Dubai Diaries: निरोप


सकाळी लवकर उठून निघेपर्यंतचा प्रत्येक क्षण दुबईचा जमेल तेवढा आनंद लुटण्यात घालवायचा, का अगदी निघण्याच्या क्षणापर्यंत झोपून त्या क्षणाची वाट बघण्याची शिक्षा टाळायची याचा विचार रात्री झोपताना काही मनाशी पक्का झालेला नव्हता. जाग मात्र नेहमीच्याच वेळी आली. तेव्हा ‘Plan A’ उपयोगात आणायचं ठरलं आणि त्यासाठी अर्थातच काका आणि काकूच्या सूचनांचं तंतोतंत पालन केलं गेलं. सामान भरण्याच्या सोपस्काराचा कुठलाही विधी या क्षणापर्यंत करण्यासाठी ठेवण्याची कल्पनाही आम्हाला सहन झाली नसती; त्यामुळे दोन्ही बॅगा आमच्या आधीच तयार होऊन बसल्या होत्या. आम्ही बाकीची सगळी कामं आटोपून शेवटचे एकदा दुबईत फिरायला बाहेर पडलो. अखेरच्या भटकंतीसाठी निवडण्यात आलेलं स्थळ ना मॉल ऑफ द एमिरेट्स होता, ना शेख झायेद रोड, ना मरिना, ना आधी आम्ही पाहिलेली कुठलीही पॉश जागा. अल बरशा भागातल्या घराजवळच्या एका बागेत आम्ही गेलो. 
दुबईच्या प्रामुख्याने उपनगरीय भागांमध्ये ठिकठिकाणी अशा मोठमोठ्या बागा आता उभ्या असल्याचं काकाने सांगितलं. आसपास राहणाऱ्या सगळ्यांसाठीच ती होती. बाकी सगळ्या गोष्टींसारखीच हीच्यासाठीही आधी कागदावर कलाकुसर करून मग पहिलं फावडं तिथे अवतरल्यामुळे, ती ‘बाग’ च्या पुस्तकी व्याख्येत चपखल बसत होती. मोठ्ठी गोलाकार जागा, त्यात कडेने चांगले रुंद जॉगिंग आणि सायकलचे ट्रॅक्स, दोनतीन लहान मुलांच्या खेळण्याच्या जागा, काही छोट्या न्याहारीच्या टपऱ्या, आणि मध्यभागी मोठं तळं! आणि या सगळ्यांच्या मधून, आजूबाजूने आणि एकूणच सर्वत्र होती दाट झाडी, हे सांगणे नलगे! वाळवंटात आल्यापासून एवढी आल्हाददायक हिरवळ नजर टाकू तिकडे पसरलेली पाहिल्याचं आठवत होतं ते फक्त अल एय्नला. अशीच हिरवळ या महाकाय काँक्रिटच्या जंगलात बऱ्याच ठिकाणी मुद्दाम जपलेली आहे हे कळल्यावर मनातला गारवा अजूनच सुखावह वाटू लागला. 
एका ठिकाणी बऱ्याच सायकली ठेवलेल्या दिसत होत्या. काही साध्या, काही खास जोडप्यांसाठी दोन पेडल्स असलेल्या, तर काही चक्क चारचाकी; ज्यात चारही सीट्सच्या खाली पेडल्स होते. त्या पाहून मला खूप पूर्वी माझ्याकडे असलेल्या तशा एका गाडीची आठवण झाली. माझी गाडी अर्थातच फक्त एका लहान व्यक्तीसाठीच होती; आणि तिच्यात पेडल्स असूनही मी ती पायाने सगळीकडे ढकलण्यातच समाधान म्हणायचो. त्या तीन प्रकारच्या सायकली ओळीने मांडलेल्या पाहून माझ्या मनात एक मजेशीर कल्पना आली : अल बरशामध्ये राहणारी एक व्यक्ती नेमाने सकाळी या बागेत सायकल चालवायला येत असावी, आणि आठदहा वर्षांच्या कालावधीत तिला साध्या सायकलपासून चारचाकी सायकलपर्यंतची ‘बढती’ही याच बागेत मिळालेली असावी! आयुष्यातल्या या महत्त्वाच्या क्षणांना ही बाग साक्ष असताना, त्याच्या संध्याकाळी असं नुसतं तळ्याकाठी येऊन बसावंसं कुणाला वाटणार नाही? जिथे गेली अनेक वर्षं रोज सकाळी सूर्योदय बघायला यायचं तिथेच शेवटी सूर्यास्त बघत राहावं असं नक्कीच वाटू शकेल. पण त्या व्यक्तीला हे स्वप्न सत्यात उतरताना बघायला तिची मुलंबाळंही इथेच राहतील अशी व्यवस्था कारणं गरजेचं आहे; कारण शेवटी दुबईत फक्त कमावत्या लोकांना आणि त्यांच्या कुटुंबांनाच राहण्याची परवानगी आहे.    
आम्ही पाच जणं असल्यामुळे त्यापैकी कुठलीच सायकल आमच्या सोयीची नव्हती, म्हणून आम्ही जॉगिंग ट्रॅकच्या शेजारून चालत राहिलो. जॉगिंग ट्रॅक चमकदार केशरी रंगाचा होता; कदाचित रात्री थोडासा उठून दिसावा म्हणून तसं असावं. त्याच्यावर अंतरही लिहिलेलं होतं. एका बिंदूला सुरुवातीचा मानून तिथून शंभर मीटर, अडीचशे, पाचशे, एक किलोमीटर वगैरे अशा खुणा होत्या. ‘आज आपण एवढं अंतर पळलो’ ही गणितं मनात ठेवून मग त्यावरून दुपारच्या जेवणात मुळ्याची ती जास्तीची चकती खायची का नाही ते ठरवणाऱ्या लोकांसाठी ही व्यवस्था असावी! नशीब, अंतराच्या खुणांसोबत तोपर्यंत ‘बर्न’ झालेल्या कॅलरीज लिहिलेल्या नव्हत्या! थोडक्यात, इअरफोन्स घालून बागेत येणाऱ्या धापा टाकणाऱ्या जीवाची सगळी व्यवस्था लावून दिली होती, आणि त्याचबरोबर आमच्यासारख्या त्यांच्या मार्गातून हसून बाजूला होणाऱ्यांचीही. 
पुढे एका ठिकाणी ‘रस्त्यावरचं जिम’ हा हल्ली पुण्यातल्या काही रस्त्यांवर पाहायला मिळणारा प्रकार दिसला. चार-पाच जिममधली यंत्रं जमिनीवर बसवलेली होती आणि आल्यागेल्या प्रत्येकाला ती चालवून बघायची मुभा होती. मी आणि माझ्या बहिणीने गंमत म्हणून एक चालवून पाहिलं. चार उभ्या खांबांना दोन मागेपुढे हलणाऱ्या पट्ट्या लावलेल्या होत्या, आणि एका पट्टीवर दोन्ही बाजूंनी एकेक पाय ठेवायची जागा होती. एकमेकांकडे तोंड करून त्या पट्ट्यांवर उभं राहून योग्य वेळेला पाय हलवायचे असा तो व्यायाम. बाकीची यंत्रं सलग जास्त वेळ वापरणं आपल्याला खूपच दमवणारं वाटत असलं तरी हा व्यायाम आपण खूप वेळ आरामात करू शकतो. पुण्यातल्या रस्त्यांवरही सकाळी कधी चालायला गेलो तर मला त्यासाठीच बाहेर पडलेले ज्येष्ठ नागरिक या यंत्रावर उभं राहून पंधरावीस मिनिटं गप्पा मारताना दिसतात. आम्ही मात्र थोडा वेळ अचानक वेग वाढवून किंवा कमी करून एकमेकांना पाडायचा प्रयत्न केल्यावर खाली उतरून पुढे गेलो. 
बागेत एका कोपऱ्यावर एक पुस्तकांचं दुकान सापडलं. ‘दुकान’ म्हणजे खरं तर ते होतं फक्त एक उंच पांढरं बुकशेल्फ, जे वेगवेगळ्या पुस्तकांनी इतकं खच्चून भरलं होतं की त्यातून एक पुस्तक काढायचा प्रयत्न केला तरी त्याच्याबरोबर सगळी खाली येतील असं वाटत होतं. त्यापैकी खूप दीर्घकथा आणि कादंबऱ्या होत्या. त्यातल्या ‘फिक्शन’ असं छोटंसं स्टीकर लावलेल्या भागापाशी मी जरा घुटमळलो. अर्थात, पुण्यातल्या ब्रिटिश लायब्ररीचा सदस्य असल्यामुळे ही तशी प्रसिद्ध पुस्तकं विकत घेणं मूर्खपणाच ठरला असता. शिवाय प्रवासात वाचायला काहीतरी हवंच असं वाटलं तरी दुबईत पाऊल ठेवल्यापासून दुर्लक्षित राहिलेलं जॉन ग्रिशम माझ्याकडे होतंच. त्यामुळे तेव्हा ज्या पुस्तकांची नावं वाचून मला ती अचानक हवीहवीशी वाटली होती, ती नावं लक्षात ठेवून घरी परत गेल्यावर लायब्ररीतून ती घ्यायचं ठरवलं. अर्थात, ती नावं डोक्यातून सहज गळून जायला आम्ही तिथून पुढे गेल्यावर पाच मिनिटंही लागली नाहीत. 
पुढे तलावाच्या काठाजवळ एका झाडीने वेढलेल्या मोकळ्या जागेत काही टेबलखुर्च्या मांडलेल्या दिसत होत्या आणि आजूबाजूला पार्टीचे अवशेष दृष्टीस पडत होते. पूर्वी बाबांच्या ऑफिसमधल्या पार्ट्या अनेकदा अशा ‘निसर्गाच्या सान्निध्यात’ असत. मला ती जागा रम्य वाटली; शिवाय रात्रीच्या वेळी तळ्याच्या काठावर असं मंद प्रकाशात बसायला नक्कीच जास्त मजा आली असती. आता आम्ही तलावाच्या अगदी काठाशी आलो होतो.  त्यात एक लहानशी जेट्टी होती आणि तिच्या दोन्ही बाजूंना छोट्या होड्याही लावलेल्या होत्या. तलावात बोटिंग करता येतं हे कळल्यावर मी आणि माझी बहीण लगेच तयार झालो. जेट्टीच्या टोकाला असलेल्या एका छोट्या केबिनमधल्या माणसाकडून आम्ही अर्ध्या तासाचं तिकीट घेतलं आणि त्याने आम्हाला एक हंसाच्या आकाराची बोट वेगळी करून दिली. ती तशी लहानच होती आणि आतमध्ये एकच आडवं सीट आणि दोन पेडल्स होते. आम्ही तिच्यात चढायच्या आधी त्या माणसाने आम्हाला लाईफ-जॅकेट्स घट्ट बांधून दिली आणि गरज पडली तर कुठल्या तारा कुठल्या क्रमाने ओढायच्या वगैरे सांगितलं. या शिकवणीमुळे एकूणच आमच्या उत्साहावर जो विलक्षण परिणाम झाला होता तो त्याच्या पुढच्या सूचनेने दुणावला. त्याने आम्हाला एक वॉकीटॉकी देऊन तो कसा वापरायचा ते सांगितलं, आणि त्या संचातला दुसरा कसा त्याच्या स्वतःच्या जॅकेटला सतत अडकवलेला राहील अशी आम्हाला ग्वाही दिली. 
आम्ही पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री करून मग त्याने आम्हाला बोटीत बसू दिलं, आणि शांतपणे “जा,” एवढंच म्हणाला. दुबईतून जायच्या ऐवजी बोट थेट पलीकडच्या किनाऱ्यावर नेऊन बाकीच्यांनी काही हालचाल करायच्या आत कुठेतरी पसार व्हायचं म्हटलं तर ते फार अवघड गेलं नसतं असा एक मजेशीर विचार माझ्या मनात येऊन गेला. माझ्या या साहसाला माझ्या बहिणीचा संपूर्ण सहभाग आणि पाठिंबा असता याचीही मला खात्री होती. पण बोट जेट्टीला जोडलेल्या तिच्या अधांतरी फलाटामधून पूर्ण बाहेर पडून तलावात शिरेपर्यंतच आमचे दोघांचेही पाय ठणकायला लागले होते. पण पहिल्यांदाच करतोय म्हणून वाटत असेल, हळूहळू सवय होईल असा विचार करून आम्ही जिद्दीने पुढे गेलो. सायकलची पेडल्स मारण्याच्या दुप्पट जोर सहजच लागत होता. तलावाला मधल्याच भागातून एक गोल चक्कर मारून परत येण्याचा आमचा विचार होता, म्हणून आता बोट वळवणं गरजेचं होतं. त्याक्षणी आपण एकूणच या सगळ्या प्रकाराबद्दल किती अनभिज्ञ आहोत याची दोघांनाही एकदमच जाणीव झाली. शेवटी आम्हाला उजवीकडे वळायचं असल्यामुळे आणि माझी बहीण डाव्या बाजूला बसल्यामुळे थोडा वेळ फक्त तिनेच पेडल्स मारली तर बोट वळेल असा आम्ही तर्क केला; तो बरोबर ठरला. बोट हळूहळू वळायला लागली. बोट पूर्ण वळवून झाल्यावर आता गोलाकार वळण घ्यायचं असेल तर प्रत्येक वेळी तिलाच बोटीला वळवावं लागणार असं लक्षात आल्यावर आम्ही तोही बेत रद्द केला, आणि काही वेळ नुसतं सरळ पुढे जाऊन मग डावीकडे वळून आल्या मार्गानेच परत जायचं ठरवलं. समोर लांबवर दिसणाऱ्या किनाऱ्याकडे, त्यावरच्या झाडांकडे आणि त्यांच्या मागे दूर उभ्या असलेल्या मरिनातल्या इमारतींकडे आम्ही जायला लागलो. पाचएक मिनिटं सरळ पेडलिंग केल्यावर पायांचा आरडाओरडा ऐकून आम्ही जरा थांबलो. थांबून आजूबाजूला पाहिल्यावर आमच्या लगेच लक्षात आलं की आम्ही आता तळ्याच्या बरोबर मध्यभागी होतो. 
काही वेळाने मी पेडल्स मारायला लागलो आणि मग हळूहळू वेग वाढवून बोट पूर्ण वळवली. इथपर्यंत येताना घेतलेला लॉंगकट पुन्हा घेण्याची आमची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून आमच्या हंसाच्या अगदी नाकासमोर जेट्टी येईपर्यंत आम्ही ती वळवत राहिलो. ते झाल्यावर मग एक खोल श्वास घेऊन आम्ही जीव खाऊन पेडल्स मारायला सुरुवात केली. निघतानाचा उत्साह पुन्हा अंगात संचारल्यासारखं वाटत होतं. परिणती बोट जेट्टीपर्यंत येईस्तोवर तिचा वेग चांगलाच वाढलेला होता आणि टक्कर होऊ नये म्हणून माझ्या बहिणीला घाईघाईने ती वळवून फलाटाशी समांतर आणावी लागली. मग हळूहळू फलाटाच्या कडेकडेने बोट नेऊन ती परत तिच्या मूळ जागेवर आणली. निघताना होती तशीच परत ठेवायला ती रिव्हर्स कशी न्यायची हा प्रश्न मनात येताच आम्ही तो काढून टाकून सरळ बोट तशीच आत नेली. त्या माणसाने हसून आम्हाला उतरायला मदत केली आणि आमचे जॅकेट्स आणि रेडिओ काढून घेतले. सुदैवाने पाय वेगाने मूळपदावर आले आणि आम्ही त्या तिघांनी काढलेले आमचे फोटो बघत तिथून निघालो. माझ्या बहिणीबरोबर केलेल्या इतर सगळ्या राईड्सप्रमाणेच, ही राईडही मागे वळून पाहिल्यावर अगदीच रोमांचक आणि आनंददायी ठरल्याचं लक्षात आलं होतं. 
लवकरच आम्ही परत बाहेर आलो आणि घरी जाण्यापूर्वी एकदा समुद्रकिनाऱ्यावर जाऊन यायचं ठरलं. पहिल्या दौऱ्याच्या वेळी आम्ही जुमेराह भागातल्या किनाऱ्यावर जाऊन आलो होतो, त्याच्यात आणि या किनाऱ्यात विशेष फरक नव्हता. असलाच तर एवढाच की त्यावेळी बुर्ज अल अरब उजवीकडे होता आणि यावेळी डावीकडे! बाकी लाटा आणि त्यांच्याशी खेळणारे लोक तसेच होते. सगळी दुबई तशीच होती. गेल्या दहा दिवसांचा हा काळ आमच्यासाठी अविस्मरणीय ठरलेला असला तरी, रोजच्या रोज एकाचवेळी हसरा आणि रडका असे दोन्ही मुखवटे चढवून पर्यटकांचं स्वागत करण्याची आणि त्यांना निरोप देण्याची सवय असलेल्या दुबईच्या दृष्टीने आजही दिवसासारखा दिवसच होता. 
किनाऱ्यावरच्या एका चारही बाजूंनी उघड्या लाकडी कुटीत उभं राहून आम्ही वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समध्ये बुर्ज अल अरबच्या समोर उभे राहून ट्रिपमधले शेवटचे फोटो काढून घेतले. थोडा वेळ शांतपणे लाटांकडे बघत राहिल्यानंतर आम्ही परत फिरलो आणि गाडीत बसून घरी आलो. जेवणाची वेळ झालीच होती, तेव्हा आदल्या दिवशीच्या प्रॉन्सवर पुन्हा एकदा आनंदाने ताव मारला. 
विमान तसं संध्याकाळी उशिराचं होतं. पण प्रक्रियांचा आणि जाण्याचा वेळ धरून आम्ही घरातून साडेचारला निघणं गरजेचं होतं. हा मधला काळ तसा विचित्र प्रकारे गेला. सामानाची सगळी तयारी झाली होती तरी अधूनमधून एकदोनदा बॅगा तपासल्या गेल्या. विमानाने दिल्लीला जाऊन मग दुसऱ्या विमानाने पुण्याला यायचं असल्यामुळे दीर्घ प्रवासाच्या आधी कराव्यात त्या सगळ्या गोष्टी करून झाल्या. वाटत होतं शेवटच्या या दोनअडीच तासांतला एकूणएक क्षण आनंदात घालवावा, पण तो क्षण येत होता आणि जात होता आणि आम्ही तसेच बसून कुठल्याही विषयावर काहीही बोलत होतो. निघण्याच्या वेळेपर्यंत करण्यासारखं काहीच उरलं नाहीये असं जाणवलं की लवकर निघायचे विचार आपोआप मनात येतातच; कारण निरोपाच्या क्षणाची वाट बघत बसणं यापेक्षा खुद्द तो क्षण केव्हाही कमीच त्रासदायक वाटतो. जरा आधी जाऊया असं म्हणण्याइतका हा मधला वेळ थोडाथोडका नव्हता, पण काहीतरी नवीन करता येईल इतका जास्तही नव्हता. एकामागून एक येणारे क्षण आम्ही तसेच शांतपणे घालवत बसलो होतो. 
पहिला ‘चला’ असा उद्गार निघाल्यानंतर लगेच निघणं कधीही होत नाही. तिथून निघण्याच्या प्रक्रियेला फक्त गती येते. कुणाच्याही घरी त्यांना भेटायला गेलो आणि गप्पा, खाणंपिणं वगैरे सगळं आटोपल्यानंतर एखादा विषय अचानक संपल्याचं दिसलं की मी मनातल्या मनात पाच सेकंद मोजायचो, आणि तेवढा वेळ शांतता टिकली तर हा पहिला ‘चला’ हटकून यायचाच, असं मी एक निरीक्षण नोंदवलं होतं. त्यानंतर दारातून बाहेर पडेपर्यंत किमान दहा मिनिटं तरी जायचीच. इथेही तसंच झालं. दाराबाहेर पडेपर्यंत घुटमळणारा पाय एकदा दार बंद झालं की मग मात्र वेगाने हालचाली करू लागतो. वास्तविक यावेळी तो अगदी विमानात चढेपर्यंतही घुटमळला असता, पण ते वाट बघणं एकदाचं संपल्याचं त्यालाही हायसं वाटलं होतं. 
मी, बाबा, काका आणि काकू विमानतळावर पोहोचलो आणि पहिल्यांदाच मुख्य प्रवेशद्वारातून आत गेलो. काका गाडी लावायला कुठेतरी निघून गेला. गेले दहा दिवस आम्हाला सगळीकडे हिंडवणाऱ्या त्या गाडीचं शेवटचं दर्शन! आम्ही तिघं आत शिरलो आणि एक ट्रॉली हुडकून टोकाला असलेल्या काउंटर्सच्या रांगेकडे निघालो. चेक-इनच्या रांगा उघडलेल्या होत्या आणि उरलेला वेळ बोर्डिंग पास घेऊन मग सगळ्याच्या ‘पलीकडे’ काढायचा असं ठरलेलंच होतं. काउंटरच्या वरच्या मोठ्या स्क्रीनवर दुबई ते दिल्ली विमान दिसल्यावर आम्ही त्या रांगेत शिरलो. एक शेवटचा फोटो रांगेत सामानाशेजारी उभं राहून काढावा असं बाबांना वाटलं, आणि त्यानुसार सामानाच्या ट्रॉलीशेजारी मी उभा राहिलो. 
“स्माईल,” बाबा सवयीने म्हणाले. मी हसलो नाही. 


                                                                                                         

The Dubai Diaries continue on DD22

Comments

Popular posts from this blog

माय

अदृश्य सोबती

Dubai Diaries Special Edition: कमलपुष्प