जीवाचं सिंगापूर: आविष्कारपर्व २


“अशी असते सिनेमाची जादू,” स्पिलबर्गचं हे निरोपाचं वाक्य अजूनही डोक्यात घुमत होतं. 
दुपारचे चार वाजत आले होते. बाराच्या सुमारास सुरु झालेला सूर्य आणि ढग यांचा लपंडाव अजूनही चालूच होता. मी प्रसन्न मनाने पार्कमधल्या एका रस्त्यावरच्या फुटपाथवर मांडून ठेवलेल्या टेबलांपैकी एका टेबलाशी बसून आजूबाजूला उत्साहाने वावरणारी लोकांची गर्दी पाहत होतो. गेल्या काही तासांत मी घरी कुठलाच अपडेट न दिल्यामुळे माझ्या दिवसभराच्या कामगिरीबद्दलचं कुतूहल शिगेला पोहोचून व्हॉट्सॲपवर फुटत होतं. मी फोनची गॅलरी उघडून घरी ‘प्रिव्ह्यू’ देण्याकरता दिवसाचे फोटो निवडत होतो. ते बघताबघता सगळ्या आठवणी डोळ्यांसमोर आकार घेत होत्या. 
सर्वप्रथम दिसले ते दोन साधे फुटपाथचे फोटो. पार्कच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर पहिल्यांदा लागतो तो ‘Hollywood Boulevard’! या भागात त्यांनी अगदी छोट्याछोट्या दुमजली इमारती असलेल्या एका लहानशा गल्लीत हॉलिवूडची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. सगळ्यात वाखाणण्याजोगा उद्योग म्हणजे त्या गल्लीच्या फुटपाथवर ‘वॉक ऑफ फेम’ ची प्रतिकृती काढणं! खऱ्या हॉलिवूडमध्ये काही फुटपाथवर त्यांनी तिथे आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवणाऱ्या कलाकारांच्या सन्मानार्थ काही टाईल्सवर त्यांची नावं कोरलेले पितळ्याचे तारे बसवलेले आहेत. तसेच काही इथेही दिसत होते. मला तेव्हा अशी कल्पना सुचली होती की ही जणू कीर्तीची एक शिडीच असावी, म्हणजे एखाद्या उदयोन्मुख कलाकाराने हॉलिवूडमध्ये जरा जम बसवल्याची खूण म्हणजे ‘वॉक ऑफ फेम’च्या सिंगापूरच्या आवृत्तीत आपल्या नावाचा तारा मिळणं! पण प्रत्यक्षात तसा प्रकार नव्हता. तिथल्या ताऱ्यांवरही हॉलिवूडच्या दिग्गजांचीच नावं होती. त्यापैकी ‘ग्रेगरी पेक’ आणि ‘डेबी रेनॉल्ड्स’ ही दोनच नावं मला ओळखू आलेली पाहून मला खूप ओशाळल्यासारखं झालं होतं. या दोघांचाही मी एकेकच सिनेमा पाहिला होता, आणि त्यातही एक बाबांनी दाखवला म्हणून आणि दुसरा मैत्रिणीच्या घरी! एरवी नवा सिनेमा पाहताना आजूबाजूच्यांपेक्षा जास्त कलाकार ओळखू शकण्यात आनंद मानणाऱ्या मला, त्या एवढ्याशा गल्लीने मला खऱ्या हॉलीवूडशी माझा किती कमी परिचय आहे ते दाखवून दिलं होतं.


 


म्हणूनच की काय, पण तिथून मी थेट माझ्या पूर्ण ओळखीच्या असलेल्या ‘मादागास्कर’ विभागात गेलो होतो. ‘मादागास्कर’ हा एकेकाळी माझा सगळ्यात आवडता सिनेमा होता, आणि आजही टीव्हीवर लागलेल्यांपैकी कुठला बघावा याचा निर्णय घेताना संपूर्ण मार्व्हल विश्वाला शह देऊ शकेल अशा मोजक्याच सिनेमांपैकी हा एक आहे. त्या विभागात उभं केलेलं ते अजस्त्र जहाज, त्याच्या पायाशी वाळूत पडलेली लाकडी खोकी वगैरे सगळं पाहून घरीही खूप आठवणी जाग्या होतील हे मला माहित होतं. मी त्या जहाजाचा फोटो पाठवून दिला. बाकी त्या विभागातल्या रोलर-कोस्टरच्या बाहेर लावलेला ‘भिजाल’ असा इशारा पाहून मी परत फिरलो होतो. तसं राईड किंवा शोच्या सदरात मोडणारं त्या विभागात मी काहीच केलं नव्हतं. मग मी सगळ्या दिवसाचं चित्र डोळ्यासमोर ठेवून दोन्ही सदरं भरायचा प्रयत्न केला. 
तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी बाबांचा सल्ला अगदीच मनावर घेतल्यासारखा वागलो होतो. रोलर-कोस्टर शक्यतो करू नकोस असं ते म्हणाले होते, कारण मी एकटाच होतो आणि नंतर पोटाने नाराजी व्यक्त केली असती तर पुढची ट्रिप चांगली झाली नसती. आणि खरंच माझा ‘राईड’ चा रकाना रिकामा राहिला होता. दुबईत रोलर-कोस्टरचा पुष्कळ अनुभव घेतल्यानंतर त्यात नावीन्य उरलं नव्हतं हेही खरंच होतं. थीम कुठल्या का सिनेमाची असेना, रोलर-कोस्टरचा गाभा पुष्कळसा तोच असतो हे मला दुबईने शिकवलं होतं. तरी या पार्कच्या ‘ज्युरासिक’ विभागातली एक राईड मी करायचं ठरवलं होतं. ती नुसती सगळ्या विभागाच्या वरून वेगाने दोनचार चकरा मारायची. पण तिथे पोहोचेपर्यंत खूप मोठी रांग लागलेली होती आणि दुसऱ्या एका शोची वेळही होत आली होती, म्हणून मी तो बेत रद्द करून तो ‘वॉटरवर्ल्ड’ नावाचा शो बघायला गेलो होतो. 
नंतर ‘विकी’ने सांगितल्याप्रमाणे, वॉटरवर्ल्ड हा हॉलीवूडचा एक जुना Dystopian ॲक्शनपट होता. जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीचा संपूर्ण भूभाग पाण्याखाली गेल्यानंतर मोडकळीस आलेला मानवी समाज कुठल्याही मार्गाने पुन्हा कोरड्या जमिनीच्या शोधार्थ निघतो असा तो सिनेमा होता. एक चांगला विषय अतिशय निर्बुद्धपणे हाताळणाऱ्या सिनेमांच्या यादीत हा तेव्हापासून आहे, असंही विकीने सांगून टाकलं. त्या काळाच्या मानाने त्याचे VFX मात्र चांगले होते असं कळलं. तेच इफेक्ट्स आम्हाला या शोच्या माध्यमातून प्रत्यक्षात बघण्याची संधी मिळाली. एका मोठ्या ओपन एअर थिएटरमध्ये रंगमंचावर त्यांनी पाण्याचा सेट उभा केला होता आणि बाकी गंजलेली लोखंडी स्ट्रक्चर्स वगैरे रचली होती. सिनेमातला एक लढाईचा प्रसंग मग त्यांनी आमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष करून दाखवला. त्यांचे स्टंट्स, स्फोट वगैरे सगळं अगदी खरं होतं. त्यांनी ते सगळं इतक्या सहजपणे जिवंत केलं की फक्त इफेक्ट्ससाठी सिनेमा बघण्याची काही गरज नाही असं मला वाटलं. प्रेक्षकांच्या रांगांना कलर कोड होते, आणि तुम्ही कुठल्या रांगेत बसता त्यावर तुम्ही किती भिजता ते अवलंबून होतं. रंगमंचाला लागून असलेला ‘चिंब’ विभाग मी अर्थातच टाळला होता, पण थिएटरमधून पुन्हा रणरणत्या उन्हात बाहेर आल्यावर ‘तुषार’ विभागात बसायला हवं होतं असं वाटून गेलं.




माझं साधंसं जेवण (डायनासॉरच्या आकाराचे चिकन नगेट्स, तळलेल्या बटाट्याच्या चकत्या आणि स्प्राईट) होईपर्यत, पहिल्यांदा विमानात आणि आदल्या दिवशी क्लार्क कीच्या रस्त्यावर भेटलेल्या वादळासदृश वातावरणाने मला पुन्हा गाठलं होतं. पण एखादी सर येऊन गेलीच तर उकाड्यापेक्षा बरीच असं ठरवून मी चालत राहिलो. सर यायच्या ऐवजी तो लपंडाव सुरु झाला. ‘ज्युरासिक’ विभागाच्या उपाहारगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका गुप्त (म्हणजे अर्थातच गुप्त वाटणाऱ्या) पायवाटेने मी पार्कच्या मधोमध असलेल्या जलाशयाच्या काठाने फिरत होतो. त्या पायवाटेवर मला एकदोन धबधबे सापडले. तीच वाट पुढे मला एका वेगळ्या मार्गाने पुढच्या ‘पुरातन इजिप्त’च्या विभागात आणून सोडत होती. इजिप्तच्या विभागातही मी सगळ्या नेपथ्याचे खूप फोटो काढून घेतले, पण त्यातली आणि त्यानंतरच्या ‘SciFi’ विभागातली एकही राईड केली नाही. वास्तविक ‘SciFi’ विभागातला एखादा छान 4D शो करायला मला आवडलं असतं, पण तो विभाग मुख्यतः ‘ट्रान्सफॉर्मर्स’ फ्रॅन्चायझीने व्यापलेला होता. हॉलिवूडच्या एकूणच सगळ्या ‘SciFi’ जॉनरशी माझे खूपच जिवाभावाचे संबंध असले तरी हे ‘ट्रान्सफॉर्मर्स’ माझ्या खूपच कमी जवळचे होते. त्यामुळे मी तो बेतही रद्द केला. 
तिथे बसून आख्ख्या दिवसाकडे नजर टाकताना मला असं कळलं की मी खरंतर एकच 4D शो केलेला होता. तो म्हणजे डिस्नेच्या किल्ल्यासारख्या दिसणाऱ्या एका अजस्त्र गढीच्या तळघरात झालेला ‘Shrek’चा. आत्तापर्यंत 4D च्या पुष्कळ युक्त्या पाठ झालेल्या होत्या, पण तरी त्या छोट्याशा पंधरावीस मिनिटांच्या सिनेमात ड्रॅगन तोंडावर आग ओकतानाच्या, कथानायक पाण्यात पडतानाच्या आणि त्याचा खास मित्र ‘डॉंकी’ जोरात शिंकतानाच्या प्रसंगातही त्या सगळ्या अनुभवायला पुन्हा तितकीच मजा आली होती. त्याच विभागात नंतर मी 4Dच्याच चुलत घराण्यातला एक शो बघितला होता, तेही मला एकदम आठवलं. तो याच ‘डॉंकी’चा एक स्टँडअप कॉमेडी शो होता. एका अंधाऱ्या थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर ते पात्र आमच्यासमोर कॉमेडी करत होतं. विशेष म्हणजे ती आधीच रेकॉर्ड करून ठेवलेली फिल्म नव्हती, कारण तो पडद्यावरचा प्राणी प्रेक्षकांचे उद्गार, प्रश्न वगैरे सगळ्यांना व्यवस्थित प्रतिक्रिया देत होता. त्याच्या खऱ्या मानवी साथीदाराने एका मुलाला उठवल्यावर तो त्याच्याशी पाचएक मिनिटं बोलला हे पाहून मला हे सगळं कुठेतरी एक दुसरा माणूस करत असणार याची खात्री पटली. पण या सगळ्याचं synchronization अफाट होतं. एकाच वेळी लोकांच्या बोलण्यावर उत्स्फूर्त विनोद, तेही पडद्यावरच्या एका पात्राच्या तोंडून करणं आणि त्याचवेळी त्या पात्राला पडद्यावर लाईव्ह नाचवणं हे सगळं अगदी परफेक्ट जमलं होतं. विनोद अगदीच साधे होते, पण अशा शोला येऊन हसण्याची अपेक्षा करणं म्हणजे जादूचा थरार अनुभवण्यासाठी हॅरी पॉटर पाहण्यासारखं आहे. You’re missing the point. हा शोच काय, या पार्कमधल्या सगळ्याच गोष्टी माणसाच्या बुद्धिमत्तेचं आणि कल्पकतेचं कौतुक वाटण्यासाठीच पाहायच्या आणि करायच्या असतात.




‘SciFi’ विभाग तसाच ओलांडून मी पुढे शेवटच्या ‘न्यूयॉर्क’ असंच नाव असलेल्या विभागात आलो होतो. सकाळी नकाशावर हे नाव बघूनच मला गंमत वाटली होती, कारण बाकीचे सगळे विभाग ठळकपणे युनिव्हर्सल स्टुडिओजच्या सर्वात गाजलेल्या सिनेमांवर आधारित होते. या स्टुडिओचं आणि न्यूयॉर्कचं काय खास नातं होतं ते मला कळेना. पण त्या विभागात फिरताना मात्र तितकीच मजा आली होती. शहरातली प्रसिद्ध लायब्ररीची इमारत मला दिसली, आणि त्याच्या आजूबाजूला ‘फ्रेंड्स’मध्ये अनेकदा पाहिलेल्या इमारतींसारख्या काही इमारती होत्या. त्या गल्लीच्या तोंडाशी मोठ्या आडव्या हिरव्या फलकावर ‘सेसेमी स्ट्रीट’ असं लिहिलेली पाटी पाहून मला खूप मजा वाटली, पण सगळ्यात जास्त आनंद झाला ‘रॉकफेलर सेंटर’ची इमारत पाहून. खऱ्या न्यूयॉर्कमध्ये मूळची गगनचुंबी असलेली ही इमारत इथे कोणीतरी मुद्दाम गुढघ्यांवर बसवल्यासारखी दिसत होती. तिचं ते काहीसं विनोदी दिसणारं रूप बघितल्यावर मला त्यांनी ‘एम्पायर स्टेट बिल्डिंग’ किंवा ‘वन वर्ल्ड ट्रेड सेंटर’ वगैरे तयार करण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल त्यांचे आभारच मानावेसे वाटले. पण या सगळ्या प्रतिकृती अगदी हुबेहूब वाटत होत्या एवढं खरं. त्यांच्याकडे काही वेळ बघून झाल्यानंतर मी शेजारच्या एका छोट्या इमारतीत शिरलो आणि जो शो मी सगळं फिरून झाल्यानंतरच बघायचा म्हणून राखून ठेवला होता त्याच्या रांगेत जाऊन उभा राहिलो. 
सुरुवातीलाच नकाशात या विभागात असलेला ‘लाईट्स, कॅमेरा, ॲक्शन’ या त्या शोचं नाव मी पाहिलं होतं, आणि त्याच्याखालच्या ओळीवर ‘होस्टेड बाय स्टीफन स्पिलबर्ग’ हे वाचून क्षणभर माझ्या काळजाचा ठोकाच चुकला होता. पण लगेच हे लक्षात आलं की पार्कच्या एकूण स्वभावाला अनुसरून स्पिलबर्गही पडद्यावरच असणार. तो शो फक्त स्पिलबर्गचा आधीच रेकॉर्ड करून ठेवलेला एक व्हिडिओ असता तर मी गेलो नसतो, पण त्याची माहिती वाचून असं वाटत होतं की सिनेमात स्पेशल इफेक्ट्समुळे कायकाय घडवून आणणं शक्य होतं त्याची एक झलक दाखवणारा तो शो होता. माझ्या या दोन्ही अपेक्षा त्याने पूर्ण केल्या. 




ती इमारत आतून एवढी मोठी असेल असं वाटलं नव्हतं, पण आम्ही पुन्हा एका मोठ्या तळघरात आलो होतो. फक्त Shrekच्या शोच्या तळघराप्रमाणे हे मशालींच्या पिवळ्या उजेडाने प्रकाशलेलं दगडी तळघर नसून व्यवस्थित एखाद्या मोठ्या मॉलच्या ‘Staff Only’ असं लिहिलेल्या दारामागे जशी खोली सापडेल तशी खोली होती. (त्या ‘Staff Only’च्या दारामागे काय असतं ते मला कसं माहित होतं ते आत्ता सांगत बसत नाही) भिंती अगदी साध्या, पांढऱ्या रंगाच्या होत्या आणि एक त्याच रंगाचा पाईप छतावरून फिरत होता. ही खोली अशीच ठेवण्यामागेही काहीतरी उद्देश असणार हे उघडच होतं, पण ती कमी उदासवाणी वाटावी म्हणून त्यांनी सगळ्या भिंतींवर युनिव्हर्सल स्टुडिओजच्या खूप सिनेमांची फ्रेम केलेली पोस्टर्स लावून ठेवली होती. ती पाहून त्यापैकी बरेच सिनेमे मी पाहिलेले असल्याचं माझ्या लक्षात आलं आणि वॉक ऑफ फेमपाशी आलेलं नैराश्य पळून गेलं. सगळ्या हॉलीवूडशी नसला तरी या स्टुडिओशी माझा परिचय चांगला आहे असं मला वाटून गेलं. तेवढ्यात रांगांसाठी केलेल्या दोन रॅम्प्सच्या टोकाला असलेली दोन्ही दारं उघडली. वरच्या रॅम्पवरून लोक बाहेर पडायला लागले आणि माझ्या एका अत्यंत आवडत्या दिग्दर्शकाची हाक ऐकून आम्ही आत गेलो होतो. 
फुटपाथवरच्या त्या टेबलाशी बसून, मघाशी विकत घेतलेल्या काकडीची चव असलेल्या थंडगार पाण्याचे घोट घेत मी अर्ध्याच तासापूर्वी घडलेल्या पार्कमधल्या त्या सगळ्यात अविस्मरणीय शोच्या आठवणींमध्ये हरवलो होतो. न्यूयॉर्कच्या समुद्रात लेव्हल ५ चं वादळ आलं तर एका किनाऱ्यालगतच्या बोटींच्या शेडमध्ये काय होईल ते त्यांनी आमच्यासमोर घडवून आणून अंगावर काटा आणला होता. त्या शेडच्या भिंती गदागदा हलणं, जमिनीवर आधी पाणी साचून मग त्यात लाटा उसळणं आणि नंतर शॉर्ट सर्किट होऊन त्या पाण्यातूनच आगीच्या ज्वाळा सगळीकडे पसरणं - हे सगळं खरं घडलं होतं; फार काय शो संपल्यावर ती आगही विझवण्यात आली होती. ते सगळं पाहून जे वाटलं त्यामध्ये आणि रोलर-कोस्टर किंवा 4D नंतर जे वाटतं त्यात फारसा फरक नव्हता. पण तिथून बाहेर पडून पार्कमधून एक शेवटची चक्कर मारताना माझ्या मनात वेगळेच विचार सुरु झाले होते. 
न्यूयॉर्क विभागात फिरतानाच मला हे सगळं कृत्रिम असल्याची प्रकर्षाने जाणीव होत होती. पण आता विचार केल्यावर असं वाटलं, की कृत्रिमपणाच्याही पायऱ्या असाव्यात. आजूबाजूला मी बघत असलेले सगळे आविष्कार निःशंक कृत्रिम होते, पण दुसऱ्या पायरीवर, कारण सिनेसृष्टीसकट मुळातच सगळं कलाक्षेत्रही कृत्रिमच तर होतं. इतक्या वर्षांत युनिव्हर्सल स्टुडिओजने जे काल्पनिक वास्तव घडवलं, तेच आम्हाला आतून अनुभवायला मिळावं आणि मग ते कसं घडवतात तेही पाहता यावं या उद्देशाने हे पार्क नावाचं दुसरं काल्पनिक वास्तव घडवलं होतं. कृत्रिम म्हणावं तरी किती गोष्टींना, आणि कसं? ज्युरासिक विभागातले दोन खऱ्या झाडांच्या मध्ये उभे असलेले दोन डायनासॉर, यांच्यापैकी डायनासॉर खोटे, का दोन्हीही? इजिप्तच्या विभागातली पिरॅमिड्स काय आणि न्यूयॉर्कमधली रॉकफेलर सेंटरची इमारत काय, दोन्ही कृत्रिम, पण ज्यांना पाहून त्यांना घडवण्यात आलं आहे त्या खऱ्या इमारतींचं काय? ते पाहत असताना मला अचानक दुबईच्या ‘ग्लोबल व्हिलेज’ची आठवण झाली आणि त्यातल्या ताजमहाल, आयफेल टॉवर यांच्या प्रतिकृती आणि त्यांच्या शेजारी उभी असलेली, तिथून अवघ्या दहावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या बुर्ज खलिफाची प्रतिकृती आठवली. का करत असू आपण असं? मग मी आजूबाजूला लहान मुलांचा हात धरून चालणारे त्यांच्याइतकेच उत्साही पालक दिसले, ‘souvenirs’ची खरेदी करण्यासाठी दुकानात शिरणारी गर्दी दिसली, आणि माझ्याच फोनवरचे शंभरेक फोटो दिसले, आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर मला आपोआपच मिळून गेलं. 
नुसतं बघून माणसाचं समाधान होत नाही. त्याला दाखवायचं असतं. 
सिनेमा म्हणजे तरी काय?
फोनने आवाज केला तसं मी मेसेजेस बघितले. आईने माझ्या लहान भावाचा शर्टचा साईझ कळवला होता. मी हसतच तिथून उठलो आणि त्या दुकानात शिरणाऱ्या गर्दीत सामील झालो.
     
                      
                      
Sentosa is not over! Continue the adventure on SG11

Comments

  1. आत्ता सगळा लेख वाचला.तू वर्णन केलेल्या बहुतेक गोष्टी अगदी डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या.लेखनशैली मस्त!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प