Dubai Diaries: दौरा २


एवढं मोठं पार्किंग मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. (अर्थात, तेव्हा आम्ही एकूणच भव्यदिव्य भागात असल्याने त्यात नवल असं काहीच नव्हतं) मॉल ऑफ द एमिरेट्सहून एका बिग बसने आम्हाला ‘दुबई मॉल’च्या प्रशस्त आवारात आणून सोडलं होतं. दुबई मॉल हा तिथला सर्वांत मोठा मॉल असून, बुर्ज खलिफाचं टुरिस्टचं प्रवेशद्वार त्याच्या तळघरात कुठेतरी आहे. त्या मॉलच्या एका आख्ख्या बाजूला फक्त पार्किंग होतं, पण तेही पुरेसं पडत नसावं. आम्ही बसलो होतो त्या भागात दोन बिग बस आणि एक सिटी टूरची बस उभ्या होत्या, शिवाय दुबईच्या खास मिनीव्हॅन टॅक्सीही तिथे दाटीवाटीने उभ्या होत्या. सगळ्या पार्किंगवर पसरलेल्या काँक्रीटच्या आडव्या छताखाली आम्ही बसलो होतो. मॉलची इमारत आणि छत यांच्या मधल्या फटीतून बुर्ज खलिफाचा एक तुकडा खूपच जवळून दिसत होता. इतका, की मी त्याच्या खिडक्याही मोजू शकलो असतो आणि पुढच्या बसने यायला अजून थोडा उशीर लावला असता तर मी तेच केलं असतं. 
बिग बसमध्ये जे तेरा भाषांत वर्णन केलं जातं, त्यातलं इंग्लिश भाषेतलं बहुतेकवेळा प्रत्यक्ष सांगितलं जातं. बसच्याच कुठल्यातरी भागात मायक्रोफोनसकट दडून बसलेल्या ‘आशियन’ मुली ते ऐकवत असतात. अशीच एक मुलगी आमच्या शेजारी बिग बसचा पोशाख घालून रुबाबात बसली होती. बाबांच्या आग्रहावरून मी तिला पुढच्या बिग बसचा मार्ग विचारला आणि तिनेही आनंदाने सविस्तर सांगितला. आजूबाजूला कुणी टुरिस्ट असते तर त्यांना तेवढाच एक आशियन आणि एक भारतीय यांच्यातलं अडखळत्या इंग्लिशमधलं संभाषण ऐकायला मिळालं असतं. पण आजूबाजूचे सगळे टुरिस्ट स्वतःच अडखळण्याच्या नादात असल्यामुळे ते कुणी ऐकू शकलं नाही. 
“कोरियन?” बाबांनी अंदाजाने त्या मुलीला विचारलं. 
“फिलिपिनो,” ती हसून उत्तरली. 
दुबईच्या एकूणच सगळ्या ‘सेवाक्षेत्रात’ या छोट्या डोळ्यांच्या मंडळींची सद्दी असली, तरी त्यात पुन्हा बहुसंख्येने कोरियन, फिलिपिनो किंवा मलेशियन लोक आढळतात. खुद्द चिनी आणि जपानी आम्हाला अशा क्षेत्रांत कमीच आढळले. मला तर फक्त एकदाच त्यांना असं बाहेर पाहिल्याचं आठवतंय. चिनी लोक फूड कोर्टमधल्या त्यांच्या दुकानांत आणि जपानी लोक मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूममध्ये! जसं समोर आलेला ‘आशियन’ आपल्याला नक्की कुठल्या देशाचा आहे हे पटकन ओळखता येत नाही, तसंच काहीसं तिथल्या सगळ्या इतर गोऱ्या लोकांकडे पाहिल्यावर होतं. दुबईत एकूणच सर्व वर्णांची माणसे राहतात. त्यापैकी आपल्यासारखा वर्ण असलेले आपणच (आणि हा आकडाही लहान नाही!) आणि दुसरे म्हणजे अरब. पण तिथल्या असंख्य क्षेत्रामध्ये जगभरातल्या अनेक देशांचे एवढे लोक पसरलेले आहेत, की समोरून येणारा माणूस हा हटकून आपल्यासारखा नसणारच याची आपल्याला फार लवकर सवय होते. मला वाटतं यामुळेच मी बाह्यरूपाच्या पलीकडे जाऊन थेट माणसाकडे पाहायला लागलो. आपण मनातून वंशभेदाच्या विरोधात असलो तरी आपल्या देशात आपल्याला क्षणोक्षणी अशा परीक्षेला सामोरे कुठे जावे लागते? म्हणूनच जगातल्या सगळ्या जाती-जमातींसाठी आणि वर्णांसाठी दुबई हे अभयारण्य आहे, फक्त तिला उपयोगी पडेल असं काम करण्याची तयारी पाहिजे!
दरम्यान आम्ही बुर्ज खलिफा आणि दुबई मॉलच्या परिसराला मागे टाकून दुबईच्या जुन्या भागाकडे निघालो होतो. बसच्या समोरच्या रस्त्यावर दोन्हीकडून पडणाऱ्या सावल्या हळूहळू लहान होत गेल्या. पुढचा स्टॉप येईपर्यंतच्या रस्त्यात आम्हाला फार काही ‘खळबळजनक’ असं दिसलं नाही. दुबईचा कोर्ट दिसला, आणि तसंच दुबईतलं मोठं हॉस्पिटलही. पण आमचं कुतूहल जागृत केलं ते रस्त्याने जाताना लांबून दिसलेल्या एका वेगळ्याच रचनेने. 
जमिनीतून अर्धवट वर आल्यासारख्या दिसणाऱ्या त्या प्रचंड उंचीच्या आणि अतिशय कोरीव, नक्षीदार बाजूंच्या पोकळ आयतकाराचं नाव ‘दुबई फ्रेम’ असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. तिचं बांधकाम पूर्ण व्हायचं होतं म्हणे. मला तरी तो प्रकार पूर्णच झाल्यासारखा वाटला, पण आपल्याला त्यातलं काही कळत नाही असं मनाशी पक्कं करून मी तो विचार बाजूला केला. पुढची माहिती खूपच कुतूहलजनक होती. त्या फ्रेमच्या कोरीव नक्षीमध्ये अरबी भाषेतल्या कविता दडलेल्या असल्याचं आमच्या फिलिपिनो गाईडने आम्हाला सांगितलं. आणि या कविता होत्या खुद्द शेखसाहेबांच्या! दुबईचा राजा कविता करत असल्याची नवीनच माहिती तिथे मिळाली, आणि त्याचबरोबर लाटांसारख्या वळणदार लिपीत ठिकठिकाणी दिसणाऱ्या अरबी भाषेवरचा ‘क्रश’ जरा जास्तच ‘गंभीर’ झाला. त्यानंतर मला त्या भाषेच्या प्रेमातच पाडण्याची जबाबदारी इमारतींचा राजा घेणार होता.




पण दुबई फ्रेमचं मुख्य वैशिष्ट्य याहीपेक्षा खूपच खास होतं. तिची जागाच अशी होती, की एका बाजूला उभं राहून तिच्यामधून पाहिलं तर जुनी दुबई दिसते आणि दुसऱ्या बाजूने पाहिलं तर नवी दुबई! भूत आणि भविष्य, पारंपरिक आणि आधुनिक, जमिनीवरचे पाय आणि आकाशातले पंख यांचा अद्भुत संगम! ही फ्रेम पूर्ण झाल्यावर ते सगळं खरंच एवढं सुरेख दिसतंय का ते पाहायला येण्याचा मी मनाशी निश्चय केला. 
‘बिग बस’च्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून जुन्या दुबईत एक पायी सहल होती. इथे नमूद करावेसे वाटते की जुन्या दुबईच्या भागाला एक विशिष्ट नाव असून, त्याचा उच्चार ‘डेरा’ किंवा ‘दिएरा’ यापैकी एका प्रकारे केला जातो. ‘डेरा’ म्हटलं की मनात मोठ्या बुंध्याच्या झाडांचा काहीतरी संदर्भ लागत असल्यामुळे मी ‘दिएरा’ हाच उच्चार निवडला. दुबईच्या ‘खाडी’चा सगळ्यात रुंद भाग दिएराला मुख्य दुबईपासून वेगळं करतो. आमची सहल सुरु मात्र मुख्य शहरातच, ‘दुबई संग्रहालयाच्या’ समोरच्या स्टॉपवर झाली. ती चार वाजता होती आणि मधला वेळ आम्ही संग्रहालय पाहणार होतो, पण रहदारीमुळे पोचायलाच साडेतीन वाजल्यामुळे आम्हाला ते अर्ध्या तासात उरकावं लागलं. तसंही त्यात फार काही पाहण्यासारखं होतं अशातला भाग नाही. आवारात वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छीमारांच्या होड्या आणि अगदी जुन्या काळातल्या झोपड्या बांधून ठेवलेल्या होत्या, तर खाली तळघरात मंद, पिवळ्या प्रकाशात अनेक व्यापाऱ्यांचे आणि कारागिरांचे देखावे सर्व बारकावे लक्षात घेऊन केलेले दिसले. विणकर, लाकडापासून शिल्प करणारे लोक वगैरे यांचे पुतळे आजूबाजूला आपली कला पसरून बसलेले दाखवलेले होते. नेहमीप्रमाणेच बघायला खूप मजा येईल याची पुरेपूर काळजी दुबईने घेतलेली होती. पण काहीतरी हरवल्याची भावना मनातून जात नव्हती. आपल्या, ग्रीक किंवा रोमन संस्कृतीच्या तुलनेत नगण्यच असला तरी दुबईला स्वतःचा काही शतकांचा छोटासा इतिहास आहेच, आणि तोच इथे बघायला मिळत होता, पण सगळं देखाव्यांच्या रूपात. त्या काळातल्याच वस्तू अशा फार कमी काय, जवळजवळ नव्हत्याच. 
दुबईतील काही काही ठिकाणं तिच्या स्वभावाबद्दल फारच बोलकी असल्याचं आढळतं, त्यापैकीच हे संग्रहालय एक होतं. शेवटच्या काही दशकांत Sandstorm मागे लागल्यासारखी प्रगती करून झाल्यानंतर, आता पूर्वीच्या आपल्या जवळपास पूर्णतः हरवलेल्या अस्तित्वाला आठवून आठवून पुन्हा पाहण्याचा तिचा प्रयत्न यातून ठळकपणे दिसून येतो. पण दुबईची पहिली संस्कृती आज फक्त तळघरातल्या देखाव्यांमध्ये टिकून आहे हा माझा समज मात्र त्यानंतर दिएरातल्या त्या सहलीने खोटा ठरवला. 
संग्रहालयातून बाहेर पडून आम्ही आमच्या सहलीच्या गाईडला भेटलो. एक हसतमुख आणि गप्पिष्ट प्रौढ युरोपियन बाई होती. बसमध्ये ऐकलेल्या आवाजासारखा तिचा आवाज ‘मंजूळ’ नसला तरी अनुभवाने भरलेला असा समजूतदार होता. आमच्या छोट्याशा ग्रुपमध्ये एक अमेरिकन जोडपं होतं; एक आफ्रिकन फॅमिली होती. शिवाय एक तरुण युरोपियन वाटणारं जोडपं होतं, तिकडच्याच कुठल्यातरी देशाचे दोन वयोवृद्ध गृहस्थही होते. भारतीय असे आम्ही दोघेच. आम्ही उभे होतो त्या फुटपाथच्या मागच्या बाजूला अर्थमंत्रालयाच्या इमारती होत्या. मग त्या निमित्ताने आम्हाला शेखांचे कोण आणि ‘कोणाचे कोण’ सध्या तिथे आहेत याची माहिती मिळाली. यानंतर रस्ता ओलांडून आम्ही दुबईतल्या मुख्य आणि सगळ्यात मोठ्या मशिदीपाशी आलो. 
यु.ए.इ.चा आणि म्हणूनच दुबईचा राष्ट्रीय धर्म इस्लाम आहे. इथे मशिदी खूप प्रमाणात आढळतात, पण तसंच क्वचित आपल्या देवांची मंदिरं आणि चर्चेसही दिसतात.
‘दुबईतली सर्वात मोठी मशीद’ या पदाला तिचा आकार साजेसाच आहे. एका वेळी दृष्टीक्षेपात न मावणारा विस्तार, वेगवेगळ्या आकारांचे अनेक घुमट आणि दुबईच्या मानाने काहीच नसला तरी तिथल्या सगळ्या परिसराच्या तुलनेने अगदीच उंच असा एक मुख्य मनोरा. हे सगळं त्या नेहमीच्या गडद पिवळ्या, वाळवंटाच्या रंगात. काँक्रीटचा वापर पसरायच्या आधी इथल्या प्रदेशात घरं, दुकानं आणि मशिदी यांच्या बांधकामासाठी प्रामुख्याने sandstone, मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे वापरलेला आढळतो. ही मशीद आणि त्यानंतर पाहिलेल्या ‘गावातल्या’ सगळ्या छोट्या-छोट्या इमारती याच रंगाच्या होत्या. दुबईत पहिल्यांदा आल्यावर त्या सगळ्या आकाशामुळे निळ्या भासणाऱ्या काचांच्या गगनचुंबी इमारती पाहून जसा भारावून गेलो होतो तशीच ही ‘हार्मनी’ पाहूनही गेलो. खरं सौंदर्य बघणाऱ्याच्या डोळ्यांत असतं, हेच खरं. 
आमच्या गाईडने आम्हाला त्या उंच मनोऱ्याच्या उद्देश सांगितला. पूर्वीच्या काळी सामूहिक नमाजच्या वेळी मौलवीसाहेब सगळ्या गावाला इथून साद घालून बोलावून घ्यायचे. हल्ली यासाठी काय केलं जातं त्याची सविस्तर माहिती अबू धाबीच्या मशिदीत मिळाली. त्या मशिदीच्या मागच्या बाजूला आम्हाला खूप अरुंद गल्ल्या लागल्या, आणि त्यांना पाहून मला एकदम आपल्या पुण्याच्या ‘गावा’चीच आठवण आली. अर्थात, पुण्यातल्या गल्ल्यांची सर दुबईतल्या गल्ल्यांना ती कुठली? तरी तिथे एक छोटंसं दुकान सापडलं; त्यात फुलं, हार, नैवेद्याच्या गोष्टी आणि ताटं, तसंच उदबत्त्या वगैरे विकायला ठेवलेलं होतं. तिथून जवळच एक देऊळ होतं म्हणे. मशिदीच्या मागच्या गल्लीत मूर्तिपूजेचं सामान विकायला ठेवलेलं पाहून मला नवल वाटलं.
ती गल्ली पाहून मायभूमीची आठवण नसतीच आली तर त्यानंतरची काही दुकानं पाहून तर हमखास आली असती. आम्ही आता कापड-व्यापाऱ्यांच्या प्रांतात होतो. तेव्हा बहुतेक दुकानं बंदच असली तरी त्यांच्या नावांच्या पाट्या चाट करणाऱ्या होत्या. एकजात सगळ्या दुकानांना राजस्थानी दुकानांच्या नावांसारखी नावं! आपल्याकडे कपड्यांच्या घरगुती व्यापारांना कोणत्याही पुरुष किंवा (जास्त वेळा) स्त्रीचं नाव देऊन त्यापुढे ‘ट्रेडर्स’ एवढं लिहिलेली एवढी दुकानं मी आजपर्यंत पाहिली आहेत की तेव्हा तिथे मला अचानक भारतातच असल्यासारखं वाटलं. पण एवढ्यावर गोष्टी संपत नव्हत्या. एका ठिकाणी चक्क ‘शोले ट्रेडर्स’!!! आपल्या उत्तरेच्या कुशल व्यापाऱ्यांनी आज आपला सगळा देश व्यापला आहे, तर जिला कधीकधी गमतीत ‘भारताचं तिसावं राज्य’ म्हटलं जातं त्या दुबईची बाजारपेठ ते काय अशी सहज सोडणारेत?




त्यानंतर आम्ही तिथली एक पर्शियन मशीद पहिली, जिच्या निळ्या रंगाच्या छोट्या-छोट्या टाइल्सच्या कोलाजने नटवलेल्या सुंदर भिंती पाहून आमची aesthetic भूक, जर उरलीच असेल तर, पूर्णपणे भागली. त्या भिंतीकडे आ वासून पाहणाऱ्या त्या लहानशा आफ्रिकन मुलीच्या डोळ्यातली चमक आणि चेहऱ्यावरचे भाव पाहून सगळे कौतुकाने हसत होते. या सगळ्या छोट्या बांधकामांमध्ये एक गोष्ट ठळकपणे दिसायची. त्यांची छतं संपूर्णतः बंद केलेली नसायची. त्याऐवजी त्यांच्यावर चौकोनी आकाराचे बऱ्यापैकी उंच असे sandstoneचेच खांब उभे केलेले असायचे. त्यांना चारही बाजूंनी भोकं असायची आणि त्यांच्यामधून लाकडाचे ओंडके आरपार घातलेले असायचे. त्यामुळे खालून पाहणाऱ्याला छताचा भाग बुद्धिबळाच्या पटासारखा वाटत असेल. जराशा उंचावर वाहणारी गार हवा त्या लाकडाच्या फटींतून खेळती ठेवून खालच्या खोल्यांना थंड करण्यासाठी हा सगळा उपद्व्याप केलेला होता. जवळजवळ कायमच टोकाचं तापमान असलेल्या वाळवंटात शतकानुशतके राहिलेल्या या लोकांनी चतुरपणे त्यांच्यापुरत्या या ए.सी.चा शोध लावला होता. 



खाडी ओलांडून पलीकडे ‘दिएरा’मध्ये जाण्यापूर्वी आमच्या गाईडने आम्हाला एक खाडीला लागून असलेला छोटा कॅफे दाखवला. त्याचा अर्धा भाग जमिनीवर तर अर्धा मोठ्या लाकडाच्या ओंडक्यांनी आधार देऊन पाण्यात उभा केलेला होता. हा कॅफे खूप पूर्वी दुबईतला पहिला ‘डॉक’ होता असं कळलं. दुबईत बाहेरून आलेलं पहिलं व्यापारी जहाज लागलं ते हे ठिकाण! दुबईची भरभराट ही अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत प्रामुख्याने फक्त व्यापारावर अवलंबून असल्यामुळे त्यांनी हे ठिकाण जपून ठेवून त्या सुवर्णदिवसाची आठवणही जपली आहे. 
आम्ही एका छोट्याशा होडीतून खाडी पार केली. तिथे अगदीच छोट्या होड्यांना ‘आब्रा’ तर जरा मोठ्या, मच्छिमारांच्या बोटींना ‘धाऊ’ असं म्हणतात. इथे खाडीचं पाणी थेट समुद्रातून येत असल्यामुळे, तसंच त्यात लाकडाच्या, मासे पकडायची जाळी टाकून फिरणाऱ्या खूप धाऊ उभ्या असल्यामुळे, हे पाणी सकाळी पाहिलेल्या पाण्याइतकं स्वच्छ नव्हतं, पण इथल्या पाण्यात जास्त उत्साह भरल्यासारखं वाटत होतं. आमच्या डोळ्यांदेखत दोन धाऊ बंदराला लागल्या आणि त्यांच्यावरचं सामान उतरवून घेताना आम्ही पाहू शकलो. या दौऱ्याचा ‘हायलाईट’ एका धाऊमधून खाडीला चक्कर हा असल्याने आम्ही तेव्हा किनाऱ्यावर उतरल्यावर थेट आमच्या सहलीतल्या शेवटच्या दोन प्रेक्षणीय स्थळांकडे गेलो. ती म्हणजे दोन लांब बोळांत पसरलेल्या प्रसिद्ध बाजारपेठा : स्पाईस आणि गोल्ड सूक!
तिकडे बाजारपेठेला ‘सूक’ असा शब्द आहे. स्पाईस सूकच्या  गाईडने आम्हाला सोडलं आणि फिरून यायला सांगितलं. त्या सूकमध्ये दुकानं अशी नव्हतीच; फक्त तऱ्हेतऱ्हेचे मसाले पोत्यात भरून रस्त्याच्या कडेला ठेवलेले होते. त्यांच्या शेजारी छोट्या गाळ्यांवर काही उत्साही अरबी तरुण बसलेले असायचे. काही काही गाळ्यांमध्ये पांढरी दाढी राखणारे वृद्ध दुकानमालक मागे बसायचे आणि त्यांचे ते तरुण नातेवाईक किंवा मदतनीस हाका मारून गिऱ्हाईकांना बोलावण्यासाठी पुढे रस्त्यावर उभे असायचे. आमचा छोटासा कंपू थेट त्या बाजारातून चालत गेला तसे त्या सगळ्यांनी आम्हाला थांबवायचे प्रयत्न केले. कधी इंग्लिशमधून, तर एकदोन वेळा उर्दूसदृश काहीतरी ऐकायला मिळालं. तो सगळा प्रकार पाहून मला अनिल अवचट यांनी त्यांच्या ‘पुण्याची अपूर्वाई’ मध्ये वर्णन केलेल्या बोहरी आळीची आठवण झाली. सगळ्याच गाळ्यांवर फक्त मसाले होते असंही नाही. ‘Souvenir’ प्रकारात मोडणाऱ्या विविध गोष्टीही होत्या. सूकच्या टोकाला असलेल्या एका गाळ्याच्या काचेच्या फळ्यांवर ठेवलेल्या बुर्ज खलिफा आणि बुर्ज अल अरब यांच्या अतिशय बारकाव्याने तयार केलेल्या मॉडेल्सनी मला खूपच भुरळ घातली. मी तिकडेच पाहत बसलो तेव्हा बाबांनी मला, “बुर्ज खलिफाचं मॉडेल आपल्याला घायचं आहेच, फक्त काका-काकू सांगतील तिथून घेऊया.” असं आश्वासन देऊन माझं लक्ष शेजारच्या गाळ्याकडे वळवलं. त्याच्यावर वेगवेगळ्या आकारांचे आणि रंगांचे हुक्के मांडून ठेवलेले होते.
पलीकडचा ‘गोल्ड सूक’ हा सगळा दागिन्यांच्या दुकानांनी भरलेला असल्यामुळे आम्ही त्यात फार पुढे गेलो नाही. फक्त त्याच्या तोंडाला असलेल्या एका काचेच्या शोरूममध्ये जगातली सगळ्यात मोठी सोन्याची अंगठी होती ती पाहायला थांबलो. तिचे आधी फोटो पाहिलेले होते, आणि तिचा तो रंग आणि त्यात बसवलेला तो महाकाय बावीस कॅरेटचा हिरा वगैरे पाहून ‘हो, सुंदर आहे, ठीक आहे’ एवढंच वाटलं होतं. एरवीही आमच्या तोंडून उसासे बाहेर काढण्यात कुठल्याही दागिन्यापेक्षा एखादं भारी इलेक्ट्रॉनिक उपकरण केव्हाही जास्त यशस्वी ठरलं असतं, पण इथे आलोच आहोत तर ती अंगठी एक पाहून घेऊ म्हणून थांबलो. पण तिच्यापुढची गर्दी हटेचना; म्हणून मग आम्ही मागे फिरलो आणि आमच्या हसतमुख गाईडचा निरोप घेऊन आमच्या धाऊ बोटीकडे निघालो.     
बोटीवर चढलो तेव्हा संध्याकाळ झालेली होती आणि संधीप्रकाशात खाडीचं पाणीच सोनेरी वाटत होतं. त्या दृश्याने घातलेली मोहिनी गोल्ड सूकच्या आवाक्यातली नव्हती. तिकडे मुख्य दुबईत दिवेलागणी सुरु झालेली होती आणि आकाशात उंचावर कुठेकुठे दिवे दिसू लागले होते. बोटीच्या वरच्या मजल्यावर आम्ही बसलो आणि ‘बघूया’ म्हणून ते उंटाच्या दुधाचं आईस्क्रीम घेतलं. त्याची चव अगदीच वेगळी होती आणि मला ती आवडलीही, पण वीस दिरहॅमच्या (यु.ए.इ.चं चलन) योग्यतेची वाटली नाही. मग बोट जसजशी खाडीतून आत जायला निघाली तसे आम्ही तिच्या मागच्या टोकाला उभं राहून दुतर्फा पसरलेल्या दुबईकडे पाहत राहिलो. बोटीवर लावलेली अरबी गाणी वातावरणाला साजेशीच होती. सगळं वातावरणच प्रसन्न होतं. खाडीत बरंच पुढे जाऊन आम्ही एका पुलाच्या अलीकडे वळण घेतलं आणि आल्या दिशेने परत निघालो. पूर्वी एका केरळला केलेल्या बॅकवॉटर सफारीची आठवण झाली, पण तिथल्या त्या हिरव्या साम्राज्याची सर या खाडीला आणि आजूबाजूच्या जुन्या दुबईला कशी असेल? पण मग म्हटलं अशी तुलना का करायची? निसर्गसौंदर्याचा तोड नाही हे खरंच, पण फक्त नैसर्गिक गोष्टीच सुंदर असतात असंही नाही ना? 
दुबईचा दिएरा हा भाग तसा बकाल हा खराच. मुख्य शहराचा चकचकीतपणा त्यात नाही. पण दुबईला घडवणारे हात इथे असतात. तिच्या समृद्धीची सुरुवात झाली ती इथे. तिकडे परदेशी लोकांच्या घोळक्यात हरवलेला अरब इथे अचानक आपला माणूस होऊन जातो. तिकडे फार झपाट्याने नवनवीन बदल होत असताना इथले कष्टकरी लोक, अजूनही मासे पकडून, मसाले कुटून आणि कारागिरी करून आपापलं पोट भरतात. आणि हे दोन्ही भाग एकमेकांना झाकत नाहीत; उलट त्या सुंदर नक्षीदार फ्रेममधून एकमेकांकडे कौतुकाने पाहतात.                                                                                                                   
बोटीवरून उतरताना मी खाडीपलीकडच्या मुख्य दुबईकडे एकदा नजर टाकली. बुर्ज खलिफा पुन्हा दिवे मिचकावताना दिसला, पण का कुणास ठाऊक तो आदल्या रात्रीपेक्षा वेगळाच वाटत होता. 
जुन्या दुबईच्या या दौऱ्यामुळे एक गोष्ट मात्र घडली; ‘दुबई म्हणजे बुर्ज खलिफा’ हे समीकरण माझ्या डोक्यातून कायमचं निघून गेलं.                                


  

The Dubai Diaries continue on DD6

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प