जीवाचं सिंगापूर: निरोपपर्व
मी गार्डन्सहून परत आलो तेव्हा जेवणाचीच वेळ होत होती, त्यामुळे फेरर पार्क स्टेशनमधून मी बरोबर मॉलमध्ये घेऊन जाणाऱ्या एक्झिटने बाहेर पडलो आणि माझ्या ‘नेहमीच्या’ थाई स्टॉलमधून पॅड थाई, स्प्रिंग रोल्स आणि त्यांचा तो खास आईस टी असं सगळं घेऊन पोटभर जेवलो. तिथून बाहेर पडल्यावर आता उरलेल्या दिवसभरात काय करायचं हा प्रश्न डोळ्यांपुढे नाचत होता.
मी आमच्या योजनेच्या शेवटच्या टप्प्याची मनात पुन्हा उजळणी केली. माझं विमान चांगी विमानतळावरून पहाटे चारला सुटणार होतं. वेळ अर्थातच खूप अडनिडी होती पण तिकिटं काढतानाच आमच्या लक्षात आलेलं होतं की बहुतेक सगळ्या फ्लाईट्स अशाच वेळी सुटतात. त्यामुळे तेव्हाच या परिस्थितीत काय करायचं याचा निर्णय झालेला होता. माझं हॉटेलचं बुकिंग दुसऱ्या दिवशी, म्हणजेच पंचवीस नोव्हेंबरला दुपारी संपणार होतं. एक रात्र जास्त घेण्याचा निर्णय आम्ही घेतला होता कारण बुकिंग संपण्याच्या दिवशी दुपारी चेक-आऊट करावंच लागतं. मग सगळी संध्याकाळ आणि रात्रही सगळं सामान घेऊन बाहेर कुठेतरी काढणं ही कल्पना कुणालाच फारशी आवडलेली नव्हती. म्हणून अखेर आम्ही बुकिंग पंचवीसपर्यंत वाढवून, चोवीसला रात्रीच चेक-आऊट करण्याचा निर्णय घेतला, कारण वेळेच्या आधी बाहेर पडण्याला अर्थातच परवानगी होती.
त्यानुसार असं ठरलं होतं की मी माझं त्या दिवशीचं भटकणं दुपारपर्यंत आटोपतं घ्यावं आणि संध्याकाळ सामानाची सगळी बांधाबांध करण्यात आणि पुढच्या दीर्घ प्रवासाची तयारी करण्यात घालवावी. अपरात्री चेकआऊट करून चांगी विमानतळापर्यंतचा प्रवास करणं हे मला काही झेपलं नसतं. तशी सिंगापूरसारख्या शहरात अगदी मध्यरात्रीनंतरही कुठलंही ठिकाण अगदीच ओसाड असण्याची शक्यता कमीच होती, पण माझ्या दृष्टीने जिथे सुरक्षित वाटेल एवढी वर्दळ असेल अशी एकच जागा होती; अर्थात चांगी विमानतळ. त्यामुळे रात्रीचं जेवण करून थेट निघायचं आणि दहाच्या सुमारास तिथे पोचायचं असं ठरलं. त्यानुसार मी उरलेल्या दिवसाचं गणित मांडत मॉलकडून हॉटेलकडे चालत निघालो. हॉटेलकडे अशा प्रकारे ‘परत’ जाण्याचीही ही शेवटचीच वेळ, असाही विचार मनात येऊन गेलाच.
जेवून परत हॉटेलवर आल्यावर मी आधी शहाण्यासारखी माझी सुटकेस खालच्या लॉकरमधून बाहेर काढली आणि वर माझ्या पॉडमध्ये आणून उघडली. माझ्या अंगावरच्या कपड्यांखेरीज सगळे कपडे तिथे असल्याची खात्री करून घेतली. युनिव्हर्सल स्टुडिओजच्या दिवशी पासपोर्ट बॅगेत सुरक्षित राहू शकतो याची खात्री पटल्यानंतर तो जवळ बाळगलाच नव्हता, त्यामुळे आता कपड्यांच्याच ढिगाऱ्यात, घड्यांच्या आत लपवलेल्या पाऊचमध्ये तो सुरक्षित असणारच होता. पण तरीही मी तो बाहेर काढून पाहिला, आणि विशेषतः त्याच्या आतमध्ये ठेवलेला तो अमूल्य गुलाबी कागदाचा तुकडा तिथेच असल्याची खात्री करून घेतली. एमिग्रेशन काउंटरवर तो तुकडा देऊन मगच दुसऱ्या बाजूने बाहेर पडायचं होतं. यानंतर मी ठिकठिकाणी लपवलेले पैसे बाहेर काढून मोजले. जमाखर्चाचा व्यवस्थित हिशोब मी घरी गेल्यावर निवांत करणार होतो, पण तेव्हा फक्त सगळे जागच्या जागी असल्याची खात्री करून घेतली. बाबांच्या कलीगनी दिलेल्या भेटवस्तू एकदा व्यवस्थित असल्याची खात्री केली, आणि अखेरीस प्रवासात लागेल असं काहीही सूटकेसमध्ये नसल्याचं पाहून घेतलं. प्रवासात मी तेव्हा घातलेलेच कपडे घालणार होतो त्यामुळे त्याचा काही प्रश्न नव्हता. शेवटी मी सूटकेस बंद करून तिला कुलूप लावून टाकलं. आता माझी सूटकेस थेट भारतातच उघडली जाणार होती. निघण्याची सगळी तयारी झाल्याचं स्वतःशी कबूल करून मी सूटकेस शेवटची लॉकरमध्ये ठेवून दिली आणि माझ्या पॉडमध्ये येऊन गादीवर पसरलो. उगीचच सगळीकडे नजर फिरवत, ज्या एका जागेने मला सिंगापूरमध्ये सगळ्यात सुरक्षित ठेवलं होतं तिच्या सगळ्या फीचर्सना न्याहाळत राहिलो.
माझी सिंगापूरला जायला निघण्याच्या काही तास आधी होत होती तशी तगमग पुन्हा व्हायला लागली होती. ही तगमग काही मला नवीन नाही. माझ्या मैत्रिणींच्या मते ज्या ‘अविचाराने’ मी परीक्षा सुरु व्हायच्या पुष्कळ आधीच अभ्यास उरकून घेतो त्याच्यामुळेच त्या क्षणापासून अगदी पेपर हातात येईपर्यंतचा काळ एका विलक्षण ब्लँक अवस्थेत जातो. परीक्षेची तयारी झालेली असल्यामुळे त्यात अजून करण्यासारखं काही उरलेलं नसतं, आणि परीक्षा व्हायची असल्यामुळे काहीतरी मोठं कामही हाती घेता येत नाही. त्यामुळे नुसता वेळ घालवण्यापलीकडे हातात फारसं काहीच उरत नाही. आणि नुसतं वेळ घालवणंही त्रासदायकच, कारण त्यातही नियम असतात. अत्यंत आवडीचं काही वाचायचं किंवा पाहायचं नाही, कारण मग डोक्यात तेच विचार सुरु राहण्याची भीती. सुदैवाने यावेळी मी ज्याची वाट पाहण्यात वेळ घालवत होतो त्यात अशी काही भीती नसल्यामुळे मला मनसोक्त वाचता येणार होतं. मी बरोबर आणलेलं जॉन ग्रिशमचं ‘द कन्फेशन’ उघडलं आणि वाचायला लागलो. सबंध ट्रिपभर पुरवण्यासाठी म्हणून घेतलेलं ते पुस्तक, ट्रिपच्या शेवटच्या काही तासांमध्ये आल्यावरही तीन चतुर्थांश वाचून व्हायचंच होतं, हे लक्षात आल्यावर मला सुखद धक्काच बसला.
मग साडेतीन वाजेपर्यंत मी वाचत होतो. साडेतीन वाजता अचानक आख्खी रात्र जागवायची असल्याचं लक्षात येताच जरा झोप काढूया म्हणून पडलो. माझ्या या प्रयत्नात मला एरवीही दिवसा झोपायचा प्रयत्न केल्यावर जेवढं यश येतं तेवढंच आलं. माझ्या दृष्टीने मी चांगले अडीच-तीन तास ‘सावध निद्रेत’ काढून जेव्हा उठलो तेव्हा चार वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.
आता पुन्हा काय करायचं म्हणून मी परत ते पुस्तक काढलं आणि जरा ‘हवा बदलायला’ म्हणून या पॉड्सच्या खोलीच्या पलीकडच्या, मी याआधी न पाहिलेल्या सिटिंग रूममध्ये गेलो. तिथे एका भिंतीवर मोठा टीव्ही होता आणि त्याच्या विरुद्ध भिंतीला लागून एक मोठा सोफासेट मांडून ठेवलेला होता. याशिवाय एका टेबलाशी दोन खुर्च्या होत्या, आणि भिंतीशी काटकोन करणारे काही आडवे बाक ठेवलेले होते. त्यापैकी एकावर माझी एक सह-उतरू लॅपटॉप उघडून काहीतरी करण्यात मग्न होती. तिला पाहून अचानक मला चांगीमधल्या माझ्या पहिल्या ब्रेकफास्टच्या वेळी त्या कॅफेत लॅपटॉप उघडून बसलेले ते दोन आशियन तरुण आठवले. मग माझ्या मनात आलं, काय मनःस्थितीत होतो आपण तेव्हा! तेव्हा मी शेजारचं ‘E-Gadget’ उघडेल ना आणि माझा फोन बरा होईल ना या चिंतेत होतो, तसंच ‘पुढे काय’ ही चिंताही सतावत होतीच. फोनने नंतर त्याला काही झालेलं असल्याचं जाणवूही दिलेलं नव्हतं; मला जे करायचं होतं ते सगळं करता आलेलं होतं. आणि मग एकदम माझ्या कणाकणांतून एक अत्यंत उबदार सुखाची आणि समाधानाची भावना पसरली. ट्रिप यशस्वी झालेली होती!
त्या खोलीतून पलीकडच्या लहानशा गच्चीत जाऊन पावसाला बघत उभा राहिलो तशी आणखी एक गंमत माझ्या लक्षात आली. खरंच, आमच्या मूळ योजनेपेक्षा गोष्टी किती आणि कशा बदलत गेलेल्या होत्या! मी माझ्या फोनमध्ये सिंगटेलचं कार्ड घालून दुसरा फोन फक्त अगदीच गरज पडल्यासच वापरणार होतो; प्रत्यक्षात मला दुसऱ्याच फोनमध्ये ते कार्ड घालून माझ्या फोनचं काम फक्त फोटो काढण्यापुरतंच मर्यादित करावं लागलं होतं. विमानतळावरची सगळी कामं अर्ध्या तासात उरकून मी ज्युएलमध्ये वेळ घालवणार होतो; प्रत्यक्षात या घोळामुळे कामातच तो सगळा वेळ संपून ज्युएलसाठी मला विशेष वेळ काढावा लागला होता. दुसरा फोन सगळा वेळ चालूच ठेवावा लागल्यामुळे त्याच्या चार्जिंगची मला काळजी होती, पण शेवटी झालं हेच होतं की ठिकठिकाणी वायफाय मिळाल्यामुळे त्याचा फारसा वापर झालेलाच नव्हता.
ठरवून लव्हेंडरला उतरल्यामुळे मी वाट चुकलो होतो आणि नंतर हॉटेल आणि मेट्रोला जोडणारी योग्य वाट माझी मलाच शोधावी लागली होती. योजनेप्रमाणे केबल कारने सेंटोसा बेटावर जायचं होतं पण प्रत्यक्षात मला मोनोरेलनेच जाऊन नंतर नुसतंच बेटावर फिरायला माझा तो ‘बोनस’ वापरावा लागला. पासपोर्ट सदैव गळ्यात अडकवून ठेवण्याच्या निर्णयावर घर सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो उर्वरित ट्रिपपुरता सूटकेसमध्येच राहिलेला होता; आणि मुळात ज्या कारणासाठी तो काढला त्या रोलर कोस्टर्स वर मी गेलोच नाही. झूमध्ये ज्या प्राण्यांना पाहण्यासाठी मी आतुर झालो होतो त्यांना मी पाहू शकलो नव्हतो. पहिल्या दिवशी गार्डन्सला जायचं ठरवून शेवट मरिना बे सँड्सच्या बोटीवरून करायचा असं ठरवून गेलेलो असताना, प्रत्यक्षात आधी मरलायन आणि याआधी न पाहिलेलं Financial District पाहून मग शेवटी गार्डन्सचा योग आला होता. सगळ्यात विलक्षण म्हणजे, आम्ही काळजीपूर्वक आखलेली सगळी योजना अशी दणदणीत विस्कटल्यानंतरही ट्रिपच्या शेवटी ‘खंत’ म्हणून शोधून सापडत नव्हती. सगळीच ट्रिप अगदी अविस्मरणीय आणि सर्वार्थाने तृप्त करणारी ठरलेली होती. खूप पूर्वीपासून शक्य ते सगळं प्लॅन करण्याचं मला आकर्षण फार, आणि त्यामुळेच कधीकधी गोष्टी जरा बदलायला लागल्या की घाबरायला होत असे. पण प्लॅनवर अति श्रद्धा न ठेवता, गोष्टी बदलू शकतात हे स्वीकारून त्याचीच मजा घेण्याची शिकवण या ट्रिपइतक्या चांगल्या प्रकारे दुसऱ्या कोणीही दिली नाही. त्याचसोबत, आपण डोकं शांत ठेवलं तर आपण जरा भरकटलेली गाडी पुन्हा मेनलाईनकडे वळवू शकतो असा आत्मविश्वासही तिने मला दिला.
साडेपाच वाजेपर्यंत मी त्या खोलीत बसून वाचत राहलो, मग पुन्हा एकदा थोडी झोप घेण्यासाठी पॉडमध्ये जाऊन पडलो. सुदैवाने यावेळेस ती आली आणि मी चांगला साडेसातला उठलो. आता हलायची वेळ झाली असं ठरवून मी सगळं सामान घेऊन खाली गेलो. पहिल्या दिवशी लिहिलेल्या सूचनेनुसार, मला चेकआऊट करताना माझा टॉवेल खाली किचनमधल्या एका खोक्यात ठेवायचा होता आणि माझ्या पॉडची किल्ली असलेलं कार्ड काऊंटरवर देऊन जायचं होतं. मी खाली गेलो तेव्हा तिथे ते आशियन तरुण किंवा तो अमेरिकन यांच्यापैकी कोणीच नव्हतं. काऊंटरवरही कोणीच नसल्याचं तेव्हा माझ्या लक्षात आलं, आणि काहीतरी formalities पूर्ण करायच्या असू शकतात म्हणून तिथेच बसून वाट बघत राहिलो. माझ्याशिवाय तिथे एक जोडपं टेबलाशी बसून त्यांचं चेक-इन होण्याची वाट बघत होतं. आठ वाजता ती मुलगी परत आली आणि मी उठून तिच्याकडे गेलो.
“मी आत्ता चेकआऊट करतोय, म्हणून ही किल्ली परत करायची होती,” मी म्हणालो.
तिने कॉम्प्युटरवर झटकन एक नोंद केली आणि माझ्याकडून ती किल्ली घेऊन म्हणाली, “थँक्यू, आणि इथे उतरल्याचेही आभार. पुढच्या वेळी किल्ली फक्त काऊंटरवर ठेवून गेलात तरी चालेल.”
तिने ते ‘पुढच्या वेळी’ इतक्या सहजतेने म्हटलं होतं की मला खूपच मजा वाटली. तशी वेळ येवो अशी आशा करतच मी ते काचेचं दार शेवटचं एकदा ढकललं.
मी माझी सूटकेस ओढत मॉलपर्यंत गेलो आणि त्या फूडकोर्टमधल्या माझ्या ठरलेल्या थाई स्टॉलकडे गेलो. आत्तापर्यंत तिथे काम करणाऱ्या त्या दोन बायकाही मला ओळखायला लागलेल्या होत्या. माझ्या हातातली सूटकेस पाहून त्यांनी ‘निघालात’ असं हसून विचारलं. मी ‘हो’ म्हटलं आणि त्यांना पुन्हा ‘मँगो स्टिकी राईस’ची ऑर्डर दिली. सिंगापूरमधलं माझं पाहिलं आणि शेवटचं जेवण एकच ठेवण्यात माझी काही सुप्त भावना होती की काय कोण जाणे. पण त्या बाईंनी मात्र हसणं बंद केलं.
“माफ करा, सर, पण एकच आंबा उरलाय नेमका आमच्याकडे आणि तो निघालाय आंबट,” असं म्हणून त्यांनी चक्क मला तो आणून दाखवला. त्यांना जरा जास्तच वाईट वाटलेलं दिसत होतं. मी लगेच “ठीक आहे, हरकत नाही, मग ग्रीन करीच द्या आपली,” असं म्हटलं. त्या पुन्हा हसल्या आणि दोन मिनिटांत माझ्यासमोर तोच वाफा येणाऱ्या करीचा बाऊल आणि भाताचा घुमट ठेवला. यावेळी मला त्यांना ‘चिकन’ असं सांगावं लागलेलं नव्हतं.
माझं जेवण होईपर्यंत पावणेनऊ वाजत आले होते. मी मॉलच्याच तळघरातून स्टेशनमध्ये जाण्याच्या ऐवजी बाहेर पडलो आणि मॉलच्या आवारातली ख्रिसमसची सजावट, तितकाच सजलेला आणि मघाच्या पावसामुळे ओला होऊन चमकणारा सेरांगून रोड आणि डावीकडच्या फेरर हॉटेलच्या इमारती यांना शेवटचं एकदा पाहून घेतलं आणि मग आवारातल्या एस्कलेटरने खाली गेलो. भुयारातून पुन्हा एक दीर्घ प्रवास केल्यानंतर ‘ताना मेरा’ला गाडी बदलली आणि विमानतळाकडे जाणाऱ्या खास गाडीत बसलो.
या टप्प्यावर माझ्या मनात पु.लं.च्या ‘अपूर्वाई’मधलं लंडनला उतरण्याच्या आधीच्या शेवटच्या टप्प्याचं वर्णन येऊन गेलं. वास्तविक दोन्ही गोष्टींची तुलना होऊच शकत नव्हती, आणि शिवाय माझा खरा प्रवास अजून सुरूच व्हायचा होता. पण तरी गेले चार दिवस सगळीकडे मेट्रोने फिरून झाल्यानंतर आता एकदाचं हे संपावं असं वाटत असल्यामुळेच कदाचित ही शेवटची तीन स्टेशन्स खूपच वेळ काढत असल्यासारखी वाटत होती. शेवटी माझ्या दृष्टीने बऱ्याच वेळानंतर मी जे ऐकायला उतावीळ झालो होतो ते कानावर पडलं.
“Changi Airport. Train terminates here.”
“As do a number of other things,” असं स्वतःशीच पुटपुटून मी माझी सूटकेस ओढत मेट्रोतून बाहेर पडलो.
अविस्मरणीय सिंगापूर ट्रिप!!!चे शेवटचे पर्व!👏👏👏👍👏👏👏👏👏
ReplyDeleteसोपी भाषा,क्रमबद्ध वर्णन, दिलेल्या उपमा, दरम्यान केलेला विचार सर्व,भारी