Dubai Diaries: प्रथमदर्शन



अबू धाबीमध्ये पाय ठेवला आणि असं वाटलं की सगळं जगच ‘एन्लार्ज’ झालं आहे. पुणे विमानतळाच्या इमारतीला नाक चिकटवून उभी असलेली विमानं पाहायची सवय असल्यामुळे अबू धाबीला आमचं विमान उतरल्यावर दोन भलीमोठी मैदानं पार करून तिसऱ्या यार्डात थांबलं, हे दृश्य नवीनच होतं. आयुष्यात पहिल्यांदा विमानाचं पार्किंग पाहायला मिळत होतं, आणि आसपास कुठलीही इमारत दिसत नव्हती. बसमधून चांगली दहा मिनिटं फिरल्यावर आम्ही एका अवाढव्य लॉबीत शिरलो. खूप काळाने अचानक ए.सी.ची थंडगार झुळूक अंगावर आदळल्यामुळे शहरल्यासारखं झालं, पण लगेचच त्याची सवयही होऊन गेली. पुढे जे वाढून ठेवलं होतं ते पाहता, तशी सवय होणं अगदीच गरजेचं होतं. 
आत्तापर्यंत औषधालाही अरब दिसला नव्हता. पण पुढे गेल्यावर जे अनेक तपासणीचे काउंटर्स दिसले ते अक्षरशः बुद्धिबळाच्या पटासारखे दिसत होते. जेवढ्या संख्येने काउंटर्सवर पांढऱ्या झग्यातले अरबी पुरुष होते, जवळपास तेवढ्याच संख्येने काळ्या बुरख्यातल्या अरबी स्त्रियाही आम्हाला ‘रिसिव्ह’ करायला उपस्थित होत्या. या अरबी लोकांनी व्यापलेल्या काउंटर्ससमोरील रांगेत मी आणि बाबा एका इंग्लिश जोडप्याच्या आणि कोरियन कुटुंबाच्या मध्ये उभे होतो, आणि त्यावरूनच अनुभवायला मिळालेल्या वैविध्याची कल्पना येत होती. 
‘युनायटेड अरब एमिरेट्स’ या छोट्याशा देशात सुमारे २०० देशांतले लोक स्थायिक आहेत. सौदी अरेबिया आणि ओमान यांच्या सीमारेषांना चिकटलेल्या या देशात एकूण सात ‘एमिरेट्स’ आहेत. तिथल्या राजांना ‘अमीर’ असंही संबोधलं जात असल्याने एका राजाच्या राज्याला ‘अमिरात’ हा शब्द आहे. अबू धाबी ही राजधानी, तशीच तिथली आकाराने सर्वात मोठी अमिरात असून तिचा राजा हाच देशाचा राष्ट्रपती आहे. आकारमानाने दुसऱ्या क्रमांकावर दुबई असल्याने तिचा राजा हा देशाचा पंतप्रधान किंवा उपराष्ट्रपती आहे. (ही दोन्ही पदे इथे सामान अर्थाने वापरली जातात) अशा प्रकारे एक राजेशाही साम्राज्य असूनही त्यांची सरकारी यंत्रणा लोकशाहीच्या जवळ नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. या राजांच्या मंत्रिमंडळांत मग राजघराण्यातलेच लोक असतात. 
दरम्यान आम्ही तपासणी पूर्ण झाल्यावर आणि सामान आणणारा फिरता पट्टा क्रमांक एक इथे आमची मोठी बॅग येणार असल्याचं कळल्यावर त्या दिशेने चालू लागलो. तिथपर्यंत पोचायला तीन लांबलचक आणि विशाल बोळ ओलांडून एका अजस्त्र लॉबीत शिरावे लागले, ज्यामध्ये एकूण पंधरा पट्टे असून आमचा अगदी टोकाला होता. आत्तापर्यंत या विमानतळाच्या एकूण विस्ताराची चांगलीच कल्पना आली होती, आणि आमच्या फर्ग्युसन कॉलेजचा कॅम्पस त्यामध्ये सहज मावेल असं वाटलं. तसंच, तिथून पुढे पाहायला मिळेल ती प्रत्येक गोष्ट घरच्यापेक्षा ‘जराशी मोठीच’ असणार असा विचार मनात येऊन गेला, जो नंतर खोटा ठरला नाही. 
आणि इतका वेळ आम्ही एका अवाढव्य बंद इमारतीतच होतो. मोठी बॅग घेतल्यानंतर पुन्हा बरीच पायपीट करून शेवटी आम्ही मुख्य द्वारापाशी पोहोचलो. तिथून आम्हाला एतिहाद कंपनीचीच एक बस दुबईला नेणार होती. आमची फ्लाईट उशिरा पोहोचल्याने आमची पहिली बस मात्र हुकली होती आणि दुसरी बस दीड तासानंतर होती असं रिसेप्शनवरच्या अरबी मुलीने आम्हाला गोड हसून सांगितलं. मग काही तासांपूर्वी जसा पुण्याच्या लॉबीत वेळ काढला होता तसा आता इथे काढायचा प्रयत्न केला. जॉन ग्रिशमच्या पुस्तकाने यावेळी सुरेख साथ दिली. ते आपल्यापेक्षा दीड तास मागे असल्याने तिथे नऊ वाजले असल्यामुळे भारतात साडेदहा झाले असणार हे ओळखून मी ‘गुड मॉर्निंग’चे मेसेज टाकायला हरकत नाही असं ठरवलं आणि ठराविक लोकांना पिंग केलं. मग आदल्या रात्रीप्रमाणेच, अधूनमधून गप्पा आणि उरलेल्या वेळात पुस्तक असं करत कसाबसा वेळ काढायचा प्रयत्न केला.      
शेवटी जेव्हा अबू धाबीत तेवढेच वाजले तेव्हा आम्ही त्या इमारतीतून बाहेर पडलो आणि एकाएकी उष्णतेच्या झळा बसायला लागल्या. टॅक्सी स्टँडचं भलंमोठं आवार पार करून आम्ही बस येणार होती तिथे थांबलो. तशी पंधरा मिनिटंच वाट पाहावी लागली, पण उन्हामुळे तीही असह्य झाली. अशात एक अत्यंत हवीहवीशी वाटणारी वातानुकूलित बस समोर आली आणि ‘केसरी टूर्स’च्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना घेऊन एका रस्त्यावरून लगेच नाहीशीही झाली. 
तेव्हा पहिल्यांदाच माझं रस्त्यांकडे लक्ष गेलं. विमानतळातून बाहेर पडणाऱ्या रस्त्याचे दोन फाटे दोन विरुद्ध दिशांना जात होते. दोन्ही दिशांना अगदी क्षितिजापर्यंत एकही मनुष्यवस्तीची खूण दिसत नव्हती. माझ्या मनात आलं, की असाच एखादा रस्ता आपल्याकडे असता तर लगेच त्याची रुंदी कमी करून दुतर्फा इमारती उभ्या राहिल्याही असत्या. पण मनात दोन्ही चित्रांची तुलना केल्यावर मला कुठलं जास्त प्रिय होतं ते ठरवता येईना. पुण्यातले रस्ते लहान असतात हे खरंच, पण फुटपाथवरच्या आणि त्यापलीकडच्या सगळ्या गजबजाटामुळे एक सुरक्षिततेची भावना जरूर निर्माण होते. त्या तुलनेत इथला हा रस्ता आणि आजूबाजूचा सगळाच प्रदेश एवढा ओसाड आणि वैराण भासला, की मी जास्तच उतावीळपणे बसची वाट पाहू लागलो. 
त्यानंतर पाच मिनिटांनी एक बस आणि तिची धाकटी बहीण अशा डुलत डुलत आल्या. कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकवार आमची सगळी कागदपत्रं तपासली आणि सगळं सामान त्या व्हॅनमध्ये भरलं. तोवर आम्ही बसमध्ये चढून ड्रायव्हरच्या मागची जागा पकडली होती. एरवी प्रवासात मला समोरच्या सीटवर बसून पुढचा रस्ता पाहायला खूप आवडत असल्यामुळे, आता दुबईला नेणारा रस्ताही असाच स्पष्टपणे पाहता येईल या कल्पनेने मी सुखावलो. 
पाच मिनिटानंतर मात्र मला कंटाळा यायला लागला. आम्ही विमानतळ सोडून बाहेर आलो आणि एक्सप्रेसवेला लागलो तो भाग तेवढा थोडा थरारक वाटला, कारण त्या भागात खूप मोठी आणि पूर्ण वर्तुळाकार अशी वळणे एकमेकांच्या खालून-वरून पसरलेली होती. पण त्यानंतर रस्ता जो सरळसोट झाला तो अगदी शेवटपर्यंत! आजूबाजूला बघण्यासारखं तरी काय होतं? सिनेमांत वगैरे पाहिलेलं लालसर रेतीचं वाळवंट असतं तर मजा आली असती, पण हे dull रंगाचं dull वाळवंट होतं. अधूनमधून झुडुपं लागायची. या सगळ्या वैराण निसर्गचित्राला दुपारचा तळपणारा सूर्य पूर्णत्व मिळवून देत होता. वेळही अशी, की रस्त्यावर वर्दळ तुलनेने कमी. किंवा कदाचित तेवढीच असत असेल. दहा मिनिटं या सगळ्यात काहीच फरक पडत नाहीये असं पाहिल्यावर मग बसच्या वेगाचं अप्रूप वाटणंही कमी होतं, कारण अंतर कापलं जातंय असं वाटतच नाही. बारा तासांपूर्वी सुरु झालेल्या प्रवासामुळे आलेला शीण आता ठळक जाणवू लागला होता. मध्येच मला डुलकी लागली. तेवढ्यात “घोरू नकोस,” असं कुणीतरी इंग्लिशमध्ये म्हणालं आणि मी दचकून मागे पाहिलं. आमच्या मागच्या सीटवरचा एक दुसऱ्याला बजावत होता. थोड्या वेळाने ही इच्छा ड्रायव्हरने व्यक्त केल्याचं कळलं, कारण तो मागे वळून “खरंच, हा रस्ता इतका monotonous आहे ना, की कुणी घोरायला लागलं तर मला झोप येईल अशी मला भीती वाटते!” असं म्हणाला. यावर तो मागचा माणूस हसला, पण जागा राहिला. 
थोड्या वेळाने जागं राहण्यासाठी कारणं मिळायला लागली. इतका वेळ कार रेसिंग गेमच्या ‘endless mode’ सारख्या दिसणाऱ्या रस्त्याला अचानक फाटे फुटायला लागले होते. एक फाटा शेजारी फुटून पूर्ण तीनशेसाठ अंश वळून पुन्हा आपल्याच डोक्यावरून पलीकडे जायचा आणि या बाजूच्या गाड्यांना सुखरूप त्या बाजूला पाठवायचा. मी काही गाड्यांना हे वळण घेताना डोळे भरून पाहिलं. वर हे करताना कुणी वेग अजिबात कमी केला नाही. दोनतीनदा ते संपूर्ण वळण पाहून घेतल्यावर मी पुन्हा पुढे बघायला लागलो. 
दुबई.
एक्सप्रेसवे सोडून दुबईच्या मुख्य रस्त्यावर येण्याचीच मी वाट पाहत होतो, पण तसं घडलंच नाही कारण तो एक्सप्रेसवे हाच दुबईचा मुख्य रस्ता होता. तिथे त्याला ‘शेख झायेद रोड’ असं नाव होतं. त्या नदीएवढ्या रुंदीच्या रस्त्याच्याच दुतर्फा आता उंचउंच इमारती दिसायला लागल्या होत्या. माझं लक्ष रस्त्यावरून एकदम उडालं. कुणा मित्राच्या / मैत्रिणीच्या घरी सगळ्या आपल्या आवडत्या चॉकलेट्सनी भरलेल्या बरण्या शेल्फ व्यापून बसलेल्या सापडाव्यात तशी माझी अवस्था झाली होती. एकेका इमारतीला ती मागे जाईपर्यंत मी अधाशासारखं पाहत होतो. सगळ्या एकतर रेतीच्या रंगाच्या नाहीतर संपूर्णतः काचेने मढवलेल्या. या लोकांच्या गर्दीतच मला एक वेगळीच इमारत दिसली, पण तिचं सविस्तर वर्णन तिला जवळून पाहिलं त्याच प्रसंगी करणं योग्य ठरेल. उजवीकडे, डावीकडे आणि क्षितिजावरही उंच सुळक्यांचं रान माजलेलं होतं. बाबांनी तेवढ्यात माझं लक्ष डावीकडे ओढून घेतलं आणि मला अगदी टोकाला समुद्रात उभी असलेली, दुबईतली माझी दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात आवडती इमारत म्हणजेच ‘बुर्ज अल अरब’ दाखवली. समुद्रात एका कृत्रिम बेटावर उभ्या असलेल्या या इमारतीचा आकार उभ्या संत्र्याच्या फोडीसारखा आहे. तिचा आकार, ठिकाण आणि शिवाय वर फोडीतून बाहेर डोकावणारे गोलाकार हेलिपॅड या सगळ्यांमुळे ही अत्यंत सुंदर दिसते. किंबहुना, ती माझी सगळ्यात आवडतीही होऊ शकली असती, पण तशी ती नसण्याचं कारण एकच आहे. 
आता मी तेच कारण शोधायला लागलो. संपूर्ण डावी आणि उजवी बाजू पाहूनही ते सापडलं नाही. मग आमची बस अजून एका उड्डाणपुलाखालून गेली तेव्हा मी क्षितिजाकडे पाहिलं. क्षितिजावर शाळेचा वर्ग भरला आहे आणि सगळी मुलं बसलेली असून, शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला बहुधा एक जरा जास्तच हडकुळा मुलगा तेवढा उभा आहे, असं काहीसं दृश्य दिसलं. तो ‘मुलगा’ म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून, जगभरातल्या गगनचुंबीच काय पण एकूणच सगळ्या इमारतींचा सम्राट अर्थात ‘बुर्ज खलिफा’ होता. जगातली सगळ्यात उंच इमारत. या अद्भुत आविष्काराचे दर्शन जरी त्यानंतरचे दहाही दिवस रोज झाले, तरी पहिले दर्शन मी कधीच विसरणार नाही. (खरेतर कुठलेच दर्शन कधी विसरणार नाही!) आता सरळ त्याच्याकडे जात राहावंसं वाटत असतानाच गेले दोन-अडीच तास ड्रायव्हरने न केलेली गोष्ट त्याने आता केली. तो वळला. आम्ही एका वेगळ्याच रस्त्यावर आलो आणि बुर्ज खलिफा दिसेनासा झाला.
कुठल्याही ट्रीपच्या सुरुवातीला, आपल्या अपेक्षेप्रमाणे सगळं घडेल ना, का आपला सगळीकडे भ्रमनिरास होईल अशी एक भीती कायम असतेच. ही भीती मग नवीन ठिकाणी पोहोचताना अनपेक्षित असलेल्या सगळ्या गोष्टींकडे आपले लक्ष वेधून घेत राहते. दुबईच्या ट्रीपची मी आत्तापर्यंत सगळ्यात आतुरतेने वाट पाहत असल्याने पहिल्यांदा पोचलो तेव्हा ही भीती वाटणं स्वाभाविक होतं. पण, या सगळ्या सुंदर पण अनोळखी इमारतींच्या गराड्यात शांतपणे उभे असलेले बुर्ज अल अरब आणि बुर्ज खलिफा दिसले, तेव्हा ‘चला, काहीतरी आपल्या कल्पनेप्रमाणेच आहे’ असा विचार आला आणि भीती गेली. 
आता आम्ही तुलनेने पुष्कळच ‘बुटक्या’ भागात फिरत होतो. बस एतिहादची असल्याने त्यांच्या एका ऑफिसपाशीच ती थांबणार होती. तिथून पुढे आपले आपण! अखेर! मग पाचदहा मिनिटांतच ती थांबली. आम्ही उतरलो. रणरणत्या उन्हामुळे जरा मान वर करणं तर सोडाच, पण समोरचंही कष्टानेच पाहता येत होतं. आमच्या बससमोरच आमची सामानाची व्हॅन उभी होती आणि कर्मचारी त्यातून बॅगा उपसत होते. आमची मोठी बॅग खाली आली तशी बाबा ती घ्यायला गेले. आमची बस दुबई विमानतळावर जाणार असं का कोण जाणे मला वाटत असल्यामुळे तिथून घरी कसं पोचायचं यावरच मी सगळं लक्ष केंद्रित केलं होतं, पण आता आम्ही एका अनोळखी रस्त्यावर अवजड बॅग घेऊन उन्हात उभे होतो. बाबा वळले की त्यांना ‘पुढे काय’ असं विचारायचं ठरवलं, पण तशी वेळ आलीच नाही. अचानक माझ्या खांद्यावर थाप पडली आणि मी मागे वळून पाहिलं. काका तिथे हसत उभा होता. 
काकाकडे ‘पजेरो स्पोर्ट’ असेल असा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. आमचं सगळं सामान मागच्या भागात व्यवस्थित बसलं. बाबा पुढच्या सीटवर काकाशेजारी बसले आणि दोघांनी सीटबेल्ट लावले. मी मागे असल्याने अर्थातच तसं काही करणार नव्हतो. मग काका म्हणाला की इथे प्रत्येकाने सीटबेल्ट लावलाच पाहिजे असा नियम आहे. मी बसलो होतो ते सीट नीट पाहिलं. सगळ्या गाड्यांप्रमाणे ते दोन स्वतंत्र सीट्स नसून एकसंध होतं. दोन्ही बाजूंना दोन सीटबेल्ट तर होतेच, पण मध्यभागी तिसरा माणूस बसू शकतो हे जाणून तिथेही सीटमधून एक तिसरा सीटबेल्ट फुटला होता. मी डावीकडचा लावला आणि मगच काकाने गाडी सुरु केली. निघताना माझ्या डोळ्यासमोर आपल्याकडच्या खच्चून गर्दी असलेल्या बसेस आणि त्यांच्या दारांना धरून लोंबकळणारी माणसे उभी राहिली. 
आता आम्ही आतल्या रस्त्यांवरून चाललो होतो. तरीही तिथे प्रत्येक वळणावर आणि चौकात सिग्नल्स होते. फार काय, चौक जवळ आला तसे रस्त्याचेही तीन तुकडे झाले, जेणेकरून डावीकडे आणि उजवीकडे जाणाऱ्या गाड्यांना त्या त्या लेन्समधून जाता यावं आणि सरळ जाणाऱ्यांना फक्त थांबायला लागावं! अर्थात, असे सिग्नल्स आपल्याकडेही असतात, पण सिग्नल सुटल्यावरच रस्त्याच्या मध्यभागी थांबलेला माणूस यू-टर्न घेणार असल्याचे मागच्यांना कळते. या सगळ्यामुळे सिग्नल्सचं जाळं असूनही आम्ही तुलनेने लवकर पोचलो. ‘अल अदियात’ नावाच्या बिल्डिंगच्या खालच्या पार्किंगमध्ये काकाने गाडी नेली. बाबा आणि काका सामान उतरवत होते तेवढ्या वेळात मी आत जावं म्हणून इमारतीच्या लॉबीत शिरण्याचा काचेचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. उघडेना. मग काका आला आणि त्याने तिथल्या नंबरपॅडवर पासकोड टाकला, मग ते दार उघडलं. 
काकाच्या प्रशस्त दिवाणखान्यात आरामखुर्चीवर कोसळून मी पंधरा तासांनंतर पायातले बूट काढले. हल्लीच्या शिष्टाचारानुसार काकाने लगेच आम्हाला पाणी आणि वायफाय विचारले. मग सुखरूप घरी पोचल्याचे आईला आणि इतर ‘उत्सुक’ लोकांना कळवून आम्ही सामान टाकलं, कपडे बदलले आणि जेवायला बसलो. 
आदल्या रात्री पुणे विमानतळावर बरोबर घेतलेल्यांपैकी एक मफिन, मग विमानातलं एक ऑम्लेट आणि सकाळी अबू धाबी विमानतळावर खाल्लेला दुसरा मफिन एवढ्याच पार्श्वभूमीवर, समोर आलेल्या गरमागरम इडली-सांबारावर मी ताव मारला. काकाला प्रवासाचं सविस्तर वर्णन करून सांगितलं. (काही गमती, तर काही मागे वळून पाहिल्यावर गंमत वाटेल असे किस्से) वास्तविक आमची बस चुकल्याचं कळल्यावर काकाने आम्हाला घ्यायला अबू धाबीला येण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पण आम्ही आमची आधीचीच योजना पाळल्याने आम्ही बरोबर जेवायच्या वेळीच घरी पोहोचलो होतो. मग काकाने आम्हाला प्रोग्रॅम सांगितला. जेवण झाल्यावर चांगली झोप काढा अशी तंबी दिली आणि तो स्वतः कामावर परत जाणार असल्याचं सांगितलं. माझी बहीण शाळेतून साडेतीन वाजता घरी येईल, मग तिच्याबरोबर संध्याकाळी फिरायला जाऊया, असं ठरलं. 
मी पलंगावर आडवा झालो तेव्हा खरंतर जॉन ग्रिशम पूर्ण करायचा माझा विचार होता. मी दुपारी झोपत नाही असं काकाला सांगण्यासाठी मी तोंड उघडलं खरं, पण ते शब्द एका दीर्घ जांभईत विरून गेले. तसंही, दुपारी न झोपण्याचं कारण ती येत नाही हेच होतं, आणि त्या क्षणी तरी मला दुसरं काहीच करावंसं वाटत नव्हतं. म्हणून मी पडदे लावून घेण्यापूर्वी खिडकीतून एकदा दुबईकडे नजर टाकली, आणि कुशीवर वळून झोपून गेलो. कधी नव्हे असं दहा दिवसांएवढं दीर्घ स्वप्न मला पडणार होतं.                                                                              
           
The Dubai Diaries continue on DD3

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प