Dubai Diaries: आडवळणावर


‘दुबई दर्शन’ झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी काकाने सगळ्यांना लवकर उठवलं. आजच्या दिनक्रमाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अगदी साध्या शब्दांत सांगायचं झालं तर, एक पिकनिक होती. यापूर्वी कार्टूनमध्ये पाहिलेल्या ‘पिकनिक’ कधी स्वतः अनुभवलेल्या नसल्या तरी त्या अनुभवाच्या खूप जवळ जाणारी कल्पना सिंहगडावर अनेकदा जाऊन आल्यामुळे आली होती. तेव्हा ‘पिकनिक’ म्हटल्यावर माझ्या मनात पहिल्यांदा सिंहगडच आला, आणि मला त्या निसर्गाची अचानक प्रकर्षाने आठवण आली. तो सगळा, ‘हिरवागार’ या शब्दाच्या अर्थाची योग्य प्रचिती करून देणारा प्रदेश, त्या पावसाच्या थेंबांनी ओल्या झालेल्या पायवाटा, बाहेर धुकं आणि पावसाचा जोर वाढत असताना एखाद्या तंबूच्या आत बसून खाल्लेली कांद्याची आणि बटाट्याची भजी..... ही पिकनिक खरी! इतर वेगळ्याच प्रकारचे अनेक अनुभव देऊ शकत असली तरी अशा अनुभवाशी स्पर्धा करणं दुबईला कधीतरी शक्य झालं असतं का? या प्रश्नाचं उत्तर काही देता येणार नाही, कारण मला जो अनुभव आला तो खरोखरच वेगळाच आणि अविस्मरणीय होता, पण तो दुबईत घडलाच नाही.  
आज आमचा बेत शेजारी डोकावण्याचा होता. या छोट्याशा देशाच्या सात अमिरातींपैकी सर्वांत मोठ्या अमिरातीत, म्हणजेच अबू धाबीत ते मुख्य शहर सोडून इतरही अनेक गावं आणि छोटी शहरं होती. त्यापैकीच एक म्हणजे ‘अल एय्न’ हे गाव. (गावाचे नाव उच्चरानुसार लिहिले आहे. फार वेळ प्रयत्न करत बसू नये) या गावाच्या आजूबाजूच्या परिसरात एका ठिकाणी एक खूप मोठी जागा खास बार्बेक्यू पिकनिकसाठी तयार केलेली आहे; तिकडेच आम्ही चाललो होतो. सगळं सामान आपलं आपणच न्यायचं असल्याने त्याची जमवाजमव करण्यासाठीच लवकर उठलो होतो. काकूची बार्बेक्यू ग्रील आणि ती उभी करायच्या वस्तू वगैरे काढायला गच्चीत गेलो तेव्हा तिथे त्या सगळ्या सामानावर एका कबुतराने घरटं केलेलं सापडलं. ‘काही गोष्टी कुठेच बदलत नाहीत’ यावर चर्चा करत आम्ही त्या घरट्याला धक्का लागू न देता ते सामान काढायचा प्रयत्न केला. 
काकाच्या ‘पजेरो’चा मागचा सगळा भाग त्या सामानाने व्यापल्याने आम्ही पाचजण पुढच्या आणि मधल्या सीट्सवरच बसलो, आणि मध्ये बसल्यामुळे मला तो मधला सीटबेल्ट लावायची संधी मिळाली. अल बरशा मधून बाहेर पडून आम्ही दक्षिणेकडे निघालो. मुख्य रस्त्यावर आल्यावर मला मध्ये बसल्याचा आनंद झाला, कारण तिथून पुढच्या दोन्ही सीट्सच्या मधून समोरचा रस्ता अगदी स्पष्ट दिसत होता. 
रस्ता त्या सकाळच्या वेळेलाही तसा शांत होता. रहदारी तशी कर्वे रोडएवढीच असली तरी आजूबाजूला वाळवंट असल्याने ती शांतता विशेष जाणवत होती. तसा आमच्या गप्पांना अंत नव्हता, पण आजूबाजूला बघितलं की तो एक वेगळ्याच प्रकारचा एकाकीपणा जाणवायला लागला होता. आम्ही मुख्य दुबई शहराच्या हळूहळू बाहेर पडत होतो, आणि आजूबाजूला असलेल्या इमारतींची संख्या कमी होत होती. ज्या होत्या त्याही बऱ्याचशा मोठ्या कारखान्यांच्या किंवा शोरूम्सच्या किंवा तत्सम ‘व्यावसायिक’ प्रकारच्या होत्या. मग तर त्या संपल्याच. त्यानंतर खूप वेळ आजूबाजूला फक्त मोठे रेडिओ आणि इतर टॉवर्स, त्यांची तारांची जाळी आणि अधूनमधून काही तेलविहिरी दिसत होत्या. सूर्य आत्तापासूनच तळपायला लागलेला होता आणि त्याच्या प्रकाशात समोरचा रस्ता खूपच चमकत होता. क्षितिजाकडे बघायला त्रास व्हायला लागला होता. माझ्या बहिणीने माझं लक्ष उजवीकडे वळवलं, तर तिकडे दूर दुसऱ्या टोकाला दुबईची स्कायलाईन अगदी धूसर दिसत होती आणि त्यात उभं राहून निरोप देत असल्यासारखा दिसणारा बुर्ज खलिफा अर्थातच ओळखू येत होता, पण आकाशाच्या पृष्ठभागावर उभ्या केलेल्या एका सुईसारखा. मनुष्यवस्तीपासून लांब जात असल्याची भावना क्षणोक्षणी मनात घर करत चालली होती. तरी हास्यविनोद, गप्पा, गाणी वगैरे यांच्यात तो प्रवासाचा वेळ चांगला गेला.    
आम्ही निघालो लवकर असल्याने थेट पिकनिकचा ठिकाणी जाण्यात काही अर्थ नव्हता, म्हणून आम्ही आधी त्याच भागातल्या एका प्रसिद्ध डोंगरावर चाललो होतो. डोंगर लांबून दिसायला लागेपर्यंत आजूबाजूच्या परिसरात होत गेलेले सूक्ष्म बदल काका-काकूने आमच्या निदर्शनास आणले होते. बराचसा प्रवास रेताळ वाळवंटातून केल्यानंतर आता जमीन जास्त टणक, जास्त पांढरट रंगाची अशी होत चाललेली होती. पृष्ठभाग सपाट नव्हताच, फक्त आधी जिथे वाळूच्या लाटा होत्या तिथे आता मोठाले खडक दिसू लागले होते. आत्तापर्यंत पाहिलेले सगळे डोंगर - अगदी सिंहगडावरून दिसणाऱ्या रांगा किंवा हिमालयाच्या पायथ्याच्या भागातले डोंगर - त्या लालसर मातीच्या रचनेत ठिकठिकाणी पसरलेल्या हिरव्या आच्छादनाच्या एकत्रीकरणातून निर्माण होणाऱ्या सुखावह रंगाचे होते; आणि त्यांच्या आजूबाजूचा परिसरही. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आमच्या समोरचा तो डोंगर ‘लॉर्ड ऑफ द रिंग्स’ मधल्या ‘Mount Doom’ नावाच्या राक्षसी ज्वालामुखी पर्वतासारखा वाटला.
प्रत्यक्षात त्याचं नाव ‘जेबेल हफीत’ असं होतं. तो व्यवस्थित दिसायला लागल्यावर काकाने एक कुतूहलजनक माहिती पुरवली; ती म्हणजे ‘रेस’ नावाच्या हिंदी सिनेमातला त्याचं नाव सार्थ करणारा एकमेव सीन या डोंगरावर शूट करण्यात आला होता म्हणे. तो सिनेमा खूप पूर्वी आणि तेव्हाही बाजूला पत्त्याचा डाव चालू ठेवूनच पाहिलेला होता खरा, पण त्या रस्त्यावरून जाताना ते खरं असल्याचं कळलं. डोंगराच्या अफाट विस्तारावरून अनेक नागमोडी वळणं घेत पसरलेल्या रस्त्यांचं मला कधी खूप आकर्षण वाटलं नव्हतं. चंदनापुरीचा घाट फक्त त्याचा अर्थ संगमनेर जवळ आलं असा होत असल्यामुळे आवडायचा. त्यानंतर हिमालयात अनेकदा त्याहून कैक पटींनी भयंकर रस्त्यांवरून अनेकदा प्रवास केला. अगदी समोरचं धुक्याने झाकलेलं असताना आणि गाडीच्या चाकांच्या काही इंच पलीकडे जिचा तळ दिसत नाहीये अशी दरी असताना ड्रायव्हरला एका हाताने रेडिओवरची गाणी बदलत गाडी चालवताना पाहिलं, आणि विमानतळावर जाण्यासाठी आम्ही सहासात दिवसांनी पहिल्यांदा सपाट जमिनीवर आलो तेव्हा मी खरंच हुश्श केलं. तरी या डोंगरावर त्या रस्त्यावरून जायला थोडी मजाही आली. प्रत्येक मोठ्या वळणानंतर एका बाजूला क्षितिजापर्यंत पसरलेलं वाळवंट दिसे, आणि जरा नीट बघितलं की त्या ‘अल एय्न’ गावातली छोटीछोटी घरं कुणीतरी चौकोनात बसवल्यासारखी दिसत होती. जरा अजून लांबवर नजर टाकली की अबू धाबीचं मुख्य शहरही दृष्टीस पडू शकत होतं. दुबईचा पत्ता नव्हता, पण काकूने एका दिशेने बोट दाखवून ती तिकडे असल्याचं सांगितलं. त्यावरून मागच्या दीड-दोन तासांत आम्ही त्या, ब्रशच्या एका साध्या फराट्यानेही साकारता येईल अशा सपाट भूप्रदेशाचा खूप मोठा भाग ओलांडला होता हे कळत होतं. 
डोंगराच्या शिखराच्या जवळ, एका लहानशा पठारावर दोन ‘बेस’ केलेले होते. त्यापैकी एक खासगी प्रॉपर्टी होती हे त्याकडे दुसऱ्या बेसवरून पाहिल्यावर कळलं. त्या रस्त्यावरून सायकलच्या शर्यती आखल्या जातात आणि त्यांच्या व्यवस्थेची अधिकृत जागाही आम्हाला मध्ये लागली होती. आम्ही ज्या बेसवर होतो तिथे फक्त एक प्रचंड आवार होतं आणि त्यातली बहुतेक सगळी जागा पार्किंगसाठीच ठेवलेली होती. त्या डोंगरावर उन्हाचं येणाऱ्या लोकांना काही त्याच्या खडकाचं शास्त्रीय विश्लेषण करायचं नसणार हे त्यांनाही माहित असणारच होतं. तिथे येणारे सगळे पर्यटक आमच्यासारखेच त्या उंचीवरून दिसणारी दृश्यं  पाहण्यासाठीच येतात, त्यामुळे त्यांना मनसोक्त सगळ्या अँगल्सनी पाहण्यासाठी जागा आणि एका कोपऱ्यात एक छोटंसं ‘क्षुधाशांतीगृह’ एवढंच त्या पर्यटनस्थळात होतं. तसं उंचीवरून पाहण्यासाठी बुर्ज खलिफा आहेच, पण शेवटी इमारतींचा सम्राट असला तरी या महाकाय पर्वतावरच्या त्या पठाराची सर त्याच्या गच्चीला कुठून येणार? पण त्या पठाराच्या कड्याच्या बाजूने एक सबंध गोल चक्कर मारून आणि तो सगळा प्रदेश एकदा डोळ्याखालून घातल्यावर असं वाटलं, की बघायचं जर शेवटी हे वाळवंटच आहे तर मग जेबेल हफीत काय आणि बुर्ज खलिफा काय! आपण एरवी डोंगर चढायला वगैरे जातो ते त्यावरून दिसणारा, सगळीकडे पसरलेला हिरवागार निसर्ग पाहायला येतो. इथे मात्र आम्ही त्या दृश्यातल्या सगळ्या गोष्टींचा अभाव पाहत उभे होतो. 




पण तरी तिथे चांगला तासभर फिरायला मजा आली खरी. आमच्या कंपूतल्या हौशी फोटोग्राफर्सनी, म्हणजेच अर्थात बाबा आणि काकूने ‘बॅकड्रॉप’ मध्ये जरा मनासारखा बदल झाला की आम्हाला तिथे वेगवेगळ्या पोझ घ्यायला सांगितल्या आणि पुढच्या अनेक वर्षांसाठी वाढदिवसाच्या ‘स्टेटस स्टोरीज’ची सोय करून दिली. मग आम्हीही उत्साहाने एकाच वेळी चार ठिकाणी उभे असल्याचा भास निर्माण करणारे पॅनोरमा काढायला बाबांना आणि काकूला मदत केली. भरपूर वेळ हाताशी असल्यावर परम्युटेशन-कॉम्बिनेशन लवकर संपत नाहीच. काकाने तेवढ्यात त्या डोंगराची एक भारी खासीयत सांगितली. त्या डोंगराच्या एका बाजूला ओमान देश होता! ज्या शहराला मी मगाशी उगीचच अबू धाबीचं कुठलंतरी उपनगर समजलो होतो ते ओमानमधलं एक गाव निघालं. दोन देशांच्या बॉर्डरवर उभं राहण्याची माझी ही पहिलीच वेळ होती. (तसं पाहायला गेलं तर हिमालयात एके ठिकाणी आमच्या गाईडने शेजारच्या एका मोठ्या डोंगराच्या पलीकडे चीन असल्याचं सांगितलं होतं खरं, पण इथे म्हणजे दोन्ही देश दिसू शकत होते) तो सगळा प्रदेश एकसारख्याच दिसणाऱ्या वाळवंटाचा भाग असल्यामुळे हे आपल्याला जन्मात कळलं नसतं असं मी स्वतःशी कबूल केलं, पण मग वाटलं की इथे वाळवंटाऐवजी दुसरं काहीही असतं तरीही आपल्याला कळलं नसतंच. या सगळ्या रेषा माणसाने नकाशावर आखलेल्या, प्रत्यक्षात त्या ठिकाणच्या निसर्गाला काय त्याचं?
शेवटी त्या कॅफेत जाण्यापूर्वी आम्ही आमचा सगळ्यांचा एक ग्रुप फोटो काकाच्या आयफोनवर एका अमेरिकन मुलीकडून काढून घेतला, आणि कॅफेजवळच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दोन भल्यामोठ्या ‘हार्ले डेव्हिडसन्स’पाशी दोन क्षण घुटमळून मग आत शिरलो. तिथे गेल्यावर अगदी भारतात परत आल्यासारखं वाटलं, कारण त्याची रचना आपल्याकडच्या काही चांगल्या ढाब्यांसारखीच होती. तिथे मधल्या प्रवासासाठी काहीतरी विकत घेऊन परत बाहेर पडलो, आणि तो सगळा व्यवहार हिंदीत झाला होता त्यावर विचार करत जेबेल हफीतला निरोप दिला. 
त्या पिकनिकचा ठिकाणी आल्यावर त्या चहूकडे पसरलेल्या हिरवळीने डोळे सुखावले. त्या डोंगराजवळच्या प्रदेशातलं ‘ग्रीन मुबाझराह’ नावाचं एक खूप मोठं उपवन खास त्यासाठी प्रसिद्ध होतं. त्या संपूर्ण भागात फक्त एक पोहण्याचा तलाव आणि त्याच्या शेजारची शॉवर घेण्याची जागा, तसंच काही लहान दुकानं आणि ‘रेस्टरूम्स’ एवढं सोडता त्या हिरव्या चादरीवर एकही राखाडी ठिपका नव्हता. उरलेल्या सगळ्या भागात ठराविक अंतरावर बार्बेक्यू ग्रील्स उभ्या करायचे स्टॅंड्स लावून ठेवलेले होते आणि अधूनमधून चार खांबांवर उभी केलेली काही कौलारू छतं होती. आम्हाला आमची जागा एका मोठ्या झाडाच्या सावलीत सापडली. रस्त्याच्या जवळच होती आणि एका छोट्या झऱ्याच्या काठावरही होती. त्या झऱ्याचं वैशिष्ट्य कळल्यावर त्या जागेच्या सौंदर्यात खूपच भर पडल्यासारखं झालं. 




काका-काकू आणि बाबा गाडीतून सामान आणून लावत असेपर्यंत आम्ही दोघं त्या झऱ्याच्या काठावर जाऊन बसलो. त्या झऱ्यात पाय ठेवून बसणं हा तोपर्यंतचा सगळ्यात सुखावून टाकणारा अनुभव होता. तो झरा लहानसाच होता आणि दोन दगडी भिंतींच्या मधून वाहत होता. तळाशी खूप शेवाळं उगवलं असल्यामुळे पाणीही हिरवं दिसत होतं. दोन्ही बाजूंना काठावर समुद्रकिनाऱ्यावर असते तशी रेती होती आणि त्यात सगळीकडे आजूबाजूच्या झाडांच्या पानांचा आणि काटक्यांचा खच पडलेला होता. झरा लहानच असला तरी उडी मारून ओलांडण्यासारखा नव्हता (म्हणजे मोठ्या माणसांना तरी) म्हणून आमच्या शेजारीच एक छोटासा, अगदी अर्धवर्तुळाकार असा पूल पलीकडच्या रस्त्याला आणि आमच्या या भागाला जोडत होता. तसेच पूल त्याच झऱ्यावर इतर ठिकठिकाणीही होते. या सगळ्याचं वर्णन करायला ‘क्युट’ हाच शब्द सर्वाधिक योग्य ठरेल. 
तिने मला त्या झऱ्याचं वैशिष्ट्य सांगितल्यावर त्यात पाय सोडून बसायला मी अधिकच उत्सुक झालो होतो. ते पाणी गरम होतं. कढत नाही, पण आपल्या सोलर वॉटर हीटरच्या वर ढग जमा झालेत असं वाटावं इतकंही कोमट नाही. तिने मला थेट झऱ्यात उतरायचं नाही; आधी बसून घ्यायचं आणि मग पाय सोडायचे असं बजावलं होतं, आणि त्यात उभं राहायचा प्रयत्न केल्यावर मला लगेच त्यामागचं कारण कळलं. ते शेवाळं इतकं निसरडं होतं की माझा सगळा तोलच गेला, आणि तिने अनुभवी चेहऱ्याने मला धरून खाली बसवलं. तिथे एवढ्या उकाड्यात स्वेच्छेने त्या झऱ्यात गरम पाण्याचा प्रवाह ठेवण्याचं आश्चर्य वाटू शकतं, पण खूप चालून आल्यावर दमलेल्या पायांना गरम पाण्यात सोडून बसण्याचं सुख सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. शिवाय चारपाच मिनिटं तसंच पाण्यात पाय ठेवून बसल्यानंतर ते बाहेर काढले की ते पाणी तसंच तळव्यांवर रेंगाळत, गुदगुल्या करत असल्याची भावना तर वेगळीच! त्या अनुभवाचं आम्हाला एवढं वेड लागलं की काकूने बार्बेक्यू बघायला बोलावल्यावरही, आम्ही चारपाच वेळा तिथपर्यंत जाऊन, मग ‘पायांना वाळू लागलीय’ असं सांगत परत पाय धुवायला त्या झऱ्याकडे जायचो!
काही वेळाने मात्र ग्रीलच्या दिशेने येणाऱ्या वासांनी आम्हाला त्या झऱ्यात बसू दिलं नाही. बार्बेक्यूचा अनुभवही, घरात इलेक्ट्रिक ग्रील आणि पुण्यात ‘बार्बेक्यू नेशन’ असल्याने नवीन नव्हता, पण असं उघड्यावर, पेटलेल्या कोळशांच्या वर धरलेल्या जाळीवर ते भाजलं जाताना पाहण्याचा अनुभव मात्र अगदी नवीन होता. त्यात आम्ही सगळे ‘सामिषाचे’ भोक्ते असल्याने बार्बेक्यू नेशनमध्ये एरवी शिवाय मिळणाऱ्या कांदे, बटाटे, मश्रूम्स, कणीस, अननस वगैरे गोष्टी आमच्यासाठी तेव्हा बादच होत्या. पण ते वेगवेगळ्या प्रकारचं ‘सामिष’ हा फक्त एक भाग होता. काका-काकूच्या प्लॅननुसार त्या दिवशी आम्ही पारंपरिक अरबी जेवणाचा आस्वाद घेणार होतो. 
आपल्याप्रमाणेच एक प्रकारची पोळी आणि वेगवेगळी तोंडीलावणी हे अरबी जेवणाचेही मुख्य घटक आहेत. त्या जाड ब्रेडला पोळी म्हणण्यापेक्षा भाकरी म्हणणं जास्त योग्य ठरेल. नाव ‘खबूस’, आणि बनवलेली गव्हाच्या पिठाची. तिच्याशी तोंडी लावायला मग कधीकधी भाज्या असतात. त्या दिवशी आमच्याकडे मात्र तीन प्रकारच्या ‘पेस्ट’ होत्या. पांढऱ्याशुभ्र रंगाची ‘sour cream paste’, लाल रंगाची ‘garlic paste’ आणि अर्थातच ‘हमस’ नावाने प्रसिद्ध असलेली हरभऱ्याची पेस्ट यांच्यात आळीपाळीने तो ‘खबूस’ बुडवून खाणे हा त्या जेवणाचा स्थायीभाव होता. या साध्या जेवणात रंग आणायला दर दोन मिनिटांनी भाजून ताटात पडणारे चिकनचे, मटणाचे कट्स आणि कबाब अगदीच पुरेसे होते. याशिवाय दोन प्रकारची सॅलड्स खास अधूनमधून तोंडात टाकायला होती. एक साधं मिठाच्या पाण्यात घोळवून ठेवलेल्या कच्च्या भाज्यांचं सॅलड होतं. थोडा वेळ फक्त गरम आणि तिखट असे बार्बेक्यूचे पदार्थ हादडल्यानंतर पोटातला जाळ जरा शांत करायला खबूसचे एकदोन घास आणि त्या मिठाच्या पाण्यातला एखादा गाजराचा किंवा मुळ्याचा मोठा तुकडा तोंडात ढकलून द्यावा. दुसऱ्या सॅलडला ‘तबुले’ असं विशिष्ट नाव होतं, आणि त्याचं स्वरूप म्हणजे ऑलिव्ह ऑईलमध्ये एकत्र करून भिजवून ठेवलेले कोथिंबीर आणि भाज्यांचे लहान तुकडे. याचेही छोटे ‘पोर्शन्स’ घेऊन ते अधूनमधून खबूसबरोबर खायचे असतात. 
पु.लं.नी त्यांच्या ‘माझे खाद्यजीवन’ मध्ये उल्लेख केलेल्या काही भोजनप्रकारांप्रमाणेच या जेवणानंतरही आडवं व्हायला मोठ्या बुंध्याचा वृक्ष सर्वात उपयुक्त ठरतो. आमच्याकडच्या पाण्याच्या बाटल्या जेवताना संपून गेल्याचं आम्हाला तेव्हा कळलं आणि म्हणून आम्ही दोघं त्या आणायला गेलो. झाडीतूनच चक्कर मारत आणि आजूबाजूला नजर टाकत आम्ही एका लहानशा दुकानात जाऊन तीन पाण्याच्या बाटल्या आणि कोकाकोलाचे कॅन्स घेतले आणि दुप्पट उत्साहाने आमच्या झाडाकडे परत यायला निघालो. वाटेत आम्हाला एकदोन वेगवेगळ्या देशांमधली मोठी कुटुंबं एकत्र येऊन बार्बेक्यूचा आस्वाद घेताना दिसली. विशेषतः जपानी मंडळींच्या ग्रील्सवर काय शिजत होतं ते पाहायला जास्त मजा आली. थोडं पुढे गेल्यावर एक छोटीशी पाण्याची घसरगुंडीही होती आणि त्याला धबधब्याचा ‘लूक’ आणला होता. तिथे वेगवेगळ्या देशांची अनेक लहान मुलं आम्हाला मनसोक्त त्या पाण्यात डुंबताना दिसली. या सगळ्याला वळसा घालून आम्ही परत आलो. झाडाखाली पसरलेल्या मोठ्या सतरंजीवर बाबा आणि काका झोपले आणि आम्ही तिघेजण कॅंपिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन फोल्डिंग खुर्च्या उघडून, हळूहळू थंड पडत चाललेल्या ग्रीलच्या शेजारी बसून आमच्या कोकचा आस्वाद घेत बराच वेळ गप्पा मारत बसलो. त्या दुपारचा तो सगळा अनुभव माझ्यासाठी नंतरच्या बुर्ज खलिफाच्या अनुभवाइतकाच सुखावह होता, आणि तसा अनपेक्षित असल्याने त्यातून मिळालेलं समाधान वाढीस लागल्यासारखंच झालं होतं. 
वेळेकडे कुणीच फारसं लक्ष दिलं नाही, पण कधीतरी त्या समाधीतून बाहेर पडून आम्ही गाडी काढून परत दुबईकडे जायला निघालो. परतीचा प्रवासही तसाच हास्यविनोद, गप्पा, गाणी वगैरेंनी भरला होता; फरक एवढाच होता की उत्सुकतेची जागा आता तृप्तीने घेतली होती. ठरल्याप्रमाणे आम्ही संध्याकाळी दुबईत पोहोचलो. 
त्या दिवशी आमची आजीही दुबईला परत येणार होती, म्हणून तिला आणायला काका, काकू आणि बाबा विमानतळावर निघून गेले. तसं विमानतळ पाहायला मला नेहमीच आवडत असलं, तरी तेव्हा दमल्यामुळे आम्ही दोघांनी घरीच थांबून सगळी संध्याकाळ एकत्र ‘फ्रेंड्स’ बघण्यात घालवण्याचं ठरवलं, आणि त्याप्रमाणे तसं केलंही. 
दुबईतील दुसरा दिवस पहिल्याइतकाच, पण पूर्णपणे वेगळ्या अर्थाने fulfilling ठरलेला होता. 

The Dubai Diaries continue on DD8

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प