जीवाचं सिंगापूर: वाटिकापर्व
सकाळी मला जाग आली तेव्हाच माझ्या एकदम लक्षात आलं की सिंगापूरमधली ती माझी शेवटची सकाळ होती.
या साक्षात्कारानंतर खूप गोष्टी एकदम लक्षात आल्या. माझी कालची रात्र या हॉटेलमधली शेवटची होती. माझ्या पॉडमधली माझी शेवटची झोप होती का नाही ते मला तेव्हा ठरवता आलं नसतं. पण माझा शेवटचा ब्रेकफास्ट, शेवटची आंघोळ, आणि अचानक हा विचार मला जास्त टोचला की या हॉटेलच्या ‘मावशींना’ भेटण्याचीही ही शेवटची वेळ, कारण त्या सकाळीच भेटायच्या. संध्याकाळी दमून भागून हॉटेलवर परत यायचो तेव्हा तिथे एक तरुण मुलगी बसलेली असायची. हे हॉटेल हा एक कौटुंबिक व्यवसाय असावा असा तर्क मी आधीच केलेला होता. पहिल्या दिवसानंतर मला आत घेणाऱ्या त्या आजोबांनाही मी पाहिलेलं नव्हतं.
सगळं आवरून मी खाली गेलो तेव्हा सगळं माझ्या अपेक्षेप्रमाणेच होतं: सकाळचे कोवळे सूर्यकिरण हॉटेलच्या काचेच्या दारामधून आत येऊन खोलीत पसरलेले होते. काउंटरशेजारच्या टेबलावर पुन्हा ब्रेड, जॅम, अंडी आणि त्याच चवदार नूडल्स ठेवलेल्या होत्या. माझं ‘गुड मॉर्निंग’ म्हणून स्वागत करून मावशींनी आपला मोर्चा पुन्हा शेजारच्या टेबलाशी बसलेल्या त्या चार तरुण आशियन मुलांकडे वळवला होता; ते आजही कुठल्यातरी पदार्थावरून उत्साहाने चर्चा करत होते आणि मावशी मध्येमध्ये सल्ले देत होत्या. मी माझ्या नेहमीच्या टेबलापाशी बसताच माझ्या समोर बसणाऱ्या त्या अमेरिकन माणसाने माझ्याकडे पाहून पुन्हा स्मितहास्य केलं. मीही हसून माझी कॉफी आणि नूडल्सची ताटली घेऊन बसलो आणि वीसेक मिनिटानंतर मावशींकडे पाहून हात हलवत बाहेर पडलो.
मला नुकतंच जे घडलं होतं त्याची, आणि विशेषतः त्याकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टीकोनाची खूपच गंमत वाटत होती. मी गेल्या अर्ध्या तासात अनुभवलेल्या सगळ्या गोष्टींना त्याआधी मोजून दोनदा घडताना पाहिलेलं होतं. संख्याशास्त्राच्या दृष्टीने त्या सकाळी मी त्यापैकी एकही गोष्ट घडण्याची अपेक्षा करणं म्हणजे पापच होतं. आपल्याला कुठल्याही गोष्टीची सवय इतक्या सहजपणे कशी होऊ शकते याचंच मला आश्चर्य वाटत होतं. ‘सवय’ या संकल्पनेचा तर्कशास्त्रात अभ्यास करताना मी शिकलो होतो की एखादी गोष्ट आपण काही ठराविक वेळा एका प्रकारे केली अथवा अनुभवली की मग त्याची सवय होते ही समजूत चुकीची आहे. त्याउलट, माणूस म्हणून आपली रचनाच अशी आहे की आपण शक्य तिथे पॅटर्न शोधायचा प्रयत्न करतो. त्यामुळे एखादी गोष्ट आपण एकदा अनुभवली की लगेच तिच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आपण नकळत केलेली असते, आणि ती नाही पुन्हा घडली तर आपण ते विसरूनही जातो, पण जर ती पुन्हा घडत राहिली तर पुढच्या प्रत्येक वेळी आपण आपली अपेक्षा योग्यच असल्याचं स्वतःला पटवत राहतो. तर्कशास्त्रातल्या अनेक थिअरीजप्रमाणेच कार्ल पॉपरच्या या थिअरीवरही अनेक मतांतरे आहेत, आणि व्यक्तिशः मला तरी त्याचा हा विचार तोपर्यंत पूर्णपणे पटलेला नव्हता. पण त्या दिवशी सकाळी हॉटेलमधल्या माझ्या अनुभवावरून खरंच कशाचीतरी अपेक्षा करायला आपल्याला किती कमी अनुभव लागतो ते समजलं होतं. या सगळ्या गोष्टींवर विचार करत मी तितक्याच सवयीच्या झालेल्या वाटेवरून चालत सिटी स्क्वेअर मॉलच्या दिशेने निघालो.
माझ्या ट्रिपच्या शेवटच्या दिवशी मी ‘गार्डन्स बाय द बे’ बघायला चाललो होतो. एका अर्थी एक भलीमोठी बागच ती, पण तिला फक्त बाग म्हटलं तर आपल्या परिचयाच्या सगळ्या बागा त्यांना एकदम तिच्या पातळीवर नेऊन ठेवल्यामुळे लाजून चूर होतील. सिंगापूरच्या या हौशी प्रकल्पाबद्दल मी खूप ऐकलं होतं; विशेषतः माझ्या एका जवळच्या मैत्रिणीने ‘ते पाहिल्याशिवाय परत येऊच नकोस’ असं बजावलं होतं. मला जेवढी माहिती होती त्यानुसार तिथे विविध प्रकारच्या दुर्मिळ आणि कुतूहलजनक वनस्पतींचं घर होतं. आणि सिंगापूरला ओळखत असल्यामुळे त्यांनी काही त्यासाठी दोन हरितगृहं ताब्यात घेऊन तिथे कुंड्यांमध्ये रोपटी लावली नसतील हे तर उघडच होतं. त्यांनी नक्कीच काहीतरी दणदणीत घडवलेलं असणार. माझ्या एकूण सगळ्या ट्रिप्समुळे माझं मानवनिर्मित आकर्षणांइतकंच नैसर्गिक गोष्टींवर आणि स्थळांवर प्रेम होतं हे लक्षात आलेलं होतं. कालच्या झूच्या अनुभवाने त्यावर शिक्कामोर्तबच केलं होतं जणू. त्यामुळे मला कंटाळा येणं शक्यच नाही हे मला मनापासून वाटत होतं, आणि अगदी दुपारपर्यंतचा वेळ तिथे आरामात काढता येईल अशी शक्यताही दिसत होती.
सिंगापूरला येऊन मी नुसतं ‘इमारत इमारत’ करत बसण्याऐवजी माझ्या कम्फर्ट झोनच्या जरा पलीकडे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं सिंगापूरच्या लक्षात आलं असावं. माझ्या या किंचितशा वाढलेल्या प्रगल्भतेचं बक्षीस मी मेट्रो स्टेशनला जोडलेल्या, गार्डन्सकडे घेऊन जाणाऱ्या लांबलचक भुयारी मार्गाला पार करून पुन्हा वर आलो तेव्हा डावीकडे ठेवलेलं होतं. डावीकडे रांगेने उभ्या असलेल्या काही झाडांच्या पलीकडे काही अंतरावर, सकाळच्या सौम्य उन्हात एखाद्या रत्नजडित अलंकारासारखी चकाकत ‘मरिना बे सँड्स’ उभी होती. तीन दिवसांपूर्वी त्या मोठ्या जलाशयाच्या पलीकडून तिच्याकडे पाहताना ज्या गोष्टी डोळ्यांना दिसू शकल्या नव्हत्या त्या सगळ्या आता ठळकपणे जाणवत होत्या. तिचे तीन, पत्त्याच्या एकमजली बंगल्यासारखे एकापुढे एक उभे केलेले आयताकार मनोरे, त्यांच्यावरच्या अगणित खिडक्या आणि मोजून प्रत्येक खिडकीतून डोकावणारी गुलाबी फुलांची लक्षावधी फुलझाडं हे सगळं इतक्या जवळून पाहताना कल्पनेपलीकडे सुंदर दिसत होतं. आणि त्यांच्यावर बसवलेली अजस्त्र बोट, आपण फार वेळ त्या मनोऱ्यांकडे पाहत बसू नये याची खबरदारी घेत असल्याच्या थाटात जमिनीपासून दोनशे मीटर उंच आकाशात दिमाखात पहुडलेली होती. मला अचानक आठवलं की माझ्या अगदी पहिल्यावहिल्या योजनेत ट्रिपची सांगता तिच्या त्या बोटीवर जाऊन तिथून माझ्या लाडक्या शहराकडे एक नजर टाकायची असा बेत होता. गार्डन्स पाहून झाल्यावर त्यावर विचार करण्याचं ठरवून मी मोठ्या कष्टाने तिच्यापासून दूर वळलो आणि गार्डन्सच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने चालू लागलो. गार्डन्सच्या परिसरामधून दिसणाऱ्या आकाशाचा ती एवढा अविभाज्य भाग होती की तिला विसरणं शक्यच नाही असं मला तेव्हा वाटलं, पण ती माझी समजूत चुकीची होती. गार्डन्समध्ये दहा मिनिटं काढल्यानंतर मरिना बे सँड्सच काय, पण खुद्द इमारतींचा सम्राटही सहजच माझ्या मनाच्या कुठल्यातरी अडगळीच्या कोपऱ्यात ढकलला गेला असता.
गार्डन्स बाय द बे या स्थळाचे, तिथल्या प्रेक्षणीय गोष्टींचे आणि तिथल्या वैविध्यपूर्ण वनस्पतिसृष्टीचे मी खूप वर्णन करू शकेन, पण त्याच्या वातावरणात मला जी एक विलक्षण प्रसन्नता आणि मनःशांती अनुभवता आली तिचं वर्णन करणं अवघड होईल. सगळेच अनुभव शब्दांत सांगण्यासारखे नसतात, असं या एका ठिकाणच्या बाबतीत मला अगदी प्रकर्षाने वाटलं. त्यातल्या काही ठळक गोष्टींचं वर्णन मी इथे करीनच, पण त्यापलीकडे मी आग्रहाने सांगेन की ती एक जागा प्रत्येकाने किमान एकदातरी बघावीच. पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी आपण सगळेच आपापल्या परीने खूप गोष्टी करतो. आपल्या भारताच्या पर्यटनक्षेत्राला निसर्गाने जी एक अफाट देणगी दिली आहे, तिची ज्यांना खूपच कमतरता भासते त्यांना इतर मार्गांनी लोकांना आकर्षून घ्यावं लागतं. मी दहा वर्षांपूर्वी सिंगापूर पहिल्यांदा पाहिल्यानंतर माझ्या मनात त्याची प्रतिमा आपल्या भौगोलिक कमतरता भरून काढण्यासाठी आतुरलेला देश अशीच झालेली होती, पण या ट्रिपमध्ये मला त्यामागचा सिंगापूरचा दृष्टिकोनही थोडासा समजल्यासारखा वाटला. दुबईप्रमाणेच सिंगापूरही डोक्याला पुष्कळ ताण देऊन लोकांना थक्क करतील असे अविष्कार घडवण्याचा प्रयत्न करतं, पण आपण जे नाही ते बनण्याचा प्रयत्न मात्र त्याने केलेला नाहीये. आपले झू आणि गार्डन्स हे प्रकल्प कधीच खऱ्या निसर्गाचं रूप घेऊ शकणार नाहीत याची त्याला कल्पना आहे, पण म्हणून या गोष्टी फक्त देखाव्यासाठी तयार केल्या असाव्यात असं चुकूनदेखील वाटत नाही. गार्डन्स हे तर एका पर्यटनस्थळापेक्षाही एक Biodiversity Project अधिक आहे. कदाचित यामुळेही, इथे फिरत असताना हे सगळं आपल्यासाठीच केलं आहे असा विचार मनात येण्याऐवजी, एका अद्भुत प्रकल्पाला समजून घेण्याची संधी आपल्याला देण्यात आली आहे असं आपल्याला वाटतं. हक्काच्या भावनेची जागा कृतज्ञतेची आणि नम्रतेची भावना घेते, आणि निसर्गाच्या बाबतीत हेच आपल्या लक्षात आणून द्यायची सिंगापूरची इच्छा आहे असं मला पुन्हा एकदा वाटून गेलं.
एक पर्यटनस्थळ म्हणूनही ते काही कमी नव्हतं. त्या परिसरातल्या पहिल्या बागेत गार्डन्सची प्रसिद्ध आणि जवळपास सगळ्या पत्रकांवर झळकणारी महाकाय धातूची ‘झाडं’ होती. ही झाडं म्हणजे वास्तविक झाडांच्या आकारात घडवलेले मोठाले लोखंडी मनोरे होते, ज्यांच्या पृष्ठभागावर सर्वत्र वेगवेगळ्या वनस्पती आणि वेली पसरलेल्या होत्या. त्यांना खऱ्या झाडांसारखं रूप देण्याचा इफेक्ट जमला होताच, पण त्यांच्या रचनेमागचं उद्दिष्ट ‘आपण झाड बांधू शकतो’ हे दाखवून देणं अर्थातच नव्हतं. त्यांच्या पायथ्याशी असलेल्या मोठ्या पारांवर त्यांच्या रचनेमागचं शास्त्र समजावून सांगणारे अनेक फलक बसवलेले होते. त्या संपूर्ण विभागाचं नाव ‘Supertree Grove’ असं होतं आणि त्यात अशी एकूण अठरा ‘सुपर’झाडं होती. त्यांच्यापैकी सगळ्यात मोठं ‘सुपर’झाड हे पन्नास मीटर उंचीचं असल्याचं मी वाचलं. काही अत्यंत exotic वनस्पतींसाठी विकसित केलेली ती vertical gardens तर होतीच, पण शिवाय त्यांच्यावर बसवलेल्या असंख्य PV सेल्सच्या कृपेने संपूर्ण परिसरासाठी एक महत्त्वाची ऊर्जास्रोतही होती. त्यांच्यापैकी काहींना हवेतच बांधलेल्या एका अधांतरी पुलाने जोडलेलं होतं, पण त्या पुलावर जाणं काही माझ्या तिकिटात बसत नव्हतं. त्यामुळे त्या ‘सुपर’झाडांना मनसोक्त पाहून घेतल्यानंतर मी आठ जास्तीचे डॉलर्स खर्च न करता थेट माझ्या तिकिटाला मान्य असलेल्या गोष्टींकडे निघालो. पहिला विभाग होता ‘Flower Dome’. हे तांत्रिकदृष्ट्या एक हरितगृहच म्हणावं लागेल, पण ते वसलेलं होतं एका विमानतळाला शोभेल अशा अवाढव्य आडव्या पसरलेल्या काचेच्या घुमटाखाली. सुमारे तासभर तिथल्या प्रत्येक पायवाटेवरून फिरून तिथे दिसलेल्या सगळ्या विलक्षण वनस्पतींचे आणि फुलझाडांचे मी शेकडो फोटो काढले. किती पाहू आणि किती नको अशा अवस्थेत बराच वेळ तिथे काढल्यानंतर त्याच्या शेजारच्याच, त्याच्याहून जास्त उंच आणि बाहेरून एखाद्या मोठ्या उभ्या खवल्यासारख्या दिसणाऱ्या दुसऱ्या घुमटाच्या आत गेलो.
त्याच्या आत पाऊल ठेवताक्षणीच एका अतिशय आल्हाददायक वाऱ्याच्या झुळुकेने माझं स्वागत केलं आणि एरवी उन्हाळ्यात क्षणभरच दर्शन देणाऱ्या झुळुकांप्रमाणे नुसतीच केसांमधून हात फिरवून न जाता ती माझ्या आजूबाजूला रेंगाळत राहिली. वातावरणातल्या गारव्यामुळे मला एकदोनदा हुडहुडी भरून गेली, पण ती गरम कपडे घालून दाबून न टाकता पुन्हापुन्हा अनुभवावीशी वाटत होती. तशा प्रकारची थंडी यापूर्वी फक्त पावसाळ्यात सिंहगडावर किंवा ताम्हिणी घाटात गेलेलं असताना अनुभवल्याचं मला आठवत होतं. मी समोर बघितलं. माझ्या उजवीकडे एक महाकाय टेकडीच होती; नखशिखांत हिरव्या अलंकारांनी नटलेली. तिच्या माथ्यावरून काही धबधबे खाली कोसळत होते आणि पायथ्याशी असलेल्या थंड टाईल्सवरून संथपणे वाहत तिच्याच आतमध्ये विरून जात होते. या घुमटाच्या आतल्या हवेतल्या विरळ धुक्यामुळे टेकडीचा माथा अंधुकसाच दिसू शकत होता. मी प्रवेशद्वाराशेजारच्या पाटीवर नाव वाचलं.
‘Cloud Forest’.
इथे त्यांनी पृथ्वीवरच्या रेनफॉरेस्टमधल्या अत्यंत नाजूक आणि गुंतागुंतीच्या ecosystems जपण्यासाठी तसं वातावरण उभारण्याचा प्रयत्न केला होता. या घुमटातून फिरताना, त्या टेकडीला विळखा घालणाऱ्या पायवाटेरून चढताना सगळीकडे सगळीच विलक्षण आणि कुतूहलजनक झाडं आणि वनपस्ती दिसत होते. पायवाटेला एका ठिकाणी फुटलेल्या एका अरुंद फाट्याला सगळ्या बाजूंनी दाट हिर्वळीचं आवरण होतं; तिला एक झाडीने बनलेली गुहाच म्हणणं योग्य ठरेल. तिच्या आत काही अतिशय दुर्मिळ अशा ऑर्किड फुलांची रोपटी होती. पृथ्वीवर ऑर्किड या ‘विक्षिप्त स्वभावाच्या’ फुलाच्या २७००० हून अधिक जाती असल्याची माहिती मला आधीपासून होती, पण त्यापैकी काही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येतील अशी कल्पनाही मी कधी केली नव्हती. ‘फूल’ म्हटल्यावर आपल्या मनात हमखास उमटणारी प्रतिमा पार बदलून टाकणारी ती ऑर्किड्स खूपच परग्रहावरची असल्यासारखी वाटत होती. गार्डन्समध्ये आणि विशेषतः या विभागात फिरताना तर पावलापावलावर आपण आपल्याच आईला किती कमी ओळखतो त्याची जाणीव होत होती.
टेकडीच्या (म्हणजे अर्थातच, टेकडीसारख्या आकाराच्या त्या इमारतीच्या) माथ्यावर असलेल्या प्रशस्त आवारासारख्या जागेत एका ठिकाणी कीटकभक्षी वनस्पतींचा एक छोटा विभाग होता. या वनस्पतींचं मला लहानपणी इतकं आकर्षण होतं की एकदा मला भेट म्हणून माझ्या मावशीने कीटकभक्षींच्या सगळ्या ज्ञात जातींची एक भलीमोठी यादीच करून दिली होती. तिथे त्यांनी खऱ्या वनस्पतींच्या शेजारी का कोण जाणे पण ‘लेगो’च्या छोट्या छोट्या ठोकळ्यांनी त्यांच्या हुबेहूब प्रतिकृती बनवून ठेवल्या होत्या. त्या माथ्यावरूनच एका ठिकाणी लपवलेल्या जिन्यावरून उतरून आपण इमारतीच्या आत जाऊ शकत होतो. चांगली सहामजली इमारत होती, जिच्या बाहेरच्या सगळ्या भागात वृक्षवल्ली होतीच पण आतूनही छतावर, भिंतींवर वगैरे त्यांचं साम्राज्य पसरलेलं होतं. नैसर्गिक आणि मानवी जग यांचा योग्य प्रकारे संगम घडवून आणण्याची कुवत असणाऱ्या त्या तांत्रिकदृष्ट्या पुढारलेल्या इमारतीसारख्या इमारती एक दिवस आपल्याला आपल्या शहरांमध्ये पाहायला मिळतील ही कल्पनाच खूप सुखावणारी होती. आणि मी fiction बद्दल बोलत नाहीये! थकवा दूर ठेवण्याच्या आणि मनःशांती जपण्याच्या कलेत वनस्पतींइतकं निष्णात काहीच नाही हे लक्षात आल्यामुळे आपल्या सर्वाधिक वापरातल्या इमारतींमध्ये त्यांचा कुंड्यांपेक्षा खूप वरच्या पातळीवर समावेश करण्याची आणि तो विचार मनात ठेवूनच आपल्या आधुनिक इमारती घडवण्याची लाट आता हळूहळू जगभरात पसरायला सुरुवात झालीच आहे.
या इमारतीच्या एका मजल्यावर मी जास्त वेळ रेंगाळलो. तिथे वेगळ्याच प्रकारच्या खडकांचे खूप नमुने ठेवलेले होते. त्याशिवाय तिथून बाहेर पडणाऱ्या त्या धबधब्याचं खूपच सुंदर दृश्य दिसत होतं. या इमारतीला बाहेरच्या त्या दाट झाडीपलीकडे भिंती अशा काहीच नसल्यामुळे त्या वातावरणातल्या गारव्याची तितकीच मजा इथे आतमध्येही लुटता येत होती. या वातावरणाचं तापमान रेनफॉरेस्टसारखं ठेवण्यासाठी कृत्रिमरीत्या जपलेलं होतं हे उघडच होतं, पण ही सगळी झाडीही त्याला मोलाचा हातभार लावत होती हेही सहजपणे कळू शकत होतं.
इमारतीच्या तळघरात सगळ्या जमलेल्यांना एक छोटासा चित्रपट दाखवला जात होता. त्याचा विषय, अपेक्षेप्रमाणेच, ‘निसर्ग आणि आपण’ हा होता. त्यात त्यांनी कुठेही भावनिक अतिरेक न करता, पण तरीही अगदी स्पष्ट आणि परखड शब्दांत सगळ्या परिस्थितीची आपल्याला कल्पना दिली होती. आपल्याकडून आत्तापर्यंत काय घडलंय, आपण ते निस्तरायला किंवा भविष्यात टाळायला कायकाय करतोय, ते कुठे अपुरं आहे आणि अजून कायकाय व्हायला हवंय हे सगळं त्यांनी व्यवस्थित, आपला interest टिकून राहील अशा प्रकारे समजावून सांगितलं. शेवटही अति आशा न दाखवता, ‘हम होंगे कामयाब’ वगैरे फालतूपणा न करता सद्यस्थितीचं एक वास्तववादी चित्र डोळ्यांपुढे आणून केला आणि आपल्या प्रत्येकाची जबाबदारी, आपला या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं ही आहे हे सांगितलं. याचा परिणाम म्हणजे त्या खोलीतून बाहेर पडल्यावर माझ्या मनात, कुठलाही पर्यावरणविषयक उपदेशपर प्रकार पाहून झाल्यानंतर असे तशी निराशा किंवा वाद घालण्याची खुमखुमी नसून खरंच शांतपणे विचार करण्याची इच्छा होती. काही गोष्टी नाट्यमय न केलेल्याच बऱ्या.
या Cloud Forest मधली पाहून घेण्याची शेवटची गोष्ट म्हणजे ‘Secret Garden’. मला जे कळलं त्यावरून असं वाटत होतं की उर्वरित गार्डन्समधल्या यच्चयावत वनस्पती अगदी सामान्य वाटाव्यात अशा काही अतिशय दुर्मिळ आणि नाजूक वनस्पती त्यांनी इथे जपलेल्या होत्या. त्या ‘Secret Garden’ मध्ये काही वेळ मनसोक्त सगळं पाहून झाल्यावर मी बाहेर पडण्यासाठी निघालो, पण त्याचबरोबर ‘Cloud Forest’ ‘संपलं’ असं जाहीर करून तिथून निघण्याची माझी इच्छाच होत नव्हती. नंतर विचार केल्यावर असं मला वाटलं, की जिथून गरज नसती तर हलावंसंच वाटलं नसतं असं, बुर्ज खलिफाच्या १२५व्या मजल्याव्यतिरिक्त, हे जगातलं मी पाहिलेलं एकमेव ठिकाण असावं.
तिथून बाहेर पडून या महाकाय घुमटाच्या शेजारून जाणाऱ्या जॉगिंग ट्रॅकला पकडून मी पुन्हा मेट्रो स्टेशनकडे जाण्याचा ‘दीर्घ’ प्रवास सुरु केला. मरिना बे सँड्सच्या बोटीवर जाऊन येण्याचा बेत माझ्या नकळतच रद्द झाला होता.
मस्त.....खूप छान बारकावे टिपले आहेस
ReplyDeleteअसाच लिहीत राहा.....