जीवाचं सिंगापूर: वनपर्व २
मी एका लाकडी पुलावर उभा राहून आ वासून इकडेतिकडे पाहत होतो.
झूमध्ये प्रवेश केल्यानंतर डावीकडे मला हा ‘Treetops Trail’ नावाचा विभाग लागला होता. खूप उंच खांबांनी आधार दिलेला एक लाकडी पूल महाकाय झाडांच्या एका दाट जंगलाच्या मधून जात होता. त्या झाडीच्या पलीकडे कितीही पाहायचा प्रयत्न केला तरी दुसरं कुंपण दिसत नव्हतं. मी नंतर वाचलेल्या माहितीतून मला असं कळलं की एका ओढ्याएवढ्या मोठ्या खंदकाच्या पलीकडे असलेल्या त्या सगळ्या भागात प्रामुख्याने ‘siamang’ जातीच्या माकडांचं साम्राज्य होतं. ‘Open Enclosure’ या प्रकाराचा खरा अर्थ आता कुठे माझ्या लक्षात येत होता. मी आणि माझ्या आजूबाजूचे काही लोक तेव्हा या माकडांच्या जगातले पाहुणे होतो. त्या पुलावरूनच आम्ही तो अजस्त्र खंदक ओलांडून पलीकडे गेलो तेव्हा त्या खंदकात मला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मासे इकडेतिकडे सळसळताना दिसले. नीट पाहायचा प्रयत्न केल्यावर एक मगरही दिसली. त्यावरून मला उगीचच लहानपणी वाचलेल्या पंचतंत्रातल्या मगर आणि माकडांच्या गोष्टी आठवल्या. त्या सगळ्या गोष्टींचा आशय, स्वतःच्या बेटावर अगदी आरामात राहणाऱ्या माकडांना फसवून पाण्यात आणण्यासाठी मगर युक्त्या करणार आणि माकड तिला पुरून उरणार असा असायचा. त्यापैकी ‘माकडाचे काळीज’ ही गोष्ट सुप्रसिद्ध होती. आता इथे झू आणि त्या बेटाच्या सीमेवरच्या खंदकात ही मगर काय करत होती ते मला कळेना. मी असा तर्क केला की सगळे खंदक कदाचित जोडलेले असतील आणि ही मगर फिरायला इथे आली असेल; आणि मग माझा तर्क तपासून पाहण्यासाठी नकाशाकडे नजर टाकली. पण तसं काही नव्हतं. तो खंदक हा त्या ‘False Gharial’ जातीच्या मगरीचा habitat होता. आणि एकूणच सिंगापूरच्या झूमध्ये प्राण्यांना खूप स्वातंत्र्य असलं तरी त्यांनी असं कुठल्याही प्राण्याला, विशेषतः मगरीसारख्या, असं स्वतःहून कुठेही फिरता येऊ देणं शक्यच नव्हतं. पण परवाच मी एक बातमी वाचली की सध्या कोरोनामुळे झू तसा बंदच असल्यामुळे मध्यंतरी त्यांनी त्यांच्या आफ्रिकन पेंग्विन्सना झू फिरून यायला सोडलं होतं. तो पेंग्विन्सचा घोळका मग ओरांगउटानसोबत काही इतर प्राण्यांना भेटून आणि जलाशयाच्या काठावर फिरून मग आपल्या habitat मध्ये परत गेला.
त्या पुलावरून फिरताना सगळा वेळ पलीकडच्या दाट झाडीच्या आतून त्या माकडांच्या आरोळ्या ऐकू येत होत्या. सर्वांत पुढच्या काही उंच झाडांच्या सगळ्यात वरच्या फांद्यांवर काही माकडं लोंबकळताना, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारताना दिसत होती. त्या झाडांची उंची आणि त्या माकडांचं त्यांच्यामधून फिरण्याचं कौशल्य पाहता त्यांना अगदी सहज एका उडीत हा पूल गाठता आला असता असं मला वाटलं. पण एवढा सुंदर जंगलाचा तुकडा आपल्याच मालकीचा असताना उगीच माणसांमध्ये कडमडायला ते कशाला येतील? पण यावर थोडा अजून विचार केल्यावर मला असं जाणवलं, की तितक्या उंचावरून उडी मारून जरी त्यांना मधला खंदक ओलांडता आला असता तरी पुलावरून परत उलटी उडी मारणं कठीण होतं. आणि शेवटी आपलेच पूर्वज ते! त्यांना हे नक्कीच माहित असणार. Treetops Trail च्या त्या लाकडी पुलाच्या दुसऱ्या टोकाजवळच्या एका खांबावर मात्र एक माकड बसलेलं होतं. खूपसे लोक त्याच्यापासून पाच फुटांचं अंतर ठेवून घोळका करून उभे होते आणि फोटो काढत होते. त्याच्याकडे बघून ते तिथे स्वतःहूनच आलं होतं असं वाटत होतं. कदाचित त्याच्या रोजच्या दिनक्रमातून जरा ब्रेक म्हणून ते, त्याला नुसतं नाक खाजवताना पाहतानाही खूपच उत्तेजित होणाऱ्या निरागस वंशजांना पाहायला आलं असावं. त्याच्या एकूण आविर्भावाकडे पाहून मला असं वाटून गेलं की आपल्या सगळ्यांचं जाऊ दे, पण किमान रेड कार्पेटवरच्या लोकांच्या पूर्वजांबद्दल तरी काही शंका उरलेली नसावी.
पुढच्या चौकात ‘Rainforest Walk’ सुरु होत होता. त्या पायवाटेवर अनेक खांबांवरून बसवलेल्या कौलारू छपराची सावली होती. तिच्या उजव्या बाजूला एका ठिकाणी एक गर्द झाडांनी वेढलेला भाग पिकनिक स्पॉट म्हणून राखीव होता, आणि त्याच्या आसपास अर्थातच कुठल्याही प्राण्याचं habitat नव्हतं. तिथेच मला एक खास exhibit म्हणून ठेवलेली एक आदिमानवाच्या गुहा दिसली; ती आपल्या हत्तीचे पूर्वज असलेल्या ‘मॅमॉथ’ नावाच्या महाकाय हत्तीच्या हाडांपासून बनवलेली होती. थोडं पुढे चालत गेल्यावर मला डावीकडे माकडांच्या मालकीचं आणखी एक बेट दिसलं, फक्त हे आधीच्या बेटापेक्षा थोडं लहान असल्याने त्याचा पलीकडचा किनाराही दिसू शकत होता. इथला खंदक या बेटाला चहूबाजूंनी वेढणारा होता आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला पुन्हा खूप दाट जंगल होतं. नकाशात बघितल्यावर मला कळलं की त्या जंगलात कुठेतरी कसलंतरी कुंपण असावं, कारण त्याच जंगलाच्या दुसऱ्या टोकाला त्या प्रसिद्ध बंगाली वाघांचं घर होतं. त्या बेटावर ‘Gibbon’ आणि ‘Red-ruffed Lemur’ या जातीची माकडं होती, पण त्यांच्या ‘Siamang’ भाऊबंदांपेक्षा हे कमी उत्साहात दिसत होते. कदाचित त्यांचा स्वभावच तसा असेल. त्या बेटावरच्या काही उंच झाडांच्या गर्दीत त्यांची घरटी होती. त्या खंदकाच्या आणि या पायवाटेच्या मध्ये दाट झुडुपांचं कुंपण होतं. त्याच्या अगदी जवळून चालत जात असल्यामुळे मला मध्येच अचानक एका फटीतून एक अद्भुत दृश्य दिसलं. कुंपणाच्या पलीकडच्या किनाऱ्यावर दोन पांढरेशुभ्र राजहंस मजेत पहुडलेले होते. त्या सुंदर पक्ष्यांना पाहून मी इतका भारावून गेलो की बराच वेळ मला फोटो काढायचं सुचलंच नाही. नकाशात तरी त्या खंदकात राजहंस असल्याचा काही उल्लेख नव्हता, पण त्यातल्याच एका छोट्याशा बेटावर ‘पेलिकन’ पक्ष्याचं चित्र होतं. मी परत त्या जोडप्याकडे नीट पाहिलं आणि ते पेलिकन होते का ते ओळखण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात त्यांच्यापैकी एकाने त्याची गोंडस मान उचलून माझ्याकडे मी त्याची झोपमोड करत असल्यासारखं पाहिलं. तेव्हा मी घाईघाईने तिथून काढता पाय घेतला. ते कोडं मला अजूनही उलगडलेलं नाहीये.
या सगळ्या विभागाला ‘प्रायमेट किंगडम’ (अर्थात वानरांचं राज्य) असं नाव होतं. त्या ‘Rainforest Walk’ मधून चालत चालत मी मुख्य रस्त्याला लागलो होतो, त्याच्यावरून झूच्या ट्रॅम्स सतत फेऱ्या मारत असतात. त्या रस्त्याच्या डाव्या बाजूला माकडांच्या मालकीचं तिसरं बेट, अर्थात ‘ओरांगउटान आयलंड’ होतं. उजव्या बाजूला झूमधलं मुख्य हॉटेल, ‘आह मेंग बिस्त्रो’ होतं. त्याचं हे नाव झूच्या सुप्रसिद्ध ‘आह मेंग’ नावाच्या ओरांगउटान माकडिणीच्या सन्मानार्थ दिलेलं होतं हे माझ्या आधीच लक्षात आलेलं होतं. फक्त एक महत्त्वाचा तपशील मात्र मी विसरलेलो होतो. त्या हॉटेलच्या दारावरची पाटी वाचून मला तिचं निधन झालेलं असून, हे नाव तिच्या स्मृतीला वंदन म्हणून देण्यात आलेलं होतं असं कळलं. त्यापेक्षा जास्त वाईट मला हे कळल्यावर वाटलं, की तिचं निधन २००८ सालीच झालेलं होतं. म्हणजे मी तिला मुळात कधी बघितलेलंच नव्हतं, आणि दहा वर्षांपूर्वीची ती आठवण तिला बघितल्याची नसून ही पाटी वाचल्याची होती. मी मग तिथल्या एका टीव्हीवर चालू असलेली तिची जीवनगाथा पाहिली. मूळची सुमात्राची असलेली ही ओरांगउटान एका तस्कराने इंडोनेशियातून पळवून आणली होती आणि एक बेकायदेशीर पाळीव प्राणी म्हणून विकली होती. १९७१ साली ती अकरा वर्षांची असताना एका प्राण्यांच्या डॉक्टरने तिची सुटका करून तिला या झूचे मालक असलेल्या ‘Wildlife Reserves Singapore Group’ या संस्थेकडे सोपवलं होतं. १९७३ मध्ये हा झू उघडल्यापासून ती त्याचा एक अविभाज्य भागच होती, आणि पुढची अनेक वर्षे इथलं प्रमुख आकर्षणही. वयाच्या ४८व्या वर्षी तिचं निधन झालं तेव्हा सिंगापूर झूच्या ओरांगउटान आयलंडवर तिचा अवाढव्य वंशवृक्ष बहरलेला होता. त्या लहानशा चित्रपटाच्या शेवटी जेव्हा ‘त्या मातेला सलाम’ अशी अक्षरं स्क्रीनवर उमटली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मग तिथून ‘फ्रोझन टुंड्रा’ विभाग जवळच असल्याचं पाहून मी माझ्या त्या पोलर अस्वलाला पाहायला पळतच गेलो. पण तिथे गेल्यावर २०१८ मध्ये तेही गेल्याचं वाचायला मिळालं. त्याच्या स्मृतिप्रीत्यार्थ तो विभाग बंद होता आणि जवळच्याच एका कॅफेला त्याचं ‘इनुका’ हे नाव देण्यात आलेलं होतं. मला पुन्हा उदास वाटायला लागलं. अनेक वेगवेगळ्या प्राण्यांचं आयुर्मान वेगळं असतं हे माहित होतं पण ते पहिल्यांदाच असं अंगावर येत होतं. अचानक मला माझी दहा वर्षांपूर्वी पाहिलेले तेच सगळे प्राणी पुन्हा पाहण्याची अपेक्षा जरा बालिशच वाटायला लागली, पण हा विचार मला आधी न सुचल्याचं कारणही कळत होतं. मी कधीच कुठलाही प्राणी पाळला नव्हता, त्यामुळे माझ्या सबंध लहानपणात माझ्या मनात घर करणारे हेच ते प्राणी होते; त्यामुळे त्यांना अचानक असं गमावल्यावर मला, हॅरी पॉटरच्या सातव्या भागात हॅरीची सात वर्षांपासूनची जिवाभावाची सोबतीण असलेली हेडविग घुबडीण जाते तेव्हा त्याला काय वाटलं असावं ते थोडंफार कळू शकत होतं.
पावणेअकरा वाजत आले होते आणि प्रायमेट किंगडममध्ये फिरताफिरता वेळेचं भान न राहिल्याने साडेदहाला असलेला माझा सील माशाचा शो बुडला होता. पण फार उशीर झाला नसेल असं वाटून मी उरलेला शो पाहूया म्हणून त्या अँफिथिएटरकडे निघालो. चालताना मनात उगीचच त्या सीलला काही झालेलं नसेल ना असे विचार डोक्यात येत होते, पण या झूच्या एकूण स्वभावाला अनुसरून जर काही झालं असतंच तर त्यांनी हा शो ठेवलाच नसता हे स्वतःलाच सांगून मी धीर देत होतो. एखादा प्राणी गेल्यावर निर्विकारपणे त्याला रिप्लेस करणारे हे नाहीत याबाबत तर काही शंका असूच शकत नव्हती. तिथे पोचल्यावर मला त्या सीलला त्याच अजस्त्र टँकच्या पाण्यात दंगा करताना पाहून बरं वाटलं. या अँफिथिएटरमध्येही कालच्या त्या ‘वॉटरवर्ल्ड’च्या शोमध्ये होते तसे ‘कलर-कोड’ असलेले बाक होते, त्यावरून या शोमध्येही पुष्कळ पाणी उडत असणार हे सहजच कळत होतं. पण आता ते सगळे जवळपास रिकामे झालेले होते. शो नुकताच संपला होता आणि हा सील मासा टँकच्या काठावर मोठ्या रुबाबात त्याच्या पंज्यांच्या आधारे उभा राहून पोझ देत होता आणि लोक त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी रांग लावत होते. हे सगळं त्या माशाच्या मर्जीनुसारच होत असल्याचं माझ्या लवकरच लक्षात आलं. मध्येच तो कंटाळून पुन्हा पाण्यात जाऊन बसायचा. त्याला पुन्हा पोझ द्यायला लावण्यासाठी त्याच्या ट्रेनरने त्याला काही मांसाच्या तुकड्यांची लालूच दाखवण्यापलीकडे काहीही केलं नाही. तसंही हे काही त्याचं जेवण नसल्यामुळे ते घ्यायचं का नाही ते तो ठरवत होता. रांगेतले लोकही फार कुरकुर न करता तो पुन्हा फोटोसाठी तयार होण्याची वाट बघत होते. हे सगळं प्राण्यांना ‘योग्य तो मान’ देण्याच्या परिभाषेत चपखल बसत होतं. मलाही फोटो काढावासा वाटला, पण रांगेत वेळ लागणार होताच आणि साडेअकरा वाजता शेजारीच हत्तींचा शो होता. त्यामुळे मी त्या सील माशाकडे पाहून हळूच हात हलवला आणि त्या अँफिथिएटरच्या बाहेर पडलो.
या अँफिथिएटरच्या विरुद्ध बाजूला पुन्हा खूप दाट झाडी सुरु होत होती, आणि तिच्या मधून एक बांबूची पायवाट खोलवर आत घेऊन जात होती. त्या पायवाटेने चालत जाताना आपल्याला आपण एका मोठ्या शहरात आहोत हे तर सोडाच, पण आजूबाजूला मानवनिर्मित झू आहे हेही विसरायला होऊ शकतं. Secluded या शब्दाचा अर्थ तेव्हा अचानक मला व्यवस्थित कळून चुकला. थोड्या वेळाने मी त्या सगळ्या झाडांनी वेढलेल्या एका मोकळ्या जागेत पोहोचलो. तिथे पायवाटेला लागून सहा मोठ्या बांबूच्या उघड्या झोपड्या होत्या आणि त्यांच्यावर नारळीच्या वाळलेल्या लांबलचक पानांचं छत बसवलेलं होतं. तसंच त्यांच्यामधून काही छत नसलेल्या बसण्याच्या जागाही होत्या. मी पोचेपर्यंत सगळ्या झोपड्या भरून गेलेल्या होत्या आणि मधल्या उघड्यावरच्या बसण्याच्या जागाही हळूहळू भरत चालल्या होत्या. झोपड्या आधी का भरल्या असाव्यात या प्रश्नाचं उत्तर नुसतं सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट नव्हे, तर खुद्द ‘सूर्यप्रकाश’ हेच होतं. गेली काही मिनिटं झाडांच्या सावलीतून चालत आल्यामुळे इथे उघड्यावर आल्यावरच दुपारच्या उन्हाची तीव्रता ठळकपणे जाणवायला लागली होती. ती उष्णता एवढी दाहक होती की उघड्यावर बसलेले लोक टोप्या, रुमाल, हाताचे पंखे आणि अगदी छत्र्या असूनही घामाने चिंब झालेले होते, पण कोणी आपली जागा सोडायला अजिबात तयार नव्हता. मी जरा सगळीकडे पाहून पटकन विचार केला, आणि तिथे वितळत बसून राहण्यापेक्षा जरा लांब जाऊन कठड्याला टेकून उभं राहणं परवडलं असं ठरवलं. तिथूनही मला व्यवस्थित सगळं पाहता येत होतं.
या सगळ्या झोपड्या पुन्हा एका मोठ्या जलाशयाच्या काठावर होत्या, ज्याच्या पलीकडे हत्ती राहत होते. काही वेळाने त्यांच्यापैकी दोघीजणी बाहेर आल्या. त्यांच्या जेवणाची वेळच ती होती. पलीकडच्या किनाऱ्यावर खूप केळी ठेवलेली होती. त्या हत्तिणींनी आधी त्यांच्याकडेच मोर्चा वळवला, आणि त्यांचं ते खाऊन होईपर्यंत जमलेल्या सगळ्यांना त्या दोघींची नावं सांगून त्यांची थोडीफार माहिती सांगितली. त्या हत्तींच्या कुटुंबाबद्दल, त्यांच्या आहाराबद्दल आणि या संस्थेने त्यांच्या संवर्धनासाठी पुनरुत्पादनाचे कोणतेकोणते उपक्रम राबवले आहेत हे सगळं त्यात सविस्तर सांगितलं गेलं. तोपर्यंत त्या दोघींचं मधल्या झोपडीत ठेवलेल्या फळांच्या मोठ्या टोपल्यांकडे लक्ष गेलं होतं. मग त्यांच्या ट्रेनरने (खरं तर त्यांना हत्तींमध्ये specialize केलेले प्राणीशास्त्रज्ञच म्हणावं लागेल) त्यांना पाण्यातून झोपडीकडे यायला सांगितलं, आणि जेवण झाल्यावर एकदा पाण्यात मनसोक्त लोळून घ्यायला त्यांना फार आवडतं हे आम्हाला सांगितलं. त्या हत्तिणी पाण्यात जरा वेळ दंगा केल्यानंतर झोपडीजवळ येऊन थांबल्या, आणि त्या ट्रेनर्सनी आणि काही उत्साही लोकांनी त्यांना ती फळं देऊ केली. लोक जरा भीतभीतच त्यांच्यापुढे ती फळं धरत होते; त्यामुळे बहुतेकवेळा त्यांनाच पुढाकार घेऊन ते फळ सोंडेने उचलून तोंडात घालावं लागत होतं. हा कार्यक्रम झाल्यावर त्या तशाच मागे जाऊन त्यांच्या झाडीत परत गेल्या. त्यांच्यावरून फेरी मारण्यासारखा कसलाही प्रकार तिथे असण्याचा काही प्रश्नच उद्भवत नव्हता.
तिथून बाहेर आल्यावर मी भूक लागलेली असल्यामुळे थेट त्या बिस्त्रोकडे जाऊन जेवून घेतलं. तोपर्यंत पायांची अजिबातच फिकीर न करता चालत असल्यामुळे आता ते जरा आवाज उठवायला लागले होते. ॲटलास स्टेशनला पोचेपर्यंत पुष्कळ चालावं लागेल याची कल्पना असल्यामुळे मी झूमधून एक पूर्ण चक्कर मारण्याच्या बेतावर फेरविचार केला. तसंही मागच्या वेळच्या अनुभवातला ट्रॅम हा प्रकार राहिलाच होता म्हणून मी तिच्यात बसून उरलेली सफर करायचं ठरवलं. बिस्त्रोच्या बाहेरच त्या ट्रॅमचं एक स्टेशन होतं. पूर्णपणे उघड्या, नुसते आडवे बाक बसवलेल्या त्या तीन-तीन डब्यांच्या ट्रॅम्स अतिशय हळू जात होत्या. इतक्या, की मध्येच चालू ट्रॅममधून उतरणंही शक्य होतं. अर्थात तसं करायला बंदी होती म्हणा. ट्रॅमने मी झूच्या पश्चिम भागातून फिरत राहिलो, आणि वाटेत मला काही झेब्रा, काही पांढरे गेंडे, काही जिराफ आणि एक सिंहीण असं सगळं दिसलं. सिंहीण अगदीच ओझरती, खूप अंतरावर दिसली पण तरी ट्रॅममधल्या सगळ्या जास्त आरोळ्या तिच्याच वाट्याला आल्या. पुढच्या एका स्टॉपवर ‘Fragile Forest’ हे नाव वाचून मी उतरलो. तिथे मला पूर्वी गेल्याचं आठवत नव्हतं. तो विभाग माझ्या सबंध दिवसाचा हायलाईट ठरणार होता.
हा विभाग नावाप्रमाणेच उघड्यावर वसवलेला नसून एका किमान दुमजली उंचीच्या अजस्त्र जाळीच्या तंबूच्या आत होता. यामध्ये माझा परिचय या ग्रहावरच्या काही अत्यंत नाजूक ecosystems शी होणार होता. त्या तंबूच्या आत असा एक ठरलेला रस्ता नव्हताच, उलट जाळीच्या पडद्यांनी वेगळे केलेले विभाग होते आणि त्यांच्यामधून एक अरुंद पायवाट तेवढी जात होती. तिच्या आजूबाजूला खूप वेगवेगळ्या अजब प्रकारच्या वनस्पती होत्या. त्यांनी ते कसं जमवलं होतं कोण जाणे, पण त्या तंबूच्या आतल्या वातावरणात एक अत्यंत नैसर्गिक आणि सुखावह गारवा होता, जो एसीने कधीच आणता आला नसता. पण या विभागाची खासियत ही होती की इथले सगळे प्राणी अगदी बिनधास्त कुठेही फिरत होते, अगदी पायवाटांवरही येत होते. इथे एकही भक्षक जनावर नसल्याने हे असावं. काही झाडांच्या गर्दीत काही छोटी हरणं लपलेली होती, तर दुसरीकडे मी यापूर्वी कधीच न पाहिलेले काही मोरांचे मावसभाऊ वाटावेत असे वेगळ्याच निळ्या रंगाचे गुबगुबीत पक्षी फिरत होते. मी त्या पायवाटेने जात असताना एक एकदम माझ्या पायापाशी आला. सिंगापूर झूच्या मानानेही एखादा प्राणी इतका जवळ आल्याचं पहिल्यांदाच घडत होतं, त्यामुळे मी जरा बिचकलो, पण त्याने माझ्या अस्तित्त्वाची फारशी काहीच दखल घेतली नाही. त्याच्या पलीकडच्या विभागात खूपशी वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं सगळीकडे भिरभिरत होती. त्या पायवाटेला पुढे चढ लागला तेव्हा जरा उंचावर गेल्यावर एका मोठ्या झाडाच्या फांदीवर काही वटवाघुळं उलटी लटकून शांतपणे झोपलेली होती, आणि ती झोपलेली असूनही लोक त्यांच्याजवळ फार वेळ घुटमळत नव्हते हे सांगणे नलगे. या ‘Fragile Forest’च्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या पाटीवरच्या माहितीत या ecosystems ना जपण्याचे कुठेकुठे असेच प्रयत्न चालू आहेत आणि त्याची कशी गरज आहे असं सगळं सांगितलेलं होतं. आपल्या असंख्य उपद्व्यापांमुळे आपण अजाणतेपणी कुठेकुठे हात घालून आत्तापर्यंत कायकाय उजाडून ठेवलं आहे, ते समजून दुःख वाटावं, का याची जाणीव आता आपल्याला होत असल्याचं पाहून हुरूप यावा ते मला कळेना. त्या विभागातून बाहेर पडून ट्रॅममध्ये बसताना मला असं वाटलं, की दोन्ही भावना, जर एकीचाही अतिरेक नाही केला तर, आपल्या जागी योग्य आहेत. मला वाटतं की आपल्या झू, गार्डन्स बाय द बे आणि अशा अनेक उपक्रमांतून सिंगापूर हेच सांगण्याचा प्रयत्न करतंय की पर्यावरणाच्या बाबतीत बोलायचं तर टोकाचा निराशावाद आणि टोकाचा आशावाद यांच्या मध्यभागी सत्य दडलेलं आहे, आणि आपल्या तथाकथित हुशारीचा सर्वांत चांगला उपयोग तिथेच होऊ शकतो.
सिंगापूर झू ही माझ्या आधीच्या आणि आत्ताच्या ट्रिपमधली कॉमन अशी एकच गोष्ट होती, पण आत्तापर्यंतचा सगळा अनुभव अगदीच वेगळा होता असं वाटत होतं, पण ठळकपणे जर कशात बदल झाला असेलच तर तो माझ्यातच होता. माझ्या इथल्या दिवसाची सांगता मी माझ्या लेखी झूमधल्या सगळ्यात रुबाबदार प्राण्यांना, म्हणजेच त्या पांढऱ्या बंगाली वाघांना भेटून केली. तिथेही माझ्या आठवणीतले तीन वाघ नसून दोन वेगळेच वाघ होते. पण ते आधीचे गेलेले नसावेत, नाहीतर ते नक्कीच सांगितलं गेलं असतं. मागे नजर टाकल्यावर मला असं कळलं की तो सील मासा सोडता माझ्या मागच्या वेळी लक्षात राहिलेले कुठलेच प्राणी आता इथे नव्हते; पण कदाचित त्यामुळेच मी या सगळ्याकडे त्याच दहा वर्षांच्या रोमांचित मुलाच्या नजरेतून न पाहता एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकलो असेन. या दोन ट्रिप्समध्ये अर्थातच खूप फरक होते, त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा अर्थातच मी यावेळी एकट्याने सगळं करत असल्याचा होता. पण माझ्या आठवणीतल्या प्राण्यांच्या अनुपस्थितीमुळेच मला पहिल्यांदाच आधीच्या ट्रिपला दहा वर्षं होऊन गेल्याचं प्रकर्षाने जाणवलं होतं, आणि एकूणच कुठल्याही गोष्टीकडे तिची कसलाही विचार न करता फक्त मजा लुटण्याचा काळ केव्हाच मागे गेल्याचंही लक्षात आलं होतं. झूमधून बाहेर पडतापडता मला असा प्रश्न पडला, की पुढच्या वेळी मी या झूला भेट देईन तेव्हा आत्तापेक्षा कायकाय बदललेलं असेल?
अशा प्रकारे सिंगापूरमधला माझा तिसरा दिवस मी काही विलक्षण अनुभव घेत आणि डोक्याला पुष्कळ खाद्य देत घालवून पुन्हा काचेच्या सुळक्यांनी नटलेल्या माझ्या जंगलाकडे परत निघालो.
वर्णन क्रमाने,उत्सुकता वाढवणारे,नेमके शब्द वापरून झालेले आहे.उपमा तर मस्त आहेत.
ReplyDelete