जीवाचं सिंगापूर: भेटपर्व
सिंगापूरच्या सगळ्यात मोठ्या मेट्रो स्टेशनमध्ये म्हणजेच धोबीघाटमध्ये एका लॉबीत उभं राहून मी आणि बाबांच्या कलीग आता जेवायला कुठे जायचं त्यावर विचार करत होतो. एका पक्क्या सिंगापूरकराचं शिफारसपत्र लाभलेल्या हॉटेलमध्ये जाता येणं म्हणजे पर्वणीच! पण बाबांच्याच शब्दांत कुठलाही ‘प्रयोग’ करायची माझी इच्छा नव्हती, त्यामुळे त्यांनी जेव्हा मला थाई आवडतं का असं विचारलं तेव्हा मी आनंदाने हो म्हटलं, आणि इथे अवतारल्यापासून मी त्या एकाच खाद्यसंस्कृतीच्या कृपेने जगतोय हा तपशील त्यांना तेव्हा सांगितला नाही.
त्या म्हणाल्या की त्यांच्या आवडीचं एक थाई हॉटेल इथे धोबीघाटमध्येच होतं. त्या चालायला लागल्या म्हणून मीही त्यांच्या मागून निघालो, पण त्यांचं ईप्सित स्थळ हॉटेल नसून एक चौकशीची खिडकी होती. तिथे बसलेल्या एका माणसाला त्यांनी हॉटेल कुठे होतं ते विचारलं. ज्यांनी आपलं उभं आयुष्य सिंगापूरमध्येच काढलं आहे अशा या एवढ्या अनुभवी व्यक्तीला एका मेट्रो स्टेशनमधल्या त्यांच्या आवडत्या हॉटेलचा पत्ता विचारावा लागावा, यावरूनच मला धोबीघाटचा विस्तार काय असेल याची कल्पना येत होती.
हॉटेलपर्यंतचा प्रवास करताना आमचं बोलणं चालूच होतं. गेल्या काही तासांत त्यांना भेटण्याचा क्षण जसा जवळ येत होता तसं माझ्या मनावरचं दडपण जरा वाढतच गेलेलं होतं. ‘त्यांना भेटून ये’ असं सांगून बाबांनी माझ्यावर मोठीच जबाबदारी टाकली होती असं वाटत होतं. मला मुख्यतः भीती वाटत होती ती ‘काय बोलायचं’ यावर. दहा वर्षांपूर्वी आम्ही भेटलो होतो तेव्हा मी अगदी उत्साहाने खूप बोललो होतो, पण तेव्हा मी काहीही बडबड केली तरी गोड वाटेल अशा वयाचा होतो. माझ्या डोक्यात पूर्वी वाचलेल्या ‘येस प्राईम मिनिस्टर’मधला प्रसंग घोळत होता. त्यात पंतप्रधान असलेल्या जिम हॅकरला त्याचा केंद्रसचिव हम्फ्री सांगत असतो की हॅकर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भेटीसाठी जाण्यापूर्वी त्या भेटीचा अजेंडा आधीच उभयपक्षी मान्य व्हायला हवा, आणि अजेंडाशिवाय नुसती भेट होऊच शकत नाही. यावर हॅकरने का असं विचारताच हम्फ्री म्हणतो, “तुम्हाला तिथे जाऊन काही बोलायला सुचलंच नाही तर?” कुठल्याही कौटुंबिक सोहळ्यात एखाद्या जवळच्या व्यक्तीला चिकटून त्यांच्या इतरांशी होणाऱ्या प्रत्येक संभाषणात फक्त हसण्याचं काम करण्यात आयुष्य घालवलेल्या मला, आता आयुष्यात एकदाच भेटलेल्या एका परदेशी व्यक्तीशी किमान तासभर गप्पा मारायच्या होत्या.
पण प्रवासाला निघाल्यापासून घडलेल्या अनेक गोष्टींप्रमाणेच, या गोष्टीचीही मी निष्कारण काळजी केली होती असं माझ्या लक्षात आलं, आणि तेही मी रात्री माझ्या पॉडमध्ये आडवं झाल्यावर. त्यानंतर आमचं संभाषण आठवण्यासाठी मला जरा कष्टच घ्यावे लागले, कारण आम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टींवर अगदी निवांतपणे गप्पा मारलेल्या होत्या. हॉटेलकडे चालत जातानाच त्यांनी आईबाबांची आणि आजीची अगदी आस्थेने चौकशी केली आणि मीही माझी शब्दसंपत्ती ‘फाईन’ या एका शब्दापुरतीच मर्यादित नसल्याचं दाखवून दिलं. आमच्या आधीच्या भेटीचा प्रसंग माझ्यासाठी तेव्हा भन्नाटच ठरल्यामुळे मला आठवत होताच, पण त्यांनाही तो अगदी तपशीलवार आठवत होता. त्यांनी तेव्हाचे काही संदर्भ द्यायला सुरुवात केली आणि तो एक धागा पकडून आम्ही खूप वेळ बोलत राहिलो.
“मला आठवतंय, तेव्हा तू आम्हाला भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतंस,” त्या हसत म्हणाल्या. तेव्हा त्या आणि बाबांच्या दुसऱ्या एक कलीग आमच्याबरोबर जेवायला होत्या, आणि मी बाबांची री ओढून त्यांना भारतात यायला सांगितलं होतं ते मलाही आठवत होतं. तेव्हा बाबांचा आग्रह पुणेरी असला तरी माझा मात्र अगदी प्रामाणिक होता. तेव्हा मी आपल्या आमंत्रणामुळे या दोन ‘मावश्या’ पुण्याला येऊन जातील, आपल्याकडेच उतरतील, आपण त्यांना शाळा दाखवू वगैरे पुष्कळ स्वप्नरंजन केलेलं होतं. ते सगळं आठवल्यावर आपण एकेकाळी काय निरागस असायचो असा एक विचार माझ्या मनात येऊन गेला.
“मग आलात का तुम्ही भारतात त्यानंतर कधी?” मीही हसून त्यांना विचारलं.
“नाही रे,” त्या म्हणाल्या. “खरंच भारत बघायचाय मला एकदा, आणि तसं यायचं कधीपासून आहे डोक्यात. तू किती फिरलायस भारतात?”
मी जर उभं आयुष्य फक्त पुण्यात काढलं असतं तर या त्यांच्या प्रतिप्रश्नावर मला लगेच विषय बदलावा लागला असता. पण प्रवासाची आवड आम्हा सर्वांनाच खूप असल्यामुळे माझी अगदी लहानपणापासूनच माझ्या देशाची थोडीशी ओळख झालेली होती. मग मी त्यांना हिमाचल प्रदेश, कन्याकुमारी, सिक्किम, केरळ, राजस्थान, अंदमानवगैरेंबद्दल कायकाय सांगितलं. हे बोलताबोलता मला माझ्या भारतीय असण्याचा भूगोलाचा अभ्यास करकरून जेवढा अभिमान वाटला नव्हता तेवढा अचानक वाटून गेला. माझ्या मनात आलं, एक शहर म्हणून सिंगापूर कितीही सुंदर, सुविधापूर्ण आणि निसर्गरम्य असलं, तरी इथेच लहानाचं मोठं व्हायला मला खूप विशेष आवडलं नसतं. त्यांच्या पुढच्या प्रश्नाने मला अचानक भारतात वाढल्यामुळे लाभलेल्या आणखी एका आत्यंतिक हव्याहव्याशा सुखाची आठवण आली.
“तुझं काय मत आहे रे,” त्यांनी विचारलं. “खऱ्या अर्थाने भारत बघायचा असेल तर सर्वांत चांगला मार्ग कुठला?”
“ट्रेन,” मी त्यांचं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच म्हणालो. याबद्दल माझ्या मनात कधी वादच नव्हता आणि असूही शकला नसता. जमिनीखालच्या अंधाऱ्या बोगद्यांमधून सबंध देश तासाभरात पालथा घालणाऱ्या या लोकांना एका चांगल्या एकदीड दिवसाच्या ट्रेनच्या प्रवासाचं सुख कसं कळणार?
बोलताबोलता आम्ही हॉटेलपाशी आलो होतो. तिथे एका टेबलाशी आम्ही येऊन बसल्यावर एका वेटरने येऊन त्यांच्या हातात एक टॅब्लेट दिला. समोरासमोर बसलेल्या आम्हा दोघांनाही दिसेल अशा प्रकारे तो टेबलावर उभा ठेवून त्याच्यावरचा मेनू त्यांनी मला समजावून सांगायला सुरुवात केली.
“ग्रीन करी आवडते का रे?” वास्तविक मला हे विचारणं म्हणजे ‘बुर्ज खलिफा आवडतो का’ असं विचारण्यासारखंच होतं. जगात थाई ग्रीन करीपेक्षा जास्त मला फक्त मेथीची डाळ घातलेली भाजी आणि लिंबू पिळलेला वरणभात या दोनच गोष्टी अधिक प्रिय आहेत. पण आदल्या रात्रीच ग्रीन करी चिकन खाल्लेलं असल्यामुळे मी यावेळेस करीबरोबर प्रॉन्स सांगितले. त्यांनी सुचवलेला दुसरा पदार्थ म्हणजे पाईनॅपल राईसही मी लगेच मान्य करून टाकला, कारण हा पदार्थ सिंगापूरमध्येच आधी खाल्ल्याचं आणि आवडल्याचं मला आठवत होतं. त्यांनी सांगितलेला स्टार्टर मात्र मला नवीन होता. कसल्याशा झाडाच्या पानात तळलेलं चिकन, पण मी त्यालाच हो म्हणून मोकळा झालो. त्यांनी टॅब्लेटवरच गणित करून एकूण बिल बघितलं आणि मग तो टॅब्लेट आणि आपलं कार्ड घेऊन काउंटरकडे गेल्या. थोड्याच वेळात तो स्टार्टर आला. तो खरोखरीच अप्रतिम होता.
त्यानंतर आलेल्या ग्रीन करीमधले प्रॉन्स इकडच्यासारखे नसून चांगले दणदणीत मोठे होते. आत्तापर्यंत प्रॉन्स या प्रकाराशी फक्त बिर्याणी किंवा गोव्याची करी याच माध्यमांतून संबंध आलेला असल्यामुळे मला या शिजवलेल्या प्रॉनचं डोक्यावरचं कवच काढून तो खायचा हा प्रकार नवीन होता.
“तू हाताने कर की ते,” काही वेळ मला त्या प्रॉनशी काट्याने झगडताना पाहिल्यावर त्या हसून म्हणाल्या. “मला खरंतर वाटलं तुला हातानेच खायची सवय असेल. तुमची तशीच पद्धत आहे ना?”
“हो आहे,” मी तो प्रॉन कृतज्ञपणे हाताने तोडत म्हणालो. “पण मला लहानपणापासूनच भात चमच्यानेच खायची सवय आहे.”
यावरून आमची गाडी आपल्या रोजच्या खाद्यजीवनावर आली. त्यांना मराठी खाद्यसंस्कृतीबद्दल खूपच कुतूहल होतं असं मला जाणवलं. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींपेक्षा परदेशातल्या खूप वेगळ्या असतात असं आपल्याला ऐकून माहित असतं. पण आपल्या पोळीपासून प्रत्येक गोष्टीबद्दल अगदी मनापासून अचंबा वाटणाऱ्या एका परदेशी व्यक्तीला जेव्हा आपण आपलंच जेवण समजावून सांगतो तेव्हा त्या खरंच किती वेगळ्या असू शकतात याची कल्पना येते. ‘भाजी’ म्हणजे काय ते त्यांना समजावून सांगण्यातच माझी पुष्कळशी ऊर्जा संपत आलेली होती, पण त्यांना त्यानंतर आपण पोळीचा ‘घास’ तोडून तो भाजीबरोबर कसा खातो त्याचं प्रात्यक्षिकासहित स्पष्टीकरण हवं होतं. मला खरंतर हे सगळं सांगताना विशेष मजा येत होती. पु.लं.च्याच शब्दांत, ‘पुण्यामुंबईत राहिलात तरच नागपुरी खाक्या दाखवता येतो,’ याचाच मी आनंद घेत होतो.
“मला तुझ्या बाबांनी सांगितलं तू आता फायनान्समध्ये शिरायचा विचार करतोयस म्हणून,” त्या म्हणाल्या. “तेव्हा तर तुला लेखक व्हायचं होतं. बाय द वे, मला त्यांनी तुझ्या पुस्तकाबद्दल सांगितलं होतं. त्याबद्दल अभिनंदन! तो विचार आहे म्हणजे अजूनही!”
“हो, आहे.” मी आनंदाने म्हणालो. मग माझ्या पुस्तकावरून थोडं बोलणं झालं. मी सध्या ब्लॉग लिहीत असल्याचं सांगितलं. “पण त्याच्यावरचं बहुतेक सगळं मराठीत असतं,”
“अस्सं,” त्या हसल्या. “कशावर लिहितोस मग तू तिथे?”
“पुष्कळ गोष्टी आहेत, विषय सुचतील तसे.” मी सांगितलं. “अधूनमधून प्रवासवर्णनही लिहितो.”
मी मघाशी सांगितलेल्या भारतातल्या सगळ्या ट्रिप्सबद्दल मी ब्लॉगवर लिहिलेलं असेल अशी त्यांची समजूत झालेली दिसली. त्यावर लिहिण्याऐवजी मी दुबईच्या एका ट्रिपवर चोवीस लेखांची मालिका रचल्याचं मी जरा लाजूनच कबूल केलं.
“मग आता या ट्रिपबद्दल लिहिणार ना?”
“हो, अर्थात,” मी म्हणालो. “पण तेही मराठीतूनच लिहीन बहुतेक. मराठीतून मला अगदी मनापासून व्यक्त होता येतं असं वाटतं.”
“वाटणारच!” त्यांना लगेच पटलं. “मग आता फायनान्स? कुठे ॲप्लाय करायचा विचार आहे?”
तेव्हा मी दोनतीन ठिकाणी ॲप्लाय केलं होतं, त्यात सिंगापूरमधल्याच एका बिझनेस स्कूलचाही समावेश होता. तिच्याबद्दल त्यांनी ऐकलेलं असेल असं मला वाटलं, पण त्यांना ती माहित नव्हती. ते मूळचं एक फ्रेंच विद्यापीठ असून, सिंगापूरमध्ये फक्त त्यांची आशियातली ब्रँच आहे असा मी खुलासा केला. तो कोर्स छान आहे, त्याचं जगातलं रँकिंगही चांगलं आहे असं सगळं सांगितलं.
“अरे वा,” त्या म्हणाल्या. “मग जायच्या आधी एकदा तिथे जाऊन ये की,” त्यावर मी ‘बघू’ एवढंच म्हणालो. तेव्हा मला तिथे प्रवेश मिळण्याची फारशी आशा वाटत नव्हती, म्हणून मी माझं आधीचं शेड्यूल त्यासाठी मोडायला तयार नव्हतो. त्यांनी मग मला सिंगापूरच्याच ‘नान्यांग युनिव्हर्सिटी’ आणि ‘नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर’चाही सल्ला दिला.
“पण म्हणजे तू कुठेतरी परदेशात जाणार हे नक्की,” त्या हसल्या. “त्यासाठी ही मस्तच प्रॅक्टिस होत असणारे!” मीही हसून होकारार्थी मान हलवली.
आमच्या दीड-दोन तासांच्या संभाषणातला तेवढा वेळ फक्त आम्ही सिंगापूरविषयी बोललो असू. त्यांनी मला माझ्या उरलेल्या अजेंडाबद्दलही विचारलं. मी दुसऱ्या दिवशी झू आणि त्यानंतर ‘गार्डन्स’ बघायला जाणार असल्याचं सांगितलं. त्यांनी मला यापेक्षा जास्त काही पाहण्याचा सल्ला दिला नाही, पण ‘गार्डन्स’मध्ये अजिबात घाई करू नकोस असं आवर्जून सांगितलं. युनिव्हर्सल स्टुडिओजमध्ये मी कायकाय केलं तेही त्यांनी विचारलं. हा एवढा वेळ सिंगापूरमध्ये घुटमळून झाल्यावर आम्ही एकदम पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये शिरलो.
आमचं जेवण झाल्यानंतर सुमारे अर्ध्या तासाने निघायच्या गोष्टी सुरु झाल्या. मग आम्ही भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्याचा कार्यक्रम पार पाडला. त्यांनी आमच्यासाठी ग्रीन करी आणि इतर थाई आणि चायनीज पदार्थांचे ‘ऑथेंटिक’ मसाले आणले होते; ही भेट मी अत्यंत कृतज्ञतापूर्वक स्वीकारली. माझी लाकडी पेटी आणि बाकरवड्या त्यांना खूप आवडल्या, आणि दिवसभर मी त्या कशा जपल्या होत्या त्याचा किस्सा ऐकून त्यांना खूप हसू आलं. पुन्हा एकदा त्यांना बाकरवड्या समजावून सांगण्यात मला विशेष मजा वाटली. मघाशी ज्या लॉबीत आम्ही भेटलो होतो तिथेच आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.
मी धोबीघाटचा भूलभुलैया पार करून अगदी आनंदात या १००% समाधानकारक ठरलेल्या दिवसावरून पुन्हा नजर टाकत माझ्या गाडीत चढलो. फेरर पार्कला उतरल्यावर त्याच धुंदीत बाहेर न पडता आधी सगळ्या पाट्या चारवेळा वाचून काढल्या. कारण मनातून कितीही हलकं वाटत असलं तरी पाय कालच्याइतकेच जड झालेले होते. यावेळी मी योग्य एग्झिट हुडकून बरोबर सिटी स्क्वेअर मॉलच्या तळघरातून बाहेर पडलो आणि माझ्या हॉटेलच्या दिशेने चालायला लागलो.
मनात वेगळेच विचार सुरु होते. माझ्या हळूहळू लक्षात येत होतं, की परदेशातून परत आल्यावर मित्रमैत्रिणींना मी ज्या चवीने तिकडची वर्णनं सांगितली होती, तितक्याच किंवा किंबहुना जास्तच उत्साहाने आज मी माझ्याच देशाबद्दल आणि माझ्याच संस्कृतीबद्दल बोललो होतो. ज्या गोष्टी आपण एरवी आपल्याच, रोजच्याच म्हणून सोडून देतो त्यांच्याकडे असं त्रयस्थपणे पाहिल्यावर या अचानक फार भारी वाटू लागल्या होत्या. मला पूर्वीचे काही प्रसंग आठवले. जर्मन वगैरेच्या वर्गात ‘तुमच्या देशावर तुमचं प्रेम का आहे’ टाईप प्रश्नांवर विचार करताना कधी ठोस उत्तर देता यायचं नाही, किंवा जे उत्तर शेवटी लिहिलं जाईल ते अगदीच छापील आणि वरवरचं वाटे. कधीकधी असंही वाटून जायचं की या ‘का आहे’ च्या प्रश्नाच्या आधी ‘आहे का’ हा प्रश्न विचारण्यात यावा, कारण आपला देश म्हटला तरी त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोडीच आवडतात? आवडूही नयेत, कारण तीच ज्या ‘राष्ट्रवादा’ने युरोपला दोनदा ठळकपणे आणि साऱ्या जगाला अगणित वेळा पोखरलं त्याच भावनेची पहिली पायरी. पण तेव्हा मला अचानक समजलं की त्या प्रश्नाचं व्यवस्थित मनापासून उत्तर देताना अडचण होण्यामागे हे खरं कारण नव्हतं. माझ्या देशातल्या आणि संस्कृतीतल्या ज्या गोष्टींबद्दल मला मनापासून प्रेम आणि अभिमान वाटतो त्या, इतर अनेक गोष्टींप्रमाणेच, अगदी पहिल्यापासून माझ्यात भिनलेल्या आहेत आणि आजही माझ्या अस्तित्त्वाचा एक अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे एका पातळीवर, त्या मला consciously का आवडतात हा प्रश्नच माझ्या मेंदूला कळत नाही. अशा एखाद्या प्रसंगी अनपेक्षितपणे आपण consciously त्याबद्दल एवढा विचार करतो, तेव्हा खरंच या गोष्टींना आपण किती निस्सीमपणे आपलं मानतो हे आपल्या लक्षात येतं. त्या रात्री माझ्या पॉडमध्ये झोपलेलो असताना मला हे सगळं सुचलं, आणि मी भविष्याकडेही जरा नव्या दृष्टीने पाहू लागलो. माझ्या एकूणच सगळ्या प्रवासाची सुरुवात मी ‘परदेशात (मुख्यतः दुबईतच) राहायचं’ या विचाराने केलेली असली तरी, आता प्रत्यक्ष परदेशात काही काळ राहायला जाण्याच्या उंबरठ्यावर आल्यावर त्या वास्तवाचं मला तितकंच आकर्षण उरलं असेल का असा विचार मनात आला. त्याचप्रमाणे, परदेशातल्या आयुष्याची कितीही सवय झाली तरी आपण खऱ्या अर्थाने कधीतरी त्याला घर म्हणू शकू का हा प्रश्नही निर्माण झाला.
माझ्या या लाडक्या शहराने माझी शाळा घेण्याचा चंगच बांधलेला होता!
खूप छान!! शेवटचा भाग विशेष आवडला. 😊
ReplyDeleteखूपच सुंदर. हा भाग the best.
ReplyDeleteराधिका प्रभुदेसाई- last one - the best.
ReplyDeleteआदित्य, खूपच छान लिहितोस. सगळे भाग वाचले. मजा येते वाचायला.
ReplyDelete-अश्विनी केळकर
आदित्य, खूप छान आहे लेख, विशेषतः,आपला देश व संस्कृती संबंधीच्या विचारांची मांडणी मला योग्य वाटली.
ReplyDeleteBest of the lot!
ReplyDeleteMusings in last para lift up the chronicling detailed earlier.