Dubai Diaries: थरार २
सकाळच्या अनुभवांमुळे रोलर-कोस्टर्स आवडत्या राईड्सच्या पंगतीत जागा मिळवून बसले होतेच. नुसता तो सगळा थरकाप अनुभवण्यासाठी आम्ही मग त्यानंतर मार्व्हल विभागातली स्पायडरमॅनची तशीच एक राईड केली आणि दिवसाच्या शेवटी पुन्हा डायनासॉर विभागातली ‘प्रिडेटर’ नावाची राईड केली. यांच्याही स्वतःच्या अशा काही खास गोष्टी होत्याच, पण अनुभव बऱ्यापैकी तसाच होता. म्हणूनच त्यांच्या तपशिलात फार न जाता इथून उरलेल्या पार्ककडे आणि त्यातल्या काही, पूर्वीच पंगतीत जाऊन बसलेल्या काही राईड्सकडे वळूया.
भीती उत्पन्न करण्यासाठी रोलर-कोस्टरचा सगळा गदारोळ अगदी उपयुक्त ठरत असला तरी तो काही सगळ्या प्रकारचा अनुभव देऊ शकत नाही. इमारतींवरून खाली कोसळण्याचा, डायनासॉरच्या हल्ल्याला बळी पडण्याचा वगैरे अनुभव देणं त्याला शक्य नाही. पण हे घडवून आणण्याचा एक मार्ग आता सर्वत्र परिचयाचा आहे, आणि तो वापरून केलेल्या राईड्स कायम माझ्या सर्वांत आवडत्या राहिलेल्या आहेत. तो म्हणजे ‘आभास’! इथे ओळख होते ती 4D आणि 5D राईड्सची. हे दोन्ही प्रकार म्हणजे 3D च्या पुढची पायरी, आणि यांना ही नावं उगीच दिलेली नसून त्यांनी निर्माण केलेल्या आभासातही फरक असतो. यापूर्वी मी 4D एकदा सिंगापूरच्या सॅन्टोसा बेटावर करून पाहिलेली होती आणि 5D उटीच्या एका पार्कमध्ये. तिथे त्या राईड्समध्ये कुठलेही चित्रपट दाखवले गेले होते (जे खास होतेच!) पण इथे मला तोच प्रकार माझ्या आवडत्या अव्हेंजर्सच्या बाबतीत अनुभवता येणार होता. त्यामुळेच मी आमचं हॉटडॉग खाऊन झाल्यावर सरळ तिकडे जायचा प्रस्ताव मांडला, जो तिने समजूतदारपणे मान्य केला.
4D म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपल्या डोळ्यांसमोर चित्रपट चालू असतो, आणि आपण 3D चष्मेही घातलेले असतात, आणि 3D च्या पुढची पायरी म्हणून तिथे खऱ्यासारखे वाटणारे खास इफेक्ट्सही असतात. उदाहरणार्थ, सिंगापूरच्या त्या शोमध्ये कुठल्यातरी निर्जन बेटावरचा प्रसंग होता, म्हणून चित्रपटात नायक समुद्रात गेला की आपल्या चेहऱ्यावर शिंतोडे उडवले जायचे. त्या शोची एक विशेष आठवणारी गोष्ट म्हणजे चित्रपटात वाळूवरून खेकडे चालत पायापाशी आले की पायांपाशी हवा सोडून गुदगुल्या केल्या गेल्या होत्या. 5D म्हणजे त्याहूनही जरा पुढची पायरी, म्हणजे सगळ्या खुर्च्या एका युनिटचा भाग असून चित्रपटातल्या प्रसंगाप्रमाणे ते आख्खं युनिट हलायचं. आम्ही केलेल्या या राईड्सपैकी मार्व्हल विभागातल्या दोन्ही 5D प्रकारच्या होत्या.
त्यातल्या पहिलीचं नाव होतं ‘अल्ट्रॉनशी युद्ध’. आम्ही त्या इमारतीच्या आत गेलो तर तिथे एका लहानशा खोलीत कोपऱ्यात ते चष्मे ठेवलेले होते, ते घेऊन आत जायचं होतं. या राईडवर एका वेळी पाचच लोक जाऊ शकतात, पण आम्ही दोघंच होतो आणि बाकी कुणीच आलं नव्हतं म्हणून आम्हाला चक्क गर्दी नसल्यामुळे वाट पाहावी लागली! तेवढ्या वेळात माझ्या बहिणीने तिथल्या मदतनीस बाईशी खूप गप्पा मारून घेतल्या. शेवटी कुठूनतरी तीन साधारण तिच्याच वयाच्या मुली आल्या आणि आम्हाला सगळ्यांना आत सोडलं. ही खोली आधीच्यापेक्षाही लहान होती आणि त्यात फक्त एक जाडजूड यान ठेवलेलं होतं. त्याच्या पुढच्या भागातल्या दोन सीट्सवर आम्ही बसलो. सीटबेल्ट लावले. खरंतर आता मला रोलर-कोस्टरची भीती वाटणं थांबलंच होतं, पण तरी सुरु होणारी राईड अनपेक्षितपणे रोलर-कोस्टर निघाली असती तर तो धक्का मला फारसा आवडला नसता. म्हणूनच इथे लोखंडी ग्रीप्स नसून सीटबेल्ट होते हे पाहून मला जरा हायसं वाटलं. मग ती राईड सुरु झाली.
सर्वप्रथम आमचं यान उलटं फिरवून त्याचं तोंड दुसऱ्या बाजूच्या भिंतीकडे आणलं गेलं, पण तिथे आता ती प्लायवूडसारखी वाटणारी फिकट निळ्या रंगाची भिंत नव्हतीच. तिची जागा एका अंधाऱ्या गल्लीतल्या साध्या विटांच्या भिंतीने घेतली होती. मग आमच्या यानाने वेग घेतला तशी ती भिंत मागे पडत गेली, आणि अचानक यान उडालं आणि आम्ही त्याच इमारतीच्या गच्चीवर जाऊन पोहोचलो. आमच्या यानाची समोरची काच कधी लावली होती ते मला आठवत नव्हतं, पण आता त्या काचेसमोर आयर्न मॅन येऊन आम्हाला त्यांना मदत करायचं आव्हान देत होता. गच्चीवरून समोर पसरलेल्या अवाढव्य शहरात अल्ट्रॉन आणि त्याची यंत्रमानवांची सेना धुमाकूळ घालत असल्याचं दिसत होतं. त्याच्या स्वभावाप्रमाणेच आमचा होकार गृहीत धरून त्याने आमच्या यानाला ढकलून पुढे आणलं आणि त्या सेनेवर लेझरचा मारा करायला सांगितला. त्याप्रमाणे आमच्या यानाने तो केलाही. तेव्हा त्यामुळे उचकून काही यंत्रमानव आमच्याकडे आले आणि आमच्या यानावरही लेझर मारायला लागले. एकाचा नेम बरोबर लागून आमच्या काचेला तडा गेला; त्याला हात पुढे करून स्पर्श करण्याचा मोह मी आवरला. तरी आमचा हल्ला चालूच असल्याने शेवटी त्या यंत्रमानवांनी आमचं यान उचलून खाली भिरकावून दिलं. त्या गगनचुंबी इमारतीवरून आम्ही रोलर-कोस्टरच्या दसपट वेगाने खाली कोसळलो, पण सुदैवाने खाली उभ्या असलेल्या हल्कने आम्हाला पडायच्या आधी पकडून परत वर फेकून दिलं. यान पुढे वाकत असल्याचं, खुर्च्या हलत असल्याचं व्यवस्थित जाणवत होतं. परत त्या गच्चीवर आलो तर समोर साक्षात अल्ट्रॉन उभा होता आणि काहीतरी फालतू भाषण ठोकत होता. त्याचं लक्ष इकडे असताना मागून आयर्न मॅनने त्याच्यावर आगीचा मारा करून त्याला नष्ट केलं, आणि एवढा वेळ यानावर बसलेल्या कॅप्टन अमेरिकाने खाली उतरून आमचे आभार मानले. मग अचानक आमचं यान पुन्हा वळलं आणि त्या इमारतीच्या गच्चीची जागा आधी अंधाराने घेतली, मग उजेडाने. त्या उजेडाला डोळे सरावल्यावर आम्ही इकडेतिकडे पाहिलं, तर आम्ही त्याच निस्तेज निळ्या रंगाच्या खोलीत होतो. आमचं यान तसूभरही हललेलं नव्हतं. त्या मदतनीस बाईने आम्हाला हसून उतरायला सांगितलं तेव्हा आम्ही तिथून बाहेर पडून चालू लागलो. जाताना ती बाई ‘अव्हेंजर्सची मदत केल्याबद्दल धन्यवाद’ असं मनापासून हसून म्हणाली तेव्हा मीही तिच्याकडे वळून पाहून हसलो. वळल्यावर आतल्या यानाकडे लक्ष गेलं. त्याला समोरची काच नव्हतीच.
5Dच असला तरी उटीपेक्षा हा अनुभव पुष्कळ वेगळा होता. उटीच्या राईडमध्ये ‘कॅनियन कोस्टर’ नावाच्या भयानक रोलर-कोस्टरमधून जातानाचा देखावा होता, जो जमला होताच, पण तरी तो एका स्क्रीनवर घडत होता. खुर्च्या हलत होत्या, पण तरी पूर्णपणे त्या प्रसंगात शिरायला त्या स्क्रीनकडेच बघण्याला पर्याय नव्हता. चष्मा काढला की क्षणात सगळा आभास कोसळला असता. त्याउलट इथे म्हणजे आमच्या आजूबाजूच्या भिंतीवरच सगळं प्रोजेक्शन केलं गेल्याने चष्मा काढला किंवा दुसरीकडे बघितलं तरी इफेक्ट तसाच राहत होता. शिवाय आमचं यान असंच कसंही हलायच्या ऐवजी व्यवस्थित त्या प्रसंगानुसार फिरत होतं, झुकत होतं. अर्थात, याचा उटी किंवा दुबईशी काहीच संबंध नव्हता कारण तेच तंत्रज्ञान जिथे नेलं जाईल तिथे अशा राईड्स करता येऊ शकत होत्या; त्यात न जमण्यासारखं काहीच नव्हतं. पण मला ही राईड जास्त आवडली याचं कारण तो सर्व पैलू विचारात घेऊन जमवून आणलेला इफेक्ट होता, असं असं इतक्या खऱ्यासारखं करणं शक्य असल्याचं पाहूनच मी तसा भारावून गेलो होतो. पण मग मी मनात म्हटलं, ज्या माणसाला त्याच्या कल्पनाशक्तीला होलोग्रॅमची सोबत देऊन मायकल जॅक्सनला त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या गाण्यावर खऱ्याखुऱ्या रंगमंचावर नाचण्याची संधी देता येते, त्याला असा आभास निर्माण करण्यात काय अवघड वाटणार आहे?
या सगळ्यानंतर पुन्हा भूक लागलेली असल्यामुळे आम्ही थेट जेवायला गेलो. तशी छोटीछोटी उपाहारगृहे प्रत्येक विभागात होती. त्याशिवाय ‘Boulevard Gourmet’ आणि मार्व्हल विभागातली ‘Tony’s Skydeck’ ‘Chang’s Golden Dragon’ वगैरेंसारखी मोठी हॉटेलंही होती. जेवणावर तसं आमचं फारसं बोलणं झालेलं नव्हतं, पण उगीच कुठल्यातरी ‘भारीतल्या’ ठिकाणी जाऊन प्रयोग करण्यापेक्षा शेवटी आम्ही चायनीजच ठरवलं असतं. तरीही, आता काही राईड्स झाल्यानंतर असं वाटत होतं की उरलेला दिवसभर अशीच मजा करायची असेल तर फार जड असं काही जेवू नये. म्हणून आम्ही एका फास्ट फूडच्या छोट्याशा इमारतीत जाऊन दोन ‘Taco Meals’ वर आमची खायची भूक भागवली. शेजारच्याच इमारतीत आम्ही सकाळी पाहिलेल्या शाळेतल्या मुलांनी गर्दी केली होती. त्या इमारतीत मॅक्डोनाल्ड्स किंवा बर्गर किंग वगैरे असावं. त्यांच्या शाळेबरोबर ती इथे आली होती तेव्हा त्यांनाही तिथेच नेलं होतं असं माझ्या बहिणीने सांगितलं. नंतर जरा नजर टाकल्यावर मला असं दिसलं की त्या ‘भारीतल्या’ हॉटेल्सपेक्षा अशा प्रकारच्या ठिकाणीच जास्त गर्दी होती. कदाचित मुलांना राईड्स करायला पाठवून शांतपणे जेवायची इच्छा बाळगणारे पालकच तिथे जात असावेत.
त्यानंतर मार्व्हल विभागातली दुसरी तशीच राईड केली, जिच्यात हल्क त्याला कोंडून ठेवलेल्या जागेतून पळून जातो आणि जाताना ती नष्टही करतो. हा अनुभव आधीच्या राईडपेक्षाही जास्त खऱ्यासारखा वाटला, कारण यावेळेस आम्ही एका मोठ्या बंद घुमटाच्या आत होतो आणि सगळ्या खुर्च्यांची मांडणी प्लॅनेटोरियममध्ये असते तशी गोलाकार केलेली होती. सगळा चित्रपट आमच्या सगळ्या बाजूंना घडत होता. त्यात समोर बसलेले लोकही दिसत असल्यामुळे आपण सगळे एका मोठ्या तबकडीच्या आत असून ती खरंच तिथून बाहेर पडायला हल्कला मदत करतेय असं वाटत होतं. पहिली काही मिनिटं फक्त चित्रपटातल्या गोष्टी फिरतायत का आमच्या खुर्च्याही गोल फिरतायत हे मला कळलं नव्हतं. मग काही वेळाने जेव्हा एका मोठ्या यंत्रमानवाला आमची तबकडी धडकली तेव्हा आमची रांग पूर्ण तिरपी झाली, तेव्हा आपणही हलत असल्याचं कळलं. या दोन्ही राईड्समध्ये खूप मजा तर आलीच, पण शिवाय ‘अव्हेंजर’ बनल्यावर कशाकशाला सामोरं जावं लागतं हे नीटच जाणवलं होतं, तेव्हा मी माझ्या त्या प्रकारच्या कल्पनांकडे जरा जास्तच गंभीरपणे बघायला लागलो.
4D किंवा 5Dची एक प्रकारे चटक लागते, कारण त्याचा कुठलाच अनुभव विसरण्यासारखा नसतो. त्यांनी खूप कष्ट घेऊन ते सगळं खऱ्यासारखं भासवण्याचा केलेला प्रयत्न आणि त्याचाच आदर राखत आपणही आपल्या बाजूने क्षणभर आपली बुद्धी बाजूला ठेवून ते खरंच असल्याची करून घेतलेली समजूत या दोन्ही गोष्टींच्या एकत्रीकरणातून तो अद्भुत प्रकार घडतो, आणि असं एकदाच करून मनाचं समाधान होत नाही. आम्हीही तिथून थेट कार्टून नेटवर्क विभागातल्या ‘Ben 10’च्या अशाच राईडकडे गेलो, पण ती सुरू व्हायला वेळ होता, म्हणून मग आम्ही तोपर्यंत इतर काही राईड्स करून घ्यायचं ठरवलं आणि मग निव्वळ टाईमपास म्हणून एक अत्यंत साधी राईड निवडली. ‘Adventure Time’ नावाच्या एका लोकप्रिय कार्टूनमधल्या ‘ऊ’ नामक कुत्र्याच्या पाठीवर (म्हणजे अर्थातच ‘आत’, सीटबेल्ट लावून) बसून त्या संपूर्ण विभागाला एक चक्कर मारायची एवढंच त्या राईडमध्ये होतं. या विभागातल्या सगळ्या इमारतींच्या वरच्या भागांतून मोठे रॉड्स लावून एकमेकांना जोडलेले होते त्यांच्यावरून आमची ही राईड फिरणार होती. काही वेग नाही, गिरक्या नाहीत, ‘थ्रिल’ नाही. एक शांत चक्कर. त्याचाही फायदा हा झाला की या राईडच्या स्वरूपामुळे फोन न्यायला परवानगी होती, त्यामुळे उंचावरून पार्कचे काही फोटो काढता आले. शिवाय गप्पा मारायला वेळ मिळाला तो वेगळाच.
तसं पाहता, आम्हाला गप्पा मारण्यासाठी त्या राईडवर जाण्याची काहीच गरज नव्हती. दिवसभरात अनेकदा अनेक विषयांवर आमचं बोलणं झालं होतं. त्यांची शिक्षणपद्धती, आमचे मित्रमैत्रिणींचे ग्रुप्स, या दोन देशांची तुलना वगैरे अशा अनेक गोष्टी. तिची परीक्षा जवळ आल्यामुळे तिला फार ‘फ्रेंड्स’ पाहता येत नव्हतं, म्हणून जेवताना मी तिला तिच्या विनंतीवरून त्याची सगळी गोष्ट सांगितली. Catching up तर पुष्कळ झालं; असं वाटलं की आम्ही एकमेकांना पहिल्यांदाच ‘भेटत’ होतो. आपल्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल फार कमी माहिती असलेली आणि तरी ती जाणून घेण्यास खूप उत्सुक असलेली एवढ्या जिवाभावाची व्यक्ती सहसा थोडीच भेटते? हाच विचार आमच्या दोघांच्याही मनात येऊन गेला होता. कधीकधी रोजच्या परिचयातूनही होत नाही ते ‘बॉन्डिंग’ अशा एका प्रसंगात होऊन जातं, आणि असा अनुभव मला माझ्या जवळच्या मित्रांच्या बाबतीत अनेकदा आलाय. थोडक्यात सकाळी घरातून बाहेर पडताना माझी दुबईला राहणारी बहीण संध्याकाळी परत येईपर्यंत जिच्यापाशी बिनधास्त कुठल्याही विषयावर मन मोकळं करता येईल अशी विश्वासातली व्यक्ती बनली होती. ही अनपेक्षित ‘राईड’ इतरांपेक्षाही सुखद ठरली होती.
आता आम्ही ‘Ben 10’ सुरु व्हायची वाट बघताबघता डायनासॉर विभागाकडे आलो आणि तिथल्या एका ‘हॉरर’ राईडमध्ये भागही घेतला. खाणीत वापरतात तशी रुळांवर चालणारी गाडी आम्हाला एका घनदाट जंगलात घेऊन गेली, जिथे डायनासॉर मोठ्याने गर्जना करीत आणि झाडांची ओली पानं उगीच खांद्याला स्पर्श करून जात. मध्येच एक चपळ डायनासॉर गाडीवर झेप घ्यायचा, पण ती गाडीच सरकून त्याला चुकवायची. तिथून एका गुहेत छतावर लटकलेल्या भल्यामोठ्या कोळ्यांना अंगावर उतरताना पाहतापाहता परत बाहेर जंगलात आलो. एक महाकाय T-Rex आमच्या समोर येऊन थबकला, तेव्हा गाडी स्तब्ध झाली, कारण म्हणे T-Rexना स्तब्ध गोष्टी दिसत नाहीत. (ते खरंय म्हणा) पण लोक कितीही स्तब्ध झाले तरी शेवटी तो गुरकावून आलाच मागे; मग मात्र आमची गाडी वेगाने पुढे जाऊन थेट बाहेर आली. आता या राईडमध्ये काहीही होणं केवळ अशक्य असल्याचं माहित असूनही त्या सगळ्या इफेक्टमुळे भीती वाटते खरी. उद्देश सफल; चला बाहेर! माझ्या बहिणीला खरं तर तिथल्या भूतबंगल्यातही जायचं होतं, पण तेव्हा मी नको म्हणालो. मग आम्ही परत ‘Ben 10’ पाशी आलो, तर सुदैवाने ती आता सुरु झालेली होती.
हे म्हणजे एक मोठं थिएटरच होतं, आणि एका खूप मोठ्या स्क्रीनसमोर किमान दोनशे खुर्च्यांच्या रांगा मांडलेल्या होत्या. आता एवढ्या खुर्च्या एकदम हलणं अशक्यच होतं, पण म्हणून प्रत्येक खुर्ची स्वतंत्रपणे थोडीशी हलू शकत होती. याशिवाय मला ती ‘इफेक्ट’ची यंत्रणा बसवलेली दिसली आणि मी खूश झालो. आधीच्या राईड्समध्ये 5D असल्या तरी हा प्रकार जवळपास नव्हताच. मग चित्रपट सुरु झाला. इतरांच्या तुलनेत बऱ्यापैकी मोठी अशी ही वीस-पंचवीस मिनिटांची फिल्म होती. आम्ही एका मोठ्या व्हॅनमधून फिरत असल्याने त्यानुसार आमच्या खुर्च्या हलत. पाण्यात पडलो तेव्हा त्या यंत्राने गार हवा सोडून भिजल्याचा आभास निर्माण केला, आणि नंतर जवळच एक मोठा स्फोट झाल्यावर तो परिणाम गरम हवेने साधला. यापलीकडे त्या राईडमध्ये स्वतःचं असं ‘विलक्षण’ काही नव्हतं, पण 5D जमलं होतं ना, मग तक्रार कसली?
ही राईड संपली तेव्हा साडेपाच वाजत आले होते आणि काकूचा फोन यायची वेळ झाली होती. तेवढ्या वेळात आम्ही एका छोट्या डेझर्ट बारमध्ये जाऊन कुठलंतरी भारी फ्रेंच डेझर्ट घेतलं आणि परत बराच वेळ बोलत बसलो. शेवटी काकूचा फोन आला आणि ते तिथून निघाल्याचं तिने सांगितलं. आता आमच्याकडे थोडाच वेळ उरलेला होता, पण एक शेवटची राईड करण्यासाठी तो पुरेसा होता.
दिवसाची सुरुवात आणि शेवट दोन्ही रोलर-कोस्टरने झालेली माझ्या बहिणीला खूपच आवडलेली गोष्ट होती, आणि मलाही संधी आहे तोवर तो थरार पुन्हा एकदा अनुभवायचा होता. यावेळेस आम्ही डायनासॉर विभागातल्या ‘प्रिडेटर’ राईडकडे गेलो. राईड सुरु झाल्यानंतर आमची गाडी अगदी हळूहळू पार्कच्या छताकडे चढत जाणाऱ्या रुळांवरून चढायला लागली. थोड्या वेळाने तर त्या रुळांनी जमिनीशी काटकोनच केला आणि मला रॉकेट सुटण्यापूर्वी अंतराळयानात बसल्यासारखं वाटलं. थेट समोर छताकडे बघत आणि हा चढ संपून वेगाने गडगडत खाली यायची वाट पाहताना माझ्या मनात ही राईड दिवसाचा ‘हायलाईट’ ठरणार असा विचार येऊन गेला. मग चढ जवळपास संपला तसे मी डोळे मिटून घेतले, कारण तिथून पुढे मला फक्त जाणिवेच्या पातळीवर ते अनुभवायचं होतं. चढ संपल्याचं जाणवलं तसा मी मोकळेपणाने हसलो, आणि मग इतरांसोबत अशक्य वेगाने खाली कोसळलो.
IMG World of Adventures मधून बाहेर पडून त्याच्या प्रवेशद्वाराशी येताना माझ्या मनात एवढा एकच विचार होता, की काय लागतं शेवटी हे सगळं उभं करायला? थोडीशी कल्पनाशक्ती, थोडा वेगळा विचार. आणि जमेल तेवढं प्रत्येक अनुभवाला पूर्णत्व मिळवून देण्याची इच्छा. इथे आलो की वेगळं काहीतरी करायला मिळतं, जे एरवीच्या आयुष्यात करता येणं जवळपास अशक्यच असतं. याशिवाय एक खास गोष्ट म्हणजे, आपण या पार्कमध्ये आलोय तेव्हा मौजमजा करणं हाच आपला शुद्ध हेतू असल्याचं आपण स्वतःशीच कबूल केलेलं असतं, आणि ती होतेही. मधल्या काळात करू आपण वाटल्यास आपल्या रोजच्या जीवनावर जरा विचार, पण राईड चालू असताना आपल्याला इतर सगळ्यापासून एक अद्भुत तात्पुरती मुक्ती मिळते, आणि उरतो ती फक्त ती भीती, तो थरार! असे सगळे विचार मनात गर्दी करत असताना आम्हाला काका, काकू आणि बाबा दिसले आणि आम्ही हसतहसत त्यांच्याबरोबर बाहेर पडलो.
Comments
Post a Comment