समोरचा पडदा ५ : यशस्वी सिने-मालिका


आजवर या विषयाकडे फक्त माझ्याच दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे असेल, पण या मालिकेतले चार लेख होऊनही मी याच्या एका बाजूकडे जरा दुर्लक्षच केले होते. त्याचे काय आहे, एक दुसरा भलामोठा पडदा माझ्या नसला तरी माझ्या आजूबाजूच्या बऱ्याच लोकांच्या मनोरंजन विश्वाचा महत्त्वाचा भाग आहे. आम्ही सिनेमा पाहायला थिएटरला फारसे जात नाही; ‘इंडियन एक्सप्रेस’च्या पुरवणीतल्या “Now Showing at your nearest…..” या सदरापेक्षा “Today on Movie Channels” हे सदर आम्हाला जास्त प्रिय आहे. असो. थिएटरमध्ये असो किंवा घरी, पण सिनेमा हा सगळ्यांच्याच मनोरंजनाचा अविभाज्य भाग असतो आणि त्याचा आणि माझा परिचय बहुतेकवेळा समोरच्या या छोट्या पडद्यावरच होत असल्याने आता त्या विषयाला हात घालायची इच्छा आहे.
यांच्याच भाषेत बोलायचं तर अशा प्रकारे ही मालिका आधीच्या मालिकेचा ‘सिक्वेल’ होईल. एखाद्या सिनेमाचा दुसरा भाग काढावा की काढू नये हा निर्णय घेणं अवघड तर आहेच, शिवाय बऱ्याच दिग्दर्शकांनी यातला चुकीचा पर्याय निवडलाय (जो बहुतेक वेळा ‘सिक्वेल काढू’ हाच असतो). ‘गल्ला’ काय होणार हे प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून ठरणार हे उघड असलं तरी तो प्रतिसाद ओळखणं जरा जिकिरीचं असतं. तसा आपल्यापुरता विचार करायचा झाला, तर जो सिनेमा आपल्याला खास आवडत नाही त्याचा पुढचा भाग बघण्यास आपण उत्सुक नसतो, आणि आवडलेल्या सिनेमाचा बघायची इच्छा असू शकते. पण हे इथेच थांबत नाही. कधीकधी आपल्याला सिनेमा इतका आवडतो की ते सगळं तिथेच थांबावं असं आपल्याला प्रकर्षाने वाटतं. माझ्या सगळ्यात आवडत्या सिनेमाबद्दल, म्हणजेच ‘इन्सेप्शन’बद्दल माझं हेच मत आहे. काही खास जमलेले सिनेमे स्वतंत्रच राहू द्यावेत. त्याला तसं कारणही आहे. पहिल्या सिनेमाची कथा जेव्हा स्वतंत्र म्हणून लिहिली जाते तेव्हा सिनेमा संपतो तिथेच गोष्टही संपते. मग प्रतिसाद बघून तीच पात्रं परत घेऊन पुढचा सिनेमा रेटला की आधीच्या चांगल्या पूर्णत्वाला नेलेल्या गोष्टीचीही वाट लागते. अशा एखाद्या ‘एकमेवाद्वितीय’ या शब्दात वर्णिलेल्या सिनेमाचा पुढचा भाग आला तर, आपल्या सगळ्या आवडत्या पदार्थांनी भरलेलं ताट रिकामं करून आपण समाधानाने मागे रेललो आणि कुणीतरी येऊन परत तेच सगळे पदार्थ आपल्या ताटात वाढून ‘सावकाश होऊ दे’ असं म्हणून गेलं की आपली जी अवस्था होते तशी काहीशी होते.
उलट ज्या कथा एकापेक्षा जास्त सिनेमांसाठी लिहिलेल्या असतात, त्यांची संपूर्ण सिरीज सुखावून जाते. याचंच उदाहरण म्हणजे ‘हॅरी पॉटर’चे आठ सिनेमे. अर्थात, ते पुस्तकांवर आधारित असल्याने ते श्रेय पूर्णतः दिग्दर्शकाला जात नाही. तशी एखादी गोष्ट चालू ठेवण्याच्या कामगिरीत यशस्वी झालेल्या दिग्दर्शकांच्या यादीत जॉर्ज लुकसचं नाव आदराने घेतलं पाहिजे. ‘स्टार वॉर्स’चे पहिले सहा सिनेमे त्या काळातलं तंत्रज्ञान वापरून ज्या अद्भुत प्रकारे त्याने तयार केले आहेत ते खरोखरचं तोड नसलेलं काम आहे. पण ही जादू केवळ त्याच्या ‘टच’ मध्येच नसून स्वतः ‘स्टार वॉर्स’च्या कल्पनेतही आहे, हे सध्याच्या घटनांवरून स्पष्ट होत आहे. या मालिकेचा प्रवास अगदीच कुतूहलजनक आहे. हिचे ‘A New Hope’, ‘The Empire Strikes Back’ आणि ‘Return of the Jedi’ हे तीन भाग सर्वप्रथम आले आणि प्रचंड यशस्वी झाले. मग या तीन सिनेमांतला मुख्य खलनायक ‘डार्थ व्हेडर’ याची पूर्वकहाणी सांगणारे ‘The Phantom Menace’, ‘Attack of the Clones’ आणि ‘Revenge of the Sith’ हे तीन सिनेमे आधीच्या तिघांचे प्रिक्वेल म्हणून आले आणि डोक्यावर घेतले गेले. यामुळे ‘A New Hope’ या मालिकेत चौथ्या स्थानावर जाऊन पोहोचला आणि ‘The Phantom Menace’ ते ‘Return of the Jedi’ अशी सहा सिनेमांची मालिका २००५ मध्ये तयार झाली. त्यानंतर तब्ब्ल दहा वर्षांनी ही कथा पुन्हा जागृत झाली आणि नवीन दिग्दर्शक जे. जे. अब्राम्स याने ‘The Force Awakens’ हा सातवा भाग काढला आणि त्याने २ अब्ज डॉलर्सहून अधिक कमाई केली. त्यानंतर आलेला ‘Rogue One’ हा सिनेमा आठवा भाग नसून तिसऱ्या आणि चौथ्या भागाच्या काळादरम्यान घडलेल्या एका घटनेची कथा आहे. आणि अजूनही ही सिरीज संपलेली नाही! पुढच्या वर्षी मुख्य कथेतल्या एका नायकावर चरित्रात्मक सिनेमा येतोय, आणि शिवाय यावर्षीही एक येणार आहे असं दिसतंय. कुतूहलजनक गोष्ट अशी की एरवी यशस्वी मालिकांना लागू होणारे नियम इथे अजिबात पाळले गेलेले नाहीत. ही मालिका म्हणजे एक ठरलेलं कथानक नाही, यातील कलाकार सतत बदलत असतात आणि एक सलग कथा नसल्याने ती कधी संपेल हेही सांगता येत नाही! ‘स्टार वॉर्स’च्या संकल्पनेत काहीही नवीन घाला आणि ते जगप्रसिद्ध अवकाशातले सीन्स भरपूर ठेवा, आणि आम्ही ते डोक्यावर घेऊ असा जगाने ‘स्टार वॉर्स’शी केलेला अलिखित करारच म्हणावा लागेल. आपलं सशक्त तंत्रज्ञान, चांगले कलाकार आणि दिग्दर्शक, मूळ कथानक आणि उपकथानकांचे प्रचंड यश आणि अर्थातच सर्व सिनेमांनी मिळून जगभरात केलेली ७.६ अब्ज डॉलर्सची कमाई यांच्या बळावर ही अद्भुत मालिका Sci-Fi सिनेमांच्या जगावर राज्य करते आहे.
Image result for star wars


तर दुसरीकडे संपूर्ण मालिकेत कलाकार बदलले नाहीत तरी  मालिकेला सुसंगतता टिकल्याचा फायदा मिळतो, कारण पुढच्या भागांमध्ये चेहरे ओळखीचे असले की आपण त्याच पात्रांशी अधिक सहजतेने जोडले जाऊ शकतो. त्याच कलाकारांना घेणं सोपं होणार की अवघड हे ठरवताना मालिकेची लांबीही महत्त्वाची असते. साधारणतः ‘ट्रिलॉजी’ अर्थात तीन भागांच्या मालिकेला कलाकार मिळवणं तितकं अवघड नसावं. पण त्याहून अधिक लांबीच्या मालिकांमध्ये अशी सुसंगतता दिसून येण्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे अर्थातच ‘हॅरी पॉटर’ची आठ सिनेमांची मालिका. हे आठ सिनेमे पूर्ण व्हायला दहा वर्ष लागली आणि यातले बहुसंख्य कलाकार तेच राहिले. हॅरी पॉटरच्या ‘The Sorcerer’s Stone’ या पहिल्या भागात दहा-अकरा वर्षांच्या बालकलाकारांनी त्यांच्या भूमिकांत पदार्पण केलं आणि पुढची दहा वर्षे पात्रांसोबत तेही मोठे होत गेले. याचाच अद्भुत परिणाम म्हणजे पहिल्या भागातली मुख्य लहान मुलांच्या भूमिका निभावणारे डॅनियल रॅडक्लिफ (हॅरी पॉटर), रुपर्ट ग्रिन्ट (रॉन विज्ली), एमा वॉटसन (हर्माइनी ग्रेंजर), बॉनी राईट (जिनी विज्ली), टॉम फेल्टन (ड्रॅको मॅल्फॉय) आणि मॅथ्यू लुईस (नेव्हिल लॉंगबॉटम) हे सहा कलाकार आपल्याला संपूर्ण मालिकाभर पाहता आले. अर्थात, यांनी सुरुवात केली तेव्हा सगळे बालकलाकार असून हे त्यांना मिळालेलं पाहिलंच मेगाप्रोजेक्ट होतं. यशस्वी आणि नावाजलेल्या अभिनेत्यांनी या कामासाठी स्वतःला झोकून देणं आणि शेवटपर्यंत या भूमिकेची साथ देणं ही खरोखरीच कौतुकास्पद बाब आहे, आणि म्हणूनच मला प्रो. मिनर्व्हा मॅक्गॉनॅगल  आणि प्रो. सिविरस स्नेप यांच्या भूमिका साकारणाऱ्या मॅगी स्मिथ आणि अॅलन रिकमन यांच्याविषयी प्रचंड आदर वाटतो.
             Harry Potter and.jpg     
वरून Clockwise रुपर्ट ग्रिन्ट, डॅनियल रॅडक्लिफ, एमा वॉटसन, अॅलन रिकमन, टॉम फेल्टन, बॉनी राईट, मॅथ्यू लुईस आणि मॅगी स्मिथ

याच प्रकारे उल्लेख करावासा वाटतो तो रुबियस हॅग्रिड या भूमिकेतील कलाकार रॉबी कोलट्रन यांचा, आणि शिवाय अनेक सीन्समध्ये डोकावणाऱ्या गॅरी ओल्डमन आणि ज्युली वॉल्टर्स यांचा. खरे तर अशा अनेक चांगल्या कलाकारांच्या बळावर ही यशस्वी मालिका उभी आहे, आणि तिच्या या सुसंगततेमुळेच ही काल्पनिक कथा खरी असावी अशी श्रद्धा बाळगणाऱ्या हजारो चाहत्यांना अजून एक सबळ कारण मिळाले आहे.
या मालिकेत काम करणारे बहुसंख्य कलाकार माझ्या मते एका वेगळ्याच जिद्दीने प्रेरित झालेले होते. ही मालिका म्हणजे एक अद्भुत काल्पनिक जग वास्तवात आणण्याची धडपड असल्याने ते शक्य तेवढं खरंखुरं भासेल हे मनात ठेवून सगळे कलाकार झटले. अशाच प्रकारची प्रेरणा असेलेले कलाकार ‘द हॉबिट’ आणि ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या दोन ट्रिलॉजींना लाभले आणि एकाच पात्राच्या सर्व प्रवेशांत त्यांनी ती भूमिका वठवली. तरीही, यापेक्षा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो दुसऱ्या एका काल्पनिक विश्वाचा, ज्याच्या वास्तवातील उभारणीसाठी कलाकार असेच झटले, अजूनही झटत आहेत. हे काल्पनिक विश्व एक मालिका नसून काही मालिकांचा आणि स्वतंत्र सिनेमांचा मोठ्ठा संच आहे, आणि त्याला सगळं जग ‘Marvel Cinematic Universe’ या नावाने ओळखतं.
मार्व्हल या ‘सुपरसिद्ध’ कॉमिक पुस्तकांच्या मालिकेचे निर्माते स्टॅन ली हे या काल्पनिक विश्वाचे जनक. हॅरी पॉटर प्रमाणेच हे विश्व पृथ्वीवरच अस्तित्वात आहे, तरी स्वतंत्रपणे आणि गुप्तपणे. स्टॅन लींनी निर्मिलेल्या सगळ्या सुपरहिरो मंडळींची एकत्रित गोष्ट म्हणजे हे विश्व. यामध्ये ‘द अव्हेंजर्स’ या नावाची सुपरहिरो मालिका आणि त्यापैकी काही खास सुपरहिरोंच्या स्वतःच्या मालिका आणि सिनेमे हे सर्व यामध्ये येतं. आणि यातल्या कलाकारांनी आपापल्या सुपरहिरोच्या भूमिका स्वतःच्या तसेच ‘अव्हेंजर्स’ मालिकेतही केल्या असल्याने हॅरी पॉटर प्रमाणेच आता मार्व्हल विश्वातला कुठलाही सिनेमा पाहताना सगळी पात्रे चटकन जवळची होऊन जातात. ‘अव्हेंजर्स’ ही एक सुपरहिरो लोकांची संघटना आहे, ज्यातील सदस्यांची संख्या सतत वाढत जात आहे. यापैकी प्रत्येक सुपरहिरोला स्वतःची अशी गोष्ट असते, ज्यातल्या काहींवर सिनेमे बनवले आहेत. आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका आणि थॉर हे ‘अव्हेंजर्स’ टीममधले महत्वाचे लोक. यांच्या प्रत्येकाच्या नावावर स्वतःच्या पात्रांचे असे तीन सिनेमे आहेत (थॉरचा तिसरा यावर्षी येतोय) आणि या भूमिका करणारे कलाकार म्हणजेच अनुक्रमे रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, ख्रिस इव्हान्स आणि ख्रिस हेम्सवर्थ यांनीच या सर्व सिनेमांत काम केले आहे. एकदा यांच्या स्वतंत्र सिनेमांत यांना पाहिल्यावर ‘अव्हेंजर्स’ मध्ये या भूमिका दुसऱ्याच कुणीतरी केल्या असत्या तर सगळा विचका झाला असता, पण या कलाकारांच्या अशा कमिटमेंटमुळे आयर्न मॅन म्हणजे रॉबर्ट डाउनी ज्युनिअर हे समीकरण डोक्यात पक्कं बसलं आहे आणि सिनेमा कुठल्याही नावाखाली येवो, तो मार्व्हलचा असला आणि त्यात आयर्न मॅन हे पात्र असलं की ही भूमिका तेच करणार हे सर्वांनी ठरवूनच टाकलेलं आहे. २०१८ मध्ये येणाऱ्या ‘इन्फिनिटी वॉर’ या अव्हेंजर्स मालिकेतील तिसऱ्या सिनेमातही हेच कलाकार याच भूमिका करत आहेत. तेव्हा तूर्तास तरी आपल्या सुसंगततेला कसला धोका नाही.
मार्व्हल विश्वाच्या अंतर्गत या सगळ्या सुपरहिरोंच्या गोष्टी एकमेकांना जोडल्या असल्यामुळे हे मुख्य कलाकार वगळता इतरांच्या गोष्टींमध्ये चमकून जाणाऱ्या पात्रांनाही तेच कलाकार ठेवले गेले आहेत. अव्हेंजर्सच्या दोन्ही सिनेमांत ‘ब्लॅक विडो’चं काम करणारी अभिनेत्री स्कार्लेट जोहान्सन हिनेच आयर्न मॅन आणि कॅप्टन अमेरिका यांच्या दुसऱ्या भागांत ही भूमिका केली आहे. तसंच अभिनेते सॅम्युएल एल. जॅक्सन यांनी आपली ‘निक फ्युरी’ ही व्यक्तिरेखा मार्व्हलच्या सर्व सिनेमांत साकारली आहे. खलनायकांविषयी बोलायचं झालं तर थॉरचा दुष्ट भाऊ लोकी ही भूमिका करणाऱ्या टॉम हिडल्सटन (हो, मागच्या वर्षी ऑस्कर्समध्ये प्रियांका चोप्राचा प्रेझेंटर जोडीदार तो हाच) यानेच अव्हेंजर्सच्या पहिल्या भागात तीच भूमिका केली आहे आणि ‘इन्फिनिटी वॉर’ मध्येही या भूमिकेत तोच असणार आहे. कॅप्टन अमेरिकाचा तिसरा भाग अर्थात ‘सिव्हिल वॉर’ ही तर बहुसंख्य मार्व्हल सुपरहिरोंची खिचडी आहे. हा सिनेमा येण्यापूर्वी आलेल्या ‘अँटमॅन’ या सिनेमात ही भूमिका करणाऱ्या पॉल रड याने हीच भूमिका करत ‘सिव्हिल वॉर’मधून अव्हेंजर्स मालिकेत एंट्री घेतली आहे. ‘सिव्हिल वॉर’मध्ये झळकलेला स्पायडरमॅन (हो, तो देखील!) हा टॉम हॉलंड या पूर्णपणे वेगळ्या अभिनेत्याने साकारला असला तरी स्पायडरमॅनच्या तिसऱ्या नव्या मालिकेत येत आहे. हो, त्याला कुणी सलग त्याची गोष्ट सांगूच देत नाही. पहिल्या साध्या स्पायडरमॅनचे तीन भाग आल्यानंतर त्यालाच ‘अमेझिंग’ करून वेगळ्या कलाकाराला घेऊन सात भागांची मालिका आखली गेली, पण तिच्या दुसऱ्याच भागानंतर हा तिसरा कलाकार घेऊन ‘स्पायडरमॅन होमकमिंग’ ही नवी मालिका सुरु होत आहे, ज्यात त्याचे ‘सिव्हिल वॉर’ नंतरचे आयुष्य दाखवले आहे. आणि त्याचा तत्त्वज्ञ म्हणून पुन्हा आयर्न मॅन आहेच! आणि ही सगळी कहाणी झाली मुख्य पात्रांची. इतर शेजारची अनेक पात्रंही ही सुसंगतता टिकवून आहेत. ‘अव्हेंजर्स’ संघटना ज्या S.H.I.E.L.D. या संस्थेपासून निर्माण झाली त्या संस्थेतील फिल कोल्सन (क्लार्क ग्रेग) हा एजन्ट आयर्न मॅनचे सिनेमे, थॉर आणि पहिल्या अव्हेंजर्समध्ये होता. त्याशिवाय एजन्ट मारिया हिल (कोबी स्मॉल्डर्स), आयर्न मॅनचा मित्र वॉर मशीन (डॉन शडेल) आणि त्याची प्रेयसी पेपर पॉट्स (ग्वेनेथ पॅल्ट्रो) ……........ अशी किती नावे घ्यावीत? मार्व्हल विश्व उभारण्यात या सर्वांचा मोठा वाटा आहे आणि यानंतर येणाऱ्या सगळ्या मार्व्हल सिनेमांतही यांनीच यांची कामे करावीत ही इच्छा सगळ्या चाहत्यांच्या मनात आहे.
2017-04-03_16.38.03[1].jpg
वरून Clockwise ख्रिस इव्हान्स, रॉबर्ट डाउनी ज्युनिअर, ख्रिस हेम्सवर्थ, स्कार्लेट जोहान्सन, पॉल रड, टॉम हिडल्सटन, टॉम हॉलंड, सॅम्युएल एल. जॅक्सन आणि मध्यभागी स्टॅन ली
असो. यशस्वी मालिकांवर बरंच बोलणं झालं. हा लेख इथे संपवायची वेळ आलेली आहे, पण ही मालिका काही संपलेली नाही. आणि कधी संपेल तेही आत्ता सांगू शकत नाही. पण मार्व्हल आणि स्टार वॉर्स या मालिकांप्रमाणेच, अशा प्रकारच्या मालिकेतही गोडी असतेच, नाही का?  

Let's get to know these guys more on SP6   

Comments

  1. खूप मस्त बाळासाहेब
    मावस

    ReplyDelete
  2. 😄
    >>इंडियन एक्सप्रेस’च्या पुरवणीतल्या “Now Showing at your nearest…..” या सदरापेक्षा “Today on Movie Channels” हे सदर आम्हाला जास्त प्रिय आहे.
    विशेष आवडलं!😁

    ReplyDelete
  3. Bhari! :)

    ‘स्टार वॉर्स’च्या संकल्पनेत काहीही नवीन घाला आणि ते जगप्रसिद्ध अवकाशातले सीन्स भरपूर ठेवा, आणि आम्ही ते डोक्यावर घेऊ असा जगाने ‘स्टार वॉर्स’शी केलेला अलिखित करारच म्हणावा लागेल.

    >>Haha! I have heard that there are people who primarily work as star wars experts. Is it true? ��

    ReplyDelete
  4. Waa Mastach.....Marvel Cinematic Universe cha prem kadhi kami honar nahi.....ho Robert Downey Jr. Cha Iron man nasel tarch asa hou shakta.... Lihila sundar aahes....

    -Sushant

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प