Dubai Diaries: पक्षीनिरीक्षण
सकाळी उठलो तेव्हा अचानक असं जाणवलं की आज दुबईतला पूर्ण असा शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी दुपारी आम्ही परत जायला निघणार होतो. हे लक्षात आल्यावर क्षणभर मी जरा उदास झालो, पण आजचा दिवस पूर्णपणे मोकळा होता हे कळल्यावर पुन्हा सुखावलो. करायलाच हवं होतं असं सगळं संपलं होतं. एकदोन दिवसांपूर्वी कधीतरी पुन्हा एकदा मॉल ऑफ द एमिरेट्समधल्या ‘कॅरेफोर’ दुकानाला भेट देऊन चॉकलेट्स, खजूर, बाक्लावा (काका भारतात आला की खूपदा आणायचा ती एक अरबी मिठाई) वगैरे खरेदी करून झाली होती. मी काही जवळच्या लोकांना देण्यासाठी म्हणून सर्वांत सुंदर फोटो असलेली फ्रिज मॅग्नेट्स निवडून घेतली होती, आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुर्ज खलिफाच्या एका छोट्या प्रतिकृतीचीही खरेदी झाली होती. बुर्ज खलिफाच्या वरच्या मजल्यावर विकत मिळणाऱ्या प्रतिकृतीसारखीच ही दिसत होती, पण हिची किंमत तुलनेने खूपच कमी होती, त्यामुळे ती इथे विकत घेण्याचा निर्णय (बाबांनी) घेतल्याबद्दल मला आता आनंद होत होता. किंमत कमी असेल तर मूर्तीही तेवढी चांगली नसेल अशी माझ्या मनात आधीचे काही दिवस चुकचुकणारी शंकेची पाल आता शांत झाली. त्या आधी पाहिलेल्या प्रतिकृतींएवढीच कोरीव, नक्षीदार आणि सुंदर सोनेरी रंगाची प्रतिकृती आता एका मखमली पेटीत ठेवलेली होती आणि ती पेटी आमच्या मोठ्या बॅगेच्या तळाशी दोन गुबगुबीत टॉवेल्सच्या मध्ये सुरक्षित होती.
काकूने आजच्या दुपारच्या जेवणासाठी एकदम खास बेत केला होता, आणि त्यासाठी आम्हाला आता एक मासा आणायला जायचं होतं. “त्यासाठी बाहेर पडतोच आहोत तर तुमची ती ‘पक्षीनिरीक्षणाची’ हौस भागवून घेऊ,” असं तिने गमतीत सुचवल्यावर मी आणि बाबा लगेच तयार झालो. आमच्या या ‘हौसेचा’ वास्तविक दुबईशी असा संबंध नव्हता, कारण आम्हाला बघायचे होते ते हे पक्षी आता हळूहळू जगभर पसरत होते. काही वर्षांनी भारतातही आलेच असते. पण हाती आलेली संधी कशाला सोडा? इथे हे स्पष्ट केले पाहिजे की मी प्राणिसंग्रहालयाची गोष्ट सांगणार नाहीये. खरंखुरं वैविध्य पाहायला मिळणार असेल तरच मला प्राणिसंग्रहालयात जायला आवडलं असतं, आणि म्हणूनच आम्ही सिंगापूरमधल्या पाचपैकी दोन दिवस अनुक्रमे तिथल्या झू आणि बर्ड पार्कमध्ये घालवले होते. त्या अनुभवानंतर त्या झूच्या तोडीचा झू जगात नसेल असा विचार मी केला होता, पण ऑस्ट्रेलियाचा झूही खूपच विलक्षण असल्याचं बाबांचं म्हणणं आहे. थोडक्यात दुबईचा झू बघण्यात आम्हाला विशेष रस नव्हता. झू असणार हे उघडच होतं; त्यालाही संघात्मक ‘दुबई झू’ असं नाव असणार आणि दुबईच्या स्वभावानुसार तिने जगातले होते नव्हते तेवढे सगळे पशुपक्षी त्यात आणून ठेवायचा प्रयत्न केला असणार. पण आम्हाला वेगळ्याच प्रकारचं पक्षीनिरीक्षण करायचं होतं. शेवटी मी, बाबा, काका आणि काकू असे चौघेच जाणार असं ठरलं, कारण माझ्या बहिणीला अभ्यास करायचा होता आणि आजीने आधीच “मला काही तुमच्या त्या A380’s मध्ये रस नाही,” असं सांगून शब्दकोडं उचललं होतं. म्हणून मग आम्ही चौघंच निघालो, विमानतळाकडे!
माझ्या आणि बाबांच्या खूप आवडीनिवडी सारख्या आहेत, त्यापैकी ठळक म्हणजे अर्थातच हॉलिवूड आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणं. ‘एअरबस’ कंपनीची ‘A380’ नावाची विमानाची एक चांगलीच सुदृढ जात ही अशीच एक आवड. ते विमान आलं तेव्हापासून त्याच्या अंतरंगाचे, उड्डाणाचे आणि तांत्रिक गोष्टींचे खूप व्हिडिओ आमचे पाहून झाले होते; पण प्रत्यक्ष ते विमान पाहायचं राहून गेलं होतं. दुबईतल्या ‘एमिरेट्स’ आणि ‘एतिहाद’ या दोन्ही मोठ्या विमानकंपन्यांकडे या मॉडेलच्या विमानांचा अक्षरशः ढीग होता, आणि दुबईचा विमानतळ हा जगातल्या सगळ्यात रहदारीच्या विमानतळांपैकी एक होता हे ठाऊक असल्यामुळे योग्य वेळी गेलो तर खूप A380 बघता येतील असा काका-काकूने अंदाज केला होता, आणि तो अर्थातच बरोबर ठरला.
सकाळी साडेसात-आठच्या सुमारास काकाची गाडी जुन्या दुबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरून धावत होती. विमानतळाचा एकूण विस्तार त्याला मेट्रोने भेट दिली होती त्या दिवशी पाहिला होता, पण त्याच्या मागच्या बाजूने जाताना तो अजून वाढवत असल्याचं दिसलं. एका ठिकाणी रस्ता खूप वळणं घेत कसाबसा त्या भल्यामोठ्या बांधकामाच्या जागेतून वाट काढत गेला. एक नवीन टर्मिनस बांधण्याचं काम सुरु असल्याचं काकाने सांगितलं. त्या सगळ्या खांबांच्या आणि लोखंडी सळयांच्या जाळ्यातून वाट काढून आम्ही एका जरा लांबच्या रस्त्याला लागून वळलो. हा रस्ता मुख्य रस्त्यांपासून लांब होता आणि त्या वेळी तसा निर्मनुष्य होता. त्याच्या एका बाजूला असलेली दुकानं अजून उघडायची होती. दुसऱ्या बाजूला फक्त पार्किंगसाठी जागा होती. हा रस्ता विमानतळाच्या खूप जवळ असल्यामुळे तिथे गर्दी झाली तर लोक इथेही त्यांच्या SUV लावून पुढे जाऊ शकत असावेत. आत्ता मात्र तिथे आमच्याशिवाय दुसरी गाडी नव्हती. आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि समोरचं दृश्य बघत राहिलो. आमच्या समोर काही अंतरावर दुबई विमानतळाची अवाढव्य धावपट्टी आणि तिच्या उजवीकडे एक टर्मिनसची अंडाकृती इमारत होती. त्या टर्मिनसला जोडलेल्या अनेक अधांतरी पुलांपाशी नाकं लावून जाडजूड विमानं उभी असलेलीही दिसत होती. धावपट्टीच्या टोकाला काही तशाच विमानांची रांग लागलेली होती. या ठिकाणी येण्यामागची हुशारी आता माझ्या लक्षात आली. धावपट्टीवरून येणारे विमान थेट आमच्या दिशेने येणार होते आणि उड्डाण घेऊन आमच्या डोक्यावरूनच पलीकडे जाणार होते. आम्ही गाडीच्या टपातली खिडकी उघडून अगदी तयार होऊन बसलो. मग दूरवर दबा धरून बसलेल्या घारीसारख्या दिसणाऱ्या त्या विमानाने अखेर हालचाल केली. एवढ्या लांबून बघत असल्यामुळे असेल पण ते फारच संथपणे आमच्याकडे येत होतं असं मला वाटलं. ते तितक्याच शांतपणे उडालं आणि आमच्या डोक्यावर आलं. आम्ही सगळी उत्सुकता डोळ्यात घेऊन त्या खिडकीतून बघत राहिलो, पण आम्हाला अपेक्षित असलेल्या कोंबडीऐवजी चिमणी बघायला मिळाली. ते विमान आमच्या नजरेपुढून जातं न जातं तेवढ्यात पुढचं समोर येऊन उडायच्या तयारीतही असल्याचं आम्ही पाहिलं. एकामागून एक अशी तीनचार छोटी विमानं आमच्या डोक्यावरून उडून गेली.
आता मात्र समोर असलेलं विमान नक्की A380च असल्याची आमची खात्री झाली, कारण आधीच्या विमानांमध्ये आणि त्याच्यात ठळक फरक होते. एकतर समोरून दिसणारं त्याचं गोलाकार तोंड आधीच्या विमानाच्या तोंडाच्या दुप्पट होतं, आणि पंखांच्या खाली नेहमीच्या दोनऐवजी चार मोठी जेट इंजिनं बसवलेली दिसत होती. बाकीची विमानं उड्डाणाच्या वेळी जेवढी दिसायची तेवढंच हे पळायच्या आधी दिसत होतं. ते आमच्या दिशेने धावायला लागल्यावर मी माझ्याच नकळत क्षणभर सीटवरच मागे सरकलो, कारण आधीच्या विमानांनी ज्या ठिकाणाहून उड्डाण घेतलं होतं ते याने धावत केव्हाच मागे टाकलं होतं. ते विमान मोठं असल्याने त्याला उडण्यापूर्वी जास्त अंतर पळावं लागत असणार असं बाबा म्हणाले; आणि खरोखरीच ते विमान अगदी कुंपणांजवळ येऊन मगच उडालं. “खिडकीतून डोकं बाहेर काढ,” असं काका म्हणाला आणि मी सीटवरच गुडघ्यांवर बसून टपामधून बाहेर डोकावलो. काकाची सूचना अगदी वेळेवर होती. आधीच्या विमानांपेक्षा जाणवेल एवढा जास्त आवाज न करता ते महाकाय धूड संथपणे माझ्या डोक्यावरून उडत गेलं. ते गेल्यानंतर हा मधला वेळ आम्ही त्याच्याच सावलीत उभे होतो असं माझ्या लक्षात आलं. तेवढ्यात काकूने मला ओढून पुन्हा खाली बसवलं आणि समोर बघायला सांगितलं. समोर धावपट्टीवर दुसरं पळायलाही लागलं होतं. दुसरं विमान आमच्या डोक्यावरून उडताना मध्येच जरा डावीकडे झुकलं आणि आम्ही हादरलोच, पण लगेच ते सरळ होऊन पुढे गेलंही. हा प्रकार अगदीच किरकोळ असल्याच्या थाटात त्यानंतर आम्ही पाहिलेल्या पंधरासोळा A380’s पैकी निम्म्याअर्ध्या विमानांनीही तसंच केलं. कदाचित त्यात विशेष लक्ष देण्यासारखं खरंच काही नसावं.
किमान वीसएक A380 आणि काही इतर लहान विमानं उड्डाण घेताना पाहून झाल्यावर हौस भागल्याचं जाहीर करून आम्ही तिथून हललो. मी घड्याळ बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की आम्ही तिथे गाडी पार्क केल्याला फारतर अर्धा तास झाला असेल. दुबई विमानतळ खरोखरच केवढा ‘बिझी’ आहे त्याचा हा जिवंत पुरावाच होता. पूर्वी एकदा सोलापूरला एका उद्यानातून दूरवर दिसणाऱ्या रुळांवरून दोन तासात आम्हाला सहा आगगाड्या जाताना बघायला मिळाल्या याचा मला केवढा आनंद झाला होता! आणि इथे रांग लावून उभी असलेली A380 मिनिटामिनिटाला उडत होती.
दुबईच्या आमच्या भागात परत आल्यावर आम्ही न्याहारी करायला म्हणून एका अरुंद गल्लीत वळलो. त्या गल्लीतलं एक ‘Take-away’ हॉटेल त्या भागात खूपच लोकप्रिय होतं असं काका म्हणाला, आणि आमच्यासमोर लागलेल्या SUV गाड्यांच्या त्या लांबलचक रांगेवरून ते सहजच दिसत होतं. दुबईतल्या इतर सगळ्या ‘ठिकाणां’प्रमाणेच या दुकानाचीही ‘खासियत’ काका-काकूच्या मनात पक्की होती आणि आम्ही शेवटी त्या दुकानापाशी पोहोचल्यावर आम्ही चहासोबत तीच मागवली. ऑर्डर दिल्यावर मात्र आम्हाला गाडी पुढे न्यावी लागली, कारण त्या दुकानातली माणसं खोळंबा व्हायला नको म्हणून ऑर्डर्स तयार होतील तशा त्या-त्या गाड्यांपर्यंत नेऊन पोहचवत होते. त्यांचं कामही झटपट असावं, कारण गल्लीच्या टोकाला पोहोचेपर्यंत त्या गाडीला आपली ऑर्डर मिळालेली असायची. आम्हालाही पाचसहा मिनिटांतच एका माणसाने चार चहाचे कप आणि चार ‘wraps’ आणून दिले. आपण लहानपणापासून पोळीच्या सुरळीत भाजी किंवा चटणी कोंबून खात आलो आहोत तोच प्रकार आता ‘wrap’ या नावाने पुण्यातही प्रतिष्ठा पावतोय. हेही तसंच, फक्त इथे पोळी अर्थातच जाड होती आणि आतमध्ये भाजीऐवजी अंड्याचा कुठलासा प्रकार होता. शिवाय तिखट चिप्सचे तुकडे! ‘Wrap’ नीट पकडला नाही तर आतलं सारण आपण ‘कुठे गेलं’ म्हणेपर्यंत दुसऱ्या बाजूने आपल्या मांडीवर विसावलेलं असतं हे तर आहेच, पण इथे त्या चिप्समुळे घासागणिक सर्वत्र चुराही सांडायची भीती होती. ही सगळी कसरत करत हळूहळू खाणं सार्थकी लावणारी त्याची चव मात्र होती.
हे सगळं करण्यासाठी आम्ही एका पार्किंगमध्ये थांबलो होतो. ऑर्डर मिळाल्यानंतर लगेच गल्लीतून बाहेर पडावं लागल्याने आम्ही ते सगळं घेऊन तसंच समुद्रकिनाऱ्याकडे निघालो होतो. तिथल्या एका दुकानातून मासा घ्यायचा होता. तिथून जवळच एका ठिकाणी एक मोठं पार्किंगचं आवार सापडलं, तिथे एक जागा पकडून मग आम्ही गाडीतच खाऊन घेतलं होतं. ते झाल्यावर मग गाडी तिथेच ठेवून पायी त्या दुकानाकडे निघालो. पार्किंगमधून बाहेर पडण्यापूर्वी तिथे उभी असलेली एक पांढरीशुभ्र लॅम्बॉर्घिनी दृष्टीस पडली, तेव्हा अशी गाडी रस्त्यावर सापडली याला शुभशकुन मानून आम्ही पटकन तिच्यासोबत एक फोटो काढायचं ठरवलं. तिच्याशेजारी उभं राहिल्यावर मला माझ्या अवताराची उगीचच जाणीव झाली, पण क्षणभरच. माझ्या अचानक लक्षात आलं की मी अगदी तयार वगैरे होऊन उभा असतो तरी फोटो बघताना माझ्याकडे कोणी बघितलं असतं?
पार्किंग ओलांडताना तिच्या दिशेने एक हात हलवून आम्ही पलीकडच्या गल्लीतून चालायला लागलो. उजवीकडे थोड्या लांबवर समुद्र असल्याचं कळत होतं. आम्ही डावीकडच्या एका बांबूच्या खोपट्यात शिरलो; त्याच्यात काही गळ आणि जाळी वगैरे ठेवलेली होती. दोन मोठ्या बर्फाच्या पेट्याही होत्या. एकदोन माणसं लगेच आमच्याकडे आली आणि काकूशी बोलून त्यांनी त्यापैकी एक पेटी उघडली. आतमध्ये एकच मोठा मासा होता. काकूने मला तो ‘घ्यायला’ सांगितलं. चांगलाच जड होता. अनेकदा इंग्लिश कादंबऱ्यांमध्ये वाचलेल्या ‘फिशिंग’ नावाच्या सोहळ्याच्या सगळ्यात जवळ जाणारा तेवढाच एक अनुभव! तोही कॅमेरामध्ये कैद झाला आणि मग त्या लोकांनी तो मासा आम्हाला बांधून दिला. दुपारी जेवणात तो सबंध ‘किंगफिश’ आणि शिवाय प्रॉन्स एवढं उडवल्यावर सगळ्यांनी रात्रीचं जेवणही आत्ताच होऊन गेल्याचं जाहीर केल्याचं मला आठवतंय!
दुपारच्या जेवणानंतर खरंतर मी झोपायलाही तयार होतो, पण आता दुबईत घालवायला फक्त चोवीस तास शिल्लक आहेत असं अचानक लक्षात आलं. अशा वेळी खूप काही करावंसं वाटतं, पण त्याचबरोबर नवीन काही उरलंही नाहीये असं लक्षात येतं. प्रत्येक गोष्टीचा पहिलाच अनुभव इतका perfect होता की पुन्हा ती करायला जाऊन आधीपेक्षा जरा वाईट अनुभव आला तर, अशी भीतीही होती. मग मी मनात म्हटलं, अशी भीती वाटणं हेच ट्रिप उत्तम झाल्याचं सुचवत नाही का? पण अचानक मला वाटलं की एक गोष्ट अशी होती जी पुन्हा करायला मी एका पायावर तयार होतो, कारण ती अशी होती की ती आधीच्याएवढी चांगली न जाणं, किंवा ती शिळी होणं, दोन्ही अगदीच अशक्य होतं. हा विचार मनात आल्याबरोबर मी उरलेली संपूर्ण संध्याकाळ माझ्या बहिणीसोबत घालवायचं ठरवलं. तिचा अभ्यास वगैरे सकाळीच पूर्ण झाल्यामुळे तीही मोकळीच होती. आम्ही ‘फ्रेंड्स’ बघितलं, इंटरनेटवरच्या काही मजेशीर क्विझ खेळून बघितल्या, व्हिडिओ गेम्स खेळले आणि नंतर बराच वेळ खेळण्यातल्या विटांपासून उगीच काहीतरी बांधत खूप गप्पा मारल्या. मधल्या वेळात पुन्हा एकदा मॉल ऑफ द एमिरेट्सला गेलेले काका, काकू आणि बाबा परत येईपर्यंत आम्ही तसेच बसलो होतो.
मॉलमध्ये त्यांनी काही प्रवासासाठीच्या गोष्टींची खरेदी केली होती. मॉल हा चक्क काहीतरी विकत घेण्यासाठी वापरला हे ऐकून मी उगीच आश्चर्य वाटल्याचं दाखवलं. या तशा पूर्णपणे नव्या संस्कृतीबद्दल उपहासात्मक बोलण्याएवढा तिच्याशी परिचय फक्त गेल्या दहा दिवसांत झाला होता! बाबांना कुठेही बुर्ज खलिफाचा फोटो असलेला टी-शर्ट सापडला नव्हता, म्हणून ते माझ्यासाठी तीन अव्हेंजर्सचे शर्ट घेऊन आले होते. या दुधाच्या पातेल्यात चमचाभर साखर टाकायला काकूच्या हातातली ‘बास्कीन रॉबिन्स’ लिहिलेली मोठी पिशवी पुरेशी होती. त्यांनी निवडलेले सहाही फ्लेवर्स भन्नाट होते, म्हणून आम्ही एक निवडायच्या ऐवजी सरळ पंगत केली. हेही एक नवीनच!
सगळं झाल्यानंतर मी बराच वेळ खिडकीपाशी उभा राहून बाहेर बघत राहिलो.
The Dubai Diaries continue on DD21
The Dubai Diaries continue on DD21
आदित्य!
ReplyDeleteमला प्रवासवर्णन सर्वाधिक आवडतं, मी तुझा ब्लॉग वाचायची सुरुवात प्रवासवर्णनाने करतोय. वाचकाशी थेट संवाद साधते तुझी शैली. मला वाचताना प्रत्यक्ष तिथंच तुझ्या आजूबाजूला आहे, असं जाणवत होतं. भविष्यात दुबईत गेलो तर आधी हा अनुभव आठवेल मला. छोट्या छोट्या गोष्टी अगदी नेमकेपणाने तू शब्दात पकडल्या आहेत.
ReplyDelete