Dubai Diaries: देहावतरण
दुबई.
दुबई, दुबई, दुबई.
वाळवंटाच्या रखरखाटात उमललेल्या फुलासारखी दुबई.
काँक्रिट आणि काचेच्या बहुरंगी अलंकारांनी मढवलेली दुबई.
अरबी विश्वाचा अविभाज्य भाग असूनही स्वतःचं वेगळंच व्यक्तिमत्त्व असलेली दुबई.
अलिप्त.
समृद्ध.
शांत.
दुबई.
अशा या दुबईला भेट देण्याची माझी खूप वर्षांपासून इच्छा होती, जी आता पूर्ण झाली आहे. आणि तीही अशा तऱ्हेने पूर्ण झाली आहे की जाण्यापूर्वी मला जितक्या प्रकर्षाने जावंसं वाटायचं तितक्याच, किंबहुना जास्तच, प्रकर्षाने अजूनही वाटतं.
‘बारावी झाल्यानंतर आपण दुबईला जाऊया’ हे एक वाक्य बारावीच्या अखेरच्या काही महिन्यांत कानावर पडत होतं. तेव्हा मला ते ऐकून ‘सुधरेनासं’ वगैरे झालं नाही कारण दोन्ही विधाने सत्य असल्याचं मी फार पूर्वीपासून ओळखून होतो. पहिली गोष्ट म्हणजे बारावी एकदा सुरु झाल्यावर, सगळ्या हव्याहव्याशा गोष्टी ती संपल्यावरच करायला मिळणार हे उघडच होतं. या सगळ्या गोष्टींमुळे बारावीत खूप मेहनत घ्यायला प्रेरणा मिळाली हेही तितकंच खरं! आणि दुसऱ्या विधानाबद्दल म्हणाल तर ती गोष्ट फार पूर्वीच मनावर कोरली गेलेली होती. इतकी, की मी मोठेपणी काय करणार या प्रश्नाचं उत्तरही ‘दुबईला जाणार’ असं मी सहज देऊन मोकळा झालो असतो. ‘दुबईला जाणे’ हे माझ्या तथाकथित Bucket List मधलं पहिलं आणि एकमेव ध्येय होतं. मग आज? दुबईत मला आलेल्या अनुभवामुळे ‘जाणे’ हा वाक्प्रचार आणि त्याचा ‘एकदा जाऊन येणे’ असा सर्वसामान्यतः घेतला जाणारा अर्थ यांच्यात फरक करण्याची गरज भासू लागली आहे.
माझा काका तिथे स्थायिक झाला तेव्हा ‘दुबई’ हे पहिल्यांदा कानावर पडलं. तेव्हा लहान असल्यामुळे, ‘इतके दिवस काकाला भेटायला कल्याणीनगरला जात होतो तसे आता दुबईला जाऊ’ असं काहीतरी माझ्या डोक्यात बसलं होतं. मग ते कुठे आहे हे कळलं. तेव्हा पासपोर्ट असायचा प्रश्नच नव्हता, आणि असता तरी दुबईला जरा कळत्या वयात गेलेलं बरं असा बाबांचा आग्रह होता. तो योग्यच असल्याचं मला आता पूर्णपणे पटलंय. त्यामुळेच एरवी ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं त्यांना योग्य तो वेळ देता आला, आणि म्हणून तुलनेने कमी महत्त्वाच्या गोष्टी लवकर नजरेआड करता आल्या. याशिवाय, आलोय ते शंभर टक्के मजा करायलाच हा विचार मनात सदैव पक्का असल्यामुळे कुठेही कंटाळा किंवा कुरकुर न करता सगळं मनसोक्त अनुभवता आलं. अर्थात, हे अमान्य करून चालणार नाही की तशी कुरकुर किंवा तक्रार करण्याची दुबईने मला ना संधी दिली, ना कारण.
पण पुणे विमानतळाने मात्र उदार होऊन दिली. पु.लं.च्या ‘अपूर्वाई’ मध्ये ‘विमान म्हणजे एसटी नाही उशिरा सुटायला; सेकंदावर कामे चालतात,’ असे महाराष्ट्रातून बाहेर न गेलेली व्यक्ती म्हणते असा प्रसंग आहे. काही अर्थी हे बरोबर आहे म्हणा. एसटी सुटली की स्टँडच्या बाहेर तिला थांबवून आत चढणारा महाभाग निघतोच! विमानतळावर मात्र विमान सुटायच्या दोन तास आधी गेलंच पाहिजे असं ठरलेलं असतं. हा वेळ जास्त वाटला, तरी चढण्यापूर्वीच्या अनेक प्रक्रिया पार पाडण्यात तेवढा वेळ सहज निघतो. तसा वेळ घालवायला विमानतळावर पुष्कळ काही असतं, पण ते सगळं ‘चेक-इन’ च्या पलीकडे. म्हणून ‘चेक-इन’ च्या प्रक्रियेला तास लागेल हे गृहीत धरून त्या हिशोबाने माणसं येतात. आम्ही मात्र आमची फ्लाईट पावणेतीनची असून रात्री दहालाच घरातून निघालो, त्या वेळीही पोहोचायला एक तास पुरेल हे माहित असून.
पुणे विमानतळ सैन्याचा असल्यामुळे फोटोग्राफीला बंदी तर होतीच, पण प्रवेशाजवळही आजपर्यंत हॉलिवूड सिनेमांतच पाहिलेल्या मोठ्या बंदुका घेऊन सगळे फौजी लोक तैनात होते. आमचे तिकीट आणि पासपोर्ट सर्वप्रथम त्यांनी तपासले. तसे सोडायला आलेले लोक मुख्य लॉबीत येऊ शकतात, हे माहित असल्यामुळे त्यांनाही आत सोडत असतील असं वाटून गेलं. लॉबी म्हणजे चार खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि बसायला खुर्च्या एवढंच असलेला एक अवाढव्य कक्ष होता, ज्याच्या टोकाला ‘चेक-इन’चे सगळे काउंटर दिसत होते. आम्ही त्या खुर्च्यांमध्ये बसलो आणि बाबा सामान तपासायचं काम सुरु झालं की त्यांना उठवायला सांगून झोपले. त्याआधी त्यांनी त्यांचा हॉटस्पॉट चालू करून ठेवून माझ्यावर अनंत उपकार केले होते, जे पुढचे दहा दिवस मी फेडत बसणार होतो! तेव्हा मला माझे सवंगडी रात्री उशिरापर्यंत जागे राहत असल्याचा खूप आनंद झाला. मग चॅटिंग करताना वेळ कसा गेला कळलंच नाही. अखेर जेव्हा सामान तपासायची यंत्रं उघडली तोपर्यंत बाबांची झोप झाली होती, आमचं बोलून झालं होतं आणि आमची फ्लाईट दीड तास लेट असल्याचा मेसेजही येऊन गेला होता.
आता जो वेळ काढायचाच आहे तो इथल्यापेक्षा ‘चेक-इन’च्या पलीकडे काढू हा सुज्ञ विचार, तिथल्या खुर्च्या जास्त आरामदायी असतात हे मनात ठेवून केला. सामान तपासून घ्यायला काहीच वेळ लागला नाही. कधी नव्हे ती आमच्या माळ्याचा अर्धा भाग व्यापणारी भलीमोठी बॅग काढली होती, त्यामुळे ती लगेच त्या यंत्रातून निघून तिच्यावर टॅग लागलासुद्धा. मग ती आणि आमची कॅरी-ऑन घेऊन चेक-इनच्या रांगेत थांबलो. नंबर येईपर्यंत काय करायचं म्हणून मी कान देऊन घोषणा ऐकत बसलो. त्या इंग्लिश आणि हिंदीसोबतच मराठीतही होत असल्यामुळे, तेच अपेक्षित असलं तरी बरं वाटलं. काही घोषणांची मात्र खूप मजा वाटली. या घोषणांमध्ये आधी फ्लाईटचं संपूर्ण वर्णन करून मग, चिडचिड झालेल्या मंजुळ आवाजात, कुणा प्रवाशांची नावे घेऊन ‘कृपया आता विमानात चढा’ असं सांगितलं जायचं. आपल्याशिवाय वाहन सुटणारच नाही या लोकांना असलेल्या फाजील आत्मविश्वासाचं मूळ सापडल्यासारखं वाटलं. तरीही, टॅग लावून बॅग विमानात पाठवून दिली तरी स्वतः चढण्याचा पत्ताच नाही या घटनेमागे जी भयानक शक्यता लपलेली असते, तिचा विचार करता या घोषणा योग्यच म्हणाव्या लागतील. ती शंका मनात आली तसा मी दचकलो, पण आम्ही चेक-इन करून पुढे जाईपर्यंत बहुतेक सगळ्या घोषणा योग्य कानांवर पडल्याचं आम्ही पाहिलं.
‘चेक-इन’ झाल्यावर आणि बोर्डिंग पास मिळाल्यानंतरची प्रक्रिया असते इमिग्रेशनची. ते करून देणारे अधिकारी तोंड पुसत आपापल्या जागांवर येऊन बसेपर्यंत रांग सबंध लॉबी व्यापून प्रवेशापर्यंत पसरली होती. आमच्या पुढची मुलगी बिनधास्त तिथेच जमिनीवर मांडी घालून पुस्तक वाचत बसली होती. मायभूमीला काही दिवसांसाठी का होईना, पण सोडून जाणाऱ्या आम्हा सगळ्यांना शेवटच्या क्षणी जरा ‘गिल्ट’ द्यायचा प्रयत्न होता की काय तो? त्यांच्या चेहऱ्यावर तो नेहमीचा उपकार करत असल्याचा भाव होताच.
पण आल्यावर मात्र त्यांनी पटपट काम केलं. चार-चारच्या संख्येने लोकांना बोलवून आणि त्यांची सगळी कागदपत्रं तपासून त्यांना पटकन पुढे शारीरिक तपासणीकडे पाठवून दिलं. एरवी सरकारी कार्यालयात आपल्याला कामाच्या बाबतीत जो ढिसाळपणा आढळतो तो इथे कागदपत्रांच्या बाबतीत होताना दिसत नव्हता, हे एक बरं होतं. मग ते बोर्डिंग पासवर एक शिक्का मारून पुढे पाठवतात. शारीरिक तपासणीही ‘सिरिअसली’ पार पडली. लॅपटॉप, कॅमेरा, फोन इतकंच काय तर स्वेटरपण काढून एका ट्रेमध्ये ठेवायला लावले आणि तो ट्रे त्याच यंत्रातून काढला. दरम्यान आम्ही दोघंही तपासणीतून ‘पिंग’ न होता सुटलो होतो. त्यांचं समाधान झाल्यावर त्यांनी बोर्डिंग पासवर दुसरा शिक्का ठोकला आणि आम्ही पुढच्या लाउंजमध्ये गेलो. मोठी बॅग चेक-इनमध्येच देऊन टाकल्यामुळे आता आमच्याकडे कॅरी-ऑन शिवाय काही नव्हतं.
पुढचे दीड-दोन तास आम्ही कसे काढले कोण जाणे! अखेर आमच्या विमानाची घोषणा झाली आणि आम्ही चौथ्या गेटमधून बाहेर पडून परत रांगेत उभे राहिलो. इमारतीचा हा भाग म्हणजे दुसऱ्या मजल्यावरचा एक लांबलचक बोळ आहे ज्याच्यापलीकडे विमानं उभी असतात. जमिनीवरून चालत किंवा बसमधून विमानापर्यंत जायचा अनुभव खासच असला तरी मला त्यापेक्षा तो अधांतरी पूल जास्त आवडतो. बोळाच्या टोकाला आपण अचानक पत्र्याच्या भल्यामोठ्या डब्यातून चालत चालत थेट विमानाच्या आत पोहोचतो. या पुलाचे तोंड आणि विमानाचा दरवाजा यांच्यामधली फटदेखील त्यांनी फॉईल लावून बंद केली होती; त्यामधून विमानाचा थोडासा बाहेरचा भाग आणि त्यावर ‘Jet Airways’ मधला ‘J’ अर्धवट दिसत होता. विमानाला बाहेरून स्पर्श करण्याची दुर्मिळ संधी चालून आली असल्यामुळे मी पटकन त्या ‘J’ ला हात लावून घेतला.
विमान उडायच्या वेळी अंधार असल्यामुळे पुण्याची धावपट्टी किती पसरलेली आहे याचा अंदाज येणं अवघड होतं, पण ठिकठिकाणी लागलेल्या, वेगवेगळ्या अक्षरांच्या आणि आकड्यांच्या आकारात चमकणाऱ्या दिव्यांनी थोडीफार जाणीव होऊ दिली. आमच्या विमानाचे हे ‘टॅक्सिंग’ चालू असताना शेजारी नुकतंच उतरलेलं एक विमानही तळाकडे जाताना पाहायला मिळालं. टॅक्सिंगच्या वेळीही विमानाचा वेग बराच असल्याने, अननुभवी व्यक्तीला आता हे कुठल्याही क्षणी उडेल असंच वाटेल. पण सरतेशेवटी ते मुख्य धावपट्टीवर येऊन थांबलं. मग काही क्षण शांतता; अगदी आपलीच धडधड ऐकू येईल इतकी. मग विमानाने जो वेग घेतला त्याच्या तुलनेत आधीचा काहीच नव्हता. अशा वेळी सीटबेल्ट का लावायला सांगतात ते व्यवस्थित कळतं. आता आपल्या हृदयासोबतच आजूबाजूचे सगळे धडधडत असते. खिडकीतून बघता आलंच, तर दिसू शकणाऱ्या इमारती किंवा झाडं क्षणार्धात धूसर होऊन मागे पडतात. आणि अचानक..... आपण सगळे वरच्या दिशेने तिरपे झाल्याचं जाणवतं. मी दरवेळी हा अनुभव घेताना डोळे मिटून घेतो, कारण घडतं ते आधी पाहून न घेता फक्त अनुभवायचं असतं. आधीचा गदारोळ, आणि मग क्षणात पिसासारखे हलके झाल्याची भावना. पण मग लगेच डोळे उघडावे, कारण आकाशात झेपावत असताना खिडकीतून शहराचा किंवा प्रदेशाचा जो देखावा पाहायला मिळतो, त्याला जगात कशाचीच सर नाही.
विमानातल्या जेवणाची सगळीकडे टिंगल होत असली तरी स्पेशल कोर्स त्यातल्यात्यात बरा असतो आणि लवकर येतो हे माहित असल्यामुळे बाबांनी तो मागवला होता. तो आला तेव्हा मी एअर-होस्टेससमोर लोक साधारणतः जसे वागतात तसं वागून तो स्वीकारला. पुढच्या दहा दिवसांसाठी जिभेला दोन गोष्टींची सवय लावायची होती. एक म्हणजे नॉन-व्हेज आणि दुसरी, इंग्लिश! अर्थात तेव्हा मला मी तिन्ही त्रिकाळ नॉन-व्हेजच हादडणार असल्याची कल्पना नव्हती. विमानातलं नॉन-व्हेज पुष्कळच समाधानकारक होतं. मी इतक्या कमी वेळात सगळा ट्रे (त्या नेहमीच्या पपईच्या फोडींसकट) रिकामा करून तो परत पाठवला, की माझं मलाच आश्चर्य वाटलं. बाकी विमानप्रवासात काहीतरी करमणूक शोधावी लागतेच म्हणा. खिडकीतून बाहेर बघण्याची प्रवासातली एक ठरलेली करमणूक इथे अर्थातच काही उपयोगाची नसते. आपल्या समोर टी.व्ही. असतो खरा, पण या विमानात नव्हता. ही कमतरता Jet Airways ने वायफाय पुरवून भरून काढली होती, तरी त्याच्याशी कनेक्ट होताना बाबांना अडचणी येत होत्या. मी दूरदृष्टी ठेवून फोनमध्ये ‘फ्रेंड्स’चे आठ निवडक एपिसोड आधीच घालून ठेवल्याने मी त्या फंदातच पडलो नाही.
अंधारात जेवा, मग झोपायचा प्रयत्न करा, मग मागच्या प्रशस्त भागात जाऊन या वगैरे करण्यात उरलेला वेळ गेला आणि अचानक परत सीटबेल्ट लावायची सूचना झाली आणि आम्ही सगळे जमिनीकडे झेपावलो. विमान ज्या क्षणी उडतं, त्या क्षणाच्या अनुभवाची तुलना फक्त ज्या क्षणी ते जमिनीला स्पर्श करतं, त्या क्षणाशीच होऊ शकते. अडीच-तीन तास कसलंच घर्षण न झाल्यामुळे जेव्हा ते एकाएकी सुरु होतं तेव्हाची धडधड जास्त भीतीदायक असते.
आम्ही थेट दुबईला न जाता अबू धाबीला उतरलो होतो. विमान उतरत असताना चहूकडे पसरलेला अथांग वाळूचा महासागर डोळे भरून पाहिला होता; त्यात मध्येच ठिकठिकाणी किनाऱ्यावर फिरायला आलेल्या लहान मुलांनी वाळूतून बोटे फिरवावीत असे रस्ते दिसत होते. मग अगदी उतरायच्या आधी खूप आखीवरेखीव चौक आणि छोट्या-छोट्या इमारती वगैरे दिसले होते. हा फक्त विमानतळाजवळचा भाग असून, मुख्य अबू धाबी शहरात उंच इमारती असतील असं सांगून बाबांनी मला धीर दिला होता. काही क्षण प्रचंड वेगाने पुढे सरकल्यानंतर जेव्हा विमान अखेर संथपणे थांबलं, तेव्हा खिडकीतून लाटेच्या आकाराची, काचांनी मढवलेली सुंदर वॉच-टॉवरची इमारत दिसली. तेव्हा मनात म्हटलं, की आजपर्यंत ज्या गोष्टींचे असंख्य फोटो पाहिले होते त्या सगळ्यांना प्रत्यक्ष पाहायला आता सुरुवात झाली आहे. ज्या दुबईत मनाने खूप पूर्वीच पोहोचलो होतो ती दुबई आता फक्त काही तासांच्याच अंतरावर आहे. या विचाराने सुखावून मी विमानातून बाहेर पडल्यावर वाळूच्या कणांनी माखलेल्या हवेचा एक खोल श्वास घेतला, आणि आम्हाला तळाच्या इमारतीकडे न्यायला आलेल्या बसमध्ये चढलो.
The Dubai Diaries continue on DD2
The Dubai Diaries continue on DD2
Comments
Post a Comment