Dubai Diaries: दौरा ३
‘दिएरा सिटी सेंटर’ नावाच्या जुन्या दुबईतल्या मॉलच्या एका फूड कोर्टमध्ये एका टेबलाशी बसून मी बाबांनी आमची ऑर्डर घेऊन यायची वाट पाहत होतो. अरबी खाद्यसंस्कृतीतल्या पदार्थांच्या बाबतीत मी तोपर्यंत जवळपास पूर्णपणे अनभिज्ञ होतो. ‘शवार्मा’ हा एकच पदार्थ ऐकून माहित होता (आणि ऐकलंही होतं ते आयर्न मॅनच्या तोंडून शिफारशीच्या रूपात!) त्यामुळे त्या रात्री आम्ही तो बेत ठरवला होता. ऑर्डर देत असतानाच तो प्रकार पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. एका खूप मोठ्या आकाराच्या एस्प्रेसो कॉफी यंत्राची कल्पना करा, आणि त्याच्या त्या कॉफी ढवळणाऱ्या सळया अगदी खालपर्यंत पोहचून यंत्राच्या तळात पक्क्या बसवल्या आहेत असं समजा. या दोन उभ्या सळया दोन मांसाच्या मोठ्या गोळ्यांच्या मधून आरपार खुपसलेल्या होत्या, आणि ते मांस आमच्या डोळ्यांसमोर गोल फिरवत भाजलं जात होतं. त्या गोळ्यांच्या रंगांवरून मी एक चिकन असल्याचं ओळखलं आणि मला अभिमान वाटला, पण दुसरा गोळा चिकनचा ‘नव्हता’ एवढंच मला कळू शकलं. तिथला माणूस आमची ऑर्डर घेताघेता मधूनमधून त्याच्यावर जरा मसाले पसरवत होता. ते बघण्याच्या अनुभवाची तुलना मी फक्त अर्धं लिंबू फिरवून भाजल्या जाणाऱ्या कणसाकडे बघण्याच्या अनुभवाशीच करू शकतो. मग आम्ही शिवाय ऑर्डर केलेला भात वगैरे आल्यावर त्याने आमच्यासमोर एक मोठी सुरी त्या चिकनच्या गोळ्यावर फिरवून त्याचे तीन लांबसडक तुकडे आमच्या भातावर पसरले. त्या जेवणानंतर मी आनंदाने कुणासाठीही आयर्न मॅनची भूमिका बजावली असती (अर्थात त्याला इतरही कारणं आहेत म्हणा!)
आमच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्याची सुरुवात आता होणार होती. बिग बसच्या ‘नाईट टूर’ मध्ये प्रवेश मिळण्याचीही सोय आमच्या तिकिटावर होती. ही नाईट टूर सगळ्या महत्वाच्या ठिकाणांना भेट देऊन जिथून सुरु होते तिथेच संपते. आमची रात्रीची बिग बस दिएरा सिटी सेंटरमधूनच सुटणार होती, म्हणून आम्ही जेवण झाल्यावर सहस्रपावली करून मॉलच्या दुसऱ्या टोकाला जाऊन थांबलो. पण आम्हाला टूरच्या शेवटी दिएरात परत यायचं नसल्याने आम्हाला कुठेतरी एक बस बदलावी लागणार होती, आणि असं करायची परवानगी होती का नाही याची आम्हाला कल्पना नव्हती. नकाशावर तर सगळीकडूनच सुटणाऱ्या बसेस तशाच फेरी मारून थेट परत येताना दाखवल्या होत्या. एका ‘कॉमन पॉईंट’ ला दुसऱ्या बसशी वेळ जुळवणं गरजेचं होतं. आम्ही चढतानाच ड्रायव्हरशी बोलून घेतलं, पण तो अगदीच आरामात होता. पुण्याच्या रिक्षावाल्यांसारख्या स्वरात त्याने आम्हाला ‘काही टेन्शन न घेता आरामात बसून घ्यायला’ सांगितलं. मग आम्हीही वेळ पडलीच तर मॉल ऑफ द एमिरेट्सच्या जास्तीत जास्त जवळ उतरून काकाला बोलवून घेता येईल असा विचार करून, टेन्शन न घेता वरच्या मजल्यावर बसच्या छत नसलेल्या भागात जाऊन बसलो.
बस सुरु झाल्यावर आजूबाजूच्या लोकांनी पिकनिकला निघाल्याचा थाटात ‘थ्री चिअर्स’ वगैरे सुरु केलं. माझ्याकडे ते इअरफोन्स होते पण आता काही ऐकण्यासारखं उरलेलं नव्हतं. आधी मला दिवसा पाहिलेल्या स्थळांना पुन्हा रात्री भेट देण्यात काय एवढं आकर्षक आहे, की ज्यासाठी बिग बसने एक स्वतंत्र टूर काढावी, ते कळलेलं नव्हतं. पण दुबईच्या मानाने संथ अशा ८०-९० च्या वेगाने आमची बस दिएरातून बाहेर पडून मुख्य दुबईकडे निघाली तेव्हा मला सहज कळलं. सकाळी पाहिलेल्या सगळ्या इमारती स्वतःच्या वेगळ्याच दिव्यांच्या प्रकाशात अधिकच सुंदर दिसत होत्या. सकाळी जरी त्यांना असं दाटीवाटीने उभं असलेलं पाहिल्यामुळे त्या तितक्याशा आवडल्या नसल्या तरी रात्रीच्या प्रकाशात त्यांचं स्वतंत्र रूप खुलून दिसत होतं. प्रत्येकीला एक वेगळाच स्वभाव होता, सांगण्यासारख्या वेगळ्याच गोष्टी होत्या. त्यांच्या मधून फिरताना त्या लांबून वाटल्या तेवढ्या दाटीवाटीने उभ्या नसल्याचंही जाणवलं. मग वाटून गेलं, जिथे क्षितिजापर्यंत फक्त जागाच जागा असल्यामुळे इमारतींचं जंगल पसरवून त्यात ठिकठिकाणी आपणहून झाडं लावणाऱ्या दुबईत, गिचमिड करायची गरजच काय? तो देखावा पाहून मला खरोखरच गगनचुंबी इमारतींचं केवढं मनापासून आकर्षण वाटतं ते व्यवस्थित कळलं. गालावर रेंगाळणाऱ्या थंडगार हवेच्या झुळुकेचा आस्वाद घेत मी त्य अद्भुत दृश्याकडे बघत राहिलो.
जरा वेळाने माझ्या लक्षात आलं, की ही थंडगार झुळूक काही जाण्याच्या विचारात दिसत नव्हती; उलट गारवा क्षणोक्षणी वाढत चालला होता. ‘वा’ चा ‘ठा’ व्हायला फार वेळ लागला नाही आणि माझं पुलोव्हर घातलेलं असूनही मी कुडकुडायला लागलो. रात्र पडल्यावर वाळवंट खूप वेगाने थंड पडतं हे ऐकलं होतं, पण तेव्हा ते प्रकर्षाने जाणवलं. पण यानंतर काही मिनिटांतच त्या गारठ्यामागचं खरं कारण समोर आलं आणि मला धक्काच बसला.
पाऊस!
वाळवंट आणि पाऊस या आपल्या नजरेत इतक्या परस्पराविरोधी गोष्टी वाटतात की सुरुवातीला मी समोरच्या काचेवर येणारे मोठाले थेंब पावसाचे नसून चालताचलताच काचा साफ करण्याची काहीतरी आधुनिक पद्धत असेल असं स्वतःला पटवत होतो. तेच पाणी हळूहळू डोक्यावरून चेहऱ्यावर ओघळायला लागलं तेव्हा मात्र खात्री पटली. आजूबाजूचे लोक, माझ्याइतके नसले तरी चकित झालेले होते खरे. जोर फारसा नव्हताच, शिवाय तो थंडगार स्पर्श हवाहवासा वाटत असल्याने आम्ही तसेच तिथे बसून रंगाने हळूहळू गडद होत चाललेले रस्ते पाहत राहिलो. पण पावसाच्या मते आमची खात्री पटायची राहिलेली होती बहुधा. त्याचा जोर वाढत गेला आणि थोड्याच वेळात तो अगदी पावसाळ्यातल्या रोजच्या सरीसारखा कोसळू लागला. मग मात्र त्या छोट्याशा जिन्यावरून बसच्या खालच्या भागात जाण्यासाठी एकच झुंबड उडाली.
माझ्या मनात आलं, खरंच, किती वेगवेगळ्या कल्पना असतात आपल्या आपण न पाहिलेल्या गोष्टींबद्दल! वाळवंट म्हणजे कोरडा रखरखाट; एकतर नुसती नजर पडेल तिकडे वाळू नाहीतर रंगहीन, भेगा असलेली जमीन… हेच नाही का चट्कन आपल्या डोळ्यासमोर येत? ओसाड, वैराण. पण मग वाटलं, अबू धाबी ते दुबई या तशा दीर्घ प्रवासात आपण वाळवंट पहिल्यांदाच नीट पाहिलं, तरीही आपल्या कल्पना का बदलल्या नाहीत? हा प्रदेश काही पूर्णपणे ओसाड नाही; आमच्या रस्त्यावर तर आम्हाला पावलापावलाला रानटी झुडुपं लागली होती. जमीनही रंगहीन नव्हती, काही ठिकाणी सुरेख लालभडक रंगाची तर दुसरीकडे पिवळ्याची कुठलीतरी अनोखी छटा. ती रेताळ असली तरी कल्पनेइतकी कोरडी नव्हती. आणि आता तर तिथे थंडीच्या काळात, आपल्याकडे येतात तितक्या वारंवार नाही तरी अधूनमधून, पावसाच्या अशा सरी येतात. ते पाणी पुरत नाही हे उघडच आहे, पण पाऊस आहे. मनात आलं, तो तहानलेल्या भटक्याची क्रूर थट्टा करण्यासाठी प्रसिद्ध असलेला अथांग वालुकासागर आहे तरी कुठे?
प्रत्यक्षात तो आमच्यापासून काही किलोमीटरच लांब होता. आणि त्याचा बहुतांश भाग अगदी तसाच असणार हेही मला माहित होतं. पण का कोण जाणे, तिथे पाऊस पडताना पाहून मला आतून खूप बरं वाटलं. आपल्या आईला तिचे सगळे प्रदेश सारखे. काही ठिकाणी जरा टोकाची परिस्थिती दिसली तरी, कधीतरी, कुठल्याही रूपात, उत्साह आणि आशा पल्लवित करणारा तो येऊन चेहरा भिजवून जातोच. वेगळी असली तरी वाळवंटातही फुलं उमलतात. एका पूर्वी वाचनात आलेल्या, चपखल बसलेल्या एका उपमेनुसार, दुबई स्वतःच त्यांच्यापैकी एक नाही का?
दरम्यान आम्ही एका अवाढव्य, इजिप्तची आठवण करून देणाऱ्या मॉलच्या परिसरात आलो होतो. पाऊस थांबला होता. दुपारी तिथूनच पुढे गेल्यामुळे मला तो ओळखू आला. त्या अजस्त्र वास्तूचं नाव ‘वाफी’ असं होतं. त्याच्या एका भागात मॉल असला तरी उरलेल्या भागात काही व्यावसायिक इमारतींसारखी सोय आणि एक Amusement Part सुद्धा होती. वाफीचं वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण इजिप्शियन बांधकाम आणि रचना. त्याच्या प्रत्येक मोठ्या, बसही जाऊ शकेल इतक्या मोठ्या प्रवेशद्वारांवर स्फिंक्ससारखे दिसणारे दोन मोठे पुतळे उभे केलेले होते. दिवसा त्यांचे रंगीत मुकुट आणि तत्सम गोष्टी पाहायला मजा आली होती.
वाफीला बस थांबल्यावर आम्हाला आमच्या ड्रायव्हरच्या निवांतपणाचं कारण कळलं. तिथे दुसरी बस आधीपासून आलेली होती आणि ज्यांना बदलायची इच्छा होती त्यांना घेऊन जाण्यासाठी तयारच होती. आमच्यासारखेच अजून पाचसहा लोक निघाले. ही बस मॉल ऑफ द एमिरेट्समधून सुटली असल्याने तिथेच परत जाणार होती, पण तिची ‘टूर’ अजून व्हायची असल्याने आम्हाला पोचायच्या आधी परत सगळं एकदा पाहावं लागणार होतं. मी नकाशा पाहिला, त्यावरून आम्हाला पाम जुमेराहला पुन्हा एकदा वळसा घालावा लागणार होता असं कळलं. तोपर्यंत मी जरासा दमलो असल्यामुळे मला त्यात काही फार उत्साह नव्हता खरा, पण बाबा म्हणाले की पुन्हा कधी आपल्याला अगदी काळोखात एका बाजूला अटलांटिस आणि दुसऱ्या बाजूला शांत, आकाशाशी एक झालेला समुद्र पाहायला मिळणारे? ते खरंच होतं, शिवाय ते पाहायची इच्छाही होती, म्हणून आम्ही पुन्हा उत्साहाने वर जाऊन बसलो.
वाफीमधून बाहेर पडून पुन्हा मुख्य रस्त्याला लागल्यावर काही वेळाने समोरच्या दृश्याने माझा थकवा कुठच्या कुठे पळवून लावला. डावीकडे वळून आम्ही दुबई मॉलच्या प्रचंड आवाराला वळसा घालायला लागलो होतो. तेव्हा दोन इमारतींच्या मधून मी पहिल्यांदाच ‘त्याला’ पूर्ण पाहिलं. इतर सगळ्या इमारतींप्रमाणेच रात्रीच्या वेळी त्याचं सौंदर्य खूपच वाढलेलं होतं. आमच्या रस्त्यालगतच्या दोन गगनचुंबी इमारती आणि त्यांच्यामधून दिसणाऱ्या त्याच्यामध्ये खूप अंतर असलं तरी त्याचा टोकदार सुळका त्या दोघींच्या वर आकाशात पोहोचलेला होता. आता तर मध्येच मोठी भिंत आली, डोक्यावर पूल आला तरी त्याचं टोक दिसतच होतं. आमची बस जशी वळत होती तशा सगळ्यांच्या माना फिरून त्याच्याकडे वळत होत्या आणि उसासे टाकत सगळे त्याला वेगवेगळ्या अँगल्सनी पाहून घेत होते. कधी नुसतंच चमकणारं टोक, तर कधी तिरपा झाल्यासारखा दिसणारा वरचा बहुतेक सगळा भाग, आणि काही वेळाने पुन्हापुन्हा तिन्ही पायांवर ताठ उभा असलेल्या त्याचं सबंध रूप. त्याच्या सगळ्या, वळणदार जिन्यासारख्या वाटाव्यात अशा अंतरांवर असलेल्या अर्धवर्तुळाकार गच्च्या शुभ्र पांढऱ्या रंगात चमकत असून त्याचा उर्वरित सगळा देह गडद काळा होता, पण काळाही इतका स्पष्ट की नीट बघितल्यावर त्याच्यावरची काच न् काच मोजता यावी. तब्बल वीस मिनिटं (त्यासाठी ट्रॅफिकचेही आभार मानायला हवेत!) त्याला असं सर्व बाजूंनी न्याहाळल्यानंतर बस पुन्हा मुख्य रस्त्याला लागली. काही वेळ जाऊ दिल्यानंतर मी परत मागे वळून पाहिलं. बुर्ज खलिफा तिथेच होता; दिवे मिचकावत.
त्यानंतर नाईट टूरमध्ये खूप अवर्णनीय असं काही घडलं नाही. नाही म्हणायला पाम जुमेराहवर परत गेलो तेव्हा समुद्र खरंच अगदी सुंदर दिसला, आणि अटलांटिसही वेगळ्याच हिरव्या दिव्यांच्या प्रकाशात उठून दिसत होता. बेटाच्या ‘कण्यावरून’ आम्ही पुन्हा एकदा फिरून आलो ते आमच्या ओळखीच्या अल बरशा परिसरात. इथे तुलनेने तशी शांतता होती. मॉल ऑफ द एमिरेट्स मध्ये मात्र पुन्हा सगळं गजबजाट अनुभवायला मिळाला. काकाने तो आम्हाला घ्यायला येत असल्याचं सांगितलं होतं.
दिवसभराच्या प्रदीर्घ सहलीमुळे आलेला थकवा आता मॉल ओलांडताना पावलापावलावर जाणवत होता. तरीही आम्ही दिवसाच्या कामगिरीवर खूपच संतुष्ट होतो. ही कल्पना खरोखरच चांगली असल्याचं मला प्रकर्षाने वाटलं. जरा धावपळ झाली असली तरी आता दुबईची पूर्ण ओळख तरी झाली होती. आता हव्या त्या ठिकाणांना परत वेळ देऊन भेट द्यायला नऊ दिवस हातात होते. या विचाराने आनंदित होऊन मी बाबांच्या मागून काकाच्या गाडीत मागे बसलो आणि आठवणीने सीटबेल्ट लावला.
पंधरा तासांपूर्वीच आम्ही बाहेर पडलो होतो खरे, पण आता ते सगळं पूर्वी घडून गेल्यासारखं वाटत होतं. मी पुन्हा सकाळपासूनच्या सगळ्या घटना आठवून पाहिल्या आणि मला प्रश्न पडला… खरंच आपण हे सगळं एका दिवसात केलं? मरिनामधलं सुंदर, स्वच्छ पाणी, समुद्रकिनारा, पाम जुमेराह, अटलांटिस, पुन्हा एका मॉल ऑफ द एमिरेट्स, बुर्ज खलिफा, वाफी, संग्रहालय, दुबई फ्रेम, ती चालण्याची सहल, ते आब्रामधून खाडी पार करणं, स्पाईस सूक, धाऊवरून खाडीतला प्रवास, शवार्मा, रात्रीचं खास सौंदर्य आणि पुन्हा एकदा पाम जुमेराह..... या सगळ्या गोष्टींचं एक कोलाज मनात तयार झालेलं होतं. सगळं एकाच दिवसात केल्यामुळे त्याबद्दल लिहायला घेतल्यावर सगळे तपशील आठवणार नाहीत असं वाटलं होतं, पण आता प्रत्येक वेगळ्या गोष्टीचा तुकडा स्वतंत्रपणे डोळ्यासमोर येऊन गेल्यासारखा वाटतोय.
घरी पोहोचलो तेव्हा माझी बहीण आमची वाट बघत जागीच होती. तिच्या लाडक्या शहराबद्दलच्या आमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आतुर झाल्यासारखी. थोड्या वेळाने तिचा प्रश्न आलाच,
“काय, मग कशी वाटली दुबई?”
मी फक्त हसलो आणि खिडकीकडे गेलो. तीही माझ्याशेजारी येऊन उभी राहिली. बराच वेळ काही न बोलता आम्ही फक्त खिडकीतून बाहेर बघत बसलो.
Comments
Post a Comment