जीवाचं सिंगापूर: ॲटलासपर्व


थंडगार हवेच्या झुळुकेने माझं स्वागत केलं. 
स्कायवॉकमधून ज्युएलच्या प्रसन्न वातावरणात मी प्रवेश केला होता. क्षणभर मी भलत्याच ठिकाणी तर आलो नाही ना अशी शंका माझ्या मनाला चाटून गेली, कारण मी एका चमकदार गुळगुळीत फरशीवर उभा राहून छतावरच्या दिव्यांच्या उजेडात न्हायलेले दुकानांचे विंडो डिस्प्लेज पाहत होतो. चांगी विमानतळाच्या साईटवर ज्युएलचे फोटो पाहून मी एका बागेची कल्पना केली होती, तसं इथे काही दिसत नव्हतं. हा तर चक्क एक मोठ्ठा गोलाकार मॉल होता. मी काहीसा निराश होऊनच त्या दुकानांच्या आणि हॉटेलांच्या मधून फिरायला लागलो. उजवीकडच्या एका हॉटेलच्या आवारातल्या काही अगदी पलीकडच्या टोकाच्या खुर्च्यांच्या मागचं नेपथ्य जरा वेगळंच दिसलं म्हणून दोन क्षण त्याच्याकडे पाहत राहिलो. मग अचानक ते काय होतं ते कळताच माझे डोळे विस्फारले गेले आणि उत्साहामुळे मला काहीच सुचेना. तशाच अवस्थेत मी त्या बाजूच्या दुकानांसमोरून जवळपास पळतच निघालो आणि अचानक उजवीकडे दोन दुकानांच्या मध्ये खूपशी मोकळी जागा लागली तसा थबकलो. 
ज्युएल हा एक मॉल आहेच, पण त्याच्या अजस्त्र वर्तुळाचा फक्त कडेचा भाग त्या मॉलने व्यापला आहे. त्याच्या मधल्या भागाच्या प्रवेशापाशी मी उभा होतो आणि पलीकडे माझ्या कल्पनेपलीकडेही सुंदर आणि शांत अशी बाग होती. खरं म्हणजे ‘बाग’ या शब्दाने त्याची कल्पना येऊच शकत नाही. मी उभ्या असलेल्या दुसऱ्या मजल्यावरच्या गच्चीच्या दोन्ही बाजूंना लांब पसरलेल्या दगडी वाटाव्यात अशा भिंती होत्या आणि असंख्य झुडुपांनी आणि वेलींनी नटलेल्या होत्या. त्याच भिंतींना लागून असलेल्या अनेक खाचांमधून पाण्याचे झरे वाहत होते. त्या महाकाय काचेरी घुमटाच्या आतल्या या चौमजली आवारात अनेक उंच झाडं सर्वत्र बहरलेली होती आणि त्यांच्या बुंध्यांशी छोटेछोटे बाक ठेवलेले होते. या सगळ्याच्या मध्यभागी एक प्रचंड गोलाकार कारंजं होतं, फक्त त्यातून वर उडण्याच्या ऐवजी चहूबाजूंनी पाणी गोळा होऊन त्याच्या आत पडत होतं. पलीकडे दोन खांबांवर उभा असलेला एक पूल या बागेला आडवं छेदून जात होता आणि एका बाजूच्या दाट झाडीतून दुसरीकडच्या तितक्याच दाट झाडीत लुप्त होत होता. काही वेळाने त्याच्यावरून ती टर्मिनस १ आणि टर्मिनस ३ ला जोडणारी ट्रेन जाताना दिसली तेव्हा त्याचा उद्देश समजला. त्या ट्रेनमधून या अफलातून बागेचं अगदीच अनोखं दर्शन झालं असतं हे खरंच, पण मला तेव्हा सुखावणारा गारवा जाणवला असता का नाही कोण जाणे. मघाच्या ए.सी.तून आता नैसर्गिक गारव्यात आल्यावर त्यांच्यातला बदल ठळकपणे कळत होता. खाली त्या बाकांवर माणसं आरामात बसली होती, काही वाचत होती, काही गप्पा मारत होती तर काही नुसतीच डोळे मिटून शांत बसली होती, पण सगळेच निवांत दिसत होते. जिथे कधीकधी अनेक तास बसून राहण्याशिवाय गत्यंतर नसतं अशा विमानतळासारख्या ठिकाणी ही अत्यंत हवीहवीशी जागा उभी करणं म्हणजे खरोखरीच चातुर्याची कल्पना होती. तेव्हा मला चांगी विमानतळाला जगातला सर्वोत्तम विमानतळ असा किताब मिळाला होता ते आठवलं, आणि तो का तेही लगेच कळून चुकलं. ज्युएलमध्ये प्रवेश करणाऱ्या माणसाने त्याची फ्लाईट अजून तासभर उशिरा सुटावी अशी इच्छा केली तर नवल नाही. फार काय, चार दिवसानंतर मीही काहीशी तशीच इच्छा करणार होतो.




त्या वातावरणातून बाहेर पडून पुन्हा विमानतळाच्या वातावरणात शिरणं तसं अवघडच, पण ज्युएल कितीही मोहक असला तरी माझ्या शेजारी अजूनही एक भरलेली सूटकेस होती, माझ्या अंगावर अजूनही आदल्या दिवशीचे कपडे होते आणि सकाळी साडेसहाला केलेल्या ब्रेकफास्टच्या तारणावर उसनी घेतलेली शक्ती आता संपत चालली होती. विमानतळातून काढता पाय घेण्याची वेळ आली होती. तरीही सकाळपासून पिडणाऱ्या सगळ्या चिंतांना ज्युएलने त्या अर्ध्यापाऊण तासात पळवून लावलं होतं, त्यामुळे थकलेलो असूनही मी अगदी प्रसन्न मनाने पुन्हा आकाशातून टर्मिनस २ पर्यंतचा प्रवास पूर्ण केला. मुख्य लॉबीत शिरल्यावर शेजारच्या मेट्रोकडे नेणाऱ्या सरकत्या जिन्याकडे गेलो आणि खाली जाताजाता मागे वळून चांगी विमानतळाला निरोप दिला. तशा अवस्थेतही नाटकीपणा करण्याचा मोह मला आवरला नाही, म्हणून मी स्वतःशीच ‘I love you, Changi, but it’s time to say goodbye,’ असं एक वाक्य टाकलं. वाक्य नाटकी असलं तरी त्यातली भावना खरी होती.
पण चांगी विमानतळाला हा क्षण सोडवत नव्हता बहुधा. मी मेट्रोतून शहराकडे जायला निघण्याआधी मला तीन दिवसांचा पास काढायचा होता. जाण्यापूर्वी त्याची माहिती वाचून बाबांनी मला पंचवीस डॉलर्सचा साधा पास घ्यायला सांगितला होता. तीन दिवसांच्या टुरिस्ट पासेसचे दोन प्रकार होते; एक साधा पंचवीस डॉलर्सचा आणि दुसरा तीस डॉलर्सचा जो तीन दिवसांनंतर परत केल्यावर दहा डॉलर्सचं डिपॉझिट परत मिळणार होतं. दुसरा जास्त स्वस्त असला तरी तो परत करायच्या भानगडीत पडण्यापेक्षा सिंगापूरच्या तिजोरीत पाच डॉलर जास्त टाकावेत असा निर्णय आम्ही घेतला होता. पण स्टेशनवर मी तो मागितल्यावर तिथल्या बाईने तो वरच्या मजल्यावर मिळत असल्याचं सांगितलं, त्यामुळे पुन्हा वर गेलो. वरच्या दुकानात मला तो पास अडतीस डॉलर्सला मिळतो असं कळलं. दोन प्रश्न जास्त विचारले असते तर दोन जिने वाचले असते याचा फार विचार न करता मी परत खाली स्टेशनवर आलो आणि तीस डॉलर्सचा डिपॉझिटवाला पास विकत घेतला. पण विमानतळाला तरी मला सोडायचं नव्हतं. निघण्याच्या आधी मी दुसऱ्या फोनवरचा डेटा चालू करावा म्हणून फोन उघडला तर डेटा चालेचना. मग पुन्हा वर लॉबीत जाऊन, ते टेलिकॉमचं दुकान शोधून, तिथल्या कर्मचाऱ्यांकडून तो पुन्हा चालू करून घेतला. पण फोन बंद केल्यावर तो पुन्हा गेला तर काय, या प्रश्नाला उत्तर नव्हतंच. शेवटी बाबांनी तिकडून तो फोन आणि त्याचा डेटा कधीच बंद न करण्याचं सुचवलं. हा फोन मी जवळपास कशासाठीच वापरणार नसल्यामुळे ही योजना चांगली चालली असती. शेवटी मी त्या डेटावर एकदाचं माझं लोकेशन सुरु केलं आणि अखेर मेट्रोत बसलो. 
त्या जमिनीखालच्या बिळातून मेट्रो (त्यांच्या भाषेत MRT) बाहेर पडून रस्त्याच्या वरून जायला लागली तेव्हा माझा थकवा गेल्यासारखा वाटला. काही आठवणीतलं तर काही पूर्ण नवीन असं माझ्या डोळ्यांसमोर आणत सिंगापूर माझ्या आजूबाजूला आकार घेत होतं. सगळ्या मोठ्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना आणि मध्यभागीही झाडांच्या आणि झुडुपांच्या रांगा होत्या. आजूबाजूच्या सगळ्या इमारती तुलनेने लहानच आणि residential होत्या. काही वेळाने ट्रेन चांगी विमानतळानंतरच्या ‘एक्स्पो’ नावाच्या अधांतरी स्टेशनवर थांबली आणि दहा वर्षानंतर मी ते आठवणीत कोरलं गेलेलं ‘Please mind the platform gap,’ हे वाक्य मी पुन्हा ऐकलं. खिडकीतूनच एक्स्पोच्या आजूबाजूचा परिसर पटकन अधाशासारखा पाहून घेईपर्यंत गाडी हलायला लागली होती. लगेच पुढची घोषणा झाली आणि ‘ताना मेरा’ हे आणखी एक परिचयाचं नाव पुन्हा ऐकून छान वाटलं, पण त्याच्यापुढे ‘ही लाईन इथे संपते; पूर्व-पश्चिम लाईनवर जायला इथे गाडी बदला’ हे ऐकून मी जरा चक्रावलो. मग मला आठवलं की त्या पाससोबत मिळालेल्या पुस्तिकेत एक नकाशा होता, तो मी काढून उघडला. दहा वर्षांपूर्वी आम्हाला मिळालेला असाच नकाशा मी परत आल्यावर खूप जपून ठेवला होता ते सगळं मला आठवलं. मी तेव्हा एकेका लाईनवरच्या सगळ्या स्टेशन्सची नावंही पाठ करून ठेवली होती. आता मात्र पुष्कळ बदल झालेले दिसत होते. तेव्हा तीनच असलेल्या लाईन्स आता पाच झाल्या होत्या. मी नकाशा पाहिल्यावर मला असं दिसलं की पूर्व-पश्चिम लाईनला ताना मेरापासून एक वेगळा फाटा फुटून चांगी विमानतळाकडे जात होता, त्यामुळे मुख्य लाईनवर यायला मला ट्रेन बदलावी लागणार होती. मी हे बघेपर्यंत मेट्रो सरळ पुन्हा जमिनीत घुसली आणि खिडकीबाहेर अंधार पसरला. मग मी पुन्हा नकाशात डोकं घालून बसलो. 
माझ्या हॉटेलचा पत्ता मी पाठ करून ठेवला होता, आणि तो शहराच्या ‘लव्हेंडर’ नावाच्या भागात होता हे मला पक्कं आठवत होतं. त्या नावाचं एक स्टेशन नकाशावर सापडलं तेव्हा तिथे उतरायचा मी निर्णय घेतला. वास्तविक दुसरं एक ‘फेरर पार्क’ नावाचं स्टेशनही त्याच्या जवळ असल्याचं मला पूर्वी गूगल मॅप्सवर पाहिल्याचं आठवत होतं, पण तिथे जायला मला पुन्हा दोन लाईन्स बदलायच्या खटपटी कराव्या लागल्या असत्या. त्यापेक्षा मी लव्हेंडरला उतरून चालत जायचं ठरवलं. मग उरलेला वेळ मी नकाशावर काही ओळखीची नावं शोधण्यात घालवला. ही लाईन पूर्वी ‘जू कून’ नावाच्या स्टेशनपाशी संपायची, आणि ते ऐकायला खास वाटल्यामुळे तेव्हा माझ्या लक्षात राहिलं होतं. आता मात्र त्याच्यापुढे चार नवी स्टेशन्स झाल्याचं दिसलं. ईशान्य-नैऋत्य लाईनवरचं ‘लिट्ल इंडिया’ स्टेशन पाहून पुन्हा काही आठवणी जाग्या झाल्या, पण सगळ्यात जास्त आनंद झाला तो ‘धोबीघाट’ स्टेशन सापडल्यावर! सिंगापूरच्या मेट्रो नेटवर्कमध्ये मध्यभागी असणाऱ्या काही स्टेशन्सपैकी हे एक, आता वर्तुळाकार लाईन पूर्ण झालेली असल्यामुळे तीन लाईन्सचा संगमबिंदू असलेलं धोबीघाट स्टेशन सिंगापूरमधलं सर्वांत मोठं स्टेशन झालं होतं. हे नाव वाचून आपल्याला जेवढी गंमत वाटते त्याच्या शतपटींनी जास्त गंमत ते या नावाचा अगदी तस्साच उच्चार करतात तेव्हा वाटते. धोबीघाटला जाऊन यायचा मी निश्चय केला, आणि मग स्वतःशीच हसलो; तसं करण्यापलीकडे माझ्याकडे पर्याय तरी होता का?
एव्हाना लव्हेंडरची घोषणा झाली आणि मी उतरायच्या तयारीत उभं राहिलो, तेव्हा एकदोघांनी माझ्याकडे जरा विचित्र नजरेने पाहिलं. बसची सवय! इथे ट्रेन थांबल्यावर उतरायला-चढायला पुष्कळ वेळ देऊन, दारं बंद करायच्या आधी इशारा देते. शिवाय सिंगापूरचे लोकही आधी आतल्या प्रवाशांना उतरू देतात त्यामुळे आपल्याकडे घडतो तसा दोन्ही बाजूंनी ‘equal and opposite force’चा प्रकार तिथे घडत नाही. लव्हेंडरला उतरून मी स्टेशनबाहेर पडलो आणि एका अनोळखी हमरस्त्यावर येऊन फोन उघडला, तेव्हा मला एकदम सिंगटेलच्या डेटावर गूगल मॅप्स उघडत नसल्याचा साक्षात्कार झाला. 
आधी मी एका बाईंना हॉटेलचा रस्ता विचारला, पण त्यांना ते माहित नव्हतं. गेल्या अर्ध्या तासापासून मी आपला ‘लव्हेंडर लव्हेंडर’ करत बसलो होतो त्यामुळे मी हॉटेल ज्या रस्त्यावर आहे त्याचं नाव विसरून गेलो होतो. डेटा चालू होताच, म्हणून मी सरळ घरी मेसेज करून बाबांना गूगल मॅप्सवर लव्हेंडर स्टेशन ते हॉटेल असा मार्ग आखायला सांगून त्याचे स्क्रीनशॉट्स मला पाठवायला सांगितले. ही युक्ती बरोबर लागू पडली आणि मी ते फोटो बघत चालायला लागलो. साधारण पंधरावीस मिनिटं चालून एकदोनदा वाट चुकवल्यानंतर ‘सेरांगून रोड’ अशी पाटी सापडली आणि त्याच्या आधारे मी माझ्या हॉटेलचा ‘रेसकोर्स रोड’ शोधून काढला. हा सगळा भागच मला तसा नवीन होता. बाबांनी फोटोसोबत दिलेल्या माहितीनुसार मला सेरांगून रोड आणि त्याच्यावरचा एक ‘सिटी स्क्वेअर मॉल’ अशा ठळक खुणा लक्षात ठेवायच्या होत्या. त्याच मॉलच्या तळघरात मला ‘फेरर पार्क’ स्टेशन आहे हेही कळलं आणि मी जन्मात पुन्हा लव्हेंडरला उतरायचं नाही असं ठरवून हॉटेल शोधायला निघालो. 
रेसकोर्स रोडच्या अगदी दुसऱ्या टोकाशी काही लहान दुमजली घरांसारख्या इमारती होत्या. रुंदीने काहीच नाही, पण मागे अगदी लांबपर्यंत पसरलेल्या अशा त्या सगळ्या होत्या. मी आधी डावीकडच्या सगळ्या पाहिल्या, मग रस्त्याच्या पलीकडे नजर टाकली. तिथे दोन घरांच्या मध्ये ‘द ॲटलास स्टेशन’ची गर्द हिरव्या रंगाची इमारत दिसली आणि मी हायसं वाटून तिकडे माझी आत्तापर्यंत निषेध करायला सुरुवात केलेली पावलं वळवली. इमारतीच्या बाहेर एक लहानसा, हिरवा गालिचा घातलेला व्हरांडा होता आणि बसायला एक खिडकीचा कोनाडा होता. दारावरची ‘Open’ अशी पाटी वाचून मी आत शिरलो. 
एका छोट्याशा हॉल-कम-किचनमध्ये मी आलो होतो. दाराच्या डावीकडचा सगळा भाग एका मोठ्या काउंटरने व्यापला होता. त्याच्यामागे एक गॅस स्टोव्ह आणि ओटा होता आणि वर मोठ्या फळ्यावर काही पदार्थांची नावं लिहिलेली दिसत होती. तसंच काही फळं आणि पाण्याच्या बाटल्या मांडून ठेवलेल्या होत्या. उजवीकडे दोन आडवी टेबलं आणि त्यांच्या एका बाजूला खुर्च्या मांडून ठेवल्या होत्या, तर दुसऱ्या बाजूला एक कोच होता. या सगळ्याच्या पलीकडे एका कोपऱ्यात पलीकडच्या खोलीत उघडणारं दार होतं आणि त्याच्या शेजारी एका मोठ्या फडताळात खूपसे कप, मग आणि चहा-कॉफी बनवायचं सामान ठेवलेलं होतं. मी काउंटरच्या मागे बसलेल्या आजोबांकडे गेलो. पासपोर्ट वगैरे तपासून झाल्यावर मी म्हटलं,
“मी लवकर चेक-इन करता यावं याची विनंती केली होती. ते शक्य आहे का?”
ते शक्य नसतं तर माझी आधीची योजना बॅग वगैरे लॉकरमध्ये ठेवून बाहेर भटकायला जाण्याची होती, पण त्यासाठीचं त्राण माझ्यात उरलं नव्हतं. ते नाही म्हणाले असते तर मी तिथेच वाचत बसून राहिलो असतो. पण सुदैवाने त्यांच्याकडे एक पॉड मोकळा होता. 
“२१३ नंबरचा, वरचा पॉड आहे. चालेल का तुम्हाला?”
“हो, अगदी” मी खूश होऊन म्हणालो. मग त्यांनी एक फॉर्म दिला, ज्याच्यावर हॉटेलचे ‘टर्म्स अँड कंडिशन्स’ लिहिलेले होते आणि खाली माझी सही हवी होती. मला खरंतर तो पॉड शोधून त्यात अंग टाकायची घाई झाली होती, पण हा भाग व्यवस्थित पूर्ण करायला हवा असं स्वतःला सांगून मी तो कागद नीट वाचला. त्यात काही सूचना होत्या; म्हणजे पॉडमध्ये चुरा पडेल असं काहीही खाऊ नका वगैरे. तसंच जाण्यायेण्याच्या वेळांबद्दल काही नियम होते. पॉडची किल्ली कायम स्वतःकडे जपून ठेवायची, आणि ती हरवली तर हॉटेल तुमची काहीच मदत करू शकत नाही असं सगळं. मी चांगली पाच मिनिटं घेऊन तो कागद दोनतीनदा वाचून काढला आणि मग खाली सही करून टाकली. ते आजोबा काहीसे कंटाळलेले होते आणि त्यांची बहुधा वामकुक्षीची वेळही झाली असेल, पण त्यांनी मला सगळं अगदी व्यवस्थित समजावून सांगितलं. ते काचेचं दार उघडायला शेजारी माझं ‘२१३’ नंबरचं कार्ड टॅप करावं लागतं असं म्हणाले आणि मागे सरकून माझ्याकडे अपेक्षेने पाहत उभे राहिले. मी ते टॅप करून दार उघडलं तेव्हा हलकंसं हसून ते माझ्याबरोबर आत आले. 
दाराच्या मागे एक उंच पांढरं कपाट होतं. माझे बूट इथे काढून ठेवायला त्यांनी सांगितलं. तिथल्याच बाकावर बसून मी ते कित्येक तासानंतर पायातून काढले आणि कपाटात ठेवून दिले. माझ्या समोर आता अगदी पूर्वी फोटोत बघितली होती तशीच पॉड्स दिसत होती. अगदी अंतराळयानाचा आभास निर्माण करणारी, पांढरीशुभ्र आणि निळ्या निऑनच्या प्रकाशात आकडे लिहिलेली. एक पॉड दुसऱ्याच्या वर बसवलेलं असलं तरी आतून ते संपूर्णपणे वेगळं असं होतं; बंकबेडसारखा प्रकार नव्हता. 
“-ही खालच्या मजल्यावर स्त्रियांची बाथरूम आहे, आणि वर पुरुषांची आहे. आता हा जिना. तुमचा पॉड वरच्या मजल्यावर आहे.” आजोबा सांगत होते. त्या अरुंद पण पावलांना गुदगुल्या करणारा काळाशार गालिचा घातलेल्या जिन्यावरून मी त्यांच्या मागून चढायला लागलो. शेजारच्या भिंतीवर सगळी ‘स्टार वॉर्स’ची पोस्टर्स लावून ठेवलेली होती. वरच्या मजल्यावरच्या पहिल्याच पॉडवर एका बाजूला स्टार वॉर्समधल्या एका हातांनी हृदयाचा आकार केलेल्या पात्राचा मोठा स्टिकर लावलेला दिसला आणि माझ्या अंगावर काटा उभा राहिल्यासारखं झालं. आधीच अवकाशयानात राहत असल्याचा ‘फील’, त्यात हे सगळं पाहून मी आमच्या हॉटेलच्या निवडीवर जाम खूश झालो होतो. आजोबांनी मला पॉड्सच्या रांगेतला माझा २१३ नंबरचा पॉड शोधून दिला आणि त्याला इतर काही पॉड्ससारखं सरकतं दार नसल्याचं सांगितलं. माझ्या समोरच्या एका पॉडला तसं दार होतं, आणि त्याच्यावरचे ते प्रखर निळे आकडे पाहून मला क्षणभर मोह झाला, पण तरी ते दार लावून घेऊन त्या पॉडमध्ये बंद राहणं मला फारसं आवडलं नसतं. माझ्या पॉडला त्याऐवजी एक वर सरकावायचा गडद निळ्या रंगाचा पडदा होता, जो खाली करून त्याचं हूक पॉडच्या तोंडपासच्या खाचेत अडकवल्यावर मीही सहज पॉड बंद करू शकलो असतो. मग आजोबांनी मला दोन्ही पॉडच्या खाली असलेले दोन लॉकर्स दाखवले आणि माझा लॉकर फक्त मीच माझं कार्ड टॅप करून कसं उघडू शकतो ते समजावून सांगितलं. मी तो उघडून पाहिला आणि त्यात सूटकेस सहज मावेल असं मला दिसलं. मग आजोबांनी मला वायफाय पासवर्ड दिला आणि हसून पुन्हा जिन्यावरून उतरायला लागले. उतरताना मध्येच थांबून त्यांनी मला जवळ बोलावलं आणि ते म्हणाले, 
“तुम्हाला जर रात्री साडेअकरानंतर परत यायचं असेल तर बाहेरच्या दाराला कुलूप असतं, तर तुम्ही हा कोड लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला ते कुलूप उघडून येता येईल,”
सिंगापूरला मी एकट्याने जाण्याचं धाडस करत असलो तरी ते एवढं ताणण्याची माझी काही इच्छा नव्हती, पण मी त्यांना थँक्स म्हटलं आणि तो कोड लक्षात ठेवून पॉडकडे परत आलो. सगळ्यात आधी मला कपडे बदलायचे होते. मी फोनमध्ये वेळ बघितली. सव्वाबारा. घरातून निघाल्यापासून हॉटेलवर पोचेपर्यंतचा वेळ धरला तर मी तब्ब्ल चोवीस तास प्रवासात काढले होते! मला स्वतःच्याच स्टॅमिनाचं कौतुक वाटलं, पण एवढ्या वेळात एकदाही कुरकुर न केल्याचं बक्षीस माझ्या शरीराला आणि विशेषतः पायांना देण्याची वेळ आली होती. मी माझी सॅक पॉडमध्ये ठेवून दिली आणि सूटकेस बाथरूमच्या दारापाशी असलेल्या एका लहानशा शेल्फपाशी ठेवली. कुलूप उघडून माझे घरातले कपडे काढले आणि बाथरूममध्ये गेलो. तिथे दोन्ही बाजूंना तीनतीन बंद स्टॉल्स होते, त्यापैकी डावीकडच्या स्टॉल्समध्ये टॉयलेट्स आणि उजवीकडच्या स्टॉल्समध्ये शॉवर्स होते. मी उजवीकडच्या एका स्टॉलमध्ये शिरून कपडे बदलले आणि परत पॉडपाशी आल्यावर सूटकेस उचलून पॉडमध्ये ठेवून दिली. 
मी आलो तेव्हा काही लोकांना पॉडसमोर किंवा बाथरुमसमोर खाली बसून बॅगा उघडताना पाहिलं होतं, पण मी माझी सूटकेस शक्यतो नेहमीच पॉडच्या आत उघडायचा निश्चय केला. पॉडमध्ये त्या गादीवर बसून मी आधी एका भिंतीवर बसवलेल्या स्विचबोर्डकडे पाहून सगळी स्विचेस पाहून घेतली. एका खाचेत माझं कार्ड घातल्यावर पॉडमध्ये वीज लागत होती. ती घालून मी पॉडमधले सगळे दिवे चालवून बघितले, छतावर बसवलेला टीव्ही आणि भिंतीत बसवलेलं लहानसं टेबल पाहून घेतलं. सगळं व्यवस्थित होतं. मग मी माझा फोन चार्जिंगला लावला आणि सूटकेस उघडली. सर्वप्रथम माझे तिन्ही ठिकाणी ठेवलेले पैसे सहीसलामत असल्याची खात्री करून घेतली. माझे प्रवासाचे कपडे सूटकेसमध्ये नीट ठेवून तिला कुलूप लावून टाकलं. किल्ली माझ्याबरोबर पॉडमध्ये सॅकच्या आत असणार होती. कुलूप लावलेली सूटकेस खालच्या लॉकरमध्ये ठेवून दिली आणि तो बंद केला, आणि तेव्हाच मी कार्ड टॅप केल्याशिवाय तो अजिबात उघडत नाही याची खात्री करून घेतली. मग मी पुन्हा वर आलो आणि पासपोर्टचं पाऊच अखेर काढून सॅकच्या आत ठेवून दिलं. सॅक माझ्या उशाशी सुरक्षित होती. 
मी हॉटेलच्या वायफायवरून घरी व्हिडिओ कॉल करून पोचल्याचं कळवलं तेव्हा आईबाबांनी मला एक छान झोप काढायचं सुचवलं. त्या गुबगुबीत गादीवर अंग टाकून तितकंच पांढरंशुभ्र असं मऊ जाड पांघरूण मी ओढून घेईपर्यंतच त्यांची सूचना अंमलात आणली गेली होती. 
  

Let's explore Singapore on SG7

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प