Dubai Diaries: दौरा १


दुसऱ्या दिवशी सकाळी घरी नाश्त्यानंतर काकाने माझ्या फोनमध्ये तिथल्या network providerचं, म्हणजेच ‘एटिसलात’ कंपनीचं कार्ड घातलं. आपल्याकडच्या कार्डांवरचे तिथले रोमिंग चार्जेस ऐकले तर तिथल्या अरबांनाही फोन करावासा वाटणार नाही. त्या कार्डावर एक नेटपॅक विकत घेतला आणि मग आम्ही दुबईत कुठेही हरवायला सज्ज झालो. 
काका-काकूच्या योजनेनुसार त्या दिवशी आम्ही संपूर्ण दुबई पाहून घेणार होतो, जेणेकरून जी ठिकाणं खास आवडतील त्यांना त्यानंतरचे नऊ दिवस आरामात देता यावेत. अशा दुबई हिंडवणाऱ्या दोन टूर्स शहरात उपलब्ध असतात. त्यापैकी ‘सिटी टूर’ ही एका ठरलेल्या मार्गावरून शहरात फिरवून आणते. दुसरी ‘बिग बस टूर’ चार वेगवेगळ्या मार्गांवर फिरायची आणि त्या मार्गांची निवड आपल्याला करता यायची. आम्ही मग ‘बिग बस’चाच एका दिवसाचा पास काढून घेतला. 
या दोन्ही टूर्स ‘Hop on, hop off’ प्रकारच्या होत्या. म्हणजे तुम्ही एकदा तो पास घेतलात की तो वापरून तुम्ही कुठल्याही मार्गावरच्या कुठल्याही ‘बिग बस’ मध्ये चढू शकता. असं असल्यामुळे आपण मार्गावरचा एखादा स्टॉप ठरवून तिथे उतरू शकतो, मनसोक्त हवा तेवढा वेळ फिरू शकतो आणि परत तिथेच किंवा जवळच्या कुठल्याही स्टॉपवर जाऊन पुढच्या बिग बसची वाट पाहू शकतो. 
चारपैकी दोन मार्गांच्या बिग बसेस, तसेच एक सिटी बस या सकाळी नऊ वाजता मॉल ऑफ द एमिरेट्समधून सुटत होत्या. त्यापैकी आम्ही पहिल्यांदा ‘मरिना सिटी’ हा मार्ग निवडला. गगनचुंबी इमारती आम्हाला कधीच एकट्यादुकट्या आढळल्या नाहीत. दुबई शहराच्या दोन मुख्य भागांमध्येच त्या सगळ्या एकवटलेल्या होत्या. त्यातल्या काही ‘डाउनटाऊन दुबई’ भागात बुर्ज खलिफा नावाच्या गल्लीतल्या दादाच्या आजूबाजूला उभ्या होत्या तर उरलेल्या सगळ्या ‘मरिना’ भागात होत्या. मरिनालाच ‘द टॉलेस्ट ब्लॉक’ असंही नाव आहे. हा भाग एका मर्यादित जागेत जास्तीत जास्त गगनचुंबी इमारती उभ्या असण्याच्या निकषावरून जगात पहिल्या क्रमांकावर आहे. अर्थात, मला अशा गर्दीपेक्षा शांतपणे एकटीच उभी असलेली गगनचुंबी इमारत जास्त आवडत असल्याने मला या माहितीचं फार अप्रूप वाटलं नाही. ही सगळी माहिती आम्हाला बिग बसमध्ये प्रत्येक सीटच्या मागे लावलेल्या छोट्याशा स्पीकरमधून मिळाली. पहिल्यांदा चढताना माणशी एकेक इअरफोन फुकट दिला जातो आणि ते वापरून बाहेरचं बघताबघता अखंड ही माहिती ऐकता येते. ते इअरफोन आठवण आणि उपयुक्तता या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन घरी परत आणलेले आहेत. ती माहिती तेरा वेगवेगळ्या भाषांमध्ये दिली जाते, आणि त्यामध्ये अर्थातच हिंदीचा समावेश आहे.  
मस्त सकाळ होती. आमची बस शेख झायेद रोडच्या अनेक सर्व्हिस रस्त्यांपैकी एकावरून फिरत होती. आमचा पहिला स्टॉप येईपर्यंत त्या एवढ्या सुंदर उड्डाण पुलांपैकी तीन तरी आमचे ओलांडून झाले होते. मग तो स्टॉप आला, जिथून ‘मरिना’ भागातली खाडी आणि तिला लागून असलेला टॉलेस्ट ब्लॉक पायी चालत जायच्या अंतरावर होते. ‘मरिना’ येथील खाडीच्या भागात एक मोठं डॉकयार्ड आहे, आणि तेव्हा तिथे छोट्या स्पीडबोटीपासून ते श्रीमंतांच्या दिखाऊ बोटींपर्यंत सगळ्या प्रदर्शनासारख्या मांडून ठेवलेल्या दिसल्या. पाण्याच्या कडेने एक जॉगिंग ट्रॅक वगैरे केला आहे. तिथल्या बाकांवर, लॉनच्या तुकड्यांने वेढलेल्या आणि अनेक गगनचुंबी इमारतींच्या सावलीत बसलेल्या आम्हाला त्या ताज्या हवेसह तिथल्या सकाळच्या प्रसन्न वातावरणाचा आस्वाद घेता येत होता. 
तिथल्या छोट्या पामच्या झाडांपेक्षा, इमारतींच्या तळमजल्यावर असलेल्या कॅफेमधल्या भुकेलेल्या गर्दीपेक्षा आणि ट्रॅकवरून पळणाऱ्या आनंदी ‘प्लग्ड’ लोकांपेक्षा मला पाण्याकडे पाहून जास्त प्रसन्न वाटत होतं. प्रत्यक्षात हे समुद्राचंच वळवलेलं पाणी, पण तेही कल्पनेपलीकडे स्वच्छ आणि निर्मळ होतं. हुबेहूब वरच्या आकाशाच्या रंगाचं. आजूबाजूच्या सगळ्या इमारतींचं त्यांच्याइतकंच सुंदर प्रतिबिंब त्यात सहज दिसत होतं. कठड्याला टेकून त्याच्याकडे पाहत बसलो होतो तेव्हा एकदोनदा प्रकर्षाने  त्यात सरळ उडी मारावी असंही वाटून गेलं. (तसं काही केलं असतं तर तिथे गदारोळ झाला असता हा भाग वेगळा!) वारा काही फार नव्हता, आणि असता तरी एवढ्या इमारतींमुळे अडलाच असता. पण म्हणून ते पाणी जास्तच नितळ वाटत होतं. कुठूनतरी लहानशी झुळूक आली की त्याच्या पृष्ठभागावर  हलकीशी चलबिचल व्हायची, जी पुढच्या क्षणी विरूनही गेलेली असे. काँक्रीटच्या जंगलाने वेढलेला तो शांत, सुखावह जलाशय पाहताना असं वाटून गेलं की दुबईच्या रचनेत निसर्गाचे स्थान खूपच लहान आहे, पण जे आहे ते मानाचे आहे. 




आत्तापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारे भरपूर फोटो काढून झाले होते. त्या प्रसंगी आम्ही जे धोरण ठरवलं तेच पुढे संपूर्ण ट्रीपभर पाळलं. काहीही प्रेक्षणीय दिसलं की आधी फोटो काढून मोकळं व्हायचं, आणि मग उरलेला वेळ ते दृश्य मनात साठवून ठेवण्यात घालवायचा. एक साधा फोटो पाहून जो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो, तो त्याच प्रसंगाचा दीर्घ व्हिडिओ पाहून राहत नाही. शिवाय त्यासाठी सगळ्या अविस्मरणीय गोष्टी लेन्समधून पाहाव्या लागतात. तसंही, ‘सगळ्या सगळ्या’ गोष्टींचं रेकॉर्डिंग हवंय कशाला? त्यावर शिक्कामोर्तब करायला आणि आठवणींचा प्रवाह चालू करायला एक फोटो पुरेसा असतो. मग बाकीचं सगळं टिपायला आपला अगणित मेगापिक्सलचा नैसर्गिक ड्युअल कॅमेरा आणि साठवायला अगणित टेराबाईट्सचं नैसर्गिक स्टोरेज आहेच की. 
दरम्यान आम्ही बसस्टॉपवर पुढच्या बिग बसची वाट बघत थांबलो होतो. त्यानंतर आमचा पुढचा स्टॉप ‘जुमेराह बीच रेसिडेन्स’ या भागात होता. वाळूच्या रंगाच्या छोट्यामोठ्या फरशांनी नटवलेले रस्ते आणि त्याच रंगाच्या विटांच्या बनलेल्या सुबकठेंगण्या इमारती ही या भागाची खासियत. शिवाय समुद्रकिनारा आहेच. किनाऱ्यावर खूप मोठी पट्टी पूर्ण रेतीची ठेवून मग त्याला लागून पुन्हा एक जॉगिंग ट्रॅक आणि कॅफे वगैरे केलेले आहेत. त्यांच्या मागे इमारती आहेतच. समुद्रात लहान मुलं खेळत होती आणि त्यांचे पालक फुकटात मिळणाऱ्या ‘टॅन’च्या विचाराने सुखावून किनाऱ्यावर पहुडलेले होते. आम्ही पाण्याच्या जवळ गेलो नाही; फक्त त्या ट्रॅकवरून किनाऱ्याच्या काठाकाठाने फेरफटका मारला. तिथले कॅफे खूपच आकर्षक दिसत असले तरी आम्हाला फारशी भूक नसल्याने आम्ही तिकडे फिरकलो नाही. (भूक असती तरी किमती पाहिल्यावर पळूनच गेली असती, मग त्रास कशाला) त्याऐवजी सगळं फक्त पाहून घेतलं. आता ऊन वाढायला लागलं होतं. 
किनाऱ्यावरच्या इमारती प्रामुख्याने या बीच सोसायटीच्या आहेत. फक्त किनाऱ्याच्या पलीकडच्या एका मोठ्या लॉनच्या पुढे हिरव्या काचांत नटलेली एक हॉटेलची इमारत आहे. दूर क्षितिजावर एक लांबलचक कृत्रिम बेट किनाऱ्याला फुटलेल्या हातासारखे पसरले आहे. त्याच्या टोकाला एक ‘जायंट व्हील’ अर्धवट बांधून झालेले दिसते. तर दुसऱ्या टोकाला नजर बारीक करून पाहिल्यावर एक उभी संत्र्याची फोड दिसली आणि मी बुर्ज अल अरबला ओळखलं. पण यांच्यापेक्षा जास्त उत्साह आणला तो बुर्जच्या अलीकडेच असलेल्या दुसऱ्या एका कृत्रिम फुटलेल्या हाताने. ते कृत्रिम बेट आमच्या सकाळच्या दौऱ्याचे ‘हायलाईट’ असणार होते आणि पुढच्या बिग बसने आम्ही त्याच्याकडेच जाणार होतो. ते बेट म्हणजे अर्थातच, ‘पाम जुमेराह’ नावाचा अविष्कार.
कृत्रिम बेटांच्या उभारणीत दुबईचा हात धरणारं कुणीच नाही. पाम जुमेराह हा या सगळ्यांपैकी पूर्णत्वाला पोहोचलेला आणि यशस्वी असा एकमेव प्रकल्प आहे. हे एक बेट नसून अनेक स्वतंत्र फांद्यांच्या रूपात आहे. या सर्व फांद्यांचा आकार एका सुंदर पामच्या झाडाच्या पानासारखा. एक अर्धवर्तुळाकार फांदी या संपूर्ण भागाला वेढते. मुख्य जमिनीपासून तिच्यापर्यंत पोहोचायला एक ‘कणा’ आहे आणि या कण्याला लांब मांजराच्या मिशांसारख्या फांद्या फुटल्या आहेत. नकाशात ते खूप सुंदर दिसत असलं, तरी रस्त्यावरून त्याच्यावर फिरताना काही फार वेगळं असं वाटलं नाही. माझ्या कल्पनेत आम्ही एका लांबलचक पुलावरून थेट टोकापर्यंत जाऊन मग त्या अर्धवर्तुळाकार फांदीवर फिरलो असतो, आणि दोन्ही बाजूंनी समुद्राचं पाणी पाहायला मिळालं असतं. पण प्रत्यक्षात सगळ्या फांद्या खूपच रुंद आहेत, आणि त्यांच्यावरच्या रस्त्यावरून फिरलं तर आपण एका छोट्याशा बेटावर नसून मुख्य जमिनीवरच कुठेतरी आहोत असंच वाटलं असतं. आमची बिग बस कुठल्या फांदीवर गेलीही नाही. आम्ही सरळ कण्यावरून बेटाच्या टोकाला गेलो. 
पण तिथून घडणारं समुद्राचं दर्शन थक्क करणारं होतं. बेटाच्या अर्धवर्तुळाकार फांदीचा मुख्य रस्ता समुद्राला लागूनच असल्यामुळे आमच्या डाव्या बाजूला सतत तो दिसत होता. त्या अथांग, गडद निळ्या विस्ताराकडे डोळे भरून पाहताना माझ्या लक्षात आलं की क्षितिजापर्यंत पसरलेल्या समुद्राकडेच, पण किनाऱ्यावरून आणि इथून पाहताना चांगलाच फरक पडतो. किनाऱ्याजवळ तो उथळ तर असतोच, शिवाय खालच्या जमिनीमुळे त्याचा रंगही फिका पडलेला असतो. हे बेट इतक्या लांबवर पसरलेलं आहे की त्याच्या टोकावर असताना आम्ही अक्षरशः भर समुद्रातच उभे होतो. त्याआधी पाहिलेल्या ‘क्रीक’ पेक्षाही जास्त नितळ आणि शांत असा तो होता. लाटा जवळपास नव्हत्याच; मला वाटलं की त्यावरून मी फरशीवरून चालल्यासारखा चालत जाऊ शकेन. आता ते दृश्य आठवून डोळ्यासमोर आणतो तेव्हा हे पटतं, की एरवी काळा असला तरी त्या काही क्षणांपुरता माझा आवडता रंग निळा होऊन गेला होता.      
मी समाधी लागल्यासारखा त्याकडे पाहत होतो, तेवढ्यात बाबांनी वेळीच माझं लक्ष उजवीकडे वेधून घेतलं. ‘दुबई’ असा गुगलला आदेश दिला की काही गोष्टींचे फोटो हमखास दिसतातच; त्यामध्ये हे पाम जुमेराह बेट आणि दोघे बुर्ज हे अर्थातच समाविष्ट आहेत. अशीच अजून एक गोष्ट म्हणजे तेव्हा आमच्या डोळ्यासमोर पसरलेली, इतरांपेक्षा वेगळ्याच अशा लाल रंगाची आणि सुबक नक्षीकामाच्या स्पर्धेत आरामात जिंकेल अशी इमारत : अटलांटिस! हे पंचतारांकित हॉटेल पाम जुमेराह बेटाची शान आहे. काही गोष्टी फक्त डोळ्यात साठवून घ्याव्यात (आणि अनुभव घ्यायला आत जाऊ नये!) तशीच ती होती. तिच्या भव्य आवाराला एक वळसा घालून आमची बस थेट पुढे निघाली. ती तिथे थांबली नाही म्हणून मी जरा हिरमुसलो होतो, पण म्हटलं शेवटी ते हॉटेल आहे. जगभरातले अनेक धनाढ्य लोक प्रचंड पैसा ओतून तिथे राहण्याचा अनुभव घेतात, मग अतिउत्साही टुरिस्टच्या घोळक्याच्या आरोळ्या, उसासे आणि क्लिक-क्लिक्समुळे त्यांच्या ब्रेकफास्टच्या आनंदावर विरजण पडू नये एवढी काळजी तर अटलांटिस घेऊच शकतं ना? तसं बघायला गेलं तर टुरिस्टला दुखावणं हे दुबईला महागात पडू शकतं, पण तोही सहजासहजी दुखावला जात नाही हेही तितकंच खरं.



कण्यावरून परत जाताना मी ते इअरफोन्स घालून जरा बेटाची माहिती ऐकून घेतली. ती माहिती आणि त्यानंतर रात्री काका-काकूने सांगितलेल्या गोष्टींचा सारांश असा : पाम जुमेराह हे तीनपैकी एक बेट आहे. त्या सुंदर पानाच्या आकाराची ‘पाम जुमेराह’, ‘पाम डेरा’ आणि ‘पाम जेबेल अली’ अशी तीन बेटं उभारण्याचा दुबईने घाट घातला होता. बाकीची दोन कामं आता जरा रखडली आहेत म्हणे. पाम डेरा अजून नकाशावरही नाही, तर जेबेल अलीवर अजून वाळू उपसायचं काम सुरु आहे. पण गती मंदावली असल्यामुळे ही अडचण हातांची नाही तर खिशांची असावी असं वाटतं. पण यामुळे न डगमगता ‘द वर्ल्ड आयलंड्स’ प्रकल्पाच्या पत्रिका आल्यागेल्याला उत्साहाने वाटत दुबई बसलेली आहे.
आमच्या ‘मरिना’ टूरचा यानंतर अंत होणार होता. ती परत मॉल ऑफ द एमिरेट्सला येऊन थांबली. आम्ही उतरलोच नसतो तर ती तशीच पुढे जाऊन आम्हाला परत मरिना, जुमेराह बीच आणि अटलांटिसला हिंडवून आली असती खरी, पण आता दुपार झाली होती आणि भुका लागलेल्या होत्या. मॉललाच परत आल्यामुळे आम्ही तिथल्या एका फूड कोर्टमध्ये मस्त जेवण केलं. बाहेर जेवण्यासाठी फूड कोर्ट हा उत्तम पर्याय असल्याचं बाबांचं म्हणणं मला तेव्हा सहज पटलं. या भागात दोन्ही बाजूच्या भिंतींना लागून छोटी फास्ट फूडची दुकानं असतात आणि मध्यभागी अनेक टेबल-खुर्च्या. आपली ‘कुझीन’ निवडा आणि या पंगतीत! तिथे मॅक्डोनाल्ड्स वगैरे होतेच, शिवाय थाई आणि चायनीजही होतं. ‘शामियाना’ नावाचं एक भारतीय दुकानही सापडलं. त्यानंतर भरपूर फूड कोर्ट पाहिले पण त्या सगळ्यांमध्ये जी दुकानं हमखास असायचीच त्यांच्यात ‘शामियाना’ही असायचं. आजूबाजूचं पब्लिक पाहून ही फूड कोर्ट व्यवस्था दुबईच्या नोकरदार वर्गासाठी देणगी आहे असं जाणवलं. ऑफिसच्या जेवणाच्या सुट्टीत तिथल्या कँटीनपेक्षा इथे यायचं. व्हरायटी जास्त आणि किमती कमी! त्या डायनिंग एरियातले बहुसंख्य लोक असेच सुट्टीत जेवायला आलेले कर्मचारी होते. (काहींच्या टेबलावर चालू लॅपटॉप्सही होते, काय हे दुर्दैव!) अर्थात सगळेच तिथलं जेवत होते असं नाही. काही घरून आणलेला डबाही खात होते. ‘आपले खाद्यपदार्थ आणू नये’ वगैरे फालतूपणा करायला ते कॉलेजचं कँटीन थोडीच आहे?
असो. त्या फूड कोर्टमधल्या थाई जेवण्याच्या घासांमध्ये आमच्या दुबई दौऱ्याची सकाळची फेरी विरघळून गेली. यानंतर आम्ही दुसऱ्या एका मार्गे या सगळ्या इमारतींच्या गर्दीला मागे टाकून दुबईच्या ‘गावात’ जाणार होतो. त्यानंतर पाहिलेली प्रत्येक गोष्ट सकाळच्या प्रत्येक गोष्टीशी प्रचंड विरोधाभासात्मक वाटली, पण ते सविस्तर पुढे आहेच. जुनी दुबई कशी असेल, आपल्या पुण्याच्या ‘गावा’सारखीच असेल का (हा विचार नंतर खरा ठरणार होता!) आणि वाटेत बुर्ज खलिफा दिसेल का अशा विचारांच्या गर्दीत हरवलेला मी बाबांच्या शेजारी मॉलच्या बाहेर उभं राहून पुढच्या बिग बसची वाट पाहत होतो.         

The Dubai Diaries continue on DD5

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प