Dubai Diaries: प्रस्थान


“Please mind the platform gap,” हे एक ओळखीचं वाक्य कानी पडलं आणि मी भानावर येऊन समोर बघू लागलो. 
आम्ही ज्या इमारतीतून चेक-इन केलं होतं तिथून आमचं बोर्डिंग गेट ज्या टर्मिनसवर होतं त्या टर्मिनसपर्यंत आम्हाला नेण्यासाठी येणाऱ्या मेट्रोची वाट बघत आधीची पाचदहा मिनिटं घालवली होती. विमानप्रवासाचे जवळपास सगळे विधी होऊन गेले होते आणि आता फक्त घोषणा झाली की विमानाकडे जायचं एवढंच आम्हाला करायचं होतं. मधला वेळ आम्ही चेक-इनच्या पलीकडे असलेल्या आलिशान लाउंजमध्ये बसून काढला होता. एकदा त्यालाच जोडून असलेल्या ‘दुबई ड्युटी-फ्री’ मध्ये फिरूनही आलो होतो. दुबईच्या मॉल संस्कृतीशी (खरंतर त्यातल्या एका अत्यंत लहान सभासदाशी) आलेला शेवटचा संबंध! भिंतीवरच्या टी.व्ही.वर आमच्या विमानाची जागा दिसल्यावर आम्ही उठलो होतो. सुदैवाने हे विमान अगदी वेळेवर असल्याचं दिसत होतं. बाकी, एवढं गच्च भरलेलं वेळापत्रक असल्यामुळे झालाच एका विमानाला उशीर तर तो किती वेळ टिकेल सांगता येत नाही, कारण रांगेतून बाहेर पडलेल्या विमानांकडे लक्ष द्यायला उसंत कुणाला असणार? परवा नॅशनल जिओग्राफिकवरचा ‘Mega Airports’ हा कार्यक्रम लागला होता त्यात दुबईहून सुटणाऱ्या एका विमानाला तब्बल तीस तास उशीर झाल्याची गोष्ट सांगत होते. याशिवाय त्यांनी मेट्रोची एक नवीन लाईन टाकल्याचीही बातमी त्या कार्यक्रमात दिली. आम्ही तिथे होतो तेव्हा एकच लाईन होती आणि तिच्यातून जाताना आम्हाला दुसरीचं बांधकाम चालू असलेलं दिसत होतं. 
मेट्रोमध्ये बसून आम्ही विमानतळ ओलांडायला लागलो तेव्हा पलीकडच्या खिडकीतून सूर्य मावळताना दिसत होता. ते दृश्य पाहून मनात आठवणींची गर्दी व्हायला लागली. पहिल्याच दिवशी संध्याकाळी मॉलमध्ये जाताना पाहिलेला सूर्यास्त…. दौऱ्याच्या दिवशी धाऊमध्ये बसून खाडीच्या पाण्याला सोनेरी रंगाचं करणारा सूर्यास्त. अल एय्नहून परत येताना गाडीच्या खिडकीतून दुबईच्या गगनचुंबी इमारतींच्या काचांवर दिसणारा सूर्यास्त. IMG च्या जगात फिरताना न पाहिलेला सूर्यास्त. दुबईच्या मेट्रोच्या अगदी पुढच्या खिडकीतून पाहिलेला सूर्यास्त. ग्लोबल व्हिलेजमध्ये जाण्यापूर्वी ज्याची आतुरतेने वाट बघितली तो सूर्यास्त. डेझर्ट सफारीमध्ये उंच ड्यून्सवर कसंबसं उभं राहत अगदी क्षितिजाला टेकेपर्यंत दिसू शकलेला सूर्यास्त आणि अर्थातच, बुर्ज खलिफाच्या १२५व्या मजल्यावरून पाहिलेला, सगळ्या दुबईनगरीला एका सोन्याच्या कवडशात लपेटणारा अद्भुत सूर्यास्त. हे सगळे एका चलतचित्राप्रमाणे माझ्या नजरेसमोर येऊन गेले. दुबईतल्या आमच्या या अल्प वास्तव्याचा सूर्य मावळताना शेवटचे एकदा डोळे दिपवून गेला. 
आम्ही आमच्या टर्मिनसच्या इमारतीत प्रवेश केला होता. मेट्रोची दारं उघडल्यावर आम्ही शांतपणे सगळ्या गर्दीच्या मागून आमचं गेट शोधायला निघालो. D विभागातलं काहीतरी सत्ताविसावं की अठ्ठाविसावं गेट होतं. अशा वेळी नाही म्हटलं तरी पुणे विमानतळ आणि त्याची चारच गेट्स डोळ्यासमोर येतातच. पण आता, प्रवास सुरु झाल्याची मनाची खात्री पटल्यावर, तोच पुणे विमानतळ आता लवकरात लवकर बघायला मिळावा अशी आशा वाटायला लागली होती. 
पुढे वाढून ठेवलेल्या प्रवासाची पूर्ण कल्पना येताच ती इच्छा अजूनच बळावली. विमानप्रवासाच्या एकूण वेळातला खुद्द विमानात बसतो तो वेळ कमीत कमी त्रासदायक असतो. एकतर मी कधी खूप लांबचे विमानप्रवास केले नाहीयेत, आणि यावेळीही अंतर कमीच असल्यामुळे विमानाने उड्डाण घेतल्यानंतर साडेतीन-चार तासात ते उतरेल हे माहित होतं. विमानात वेळ सहज जातो. पण दोन्ही बाजूंना मात्र तो अंत पाहतो. यावेळी तर आम्ही आधी दिल्लीला जाऊन मग तिथून पुण्याला येणार होतो, त्यामुळे विमानात दोनदा आणि सगळ्या प्रक्रियेतून चार वेळा जावं लागणार होतं. पहिली प्रक्रिया सुरळीत पार पडली, तर उरलेल्याही तशाच पडाव्यात असं खूप वाटत होतं. तशा त्या तुलनेने पडल्याही. पण तेव्हा विमानात बसलं की शांतपणे झोपी जात येणार नव्हतं, कारण अपरात्री उठून एका अनोळखी विमानतळावर काही तास काढायचे होते ही जाणीव सारखी येऊन टोचत होती. सुदैवाने दिल्ली विमानतळावर आम्हाला दोनच तास काढायचे होते, जे सगळ्या प्रक्रिया धरून लगेच संपून गेले असते. पण तरी… मी विचार करणं सोडून दिलं. घरी आमच्याकडून मिळणाऱ्या अपडेट्सची वाट बघणाऱ्या माझ्या बहिणीला स्थिती कळवली आणि शांतपणे वेळ घालवत राहिलो. काही वेळाने घोषणा झाली आणि जमलेले सगळे लोक घोळक्याने गेटमधून पलीकडच्या बोळात शिरले. बहुसंख्य लोक घरी परत जायला निघालेले उत्तर भारतीय होते. 
यावेळी आम्हाला aisleच्या बाजूला असलेल्या दोन सीट्स मिळाल्या होत्या, त्यामुळे खिडकी कुणाच्याच वाट्याला आली नव्हती. आता पूर्ण अंधार पडलेला होता. विमान उडताना खिडकीतून दुबईचं शेवटचं दर्शन घेण्याची माझी इच्छा पूर्ण होईल का नाही अशी शंका येत होती. मी माझ्या उजवीकडच्या दोन सीट्सच्या पलीकडे असलेली खिडकी बघितली, तर तिथून बऱ्यापैकी दिसू शकत होतं. पण दुबईचं दृश्य, विशेषतः मला जे बघायचं होतं ते कुठल्या दिशेला येईल याची काहीच कल्पना नसल्यामुळे मी डावीकडेही नजर टाकली. बाबांच्या आणि इतर दोन सीट्सच्या पलीकडे असलेली खिडकी अगदीच टॅब्लेटच्या आकाराची दिसत होती. हे बघून झाल्यावर मी मागे टेकून वाट बघत बसलो. दोनतीन मिनिटातच सगळे मुख्य दिवे मालवले गेले आणि सामानाच्या रॅक्समध्ये खालच्या बाजूला लावलेले प्रखर निळे तेवढे चालू राहिले. शिवाय प्रत्येक सीटच्या वरच्या सीटबेल्ट आणि ‘धूम्रपानास बंदी’च्या खुणा केशरी रंगात चमकायला लागल्या. दुबई विमानतळाचा विस्तार अफाट असला तरी धावपट्टी आमच्या टर्मिनसला तशी लागूनच होती, म्हणून पुणे विमानतळावर आम्ही मोठ्या मैदानातून खूप वेळ टॅक्सिंग केलं होतं तसं यावेळी करावं लागलं नाही. लगेच आमचं विमान सरळ झालं आणि वेगाने पुढे पळायला लागलं. आजूबाजूची घरघर, हादरे वगैरे यांचं प्रमाण वाढत जाणं आणि अचानक पूर्ण हलकं वाटणं हा एक आता सवयीचा झालेला थरार पुन्हा एकदा अनुभवला. मी घाईघाईने दोन्ही खिडक्यांतून बाहेर नजर टाकली. सगळीकडे फक्त दिव्यांची रासच तेवढी दिसू शकली. त्या राशीत कुठेतरी पलीकडच्या एका रस्त्यावर A380 बघायला आलेल्या उत्साही लोकांच्या गाडीचे दिवे असू शकले असते का? विमान आता पूर्ण वळण घ्यायला लागलं होतं. दुबईचं शेवटचं दर्शन होऊन गेलं होतं आणि त्यात लक्षात ठेवण्यासारखं काहीच नव्हतं यामुळे मी काहीसा उदास झालो होतो. 
आणि अचानक, “तिकडे बघ,” असं बाबा ओरडले आणि मी क्षणात वळून त्यांच्या बाजूच्या खिडकीकडे पाहिलं. त्या टॅब्लेटच्या आकाराच्या लंबगोलाकार खिडकीतून दूरवर उभा असलेला बुर्ज खलिफा संपूर्ण आणि स्पष्ट दिसत होता. विमान गर्रकन वळायच्या आत त्याने शेवटचे एकदा दिवे मिचकावून घेतले आणि माझी उदासीनता कुठच्या कुठे पळून गेली. 
त्यानंतर विमानातले दिवे पुन्हा लागून जेवण येईपर्यंत मी माझ्या या बुर्ज खलिफाच्या वेडाबद्दल विचार करत बसलो होतो. ते नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हाचा प्रसंग आठवून मला हसू आलं. शाळेत आम्हा मित्रांमधले मधल्या सुट्टीतले गप्पांचे विषय ठरलेले असायचे - इलेक्ट्रॉनिक्स, गाड्या आणि टीव्ही हे त्यातले मुख्य होते, पण गगनचुंबी इमारती हा विषयही आम्हाला तितकाच प्रिय होता. अशाच एका चर्चेत माझ्या मित्राने मला जगातली सगळ्यात उंच इमारत कुठली ते माहित आहे का विचारलं. मला माहित नव्हतं; कुठे आहे म्हटलं असतं तर मी न्यूयॉर्क असा अंदाज केला असता. मग तो म्हणाला, “ती दुबईत आहे. तिचं नाव बुर्ज खलिफा,” तेव्हा फक्त ‘अच्छा’ म्हणून ते सोडून दिल्यानंतर खूप काळाने बाबांच्या फोनमधल्या डिफॉल्ट वॉलपेपर्सच्या चित्रांमध्ये त्याचा एक फोटो सापडला; तेव्हा पहिल्यांदा त्याला नीट बघितलं. तशी स्वतःच्या वॉलपेपरसाठी मला फोनने दिलेल्या फोटोंपैकी एकही न निवडता स्वतःच एक अंतराळातला वगैरे हुडकून लावायला आवडतो, पण हा फोन बाबांनी मला दिला तेव्हा हा वॉलपेपर मी बदलला नाही. हे दोन्ही प्रसंग तेव्हा माझ्या डोळ्यापुढे तरळले. एखादी व्यक्ती आपली अगदी जिवाभावाची झाल्यानंतर तिच्या आणि आपल्या पहिल्या भेटी आठवल्या तर जसं विचित्र वाटतं तसं माझं झालं होतं. बुर्ज खलिफामध्ये काहीतरी अनाकलनीय शक्ती असावी, जी त्याला पाहिल्यानंतरची एवढी वर्षं मला दुबईकडे खेचत राहिली, आणि तिच्यामुळेच मला या इतरही अनेक अद्भुत गोष्टी पाहता आल्या, अनुभवता आल्या. त्याच शक्तीने विमानातली माझी जागा बाहेरचं काही बघण्यासाठी सर्वस्वी अयोग्य असूनही ते योग्य दिशेला वळवून मला त्याची एक शेवटची झलक दाखवली. आणि आज दुबई ट्रिपला एवढा काळ उलटून गेल्यानंतरही मला तितक्याच ताकदीने पुन्हा तिकडे खेचतेय ती हीच. त्या क्षणी मी मनात दोन गोष्टी कायमच्या पक्क्या केल्या : आयुष्यात किमान अजून एकदातरी दुबईला जायचंच, आणि गेल्यावर या ट्रिपमध्ये केलेल्या बाकीच्या गोष्टी करो न करो, पण बुर्ज खलिफाला परत भेट द्यायचीच. 
दरम्यान जेवणाच्या बाबतीत काहीतरी गोंधळ झालेला दिसत होता, पण सगळे एकाच वेळी बोलत असल्यामुळे तो नक्की काय होता ते कळायला बराच वेळ लागला. आम्ही दोघांनी पुन्हा स्पेशल पॅकेज घेतल्यामुळे आमचं जेवण आधी आलं होतं. ते होईपर्यंत बरोबर घेतलेल्या जेवणाच्या पाकिटांपैकी नॉन-व्हेजच्या पाकिटांची संख्या कमी होती असं निदर्शनास आलं होतं, त्यामुळे नॉन-व्हेज निवडूनही आता व्हेज समोर आलेले लोक उसळत होते. खरं तर व्हेज ‘थाट’ काही कमी आकर्षक असतो अशातला भाग नाही. चिकनच्या ऐवजी एखादी चांगल्यापैकी पंजाबी भाजी किंवा उसळ वगैरे असते. पण चिकनची अपेक्षा ठेवून विमानात चढलेल्या सगळ्यांनाच हा बदल शांतपणे पचवता आला नव्हता. आमचं जेवण तसं समाधानकारक होतं, पण एकूणच आता नॉन-व्हेजच्या बाबतीतल्या अपेक्षा फूड कोर्ट्सनी चांगल्याच वाढवून ठेवल्या होत्या आणि त्याला काकूनेही हातभार लावला होता. माझ्या दृष्टीने सलग एवढा काळ मुख्यतः सामिषावर जगण्याची ही पहिलीच वेळ होती, पण हा प्रयोग सफल झालेला पाहून मी तो घरी आचरणात आणण्याचा विचारही केला नसता. शेवटी उत्तम ट्रिप म्हणजे ‘रोजच्या आयुष्यापासून एक ब्रेक’ अशी असते, पण त्यामुळे रोजच्या आयुष्याची आठवण येणं काही थांबत नाही आणि ब्रेक संपूच नये असंही वाटत नाही. खाण्याच्या बाबतीतही तसंच! विमानातल्या या जेवणानंतरच्या माझ्या झोपेतल्या स्वप्नात मेथीची डाळ घातलेली भाजी आली असती तर मला नवल वाटलं नसतं. पण काही म्हणा, गेल्या दहा दिवसांत एवढं नक्कीच घडलं होतं की त्यामुळे पुन्हा जेव्हा केव्हा डोळे दुबईला जाण्याचा प्रस्ताव मांडतील तेव्हा जीभ त्यांना संपूर्ण पाठिंबा देईल आणि पायांना मान्य करावं लागेल!          
यावेळी जेवण वगैरे सगळं योग्य वेळी झाल्यामुळे नंतर झोपही सहज आली आणि उरलेला विमानप्रवास त्यातच संपून गेला. मी उठलो तेव्हा बाहेर अजूनही मिट्ट काळोख होता आणि पुन्हा सीटबेल्ट लावण्याची सूचना झाली होती. विमान शांतपणे उतरलं आणि एक बस आम्हाला मुख्य इमारतीकडे घेऊन गेली. प्रवेशप्रक्रिया वगैरे झाल्यावर आम्ही लगेच पुढच्या विमानाचं चेक-इन करायच्या रांगेत उभे राहिलो. आमच्या बॅगा त्या फिरत्या पट्ट्यांवरून येण्यात जरा वेळ गेल्यामुळे विमानतळावर काढायचा वेळ अजूनच कमी झाला होता. चेक-इनही तुलनेने लवकर झालं आणि आम्ही गेट हुडकून थेट त्याच्या शेजारीच खुर्च्यांवर जाऊन बसलो. या टर्मिनसच्या आणि दुबईच्या त्या टर्मिनसच्या आकारात फार फरक नसेल असं या मधल्या फेरफटक्यामुळे कळलं होतं. तिथे गेटजवळचा तो अर्धापाऊण तास अगदीच निष्क्रियपणे पार पडला. दिल्ली हा आमच्या प्रवासातला मधला टप्पा होता. त्यामुळे इथे उतरताना मनात पोचल्याची भावना नव्हती आणि इथून निघताना काहीतरी सोडून चालल्याचीही भावना नव्हती. दोन विमानप्रवासांमधला एक लहानसा टप्पा यापलीकडे त्या तेवढ्या काळाशी आणि जागेशी आमचं काहीही नातं नव्हतं. त्यामुळे उतारतानाच्याच विचारविरहित अवस्थेत आम्ही गेटमधून बाहेर पडलो आणि पुण्याला नेणाऱ्या विमानात शिरलो. 
हे विमान उडाल्यावर मी पुन्हा झोपलो ते शेवटपर्यंत उठलोच नाही. पहाटेच्या आधीच्या कुठल्यातरी प्रहरी आम्ही उतरलो होतो. उतरल्यावर विमानतळाची लहानशी दुमजली इमारत पाहून मला चक्क आनंद झाला. एवढ्या प्रवासानंतर मोठ्ठे टर्मिनस, सरकत्या जिन्यांचं जाळं, उतरायची जागा बाहेर पडण्याच्या जागेपासून दोन किलोमीटरवर असणं हे काहीही नको असतं. विमानातून उतरल्यावर आम्ही सरळ जमिनीवरून चालत इमारतीच्या आतमध्ये शिरलो. प्रवेशप्रक्रिया वगैरे चटकन पार पडली. विमानतळावरचे दोनच बॅगेजचे पट्टे शेजारच्याच खोलीत होते. सामानाला आणणारी गाडीही आमच्याच शेजारून इमारतीच्या टोकाला येऊन थांबल्यामुळे बॅगाही त्वरित हजर झाल्या. त्या फिरत्या पट्ट्यावर बॅगा तो माणूस भिंतीच्या पलीकडे बसून हाताने सोडत होता. आम्हाला मिनिटभरातच आमची बॅग मिळाली. दुबईचा विमानातळ कितीही अजस्त्र, दिखाऊ आणि सोयीसुविधांनी भरून वाहणारा असला तरी शेवटी घरी परत आल्याची भावना वेगळीच असते. 
बाहेर आम्ही एक ‘ओला टॅक्सी’ मागवली आणि ती आल्यावर तिच्यात बसून निघालो. अजूनही बाहेर पूर्ण काळोख होता आणि रस्ते रिकामे होते. पुणे काही अजून बाकीच्यांप्रमाणे ‘The City that never sleeps’ या पदाचे मानकरी ठरले नव्हते (त्याला कदाचित दुपारची ती वेळ जास्त कारणीभूत असेल) आणि पहाटे साडेतीनच्या आसपास रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. मी सगळा वेळ खिडकीबाहेर बघत होतो. खरं तर दहाच दिवस झाले होते हे सगळं पाहून, पण या सगळ्या आपल्याच जागा पुन्हा हळूहळू मनात नोंदल्या जात होत्या असं वाटत होतं. स्टेशन. COEPच्या उड्डाणपुलांचं जाळं. जंगली महाराज रोड. डेक्कन. कर्वे रोड. नळस्टॉप. कोथरूड. सगळा आपला प्रांत.               
चारच्या सुमारास आम्ही घरी पोहोचलो. आईने आमच्यासाठी चहा केला. चहा झाल्यानंतर लगेच एक झोप काढायची आहे असंही बजावलं. खरंतर नुकतेच सहा वाजत होते पण गेल्या काही तासांचा सगळा क्षीण जाणवत होताच, म्हणून मी ते मान्य केलं. काही वेळ आम्ही तसेच शांतपणे बसून राहिलो. 
काही वेळाने आई म्हणाली, “काय, मग कशी झाली ट्रिप?”
तिच्या या प्रश्नाचं उत्तर आत्ता कुठे देऊन होतंय!!    




The Dubai Diaries continue on DDSE2                                             

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प