जीवाचं सिंगापूर: प्रस्थानपर्व २


विमानातल्या घोषणा आणि सूचना नेमक्या किती गंभीरपणे घ्यायच्या ते मला कधीच पूर्णपणे कळलं नाही. या प्रवासात माझ्या विशेष लक्षात राहिलेली एक घोषणा म्हणजे ‘DGCA*च्या आदेशानुसार प्रवाशांना त्यांच्या कुठल्याही सामानात ॲपल कंपनीच्या ‘मॅकबुक प्रो’ या लॅपटॉपचे अमुक अमुक मॉडेल नेता येणार नाही, याची प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी.’ ही! या एकट्या मॉडेलने त्याच्या कारकिर्दीत काय द्वाडपणा केला होता कल्पना नाही, पण अचानक विमानसंस्कृतीला त्याची बॅटरी पेटेल अशी भीती वाटायला लागली होती. बरं, हे काही तेव्हा कळलं नव्हतं. मला कुतूहल वाटल्यामुळे मी परत आल्यावर ती बातमी वाचली तेव्हा मला त्याच्यामागचं हे कारण समजलं. ते काहीही असो, ही काही माझ्या दृष्टीने विमानाच्या आत करण्याची घोषणाच नव्हती. विमानाची दारंबिरं लावून ते हलण्याच्या बेतात असताना कोणाकडे असेल मॅकबुक तर तो नोंद घेऊन काय करणार आहे? ही सूचना बोर्डिंगच्या आधी करायला नको का? सुदैवाने त्या फ्लाईटवर कोणाकडेच ते किडकं सफरचंद नव्हतं, नाहीतर आम्ही अजून पुणे विमानतळावरच सामानाची उचकापाचक संपायची वाट पाहत बसलेलो असतो.
पण तसं काही न घडल्यामुळे आम्ही गेला सव्वा तास उडण्यात घालवून सत्कारणी लावला होता, आणि आता दुसरी घोषणा सुरु झाली होती. ‘खराब हवामान असण्याच्या कारणास्तव सर्व प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी कृपया आपापल्या जागांवर बसून सीटबेल्ट लावून घ्यावा.’ जिथे त्यांचं न ऐकण्याची आपली काय बिशाद अशी परिस्थिती असते तिथे ‘विनंती’, ‘कृपया’ हे शब्द घालायचेच कशाला? तरी मला वाटतं या नम्रतेला हे कृत्रिमपणाचं आवरण फक्त त्या सूचनेच्या मराठी रूपांतरामुळे चढलेलं असेल; मूळ सूचना हिंदीत असल्यामुळे तेव्हा ऐकताना ते कानांची अशी थट्टा करून जात नाही. पण इंग्लिशबरोबर हिंदी सूचनांच्या या आग्रहाचा भलताच परिणाम पाहायला मिळाला तो सुरुवातीच्या ‘Safety Lecture’मध्ये. या ‘तासाला’ एअरहोस्टेस सीटबेल्टचा आणि कमी दाबाच्या पट्ट्यातून जाताना ऑक्सिजन मास्कचा वापर कसा करायचा, तसंच विमानातली आपत्कालीन exits कुठेकुठे आहेत हे सगळं करून दाखवतात. त्यामध्ये ‘केबिनमध्ये धुरामुळे अथवा वीज गेल्यामुळे अंधार पसरला असेल तर खाली बसवलेल्या fluorescent पट्ट्यांच्या आधारे विमानाबाहेर पडा,’ अशी एक सूचना असते. हेच लेक्चर हिंदीतून देताना जेव्हा त्यांनी ‘जमीं पर लगी प्रतिदीप्तिशील पट्टियों के आधार से मार्गक्रमण करें’ असं सांगितलं तेव्हा मला इंग्लिश येत असल्याचा कोण आनंद झाला! एखाद्या निवांत सकाळी या लोकांपैकी कोणालातरी गाठून त्यांना ‘हे सारं कशासाठी?’ असं विचारावं असं मला फार वाटलं. त्या खराब हवामानाच्या सूचनेच्या एकूण सुरावरून आम्हाला ‘Turbulence’चा खूप त्रास होणार होता असा मी तर्क केला होता. तसं होऊही शकतं म्हणा. पण बंगलोरला अखेरीस उतरल्यावर तिथे भुरभुर पाऊस होता हेच त्या सूचनेमागचं मूळ असल्याचं समजलं. तरी यावेळी आमच्या विमानाने इमारतीला जाऊन चिकटायच्या ऐवजी लांब कुठेतरी तळ ठोकलेला असल्यामुळे बस येईपर्यंत लोकांना मस्त फ्रेश होता आलं.
मला त्या विमानाला चिकटणाऱ्या पुलाचं जेवढं आकर्षण आहे तेवढंच विमानापासून बसने मुख्य इमारतीपर्यंत जाण्याचं आहे. ‘गो एअर’कडे त्या दिवशी स्वतःची बस नव्हती बहुधा. आम्ही तिथे उभे असताना इंडिगोच्या चार निळ्याशार बसेस आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून नाक उडवत पलीकडच्या विमानांकडे गेल्या. शेवटी आमच्यावर दया येऊन एक एअर इंडियाची बस आम्हाला न्यायला आली. तिच्या समोरच्या काचेवर लिहिलेलं ‘PAX’ वाचलं आणि प्रकल्पामुळे त्याचा अर्थ प्रवासी (passengers) असा होतो हे ठाऊक असल्याचा मला आपला थोडा अभिमान वाटला.
बंगलोरच्या केम्पेगोवडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची इमारत बाहेरून पाहायला खूपच छान वाटते, पण तिचा एकूण विस्तार पाहून थोडंसं घाबरायलाही होतं. त्यामुळेच मी आत शिरल्यावर इतर प्रवाशांच्या बरोबर न जाता तिथल्या एका कर्मचाऱ्याला गाठलं. वास्तविक चेक-इन केलेलं सामान कुठल्या पट्ट्यावर येणार आहे त्याची घोषणा विमानात झाली होती, पण पुढे दुसऱ्या फ्लाईटवर चढणारं सामान इतरांच्याच पट्ट्यावर येतं का नाही याची मला काहीच कल्पना नव्हती. अर्थात, पुण्याहून निघताना या सगळ्याची खात्री घेतलेली होती, पण तरी मला मदत करणाऱ्या प्रत्येकाला मी सिंगापूरला चाललोय हे माहित असावं असं मला वाटत होतं. 
“माफ करा, मी या फ्लाईटने पुण्याहून आलोय आणि मी इथून पुढे सिंगापूरला जाणार आहे. मला इथे चेक-इनचं सामान कुठून घेता येईल?” 
“तुम्हाला सहा नंबरच्या पट्ट्यावरून तुमचं सामान घेता येईल. मग त्या फ्लाईटसाठी तुम्ही ते पुन्हा चेक-इन करू शकता.” त्याने हसून उत्तर दिलं, आणि वाटही दाखवली. मी त्याला थँक्स म्हणून पुन्हा इतर प्रवाशांच्या लोंढ्यात शिरलो. 
एका भल्यामोठ्या लॉबीत आठ का दहा पट्टे होते. प्रत्येक सरकता पट्टा एका मोठ्या जागेत पूर्ण गोल फिरतो आणि त्याचा काही भाग इमारतीबाहेर असतो. त्या बाहेरच्या बाजूला विमानातून काढलेलं सामान घेऊन कर्मचारी ते पट्ट्यावर ठेवतात आणि ते सरकत सरकत आपल्यापर्यंत पोहोचतं. मला कायमच ही पद्धत खूप कार्यक्षम वाटत आली आहे. विशेषतः पहिल्या ‘फेरी’त ज्या प्रवाशांना उशिरा पोचल्यामुळे सामान घेता आलं नाही त्यांना तितक्याच सहजपणे ते पुढच्या फेरीत घेता येतं म्हणून. सहा नंबरच्या पट्ट्यापाशी मी आणि एक आजोबा एकाच वेळी पोचलो आणि शेजारीच उभे राहिलो. वेळेतच म्हणायचं, कारण त्यांच्या दोन अवजड बॅगा तेव्हाच भिंतीतून आत येत होत्या. “त्या जरा खाली काढून देता का,” असं त्या आजोबांनी मला विचारलं. तोपर्यंत त्यांच्याबरोबरच्या आजी एक रिकामी ट्रॉली घेऊन तिथे आल्या होत्या. त्यांच्या बॅगा जवळ आल्यावर मी त्या उचलून ट्रॉलीवर ठेवून दिल्या. त्या दोघांनी लगेच मला हसून थँक्स म्हणत ती ट्रॉली ढकलत न्यायला सुरुवात केली. मला वाटलं, माझ्याकडे माझी सूटकेस आलेली असती तर मी त्यांची ट्रॉली घेऊन त्यांना त्यांच्या इष्ट स्थळी पोचवलं असतं. पण ते थोड्या अंतरावर जाताच एक कर्मचारी आपणहून पुढे आला आणि त्यांच्यामागून ती ट्रॉली ढकलत घेऊन गेला.   
या वेळी नेमकी माझी सूटकेस यायला खूपच वेळ लागला. दोन पूर्ण फेऱ्या होऊन गेल्या तरी तिचा पत्ताच नाही हे पाहून मी कासावीस होत होतो. ‘तुझ्या पाठीवरच्या बॅगेत कपड्यांचा एक सेट असू देत’ अशी बॅग भरताना बाबांनी केलेली सूचना कानात घुमत होती. नको त्या वेळी नको ते आठवतं या न्यायानुसार नेमकी तेव्हाच डोक्यात काही दिवसांपूर्वी वाचलेली एक बातमी चमकून गेली. एका कुठल्याशा कर्मचाऱ्याने त्याच्या कंपनीवर उचकून दोनशे बॅगांच्या टॅग्जची अदलाबदल केली होती आणि गदारोळ झाला होता. त्यामुळे माझ्या सहप्रवाशांना त्यांचं सामान मिळत होतं हे पाहून मला आनंद व्हायला हवा होता, पण पट्ट्याजवळची गर्दी कमी होत असल्यामुळे तसं काही झालं नव्हतं. त्यातल्यात्यात दर फेरीला नवीन बॅग्ज येत होत्या हे पाहून थोडासा दिलासा मिळत होता. अखेर चौथ्या फेरीच्या वेळेला माझी सूटकेस मला लांबून येताना दिसली. ती चटकन ओळखू यावी म्हणून तिच्या मागच्या बाजूला ब्राऊन सेलोटेपचा एक मोठा ‘A’ करून चिकटवला होता, शिवाय हँडलला एक हिरवी रिबीन बांधली होती. ती माझ्यापर्यंत आल्यावर मी सराईतासारखी ती खाली ओढून घेतली आणि मागे वळूनही न पाहता थेट पलीकडच्या भिंतीपासच्या खुर्च्यांच्या रांगेतल्या एका खुर्चीत बसलो.
घरी कळवून टाकल्यानंतर इतर प्रवाशांच्या मागूनच त्या लॉबीतून बाहेर पडलो आणि विमानतळाच्या बाहेरच्या दालनात प्रवेश केला. किमान तीन मजल्यांएवढ्या उंचीच्या महाकाय काचेच्या घुमटात मी संगमरवरी फरशीवर उभा होतो. मी ज्या लॉबीतून आलो त्याच्याच वर असलेला दुसरा मजला मला आता मागे वळून पाहिल्यावर दिसत होता. या बाहेरच्या दालनात तो एका गच्चीसारखा दिसत होता. त्याच्या कठड्यांवर शेकडो झुडुपं आणि रोपटी कुंड्यांमधून लावलेली होती. त्यांच्याच मागे अनेक लोक उभे असलेले दिसत होते. चहूकडे नजर टाकल्यावर मला उजवीकडे एक उंच पारदर्शक काचेची भिंत दिसली, ज्यावर ‘Transfers’ असं लिहिलेलं होतं. त्या भिंतीच्या पलीकडे चेक-इनचे काऊंटर्स दिसत होते. मी तिकडे जायला निघालो. या भिंतीतल्या दारापाशी दोन पोलिसांनी माझं तिकीट आणि पासपोर्ट तपासून मला पलीकडच्या दालनात सोडलं. या दालनात त्याच गच्चीच्या खाली अनेक चेक-इन काउंटर्स ओळीने मांडून ठेवलेले होते. एका मोठ्या टीव्हीवर मला माझ्या फ्लाईटच्या काऊंटरचा आकडा दिसला. पाच का सहा असा काहीतरी होता. मग मी उजवीकडे पाहिलं. मी तेव्हा साठाव्या काऊंटरच्या समोर उभा होतो. एक उसासा टाकून मी ती सूटकेस ओढत लांबच्या प्रवासाला निघालो.
चेक-इनची प्रक्रिया यावेळेस अगदीच सहज पार पडली; फक्त माझ्याआधी एक मोठी फॅमिली तिथे काऊंटरपाशी कुठल्या बॅगा चेक-इन करायच्या आणि कुठल्या नाही यावरून वाद घालत बसल्यामुळे थोडा वेळ मला रांगेत उभं राहावं लागलं इतकंच. “तुम्ही आत्ताच पुण्याहून आलात का सर?” त्या काऊंटरवरच्या माणसाने मला विचारलं. मी हो म्हटल्यावर त्याने पासपोर्ट तपासला आणि माझ्या सूटकेसवरचा आधीचा टॅग फाडून तिथे ‘SIN’ असं लिहिलेला नवीन टॅग बसवला. मग त्याने विचारलं, “तुम्हाला एखादी विशिष्ट सीट हवीय का सर?”
हे मला पुण्याला विचारण्यात आलं नव्हतं! “हो, खिडकीची असेल तर द्या.” मी म्हणालो. त्याने दिलेला ‘16-A’ असा सीट नंबर घातलेला बोर्डिंग पास घेऊन मी जरा खुशीतच एमिग्रेशनकडे निघालो. 
एमिग्रेशनचा विभाग त्या वरच्या गच्चीवर होता. तिथे ओळीने काही काऊंटर्स आणि त्यांच्या शेजारी काचेची छोटीशी सरकती दारं असं सगळं मांडून ठेवलेलं होतं. एका काऊंटरवरच्या अधिकाऱ्याने मला खूण केल्यावर मी तिकीट आणि पासपोर्ट घेऊन त्याच्याकडे चालत गेलो. त्याने दोन्ही गोष्टी तपासल्या. इथे काही प्रश्नही विचारले जातात, तेव्हा शांतपणे सगळ्याची व्यवस्थित उत्तरं द्यायची असं बाबांनी घरी सांगितलेलं होतं. 
“हं, काय सिंगापूरला चालला आहात?”
“हो,” 
“कशासाठी?”
“फिरायला.” 
“किती दिवस?”
“पाच.”
“ग्रुप आहे का तुमचा?”
“नाही, मी एकटाच आहे.” हे उत्तर ऐकल्यावर तो माझ्याकडे पाहून ज्याप्रकारे हसला त्यावरून मला असं वाटलं की पुढचा प्रश्न ‘एकटं फिरायला तू जरा लहानच नाहीस का बाळ?’ असा काहीसा असावा. पण त्याचं समाधान झालेलं होतं. जर सिंगापूर सरकारला काहीच हरकत नसेल तर त्याने घेण्याचं काही कारण नव्हतंच, पण अशा वेळी असे आत्मविश्वास उंचावणारे विचार मेंदूच्या तळघरात झोपलेले असतात. माझ्या उत्तर देण्याच्या पद्धतीवरून मी हे पहिल्यांदाच करतोय हे त्याच्या नक्की लक्षात आलं असणार, कारण पासपोर्टवर शिक्के मारून ती काचेची दारं उघडल्यावर त्याने स्वतः मला सुरक्षा तपासणीच्या रांगेत आणून सोडलं. ‘अपना टाईम आएगा,’ असं मनात म्हणत मी माझी कागदपत्रं बॅगेत ठेवून ती एका ट्रेमधून पुढे पाठवून दिली आणि माझ्या तपासणीसाठी पुढे झालो. 
ज्या चार तासांच्या layover ची मला एवढी काळजी वाटत होती त्यातले दोन तास केव्हाच संपून गेले होते. शिवाय बोर्डिंग पासवर लिहिलेल्या वेळांनुसार विमान आठला सुटणार असलं तरी बोर्डिंगची प्रक्रिया तासभर आधीच सुरु होणार होती. आता या मधल्या एकाच तासात मला गेट शोधायचं होतं आणि जेवूनही घ्यायचं होतं. माझं गेट क्रमांक पस्तीस अगदी पाच मिनिटातच सापडलं. त्याच्या आसपास खुर्च्यांच्या काही रांगा होत्या. पण तिथेच जाऊन बसण्याऐवजी मी एका आरामखुर्च्यांच्या समूहाकडे गेलो. मोठ्या कुंड्यांमधल्या झुडुपांच्या दोन ओळींच्या मध्ये काही गोलाकार टेबलांच्या भोवती या आरामखुर्च्या मांडून ठेवल्या होत्या. मला लगेच भूक लागलेली नसल्यामुळे मी आधी कडेच्या आरामखुर्चीत बसून एकदोन फोटो काढले आणि मग ‘द कन्फेशन’मध्ये डोकं घातलं. दुसरं प्रकरण संपेपर्यंत पंधरावीस मिनिटं होऊन गेली होती. माझ्या आजूबाजूला सगळे परदेशी लोकच बसलेले होते. त्यातल्या एकांच्या हातात मला दुसरं जॉन ग्रिशम दिसलं. क्षणभर मला त्यांच्याकडे जाऊन ‘हा काय लिहितो नाही?’ असं एक वाक्य टाकावं असं उगीच वाटलं. पण त्यांचं नेमकं हे पहिलंच जॉन ग्रिशम निघालं असतं तर पंचाईत झाली असती. शिवाय ओपनिंगला हे म्हणायचं? तसं मी त्यांना काहीतरी विचारण्याच्या बहाण्याने सुरुवात करून मग संभाषण योगायोगाचा विषयावर नेऊ शकलो असतो, पण एवढा उत्साह कोणाकडे आहे? माझ्यासारख्या ‘thought experiments’मध्ये रमणाऱ्या जीवात तर अजिबात नाही. 
मी आपलं सरळ एक टेबल पकडलं, डबा काढला आणि शेजारी तिसरं प्रकरण उघडून जेवायला सुरुवात केली. आईने दिलेल्या पालकाच्या चार परोठ्यांपैकी दोन संपवेपर्यंत सात वाजत आले होते. उरलेलं विमानात खाऊ असं म्हणून मी आवरून घेतलं आणि पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ निघालो. ते उरकून माझ्या गेटपाशी परत आल्यावर तिथे एका उंच टेबलावर तीन चार्जिंग पॉईंट्स सापडले. त्यातल्या एकाला माझा फोन जोडून टाकला आणि पुन्हा माझं पुस्तक उघडून बोर्डिंग सुरु व्हायची वाट बघत बसलो. थोड्याच वेळात ते झालंही. 
वीस मिनिटांनंतर मी माझ्या खिडकीच्या सीटवर बसून माझ्या शेजारच्या दोन जागा भरण्याची वाट पाहत होतो. विमान सुटेपर्यंत त्या काही भरल्या गेल्या नाहीत. शेवटी दारं बंद होऊन घोषणा सुरु झाल्या आणि विमान चुळबुळ करायला लागलं तेव्हा कुणाचेतरी प्लॅन्स बारगळल्याचं स्पष्ट झालं. मी आनंदाने सीट्सचे हात वर सरकवून टाकले आणि हवेत पोचल्यावर मस्तपैकी पसरता येईल असा विचार करायला लागलो. त्या विमानकंपन्यांवरच्या प्रकल्पाचा काही भाग अचानक मनात चमकून गेला. Available Seat Kilometers (म्हणजे एका विमानकंपनीचा पुरवठा मोजण्यासाठी एक किलोमीटर जाणारी एक सीट अशा एककानुसार केलेली मोजणी) आणि Passenger Kilometers Served (म्हणजे त्यापैकी प्रत्यक्षात प्रवाशांनी वापरलेल्या सीट्सचा आकडा) यांच्यातली नित्याची तफावत महिन्याभरापूर्वी एक्सेलमध्ये पाहिली होती, ती आज प्रत्यक्षात पाहण्याचा योग आला, असा विचार करून मी हसलो. तोपर्यंत विमान धावपट्टीवर येऊन धावण्याच्या तयारीत उभं राहिलं होतं. पुढचे साठ सेकंद पुन्हा मंत्रमुग्ध करून गेले.            
ढगांच्या पडद्याआड बंगलोर गायब झालं तसं माझ्या मनात आलं, की आता झालं. आता आपण आकाशात आहोत आणि जेव्हा उतरू तेव्हा आपल्या हक्काच्या जमिनीवर नाही. नकळत मी गळ्यातल्या शर्टाच्या आत घातलेल्या पाउचला बाहेरूनच चाचपून पासपोर्टच्या कडांवरून हात फिरवून घेतला - the first of many!                          

Let us arrive in Singapore on SG4

Comments

  1. आता सिंगापूरप्रवासाचे तुझे अनुभव त्यावेळी केलेले विचार,आलेले अनुभव हे सगळे फार व्यवस्थित, मुद्देसूद आहेत‌ भाषेचे व मांडणीचे सामर्थ्य फार आनंददायी आहे.

    ReplyDelete
  2. मस्त.आपण गप्पा मारत सोबत सिंगापूरला जातोय असं वाटतं. शब्दांची निवड 1 no.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प