Dubai Diaries: भटकंती



“दादा, उठ!
माझ्या बहिणीच्या आवाजावरूनच मी ओळखलं की हीच साद तिने याआधी किमान तीनदा तरी घातलेली असणार. मी डोळे उघडले तेव्हा आमच्याकडे एकमेकांसोबत घालवण्यासाठी दहा दिवसांएवढा अमूल्य वेळ मिळालेला असून त्यातले पहिले दोन तास मी झोपून वाया घालवले याबद्दलची तिची नाराजी तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. हे लक्षात येताच मी लगेच उठून ‘फ्रेश’ व्हायला गेलो. 
ती संध्याकाळ आम्ही जरा आसपास फिरण्यातच घालवणार होतो. काकाचं घर हे ‘अल बरशा’ या उपनगरीय भागात आहे आणि एकूण हा सगळा परिसर शेख झायेद रोड आणि मुख्य दुबईपासून तसा जवळच आहे. माझ्या बहिणीने ठरवल्याप्रमाणे आम्ही ‘मॉल ऑफ द एमिरेट्स’ बघायला जात होतो. ‘मॉल’ म्हटल्यावर माझ्या डोळ्यासमोर फक्त ‘बिग बझार’ वगैरे येण्याइतका त्या संकल्पनेला मी नवीन नव्हतो, पण तरी माझी कल्पनाशक्ती ‘पुणे सेंट्रल’ किंवा ‘आर डेक्कन’ यापलीकडे फारशी जाऊ शकली नाही. तो हिशोब मनात ठेवून, हा एमिरेट्स मॉल पाहायला फारतर अर्धा-पाऊण तास लागेल आणि उरलेला वेळ आपण शेख झायेद रोडकडे चक्कर टाकून ‘त्या सगळ्यांना’ पाहू शकू असा विचार माझ्या मनात येऊन गेला होता. प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. 
अल बरशा हा उपनगरीय असला तरी इमारतींची गर्दी साधारण तेवढीच म्हणावी लागेल. फक्त या सगळ्या उंचीने लहान. तरीही, आमच्या इमारतीपासून ते मॉलपर्यंतच्या संपूर्ण रस्त्यात खूप मोकळी जागा अशी एकदाच पाहायला मिळाली, आणि तोही एक वाळूने भरलेला ‘प्लॉट’ होता. जिथे जमीनच मुळी वाळूची बनलेली आहे तिथे, त्याच वाळूवर काँक्रीट पसरून मग त्यावर परत थोडी वाळू ओतून निर्माण केलेला हा unintended देखावा पाहून मला मजा वाटली. पण अशाच प्रकारे इतर खूप ठिकाणी काँक्रीट घातल्यावर त्यावर माती टाकून मग झाडं लावलेलीही आढळली. 
दुबई ही अथपासून इतिपर्यंत मानवाने स्वतःच्या हाताने घडवलेली आहे; अजूनही घडवतो आहेच. 
दरम्यान आम्ही मॉलपाशी पोहोचलो होतो. वाटेत दोन इमारतींच्या मध्ये दुबईची ‘स्कायलाईन’ दृष्टीस पडल्यामुळे आणि खासकरून त्या इमारतींच्या गर्दीत दिवे मिचकावणारा बुर्ज खलिफा स्पष्ट दिसल्यामुळे मी चांगलाच खुशीत होतो. मॉलकडे एक नजर टाकल्यावर मात्र मी आणि बाबांनी एकाच वेळी आश्चर्याने आ वासला. मी माझ्या बहिणीकडे पाहिलं तर ती आमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आमच्याकडेच पाहत होती. तो मॉल एका नजरेत मावणं तर सोडाच, पण त्याची जवळची दोन टोकंही एका वेळी दिसू शकत नव्हती. शिवाय आम्ही ज्या बाजूने शिरलो त्या बाजूला तर तिमजली पार्किंग होतं. ते पूर्ण ओलांडून मॉलच्या मुख्य इमारतीत प्रवेश केला तेव्हा त्या पार्किंगचा आकार आणि आपल्याकडच्या सुपरमार्केटचा आकार यात खूप साम्य असल्याचं जाणवलं. 
मॉलमध्ये शिरलेल्या ‘उत्सुक ग्राहकां’चे पाय आणि डोळे एकमेकांशी अखंड वाद घालत असणार. आम्ही आत गेल्यावर पहिल्यांदा नकाशाकडे कूच केलं. एका मोठ्या खांबाला लागून दोन विरुद्ध दिशांना दोन मोठे स्क्रीन ठेवलेले होते, तिथे मजल्यानुसार मॉलचा संपूर्ण नकाशा दिसायचा. एक नकाशा अरबी भाषेत तर दुसरा अर्थातच इंग्लिशमध्ये. दुबईत सगळीकडे कटाक्षाने या दोन्ही भाषेतल्या पाट्या आढळतात, आणि अरबी भाषेचा नंबर नेहमी पहिला असतो. नकाशाकडे एक नजर टाकली की मॉलमध्ये एकूण कायकाय आहे याची कल्पना येते. सर्वाधिक संख्येने जगभरातल्या वेगवेगळ्या ब्रॅंड्सची दुकानं आणि त्यापाठोपाठ खूप वेगवेगळ्या प्रकारची हॉटेल्स. तिसऱ्या का चौथ्या मजल्यावर एक आयमॅक्स थिएटरही होतं. चौथ्या मजल्यावर या मॉलचं प्रमुख आकर्षण, म्हणजेच ‘स्की दुबई’ नावाची भन्नाट कल्पना होती. ‘ते करून बघायचं नसलं तरी असा प्रकार तुम्हाला दुसरीकडे कुठे पाहायला मिळणार नाही’ असं माझ्या बहिणीने आम्हाला बजावलं आणि त्याच मजल्यावरच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांकडे आपसूकच वळणाऱ्या आमच्या पायांना दिशा बदलून तिकडे जायला लावलं. 
‘स्की दुबई’ म्हणजे, आपल्याकडची निसर्गसौंदर्याची कमतरता भरून काढण्याच्या हट्टाने पेटलेल्या दुबईच्या स्वभावाचं एक खास प्रतीक आहे. या मॉलच्या इमारतीच्या अंतर्भागातच, चौथ्या मजल्यावर एका काचेच्या वेढलेल्या प्रचंड आवारात एक मोठ्ठा कृत्रिम बर्फाचा डोंगर मांडून ठेवला आहे. मॉलच्याच लिफ्ट्सने वर जायचं, मजेत स्कीईंग करत खाली पुन्हा मॉलमध्येच यायचं, आणि त्यातून बाहेर पडल्यावर नेहमीप्रमाणे रुमाल काढून घाम पुसायचा! आपल्याकडच्या लोकांचं एकवेळ ठीक आहे, पण युरोपियन पर्यटकांनी इथे आल्यावर हे करण्यासाठी का म्हणून रांग लावायची? नाही म्हणायला हे लोक ski simulator किंवा तत्सम कुठलातरी ‘व्हर्च्युअल’ अनुभव मिळवून देऊ शकले असते; कदाचित ते जास्त स्वस्तही पडलं असतं त्यांना. पण त्याऐवजी त्यांनी खोटा असला तरीही ‘खरा’ डोंगर तयार करायचा घाट घातला, याचं थोडं समाधान वाटतं. 
पण तो होता खरंच सुंदर! त्याचा कृत्रिमपणा क्षणभर बाजूला ठेवला तर तो सगळा उपद्व्याप खरंच रचनाकारांच्या बुद्धिचातुर्याला सलाम म्हणावा लागेल. वर्षानुवर्षे या वाळवंटात राहिलेल्या लोकांना थोडा काळ, खोट्या का होईना पण बर्फाचा आस्वाद घेता यावा यासाठी हा अट्टाहास, असं आपण आपलं एक म्हणू शकतो. (अर्थात, दुबईतल्या अरबांनी उपभोगली नाहीत अशी फार कमी सुखं जगात असतील, ही बाब विसरून चालणार नाही!)
मग आम्ही चौथ्या मजल्यावर टोकाला असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांत गेलो आणि तिथे आम्हाला एक लांब स्कायवॉक दिसला. या मॉलच्या उत्तरेला एक तलाव आणि जॉगिंग ट्रॅक आहे, आणि त्याच्यापलीकडे थेट शेख झायेद रोड आणि त्याचे सर्व्हिस रस्ते आहेत. ‘मॉल ऑफ द एमिरेट्स’ हे मेट्रो स्टेशन तिथे असून हा स्कायवॉक त्याला मुख्य मॉलशी जोडतो. कशाला स्टेशनवर उतरल्यावर खाली जा (दुबई मेट्रोच्या ट्रॅकचा खूप मोठा भाग जमिनीच्या वरून आहे), स्टेशनबाहेर पडा, तसल्या उन्हातून ते सर्व्हिस रस्ते क्रॉस करून, तलाव ओलांडून मग मॉलकडे येता? त्यापेक्षा या सगळ्यापासून सुरक्षित अंतरावर आकाशातून चालत थेट मॉलच्या चौथ्या मजल्यावरच येऊन पोहोचा की! दुबईत एकूणच जवळच्या वास्तू आतून जोडण्याकडे खूप कल आहे, आणि याची प्रचिती आम्हाला त्यानंतर वारंवार येत राहिली. 
अर्थात यामागे तसं कारणही आहेच. जराही बाहेरची हवा लागू न देता मी या मॉलमध्ये जाऊन परत येऊ शकतो, असं मी त्या रात्री काकाला म्हटलं. लिफ्टने सरळ पार्किंगमध्येच जायचं, गाडीतून मॉलपर्यंत जायचं, तिथे ए.सी.च्या वातावरणाच्या आतच गाडीतून उतरायचं! आणि मॉलच कशाला, त्या स्कायवॉकने मेट्रो स्टेशन आणि मग तिथून अगदी कुठेही! त्यावर तो म्हणाला की तसं आहे खरंच, आणि वर्षातला काही काळ तसं करण्यापलीकडे काही पर्यायही नसतो. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये, जेव्हा बाहेर पडणं अगदीच असह्य असतं, तेव्हा या सगळ्याचं खूप अप्रूप वाटत असणार. 
बाकी यानंतर मॉलमध्ये पाहण्यासारखं फारसं काही नव्हतं यावर आमचं एकमत झालं. आल्या मार्गाने आम्ही परत जायला निघालो. यावेळी दुकानांकडे कमी आणि त्यांच्यापाशी घोटाळणाऱ्या लोकांकडे जास्त लक्ष द्यायचं मी ठरवलं. मॉलमध्ये फेरफटका हा लोकांचं निरीक्षण करण्यासाठी खूपच चांगला असतो असं म्हणावं लागेल. आम्ही पाहिलेल्या सगळ्या लोकांपैकी बहुतांश लोक विंडो शॉपिंगचा छंद जोपासत होते. पण खरंच, एवढ्या सगळ्या ब्रॅंड्सचे त्यांच्या भिंतीएवढ्या खिडकीतले आकर्षक डिस्प्ले पाहत पाहत पुढे जाण्यात एक वेगळीच मजा येत होती खरी. तेवढ्यात मला शेजारी-शेजारी असलेल्या ‘प्राडा’ आणि ‘ब्लूमिंगडेल्स’च्या भव्य दुकानांच्या समोर दोन काळ्या बुरख्यातल्या अरबी स्त्रिया डिस्प्लेकडे बोट दाखवून उत्साहाने बोलताना दिसल्या आणि गंमत वाटली. 
मॉलमधल्या खूप बोळांच्या दोन्ही बाजूंना अशी दुकाने आढळतात. रेस्तराँट्स वगैरे स्वतःसाठी खास जागा करून असतात. त्यामुळे हे दुतर्फा झगमगीत डिस्प्ले असलेले बोळ आणि दुतर्फा उंच इमारती असलेला शेख झायेद रोड यांच्यात साम्य आढळतं. फक्त इथला ट्रॅफिक खूपच हळूहळू पुढे सरकतो! या सगळ्या बोळांत, वर छतावर कुठेतरी लपवलेल्या पिवळ्या प्रकाशाच्या दिव्यांचा उजेड आणि खालच्या संगमरवरी फरशा यांची ‘हार्मनी’ त्या बोळांना एक जुन्या काळच्या बांधकामांमधलं संध्याकाळच्या वेळी जाणवणारं आगळं तेज प्राप्त करून देते. शक्य तेवढ्या ठिकाणी अशा अनेक फरशा बसवून त्यांनी गार हवा खेळती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वत्र centralized A.C. असूनही, अशा इतर जमतील तेवढ्या प्रकारे गारवा जपण्याचा प्रयत्न आपल्याला दुबईत खूप ठिकाणी सापडतो. काही ठिकाणी तर अत्यंत चातुर्यपूर्ण, पारंपरिक पद्धतीने. पण तिकडे नंतर परत येणारच आहोत. 
या बोळांची रुंदी सगळीकडे सारखी नसते , हे उघडच आहे. पण जिथे ती सर्वाधिक असते तिथे एकेक बोळ फर्ग्युसन रोडच्या अर्ध्या रुंदीचा असतो. मग अशा एकेका बोळात त्यांनी मध्यभागी तीनतीन स्टॉल्स उभे केलेत. संख्या कमी असल्याने काही ब्रॅंड्सना असे स्टॉल मिळतात, पण बाकी ‘माला’चा दर्जा तेवढाच असतो, आणि किंमतही. त्या दिवशीच आम्हाला असे कितीतरी वैविध्यपूर्ण स्टॉल्स दिसले. फ्रेंच अत्तरे, आफ्रिकन चॉकलेट्स, भारतीय मसाले (हो!) आणि एवढंच काय पण आम्हाला एक लेडीज पार्लर-स्टॉलही दिसला! आजूबाजूच्या वाहत्या गर्दीकडे पूर्ण दुर्लक्ष करून दोनतीन स्त्रिया मजेत आपल्या केसांना आकार देऊन घेत बसल्या होत्या. पण याहीपेक्षा जास्त मजा आणली ती एका फक्त डिस्प्ले असलेल्या स्टॉलने. चार कर्मचारी त्या सुरेख खऱ्याखुऱ्या डिस्प्लेशेजारी उभे राहून ‘The World Islands Dubai’ या प्रकल्पासाठी गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना शोधत होते. बाबांनीही गंमत म्हणून त्यातलं एक पत्रक घेतलं. महाकाय कृत्रिम बेटांची उभारणी या वास्तुशास्त्रातल्या सध्याच्या ‘हॉट’ प्रकारात दुबईचा हात धरणारं कोणीच नाही. पाम झाडाच्या पानांसारख्या आकारांची तीन अजस्त्र बेटं उभारायला तिने सुरुवात केली, त्यापैकी एक आता पूर्ण झालं आहे आणि दुसरं नुसतंच उभं आहे. हे चालू असतानाच तिला ही एक भन्नाट कल्पना सुचली असावी. या पाम बेटांच्या थोडं पुढे, खोल समुद्रात शंभरेक छोट्या छोट्या बेटांची उभारणी करण्याची! ही सगळी बेटं म्हणजे जगाच्या नकाशाचं एक सुरेख कोलाजच आहे. सगळे खंड आणि मोठेमोठे देश असे व्यवस्थित रचून ठेवलेले, आणि एक वर्तुळाकार बेट त्या सगळ्यांना सामावून घेणारं! त्या भल्यामोठ्या डिस्प्लेवर हे सगळं खूप सुंदर दिसत होतं, ते तसंच्या तसं प्रत्यक्षात येईल का असा प्रश्न अगदीच पडू शकत होता. पण जर ते कोणाला शक्य असेल तर दुबईलाच! या जगाच्या नकाशातल्या बेटांवर त्या त्या देशांची वैशिष्ट्य ती उभारणार; स्वतःच्याच बेटावर काय करणार बुवा?              
आता भूक लागल्यामुळे आम्ही तळमजल्यावरच्या अवाढव्य ‘कॅरेफोर’ सुपरमार्केटला लागून असलेल्या काही खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सकडे गेलो. नेमकी त्यांची तयार ऑर्डर्स दाखवणारी यंत्रणा तेव्हा बंद पडलेली होती आणि कपाळावर सारख्या येणाऱ्या बटा सावरत दमून गेलेल्या अरबी आणि आशियन मुली (तिथे मिचमिचे डोळे असणाऱ्या सगळ्यांना ‘आशियन’ आणि आपल्याला ‘भारतीय’ म्हणून ओळखलं जातं) वैतागलेल्या पाश्चात्य देशांतल्या लोकांना जरा समजून घ्यायला सांगत होत्या. आमची ऑर्डर यायलाही वेळ लागलाच. तेवढ्या वेळात माझ्या बहिणीने मला तिथल्याच टर्किश आईस्क्रीमच्या स्टॉलची गंमत दाखवली. नेहमीचे आईस्क्रीम काढायचे चमचे न वापरता तिथला हसतमुख कर्मचारी एक खूप लांब हँडल असलेला धातूचा चिमटा वापरून लांबूनच आईस्क्रीम घेणाऱ्यांच्या समोर ठेवत होता. ते घ्यायला त्यांनी हात पुढे केला की चपळाईने तो चिमटा फिरवून, उलटा करून ते आईस्क्रीम त्यांच्यासमोर तसंच नाचवत ठेवायचा. घेता आलं तर घ्या! एका बाजूला कसून सराव केलेली ती अवघड हालचाल (ते आईस्क्रीम एकदाही सांडलं नाही) करत तो बाकीच्यांना मोठ्याने त्याच्या स्टॉलकडे बोलवत होता.  हाच प्रकार त्यानंतर सगळ्या मॉल्समध्ये आणि इतर ठिकाणी टर्किश आईस्क्रीमच्या स्टॉलवर घडताना दिसेपर्यंत मला या मॉलने एवढ्या विक्षिप्त कर्मचाऱ्याला कसं ठेवून घेतलं असा प्रश्न पडला होता. पण नंतर असं कळलं की टर्किश पद्धतच तशी होती. मजा आणायचा प्रामाणिक प्रयत्न, आणि लोकांना मजा येतही होती. तसा तो थोडा वेळ असं सतावून मग ते देऊन टाकायचा, पण तोपर्यंत त्याचं बघण्यापलीकडे आपल्याही हातात काही नसायचं. फक्त एकदा एक छोटी मुलगी रडवेली झाली तेव्हा त्याने तिचा गालगुच्चा घेत लगेच तिला आईस्क्रीम देऊन टाकलं. 
एक गोष्ट आता आठवते, ती म्हणजे त्या दिवशी जे सगळे कर्मचारी आम्हाला भेटले, त्यातल्या कुणाच्याच चेहऱ्यावर टूथपेस्टच्या जाहिरातीतलं हसू नव्हतं. जे होतं ते खरं, सुंदर आणि निर्मळ होतं. तसा खऱ्यासारखा आनंद चेहऱ्यावर दाखवायचे वर्ग असतात हे मला माहित होतं, पण मला तरी तो आनंद खरंच खरा वाटला. 
यानंतर आम्ही मॉल ‘झाला’ असं ठरवून परत जायला निघालो. हे ठरवल्यापासूनही परत बाहेर रस्त्यावर येईपर्यंत दहा मिनिटं लागलीच. परतीच्या वाटेवर कुणी फारसं काही बोललं नाही. माझं म्हणाल तर ते एवढं वैभवप्रदर्शन पाहून मी अजूनही चकितच होतो. मुळात ‘माल’ चांगला असेल तर त्याचे डिस्प्ले एका पातळीपर्यंत यशस्वी होऊ शकत असताना हा मॉल त्याच्या एवढ्या पुढे का गेला होता असा मला प्रश्न पडला होता. मी माझ्या बहिणीला विचारलंही, की हे सगळं एवढं भव्यदिव्य का करून ठेवलंय म्हणून. त्यावर तिने हसून एक अत्यंत साधंसोपं पण अर्थपूर्ण असं उत्तर दिलं. 
“इथे असंच असतं.”
मी वळून त्या दोन इमारतींमधून दिसणाऱ्या स्कायलाईनकडे नजर टाकली. बुर्ज खलिफा दिवे मिचकावत होता.       
                                     Image result for mall of the emirates


The Dubai Diaries continue on DD4

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प