रचना १ : आपली अधांतरी घरे
आजपर्यंत आपण, म्हणजे सगळ्या मानवजातीने अनेक शोध लावलेत; अनेक क्षेत्रांत सुधारणा आणि प्रगती केली आहे. एक सबंध जात म्हणून आपली सर्वांत मोठी आणि महत्त्वाची कामगिरी कुठली, असा प्रश्न खूपदा विचारला गेला आहे. आमच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकात कुणीतरी ‘आजतागायत सगळ्यात महत्त्वाचे असे तीनच शोध लागले आहेत, ते म्हणजे चाकाचा शोध, आगीचा शोध आणि बँकिंगचा शोध.’ असं म्हणून ठेवलंय. अर्थात यावरून, हे विधान काही आपल्या प्रश्नाचं उत्तर नसून बँकिंगची स्तुती करण्यासाठी रचलेलं आहे हे आपल्या सहज लक्षात येतं. याच विधानातले दुसरे दोन उल्लेख मात्र योग्य उत्तरे असू शकतात. “When the wheel was invented, it caused a revolution,” ही चाकाचे महत्त्व सांगणारी एक प्रसिद्ध शाब्दिक कोटी आहे. आणि तांत्रिकदृष्ट्या आपण काही आगीचा ‘शोध’ वगैरे लावला नाही; आपल्याला ती ऊर्जा ‘harness’ करता आली एवढंच. पण याशिवाय आपल्या इतिहासात असाच एक महत्त्वाचा शोध आहे, जो अनेक शतके आपले अस्तित्व नुसते टिकवूनच नाही, तर सतत सुधारतही आला आहे. फक्त आपण त्याला आता इतके सरावलेले आहोत, की आपल्याला तो असा खास शोध आहे असं काही वाटतंच नाही. शोध कसला? आपलं घरच तर आहे ते!
हाच तो शोध आणि हेच ते प्रचंड सुधारणा आणि प्रगती घडलेलं क्षेत्र : वास्तूरचनाशास्त्र! तुम्ही सगळे माझ्यासारखे शहरात राहणारे असाल तर आपल्या सगळ्यांचा अनुभव हाच आहे की इमारती आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. आपण जिथे राहतो ते घर, जिथे कामाला जातो ती ऑफिसेस, जिथे जेवायला जातो ती हॉटेल्स आणि जिथे नाईलाजाने जातो ती सरकारी कार्यालये सगळी मोठ्या इमारतींमध्ये असतात. या असंख्य इमारती, आपण आपल्या शहरात कुठूनही पाहिलेल्या कुठल्याही दृश्याचा अविभाज्य भाग. या इमारतींकडे कुणी फारसं कौतुकाने पाहत नाही. पण शेवटी, या इमारती आणि सुबक कौलारू बंगले, जुने महाल, राजवाडे, किल्ले वगैरे या सगळ्यांची जात एकच!
राजवाडे, महाल वगैरे यांना वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणून शान असते, पण तसं पाहायला गेलं तर आपल्या साध्या residential इमारतींची रचनाही काही कमी वैशिष्ट्यपूर्ण नसते. बाहेरून अगदीच काँक्रिटच्या ठोकळ्यांच्या ढिगासारख्या दिसणाऱ्या या इमारतींचे अंतरंग खूप विचार करून आखलेले असते. लिफ्टचा मार्ग आणि जिने वगळता, कुठल्याही फ्लॅटमध्ये शिरलो की आपण इमारतीच्या नक्की कुठल्या भागात आहोत हे सहज विसरतो. याहून जास्त विस्मयकारक वाटतं ते इमारतीचं पाईप आणि वायरींचं जाळं! मला आठवतंय, मी एकदा आईला विचारलं होतं की बाथरूमपेक्षा कॉम्प्युटरची खोली (जिला सुधारित भाषेत ‘स्टडी’ म्हणतात) आकाराने मोठी आहे, तर तिचीच बाथरूम का नाही केली? कॉम्प्युटरला नाहीतरी अशी किती जागा लागते? पण तेव्हा कळलं की स्वयंपाकघर आणि बाथरूम यांच्याबाबतीत आपल्याला हे स्वातंत्र्य मिळत नाही, किंबहुना हवंच असेल तर स्वतः बरीच खटपट करावी लागते. इमारतीच्या गच्चीवरच्या आणि जमिनीखालच्या पाण्याच्या टाक्यांना जोडणारे अनेक पाईप जिथे पोचू शकतात, तिथेच या खोल्या असू शकणार हे उघड आहे. काही अपवाद वगळता सगळे पाईप इमारतीच्या आत असल्याने तिच्या बाह्यरुपावरही काही परिणाम होत नाही.
पाइपहूनही जास्त अचाट असं जाळं असतं ते विजेच्या तारांचं! सगळ्या तारा इमारतीच्या भिंतींतून रक्तवाहिन्यांसारख्या पसरलेल्या असतात. एरवी या गोष्टी आपण गृहीत धरत असल्याने त्यांचं दर्शन आपल्याला अगदी थक्क करून टाकतं. मला आमच्याच घरी घडलेला प्रसंग आठवतो. आमच्या इमारतीतल्या काही घरांप्रमाणे आमच्या घरातही फरशा उखडल्या होत्या. त्या प्रकरणात, इमारतींनाही गॅसेस होतात ही नवी माहिती मिळाली. त्या गॅसेसचा दाबामुळे किंवा तत्सम कारणामुळे घरातल्या काही फरशा फुगून वर यायच्या. चालताना उंचवटे जाणवत. यावर त्या फरशा फोडून नवीन बसवणे हाच एक उपाय आहे. मग आमच्या घरातल्या अर्ध्याअधिक फरशा रीतसर फोडून काढल्या गेल्या, आणि त्याच्याखाली दिसणारं दृश्य फारच अनपेक्षित होतं. काळी, दाट अशी वाळू सगळीकडे पसरलेली होती. नेमक्या हॉलमधल्याच फरशा उखडल्याने तिच्यावरून जाणं भाग होतं. त्यानंतर नव्या फरशा बसवेपर्यंत आम्ही घरातल्या घरात बीच अनुभवला. नुसती वाळू असती तर एकवेळ ठीक होतं, पण ती जरा हलवून पाहिली की वायर्स हातात यायच्या. घरातल्या सगळ्या प्लगपॉइंट्सकडे जाणाऱ्या मोठ्या वेलींसारख्या वायर्स. टी.व्ही.चा मागचा भाग उघडून आत पाहिलं की जसं होतं तसं झालं. या एवढ्या सगळ्या वायर्स अशाच प्रत्येक घरात कशा पसरवल्या असतील आणि कधी? हे खरं गुंतागुंतीचं काम!!
काही residential इमारती त्यांच्या वेगळ्याच रचनेमुळे आश्चर्यचकित करून जातात. माझ्या आजीचं नवीन घर आहे ते अशाच एका वेगळ्या रचनेच्या इमारतीत. ही आहे चारच मजली, पण आतून एका जुन्या वाड्यासारखी. नेहमी पाहायला मिळत नाही अशी एक गोष्ट म्हणजे हिच्या तळमजल्यावरही घरे आहेत. इमारतीच्या चार बाजूंपैकी दोन बाजूंना प्रत्येकी दोन घरे आहेत आणि उरलेल्या दोन बाजूंना पार्किंग आहे. मध्यभागी जिना आहे, आणि वरच्या मजल्यांना ‘मजला’ म्हणावं असं काही खास अस्तित्व नाही. फक्त टोकाच्या घरांकडे नेणारे पॅसेज. इतर इमारतींमध्ये पॅसेजेसही पूर्णपणे आत असतात आणि म्हणून खाली उतरल्यावरच आपल्याला बाहेर पडल्यासारखं वाटतं, जे या इमारतीच्या रहिवाश्यांना दाराबाहेर पडल्यावरच अनुभवायला मिळतं. बंदिस्त असण्याची भावना कमी होते, नाही का? थोडक्यात, ही इमारत म्हणजे अगदी जुना वाडाच आहे, आणि घराच्या दारांना कड्या आहेत हाच काय तो फरक आहे.
आजी एकदा म्हणाली होती की तळमजल्यावर घर आणि अशी रचना असल्यामुळे, आपण एका मोठ्या इमारतीच्या आत नसून टुमदार बंगल्यात आहोत असंच वाटतं. काही लोकांना असं घर आवडतं, तर काहींना ते बाहेरून सहजासहजी दिसणार नाही अशा ठिकाणी असायला आवडतं. अशा लोकांच्या गरजा भागवायला मग residential इमारती उभ्याआडव्या पसरतात. परवाच माझ्या पाहण्यात अशीच एक अजस्त्र इमारत आली. माझ्या आत्याचं नवीन घर बाणेरला एका नव्या सोसायटीत आहे. या सोसायटीतल्या इमारतींना A, B, C अशी वेगवेगळी नावे असली तरी प्रत्यक्षात ती एकच इमारत आहे. तिची लांबी साधारण दीडशे मीटर एवढी असेल. उंची नेहमीसारखीच दहा-बारा मजले. आजीच्या इमारतीत तळमजल्यावर घर होते तर इथे बरोबर उलटा प्रकार : दुमजली पार्किंग! त्यालाही कारण होते म्हणा. या सोसायटीची जमीन काही सपाट नव्हती, आणि हे धूड नेमकं एका उतारावर उभं होतं. त्यामुळे उतार असलेल्या भागात एक पार्किंग उभारणं आवश्यक होतं, जेणेकरून तो सगळा पट्टा समान पातळीवर आला असता आणि वर इमारत नीट उभी राहिली असती. पण ते पार्किंग पुरेना, मग त्याच्यावर दुसरं पार्किंग बसवलं. यामुळेच उताराच्या सुरुवातीपाशी इमारतीत शिरलं की एका लांबलचक ड्राईव्हवे वरून आपण अगदी दुसऱ्या टोकाला पोचतो, पण तोच उतार उतरून पलीकडच्या बाजूने आत शिरलो तर वेगळंच पार्किंग लागतं.
एखाद्या इमारतीत हरवण्याची आमची पहिलीच वेळ! आधी आम्ही खालच्या पार्किंग मध्ये गेलो, पण तिथून वर जायचा रस्ताच सापडेना. मग परत उतार चढून दुसऱ्या बाजूने वर गेलो तेव्हा इमारतीच्या मध्यभागी ड्राईव्हवे वर असलेलं एक छोटं ऑफिस आणि एक रिसेप्शन रूम सापडली. तिथून आत गेल्यावर चार लिफ्ट्स दिसल्या. आम्हाला हव्या त्या मजल्यावर येऊन आम्ही फ्लॅट नंबर पाहून बेल वाजवली, पण दाराला कुलूप होतं. काही वेळ संभ्रमात पडल्यानंतर आमच्या लक्षात आलं की नंबर बरोबर होता, पण आम्ही इमारतीच्या ‘B’ भागात होतो आणि आत्याचं घर ‘C’ भागात होतं. थोडं पुढे आत गेल्यावर आम्हाला दोन बाजूंना पसरलेले दोन लांबलचक पॅसेज दिसले, त्यातल्या एकावरून चालत चालत आम्ही ‘C’ भागात पोचलो. तिथे त्या पॅसेजला आणखी बोळ फुटले होते. त्यातल्या डावीकडच्या बोळाच्या शेवटी दोन दरवाजे होते; त्यातल्या एकावर आम्हाला हवा तो नंबर सापडला. एव्हाना आमचं दिशाज्ञान पूर्णपणे गायब झालेलं होतं. घरी जायला निघाल्यावर परत तो सगळा मार्ग पादक्रांत करून आम्ही इमारतीबाहेर आलो, तेव्हा इतका वेळ आम्ही कुठे होतो ते बाहेरून पाहून अजिबात कळत नव्हतं.
हे लिहीत असताना बाहेर वळवाचा पाऊस सुरु झाला. मग घाईघाईने वाळत घातलेले कपडे काढण्यासाठी थोडा ब्रेक घ्यावा लागला. मग लाईट्स गेल्याने नाईलाजाने लिखाण थांबवावं लागलं. खिडकीतून बाहेर माजलेलं रणकंदन पाहत बसलो. पलीकडच्या सोसायटीतले रस्ते पूर्णपणे काँक्रिटचे असल्याने नेहमीप्रमाणे त्यांच्यावरून पाणी ओसंडून वाहत होतं. समोरची अशोकाची झाडं वाऱ्यामुळे झुलत होती; दरवर्षी इथलं एक अशोकाचे झाड तरी निसर्गापुढे मान तुकवतंच आणि मग मी गच्चीतून त्याला हात लावायचा प्रयत्न करतो. त्या वेड्यासारख्या गदगदणाऱ्या झाडांकडे पाहिल्यावर वाटतं, की आपण किती भाग्यवान! काँक्रिटच्या भक्कम ढालीआडून हे सर्व तांडवनृत्य पाहू शकतोय. तेवढ्यात वीज कडाडली आणि एकदम भानावर आलो. वाटलं, या इमारती आहेत म्हणूनच आपल्याला विजा कोसळण्याची भीती वाटेनाशी झाली आहे. मुसळधार पावसात आपण घरापासून लांब असलो की, आडोसा घ्यायला यापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. घरी पोचणं खूप अवघड आहे हे माहित असूनही, आपण कुठे झाडाखाली किंवा कारमध्ये आहोत यापेक्षा, आपण कुठल्यातरी इमारतीच्या खाली किंवा आत आहोत असे कळवले की घरच्यांचा जीव भांड्यात पडतो.
पण याचाच बरोबर उलटा परिणामही अनेकदा होतो. बाहेर मुसळधार पाऊस आणि त्यात वर लाईट्स गेले की आपण आपल्याच इमारतीत कैद होतो. याचा त्रास पुष्कळदा पाचव्या आणि त्याहून वरच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांना होतो. वीज गेल्यावर लिफ्ट बंद. तशी सगळ्या इमारतींना बॅकप सिस्टीम असते हे खरं, पण त्यांना निकामी व्हायला असा कितीसा वेळ लागतो? मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला पुण्यात जसा सलग तीन दिवस पाऊस पडत होता, तशा परिस्थितीत जिने उतरून जाणे एवढा एकच पर्याय उरतो. पण इमारतींची उंची वाढली की हा त्रासही वाढतो. आपल्या तुलनेत परदेशात ही स्थिती अजून वाईट आहे, कारण तिथे त्यांच्या शहरांच्या ‘डाउनटाऊन’ भागात राहणारे लोक बहुतेकवेळा खूप उंच इमारतींमध्ये राहतात आणि दुसरं म्हणजे त्यांच्या सगळ्या सिस्टिम्स विजेवर चालत असल्याने घरी अडकून पडणंही भयंकर असू शकतं. थोडक्यात जमिनीपासून लांब गेल्यावर आपले पर्याय कमी होत जातात; मग ते विमानात असो वा उंच इमारतीत!
पण हे सर्व असूनही उंच इमारतींचे फायदेही तितकेच म्हणता येतील. शिवाय त्या देखण्याही दिसतात. सध्या बांधकाम सुरु असलेल्या residential इमारतींपैकी पुष्कळ या २०हून अधिक मजले असलेल्या आहेत. पण जगातल्या उंच इमारतींचा विचार करायचा झाला तर २० म्हणजे काहीच नाही. तशा इमारतींविषयी पुढच्या लेखात थोडं असेल. मला जरी उंच इमारतींचं खूप आकर्षण असलं तरी माझी स्वतःची ‘मजल’ आजवर फक्त नवव्या मजल्यापर्यंतच गेलेली आहे. आणि तेही माझ्या एका मैत्रिणीच्या घरी. याबाबतीत आम्ही बाकी सगळे ‘Down to Earth’ मंडळी असल्याने, नवव्या मजल्यावर राहण्याचा अनुभव कसा असेल याबद्दल माझ्या मनात उगीचच कुतूहल निर्माण झालं होतं. प्रत्यक्षात आजी राहते तो तळमजला, आम्ही राहतो तो दुसरा मजला आणि हा नववा मजला यांच्यात तसा काही फरक नाही, असे लक्षात आले. असलाच तर एवढाच की आमच्या खिडकीतून समोरची उंच इमारत दिसते तर त्यांच्या खिडकीतून हिरवीगार तळजाई टेकडी, दूरवर पसरलेलं शहर आणि पुण्यात कुठूनही दिसणारे क्षितिजावरचे डोंगर हे सगळं दिसे. मी मात्र कल्पनाचित्र रंगवताना इतक्या उंचावर जास्त हलकं वाटेल का, आणि नेहमीच्या एका कुटुंबाऐवजी आठ कुटुंबांच्या डोक्यावर उभं राहिल्यावर कसं वाटेल असे फालतू विचार केले होते. पण असलं काहीही नसतं बुवा. घराच्या आत असल्यावर आपण उरलेल्या इमारतीच्या अस्तित्वाशी अलिप्त आणि एका छताखालच्या चार भिंतींच्या जगात सुखी असतो, आणि हीही यांच्या रचनेची एक किमया आहे.
असं असलं तरी आपण एक विचार आपल्या मनातून पूर्णपणे कधीच काढू शकत नाही. आपण हौसेने गच्चीत बाग वगैरे करतो; काही जास्त उत्साही लोक फरशीच मातीची करून तिला जमिनीचा किंवा कमीतकमी जुन्या सारवलेल्या वाड्याच्या फरशांचा ‘फील’ आणायचा प्रयत्न करतात, तर (आमच्यासारखे) काही छताला चांदण्यांचे फ्लुरोसंट स्टीकर्स चिकटवतात, पण शेवटी ते असतं सगळं कृत्रिम. या सगळ्या गोष्टी खऱ्या हिरवळीची, जमिनीची आणि रात्रीच्या आकाशाची जागा घेऊ शकत नाहीत हे आपल्याला माहित असते; पण आकाशात राहायला लागल्यापासून पृथ्वीशी नाते तुटू नये यासाठी तो आपला कमजोर प्रयत्न असतो. या असंख्य इमारती सतत आपल्याला आपण एका कृत्रिम जगात राहत असल्याची आठवण करून देतात. पण त्या नसतील, तर आपल्याला असुरक्षित आणि उघड्यावर पडल्यासारखं वाटतं, हेच खरं. या सगळ्यापासून आपल्याला दूर जावंसं वाटलं तर आपण निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जातो, आणि हॉटेलमध्ये राहतो. तो पर्याय नको असल्यास किंवा जातोय तिथे हॉटेल नसल्यास आपल्यापैकी काही लोक कॅराव्हॅन घेऊन जातात. पण आपल्याला पूर्णपणे निसर्गाच्या सान्निध्यात राहायचं असेल, तर आपण यापैकी काहीही न करता सरळ उघड्या माळरानावर किंवा डोंगरावर जातो, मस्तपैकी शेकोटी पेटवतो आणि क्षितिजावर दिसणाऱ्या दिव्यांच्या समूहाला ठेंगा दाखवत आपल्या तंबूत शिरतो.
शेवटी तंबू म्हणजे तरी काय?
खूप छान लेखन.मला उगीच वाचताना आपल्या घुले वाडीच्या अक्षरची आठवण आली.
ReplyDeleteअसो.
मावस