जीवाचं सिंगापूर: आविष्कारपर्व १


साडेचारचा गजर मी पावणेपाचला बंद करून उठलो तेव्हा पाच वाजले होते.   
ब्रेकफास्ट मला हॉटेलमध्येच मिळणार असला तरी त्याला अजून दोन तास अवकाश होता. मी बाथरूममध्ये जाऊन दात घासले आणि नेहमीप्रमाणे ही क्रिया पार पडल्यानंतर मनात पहिला विचार आला तो चहाचा! चहाकॉफीची अशी ठरलेली वेळ नसते हे लक्षात आणून द्यायला माझा आत्तापर्यंतचा हॉटेलांचा अनुभव पुरेसा होता. मी खाली उतरून बाहेरच्या लॉबी-कम-किचनमध्ये आलो. सगळीकडे सामसूम होती, आणि बाहेर अजूनही अंधारच होता. मी त्या मोठ्या फडताळाकडे पाहिलं. “Help Yourself” असं मोठ्या अक्षरात लिहिलेल्या एका बोर्डखाली एका कप्प्यात पुष्कळसे कप, मग आणि बशा वगैरे ठेवलेले होते. त्याच्या खाली एका ट्रेमध्ये टी-बॅग्जची पाकिटं आणि क्रीमर ठेवलेले होते, तसंच दुसऱ्या ट्रेमध्ये नेसकॅफेचे पुडे होते. एका ग्लासात ढवळण्यासाठी त्या अतिसूक्ष्म लाकडी काड्या असतात त्या ठेवलेल्या होत्या. का कोण जाणे, पण मला तेव्हा अचानक कॉफी प्यायची इच्छा झाली. माझ्या मेंदूला अजून पुरेशी जाग आलेली दिसत नव्हती, कारण त्याने ‘Boiled Water’ आणि ‘Hot Water’ या दोन गोष्टींमध्ये गडबड केली. मी ऐटीत आपल्या काळजीपूर्वक ‘कॉफीचे कप’ लिहिलेल्या ट्रेमधूनच उचलून घेतलेल्या कपात ते ‘Boiled Water’ ओतून वरून कॉफी, क्रीमर आणि साखर घातली. पहिला घोट गारढोण लागल्यावर मला माझी चूक लक्षात आली आणि हसू आलं. मी तशीच ती गार कॉफी पिऊन टाकली आणि ‘धुवायचे कप इथे ठेवा,’ असं लिहिलेल्या काउंटरवरच्या जागेत तो कप ठेवून परत वर गेलो. 
अजूनही माझ्या मजल्यावर फारशी कोणाला जाग आलेली दिसत नव्हती. मी आरामात सगळ्या सकाळच्या क्रिया उरकल्या. अंघोळ झाल्यावर बेसिनपाशी मला माझे एक आशियन पॉडबंधू भेटले. त्यांची दाढी झाल्यावर ते माझ्याकडे पाहून हसले आणि शॉवरकडे गेले. मीही हसलो आणि आरशात बघून केस नीट बसवण्याचा प्रयत्न केला. बाहेर जायचे कपडे मी पॉडमध्येच चढवणार होतो, पण लागली तर असावी म्हणून मी मधल्या वेळात माझी सूटकेस बाथरूमच्या बाहेरच्या रॅकशेजारी ठेवून दिली होती. अर्थात कुलूप लावून. पॉडमध्ये सगळी तयारी पूर्ण केल्यावर पुण्यात सकाळ झालेली असल्यामुळे घरी एक कॉल केला आणि आईबाबांबरोबर सगळ्या बेताची पुन्हा चर्चा केली. आज मी सेंटोसा बेटावरच्या ‘युनिव्हर्सल स्टुडिओज’ च्या थीम पार्कला भेट देणार होतो. दिवस तिथे बेटावरच काढून रात्री बाबांच्या जुन्या कलीगना जेवणासाठी भेटणार होतो. त्यांना देण्यासाठी पुण्याहून एक नक्षीदार लाकडी पेटी आणि चितळेंच्या बाकरवड्यांचा मोठा पुडा आणला होता, तो मला दिवसभर बाळगायचा होता. हे सगळं सॅकमध्ये ठेवून झाल्यावर मग पासपोर्टवर चर्चा झाली. बाबांचं म्हणणं होतं की आज मी रोलर-कोस्टर आणि अशाच इतर राईड्स करणार असल्यामुळे तो शर्टाच्या आतला पासपोर्ट अगदी सुरक्षित राहिला नसता. तसंही मी एकटाच असल्यामुळे उगीच पोटाला नंतर त्रास होईल असे रोलर कोस्टर्स करूच नयेत असं आमचं ठरलेलं होतंच, पण तरी तो चॉईस मला असावा म्हणून पासपोर्ट मी इथेच ठेवून जावा असं सर्वांनुमते ठरलं. मग मी सुटकेसमध्ये अगदी तळाशी ठेवलेल्या एका शर्टाच्या घडीच्या आत ते पाऊच पासपोर्टसकट लपवून ठेवलं. सूटकेसला कुलूप असणार होतं आणि ती दिवसभर लॉकरच्या आत पडून असणार होती, शिवाय लॉकरची किल्ली म्हणजेच ते कार्ड मी दिवसभर जवळ ठेवणार होतो. त्यामुळे मी फार काळजी न करता ती ठेवून दिली आणि आवरून खाली नाश्ता करायला गेलो. 
साडेआठ वाजले होते आणि तिथे आता पहाटेच्या तुलनेत पुष्कळच लगबग सुरु होती. किचनच्या ओट्यावर ब्रेड, जॅम आणि बटर रचून ठेवले होते, शिवाय दुसऱ्या एका भांड्यात काहीतरी शिजत होतं. मला ब्रेडच्या पलीकडे अंडीही ठेवलेली दिसली. मी खोलीत येताच सोनेरी केसांचा बॉबकट केलेल्या, चष्मा घातलेल्या आणि ज्यांना भेटल्यावर पाचएक मिनिटांतच ‘मावशी’ असं संबोधन करावंसं वाटेल अशा बाईंनी माझं उत्साहाने स्वागत केलं. मी यायच्या आधी त्या एका टेबलावर बसलेल्या चार माझ्याहून थोड्या मोठ्या आशियन मुलामुलींच्या ग्रुपशी गप्पा मारत होत्या. त्यातल्या एकाच्या हातात मी आदल्या दिवशी विमानतळावर जाहिरातीत पाहिलेला एक पदार्थ होता. कुठल्याशा मांसाचे चौकोनी काप, हे नुसते खावे का कशाशी खावे यावर उत्साहात चर्चा सुरु होती आणि मावशी अधूनमधून त्यांच्यात डोकावून ‘याच्यासोबत खाऊन बघा, त्याच्यासोबत खाऊन बघा’ असे सल्ले देत होत्या. मीही हसून मावशींना ‘गुड मॉर्निंग’ केलं आणि एक ताटली घेऊन त्या पदार्थांकडे गेलो. मोठ्या भांड्यात मला नूडल्स दिसल्यावर मी ब्रेड आणि अंडी यांच्याकडे दुर्लक्ष करून सरळ बऱ्याचशा माझ्या ताटलीत वाढून घेतल्या. शेजारीच एका बाऊलमध्ये ते छोटे टोमॅटो दिसले तेव्हा आनंदाने चारपाच उचलून घेतले आणि एका टेबलाशी येऊन बसलो. साध्या मसाला घातलेल्या नूडल्स होत्या, पण रुचकर. सकाळीसकाळी ब्रेड खायची सवय नसलेल्या माझ्यासाठी ती पर्वणीच होती. मी दहापंधरा मिनिटांत माझी ताटली स्वच्छ केली आणि अगदी मनासारखा ब्रेकफास्ट झाल्याच्या आनंदात थोडावेळ तसाच बसून माझ्या शेजाऱ्यांची चर्चा ऐकू लागलो. मावशींनी तेवढ्यात माझ्याकडे येऊन ‘अरे एवढ्याशाने काय होतंय, अजून घे, हवं तेवढं घे’ असं सुरु केलं तेव्हा मला अचानक माझ्या एखाद्या जवळच्या मैत्रिणीच्या घरीच राहायला गेल्यासारखं वाटलं. माझं पोट भरल्याची मी मावशींना चारवेळा ग्वाही देऊन बाहेर पडलो आणि मॉलच्या दिशेने चालायला लागलो. रस्ता बदलण्यापूर्वी एकदा हॉटेलकडे वळून पाहिलं. काल काहीशी परकी वाटणारी तीच इमारत आज अगदी आपुलकीने मला निरोप देत असल्यासारखी भासली. 



मी चालताचलता बाबांनी मला आदल्या रात्री पाठवून ठेवलेल्या सूचना वाचत होतो. त्यानुसार मला मेट्रोने ‘हार्बरफ्रन्ट’ स्टेशनला उतरायचं होतं. माझ्या सिंगटेल कार्डाच्या प्लॅनमुळे मला तिथून सेंटोसा बेटावर जाण्यासाठी केबल कारची एक फेरी मोफत होती. मी माझ्याकडचा नकाशा उघडून हार्बरफ्रन्टकडे जाणारी गाडी बघायला लागलो. ईशान्य-नैऋत्य लाईनच्या नैऋत्य टोकाला हार्बरफ्रन्ट हे शेवटचं स्टेशन होतं आणि तिथेच केबल कार आणि मोनोरेल अशा दोन्ही खुणा होत्या. मोनोरेल हा सेंटोसा बेटावर जाण्याचा दुसरा मार्ग, आणि मागच्या वेळी आम्ही तिच्यानेच गेलो होतो. सुदैवाने माझं फेरर पार्क स्टेशन त्याच लाईनवर होतं. मी मॉल गाठला आणि त्याच्या आवारातल्या त्या सरकत्या जिन्यांवरून पाताळात जाऊन फलाटावर जाऊन थांबलो. दोन मिनिटांत ती आलीच. 
काल मी त्याच दिशेने प्रवास केला होता पण तेव्हा डोक्यात वेगळेच विचार चालू असतील बहुधा. यावेळेस मात्र सकाळी फ्रेश असताना काही स्टेशन्सची नावं ऐकून आठवणी डोळ्यांपुढे येत होत्या. फेरर पार्कनंतर लागणारं पहिलंच स्टेशन म्हणजे ‘लिट्ल इंडिया’! मागच्या वेळी आम्हाला तिथल्या एका फूडकोर्टमध्ये छोले-भटुरे मिळाले होते तो प्रसंग आठवला. आमचं तेव्हाचं हॉटेलही त्याच भागात होतं, पण त्याच्यापासून सगळ्यात जवळचं स्टेशन पूर्व-पश्चिम लाईनवरचं ‘बुगीस’ हे होतं. हे आठवल्यावर माझ्या मनात दहा वर्षांपूर्वी सतत ओळीने ऐकल्यामुळे डोक्यात बसलेली ‘कलांग - लव्हेंडर - बुगीस’ ही त्रिसूत्री येऊन गेली, जी काल मी लव्हेंडरला उतरल्यामुळे तुटली होती. त्यावेळी दमूनभागून संध्याकाळी परत फिरत असताना मेट्रोत ‘बुगीस’ कानी पडलं की कसा जीव भांड्यात पडायचा ते सगळं मला आठवलं. ‘लिट्ल इंडिया’नंतर होतं ‘धोबीघाट’; ते तर जन्मात विसरणं शक्य नाही! रात्री बाबांच्या कलीगना भेटायला मला इथेच यायचं होतं. त्याच्यानंतर ‘चायनाटाऊन’! मागच्या वेळी इथे जेवताना आईच्या वाट्याला नुसताच शिजवलेला भात आणि कच्च्या कोबीची पानं आली होती. एकामागून एक आठवणी येत होत्या आणि मला माझ्या बालपणीच्या सुखाच्या काळातले पाच अविस्मरणीय दिवस पुन्हा जगायला प्रवृत्त करत होत्या. हार्बरफ्रन्ट जवळ येऊ लागलं तसं मी कष्टाने स्वतःला वर्तमानात परत आणलं. त्या आठवणी माझ्यासोबत कायम राहतील याची खात्री होती; आत्ता महत्त्वाचं होतं ते नवीन आठवणी तयार करणं. 
‘Train terminates here,’ अशी घोषणा ऐकून मी सगळ्यांसोबत मेट्रोतून बाहेर पडलो. सरकत्या जिन्यांनी आम्हाला परत जमिनीवर आणून सोडलं. एका मोठ्या इमारतीच्या समोरच्या लॉबीत मी आलो होतो. तिथे काही बाण ‘केबल कारकडे’ जाणारी वाट दाखवत होते. मी त्या दिशेने निघालो. जाताना मी डावीकडचा मोठा रस्ता आणि त्याच्या दुतर्फा असलेली झाडी पाहत त्यांचे फोटो काढत चाललो होतो. सकाळच्या उन्हात न्हाऊन निघालेली झाडं किती सुंदर दिसतात याची मला तेव्हा अचानक जाणीव झाली. मग एका ठिकाणी उजवीकडे वळून मी त्याच इमारतीच्या सावलीतून चालत दुसऱ्या एका भागात आलो. तिथे लिफ्टने केबल कारच्या मजल्यावर जायचं होतं. तिथे वर पोहोचल्यावर मला विमानतळावरच्या चेक-इन भागासारखाच प्रकार दिसला. पलीकडे काचेच्या काऊंटरमागे लोक बसलेले होते आणि मधल्या भागात खांब आणि त्यांना जोडणाऱ्या निळ्या फीती वापरून रांगा पाडण्यात आलेल्या होत्या. कोणीच नव्हतं तरी मी त्याच रांगेतून चालत काऊंटरपाशी पोहोचलो. 



“गुड मॉर्निंग,” मी त्या माणसाला माझं सिंगटेल कार्ड आणि सूचनापत्रक दाखवत म्हटलं. “या प्लॅननुसार मला सेंटोसा बेटावरची एक केबल कारची जाऊनयेऊनची सफर फुकट आहे, बरोबर ना?”
“हो, तुमचं बरोबर आहे सर,” तो माणूस काहीसा खजील झाल्यासारखा चेहरा करून म्हणाला. “पण ती फुकट सफर बेटावर फिरण्यासाठी उपलब्ध आहे, इथून बेटावर जाण्यासाठी नाही. सॉरी.”
बेटावर फिरायचं म्हणजे? त्याने मला नकाशा दाखवला. सेंटोसा बेटावर केबल कारची तीन स्टेशन्स असून, चौथं स्टेशन इथे हार्बरफ्रन्टला होतं. त्याच्या म्हणण्यानुसार मी सेंटोसा बेटावर गेल्यावर त्या तीन स्टेशन्समधून एक गोल चक्कर मारू शकलो असतो. पण तूर्तास तरी बेटावर जायचं कसं हा प्रश्न मलाच सोडवावा लागणार होता. 
“इथून बेटावर जायचं केबल कारचं तिकीट किती आहे?” मी त्याला विचारलं. 
“सोळा डॉलर्स.”
मी निमूटपणे माझं कार्ड परत घेऊन त्याला धन्यवाद दिले आणि आल्या मार्गाने परत मेट्रो स्टेशनपाशी आलो. पायपीट जरा झाली खरी, पण तरी स्वस्त पर्याय उपलब्ध असताना मी माझे दोन वेळच्या जेवणाचे पैसे केबल कारवर उडवणार नव्हतो, विशेषतः मला त्या सेवेचा काही भाग आधीच फुकट उपलब्ध असताना. मी सरळ हार्बरफ्रन्टच्या त्या अजस्त्र इमारतीतल्या चौथ्या मजल्यावरच्या ‘व्हिव्होसिटी’ मॉलमध्ये जाऊन मोनोरेलचं चार डॉलर्सचं तिकीट काढलं. तेही काढण्यापूर्वी या तिकिटाच्या आधारे मला दिवसभर मोनोरेलने कुठून कुठेही फिरता येईल अशी खात्री करून घेऊनच. 
मोनोरेलमध्ये बसल्यावर मी एक व्हिडिओ काढायला सुरुवात केली. त्या इमारतीतून बाहेर पडून आकाशातून प्रवास करतानाचा. काही वेळाने आम्ही समुद्रावरून जायला लागलो. मोनोरेलनेही तिच्या परीने मला एक आठवण करून दिलीच. मागच्या वेळी मी तिच्यात बसलो होतो ते रात्री आठ-साडेआठच्या सुमारास सेंटोसावर दिवस घालवून परत येताना. त्या दिवशी मी आयुष्यात पहिल्यांदा एक 4D शो बघितला होता, ‘सेग्वे’ नामक एका चाकाच्या ऑटोमॅटिक वाहनावरून फिरलो होतो आणि अंधार पडल्यावर किनाऱ्यावरून एक अद्भुत ‘लाईट अँड साऊंड’ शो बघितला होता. मुख्य बेटापासून लांब जाताना त्या शो मधलं ‘सिंगापुरा, सिंगापुरा’ हे गाणं सहजच माझ्या ओठांवर आलं. 
सेंटोसा बेटावर आल्यावर पहिल्याच स्टेशनला ‘युनिव्हर्सल स्टुडिओज’ची घोषणा झाली आणि मी उतरलो. बेटावर गेल्यावर बाबांनी सर्वप्रथम एक ‘सेव्हन-इलेव्हन’ शोधून एक बनपाव घेऊन ठेवायला सांगितलं होतं. स्टेशनच्या तळघरातच मला एक सापडलं आणि मी एक स्ट्रॉबेरी बनपाव घेऊन बाहेर आवारात आलो. खूप मोठा अस्ताव्यस्त पसरलेला भाग होता. एका दिशेला ‘युनिव्हर्सल स्टुडिओज’चा प्रसिद्ध लोगो म्हणजेच एक महाकाय पृथ्वीगोल दिसत होता. दुसरीकडे काही वेगळ्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सकडे जाण्याचे मार्ग होते. मी त्या आवारात चांगली पंधरावीस मिनिटं काढून त्या पार्कचं वायफाय मिळवलं. मग त्यावरून घरी माझं लोकेशन कळवून टाकलं आणि त्या पृथ्वीगोलाच्या दिशेने निघालो. तो म्हणजे खरंतर एक अवाढव्य कारंजं होतं, ज्याच्या मध्यभागी एक भलामोठा निळाशार गोल उभा केलेला होता आणि त्याच्याभोवती ‘युनिव्हर्सल स्टुडिओज’ची अक्षरं संथपणे फिरत होती. त्याच्याकडे थोडा वेळ नीट निरखून पाहिल्यावर तो सबंध गोलच आवर्तने घेत असल्याचं मला दिसलं, पण त्याचा पृष्ठभाग इतका गुळगुळीत होता की ते सहजासहजी लक्षात येत नव्हतं. कारंज्याचे तुषार जवळ उभ्या असलेल्या लोकांवर इतस्ततः उडत होते, पण आता ऊन चांगलंच वाढायला लागलेलं असल्यामुळे लोकांना ते आल्हाददायकच वाटत असावं. 




या कारंज्यापासून जवळ एका मोठ्या आडव्या कमानीखाली पार्कचं प्रवेशद्वार होतं. तिथे खूप लोक रांग करून उभे होते. आम्ही खूप विचार करून आखलेल्या योजनेप्रमाणेच सगळ्या हालचाली केल्याप्रमाणे त्या केबल कार प्रकरणात जरा वेळ गेला असला तरी मी पार्क उघडायच्या वेळी बरोबर दहा वाजता तिथे उभा होतो. तिथे मात्र हा शहाणपणा सगळ्यांनाच सुचल्याचं स्पष्ट झालं. प्रवेशद्वारापाशी प्रत्येकाची अगदी ‘विमानतळ स्टाईल’ तपासणी होत होती. माझी वेळ आली तेव्हा त्यांनी माझं तिकीट पाहून झाल्यानंतर माझी सॅक उघडायला सांगितली. त्यात लगेच त्यांना मी बरोबर ठेवलेला एक खाऱ्या बिस्किटांचा पुडा आणि बनपाव सापडले. 
“माफ करा, सर, पण पार्कच्या आत बाहेरचे खाद्यपदार्थ नेण्यास मनाई आहे. तुम्ही प्लीज बाहेर खाऊन या,” त्या गार्डने मला सांगितलं. उभं आयुष्य नाट्यगृहातल्या ‘मनाई’च्या पाटीकडे बिनदिक्कत दुर्लक्ष करून मध्यंतरात पंगत मांडायची प्रथा पाळण्यात घालवल्यामुळे त्याचं म्हणणं कळायलाच मला पाच सेकंद लागले. मग मी रांगेतली माझी जागा सोडून आवारातल्या एका सावलीतल्या कट्ट्यावर जाऊन बसलो आणि माझा बनपाव खायला सुरुवात केली. मी बिस्किटांचा पुडा उघडल्यावर मला शेजारून ‘एक्स्क्यूज मी’ असा उद्गार ऐकू आला म्हणून मी तिकडे बघितलं. तिथे एक भारतीय कुटुंब बसलेलं होतं आणि त्यांच्यातल्या बाबांनी मला हाक मारली होती. मग बंधुभगिनी भेटल्याच्या आनंदात आमचं पाचएक मिनिटं ‘कुठून आलात, नाव काय’ वगैरे संभाषण झालं. ते दक्षिणेकडचे होते आणि माझ्यासारखेच, पण सहपरिवार ट्रिपला आलेले होते एवढं मला कळलं. मग त्यांनी त्यांच्याकडचे वेफर्स मला देऊ केले. मी त्यांना थँक्स म्हणून नकार दिला. 
“पार्कच्या आतमध्ये खाद्यपदार्थ न्यायची परवानगी नाहीये ना,” ते म्हणाले. “त्यामुळे आम्ही आमच्याकडचं संपवतोय. तुम्हीही घेतलंत तर बरंच होईल, प्लीज संकोच करू नका,”
हे ऐकून मला हसू आलं आणि माझ्याकडचा बिस्किटचा पुडा त्यांना दाखवून मी समदुःखी असल्याचं सांगितलं. त्यावर तेही हसले आणि आम्ही एकमेकांना गुड लक म्हणून हातातल्या कार्याकडे लक्ष वळवलं. माझ्याकडे तरी तेवढंच होतं म्हणून. त्यांनी बिस्किटांचे दोन मोठे पुडे, वेफर्सची दोन पाकिटं, एकदोन सँडविचेस आणि शिवाय ज्यूस असं सगळं आणलं होतं. पार्कमध्ये एक आख्खा दिवस काढण्याच्या दृष्टीने योग्यच होतं ते. पण पार्कमध्ये फक्त आतमध्ये विकत मिळणाऱ्या गोष्टीच खा, नाहीतर खाऊ नका, या पक्क्या व्यापारी धोरणाने आमच्या दूरदृष्टीवर मात केलेली होती. थोड्या वेळाने ते उठले आणि त्यांच्याकडचे सगळे खाद्यपदार्थ त्या आवारातल्या सफाई कामगारांना देऊन आले. त्या कामगारांनीही हसतमुखाने ते स्वीकारलं; त्यांना हा प्रकार नवीन नसावा कदाचित. मग ते त्यांच्या परिवाराला घेऊन माझ्याकडे पाहून हसत पार्कच्या दिशेने जायला निघाले. मीही त्यांच्याकडे पाहून हसून ‘एन्जॉय’ अशी खूण करून त्यांना निरोप दिला. 
प्रवेशद्वारापासच्या माझ्या दुसऱ्या तपासणीदरम्यान त्या गार्डला माझ्याकडचा तो चितळेंच्या बाकरवड्यांचा पुडा सापडला. या खेपेला मी सरळ नाही म्हणून, “हे गिफ्ट आहे, हे काही मी खाऊन येऊ शकत नाही,” असं सरळ त्याला सांगितलं. त्यावर त्याने एका इमारतीकडे बोट दाखवून तिथे लॉकर्सची सोय असल्याचं सांगितलं आणि त्या गोष्टी तिथे ठेवायला सांगितल्या. हेच मघाशी म्हणाला असता तर? हे माझ्या नव्या भारतीय मित्रांच्या कानावर घालण्याची माझी इच्छाच झाली नाही. मी सरळ तिथे गेलो. एका ‘Check-in Kiosk’ सारख्या दिसणाऱ्या यंत्रावर मी दिवसासाठी लॉकर भाड्याने घेण्याची इच्छा व्यक्त केली. पहिल्यांदाच माझं फोरेक्स क्रेडिट कार्ड वापरून पंधरा डॉलर्स भरले. त्या यंत्राने मला एक परवलीचा प्रश्न ठरवायला सांगितला. मी ‘आवडता रंग’ असा प्रश्न निवडून ‘काळा’ असं उत्तर दिलं. मग त्या यंत्राने शेजारचाच एक लॉकर उघडून दिला. मी त्यात माझ्या बाकरवड्या आणि ती नक्षीदार लाकडी पेटीही ठेवून दिली आणि तो बंद करून टाकला. यानंतर मी लगेच चाचणी करायला म्हणून त्याला लॉकर नंबर आणि परवलीचं उत्तर देऊन तो लॉकर व्यवस्थित चालत असल्याची खात्री करून घेतली. ती झाल्यावर मगच मी तिथून बाहेर पडून पुन्हा रांगेत लागलो. 
तिसऱ्या तपासणीनंतर मला आत सोडण्यात आलं आणि मी घडलेल्या घटनेकडे एक विनोदी अनुभव म्हणून पाहायचं ठरवून पार्कमध्ये फेरफटका मारायला लागलो.                        

Enjoy the theme park with me on SG10                         

Comments

  1. आदित्य,मी आता तुझा ब्लॉग वाचला.मांडणी एकदम मुद्देसूद,योग्य क्रमाने, आपल्याला म्हणजे वाचकाला वाचतानाचा आनंद देणारी व विचारप्रवृत्त करणारी आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प