समोरचा पडदा ६ : अद्भुत शक्ती


आपल्याकडे इतका प्रचलित नसला तरी हॉलिवूडमध्ये तो एक स्वतंत्र प्रस्थापित ‘जॉनर’ आहे. आजवर इथे सुपरहिरो लोकांबद्दल अनेक सिनेमे बनले आणि अजूनही बनताहेत. विशेष म्हणजे उगीच कुठल्याही उपटसुंभाला ‘अद्भुत शक्ती’ देऊन त्याला व्हिलन मंडळींशी हाणामारी करताना दाखवणं ही मानसिकता यांच्यापैकी फारशा कुणातच पाहायला मिळत नाही. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘डेडपूल’ हा त्याला अपवाद आहे. साधीसुधी बाळबोध गोष्ट, प्रचंड हिंसा आणि अपशब्दांचा यथेच्छ वापर यांच्या आधारावर हा सिनेमा उभा आहे. तरीही याचे प्रदर्शन करताना मार्व्हल स्टुडियोजनी तो ‘अँटी-हिरो’ असल्याचं स्पष्ट सांगितलं ही कौतुकास्पद गोष्ट आहे. ‘अँटी-हिरो’ ही एक खास वेगळी संकल्पना. या मंडळींकडे अद्भुत शक्ती असते, पण ते सद्गुणांचे पुतळे वगैरे अजिबात नसतात. बहुतेकवेळा सूड उगवायच्या किंवा अशाच एखाद्या ‘अनैतिक’ हेतूसाठी आपल्या बळाचा वापर करणारे हे लोक. सुपरहिरोच, पण आदर्शस्थानी ठेवावेत असे नाही. यांच्या गोष्टी टाईमपास म्हणून बघायच्या असतात.
याउलट ‘हिरो’ ही संकल्पना खूप जास्त प्रगल्भ आणि विकसित आहे. हिरो (स्त्री-सुपरहिरोंनाही ‘हिरो’च म्हणतात हे ध्यानात ठेवावे) म्हणजे आशेचा किरण; सत्याचा आणि चांगुलपणाचा सर्वांत शक्तिशाली आवाज. देवाचे नाव घेतले की जशी भीती कमी होते, दिलासा मिळतो तसेच सुपरहिरोला पाहिल्यावर मनात आशा जागृत झाली पाहिजे. आपल्या स्पायडरमॅनच्या आत्याने एकदा अत्यंत समर्पक शब्दांत हिरोची व्याख्या केली होती. स्पायडरमॅन-गिरी सोडून देण्याच्या विचार करत असलेल्या पीटरला मेआत्याने समजावले आणि तो परत स्फुरण चढून न्यूयॉर्कच्या गगनचुंबी इमारतींवरून उड्या मारायला लागला. मे आत्या म्हणते, “सगळ्यांना हिरोची गरज असते. शूर, त्यागी माणसं ती. आपल्या सगळ्यांसमोर आदर्श ठेवणारी. हिरो सगळ्यांनाच मनापासून आवडतो. लोक त्यांच्या नावाचा जप करतात, त्यांना भेटण्यासाठी रांगा लावतात. अनेक वर्षांनंतरही ते आपल्याला सांगतात की कसे ते बराच वेळ कोसळत्या पावसात ताटकळत उभे राहिले; केवळ ज्या व्यक्तीने त्यांना धीर न सोडता क्षणभर अजून तग धरून ठेवायला शिकवलं त्याची एक झलक पाहायला मिळावी म्हणून.” तात्पर्य, फॅन्सी ड्रेसपलीकडे बरंच काही असतं!
सगळ्या सुपरहिरोंचा जन्म कॉमिक पुस्तकांतून झाला, आणि यातल्या आघाडीच्या दोन संस्था म्हणजे डी.सी. आणि मार्व्हल. दोघांचेही अनेक सुपरहिरो असले तरी मार्व्हल जास्त लोकप्रिय आहेत हे वेगळे सांगायला नकोच. डी.सी.ने काढलेल्या अनेक सुपरहिरोंच्या सिनेमांपैकी आपल्याला फक्त आपले सुपरमॅन आणि बॅटमॅन तेवढे परिचयाचे वाटतात. आता मात्र सुपरमॅन सगळीकडे चेष्टेचा विषय बनला आहे. तुम्ही या विश्वात नव्याने उतरत असाल तर तुमची निष्ठा कुणावर असली पाहिजे ते आत्ताच ठरवून घ्या. सुपरमॅनच्या उतरत्या लोकप्रियतेला एक कारण आहे. त्याचं असं आहे, की मार्व्हलने काढलेल्या प्रत्येक सुपरहिरोला त्याची / तिची शक्ती कशी मिळते याला अगदी पटण्यासारखी आणि मुद्देसूद उत्तरे दिली आहेत. याच्या तुलनेत सुपरमॅनच्या प्रचंड शक्तीचे कारण तो फक्त परग्रहावरून आला आहे हे सोईस्कर उत्तर तुलनेने रुचले नाही. शिवाय हिरो म्हणून सुपरमॅन तसा बोअर आहे. त्याला या इतरांसारख्या काही खास क्लृप्त्या किंवा चमत्कार करता येत नाहीत; तो एक नुसताच शूर माणूस आहे. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे याच्या कथेत सुसंगतता अडखळली आणि याला त्रासच झाला. सुपरमॅनचे पहिले चार भाग आले आणि मस्त चालले. पण चौथ्या भागाच्या शेवटी सुपरमॅन त्याच्या ग्रहाला भेट द्यायला गेला आणि ‘सुपरमॅन रिटर्न्स’ या भागात दुसराच कुणीतरी सुपरमॅन बनून आला. आपले नवे, अधिक देखणे रूप आपल्या प्रेयसीला, लॉईसला दाखवावे म्हणून आला आणि पाहतो तर काय, तीही बदललेली! आधीपेक्षा जास्त तरुण आणि सुंदर झालेली! यानंतर पूर्ण वेगळ्या कलाकारांना घेऊन आधीच्या कथेशी काहीही संबंध नसलेला ‘मॅन ऑफ स्टील’ आला आणि खास चालला नाही. या सगळ्यामुळे इंटरनेटवर सुपरमॅनची खेचाखेची चालू असते. एक विनोद आठवतो. सुपरमॅन एकदा आयर्न मॅनला, म्हणजेच टोनी स्टार्कला (त्याचे खरे नाव) “माझ्याकडे परग्रहवासी हल्ला झाला तेव्हा मी एकट्याने थोपवला. तुमच्याकडे मात्र तुम्हाला सहा-सहा जण लागले.” (अव्हेंजर्सची गोष्ट) असे कुत्सितपणे म्हणाला. टोनी म्हणजे अगदी पक्का. ऐकून नाही घेणार. तो शांतपणे म्हणाला, “त्या सहापैकी फक्त दोघेच तो हल्ला परतवून लावत होते, आणि बाकीचे चार ही लढाई एका चौकातच ठेवायला झटत होते, जेणेकरून संपूर्ण न्यूयॉर्कचे बारा वाजू नयेत.” (हे खरंच आहे) आणि पुढे मिश्कीलपणे म्हणाला, “बाय द वे, तुझ्याकडच्या हल्ल्याच्या वेळी किती विध्वंस झाला?” आणि सुपरमॅन आपल्या दर्शनीय अंडरवेअरसारखाच लाल चेहरा घेऊन गुपचूप काढता पाय घेतो!!!
मध्ये सुपरमॅनच्या शौर्यावरही शंका घेतली गेली. ‘सुपरमॅन? सुपरमॅन काही शौर्याचं प्रतीक नाही. कारण तो अजिंक्य आहे. शूर असतात ते बॅटमॅनसारखे, ज्यांना आपण नष्ट होऊ शकतो याची पूर्ण कल्पना असूनही झटत राहतात.’ डी.सी.च्या कल्पनाही सुंदर असतात, फक्त चांगली पटकथा आणि दिग्दर्शक यांची साथ लाभली की तेही उत्तम गोष्टी सांगू शकतात, हे पुराव्यानिशी सिद्ध झालं आहे. बॅटमॅनचेही अशाच टिपिकल सुपरहिरो कथानक असलेले सिनेमे येत होते, पण मग नंतर ती संधी जेव्हा ख्रिस्तोफर नोलनला मिळाली तेव्हा त्याने नेहमीप्रमाणे संपूर्ण वेगळा आणि अद्भुत विचार करून ‘डार्क नाईट ट्रिलॉजी’ हे तीन सिनेमे काढले आणि आज बॅटमॅनचे हे तीन सिनेमेच सर्वांत लोकप्रिय आहेत. नोलनच्या परीसस्पर्शाचा परिणाम असा की आज मार्व्हलच्या सिनेमात अवतरलेल्या एकूणएक सुपरहिरोंना एका पारड्यात घातले आणि एकट्या बॅटमॅनला दुसऱ्यात ठेवले तर स्वतःच्या बळावर तो अधिक वजनदार ठरू शकतो. अप्रतिम पटकथा, उत्तम दिग्दर्शन आणि हॉलिवूडच्या दिग्ग्ज कलाकारांचा कास्ट या सगळ्यामुळे बॅटमॅन सुपरहिरो विश्वात ‘डार्क नाईट’ या नावाने अजरामर झाला.
एक विशेष गोष्ट म्हणजे बॅटमॅन स्वतः सुपरहिरो नाहीये; म्हणजेच त्याच्याकडे कुठलीही अद्भुत शक्ती नाही. तो साधा आपल्यासारखा माणूस आहे. त्याची शक्ती आहे त्याच्या जिद्दीमध्ये. हा मनुष्य अगदी दोनदा विचार वगैरे करून बॅटमॅनचे रूप धारण करण्याचा निर्णय घेतो. यामुळे त्याला शक्ती मिळण्याचं काहीतरी भारी कारण द्यायची गरजच पडली नाही. बॅटमॅनची संकल्पना समजावताना जरा गोष्ट सांगावी लागेल.
‘गॉथम’ या काल्पनिक महानगरात ब्रूस वेन हा एका अब्जाधीश उद्योगपतीचा मुलगा. त्याचे आईवडील म्हणजे तेव्हाच्या गुन्हेगारीने काळवंडत चाललेल्या गॉथममध्ये आशेचा किरण होते. गरिबांना आणि असहाय्य लोकांना खूप मदत मार्था आणि थॉमस वेन यांनी केली, पण एकदा एका बेकारीने असहाय्य झालेल्या, नाईलाजाने चोरी करणाऱ्या इसमाने त्यांची हत्या केली आणि ब्रूस अनाथ झाला. लहानपणापासून गुन्हेगारीविषयी त्याच्या मनात चीड निर्माण झाली आणि जरा मोठा झाल्यावर गॉथमला या वाळवीपासून मुक्त करण्यासाठी तो ‘लीग ऑफ शॅडोस’ या गुप्त संघटनेत गेला आणि युद्धकलेचं प्रशिक्षण घेतलं. त्याच्या गुरूचा एक संदेश त्याने मनात पक्का केला : “To conquer fear you must become fear.”
पण जेव्हा ब्रूसला समजतं की ‘लीग ऑफ शॅडोज’चे मुख्य कार्य कुठल्याही मोठ्या शहराचा पापाचा घडा भरला की त्याला जमीनदोस्त करणे हे आहे, तेव्हा तो त्यातून बाहेर पडून गॉथमला परत येतो आणि त्याच्या वडिलांच्याच कंपनीत शिरकाव करून त्यातल्या ‘R&D’ विभागाच्या ल्युसियस फॉक्स या त्याच्या वडिलांना ओळखणाऱ्या विश्वासू आणि बुद्धिमान पन्नाशीच्या माणसाला विश्वासात घेतो आणि त्यांनी विकसित केलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर बॅटमॅन साकारण्यासाठी करतो. एकदा आलेल्या एका विनोदात असं म्हटलं होतं, “बॅटमॅन आणि आयर्न मॅनकडे पाहून हे पटतं की जगातली सर्वोत्तम अद्भुत शक्ती पैसा हीच आहे!” आता बॅटमॅनचा पोशाख या कंपनीने सैनिकांसाठी बनवलेला, पातळ पण चिवट आणि विजेच्या प्रवाहाने टणक होणारा सूट आणि झगा असा आहे, जो नंतर रद्द झाल्याने हा उरलेला नमुना ब्रूसला मिळतो. याशिवाय जेम्स बॉंडला लाजवतील अशी अवजारं आणि गॅजेट्स बॅटमॅनकडे असतात. आता हे तर कोणीही करू शकेल, मग त्यात ब्रूसची काय हवा? पण हाच मुळी नोलननी मांडलेल्या ‘बॅटमॅन’ या संकल्पनेचा पाया आहे.
परत गॉथमला येताना ब्रूस जेव्हा त्याच्या अत्यंत विश्वासू आणि जवळच्या बटलरला, अल्फ्रेडला त्याची कल्पना समजावून सांगतो तेव्हा तो म्हणतो, “गॉथममध्ये गुन्हेगारी जग खूप सशक्त आहे. आणि लोकांचा धीर सुटत चाललाय. अशा वेळी एखादा तारणहार यायला हवा असेल तर तो असा असला पाहिजे की जनतेला त्याच्या अस्तित्वानेच लढण्याचं बळ मिळावं आणि गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण व्हावी. एक साधा हाडामांसाचा माणूस म्हणून हे माझ्या आवाक्यातलं नाहीये. माणसाला हरवता येतं, विकत घेता येतं, त्याच्याकडे दुर्लक्ष करता येतं. पण एक प्रतिमा, एक चिन्ह, खूण..... ती तर कायम टिकणारी आणि अजिंक्य असते.” थोडक्यात वटवाघूळाची ती प्रसिद्ध खूण हीच बॅटमॅनचं खरं अस्तित्व आहे. ती दिसली की गुन्हेगार घाबरतात, आणि रस्त्यावरच्या सर्वसामान्यांना एक दिलासा मिळतो. अशा प्रकारे बॅटमॅन हे खऱ्या अर्थाने धैर्य, जिद्द आणि आशा यांचं प्रतीक आहे.
2017-04-06_14.49.46[1].jpg
वरच्या कोपऱ्यात आकाशात झळकणाऱ्या बॅटमॅन सिग्नलचा दिवा, उजवीकडे बॅटमॅनचा सूट आणि खालच्या कोपऱ्यात गॉथम जुलमी हुकूमशाहीखाली असताना बंड करणाऱ्यांचे चिन्ह, जे ते खडूने रस्त्यावर आणि इमारतींवर काढीत.


समोरचा पडदा उघडल्यावर, सिनेमाच्या चॅनेल्सपैकी एकावर या  ट्रिलॉजीतला एक सिनेमा सापडला तर दुसरीकडे कुठे काय आहे ते अजिबात न बघता मी याच्यावर स्थिरावतो आणि मग पुढचा वेळ भारलेल्या अवस्थेत जातो. माझ्या मते, ख्रिस्तोफर नोलनचा बॅटमॅन, लोकांना सुपरहिरो या संकल्पनेचं एवढं आकर्षण का आहे याचं उत्तर सहज देऊ शकतो. पण अशा कौतुकास्पद पात्रांचे विजय अधिक हृदयस्पर्शी करण्यासाठी खलनायक तितकेच क्रूर आणि निर्दय हवेत. बऱ्याच सिनेमांत हिरोच्या बाजूने व्हिलनला रंगवणे हेही तितकेच महत्वाचे मानले जाते. अशाच काही खलनायकांविषयी पुढच्या लेखात असेल. अखेरीस या सगळ्या प्रकारच्या सिनेमांचा संदेश एकच असतो, आणि तो म्हणजे संकट कितीही भयंकर असलं तरी खचून जायचं नाही. हाच संदेश या ट्रिलॉजीच्या पहिल्या भागात आपल्याला ब्रूसच्या वडिलांकडून अत्यंत समर्पक शब्दांत ऐकायला मिळतो.
“Why do we fall, Bruce? So that we can learn to pick ourselves up.”
सुपरहिरोच्या संकल्पनेला माझा सलाम!!                  

Let's cross over to the other side on SP7                    

Comments

  1. wa kitti navnavin anpekshit vishay!
    >>अशाच काही खलनायकांविषयी पुढच्या लेखात असेल.
    pratikshet....

    ReplyDelete
  2. Emphatically loved the way you have wrote this one. Writing about superheroes need all the energy and enthusiasm to make it interesting. This one had that, also the storytelling and dialogues made it hell lot more captivating!

    ReplyDelete
  3. Waaa.....haa aapla agadi jivhalyacha vishay.....Batman Trilogy baddal jitka sangayacha titka kamich....Spiderman pan vishesh.....Iron Man aani Spiderman sarkhya heroes baddal pan vaachayala aavadel.....aani Villains tar arthat khoop fascinating astat..... Tuzya lekhanitun Joker vaachaychay....Vaat paahtoe....

    -Sushant

    ReplyDelete
  4. 'व्ही फॉर व्हेन्डेटा' वाचलं आहेस/पाहिला आहेस का?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प