलेलं किंवा आत्तापर्यंतच्या अनुभवापेक्षा वेगळं असं काही दिसलं की पहिल्यांदा आपल्या मनात भीतीची भावना निर्माण होते. आपल्या पूर्वजांनी शनी पहिल्यांदा पाहिल्यावर तो इतर सगळ्यांपेक्षा वेगळा नाही भासला तरच नवल. शनीची कडी अत्यंत सुरेख दिसते, आणि तिच्यामुळेच त्याच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळेपण लाभले आहे. त्याचा हा अद्भुत अलंकार नसता तर तोही गुरूसारखाच आणि जरासा लहानच असा ढगांचा गोळा राहिला असता. पण शनीची कडी हे विश्वाच्या वैविध्याचे लक्षण आहे. गुरु आणि शनी हे एकूणच आपल्या सूर्यमालेतले ‘दादा’ लोक आहेत. सगळ्या बाबतीत पुढेच! बुध आणि शुक्राला स्वतःचे उपग्रह नाहीत (शुक्राने यासाठी स्वतःलाच दोष दिला पाहिजे) आणि आपण आपला चंद्र तर मंगळ त्याचे ‘फोबोस’ आणि ‘डिमॉस’ यांना घेऊन आहोत. पण गुरु आणि शनी ‘जास्त उपग्रह कुणाचे’ अशी चढाओढ लागल्याच्या थाटात चक्क साठएक उपग्रह गोळा करून फिरतायत! काही वाटतं का नाही? शनीच्या एवढ्या सगळ्या उपग्रहांत टायटन हा सगळ्यात कुतूहलजनक आहे. एक म्हणजे त्याला चांगलं वातावरण लाभलंय, आणि त्याच्यावर मिथेन मिसळलेले आणि अत्यंत थंड असे पाणी आपल्याला सापडले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, जीवसृष्टीच्या पूर्वी पृथ्वी जशी होती तसा टायटन आज दिसतो आहे. आपल्याला आशा आहे, की सूर्य जेव्हा राक्षसी तारा होईल, तेव्हा टायटनपर्यंत पुरेशी ऊब पोचून पाण्यातला मिथेन हवेत विरून जाईल आणि जीवसृष्टी सुरु होऊ शकेल. आपण आपल्या मातेला वाचवणार आहोतच, पण सूर्य राक्षसी तारा झाल्यावर सगळं अवघडच होईल. अर्थात, त्याला अब्जावधी वर्ष आहेत. पण तेव्हा जर मानवजात शिल्लक असेल, तर आपण वनस्पती आणि प्राणी घेऊन कायमचे टायटनवर स्थायिक होऊ शकतो आणि तिथल्या आकाशाचा पंचमांश भाग व्यापणाऱ्या या सुंदर ग्रहाच्या छायेत आनंदाने राहू शकतो.
आता फार लांबवर पाहायची गरज नाही. शनीच्या पलीकडे डोळ्यांना सुखावह वाटणाऱ्या निळ्याशार रंगाचे दोन जुळे ग्रह आहेत. त्यातला जरासा मोठा आणि फिकट रंगाचा तो युरेनस आणि लहान, गडद रंगाचा नेपच्युन. या दोघांना संस्कृत नावे नाहीत, कारण हे तुलनेने नुकतेच सापडलेले ग्रह आहेत. गुरु आणि शनीप्रमाणेच हेही वायुरूप राक्षस आहेत, पण त्यांच्या वातावरणातल्या कुठल्या वायूंमुळे त्यांना असे रंग मिळालेत यावर आपण डोकेफोड करतोय. सूर्यमालेतल्या प्रत्येक ग्रहाला स्वतःचा असा एक खास गुणधर्म असतो. बुधाचा लहान आकार; शुक्राचा ‘म्याडनेस’; पृथ्वीचा जीव. मंगळाचा खास लाल रंग; गुरूचा लाल डोळा आणि शनीची कडी. युरेनसचं काही असेल तर एवढंच की सगळ्या ग्रहांपैकी त्याचाच पृष्ठभाग (किंवा ढगांचे आवरण) पूर्णतः प्लेन आणि गुळगुळीत आहे. कुठे रंगात बदल नाही की कमीअधिक दाट ढगांचे पट्टे नाहीत. आपण सूर्यमालेचं मॉडेल करताना बॉल वापरायचे म्हटले, तर बाकी ग्रहांसाठी आपल्याला बरेच नक्षीकाम करावे लागेल, पण एक साधा फिकट निळा बॉल घेतला तर तो सहजच युरेनस बनू शकेल. आपल्याला आधी युरेनसलाही कडी आहे हा शोध लागला, मग चारही वायुरूप राक्षसांना कड्या असतात हे कळलं. गुरुची कडी म्हणजे त्याच्या इमेजची अगदीच हवा काढेल अशी आहे. शनीची सर्वांत सुस्पष्ट, आणि त्याखालोखाल युरेनसची. नेपच्युन हा बिचारा तसा उपेक्षित ग्रह. युरेनसच्या कक्षेत मध्येमध्ये करायला लागला तेव्हा सापडला. सूर्यमालेतला सर्वांत लांबचा ग्रह, आणि त्याला प्लूटोच्या विचित्र कक्षेशी जुळवून घ्यावे लागते. Voyager 2 ला ते यंत्र असून नेपच्युनपर्यंत पोचायला बारा वर्ष लागली! आपण कधी ट्रिप काढायचा विचार केलाच तर आपल्याला मानवी शरीर गोठवून परत त्याच स्थितीत जिवंत बाहेर काढण्याची कला अवगत असली पाहिजे. त्याशिवाय हा प्रवास करायचा म्हटला तर आपण परत येऊ तेव्हा पन्नास वर्षे उलटलेली असतील, आपल्या बरोबरीचे मित्रमैत्रिणीही आपल्यापेक्षा वयाने मोठे असतील आणि जगातलं काहीच आपल्याला ओळखू येणार नाही. एवढी वर्ष दूर काढल्यावर त्याचा आपल्या आणि मातेच्या नात्यावरही परिणाम होईल.
आपल्या अंगणात…. Clockwise गुरु, पृथ्वी, शनी, मंगळ, नेपच्युन, शुक्र, युरेनस आणि बुध. मध्यभागी सूर्य
आपल्याला अनेकदा हा प्रश्न पडला, की ग्रह सापडणे का थांबले? अजून कितीतरी असू शकतील आपल्या सूर्यमालेत? पण ते खूप अवघड काम आहे. त्याचं कारण जयंत नारळीकरांनी त्यांच्या ‘आकाशाशी जडले नाते’ या पुस्तकात सांगितले आहे. त्याचं काय आहे, आपल्याला इथून सगळ्या चांदण्याच दिसतात. तो ग्रह आहे हे कळायला तो हलताना दिसला पाहिजे. पण आता प्लूटोचा सूर्यप्रदक्षिणाकाळ २४७ वर्षे इतका आहे. त्यापलिकडच्या ग्रहाचा कदाचित ३६० वर्षे असू शकेल. याचा अर्थ एका सबंध वर्षात तो ग्रह फक्त एका डिग्रीने हलेल. एवढीशी हालचाल पाहणे आपल्याला जमणे कठीण आहे. विरोधाभास हा, की आपल्या दुर्बिणींच्या साहाय्याने आपल्याला सूर्यमालेच्या बाहेरचे बरेच काही दिसते, पण आपल्या अंगणात अजून एक सोबती आला, तर आपल्याला ते कळणार नाही.
आता अंगणातल्या ओळखीच्या सर्वांची तरी आपल्याला पूर्ण माहिती आहे. आणि संशोधन यशस्वी होत असल्याचे पुरावेही मिळत आहेत. आपल्याला अंगणाची माहिती झाली तेव्हा आपण पृथ्वीकेंद्रीत विश्वाच्या कल्पनेतून कायमचे बाहेर पडलो. काही काळ सूर्यकेंद्रित विश्वाची कल्पना टिकली. पण अगदी थोडा काळ. कुणाला कधी प्रश्न पडू शकेल, की सगळ्या सभासदांपैकी पृथ्वी सगळ्यात गुणी नाही का? प्रश्नच नाही! मग सूर्यानंतर वाड्याच्या चाव्या पृथ्वीकडे का येणार नाहीत? मग तिला नेपच्युनकडे जरा लक्ष देता येईल, गुरु-शनीला जरा समज देता येईल आणि शुक्राला शिक्षा करता येईल. पण या प्रश्नाचे उत्तर खरेतर ‘सूर्यानंतर म्हणजे काय’ या प्रश्नाच्या उत्तराइतकेच गहन आहे. पण अंगणात उतरल्यावर आपण कुंपणाच्या पलिकडे काय आहे ते पाहू शकलो, आणि त्यावरून एवढं नक्की कळलं की पृथ्वी कितीही गुणी असली तरी ते काम सूर्यच सांभाळू शकतो. कारण आपल्या वाड्याच्या आजूबाजूच्या सगळ्या वाड्यांतही आपल्याला तारा आणि त्याभोवती ग्रह, हेच दृश्य आढळले. त्यानंतर जे शोध लागले, त्याने सूर्यकेंद्रित विश्वाची कल्पना तर गेलीच, पण सूर्याला सर्वोच्च स्थान देण्याची प्रथाही मागे पडली. अर्थात, आपण आणि इतर सभासदांच्या दृष्टीने त्याचे स्थान सर्वोच्च आहे, पण तो तसा एकटाच नाही. त्याच्यासारखे बरेच आहेत, त्याच्याहून मोठेही आहेत. पण अंगणातल्या अंगणात खेळत खेळत बसून ते आपल्याला कळणार नाही. त्यासाठी एक वेगळं धाडस करावं लागेल, आणि उतरावं लागेल...... मोठ्या रस्त्यावर.
Jump a few light years with me to Plk3
Jump a few light years with me to Plk3
Wish our physics textbook was this interesting.. :)
ReplyDeleteHave you read about the hypothetical 'Planet 9'? It is an interesting read related to this topic.
Surekh.....apratim.......shikana aani shikavana hi vegli kala aahe........tula te utkrushtaritya jamtay......abhinandan...
ReplyDelete-Sushant