Dubai Diaries: थरार १



मध्ये कधीतरी वाचनात आलेल्या, “थ्रिल राईड्स घेऊन लोक का आपणहून स्वतःला धोक्यात टाकत असावेत?” या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं. त्या दिवशी ते सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट झालं.
‘अल एय्न’ला भेट दिल्यानंतरचा दुसरा दिवस. त्या दिवशी आम्ही वेगवेगळे बेत केलेले होते. आम्हा दोघांना ‘IMG World of Adventures’ नावाच्या amusement park मध्ये सोडून बाबा, काका आणि काकू तिथला वार्षिक मोटरशो, म्हणजेच ‘भारीतल्या’ गाड्यांचं प्रदर्शन पाहायला चालले होते. खरंतर या दोन गोष्टींमधल्या एकीची निवड करणं म्हणजे माझ्यासाठी ‘इकडे आड तिकडे विहीर’च्या अगदी उलट परिस्थिती ठरणार होती. पण माझी बहीण ठाम होती. “त्या कार्सचे फोटो तुला नंतर आरामात बघता येतील; थ्रिल राईड्स कशा अनुभवशील?” या तिच्या एका तर्कशास्त्राच्या विद्यार्थ्याला मान खाली घालायला लावणाऱ्या प्रश्नाला अर्थातच उत्तर नव्हतं. मग काय? बाकीच्यांना एकूणएक कारचे फोटो काढायचेच असं बजावून मी खांदे उडवून तिच्या मागून घराबाहेर पडलो. पण खरंतर माझा निर्णय माझ्याही नकळत झालेला होता. 
‘Amusement Park’ला भेट देण्याची माझी ती पहिलीच वेळ असणार होती. आत्तापर्यंत माझ्या खात्यात ‘थ्रिल’च्या नावाखाली दोन वॉटरपार्क, एक शिर्डीची आणि एक कन्याकुमारीतली, एवढंच जमा होतं. (ताम्हिणी घाटात ट्रेकच्या बाकी लोकांसोबत अनोळखी पाण्यात थेट उडी मारण्याचा एक प्रसंग वगळता) आणि वर्णनं वगैरे वाचून एकदा करून पाहण्याइतकी उत्सुकता नक्कीच होती. त्या दिवशी एक मात्र कळलं की त्या अनुभवाचं वर्णन शब्दांत करणं हे खरोखरच ‘इंटरस्टेलर’ एकदा पाहून कळण्यासारखं अशक्य आहे. तरी त्याबद्दल लिहिलं नाही तर तो माझ्या हृदयावर अन्याय होईल…. त्या दिवशी त्याने मला खूपच साथ दिली होती!
याशिवाय, एक आख्खा दिवस बहिणीसोबत घालवायला तर मी अगदीच एका पायावर तयार होतो. ते दुबईला राहायला लागल्यापासून, विद्यार्थी-‘दशे’मुळे आम्ही क्वचितच उडतउडत भेटलो होतो, आणि त्यामुळेच ‘catching up’ साठी पुष्कळ कायकाय होतं. म्हणूनच त्या पार्कच्या अजस्त्र इमारतीच्या आत तिकीट काढून देऊन काकूने आम्हाला मुद्दाम ‘You’re on your own’ असं खोट्या गांभीर्याने सांगितल्यावर आम्ही उत्साहाने हात हलवून आत शिरलो आणि बोलायला लागलो. पहिल्यांदा कुठल्या राईडवर जायचं यावर चर्चा सुरु होईपर्यंत खूप वेळ उलटून गेलेला होता. 
बाकीच्यांचा निरोप घ्यायच्या आधी गेटपाशी आम्हाला खूपच गर्दी लागली होती; आणि तीही दुबईतल्या एका शाळेतल्या चौथी-पाचवीच्या मुलांची. त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शिक्षिकांनी केलेल्या रांगेत राहूनच पण प्रचंड दंगा चालू होता. ही शिस्त पार्कच्या आत गेल्यावर टिकेल का असा मला प्रश्न पडतच होता, तेवढ्यात माझ्या बहिणीने माझं लक्ष त्याहून खूप महत्त्वाच्या समस्येकडे वेधलं. आता प्रत्येक राईडवर आमचा नंबर सगळ्या शाळेनंतर लागणार की काय? मग तिनेच त्यावर तोडगा काढला. त्या शाळेकडे काही आमच्यासारखा सबंध दिवस नसल्याने ते फक्त मुख्य राईड्सनाच भेट देतील, आणि त्याही कुठल्या ते तिला स्वतः पूर्वी तिच्या शाळेबरोबर येऊन गेल्यामुळे आठवत होतं. म्हणून ते तिकडे असेपर्यंत आम्ही इतर राइड्स करून घेऊ आणि दुपारनंतर यांच्याकडे येऊ अशी तिची योजना होती, जी अर्थातच खूप उपयुक्त ठरली आणि आम्हाला कुठल्याच राईडसाठी फार वाट पाहावी लागली नाही. हे ठरल्यावर मी शांतपणे आख्ख्या दिवसाची सूत्रं तिच्या हातात दिली आणि तिच्या मागून ती नेईल तिथे जायचं कबूल करून तिला खूश केलं. तसं दिवसभर मला ‘सांभाळायची’ जबाबदारी तिच्यावर टाकल्यामुळे ती आनंदात होतीच, आणि ही पार्क अगदी तिच्या ओळखीची असल्यामुळे आपल्याकडची भारी गोष्ट दाखवायला तिला मजा येत होती. तसं तर काय, तिच्या परीक्षा जवळ आलेल्या नसत्या तर ती आनंदाने आमच्याबरोबर सगळीकडे फिरली असती.              
एक मोठ्ठी राईड सोडता, सबंध पार्क एका अवाढव्य स्टेडियमच्या आकाराच्या इमारतीत आहे. तिला आतून एका छोट्याशा शहराचं रूप देण्यात आलं आहे. आम्हाला मिळालेल्या नकाशानुसार, त्यांनी पार्कचे त्यांच्यातल्या राईड्सच्या प्रकारांनुसार विभाग केलेले होते. एक लॉस्ट व्हॅली नामक डायनासॉरचा विभाग (Oooh!), एक मार्व्हल विभाग (Yess!), एक कार्टून नेटवर्क विभाग (Oh well….) वगैरे वगैरे. या सगळ्यांना एकमेकांशी आणि त्यांच्यातल्या राईड्सना जोडायला अगदी खऱ्यासारखे दिसणारे रस्ते वगैरे होते. फुटपाथसकट! आणि लहान राईड्स, रेस्टॉरेंट्स वगैरे त्या रस्त्यांलगतच्या इमारतींत होते. त्या इमारतीही खऱ्यासारख्या वाटाव्यात अशी काळजी घेतलेली होती. सगळीकडे रात्रीसारखा अंधार करण्यात आलेला होता आणि अगदीच अंधार होऊ नये म्हणून छतावर दिवे होतेच, पण मुख्य प्रकाशस्रोत खरेखुरे रस्त्यांवरचे दिव्याचे खांब आणि इमारतींच्या निऑन साईन्स होते. त्यामुळे सगळा वेळ पार्कमधून फिरताना आपण एका, लहानशा पण खूप उत्साहाने भरलेल्या अशा गावात रात्रीच्या वेळी फिरत असल्याचा भास होत होता. उगीच वर पाहिलंच तर दूर कुठेतरी ते अंधारं छत आणि त्याच्यावर बसवलेले खांब वगैरे दिसू शकत होते. एकूण नेपथ्य जमलं होतं. 
ती इमारतीच्या बाहेर असलेली सर्वांत मोठी राईडच तिने आमच्यासाठी पहिली म्हणून ठरवली होती. ती पार्कच्या डायनासॉर विभागात होती आणि तिचं नावही ‘Velociraptor’ असं होतं. (हे एका अतिवेगवान डायनासॉरच्या जातीचं नाव आहे) तो एक प्रचंड रोलर-कोस्टर होता. पार्ककडे येतानाच तो दिसला होता आणि त्यावर सुरु असलेली एक राईडदेखील. तसा प्रत्येक राईडपाशी ‘आधी राईड बघून मग जायचं का नाही ते ठरवा’ असं लिहून ठेवलेला फलक असतोच म्हणा, आणि त्याखाली त्या ठराविक राईडवर जाण्यास बंदी असलेल्यांची यादी असते. मी हा रोलर-कोस्टर खिडकीतून पाहिला होता, पण टीव्हीवर वगैरे ते आधी पाहिलेले असल्यामुळे त्यात विशेष काही वाटलं नव्हतं. आता त्याच्याकडे चालत निघाल्यावर, त्याच्या फलकावरची लांबलचक यादी वाचल्यावर आणि बाहेरून लोकांच्या आरोळ्या ऐकल्यावर जरा भीती वाटायला लागली होती. 
“हे तुझं पहिलं ‘लूप’ आहे का?” तिने विचारलं. लूप म्हणजे रोलर-कोस्टरच्या त्या विस्कटलेल्या ट्रॅकमधलं एक उभं, पूर्ण ३६० अंशांचं वळण, ज्यावरून सर्वाधिक वेगात जाण्यास पर्यायच नसतो. क्षणभरच, पण आपण आकाशात पूर्ण उलटे असतो. 
“हा माझा पहिला रोलर-कोस्टरच आहे,” मी निरागसपणे सांगून टाकलं. “Any advice?”
“Don’t forget to scream,” ती उत्तरली. 
मग सगळं अवसान एकवटून मी तिच्यामागून त्या छोट्याशा गाडीपाशी आलो. दोन-दोन खुर्च्यांच्या सहा रांगा होत्या. तिथल्या मदतनिसांनी आम्हाला खिसे रिकामे करायला सांगितले (वस्तू उडून वगैरे जायला नको म्हणून) आणि त्यातल्या वस्तू तिथल्या खोक्यांत ठेवायला सांगितल्या. मी माझा फोन आणि पाकीट तिच्या पर्समध्ये ठेवून दिलं आणि पुढच्या खुर्चीत येऊन बसलो. शेजारी ती बसली; मागे सगळ्यांनी हळूहळू बसून घेतलं. मग त्या खुर्च्यांच्या वरच्या भागात बसवलेली स्टीलची ‘ग्रीप’ आम्ही ओढून खाली घेतली आणि पक्की बसवायचा प्रयत्न केला. दोनचार मिनिटं ते मदतनीस आमच्या सगळ्यांचे प्रयत्न पाहत होते. मग सगळ्या हालचाली थांबल्या तशा त्यांच्यातल्या दोघांनी सगळ्यांच्या ग्रीप्स दोनदा पुन्हा तपासून घेतल्या. मी माझ्या ग्रीपला धरलं तेव्हा कळलं की मला आता कितीही प्रयत्न करूनही ती जराही हलवता येणार नाहीये. मग मी जरा शांत झालो. (तेव्हा ‘निश्चिंत’ वगैरे होण्यासारखी परिस्थितीच नसते) मग त्यांनी लांब सरकून एक बटन दाबून राईड सुरु केली. विमानाच्या टॅक्सींगप्रमाणेच आमची ती गाडी खडखडत हळू पुढे सरकायला लागली. मग लगेच आम्ही एका ठिकाणी वळलो आणि ते मदतनीस दिसेनासे झाले. दिसेनासं व्हायच्या आधी त्यातला तो एक हात हलवताना हसला नसता तर बरं झालं असतं असं मला उगीच वाटून गेलं.             
आता आम्ही त्या डायनासॉरच्या चित्रांनी भरलेल्या बोगद्याच्या तोंडाशी आलो होतो आणि पुढे प्रखर सूर्यप्रकाश असल्याने ट्रॅक नीट दिसत नव्हता. वातावरणनिर्मितीसाठी की काय, पण एकदोन डायनासॉरच्या गुरकावण्याचे आवाज आले. मग लक्षात आलं की आमची तोपर्यंत निवांत चाललेली गाडी घरघरत थांबली होती. अगदी थोडा वेळ आम्ही नुसतेच त्या ट्रॅकवर गाडीत बसून समोर पाहत राहिलो. 
क्षणभरच, पण तोही प्रदीर्घ भासणारा. आणि तो क्षण संपल्यावर काय घडणार आहे याची अंधुकशी कल्पना आल्यामुळे, तो संपायला हवा की नको कळत नाहीये अशी अवस्था. वाटतंय आत्ता संपेल, पण नाही. आत्ता. नाही. मग आता? नाहीच?
आणि मग तो संपला. 
एका भयानक हादऱ्यासरशी आम्ही वेगाने पुढे फेकले गेलो. आता बाहेर पडल्यावर समोरचं दिसत होतं खरं पण पाहायचं होतं का नाही कळत नव्हतं. ट्रॅक खरंच एखाद्या लहान मुलाने आईवडिलांवर चिडून मोडतोड केलेल्या खेळण्यातल्या रुळांसारखा होता. आत्ता वर आकाशाकडे झेपावतोय तर पुढच्याच क्षणी दुप्पट वेगाने जमिनीवर कोसळतोय; आणि शेवटच्या क्षणी आपटायच्या आधी परत फिरून वर येतोय. क्षणात वाटे पिसाहूनी हलके, क्षणात पोटात दगड पडे…. मग माझ्या लक्षात आलं की माझ्या बहिणीचा सल्ला मी अगदीच मनावर घेतलेला होता, आणि सगळेच मला सामील झालेले होते. मग ते ‘लूप’ आलंच. खाली डोकं वर पाय होईल त्या क्षणाची मला सर्वाधिक धास्ती वाटत होती, आणि तो क्षण आला होता, पण, पण…. ‘खाली’ आणि ‘वर’ म्हणजे काय तेच विसरून गेल्यावर काय? डोळ्यांसमोर तर सतत चिडून फेटलं जाणारं आकाशी निळा आणि वाळूचा पिवळा यांचं मिश्रण… त्यात मधूनच दिसणारे आपलेच पाय, आपण फक्त हात आणि डोळे नसून संपूर्ण आहोत अशी जाणीव करून देणारे.....
आणि अचानक पुन्हा एक हादरा बसून आम्ही सगळे स्थिर झालो आणि मी इकडेतिकडे पाहिलं. मी अजूनही त्या ग्रीपला घट्ट धरून ठेवलेलं होतं आणि शेजारी तीही तेच करत होती. आमची गाडी हळूच सरकत पुन्हा इमारतीच्या आतदेखील आली होती. सगळे मदतनीस आमच्यापाशी गोळा होऊन ‘सगळे ठीक?’ वगैरे विचारत त्या ग्रीप्स काढायला लागले. मी आणि माझ्या बहिणीने एकदमच पाय हलवून बघितले. मग आम्ही एकमेकांकडे पाहून हसत सुटलो; ते सगळं घेऊन तिथून बाहेर पडून परत पार्कच्या आत येईपर्यंत हसतच होतो. 
‘थ्रील’ या शब्दाचा अर्थ व्यवस्थित कळलेला होता. नंतर फोनमध्ये वेळ बघितल्यावर असं लक्षात आलं की खुद्द राईड फक्त मिनिटभराचीच होती. फक्त साठ सेकंदांच्या त्या ‘फ्रेन्झी’चं का एवढं आकर्षण असावं? जीव धोक्यात घालण्याची भावना? इतरांसमोर भाव खाण्यासाठीचा प्रयत्न? का स्वतःलाच आपण जरा ‘टफ’ वगैरे असल्याचं पटवून द्यायचा एक मार्ग?
कसं कोण जाणे, पण वेगाने धडधडणारं हृदय हळूहळू शांत झालं तसं या प्रश्नाचं उत्तर सहजच मिळून गेलं. तिथे बाहेर ट्रॅकवर असताना, प्रत्येक वेड्या वळणाला एवढा जोरात हादरा बसायचा की वाटायचं आपल्याला भिरकावूनच दिलंय आकाशात कुठेतरी. मग लगेच लक्षात यायचं की त्याउलट आपण दुसऱ्या दिशेने घसरतोय, आणि अजूनही रूळांवरच आहोत, पण हायसं वाटायलाही वेळ नाही कारण ते पुढचं वळण आहेच लगेच - आणि तिथेही पुन्हा हेच सगळं! तो वेडा अनुभव टिकतो मिनिटभरच पण ही भावना नंतर मनात राहते..... खोल कुठेतरी आपल्याला त्या रोलर-कोस्टरच्या यंत्रणेवर विश्वास असतो, आणि ती कणभरही त्रुटी न राहू देता तयार केलेली असून एवढा काळ व्यवस्थित चालतेय आणि कधीच काहीच विपरीत घडलेलं नाहीये हे सगळं ठाऊक असतं. पण तिथे बाहेर रुळांवर आपण हे सगळं विसरतो, आणि उरते ती फक्त भीती. आणि म्हणूनच ते जेव्हा संपतं, तेव्हा आपल्या मनात फक्त हाच एक विचार उरलेला असतो. 
काहीही घडू शकलं असतं. 
काहीही. 
पण काही नाही घडलं!!!!
थोडक्यात, ‘क्षणाची भीती आणि अनंतकाळचा दिलासा’ हे सगळ्या प्रकारच्या थ्रील राईडचं मूळ तत्त्व आहे, आणि त्यांच्या तुफान लोकप्रियतेमागचं कारणही. लोक हे अनुभवण्यासाठी रांगा लावतात ते त्या मिनिटाभराच्या गदारोळासाठी नाही तर तो संपल्यानंतरच्या मनःस्थितीसाठी. हे ओळखू आल्यावर मला गंमत वाटली, आणि पुढच्या राईड्सच्या वेळी भीती वाटू द्यायची नाही असं ठरवलं. पण पुढच्या एकूणएक राईडवर हाच सगळा अनुभव आला. आपण मारे आपला आपल्या भावनांवर ताबा असण्याच्या गप्पा मारतो, पण काही गोष्टी अगदी खोलवर चौकशी करून जातात, हेही खरंच.      
पार्कमध्ये अशा प्रकारच्या तशा पाचसहाच राईड्स होत्या, आणि माझ्या बहिणीच्या योजनेनुसार त्यातल्या अर्ध्या सुरुवातीला करून उरलेल्या दिवसाच्या शेवटी करणं योग्य होतं, जेणेकरून जेवणावर कशाचा परिणाम होऊ नये. त्यामुळे मग आम्ही तिथून आधी सरळ मार्व्हल विभागातल्या ‘थॉर’च्या राईडकडे गेलो. आधीच्या राईडप्रमाणेच, हिच्या आजूबाजूच्या वातावरणाचा हिच्या ‘fear factor’ मध्ये महत्त्वाचा वाटा होता. एकतर हा प्रकार अर्धाअधिक बंद होता. एका प्रचंड केशरी घुमटाच्या आत, जो एका बाजूने तसा बऱ्यापैकी उघडा होता आणि त्याच्या दोन बाजूंना थॉर आणि लोकी एकमेकांना खुन्नस देत उभे होते. त्या घुमटाच्या आत शिरताना फक्त आम्हाला थोडीशी गर्दी लागली आणि आमचा नंबर लागायच्या आधी तिथे दोन राईड्स होताना ‘ऐकू’ आल्या. आम्ही बोगद्याच्या आत वाट पाहत असल्याने ती राईड नक्की कशी होती ते दिसू शकत नव्हतं असं मी म्हटलं. 
“एका अर्थी बरंय ते,” ती उद्गारली. “कारण ती पाहिलीस तर कदाचित तू येणार नाहीस,”
एवढ्या प्रोत्साहनानंतर मी तिथे गेलोच कसा कुणास ठाऊक! पण शेवटी आमचा नंबर लागला आणि आम्ही त्या घुमटात शिरलो. दारातून आत आल्यावर समोर एक लांबलचक खुर्च्यांची रांग दिसली. घुमटाच्या वरच्या भागात एक मोठा रॉड आडवा बसवलेला होता आणि ही खुर्च्या बसवलेली ‘होडी’ त्याच्यावर दोन तितकेच मोठे रॉड वापरून लटकवलेली होती. पंधरासोळा खुर्च्यांच्या दोन रांगा पाठीला पाठ लावून त्या होडीत बसवलेल्या होत्या. आम्ही त्यांच्याकडे चालत जाऊन त्यांच्यात बसलो तेव्हा खालची जमीन लोखंडी जाळीची होती हे माझ्या अचानक लक्षात आलं. 
मग पुन्हा तोच सगळा प्रकार घडला. मदतनिसांनी आमच्या सगळ्यांचे ग्रीप्स तपासले. तेवढ्यात आमच्या शेजारच्या दोन जणांनी त्यांना बसायचं नसल्याचं सांगितलं आणि त्यांची ग्रीप काढून त्यांना दुसऱ्या दारातून बाहेर नेलं. मग ते मदतनीस स्वतः त्या दारांतून बाहेर गेले आणि आम्हाला त्यांनी कडी लावून घेतल्याचा आवाजही ऐकू आला. आता परत फिरायला मार्ग नव्हता. तसं मी माझी ग्रीप काढून टाकून दारावर जोरजोरात हात आपटला असता तर मला बाहेर जाऊ दिलं असतं, नाही असं नाही. हा विचार मनात यायचं खरं काही कारण नव्हतं, पण त्यांची घाबरवण्याची पद्धती पुन्हा माझ्याही नकळत यशस्वी होत होती. इथेही आता काय घडणार आहे याची अंधुक कल्पना आली होती आणि भीतीमुळे पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटत होतं. 
वाटलं नसतं कसं? आमच्या पायाखालची जमीन खरंच सरकत होती! ती लोखंडी जाळी हळूहळू (मुद्दाम!) विरुद्ध बाजूंना सरकून दुभंगली, मग तिची घडी होऊन ती कुठेतरी दिसेनाशी झाली. आता मात्र खरंच परत फिरायचे सगळे मार्ग संपले होते. तो घुमट नसून पूर्ण गोल होता आणि आम्ही त्याच्या वरच्या भागात अधांतरी होतो. मग दूर कुठेतरी बटण दाबल्याचा आवाज आला आणि राईड सुरु झाली. 
सुरुवातीचा थोडा वेळ फक्त कुठूनकुठून रंगीत धूर बाहेर पडून पसरायला लागला आणि ‘रॉक’ संगीत वाजायला लागलं. चांगले तीस सेकंद फक्त एवढंच सुरु होतं. मग हळूहळू तो धूर विरून गेला आणि संगीतही थांबलं. पुन्हा क्षणभराची शांतता. माझ्या मेंदूचा सगळ्यात शंकेखोर भाग मला पटवायला लागला होता की राईड संपलीही असू शकते, लोकांना ‘पचका’ झाल्याचीही मजा वाटू शकते वगैरे. मी खरंच त्या लोखंडी जाळीला परत आमच्या पायाखाली यायची क्षणभर अपेक्षा केली. 
मग तो क्षणही संपला. 
पहिल्यांदा त्या आडव्या रॉडभोवती आमच्या होडीने एक संपूर्ण वळण घेतलं, पण खूप वेगात. त्यामुळे हादरलो होतो तरी असं वाटलं की अशाच चारपाच ‘बॅकफ्लिप्स’ अजून मारल्या तर त्याची काही विशेष भीती वाटली नसती; नाहीतरी लहानपणी सर्वांत उंच झोका घायची स्पर्धा लागायची तेव्हा कधीतरी हे घडावं अशी माझी सुप्त इच्छा होतीच, आणि इथे मी तसा जास्त सुरक्षित होतो. पण नाही. पहिली बॅकफ्लिप संपते की नाही तर आम्ही तितक्याच वेगात मागे ढकलले गेलो आणि उलट्या दिशेने एक कोलांटी घेऊन पुन्हा खाली आलो. तरी ही कोलांटी आधीच्यापेक्षा खूपच जास्त भयानक होती, कारण दोन्हीवेळा वेग तोच असला तरी पहिल्या वेळी आपण कुठे चाललोय ते दिसत तरी होतं. दुसऱ्या वेळी मात्र आम्ही मागे चाललो होतो आणि त्या गोलाचा पृष्ठभाग आमच्यापासून दूर चालल्यासारखा वाटत होता. या फ्लिपमध्ये घुमटाचा उघडा भाग लागला तो क्षण सर्वांत भीतीदायक होता, कारण त्यातून पलीकडचं दिसत होतं आणि आख्खी पार्क आमच्या डोळ्यांसमोरून उलटी फिरत होती!        
दोन ‘साध्या’ कोलांट्या मारल्यानंतर जरा बदल हवाच, नाही का? दुसऱ्या कोलांटीनंतर आम्ही परत मागच्या बाजूला ढकलले गेलो, पण यावेळी आम्हाला हवेत तसंच ठेवण्यात आलं. संपूर्ण उलटं नाही, तर आमची होडी जमिनीशी समांतर होती. अगदी उलटं असण्यापेक्षाही हे जास्त भयानक होतं असं नंतर विचार केल्यावर पटलं, कारण उलटं असताना फक्त जग उलटं दिसतं. पण इथे मात्र आमच्या नजरेसमोर त्या गोलाचा तळ होता आणि तेवढा सगळा वेळ त्यात पडत असल्याचा भास होत होता. मग आम्ही पुन्हा जरा मागे ढकलले गेलो आणि मी उलटं होण्याची तयारी केली, पण त्याउलट पुन्हा मोठा हादरा बसून आम्ही घसरून परत तळाशी आलो. त्यानंतरचा भाग तसा सगळ्यात भीतीदायक होता. आम्ही पुन्हा पुढच्या दिशेने हललो आणि यावेळी आकाशात पूर्ण उलटे होऊन थांबलो, आणि आधीच्यापेक्षा थोडा जास्त काळ. परत यावेळी आम्ही पूर्ण स्थिर नसून अधूनमधून पुढेमागे झुकत होतो. सारखा तोल जाताना जाणवत होता (तसा तोल केव्हाच गेलेला होता), फक्त पुढे पडतो का मागे एवढाच विचार आता मनात होता. मग आम्ही पुढे पडायला लागलो, आणि तळाशी येतो न येतो तेवढ्यात पुन्हा एक अशक्य हादरा बसून वेगाने पुन्हा उलट्या दिशेने आख्खी कोलांटी मारून मग तळाशी आलो. या होडीची प्रत्येक हालचाल अगदीच अनपेक्षित निघाली होती. तळाशी येऊन एकदोन सेकंद झाल्यावर पुन्हा धूर आणि संगीत वगैरे प्रकार सुरु झाले, पण राईड संपली होती का हे फक्त ‘मध्यंतर’ होतं कळायला मार्ग नव्हता. काही क्षण तसेच गेले - कुठल्याही क्षणी घोट्यांना पकडून आडवातिडवं फिरवलं जाण्याची अपेक्षा असून ते घडत नाही, तेव्हाच्या भावनेचं वर्णन शब्दात करणं खरंच अशक्य आहे. पण मग मला ती प्राणप्रिय जाळी परत सरकून आमच्या पायाखालची जमीन बनताना दिसली, आणि राईड खरंच संपली असल्याचं कळलं. 
या दोन्ही राईड्समधली जास्त भीतीदायक कोणती होती ते ठरवणं खरंच मुश्किल आहे. नाही म्हणायला दुसऱ्या राईडमध्ये सगळं त्याच एका गोलात घडत असल्यामुळे, पहिल्या राईडमध्ये होती तशी आकाशात कुठेतरी उडून जाण्याची भीती तेवढी नव्हती. पण पहिल्या राईडमध्ये जमीन आणि आकाश यांच्यात फरक तरी करता येत होता, दुसरीत ती सोय नव्हती. दोन्हींत साम्य तसं एवढंच होतं की दोन्ही वेळा खरंच थरकाप उडालेला होता, पण संपल्यावर तितक्याच शांतपणे तिथून बाहेर पडता आलं होतं. सर्वांत महत्वाचं म्हणजे, दोन्ही वेळेला भांड्यात पडलेल्या जीवाची जाणीव सुखावह होती. 
मग माझ्या बहिणीने मुख्य प्रश्न विचारला, “तुला मजा आली का?”
मी मनात म्हटलं, राईड संपल्यावर कोणीही याचं उत्तर द्यायला एका पायावर तयार होईल. 
पण हो, अगदी खरं सांगायचं तर मला मजा आली होती. का ते इतक्या स्पष्टपणे मांडता यायचं नाही. या राईड्स असंख्य वेगवेगळ्या भावनांना वाट करून देतात, मनाच्या कुठल्याकुठल्या कोपऱ्यांना स्पर्शून जातात, आणि आपल्या शरीराचा कण न् कण रोमांचित करतात. या सगळ्यातल्या कशामुळे नक्की तिथून बाहेर पडताना मला आनंद आवरत नव्हता हे आजपर्यंत माझ्या लक्षात आलेलं नाही, पण तो होता एवढं मात्र नक्की. हे सगळं मी तिला सांगितल्यावर माझं ‘विश्लेषण’ तिला आवडलं, आणि आम्ही सरळ काहीतरी खाण्यासाठी शोधायला निघालो. 
वाटेत समजा ती ग्रीप सुटली असती तर? असा विषय निघाला आणि आम्ही बराच वेळ त्यावर हसत चर्चा केली. आता पाय जमिनीवर होते; आता कल्पनाशक्ती भराऱ्या मारायला मोकळी होती.  

The Dubai Diaries continue on DD9

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प