पलीकडे : मोठ्या रस्त्यावर


आपल्या जन्मापासून आपल्या पृथ्वीच्या अंगणाचा मालक सूर्य आहे आणि नंतरही खूप काळ तोच असणार आहे. असा काय फरक आहे त्याच्या आणि आपल्यामध्ये? आणि तो सारखा तळपणार आणि बाकीचे आपण कायम ढिम्म, असे का? (म्हणजे आपण नाही, बाकीचे ग्रह) आणि त्याचा आकार इतका कसा मोठा असू शकतो? सूर्याच्या व्यासात १०९ पृथ्वीच्या आकाराचे ग्रह मावू शकतात, यामुळे आपण सूर्याच्या आकाराची कधी नीट कल्पना करू शकत नाही. त्याऐवजी आपल्या आयताकार चित्राच्या एका बाजूला भरपूर जाळ दाखवून आपण समाधान मानतो. आपल्या पृष्ठभागावर सतत हालचाल चालू असते, पण इथे जीव आहे म्हणून. आणि गुरु, शनीवर वादळे चालू असतात म्हणून. पण सूर्याच्या वेगळ्याच हालचालींचे कारण काय? त्याच्या पृष्ठभागावरून मधूनच उठणाऱ्या प्रचंड आगीच्या लाटा...... त्याही पृथ्वीपेक्षा मोठ्या असतील. पण सूर्यात एवढे काय खास आहे ते जाणून घ्यायला जरा वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा.
एक सारखे ध्यानात ठेवावे लागते, की मोठ्या रस्त्यावर आल्यावर सगळ्याच वस्तू आणि मोजमापे कल्पनेपलीकडे मोठी झालेली असतात. अर्थात, ‘लहान’ आणि ‘मोठे’ या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहेत, पण आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने जर काही मोठे असेल तर हे. १०९ पृथ्वी मावतील एवढा व्यास, दोनावर तीस शून्य इतकं वस्तुमान आणि सर्वांत लांबच्या प्लूटोपासून ३.६७ अब्ज किलोमीटर एवढं अंतर ही मोजमापे ठेवून आपल्या सूर्याने आपल्याला विश्वाच्या एकूण मोजमापांची चांगली कल्पना दिली आहे. आपल्या अंगणात होतो तोवर किलोमीटर वगैरे ठीक होतं. पण मोठ्या रस्त्यावर सगळंच प्रकाशवर्षांत मोजायला जास्त सोपं पडतं.
‘प्रकाशवर्ष’ हे एकक आपण सर्वसाधारणपणे विश्वातील बहुसंख्य अंतरे मोजायला वापरतो, आणि परिस्थिती अगदीच हाताबाहेर जात असेल तर ३.२ अब्ज प्रकाशवर्षांचा ‘गिगापार्सेक’ हे वापरतो. प्रकाश ही आपल्याला माहित असलेली सर्वांत वेगवान वस्तू. म्हणून प्रकाशाला एका वर्षात जेवढे अंतर कापता येते तेवढे अंतर म्हणजे एक प्रकाशवर्ष. तसे आपण सोईनुसार प्रकाशमिनिट, प्रकाशसेकंद वगैरेही वापरतो. सूर्यापासून प्रकाशाला इथे यायला सुमारे साडेआठ मिनिटं लागतात, यावरून प्रकाशवर्ष म्हणजे किती प्रचंड अंतर असावे याची कल्पना येते. पण इथे बाहेर आल्यावर हेच एकक सर्वाधिक वापरावं लागतं.
आपली सूर्यमाला म्हणजेच विश्व नाही हे आकाशातल्या या इतक्या चांदण्यांची ओळख पटली तेव्हा कळले. त्यातले काही अर्थात ग्रह होते, पण बाकीचे अजिबात न हलणारे असे होते. जास्त शक्तिशाली दुर्बिणीच्या साहाय्याने आपल्याला तेही सूर्यासारखे तारे असल्याचं कळलं. त्यातल्या काहींच्या आपल्यासारख्या ग्रहमाला होत्या, तर काही तारे स्वभावामुळे एकटेच एका ठिकाणी आयुष्य कंठत होते. हो, ताऱ्यांनाही आयुष्य असतं. आणि त्याबद्दल जेवढी माहिती आपल्याला मिळाली आहे, त्यानुसार सूर्य तसा अजून बऱ्यापैकी तरुण आहे.
मला ताऱ्यांना नावे देणाऱ्यांचे कौतुक करावेसे वाटते. नावे संस्कृत असोत वा पाश्चात्य भाषांतली, पण ताऱ्यांना ‘लय भारी’ नावे देण्याकडे आपल्या सगळ्यांचाच कल आहे. आपल्या सूर्यमालेच्या सगळ्यात जवळचा शेजारी म्हणजे ‘Centauri System’. इथे आपल्याला एक नवीनच प्रकार पाहायला मिळाला. तीन तारे एकत्र एका अंगणात राहून ग्रह वाटून घेत होते. पहिल्या लेखात त्याला ‘नरतुरंग’ असे नाव असून तो सगळ्यात प्रखर तारा असल्याचे म्हटले होते. पण आपण त्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला प्रत्यक्षात ते तिन्ही तारे दिसतात, म्हणून ते जास्त प्रखर भासतात. तसा स्वतंत्र असा ‘Sirius’ हा तारा सर्वाधिक प्रखर आहे. आणि नरतुरंग त्यापैकी सगळ्यात कमी प्रखर असा तारा आहे. तो आपल्या सूर्याच्या सगळ्यात जवळचा असल्याने त्याला आपण Proxima Centauri असे नाव दिले आहे, तर उरलेल्या दोघांना Alpha Centauri A आणि Alpha Centauri B अशी नावे आहेत. नरतुरंग सूर्याच्या सगळ्यात जवळचा असला, तरी त्याच्यात आणि सूर्यात ४.२ प्रकाशवर्षांचे अंतर आहेच. यामुळे एक गंमतशीर प्रकार आपल्या दृष्टीस पडतो. त्या ताऱ्याचा जो प्रकाश आपल्या डोळ्यात शिरतोय तो त्याने चार वर्षांपूर्वी सोडलेला आहे! म्हणून आत्ता आपल्याला Centauri कुटुंब चार- साडेचार वर्षांपूर्वी ते जसं होतं तसं दिसतं आहे. म्हणजे आपण अंतराळात दूर डोकवायला लागलो, की आपण भूतकाळात जायला लागतो. अवकाश आणि काळ यांचं हे एक अद्भुत नातं आहे.
सगळे तारे काही सूर्याइतके नसतात. काही खूप लहान, तर काही अतिराक्षसी. पण हे सगळे त्यांच्या जीवनातले टप्पे आहेत. एक दिवस आपला सूर्यही लाल राक्षसी तारा होणार आहे. आत्ता नजर टाकली तर आपल्याला काही राक्षसी तारे दिसतात. त्यांचेही प्रकार आहेत. Orange Giant, Red Giant, Blue Supergiant असे. त्यांच्या आकारावरून, उष्णतेवरून आणि त्यामुळे येणाऱ्या रंगावरून हे वर्गीकरण केलं जातं. ‘रोहिणी’ नावाचा एक Orange Giant आपल्या आकाशात कुठेतरी असतो; त्याला इंग्लिश नाव Aldebaran असे आहे. आणि ‘काक्षि’ नावाचा एक लाल राक्षसी तारा काही काळ आपण पाहिलेला सगळ्यात मोठा तारा होता. त्याचे इंग्लिश नाव Betelgeuse आणि त्याची त्रिज्या सूर्याच्या ७०० पट आहे. या ताऱ्याची, प्रकाशाच्या वेगामुळे निर्माण झालेली एक मजेदार गोष्ट आहे. हा महातारा आपल्यापासून ६४० प्रकाशवर्षे एवढ्या अंतरावर आहे. त्यामुळे आत्ता तो आपल्याला जसा दिसतो तसा ६४० वर्षांपूर्वी होता. पण खरी गंमत पुढे आहे. त्याचं काय आहे, हा तारा येत्या काही वर्षात प्रचंड स्फोट होऊन प्राण सोडणार आहे असं आपल्याला कळलं आहे. पण आपल्याला ते कळणार नाही. अजून १०० वर्षांनी त्याचा स्फोट झाला तरी आपण त्याला किमान पाचशे वर्षे अजून पाहू शकू! अजून ६४० वर्षांनी तेव्हाच्या लोकांना या राक्षसी ताऱ्याचा स्फोट पाहायला मिळेल, जो त्यांच्या भूतकाळात होऊन गेला होता!
ताऱ्यांचे आयुष्य असते तरी काय? तारा म्हणजे एक प्रचंड रासायनिक प्रक्रिया आहे. त्याच्या गर्भात सतत चालू असलेल्या रासायनिक क्रिया आणि स्फोट यांच्यामुळे त्याला ऊर्जा मिळत राहते आणि तो जळत राहतो. कालांतराने त्याच्या पोटातले इंधन संपत जाते तेव्हा त्याचे तापमान कमी होत जाते आणि तो फुगून मोठा होतो. असे मोठे होत ते राक्षसी तारे होतात, पण सगळ्यांचा एकाच प्रकारे मृत्यू होत नाही. ते त्यांच्या वस्तुमानावरून आणि रासायनिक स्थितीवरून ठरतं. काही तारे जळून सगळं इंधन संपवतात आणि मग त्यांचा भलामोठा पृष्ठभाग विरत जाऊन शेवटी ते आकाराने अत्यंत लहान होतात आणि ‘श्वेतबटू’ म्हणून उर्वरित आयुष्य कंठतात. आता ते तारे उरलेले नसल्याने या प्रक्रियेला ‘मृत्यू’ म्हणता येईल. हे श्वेतबटू फक्त पांढरा प्रकाश देण्याइतपत शक्तिमान उरतात. आपल्या सूर्याचे हेच होणार आहे. तो आकाराने मोठा होईल तसा बुधाला आणि शुक्राला गिळून टाकेल. त्याने पृथ्वीला नाही गिळले तरी, इथली उष्णता असह्य वाढून जीवसृष्टीचा अंत होईल. त्यानंतर तो श्वेतबटू होईल, आणि या पोळून निघालेल्या जगावर परत जीव फुलवण्याची त्याची क्षमता गेलेली असेल. या वेळेपर्यंत पृथ्वी एक अतिशय थंड असा वैराण प्रदेश झालेली असेल. सगळे महासागर गोठून गेलेले असतील आणि कायमची रात्र झालेली असेल. आणि आज आपल्याला जसा चंद्र दिसतो तसा तेव्हा एक केविलवाणा सूर्य तिथे बसलेला दिसेल. आपल्या जीवनदात्याचे हे रूप पाहायला कुणीच नसेल, हेही बरंच.
पण मी मघाशी म्हटल्याप्रमाणे तो अजून तरुण आहे आणि अजून त्याच्यात भरपूर जोम आहे. आणखी अब्जावधी वर्षे तो असाच प्रकाशत राहील. पण त्याला असा झिजून मृत्यू येणार हे जरा वाईट आहे. त्याउलट काही तारे पोटातला ताण असह्य होऊन प्रचंड स्फोट होऊन मृत्यू पावतात. हे ऐकायला भयानक वाटले, तरी या स्फोटांचा पुष्कळ उपयोग होतो. मला नुकतेच कळले, की पृथ्वीवर सापडणारी अनेक मूलद्रव्ये या स्फोटांतून आलेली आहेत. आपलं सोनं, चांदी, तांबे, लोखंड वगैरे धातू आणि बरेच अधातूही खूप खूप वर्षांपूर्वी एका राक्षसी ताऱ्याच्या स्फोटातून निर्माण झाले. हायड्रोजनच्या सगळ्यात लहान अणूच्या अंतर्भागात काही क्षणांत भरपूर इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स येऊन वाढले की त्याचे Atomic Mass वाढून त्याचे रूपांतर जास्त मोठ्या मूलद्रव्याच्या अणूत होते. ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर घडायला प्रचंड ऊर्जा कमी वेळात निर्माण व्हावी लागते, जी निर्माण करायला एका ताऱ्याचा स्फोट पुरेसा असतो. तात्पर्य, एका महाताऱ्याच्या स्फोटातून खूप वर्षांपूर्वी ही मूलद्रव्ये निर्माण झाली, आणि पृथ्वी अजूनही गरम असताना तिच्या पृष्ठभागावर येऊन पडली. पृथ्वी गार झाल्यावर तिचा पृष्ठभाग निर्माण झाला आणि त्याखाली असलेली ही मूलद्रव्ये आपल्याला सापडली. त्या अनामिक ताऱ्याची ही आपल्याला देणगीच आहे. हा एक चांगला मार्ग असावा जाण्याचा...... शेवटच्या स्फोटातही सर्वांच्या उपयोगी पडण्याचा. ताऱ्याच्या अशा स्फोटाला ‘Supernova’ असे नाव आहे. यानंतर त्याचा सगळा शिल्लक राहिलेला पदार्थ (Matter) हा एका मोठ्या ढगाच्या रूपात अवकाशात राहतो. त्यातल्या रासायनिक प्रक्रियांतून नवीन तारे जन्माला येतात. अशा ढगाला ‘अभ्रिका’  (Nebula) असा शब्द आहे. मृत्यूसमयी स्वतःला जाळून घेऊन राखेतून पुनर्जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्ष्याची कथा यातूनच आली असेल का?
मला माहित असलेला अजून एक प्रकार आहे, तो फक्त प्रचंड वस्तुमान असलेल्या ताऱ्यांच्या बाबतीत घडतो. तो एक वेगळाच प्रकार आहे आणि त्याबद्दल पुढच्या लेखात थोडेसे असेल. तर अशा या सगळ्या आपल्या शेजारच्या ताऱ्यांचा सर्वांत मोठा समूह म्हणजे तारकाविश्व (Galaxy). आपल्या तारकाविश्वाचे नाव अर्थातच आकाशगंगा आहे. रात्री क्वचित दृष्टीस पडणाऱ्या तिच्या मोत्यासारख्या दुधी पट्ट्यामुळे तिला हे नाव मिळाले असावे. इंग्लिशमध्येही त्याला ‘The Milky Way’ असे नाव आहे. एक मिनिट! आपण स्वतः तिच्या आत असू तर आपल्याला ती दिसते कशी? आपली सूर्यमाला या भल्यामोठ्या आकाशगंगेच्या एका कोपऱ्यात आहे. त्यामुळे आपल्याला दुसऱ्या बाजूचा पट्टा दिसू शकतो. त्यांच्या सुंदर तबकडीसारख्या आकारामुळे आणि अद्भुत रंगसंगतीमुळे तारकाविश्वे खूप सुंदर दिसतात. विश्वात अगणित तारकाविश्वे आहेत, आणि आपण तारकाविश्वांच्या एका मोठ्या समूहाचा भाग आहोत. आपली आकाशगंगा आणि शेजारची देवयानी (Andromeda) या दोघी Virgo Cluster या समूहाचा भाग आहेत आणि तो समूह Virgo Supercluster या मोठ्या समूहाचा भाग आहे. काय लहान वाटतं नाही? देवयानी खूप काळापासून आपल्या शेजारी असून आपल्यापेक्षा आकाराने चांगलीच मोठी आहे. सध्या दोन्ही तारकाविश्वे एकमेकांना धडकण्याची मार्गावर आहेत. देवयानी धडकली की आपल्या आकाशगंगेवर प्रचंड आघात होऊन आपण सगळे विखुरले जाऊ. आपल्या अंदाजानुसार, सूर्य राक्षसी तारा बनण्यापूर्वीच, म्हणजे साधारण चार अब्ज वर्षांनंतर ही टक्कर होईल. इतर सगळ्या अशा गोष्टींप्रमाणेच, याचीही काळजी करायची आपल्यालाच काय, पण सबंध जीवसृष्टीलाही गरज नाही!
Big Road.jpg
वरच्या ओळीत सूर्य आणि Betelgeuse. मध्यभागी आकाशगंगा. खालच्या ओळीत अश्वशिर अभ्रिका (Horsehead Nebula) आणि एक Supernova
मध्ये काही काळ सूर्य विश्वाच्या केंद्रस्थानी असल्याची कल्पना प्रचलित होती, तरी या शोधामुळे आपल्याला सत्य जास्त चांगल्या रीतीने समजतंय. आपण आकाशगंगेच्या कुठल्याशा कोपऱ्यात आहोत, आणि तिच्यात इतर अनेक आपल्यापेक्षा खूप मोठे तारे आणि इतरही गोष्टी आहेत. तिच्यासारखी अनेक तारकाविश्वे आहेत. आपण जितके पुढे जातो तितके हे अंतर वाढल्यासारखे वाटते. मुळात विश्वच प्रसरणशील आहे, म्हणून हे घडणं तर अटळ आहे. पण मुळात ते प्रसारण कसे पावते? उत्तर काहीसं भयावह आहे.
पूर्वीपासून आपल्याला हा प्रश्न सतावतो, की विश्वातलं सगळं आपल्याला दिसू का शकत नाही? आपण विश्वात अगणित तारे, अगणित ग्रह, असंख्य तारकाविश्वे आहेत असं म्हटलं, पण त्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त असलेल्या या अंधाराचे काय? बराच काळ आपली अशी समजूत होती, की हवेचे कणही प्रकाश परावर्तित करू शकतात, पण अंतराळात हवादेखील नसल्याने प्रकाश परावर्तित होत नाही आणि म्हणून आपल्याला ते काळं दिसतं. पण काळाच्या ओघात आपल्याला असे प्रश्न पडले की खरंच असं घडत असेल का...... का प्रकाश परावर्तित होण्याऐवजी लुप्त होईल असे काहीतरी असेल? किंवा आपण जो अंधार पाहतो तो अंधार नसून काळ्या रंगाचे, पण प्रकाश न सोडणारे पदार्थ असतील का? या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी, आपल्यालाच त्या अंधाऱ्या कोपऱ्यांत डोकवावे लागेल. त्या गोष्टींवर ‘प्रकाश टाकण्याचा’ हाच एक मार्ग आहे बुवा!

Wonder what's attracting us so relentlessly to Plk4

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प