समोरचा पडदा ७ : दुसरी बाजू
‘Evil’ अर्थात सगळ्या वाईट प्रवृत्ती हा आमच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासक्रमाचा एक खास भाग होता. जगात देव असेल तर त्याने या निर्माण केल्याच का - किंवा अस्तित्वात येऊ का दिल्या - हा प्रश्न होता, ज्याला वेगवेगळी उत्तरे येत. काही म्हणत की Evil हे खरं अस्तित्वात नसून ते सगळं आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. हे उत्तर जरी प्रथमदर्शनी अगदीच मूर्खपणाचं वाटलं तरी त्यामागेही काहीतरी थोडासा का होईना, पण अर्थ आहे. तर दुसरे काही म्हणत की Evil आहे म्हणूनच आपल्याला Good ची किंमत आहे. हे सर्व मुद्दे दुपारच्या चहावर विवेचन करायला चांगले आहेत, पण आपल्या लेखाचा संबंध यातल्या कशाशीच येत नाही. देवाने Evil का निर्माण केलं यापेक्षा ते सिनेमा काढणाऱ्यांनी आपल्या गोष्टींमध्ये का दाखवायला सुरुवात केली याच्याशी आपल्याला जास्त कर्तव्य आहे.
या प्रश्नाला वरील Goodची किंमत ठेवण्याचं उत्तर जास्त योग्य वाटतं, पण त्याशिवाय त्यामुळे कथा खरी वाटू लागते आणि आपण तिच्याशी जास्त सहजतेने जोडले जाऊ शकतो. कुठल्या जगात जर राग, द्वेष, हळहळ, दुःख वगैरे नसेल तर त्या जगात आपल्याला राहायला आवडेल, पण ते जग पडद्यावर बघायला आवडेल का? याउलट पडद्यावर ते काहीच नसले तर, ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात सलतात त्यांच्यापासून ती पडद्यावरची मंडळी सुरक्षित असती तर आपल्याला त्यांच्याबद्दल खूप कमी सहानुभूती वाटली असती. नायक-नायिकेचं प्रोग्रॅम केल्यासारखं एकमेकांच्या प्रेमात पडणं हे काय कमी क्लेशदायक आहे?
खलनायक रचणे हे म्हटले तर सोपे, म्हटले तर अवघड असे काम आहे. सोपेच ठेवायचे असल्यास अमानुष शक्ती किंवा सत्ता असलेला कुणीही सगळ्यांच्या विरोधात उभा राहतो हे दाखवले की काम होते. मग हे येतात, हरतात आणि गोष्ट संपते. हे प्रकार आपल्याला बऱ्याच सुपरहिरो सिनेमांमध्ये पाहायला मिळतात. खलनायकाला हरवणं अवघड करण्यासाठी त्याला प्रचंड शक्ती देणं हा एक मार्ग आहेच, पण नीट रचलेल्या, विकसित केलेल्या खलनायकाच्या पात्राला यासोबत अजून एक गोष्ट हमखास असते, ती म्हणजे इतिहास. आपल्या सिनेमाच्या कथेसोबत तो उलगडत जातो आणि खलनायकाच्या दुष्टपणाचं कारण आपल्याला कळत जातं. असे काही मोजके खलनायक या सिनेमांतून आपल्याला लक्षात राहतात. हा पुढचा खलनायक ज्या कथेचा भाग आहे, ती कथा पुस्तके आणि सिनेमे या दोन्ही माध्यमांतून प्रसिद्ध असल्याने लेखिकेचा ते पात्र रंगवण्यात सर्वाधिक वाटा आहे. तरीही, अतिशय विचारपूर्वक रचलेल्या खलनायकांच्या पात्रांच्या यादीत याचा उल्लेख करायला हवाच.
‘वॉल्डेमॉर्ट’ हा हॅरी पॉटरच्या कथेचा मुख्य खलनायक. जादुई जगाच्या इतिहासातला सर्वांत शक्तिशाली सैतानी जादूगार अशी त्याची ओळख आहे. वॉल्डेमॉर्टची व्याख्या करायची झाली तर ‘आतल्या निद्रिस्त सैतानाला इतिहासातल्या अनुभवांनी दिलेली जागृती’ अशी करावी लागेल. आपल्याला परिचित असलेल्या वर्णभेदाप्रमाणेच जे. के. रोलिंगच्या जादुई जगात रक्तभेद आहे, ज्यानुसार पूर्ण जादूगार असलेल्या कुटुंबांतले लोक मगलूंना (जादू न येणाऱ्या आपल्यासारख्यांना) आणि मगलू परिवारात ‘चुकून’ जन्मलेल्या जादूगारांना तुच्छ लेखतात. वॉल्डेमॉर्ट हा अनाथ आहे. त्याची आई जादूगार असल्याचं कळल्यावर त्याचे वडील तिला सोडून गेले आणि गरिबी आणि असहायतेमुळे त्याचा जन्म झाल्यावर तिचा मृत्यू झाला हे ठाऊक असल्याने त्याच्या मनात एकूणच मगलू समाजाविषयी चीड निर्माण होते. तो वॉल्डेमॉर्ट बनल्यावर आणि शक्ती मिळवल्यावर मगलू लोकांच्या जीवाशी खेळ करणे हा त्याचा एक छंद बनला. पण गतायुष्यातल्या कटू अनुभवांमुळे त्याने टोकाची भूमिका घेतली एवढ्यावरच प्रकरण थांबत नाही. त्याच्या दुष्टपणाचे एवढे एकच कारण मानले तर त्याने सूड म्हणून केलेली वडिलांची हत्या हे सयुक्तिक वाटते. पण त्याने वडिलांसोबत त्याच्या मगलू आजीआजोबांनाही मारून ते घराणंच नष्ट करून टाकलं, शिवाय तो पकडला जाऊ नये म्हणून ते खून केल्याची खोटी आठवण त्याने त्याच्या मामाच्या मनात भरून त्याला अडकवले. या सगळ्यावरून त्याच्या आत दडलेल्या विकृतीची, सैतानी प्रवृत्तीची आणि त्याचबरोबर बुद्धीची कल्पना येते.
शेरलॉक होम्सचं एक वाक्य होतं : “वॉटसन, हे जग मोठं क्रूर आहे. आणि जेव्हा एखादा बुद्धिमान माणूस आपल्या बुद्धीचा वापर वाईट कृत्यांसाठी करतो तेव्हा तो क्रौर्याची परिसीमाच गाठतो.” वॉल्डेमॉर्ट हा त्याच्या काळातला सर्वांत हुशार जादूगार होता आणि हॅरीच्या जादूच्या शाळेचा सगळ्यात हुशार विद्यार्थीही. त्याच्या बालपणीच्या आठवणींतून एक क्रूर हुकूमशहा होण्याचे सगळे गुणधर्म त्याच्यात जन्मतःच होते हे आपल्याला दिसते. याशिवाय त्याला ‘प्रेम’ म्हणजे काय हे कधीच कळलं नाही आणि कळू शकत नाही हा एक वेगळाच गुणधर्म. ‘हत्या केल्यावर आत्म्याचे तुकडे होतात आणि ते तुकडे दुसऱ्या वस्तूत ठेवले तर आपले शरीर नष्ट होऊनही आपण मरत नाही’ हे त्याला कळल्यावर केवळ अमरत्वासाठी हत्या करायला, स्वतःचा आत्मा विभक्त करायला आणि स्वतःला विद्रुप आणि अमानवी करून घ्यायला तो एका पायावर तयार होतो. शेवटी हॅरी पॉटर लिहून झाल्यानंतर जे. के. रोलिंगनी इंटरनेटवर प्रसिद्ध केलेल्या काही माहितीतून वॉल्डेमॉर्टच्या स्वभावाला पाठबळ मिळते. ‘बहुरूपी’ नामक प्राणी ही रोलिंगची खास कल्पना. हा प्राणी कुठयलाही व्यक्तीसमोर त्या व्यक्तीला सर्वांत जास्त ज्याची भीती वाटते त्याचे रूप घेतो. वॉल्डेमॉर्टच्या समोर आल्यावर बहुरुप्याने त्याच्याच प्रेताचे रूप घेतले, हे अत्यंत सूचक आहे. तात्पर्य, सत्तेची आणि शक्तीची हाव, सूडबुद्धी, अत्यंत सुपीक डोकं, क्रूरतेची आवड, असामान्य बुद्धिमत्ता आणि पाडावाची भयंकर भीती या सगळ्या गुणधर्मांचे जिवंत उदाहरण असलेला वॉल्डेमॉर्ट हा काल्पनिक कथांमधला आद्य खलनायक ठरतो.
याउलट काही खलनायकांचा इतिहास आपल्याला माहित नसतो, पण सिनेमाच्या कथेमुळे त्यासंबंधी आपल्याला वाटणारी उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. ती तशी ठेवण्यातच त्या सिनेमाची ताकद दिसून येते. हॅरी पॉटरची संपूर्ण गोष्ट ठाऊक असणाऱ्यांना वॉल्डेमॉर्ट कळतो, पण दुसऱ्या काही सिनेमांमध्ये संपूर्ण गोष्ट कळूनही खलनायक आपल्याला शेवटी कळत नाहीच, आणि तरीही त्याच्याभोवतीच्या गूढ वलयातच त्याचा प्रभाव टिकून राहतो. या वर्णनात तंतोतंत बसणारा एक खलनायक माझ्या परिचयाचा आहे, आणि तो म्हणजे बॅटमॅनच्या ‘डार्क नाईट ट्रिलॉजी’च्या दुसऱ्या भागातला प्रमुख खलनायक अर्थात जोकर.
जोकर हे पात्र शेवटपर्यंत कुणालाच पूर्णतः उलगडत नाही. हा माणूस गॉथम शहराच्या कुप्रसिद्ध ‘मॉब’शी (गुन्हेगारी विश्व) सौदा करतो आणि बॅटमॅनला ठार करायच्या बदल्यात त्यांच्या संपत्तीचा अर्धा हिस्सा मागतो. बॅटमॅनला तो काही करू शकत नाही, पण मॉबला त्रास देणाऱ्या पोलिस कमिशनर, न्यायाधीश वगैरे मंडळींना तो अगदी चातुर्याने योजना आखून ठार करतो, त्याचसोबत बॅटमॅनला ब्लॅकमेल करण्यासाठी सामान्य लोकांचे हत्याकांडही सुरु करतो. पण मॉबकडून अर्धी संपत्ती मिळाल्यावर तो सरळ त्या पैशाच्या ढिगाला आग लावून जाळून टाकतो. यामुळे त्याला नक्की काय हवं असतं ते कुणालाच कळत नाही. ब्रूस वेन (बॅटमॅन)चा विश्वासू बटलर अल्फ्रेड, जोकरची मानसिकता ब्रूसला समजवायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला ते काही प्रमाणात समजतं. अल्फ्रेड त्याला म्यानमार देशाच्या राजाची रत्ने चोरून आणि मग ती जंगलात फेकून देणाऱ्या दरोडेखोराची गोष्ट सांगतो. ‘मग मुळात चोरायचीच कशाला’ या प्रश्नाला अल्फ्रेडचं उत्तर म्हणजे, “काही लोक पैशासारख्या भौतिक सुखाच्या मागे नसतात, आणि म्हणूनच त्यांना समजावता येत नाही, परावृत्त करता येत नाही किंवा कसली लालूच दाखवून बाजूला करता येत नाही. काही लोकांना फक्त जग जळताना पाहायला आवडतं.” कालांतराने हे खरं असल्याचं कळतं. जेव्हा जोकर आणि बॅटमॅन आमनेसामने येतात तेव्हा बॅटमॅन त्याला तो थंड डोक्याचा गुन्हेगार असल्याचं सांगतो. पण जोकर म्हणतो, “तू मॉबविषयी बोलतोयस. कट वगैरे ते करतात. मी म्हणजे गाड्यांच्या मागे भुंकत धावणारा एक कुत्रा आहे फक्त. जर एखादी गाडी मी पकडलीच तर तिचं काय करायचं हेही मला ठाऊक नाही.”
आपल्याला जोकरला वेडा ठरवता येत नाही. कारण त्याच्या वागण्याबोलण्यात (विशेषतः बोलण्यात) खूपदा कटू, परंतु तात्त्विक सत्य असतं. या पात्राच्या वाट्याला खूप चांगले आणि हादरवून टाकणारे डायलॉग्स आले आहेत. “We stopped looking for monsters beneath our beds when we realized they were inside us.” हे त्याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. तो आदर्श व्यक्ती म्हणून सिनेमात चमकलेल्या हार्वी डेन्ट या District Attorneyच्या मनात विष कालवून त्याला शहरातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सूड घ्यायच्या अघोरी मार्गावर आणून सोडतो, कारण त्याला दाखवून द्यायचं असतं की सर्वजण आतून वाईटच असतात. त्याच्या या ‘पराक्रमाबद्दल’ तो बॅटमॅनला सांगतो, तेव्हा इतका चांगला नाकासमोर सरळ चालणार माणूस असा हत्या करून सूड घ्यायला लागेल हे बॅटमॅनला पटत नाही. जोकर त्याला सांगतो, “खरं सांगू? मला फारसं काहीच करावं लागलं नाही. You see, madness is like gravity. It only needs a little push.” या सगळ्याचा विचार करता, जोकर वेडा असावा असं आपल्याला वाटत नाही; त्याऐवजी त्याच्या आयुष्यात अशी कुठली आपत्ती ओढवली असावी ज्यामुळे तो इतका खालच्या थराचा विकृत मनुष्य बनला यावर आपण कळवळून विचार करू लागतो. शेवटी, जोकर हरल्याचं आपल्याला बरं वाटतंच, पण त्याच्याबद्दल किंचित तिरस्कारमिश्रित कणवही वाटते आणि आपण समजून चुकतो, की जोकरसारखा माणूस घडणं हा संपूर्ण मानवजातीचा खूप मोठा पराभव आहे. यामुळेच मला तो आत्तापर्यंत मी पाहिलेल्या सगळ्या खलनायकांपैकी सर्वोत्कृष्ट घडवलेला खलनायक वाटतो. बॅटमॅनच्या आधीच्या सिनेमांमध्ये जोकरला फक्त कुणीतरी वेडा म्हणून दाखवलं होतं. मागे म्हटल्याप्रमाणे ख्रिस्तोफर नोलनचा परिसस्पर्श तो हाच!
हॅरी पॉटर आणि डार्क नाईट ट्रिलॉजी या दोन्ही काल्पनिक कथा होत्या, पण दोन्ही तात्त्विक विचार, संकल्पना आणि वैचारिक सौंदर्य यांनी ओतप्रोत भरलेल्या होत्या. त्यांचे खलनायकही तसेच, पण इतर अशा काल्पनिक कथांच्या सिनेमांत, विशेषतः सुपरहिरोच्या सिनेमांत आपल्याला इतकी प्रगल्भ पात्रे खलनायकाच्या रूपात पाहायची अपेक्षा नसते, सवयही नसते. अशा सिनेमातले खलनायक बहुतेकवेळा ‘उपटसुंभ’ प्रकारातले असतात. मार्व्हल विश्वाचे बहुसंख्य खलनायक असेच काहीही पार्श्वभूमी नसलेले आणि हरवायला अवघड असे असतात. पण उल्लेख करावा असे दोन खलनायक आढळतात. एक म्हणजे मार्व्हलच्या संपूर्ण विश्वाचा मुख्य शत्रू थॅनॉस. हे पात्र कुठल्याही आधुनिक खलनायकापेक्षा आपल्या पुराणातल्या राक्षसांच्या पात्रांशी काहीसं मिळतंजुळतं वाटतं. थॅनॉसच्या क्रूरतेचं कारण अगदीच भन्नाट आहे. तो म्हणे मृत्युदेवतेच्या प्रेमात पडतो आणि तिला खूष किंवा प्रभावित करायला तो असंख्य हत्या करतो. हे काही सुंदर स्पष्टीकरण नसलं तरी यामुळे आपल्या मनात त्याची प्रतिमा एकदम वरच्या दर्जाची होऊन जाते, नाही का? दुसरा म्हणजे अल्ट्रॉन नावाचा रोबो. त्याचा उगम समजवायला थोडंसं गोष्टीत शिरावं लागेल.
अव्हेंजर्सच्या पहिल्या भागात थॅनॉसने पुरवलेली शक्तिशाली ‘चितौरी’ सेना वापरून थॉरचा दुष्ट सावत्र भाऊ (काही गोष्टी बदलत नाहीत) लोकी पृथ्वीवर हल्ला करतो तेव्हाची गोष्ट. आपला आयर्न मॅन त्याला मोठ्या टेचात म्हणाला होता, “तू तुला हवा तो धुमाकूळ घाल इथे. आम्हाला ब्लॅकमेल करता येईल असं समजू नकोस. कारण आम्ही पृथ्वीला वाचवू नाही शकलो तरी ती नष्ट झाल्याचा बदला नक्कीच घेऊ.” पण थॅनॉसने खरंच सर्व शक्तीनिशी हल्ला केला तर आपण कमी पडू असं त्याला वाटतं आणि मग सगळ्या पृथ्वीसकट त्याचे अव्हेंजर मित्र मरताहेत असं स्वप्न त्याला पडून तो व्याकुळ होतो. म्हणून तो पृथ्वीभोवती संरक्षक कवच तयार करेल असा Artificial Intelligence असलेला अल्ट्रॉन नामक प्रोग्रॅम गुप्तपणे तयार करतो. अल्ट्रॉन मग त्यांच्यावर हल्ला करतो आणि इंटरनेटद्वारे पळून जाऊन स्वतःसाठी एक मोठे धातूचे शरीर निर्माण करतो. संरक्षणासाठी बनवलेली महाशक्तिशाली वस्तू आपल्याच जीवावर उठण्याचं हे एक क्लासिक उदाहरण. आपण आपल्याच हाताने आपला विनाश घडवून आणू शकतो हे सत्य अल्ट्रॉन उघडपणे बोलून दाखवतो म्हणून तो इतर साध्या खलनायकांपेक्षा वेगळा आणि प्रगल्भ विचारांचा ठरतो, आणि शिवाय मार्व्हल मांडू पाहत असलेला मुद्दाही आपल्याला पटतो. स्वतःच्या जन्माबद्दल बोलताना अल्ट्रॉन (हो, हा एक अत्यंत बडबड्या प्रोग्रॅम दाखवला आहे. आपल्या निर्मात्याचा म्हणजेच आयर्न मॅनचा हा एक गुण त्याने बरोबर उचलला असावा) एक ‘भारी’ वाक्य टाकतो. “Everyone creates the thing they dread. Men of peace create engines of war; invaders create avengers. People create …… smaller people? Children! Sorry, I lost the word there. Children. Designed to supplant them. To help them ….. End.”
याशिवाय त्याच्या कल्पना आणि धारणेमुळे तो खोलवर विचार करून घडवलेला वाटतो. त्याचं काम जगाला वाचवणं हे आहे हे आयर्न मॅनने त्याला स्पष्ट सांगितलेलं असतं, पण त्याचा अर्थ तो असा घेतो की अव्हेंजर्सचा नाश म्हणजे जगाची सुटका. म्हणून तो नुसता त्यांच्या जीवावर उठत नाही, तर पृथ्वीवर एक मोठ्ठा खडक पाडून जीवसृष्टीचाच नाश करण्याची व्यवस्था करतो. ‘जगाला वाचवायचे असेल तर उत्क्रांती ही झालीच पाहिजे’ हा त्यामागचा विचार. आणि उत्क्रांतीमध्ये त्याच्यासारखे धातूचे रोबो जास्त प्रगत आणि लायक असल्यामुळे मानवजात नष्ट झाली तर जग वाचेल ही त्याची श्रद्धा! “When the Earth starts to settle, God throws a stone at it.” हे वर! पण अव्हेंजर्स एकत्र येऊन अल्ट्रॉनला नष्ट करतात आणि त्यांनीच घडवून आणलेलं अरिष्ट टळतं. मग Post-credits scene मध्ये थॅनॉस येतो आणि “Fine, I’ll do it myself.” एवढं वाक्य टाकून जातो.
वाईटाला अंत नाही. ते सर्वत्र आहे, अनंत आहे आणि कायमस्वरूपी आहे. असे खलनायक असलेल्या कथा येतच राहतील, आणि आपण त्यांचा आस्वाद घेत राहू. मला वाटतं की नायकांपेक्षा खलनायक कळला की ते आपल्यासाठी जास्त लाभदायक असतं. त्यामुळे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट कळून चुकते. ती म्हणजे आपण नदीकिनाऱ्यावर उभे नाही आहोत आणि वाईट हे दुसऱ्या किनाऱ्यावर नाही आहे. वाईट हे चांगल्याप्रमाणेच आपल्या सगळ्यांमध्ये पसरलेलं आहे आणि त्याच्यापासून आपण स्वतःला कधीच पूर्णपणे वेगळे करू शकत नाही हेही कळतं. मग हॅरी पॉटरच्या कथेतल्या एका संदेशाची आठवण होते : लढ, लढत राहा आणि सतत लढा देत राहा. कारण वाईटाचा समूळ नाश करणं जरी शक्य नसलं, तरी त्याला ताब्यात ठेवणं तर आपल्या हातात आहे ना?
वरून Clockwise वॉल्डेमॉर्ट, जोकर, थॅनॉस आणि अल्ट्रॉन
Let's return to the small screen with some more hilarity on SP8
Comments
Post a Comment